Friday, September 11, 2020

सुशांत प्रकरण आणि राजकारण

 सुशांत प्रकरणात त्याची आत्महत्या की हत्या याचा तपास करण्यावरून वाद सुरू झाला. पण शुक्रवारी यातूनच काही अटका व धाडी घालण्यात आलेल्या आहेत. आता यात हाती आलेल्या अंमली पदार्थ व्यापाराचे धागेदोरे थेट कर्नाटक केरळापर्यंत जाऊन पोहोचल्याचे उघडकीस येत आहे. म्हणूनच यातले वेगवेगळे दुवे समजून घेण्याची गरज आहे. यात सीबीआय किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणा, अनेक गोष्टी जाहिरपणे सांगत नसतात आणि सांगूही नयेत. पण अनेकदा आपल्याला विविध वाहिन्या वा माध्यमातून आतल्या गोटातली बातमी वा माहिती म्हणूनही काही गोष्टी ऐकू येत असतात. त्याचा अशा यंत्रणा इन्कार करीत नाहीत आणि त्याला दुजोराही देत नसतात. कारण जी माहिती हाती येते वा जमवली जाते, ती परिपुर्ण नसते किंवा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यातली अन्य पुरक माहिती मिळवणे भाग असते. पण ती माहिती सहजासहजी उपलब्ध होणार नसते. तेव्हा हाती लागलेली माहिती निवडक स्वरूपात उघड करून त्यावरच्या प्रतिक्रीया वा प्रतिसादातून नवे धागेदोरे हाती आणले जातात. म्हणूनच सुशांतच्या तपासात ज्या यंत्रणा काम करीत आहेत, त्यांनी अजून एकाही बाबतीत इन्कार वा दुजोरा देण्याचा धोका पत्करला नाही. पण उलटसुलट माहिती बाजारात पसरू दिलेली आहे. त्यामुळे काही लोक इतके अस्वस्थ झालेले आहेत, की त्यांनी रोजच्या रोज या तपासावर बातम्यांची खळबळ उडवून देणार्‍या माध्यमांवर प्रतिबंध लावावा म्हणून हायकोर्टात धाव घेतलेली आहे. कारण यातले बहुतांश माजी पोलिस अधिकारी असून त्यांना तपास यंत्रणांनीच यातून लावलेला सापळा समजू शकतो.


अनेकदा अर्धवट माहिती संबंधितांना भयभीत करणारी असते. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणात कुठूनही आपला संबंध असेल अशा लोकांना धडकी भरत असते. त्यामुळे त्यातले कच्चे दुवे असतात, त्यांचा धीर सुटत असतो व त्यांच्याकडून नको ते बोलले सांगितले जाण्याने इतरांना अडचणीत आणले जाऊ शकत असते. मुंबई पोलिसांनी जो हलगर्जीपणा केला, त्यामुळे हा तपास सीबीआयकडे गेलेला आहे आणि त्यातून निघणारे धागेदोरे इतिहासातही जाऊ शकणार आहेत. कारण बॉलीवुड वा माफ़िया यांच्यातले जाळे एका दिवसात किंवा एका वर्षात उभे रहात नसते. त्याची जुळणी अनेक वर्षाच्या परस्पर विश्वासातून व सहकार्यातून होत असते. सहाजिकच आजचे पोलिस ज्या बेदरकारपणे सुशांत व दिशा सालियान प्रकरण गुंडाळत गेले, त्यामागे एक शिष्टाचार वा कार्यपद्धती सामावलेली आहे. त्यामुळे सुरू झालेला तपास आणि सीबीआय वा अन्य यंत्रणांनी मारलेली मुसंडी बघता, इतिहासात डोकावले जाण्याची शक्यता वाढलेली आहे. ती भिती अनेक निवृत्तांच्या पोटात गोळा उठवणारी असल्या्स नवल नाही. अन्यथा अचानक या निवृत्तांना मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा वा मीडिया ट्रायल असल्या गोष्टींनी विचलीत नक्की केले नसते. आता ज्या गोष्टी चव्हाट्यावर येत आहेत आणि नार्कोटीक्स ब्युरोने ज्या वेगाने धरपकड केलेली आहे, त्याकडे पहाता हे जंजाळ खुप जुने व स्थिरावलेले आहे. त्याचे धागेदोरे थेट कर्नाटक व केरळपर्यंत एका सुशांत वा रिया चक्रवर्तीच्या प्रकरणापुरते असू शकत नाहीत. त्यात मुठभर माणसेच गुंतलेली नाहीत. स्थानिक पातळीवर काम करणारे सापडले आहेत आणि त्यांना वेठीस धरून त्यांचे गॉडफ़ादर शोधण्याचा चाललेला प्रयास म्हणूनच भल्याभल्यांची झोप उडवणारा आहे. अन्यथा माध्यमांपासून प्रतिष्ठीतांपर्यंत अनेकांचे मुखवटे कशाला फ़ाटले असते?


मालेगाव बॉम्बस्फ़ोटाचे निमीत्त करून कर्नल पुरोहित यांना गोवले गेले आणि अजून त्यांच्यावरचा खटलाही चालू होऊ शकलेला नाही. बारा वर्षे त्यांच्यासह साध्वी प्रज्ञासिंग यांना आरोपी ठरवून सातत्याने हिंदू दहशतवादाचा डंका पिटला गेलेला आहे. आठ वर्षे कुठलाही गुन्हा सिद्ध केल्याशिवाय त्यांना तुरूंगात डांबताना त्यांची प्रतिष्ठा काय, किंवा त्यांच्या अब्रुचे उडवण्यात आलेले धिंडवडे आज कोर्टात धावणार्‍यांना दिसले नव्हते काय? लष्करातला एक उमदा कर्तबगार कर्नल ज्याप्रकारे गुन्हेगार म्हणून अपमानित करण्यात आला, किंवा त्याचा छळ करण्यात आला, तेव्हा यापैकी कोणाला त्यातली मीडिया ट्रायल दिसली नव्हती का? मुळातच कर्नल पुरोहित यांच्यावर आरडीएक्सचा आरोप ठेवण्यात आला. त्यांचा प्रशिक्षणापासून कामापर्यंत कुठेही अशा रसायनाशी कुठे संबंध येत नाही. त्यांच्या घरात अशी द्रव्ये ठेवून खोटे पुरावे निर्माण करण्यापर्यंत मजल गेलेली होती. यामागे काहीच  राजकारण नव्हते? तेव्हा सत्ताधारी युपीए व कॉग्रेसला हिंदू दहशतवादाचे भूत उभे करायचे होते. त्यासाठी उमद्या कर्नलचा बळी देण्यात आला. पण हा माणुस फ़क्त कर्नल नव्हता, तर लष्करी गुप्तचर विभागाचा कर्तबगार अधिकारी होता. त्याच्यावरच हे बालंट कशाला आणले गेले? त्याने गुजरातपासून केरळच्या सागरी किनार्‍यावरील पाकिस्तानी हालचाली व स्मगलींगचे जाळे उखडून टाकण्याची कामगिरी बजावली म्हणून? कधीतरी त्या अधिकार्‍याच्या कामाचा गौरव करणार्‍या पदकांचा उल्लेख तेव्हाच्या बातम्यातून आलेला होता काय? पुरोहितांच्या अटकेनंतर अवघ्या महिनाभरात कसाब टोळी मुंबईत राजरोस येऊन धडकली, हा योगायोग नव्हता. पुरोहितांनी उध्वस्त करून टाकलेल्या जाळ्याची नवी वीण अल्पावधीत उभी राहिली. म्हणूनच मुंबईत कसाब रक्ताचा महापूर आणू शकला होता आणि त्यालाही अशाच लोकांचे सहकार्य व मदत मिळालेली आहे, ज्याचे धागेदोरे आता उघड होऊ शकतात.


आपल्याला आठवत असेल तर जेव्हा मुंबई हल्ल्याची घटना घडली होती तेव्हा म्हणजे २००८ सालात नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी मुंबईला भेट देण्याचा विचार जाहिर केल्यावर त्यांना तात्काळ राज्यसरकारने नकार दिलेला होता. मोदींनी मुंबईत येणे धोक्याचे आहे असेही अगत्याने सांगण्यात आलेले होते. पण मोठी गोष्ट अशी, की तेव्हा मोदींनी एक शंका किंवा संशय व्यक्त केला होता, त्याला महत्व आहे. मोदी म्हणाले होते, की इतका मोठा हल्ला करण्यासाठी समुद्रमार्गे मुंबईत पोहोचलेल्या पाकिस्तानी जिहादी टोळीला स्थानिक मदतीच्या अभावी इथे उतरताच आले नसते. त्यावरून मोदींना पुरोगामी नेते व माध्यमांनी लक्ष्य केलेले होते. हे धागेदोरे कुठे व कसे उघडकीस आणता येतील; याचा विचार पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदींनी केलेला नसेल का? कारण बारा वर्षापुर्वीच्या दोन भयंकर घटना होत्या. मालेगाव स्फ़ोटात कसल्याही सज्जड पुराव्याशिवाय कर्नल पुरोहितांना अडकवण्यात आलेले होते आणि त्यांच्या अटकेनंतरच मुंबईत सुरक्षितपणे कसाबचे साथीदार रक्तपात घडवायला पोहोचले होते. योगायोग असा, की त्याची आधीपासून तयारी करणार्‍या डेव्हीड कोलमन हेडली याची मुंबईतली दोस्ती निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याच मुलाशी निघालेली होती. असे कित्येक धागेदोरे खुप जुने आहेत आणि अंमली पदार्थाचा व्यापार व आवकजावक त्याच जंजाळातून चाललेली असते. अशी यंत्रणाच जिहादी व घातपाती वापरत असतात. जम्मू वा पंजाबात एसपी दर्जाच्या अधिकार्‍याला अशाच अंमली पदार्थासह पाकिस्तानातून हत्यारांचा पुरवठा होण्याच्या प्रकरणात अटक झालेली विसरून चालेल काय? सहाजिकच जम्मूत वा पंजाबात होऊ शकते, तेच मुंबईत सत्ता व कायदेशीर संरक्षणाखेरीज होईल; यावर कोणी किती विश्वास ठेवावा? 


हे असे संदर्भ व घटनांचा जोडून एकत्र विचार केल्यास मुंबईचे अनेक निवृत्त ज्येष्ठ पोलिस अधिकारी वाहिन्यांवर सुशांत प्रकरणात चाललेल्या खळबळीने कशाला बावचळून गेलेत; त्याचा उलगडा होऊ शकतो. कारण वाहिन्या वा माध्यमांनी अशा सनसनाटी प्रकरणात बारीकसारीक धागे शोधून खळबळ माजवणे नवे अजिबात नाही. असे प्रकार मालेगावपासून गुजरात दंगलीपर्यंत नित्यनेमाने घडत आलेले आहेत आणि मुंबई पोलिसांच्या नाकर्तेपणावर अनेकदा प्रश्नचिन्ह लावले गेलेले आहे. आताही त्यावरच खळबळ माजली आणि अखेरीस प्रकरणाचे तपासकाम सीबीआयकडे सुप्रिम कोर्टाने सोपवलेले आहे. पण तेव्हाही यापैकी कोणी निवृत्त अधिकारी विचलीत झाला नव्हता. अगदी सीबीआयने तपास सुरू केला आणि अनेकांच्या जबान्या घेण्यात आल्या; तेव्हाही वाहिन्यावर चर्चा चालल्या होत्या. किंबहूना त्यात अनेक मुंबईकर निवृत्त पोलिस अधिकारीही सहभागी होत राहिले आहेत. पण त्यावेळी कोणी मीडिया ट्रायल असा आक्षेप घेतलेला नव्हता. पण यात अंमली पदार्थाच्या राजरोस विक्रीचा वा व्यापाराचा संदर्भ आला आणि अकस्मात या निवॄत्त अधिकार्‍यांना त्यातली मीडिया ट्रायल दिसू लागली आहे. हीच संशयास्पद बाब नाही काय? कोण कुठल्या बाबतीतला तपशील उघड होण्याला घाबरला आहे? वास्तविक रिया चक्रवर्ति किंवा अन्य कोणी बॉलिवुडचे महाभाग आपल्या अब्रुची लक्तरे होत असतानाही समोर आलेले नाहीत. त्यांनी उघडपणे या वाहिन्यांना आव्हान दिलेले नाही. ज्या वाहिन्यांना रियाने मुलाखती दिल्या, त्यांनाच आता आपली अब्रु झाकताना तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे हा घटनाक्रम खरोखरच तपासापेक्षाही राजकारणाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतो आहे. 


या निवृत्त पोलिसांनी आज कोर्टात धाव घेतली आहे. पण जेव्हा गुजरातच्या सेवेतील डझनभर पोलिस अधिकार्‍यांना खोट्या चकमकीच्या नावाखाली बदनाम करण्यात आले त्यांच्यासाठी ही मंडळी कशाला कळवळलेली नव्हती? तेही आयपीएस झालेले व यांच्याच पठडीतले अधिकारी नव्हते का? त्यापैकी एकाने राजदीप सरदेसाई याला कोर्टात खेचून माफ़ीही मागायला लावलेली आहे. वाहिन्यांच्या खोटारडेपणा रोखण्याचा तोही मार्ग आहे. पण निवृत्त मंडळींना मुंबई पोलिस खात्याच्या अब्रुची चिंता सतावते आहे. की त्यांना आपल्या कारकिर्दीतल्या गोष्टीही यातून उकरल्या जाण्याची भिती आहे? ज्युलिओ रिबेरो यांच्याच कारकिर्दीत खोट्या चकमकीने गुन्हेगारांना ठार मारण्याची परंपरा सुरू झाली. पण तेव्हा त्याला कोणी खोटी चकमक म्हणत नव्हते. कर्नल पुरोहितांना कुठल्याही भक्कम पुराव्याशिवाय तुरूंगात डाबले गेले. इतके कर्तव्यदक्ष पोलिस खाते राजरोस चालणार्‍या अंमली पदार्थाच्या व्यापाराला रोखू शकत नव्हते काय? नक्कीच शक्य होते. पण आपल्याकडून ते झाले नाही, याचा अपराधगंड आता अशा लोकांना भयभीत करतो आहे का? कसाबच्या हल्ल्यात शेकडो लोकांचा बळी गेला, त्यातला अपराधगंड अशा याचिकेच्या मागचे खरे कारण आहे काय? एक मात्र निश्चीत, ही मंडळी भेदरलेली आहेत. त्यांना पोलिसांच्या प्रतिष्ठेपेक्षाही आपला आजचा व जुना नाकर्तेपणा घाबरवतो आहे. किंबहूना सीबीआय सुद्धा अशाच राज्याकडून केंद्रात प्रतिनिधीत्वावर आलेल्या अधिकार्‍यांची संस्था आहे. त्यातल्या काही सहकारी मित्रांकडून येऊ घातलेल्या संकटाची चाहूल लागल्याने पळापळ सुरू झाली आहे काय? कारण सुशांत प्रकरण बाजूला पडून दिवसेदिवस हा तपास मुंबईच्या हाडीमाशी खिळलेल्या व भिनलेल्या गुन्हेगारी साम्राज्याच्या मुळालाच हात घालताना दिसतो आहे. आज बॉलिवूड व माफ़ियांच्या घराला लागलेली आग उद्या आपल्या दारात येण्या़चे भय त्यामागे असेल का?


No comments:

Post a Comment