मध्यंतरीचा म्हणजे विसाव्या शतकाच्या अखेरीचा काही काळ असा होता, की महाराष्ट्रात शिवसेनेचा जोर वाढत चालला होता आणि त्याच कालखंडात राज्यामध्ये बाकीच्या कॉग्रेस नेत्यांचा प्रभाव संपून शरदराव पवार यांचे नेतृत्व उदयास आलेले होते. अशा कालखंडात भिन्न पक्षात असले तरी पवार आणि सेनेचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे मनोहरपंत जोशी यांची सलगी कोणाच्याही नजरेत भरणारी होती. त्यामुळेच तेव्हाचे जाणते पत्रकार या दोघांना तात्कालीन हिंदी चित्रपटकथांच्या भाषेत ओळखायचे वा संबोधायचे. मनमोहन देसाई तेव्हाचा लोकप्रिय दिग्दर्शक होता आणि त्याच्या बहुतेक चित्रपटात विरुद्ध दिशेने वाटचाल करणार्या दोघा भावांचे कथानक असायचे. अनेकदा हे भाऊ बालपणी जत्रेत हरवलेले आणि अकस्मात समोरासमोर येऊन उभे ठाकणारे असायचे. परस्पर भिन्न स्वभाव, कार्यक्षेत्र व बाजूंना उभे असलेले हे जुळे भाऊ असावेत, तशीच मराठी राजकारणात शरदराव व मनोहरपंतांची जोडी होती. राजकीय आखाड्यात एकमेकांवर शिंतोडे उडवणारे हे दोघे, व्यवहारात मात्र एकमेकांना कमालीचे संभाळून घेत असत. म्हणूनच मनमोहन देसाईच्या चित्रपटकथेतील जत्रेत हरवलेले दोघे भाऊ, अशीच पत्रकार मंडळी जोशी पवारांची वर्णने करीत. आज मनमोहन देसाई वा त्याच्या चित्रपटातला हमखास हिरो अमिताभ बच्चन मागे पडले आहेत. अमिताभ त्या भूमिका सोडून वयाला शोभणार्या कथांतून पडद्यावरील आपली लोकप्रियता टिकवून आहे. त्याच्या सोबतचे ॠषिकपूर व विनोद खन्नाही बाजूला झालेत. मात्र राजकारणातील ही जोडी काळाची पावले ओळखायला राजी दिसत नाहीत. पवार मिळेल त्या सत्तास्थानाला अपमानित होऊन चिकटून बसले आहेत, तर पंत जुन्या जमान्यातील आठवणीतून बाहेर पडायला राजी नाहीत.
सोनियांचे आगमन झाल्यावर त्यांच्याशी जुळवून घेण्याचा व निष्ठावान असल्याचे पुरावे देण्याचा पवारांनी खुप प्रयास केला. पण त्याचा उपयोग नसल्याचे जाणवताच, आता आपल्याला कॉग्रेसमध्ये भवितव्य नाही हे ओळखून पवारांनी वेळीच वेगळी चुल मांडली. आपले महाराष्ट्रातील प्रादेशिक नेता हे स्थान टिकवले. तेवढ्यावर न थांबता, तो प्रयोग फ़सल्यावर निमूटपणे सन्मानीय माघार घेत त्याच सोनियांसमोर शरणागती पत्करून लालदिव्याच्या गाडीवर समाधान मानले. आपल्या तुलनेत कमी कुवतीचे व नालायक लोक सोनियाकृपेने बडे होताना बघून आवंढे गिळतही शांत रहाण्याची चतुराई दाखवली. आपल्या या जुन्या‘जाणत्या’ मित्राकडून मनोहरपंत इतकेही शिकू शकले नसतील; तर त्यांची आजची दुरावस्था होण्याला पर्याय नव्हता. बाळासाहेबांच्या कृपेने आजवर अनेक अधिकारपदे कुवत नसताना उपभोगलेल्या पंतापेक्षा त्यांच्या जाणत्या मित्राची कुवत खुप मोठी आहे. पण परिस्थितीचा व काळाचा महिमा ओळखून पवार शरण जात असतील; तर पंतांनीही सावध व्हायला हवे होते. त्यांना हव्यास आवरता आलेला नाही. त्यांना ठाकरे यांच्या पक्षामध्ये मानाचे पान अजूनही हवे आहे आणि नाही मिळाल्यास तक्रार आहे. तिकडे पवारांनी स्वत:च स्थापन केलेल्या व वाढवलेल्या राष्ट्रवादी पक्षात पुतण्याने त्यांना चितपट करून टाकले आहे, तरी पवार अत्यंत सावधपणे टिकून रहायची केविलवाणी धडपड करीत आहेत. त्यांनी कधी अजितदादांना शिंगावर घ्यायचा डाव खेळायचे धाडस केलेले नाही. मग दादरमधून पालिकेत स्वबळावर निवडून येण्याची क्षमता नसलेल्या पंतांनी किती मिजास दाखवायची? इतक्या वर्षात जुन्या मित्राकडून तेवढे तरी शिकून घ्यायला नको काय?
मागल्या विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री व्हायला गुडघ्याला बाशिंग बाधून बसलेल्या अजितदादांना थोरल्या साहेबांनी भुजबळांना पुढे करून शह दिला होता. पण लौकरच आदर्श प्रकरणामुळे अशोक चव्हाणांना जावे लागल्याची संधी घेऊन अजितदादांनी काकांना अंधारात ठेवले आणि खर्याच ‘भुजबळाचा’ यशस्वी प्रयोग आपल्याच ‘जाणत्या’ काकांना घडवला. तेव्हा आपले नाममात्र ‘भुजबळ’ आवरते घेऊन पवारांना नव्या पिढीसमोर शरणागत व्हावे लागले होते. तेव्हापासून पक्षावर अजितदादांनी आपली जी पकड बसवली आहे; त्यावर मात करणे थोरल्या साहेबांना साधलेले नाही. पण म्हणून त्यांनी डोक्यात राख घालून घेतली नाही, की थेट अजितदादांशी दोन हात करायचा पवित्रा घेतलेला नाही. चावायचे दात आणि दाखवायचे ‘सुळे’ केव्हा कसे वापरावेत, ते पवारांना नेमके ठाऊक आहे. म्हणूनच कधीकाळी पंतप्रधानकीवर डोळा ठेवलेला हा नेता, आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीही झगडतो आहे. पण त्यात आपली शान पणाला लावायची नामुष्की येऊ नये किंवा दिसू नये; याची पुरेपुर काळजी घेतो आहे. पंतांना सेनेत इतकी वर्षे घालवल्यावर दोन नेते वा आमदार, नगरसेवक आपल्या सोबत घेऊन जाण्याचाही लोकसंग्रह करता आलेला नाही. मग पवारांशी दोस्ती करून काय उपयोग? बाळासाहेबांची कृपा किंवा आशीर्वाद वा पाठबळ हीच आपली शक्ती आहे; हे विसरून उधारीच्या नेमणूकीला आपली ताकद समजून वागल्याचे दुष्परिणाम पंताना आज भोगावे लागत आहेत. त्या कुठल्या चित्रपटात अमिताभ शशीकपूरला म्हणतो, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, दौलत आहे, तुझ्याकडे काय आहे? तर शशीकपूर म्हणतो, ‘मेरे पास मॉं है’. त्या काळात टाळ्या मिळवणारे तेच वाक्य, आज विनोद म्हणून सांगितले जाते. ‘माझ्यावर शिवसेनाप्रमुखांची कृपा होती’, अशा स्वरूपातली पंतांची भाषा, तितकीच हास्यास्पद झाली आहे. पवारांच्या मित्राला त्याचे भान कधी येणार?
No comments:
Post a Comment