Saturday, October 12, 2013

केले तुका झाले माका



  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मोदीविरोध म्हणण्यापेक्षा मोदीद्वेष आता त्यांच्याच मूळावर येऊ लागला आहे. की त्यांनीही अडवाणींप्रमाणे तोंडघशी पडून घेण्याचा निर्धार केला आहे, देवजाणे. मागल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मित्रपक्ष असूनही भाजपाला प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदींना आणू नये अशा अटी घातल्या होत्या. मैत्री राखण्यासाठी भाजपाने त्यांचा हट्ट मान्य केला. पण दिवसेदिवस नितीश अधिकच हट्टी होत गेले आणि त्यांनी आपला मोदीद्वेष उघडपणे दाखवायला सुरूवात केली. अर्थात त्याला तात्विक मुलामा द्यायला नितीश विसरत नाहीत. पण सत्य आणि नाटक यातला फ़रक कधी ना कधी उघडा पडतोच. मागल्या उहाळ्यात भाजपाने पक्षाचा सर्वात लोकप्रिय नेता म्हणून आगामी लोकसभा निवडणूकीत मोदी यांची प्रचारप्रमुख म्हणून निवड केली, तेव्हा नितीश म्हणाले होते; तो त्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. जोपर्यंत एनडीएकडे विषय येत नाही, तोपर्यंत आम्हाला त्यात लक्ष घालण्याचे कारण नाही. कारण तेव्हा मोदीविरोधाची त्यांची आघाडी अडवाणी भाजपात राहूनच लढत होते. पण दोन आठवड्यात अडवाणींचे डावपेच अपयशी ठरल्यावर नितीश यांनी हसायचे दात बाजूला ठेवून चावायचे दात बाहेर काढले होते. त्यांनी मोदींना भाजपाने पंतप्रधान पदाचे उमेदवार करता कामा नये, अशा अटी घालून अडवणूक सुरू केली व मागणी मान्य होत नसल्याने एनडीएमधून बाहेर पडले. मात्र तरीही त्यांच्या मोदीविरोधाच कंडू शमलेला नाही. म्हणूनच मोदींना अपशकून करण्याची एक एक संधी नितीश शोधत असतात आणि नसेल तर तशी संधी निर्माण करीत असतात. मात्र त्यात त्यांनाच तोंडघशी पडायची वेळ येत असते. यावेळी त्यांना राष्ट्रपतींनी तोंडघशी पाडले आहे.

   तीनचार महिन्यांपासून बिहारमधील नितीश-भाजपा युती फ़ुटली आहे. त्याचे कारण नितीशचा मोदीद्वेष हेच आहे. म्हणूनच भाजपाने पाटण्यात मोदींची प्रचंड सभा घेण्याचा घाट घातलेला आहे. त्यासाठी दोनतीन महिन्यांपासून तयारी चाललेली आहे. त्या सभेला नितीश बंदी घालू शकत नव्हते. तेव्हा त्यांनी अत्यंत धुर्तपणे त्यात राष्ट्रपतींचा वापर करायचा डाव खेळला. मुद्दाम मोदींच्या सभेच्या कालखंडातच राष्ट्रपतींना बिहार दौर्‍याचे आमंत्रण देऊन दोन कार्यक्रम एकाच दिवशी यावेत असा खेळ केला. मग एकाच दिवशी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व नरेंद्र मोदी अशा दोन महत्वाच्या व्यक्तींसाठी बंदोबस्त देता येत नाही, असे कारण देत मोदींची जाहिरसभा पुढे ढकलण्याची सरकारी अडचण भाजपासमोर मांडली. तेव्हा भाजपाच्या एका आमदाराने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांच्या आकस्मिक कार्यक्रमाने आधी ठरलेल्या मोदींच्या सभेत कसा व्यत्यय येतो आहे, अशी माहिती कळवली. भाजपाचे दोन बिहारी नेते शहानवाज हुसेन व राजीवप्रसाद रुडी थेट प्रणबदांना जाऊन भेटले. त्यांनी त्यांच्या चांगुलपणाचा नितीश कसा मतलबी राजकारणासाठी वापर करीत आहेत, तेच दाखवून दिले. परिणाम साफ़ होता. शनिवारी पाटण्यात कार्यक्रमासाठी जाणारे राष्ट्रपती रात्रीचा मुक्काम तिथे करून रविवारी निघणार होते. रविवारी त्यांचा कुठला कार्यक्रम नव्हता. म्हणूनच त्यांनी शनिवारी कार्यक्रम उरकून रातोरात माघारी दिल्लीत येण्याचा निर्णय घेतला. सहाजिकच मोदींच्या जाहिरसभेला नितीश सरकारने मुद्दाम निर्माण केलेली अडचण संपुष्टात आली. नितीशनी आपल्याच हाताने आपले नाक कापून घेतल्यासारखी स्थिती झाली. पण ह्या घटनाक्रमाचा तेवढाच अर्थ होत नाही. मोदींना अपशकून करताना प्रत्यक्षात नितीशनी त्यांना शुभशकूनच घडवला.

   गेले वर्षभर मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार संबोधले जात आहे. पण वाटते तितकी मोदींची लोकप्रियता नसून हा माध्यमांनी फ़ुगवलेला फ़ुगा आहे असाच मोदी विरोधकांचा दावा असतो. पण मोदींनी मागल्या दोन महिन्यात जाहिर कार्यक्रमाप्रमाणेच घेतलेल्या जाहिरसभांच्या वाढत्या उपस्थितीने त्यांचे विरोधक हादरून गेले आहेत. म्हणूनच मोदींची दखलही घेण्याचे कारण नाही म्हणत, प्रत्येक पक्षाचा नेता प्रवक्ता मोदीवर तोफ़ डागल्याशिवाय रहात नाही. नितीशची कहाणी वेगळी नाही. बिहारमध्ये आपल्याखेरीज अन्य कुठला नेता लोकप्रिय नाही, की गर्दी खेचू शकत नाही; असा नितीशचा दावा होता. पण भोपाळ, दिल्ली, रेवाडी अशा एकामागून एक विराट सभा मोदींनी गाजवल्याने नितीशचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच पाटण्यात मोदींची अफ़ाट सभा होऊ द्यायला अपशकून घडवण्याचा त्यांनी घाट घातला होता. त्यासाठी गाफ़ील ठेवून त्यात राष्ट्रपतींना ओढण्यात आले. पण ही बाब लक्षात येताच प्रणबदांनी नितीशच्या राजकारणातला मोहरा व्हायचे नाकारले. ही तांत्रिक बाब असली, तरी मोदींची राजकीय प्रतिमा उंचावण्यास त्यातून परस्पर हातभार लागला आहे, मोदींची आजची लोकप्रियता मान्य करूनच राष्ट्रपतींनी आपला कार्यक्रम रद्द केला, असेच सामान्य माणसाला वाटणार. शिवाय पुढल्या पंतप्रधानाला निवडणारा आणि शपथ देणारा राष्ट्रपतीच मोदींसाठी आपला कार्यक्रम रद्द करतो; याचा अर्थच मोदी जिंकणारा उमेदवार आहे, अशी सामान्य माणसाची समजूत व्हायला ह्या घटनेने हातभार लागला आहे. पण त्यासाठी मोदींनी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. नितीशनी जो लबाड डाव खेळला होता, तो उधळून लावताना मोदी यांना लॉटरी लागली म्हणायची. म्हणतात ना, केले तुका आणि झाले माका.

No comments:

Post a Comment