Sunday, October 13, 2013

पत आणि पंत



  रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सेनेचेच आजचे सर्वात ज्येष्ठ नेता म्हणावेत, अशा मनोहरपंत जोशी यांचा झालेला अवमान अनेकांना व्यथीत करणारा होता यात शंका नाही. मग त्यातून खुद्द मनोहरपंत व्यथीत झाले तर नवल नाही. पण ज्या संघटनेत त्यांनी आपले सर्व उमेदीचे आयुष्य़ घालवले, तिथे काय घडू शकते; याचा पंतांना अंदाज नसेल असे कोणी म्हणू शकेल काय? या दसरा मेळाव्याच्या आधी दोनच दिवस, पंतांनी व्यक्त केलेले मनोगत शिवसैनिकांना विचलीत करणारे होते. शिवसैनिकांना म्हणजे ज्यांना ‘निष्ठावंत’ म्हटले जाते, अशा सेनेच्या कार्यकर्त्यांना डिवचणारे विधान पंतांनी केलेले होते. आणि मग असे डिवचलेले सैनिक कसे वागतात, ते पंतांना साडेचार दशकात अनेकदा जवळून बघायला मिळालेले आहे. मग त्यांनी आधी असे विधान कशाला करायचे? आणि केलेच होते, तर त्यानंतर शिवाजी पार्कच्या मेळाव्यात हजर तरी कशाला रहायचे? की वयपरत्वे पंत या मेळाव्याची औपचारिकताही विसरून गेले होते? आजवरच्या जवळपास सर्वच मेळाव्यात पंतांनी हजेरी लावलेली आहे. नेहमी त्या व्यासपीठावर अखेरची एन्ट्री पक्षाच्या प्रमुखाचीच असायची. बाळासाहेबांच्या नंतर कोणी कधी तिथे प्रकटला नाही. आज उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असतील, तर त्यांच्या आगमनापुर्वी पंतांनी व्यासपीठावर हजेरी लावायला हवी होती. ती औपचारिता त्यांनी का मोडली? की आधीच व्यासपीठावर दिसलो, तर ‘निष्ठावान’ हुर्यो उडवून पिटाळून लावतील, ही भिती होती? ती नामुष्की टाळण्यासाठी त्यांनी उद्धवनंतर व्यासपीठावर येण्य़ाची चतुराई केलेली होती? जेणे करून समोर असे काही झाल्यास, लाजेकाजेस्तव आपल्या ‘निष्ठावानाना’ उद्धव गप्प करतील, असा डाव पंत खेळले नाहीत काय?

   आजारी अवस्थेमध्ये सुधीरभाऊ जोशी आधीपासून हजर होते. मग पंतांनी हजर व्हायला उशीर करण्याचे कारण काय होते? पक्षप्रमुखाला डिवचणारे विधान करायचे आणि नंतर त्याच्या चांगुलपणाला हत्याराप्रमाणे वापरण्याच्या खेळीला डावपेच म्हणतात. मध्यदक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती किंवा निदान राज्यसभेत वर्णी लागावी, असा हव्यास त्यांनी धरलेला होता. आजवर मध्यमुंबईतील सेनेच्या प्रत्येक फ़लक वा पोस्टरवर आपले नेता म्हणून नाव असायचे; असे तक्रारीच्या स्वरात पंत म्हणतात. पण तेवढ्या प्रदिर्घ काळात त्यांनी त्याच भागात संघटना वा कार्यकर्त्यांसाठी काय केले; त्याचा तपशील देत नाहीत. सेनेत बाळासाहेबांनी सर्वाधिक मेहेरनजर कोणावर दाखवली; असा प्रश्न विचारल्यास मनोहर जोशी हेच एकमेव नाव समोर येते. इतके कुणा अन्य शिवसैनिकाच्या वाट्याला कधी आले नाही. अधिकार पदापासून मिळालेल्या लाभापर्यंत मनोहरपंतांचे ‘यश’ नजरेत भरणारे आहे. आजही हयात असणारे सुधीरभाऊ, लिलाधर डाके अशा समकालीन सेनानेत्यांकडे पाहिल्यास पंतांना सेनेने भरभरून दिले; असेच म्हणावे लागते. तरीही पंत समाधानी नसतील, तर त्यांच्या अपेक्षा चुकीच्याच म्हणायला हव्यात. आणि त्यासाठी त्यांनी दुसर्‍या पिढीतल्या ठाकरे नेतृत्वाशी खेळलेले डावपेच अगदीच बालीश म्हणायला हवेत. बाळासाहेबांशी उद्धव ठाकरे यांची तुलना होऊच शकत नाही आणि स्वत: उद्धवही तसे करायला धजावत नाहीत. मग पंतांनी साहेब असते तर त्यांनी सरकार पाडले असते, असल्या वल्गना करण्याचे कारणच काय होते? त्यांना उद्धवमधील नेतृत्वगुणांच्या त्रुटी उमगत असतील तर हरकत नाही. पण त्यांनी साहेब हयात असतानाच त्यांच्या कानावर त्या त्रुटी कशाला घातल्या नव्हत्या?

   मनोहरपंतांनी दसर्‍याच्या सुमुहूर्तावर आपला असा अवमान घडवून आणला म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिवसेनेची कार्यपद्धती त्यांना चांगलीच ठाऊक आहे. अनेक वर्षे त्या संघटनेत काम करताना आणि तिचे सर्वाधिक लाभ उठवताना, पक्षनिष्ठेची खरी किमया त्यांनाच उमगलेली असायला हवी. मग त्यांनी असले पोरकट डावपेच खेळायचेच कशाला? आपल्या ज्येष्ठतेचा मान साहेबांच्या निर्वाणानंतर राखला जात नाही, ही तक्रार आहे, की एकूणच शिवसेनेतील आजवरच्या संकेत व परंपरांना बाधा आलीय; असे पंतांना म्हणायचे आहे? तसे असेल, तर मग त्या जुन्या परंपरांना कधीकाळीच फ़ाटा देण्यात आलेला आहे. अगदी साहेबांच्या हयातीमध्येच त्यांनी पाडलेल्या अनेक परंपरा मागे पडत गेल्या होत्या. म्हणून तर नारायण राणे किंवा राज ठाकरे यांना वेगळे व्हायची वेळ आली. पण त्या सर्व काळात सावधपणे पंत आपले हितसंबंध जपत आपली जागा धरून गप्प राहिले होते. अन्य नेते वा ज्येष्ठांना पद्धतशीर बाजूला सारण्याची प्रक्रिया पंधरा वर्षापुर्वीच ‘कार्याध्यक्ष’ पदाच्या निर्मितीपासून सुरू झालेली होती. पण तेव्हा पंत अवाक्षर बोलले नव्हते. मग ‘साहेब असतानाच्या गोष्टी’ त्यांना आज अचानक आठवण्याचे कारणच काय? या पंधरा वर्षात सेनेतल्या निष्ठा वा निष्ठावान शब्दांच्या संकल्पनाही बदलत गेल्या. त्यातूनच राणेनिष्ठ, राजनिष्ठ असे गट बाजूला होत गेले. पण साडेचार दशकांच्या प्रदिर्घ काळात सेनेमध्ये कोणी जोशीनिष्ठ पंतांना निर्माण करता आलेला नव्हता. कारण पंत शिवसैनिक म्हणून संघटनेत वावरले; तरी मनाने ते व्यावसायिक राहिले, कार्यकर्ता कधीच नव्हते. साहेबांच्या चांगुलपणामुळे शिवसैनिकांनी त्यांना खपवून घेतले. याचे भान सुटले म्हणून पंतांवर आज ही वेळ आली. किंबहुना त्यांनी ती ओढवून आणली. कारण सेनेच्या पहिल्या पिढीत एकच व्यावसायिक शिवसैनिक होता. आज निव्वळ व्यावसायिक असलेल्यांच्या हातीच शिवसेनेची सुत्रे आलेली आहेत. त्यांना ‘पत’ आणि ‘पंत’ यातला फ़रक कळू लागला आहे. रविवारी शिवाजीपार्कच्या मेळाव्यात त्याचेच प्रदर्शन घडले. 

No comments:

Post a Comment