Tuesday, October 1, 2013

सार्वजनिक जीवनाची शोकांतिका

  विचार आणि व्यवहार या दोन स्वतंत्र वाटणार्‍या गोष्टी असल्या तरी त्या परस्परावलंबी असतात. विचारानुसार व्यवहार व्हायचा असतो आणि व्यवहारात येऊ शकणार नाही, अशा विचारांचा काहीच उपयोग नसतो. म्हणूनच विचार व व्यवहार यांचा समतोल राखुनच वाटचाल करावी लागते. तरच दोन्ही बाबी यशस्वी होऊ शकतात. उलट दोन्हीचा अतिरेक केला, तर दोन्ही रसातळाला जाऊन त्यांची अधोगती होते, शोकांतिका होते. लालूप्रसाद यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊन त्यांना होऊ घातलेली शिक्षा, त्याचेच ज्वलंत व प्रखर उदाहरण आहे. म्हणूनच त्याकडे एका राजकीय नेत्याच्या जीवनातील व्यक्तीगत अधोगती वा शोकांतिका म्हणून बघणे गफ़लतीचे आहे. ती एका मोठ्या ऐतिहासिक राजकीय सामाजिक विचारधारेची शोकांतिका व चळवळीची अधोगती आहे. लालू हे त्यातले एक निमित्तमात्र पात्र आहे. कारण लालूंच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवातच एका राजकीय विचारधारेच्या प्रभावाखाली झाली. ज्याला समाजवादी विचारधारेची सामाजिक परिवर्तनाची चळवळ म्हटले जाते, त्यातून लालू राजकीय जीवनात आले. त्या प्रभावाखाली आलेच नसते, तर आज आपल्याला त्यांचे नावही ठाऊक झाले नसते, की त्यांच्यावरील आरोप व शिक्षेची इतकी चर्चाही झाली नसती. १९६० नंतरच्या कालखंडात समाजवादी विचारांच्या माध्यमातून जी गरीब व पिछड्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय आंदोलने उभी राहिली; तिने प्रस्थपित भ्रष्ट राजकीय सत्ता व सामाजिक वर्चस्वाला आव्हान उभे केले होते. त्यात ज्यांनी स्वत:ला तरूणपणी झोकून दिले, त्यापैकीच एक लालूप्रसाद यादव होते. म्हणूनच त्यांच्या शिक्षेकडे किंवा गुन्ह्याकडे व्यक्तीगत बाब म्हणून बघता येणार नाही.

   कायद्याच्या भाषेत लालूंनी केलेले गुन्हे वा कृत्ये त्यांची वैयक्तिक आहेत, यात शंकाच नाही. म्हणूनच त्यांना व्यक्तीगत शिक्षा झालेली आहे. पण म्हणून त्या पापाचे लालू एकटेच धनी आहेत काय? ज्या चळवळ वा विचारधारेचा वारसा घेऊन लालू चालत होते; त्याच वारशात असलेल्यांच्या पाठराखणीशिवाय लालू हे सर्व गुन्हे इतके राजरोस व उजळमाथ्याने करू शकले असते काय? १९६० नंतरच्या काळात जे भ्रष्टाचार विरोधी व समाज परिवर्तनाचे आंदोलन सुरू झाले; त्यात उडी घेऊन लालू इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्या वाटचालीत लालूंनी जे काही गुन्हे वा पापकर्मे केली, त्याला अनिच्छेने पाठींबा देणार्‍यांनी विचार व तत्वज्ञानाला तिलांजली देत व्यवहाराचीच पाठराखण केली नव्हती काय? अमूकतमूकाला विरोध करताना तत्वांचा बळी देऊन कुठलाही मार्ग चोखाळणे वा कुणाचेही समर्थन करणे, व्यवहार साधायला उपयुक्त असते. पण त्यात विचारांचा बळी दिला जात असतो. लालू तोंडाने समाजवाद व परिवर्तनाची पोपटपंची करीत होते, पण त्यांनी आपले स्वार्थ साधण्यासाठी वाटेल त्या मार्गांचा अवलंब केलेला होता. त्यात आक्षेप घेणार्‍यांना गुंडगिरीनेही संपवायला लालूंनी मागेपुढे पाहिले नाही. तिथे त्यांनी विचारांना तिलांजली दिलेली होती. ज्या भ्रष्टाचार विरोधी संघर्षातून हा तरूण राजकीय जीवनात आला, त्याच मार्गाने भरकटत गेला. तेव्हा विचारांच्या पोकळ कारणास्तव त्याची पाठराखण करणार्‍यांनी त्याच्या पापालाच प्रोत्साहन दिले नव्हते काय? लोहिया व जयप्रकाशांच्या विचारांची त्याच्याकडून पायमल्ली होतेय, याचेही भान त्याच्या जुन्याजाणत्या सहकार्‍यांना राहिले नाही. मग तेही तितकेच पापातले भागिदार नाहीत काय? लालू आपल्या राजकीय यशातून विरोधकांना पराभूत करताना आपल्याच विचारांनाही पराभूत करत होता.

   लालू सेक्युलर वा पुरोगामी म्हणून त्याची पाठराखण करणार्‍यांसाठी तो प्रतिगामी मानल्या जाणार्‍या शक्तींना पराभूत करतो, याकडेच बघितले गेले. तिथेच मग लालुसोबत एकूण समाजवादी व पुरोगामी चळवळीची अधोगती सुरू झाली होती. तो भल्याबुर्‍या मार्गाने लोहियांच्या वैचारिक प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत असेल. पण त्याच कृत्यातून लालूसारखे लोक लोहियांच्या विचारांनाही मातीमोल करीत असतात ना? याचे भान ज्यांनी ठेवले नाही, त्यांचे पाप कमी आहे काय? भ्रष्टाचार विरोधी संघर्षातून राजकारणात आलेला एक तरूण आज चार दशकांनंतर देशातला पहिला भ्रष्ट राजकारणी म्हणून गजाआड गेला, याची खंत त्या चळवळीचा वारसा सांगणार्‍या कोणालाच असू नये? कारण आता त्या चळवळीचा वारसा सांगणारे सगळेच लालूसारखेच कमीअधिक भरकटलेले आहेत. व्यवहाराच्या आहारी जाऊन बहुतेकांनी विचारांना तिलांजली देऊन टाकली आहे. आणि ही केवळ त्या समाजवादी, पुरोगामी वा सेक्युलर चळवळीचीच शोकांतिका मानायचे कारण नाही. एकविसाव्या शतकात येण्यापर्यंत देशातील सर्वच विचरधारा व चळवळी साधनशूचितेपासून पुरत्या भरकटलेल्या आहेत. ही त्यांचीही तितकीच शोकांतिका आहे. लालूंना झालेली शिक्षा ही म्हणूनच देशातील सार्वजनिक जीवनाची शोकांतिका आहे. व्यवहार व विचार यांच्या बिघडलेल्या समतोलाची कहाणी आहे. चारित्र्यहीनतेची कथा आहे. निर्लज्ज सार्वजनिक जीवनाचा अध्याय आहे. त्यामुळेच एकट्या लालूचे तोंड काळे झाले म्हणून इतरांनी मिरवण्याचे कारण नाही. आपल्या आसपास किती लहानमोठ्या लालूंची पाठराखण आपण कमीअधिक प्रमाणात करतो ते प्रत्येकाने मनाशी विचारून बघावे.

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. एकाधी चळवळ आपल्या उधिस्त साठी लढताना सत्व कडून स्वार्थ कडे वळते याचे उत्तम उधारण लालु आहे !

    ReplyDelete
  3. राजकारणात आता कोणतीच विचारधारा पाळली जात नाही. हिंदुत्वाच्या विचाराने भारावलेल्या लोकांनी मोदींची पाठराखण केली. पण आज त्या विचारावर मोदी चालत आहेत का? दिवाळी पुरग्रस्त काश्मिरींबरोबर घालवणे, त्याच बरोबर बिहारच्या पुरग्रस्तांना विसरणे. अजमेर शरीफवर टाकण्यासाठी चादर पाठवणे. ही कुठे हिंदुत्वाची विचारधारा राहिली. हे सुद्धा मुस्लिमांचे लांगूलचालन म्हणता येणार नाही का? सर्वच निवडणूकांचे खेळ झाले आहेत.

    ReplyDelete