Wednesday, October 16, 2013

मौलाना मदनींचे फ़टकारे

  


   भाजपाने आपल्या सर्वात लोकप्रिय नेत्याला पंतप्रधानाचा शर्यतीमध्ये उतरवले,तर कॉग्रेसचे काम एकदम सोपे होऊन जाईल; अशी चर्चा मागल्या वर्षभर चालू होती. तमाम सेक्युलर बुद्धीमंत अभ्यासक त्याचाच हवाला देत होते. पण त्याला झुगारून भाजपाने मोदींनाच आपला उमेदवार म्हणून जाहिर करण्यापुर्वी नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडले. त्यामुळे तर मोदींच्या उमेदवारीला अपशकूनच झाला होता. सहाजिकच कॉग्रेस व अन्य सेक्युलर पक्षांनी खुश व्हायला हवे होते. कारण हिंदूत्ववादी मोदींच्या उमेदवारीने त्यांचे काम सोपे झाले होते. पण मोदींची उमेदवारी जाहिर झाल्यापासून त्याच सेक्युलरांचे धाबे दिवसेदिवस दणाणत चालले आहे. कारण नितीशचा जदयु दुरावला असला, तरी अनेक लहानमोठे पक्ष सेक्युलर थोतांड झुगारून भाजपाच्या जवळ येऊ लागले आहेत. खरेतर भाजपापेक्षा हे नवे मित्र मोदींच्या जवळ येऊ लागले आहेत म्हणायची स्थिती आहे. कारण आता निवडणूकीच्या आधी भाजपाशी जवळीक साधू बघणार्‍या बहुतांश पक्षांना मोदींच्या लोकप्रियतेचा व कॉग्रेसबद्दलच्या नाराजीचा लाभ उठवायला मोदींच्या गाडीत बसायचे आहे. त्यामुळेच तमाम सेक्युलर मंडळी अस्वस्थ झाल्यास नवल नाही. कारण गेल्या दहाबारा वर्षात त्यांनी मोदी नावाचा जो बागुलबुवा निर्माण केला; त्याचा फ़ुगा आता फ़ुटत चालला आहे. भारतातील मुस्लिमांची प्रमुख धर्मसंस्था असलेल्या देवबंद मदरशाचे म्होरके व जमाते उलेमाचे नेते सय्यद महंमद मदनी यांनी तर कॉग्रेसचा सेक्युलर बुरखाच टरटरा फ़ाडून टाकला आहे. मोदींविषयी भयगंड निर्माण करून मुस्लिमांची गठ्ठा मते मिळवायचा धंदा आता कॉग्रेसने बंद करावा, हा त्यांच इशारा म्हणूनच त्या पक्षाला झोंबला आहे.

   खरे सांगायचे तर देशात आजवर सर्वाधिक दंगली कॉग्रेसच्याच राज्यात झाल्या आणि सर्वाधिक मुस्लिम त्याच पक्षाच्या राजवटीत भरडले गेले आहेत. परंतू गुजरात दंगलीच्या निमित्ताने तेव्हा दिल्लीत सत्तेवर असलेल्या भाजपाला नामोहरम करण्यासाठी मोदींच्या नावाचा बागुलबुवा करयात आला. माध्यमांनीही त्याला साथ दिल्याने मोदी म्हणजे मुस्लिमांचा कर्दनकाळ, अशी प्रतिमा उभी करून मुस्लिमांची गठ्ठा मते मिळवण्यात कॉग्रेससह बहुतांश सेक्युलर पक्ष कमालीचे यशस्वी झालेही. पण सत्य कायम लपवून ठेवता येत नाही. देशात मुस्लिमांचा सर्वाधिक विकास व प्रगती गुजरातमध्येच झाली आणि मुस्लिमांना सर्वाधिक विकासाचे लाभ गुजरातमध्ये मोदींच्याच कारकिर्दीतच मिळाले; हे सत्य हळूहळू बाहेर आले आहे. किंबहूना त्यातूनच आज मोदींची देशव्यापी यशस्वी राज्यकर्ता अशी प्रतिमा तयार झालेली आहे. त्यांची किर्ती गुजरातबाहेर जायला तोच बागुलबुवा उपयुक्त ठरला. पाच वर्षापुर्वी जेव्हा देवबंदचे तात्कालीन प्रमुख गुलाम वस्तानवी यांनी हेच सत्य बोलून दाखवले; तेव्हा याच सेक्युलर माध्यमांसह विचारवंतांनी काहुर माजवले होते आणि मोदीस्तुतीची किंमत मोजत वस्तानवींना देवबंद सोडावे लागले होते. त्यात पुढाकार घेणारे मौलाना मदनीच आता वस्तानवी यांची भाषा बोलत आहेत. म्हणजेच सेक्युलरांनी मोदीविरोधी केलेल्या दिशाभुलीचे तेही एक स्वत:च बळी आहेत. त्यामुळेच त्यांनी मोदींच्या नावाने भयगंड निर्माण करण्याचा सेक्युलर राजकारणावर केलेला आरोप महत्वाचा ठरतो. ह्यामागची हिटलरची प्रेरणाही लक्षात घेण्यासारखी आहे. कारण मोदींवर हिटलरशाहीचेही आरोप झालेले आहेत. पण त्यांचे विरोधकच कसे हिटलरच्या तत्वज्ञानाचे अनुयायी आहेत, त्याची साक्ष मदनी देतात.

   एकदा हिटलरला विचारण्यात आले, की ज्य़ु जमातीचा संपुर्ण नि:पात करण्यात यावा, असेच तुझे मत आहे का? त्यावर त्याने दिलेले मत डोळ्यात अंजन घालणारे आहे. तो म्हणाला, ‘छे छे, ज्य़ु नावाचा कुणी अस्तित्वात नसेल, तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्य़ु नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल; असा कोणीतरी हाडामासाचा, खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा शत्रू नसेल तर लोकंना चिथावता येत नाही. केवळ अमुर्त कल्पना पुढे करून ही गोष्ट साध्य होत नाही.’ हिटलरचे हे बोल मागल्या दहाबारा वर्षातील मोदी विरोधी सेक्युलर प्रचाराशी तुलना करून तपासा. मुस्लिमांमध्ये मोदी, भाजपा व संघाच्या धर्मांधतेचा बागुलबुवा माजवून त्यांची एकगठ्ठा मते मिळवण्याचा सेक्युलर पक्षांनी प्रयास अखंड चालविला आहे. मोदी वा भाजपाच्या यशाने तुमचे जीवन धोक्यात येईल म्हणून ‘जातियवादी शक्तींना सत्तेबाहेर ठेवायची’ पोपटपंची अखंड चालू आहे. पण मुस्लिमांच्या प्रगती, विकासाबद्दल अवाक्षर बोलले जात नाही किंवा काही केले जात नाही. थोडक्यात मोदींच्या नावाने भयगंड निर्माण करून त्यावर आपली पोळी भाजून घेतली जात आहे. सेक्युलॅरिझम म्हणजे मोदीद्वेष अशी एक व्याख्याच बनून गेली आहे. ती व्याख्या व त्या प्रचाराला फ़सून मुस्लिमांचे अधिक नुकसान झाले, याची प्रखर जाणिवच मौलाना मदनींच्या विधानाने समोर आणली आहे. वास्तविक मदनी एका समारंभात ओझरते बोलले होते. त्यांचा रोख मोदीच्या समर्थनाचा नव्हता. पण चोराच्या मनात चांदणे म्हणतात, तसा कॉग्रेसने तो आरोप अंगावर घेतला आणि सेक्युलर थोतांडाचे पितळ उघडे पडले.

No comments:

Post a Comment