Saturday, October 26, 2013

लौकर निघा वेळेवर पोहोचा



   मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष व कृषीमंत्री शरद पवार यांनी सल्ला द्यावे तसे भाष्य केले होते. राज्यात फ़िरून लोकांना व समस्यांना समजून घेऊन पक्षाची उभारणी करावी लागेल; असे काहीसे पवार बोलले होते. मग पत्रकारांनी संधी साधून एका बातचितीमध्ये राज ठाकरे यांना त्यावर प्रतिक्रिया विचारली होती. तेव्हा आपल्या व्यंगशैलीमध्ये राज ठाकरे म्हणाले होते, पवार कोणाला सल्ले देतात तेच समजत नाही. आपल्याच पुढल्या पिढीला समजावण्याचे सल्ले त्यांनी माझ्या नावे कशाला द्यावेत, तेच लक्षात येत नाही. थोडक्यात पवार नेहमीच असे गुंतागुंतीचे बोलत असतात. मग त्याचा अर्थ लावताना त्यांनी नाव कोणाचे घेतले आणि बोलले कोणाविषयी; तेच शोधत बसावे लागते. आताही राहुल गांधी कॉग्रेसचे भावी पंतप्रधान होण्याच्या संदर्भात बोलताना पवारांनी राहुलचे प्रतिस्पर्धी मानल्या जाणार्‍या मोदींबद्दल असेच काहीसे अनाहुत मतप्रदर्शन केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षातर्फ़े पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत. त्यानंतर नव्हेतर त्याच्याही खुप आधीपासून मोदींनी आपल्या ध्येयाच्या दिशेने क्रमाक्रमाने वाटचाल सुरू केलेली आहे. अलिकडल्या काळात मोदींचा वेग वाढला आहे. म्हणूनच महिन्याभरात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणूकांनाही लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा रंग चढू लागला आहे. त्याच संदर्भात पवार यांनी आपले मतप्रदर्शन करताना सांगितले, 'मी आजपर्यंत १४ निवडणुका लढवल्या आहेत. निवडणुकांबाबतचा माझा एकूण अनुभव सांगतो की या क्षेत्रात जो लवकर आणि वेगाने सुरुवात करतो, तो अदृश्यही लवकर होतो.' यातून पवार कोणाबद्दल व काय मतप्रदर्शन करीत आहेत?

   लोकसभा निवडणूका अजून सहासात महिने दूर असताना मोदींनी त्यासाठी आतापासूनच मुलूखगिरी सुरू केली. त्यामुळेच त्यांनी लौकर सुरूवात केली आहे आणि म्हणूनच तितक्याच वेगाने मोदी भारतीय राजकारणातून अस्तंगत होतील; असे भाकित पवारांनी केले आहे. तसे करताना त्यांनी आपल्या मागल्या अर्धशतकातील राजकारणाच्या अनुभवाची पुस्तीही जोडली आहे. आपण चौदा निवडणूका लढवल्याचा हवालाही पवारांनी दिला आहे. त्याचा अर्थ पंतप्रधान व्हायच्या आपल्या महत्वाकांक्षेचा बोजवारा कसा उडाला, त्याचे कथाकथन पवार करीत आहेत, की त्यापासून काही धडा घेण्याचे आवाहन मोदींना करीत आहेत? पवारांचा अनुभव कोणता? बावीस वर्षापुर्वी राजीव गांधींच्या घातपाती हत्येमुळे कॉग्रेसी राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्यासाठी पवारांनी थेट पंतप्रधान पदावर दावा सांगण्यापर्यंत मजल मारली होती. त्याची फ़लनिष्पत्ती काय झाली? राज्यातले मुख्यमंत्रीपद सोडून तात्काळ दिल्लीच्या आखाड्यात उडी घ्यायला पवारांनी विलंब केला, तोपर्यंत अशा राजकारणात मुरलेल्या नरसिंहरावांनी पवारांना सहजगत्या चितपट केले होते. तिथेही लुडबुड केल्यामुळे पवारांना अकस्मात पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसायला माघारी येण्याची पाळी आली होती. त्यानंतर १९९६-९८ या कालखंडात लोकसभेतील कॉग्रेसचा गटनेता व संसदेतील विरोधी नेता व्हायची संधी पवारांना मिळाली. पण तिथेही आपले पाय रोवून उभे रहाण्याआधीच डावपेचाचे राजकारण खेळताना त्यांना कॉग्रेसमधूनच बाहेर पडायची नामुष्की पत्करावी लागली. थोडक्यात लौकर सुरूवात करणार्‍या पवारांना लौकर आणि घाईगर्दी यातला नेमका फ़रक कळला नाही. म्हणूनच दिल्लीच्या राजकारणातून अस्तंगत व अदृष्य व्हायची पाळी आली.

    महाराष्ट्राच्या विविध हायवे, हमरस्त्यावर वाहन चालकांना सावधानतेच्या सूचना देण्यासाठी फ़लक लावलेले असतात. त्यापैकी एक अशी सुचना असते, ‘लौकर निघा आणि वेळेवर पोहोचा’. महाराष्ट्र उभाआडवा फ़िरलेल्या पवारांच्या नजरेतून ती सुचना निसटलेली दिसते. अन्यथा त्यांनी मोदींना असला सल्ला दिला नसता. वेळेवर सुरक्षित पोहोचण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे ‘लौकर’ निघणे हाच असतो. उशीरा निघून नंतर घाई करणे, अपघाताला आमंत्रणच असते. महाराष्ट्रातल्या रस्त्यावरच्या सूचना क्वचितच वाचलेल्या मोदींनी तोच सल्ला मानला आहे. म्हणूनच नंतर घाईगर्दी करण्यापेक्षा त्यांनी लौकर सुरूवात केली होती. त्यांनी पक्षाने नेमल्यानंतर सुरूवात केली नाही, तर पक्षाने आपलीच उमेदवारी घोषित करावी, यासाठी दोन वर्षे आधीपासून आरंभ केला. त्याकरीता पक्षात व राज्यातच नव्हेतर देशाच्या कानाकोपर्‍यात आपली प्रतिमा व लोकप्रियता निर्माण व्हायचे योग्य प्रयत्न केले. लोकप्रियतेचे ठेकेदार असलेल्या विविध राज्य वा जिल्ह्यातील सुभेदारांना हाताशी धरून पवारनितीने उमेदवारीवर हक्क सांगण्यापेक्षा त्यांनी जनतेतून आपल्या लोकप्रियतेच्या बळावर वाटचाल केली आहे; जे शक्य असून पवारांनी कधीच केले नाही. म्हणून बावीस वर्षापुर्वी खुपच लौकर सुरूवात केल्यावर, प्रत्येकवेळी घाई करून संधीच मातीमोल करणार्‍या पवारांपासून मोदींनी योग्य धडा घेतला आहे. पवारांच्या अनुभवातून मोदी खुप काही शिकले आहेत, पण आपल्याच अपयशातून मोदींनी अनेक धडे घेतल्याचा पवार यांनाच थांगपत्ता लागलेला नाही. पवार स्वानुभवातून शिकले नाहीत, पण पवारांनी केलेल्या चुका मोदींनी पद्धतशीरपणे टाळल्या आहेत. तेव्हा बाकीचे सल्ले बाजूला ठेवून पवारांनी लौकर आणि घाई या दोन शब्दातला फ़रक शिकून घ्यावा. त्यांना पुढे राहुलच्या कारकिर्दीतली राजकीय वाटचाल करताना धोके टाळता येतील आणि अदृष्य व्हायची पाळी येणार नाही.

No comments:

Post a Comment