Sunday, June 1, 2014

मोदींची नक्कल नको, अनुकरण हवे



   जेव्हापासून लोकसभा निवडणूकीचे निकाल लागले आहेत, प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्या निकालांचा अर्थ लावतो आहे. सहाजिकच मोदींच्या अभूतपुर्व यशाची डझनावारी कारणे समोर येत आहेत. अगदी ज्या कॉग्रेस पक्षाने संसदीय लोकशाहीत आधी पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केल्याबद्दल भाजपाची टवाळी चालवली होती, त्यालाही आता आधी राहुलचे नाव जाहिर न केल्याचा पश्चात्ताप होतो आहे. अनेकांना हा भाजपापेक्षा मोदींचा विजय वाटतो आहे, म्हणूनच त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये, असलेही सल्ले देण्याचा आगावूपणा चालू आहे. मात्र निकालाची व मोदींच्या विजयाची वास्तविक मिमांसा करण्याचे कष्ट कोणाला घेण्याची इच्छा दिसत नाही. त्यापेक्षा मोदींची नक्कल करण्याचा मोह अनेकांना होऊ लागला आहे. खुप आधीपासून भाजपाने मोदींना पंतप्रधान म्हणून जाहिर केल्याने त्यांचा लाभ झाला, हे सत्यच आहे. पण नुसते नाव घोषित केल्याने निवडणूका जिंकता येत नसतात. त्या नाव किंवा चेहर्‍याला यशस्वी करण्यासाठी संघटनात्मक बळ पाठीशी उभे करावे लागते. ते मोदी वा भाजपापाशी होते, याचा विसर पडून चालणार नाही. हे पाठबळ असल्यामुळे मोदींनी देशातील अनागोंदी व अराजकातून जनतेला मुक्त करण्याचे आश्वासन दिले आणि ते पुर्ण करू शकण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याचे पटवणे त्यांना शक्य झाले. कारण मागल्या तेरा वर्षात मोदींनी गुजरातमध्ये निर्णायक सरकारी कारभाराची आपली शैली निर्माण केलेली होती. विविध मार्गाने तिचे वर्णन लोकांपुढे आधीच पोहोचले होते. तीच त्यांची खरी प्रतिमा होती, जिने लोकांना भुरळ घातली. नुसते नाव कामाचे नव्हते. ज्यांना मोदींच्या कामाची भुरळ घातली होती, त्यांना मतदार म्हणून केंद्रापर्यंत आणायची क्षमता भाजपाच्या संघटनेत होती. म्हणून पुढला चमत्कार घडला. ज्याच्यावर पक्षाचे जाणते अनुभवी नेते लालकृष्ण अडवाणी यांचाही विश्वास नव्हता.

   आता अनेकजण विधानसभा पातळीवर तोच प्रयोग करायला निघालेले आहेत. उदाहरणार्थ भाजपातील काही लोकांनी ‘दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणाच दिलेली आहे. कोणी गोपिनाथ मुंडे यांचे नाव पुढे करतो आहे. सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पाठीराख्यांकरवी आपले नाव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणुन पुढे केलेले आहे. त्यालाच शनिवारी राज ठाकरे यांनी काटशह दिला म्हणायचा. कारण लोकसभा निवडणूकीत दारूण पराभव त्यांच्या वाट्याला आल्यावर त्यांनी अवघ्या दोन आठवड्यात दणदणित सभा घेऊन आपण संपलो नाही, याची साक्ष दिलेली आहे. किंबहूना त्यासाठीच ही सभा इतक्या घाईगर्दीने घेण्यात आली. त्यात आपल्या नेहमीच्या धक्कातंत्राचा वापर करून राज ठाकरे यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे. त्यावेळी भाषण करताना राजनी भाजपाचे यश हे मोदी नावाच्या चेहर्‍याचे यश असल्याची मिमांसा केली. त्यामुळेच आपणही मनसेचा चेहरा म्हणून मोठे यश मिळवू शकतो, असे त्यांना सुचवायचे आहे. त्यात गैर काहीच नाही. कारण महायुती आता लोकसभा जिंकल्यावर पाच महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. पण त्याच सेना व भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदाचा वाद असल्याचे जगजाहिर आहे. त्याच बेबनावाचा राजकीय लाभ उठवण्यासाठी राजनी केलेली ही खेळी आहे. कारण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधीच ठरवण्याबाबत भाजपा व सेनेत एकमत होणार नाही, याची मनसेला खात्री आहे. ज्याचे आमदार अधिक, त्याचा मुख्यमंत्री हे जुनेच तत्व त्यांच्यात आहे. त्यामुळे आधी कुणाचे नाव कसे जाहिर करता येईल? उलट त्यात आपले आमदार अधिक व्हावेत, म्हणून दुसर्‍याचे अधिक उमेदवार मतदानातच पडावेत; असा खेळ सेना भाजपा यांच्यात रंगण्याची शक्यता आहे. असे १९९९ सालातही झालेले आहे. राजनी त्याचाच लाभ उठवण्याचा मनसुबा केलेला दिसतो.

   पण सवाल असा आ,हे की सामान्य मतदार असल्या राजकारणाला किती प्रतिसाद देऊ शकेल? पुर्वी मोदीसरखा खमक्या प्रभावशाली भाजपाचा नेता दिल्लीत युतीपाशी नव्हता. शिवाय इथे महाराष्ट्रात बाळासाहेबांचे वर्चस्व सर्वश्रुत होते. ती स्थिती आज बदललेली आहे. शिवाय राज्यातील युतीचे यश मोदींच्या प्रभावाचा परिणाम आहे. म्हणूनच तो प्रभाव कायम राहिला तर राज्यातल्या नेत्यांचे नकारात्मक डावपेच मतदानावर परिणाम घडवू शकणार नाहीत. कारण मोदींच्या व्यक्तीमत्वाने मतदानाच्या व्होटबॅन्क उध्वस्त केल्या आहेत. त्या जशा उत्तरेच्या अनेक राज्यात जमीनदोस्त झाल्यात, तशाच महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक राजकीय प्रदेशातही दिवाळखोर झाल्या आहेत. म्हणून तर मनसेला आपल्या प्रभावक्षेत्रातही उमेदवारांची अनामत रक्कम वाचवता आली नाही. आपण कोणाला पाडून कोणाला निवडून आणू शकतो, अशा भ्रमात वावरणार्‍या राजकीय नेत्यांना मोदींच्या लाटेने निष्प्रभ करून टाकले आहे. त्यामुळेच नुसती मोदींची नक्कल करून त्यांच्यासारखे राजकीय यश संपादन करता येणार नाही. मोदींच्या राजकारणाचे अनुकरण करावे लागेल. मोदींनी कोणाला पराभूत करण्याचा मनसुबा रचलेला नव्हता. त्यांनी दुसर्‍या कुणा पक्षाला वा नेत्याला धडा शिकवण्याची भाषा केली नाही. त्यांनी लोकांना चांगल्या कारभाराचे आमिष दाखवले, त्याचे आश्वासन दिले. मोठमोठ्या सभा राज ठाकरेही घेतात व श्रोत्यांना गुंगवून टाकायची कला मोदींप्रमाणे राजपाशीही आहे. पण सभेनंतर पुढे काय? जमणार्‍या गर्दीला आपल्या पक्षाकडे ओढून व जोडून घेणारी संघटनात्मक यंत्रणा मोदींपाशी सज्ज होती. त्याच बळावर त्यांनी निवडणूकीतला चमत्कार घडवला. दुसर्‍याची मते फ़ोडण्यापेक्षा त्यांनी मतदानामध्ये लक्षणिय वाढ घडवून आणली आणि प्रतिस्पर्ध्यांना मिळू शकणारी मतसंख्याच छोटी करून टाकली. त्याचे अनुकरण मनसे करू शकणार आहे काय?

   आपल्या नव्या पक्षाची स्थापना करताना राज यांनी नेहमी बाळासाहेबांची नक्कल वा अनुकरण केलेले आहे. त्यामुळेच साहेबांच्या धर्तीवर त्यांनी आरंभी केलेल्या दोन प्रतिज्ञा आठवतात. ‘आपण कधी आत्मचरित्र लिहीणार नाही आणि निवडणूक लढवणार नाही’. त्यातली दुसरी प्रतिज्ञा त्यांनी मोडायचा पवित्रा घेतला आहे. निवडणूकीला उभे रहाण्याची त्यांची घोषणा त्यांच्या अनुयायांना उत्साह व आवेश बहाल करणारी नक्कीच आहे. पण तोच त्यांचा तुरूपाचा पत्ताही नव्हता काय? लोकसभेच्या दारूण पराभवातून सावरण्यासाठी त्याचाच वापर केल्यावर, त्यांच्यापाशी कुठला पत्ता शिल्लक उरला? आज तरी स्वबळावर मुख्यमंत्री व्हायला लागणारे बहूमत निवडून आणायची संघटनात्मक ताकद मनसेपाशी नाही. याबद्दल दुमत व्हायचे कारण नाही. २८८ पैकी निम्मे म्हणजे १४४ उमेदवारही उभे करण्याइतकी क्षमता ज्यांच्यापाशी नाही, त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार घोषित करून काय संदेश दिला आहे? हिंमत असेल तर उद्धवनेही उमेदवारी घोषित करून दाखवावी, यापेक्षा त्या घोषणेला अन्य कुठला राजकीय अर्थ आहे काय? नाही म्हटल्यास राज २८८ उमेदवारही उभे करू शकतील. केजरीवाल यांनी भाजपा वा कॉग्रेस यांच्यापेक्षाही जास्त ४२३ लोकांना लोकसभेला उभे केलेच की. पण त्यातले ४१३ अनामत रक्कम गमावून बसले. राजना महाराष्ट्रात २८८ इच्छुक मिळायला काहीच हरकत नाही. पण त्यातले २५-३० निवडून आणणे तरी शक्य आहे काय? त्याची तयारी मागल्या पाच वर्षात व्हायला हवी होती. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शहरात संघटनात्मक बळ उभे करणे अशक्य नव्हते. गेल्या तीन वर्षात अनेक भागात अन्य कुठल्या नेत्यापेक्षा मोठमोठ्या जाहिरसभा राजनी घेतल्या. त्याला लोटलेली गर्दी राजकीय अभ्यासकांना तोंडात बोट घालायला लावणारी होती. पण पुढे काय झाले? त्याचा लाभ उठवून स्थानिक पातळीवर संघटना बांधणीचे काम होऊ शकले नाही. आपल्यातले मोदीगुण वापरू बघणार्‍या राज ठाकरेंना मनसेतला ‘अमित शहा’ सोबत घ्यावा लागेल. तो त्या पक्षात आहे काय? असेल तर त्याने आजवर काय केले किंवा पुढे काय करणार आहे? की नुसती मोदींची नक्कल करून विधानसभेची बाजी मारता येईल अशा भ्रमात हा पक्ष वावरतो आहे? गेल्या पाचदहा वर्षात ‘नामदार’ पत्रकारांच्या सल्ल्याने व अजेंड्याने चालणार्‍यांची लोकसभा मतदानात धुळधाण उडाली व माध्यमांकडे साफ़ पाठ फ़िरवणार्‍या मोदींनी बाजी मारली. इतके जरी राजकीय नेते ओळखू शकले, तरी त्यांना धक्क्यातून सावरणे शक्य आहे. राज ठाकरे व मनसे त्याला अपवाद नाहीत.

3 comments:

  1. सेना भाजप ची मते खाउन पवारांचा फायदा करण्याचा सौदा तर नाही? भ्रष्टावादिचे सर्व अभिनंदन करतायत

    ReplyDelete
  2. सेनेकडे मुख्यमंत्री पदासाठी लायक उमेदवारच नाही .

    ReplyDelete
  3. Karyakartyana nivadnuki purte sakriya karayche va nantar thand rahayche hyamule khra pakshancha rhas jala aahe.

    ReplyDelete