Saturday, June 28, 2014

लोणी फ़स्त करून ताकावर दावा?



   राज्यातील आघाडी सरकारने विधानसभेच्या बैठका संपल्यावर मराठा आरक्षणाचा निर्णय घोषित केला. तसे बघितले तर त्यात चकीत होण्यासारखे काहीच नाही. येत्या तीन महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्या जिंकायच्या तर काहीतरी हालचाली करायला हव्यात. कारण नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणूकीत सत्तारूढ आघाडीला जबरदस्त फ़टका बसला आहे. ४८ पैकी ४२ जागा महायुतीने जिंकताना सत्ताधार्‍यांना अवघ्या ६ जागांवर आणून ठेवले आहे. त्यातही जवळपास अडीचशे विधानसभेच्या जागी युतीलाच मताधिक्य आहे. आघाडीला मताधिक्याच्या जागांची पन्नाशीही गाठता आलेली नाही. अशावेळी आपले काय चुकले आणि लोकांनी आपल्याला कशाला इतके आपटले; याचा विचार व्हायला हवा. पण असा विचार कुणीही सभ्य माणसे करतात. राजकारण हा प्रांतच कुटीलतेचा असल्यावर आपण चुकलो, असे मान्यच करायची सोय नसते. निदान त्यात मोरावळ्याप्रमाणे मुरलेल्या शरद पवारांना तरी चुक कबुल करण्यातच मोठा पराभव वाटतो. म्हणूनच त्यांची इतकी घसरगुंडी होत राहिली आहे. चुक मान्य करणे व आत्मपरिक्षण करण्यावर त्यांचा अजिबात विश्वास नाही. सहाजिकच आपल्या चुका दुसर्‍याच्या गळ्यात मारून नामानिराळे होण्यालाच पवार आजवर मुरब्बीपणा समजत राहिले. म्हणूनच अनुभव व कुवत असतानाही त्यांना कसोटीच्या क्षणी पराभूत व्हायचीच पाळी आलेली आहे. त्यांचे पाठीराखे त्यांना कौतुकाने जाणता राजा म्हणतात, तेव्हा हे शब्द कुठल्या राजाच्या संदर्भात पहिले वापरले गेले, त्याचे पाठीराख्यांना भान नसले तरी हरकत नाही. पण जाणत्याला तरी त्याचे भान असायला हवे ना? ज्याला इतिहास ‘जाणता राजा’ म्हणतो, त्याची ‘श्रीमंत योगी’ अशीही ओळख आहे. त्यात श्रीमंत आणि योगी अशा दोन शब्दांची सांगड कशाला घातली गेली आहे; याचे तरी भान मुरब्बी राजकारण्याला हवे की नको? श्रीमंत म्हणजे राजकारणी सत्ताधीश असला, तरी जो योग्याप्रमाणे निरीच्छ भावनेने राजकीय धर्माचे पालन करतो, त्यालाच इतिहासाने श्रीमंत योगी ठरवलेले आहे. त्याच मार्गाने कर्तव्यदक्ष कारभार करणारा म्हणून तो श्रीमंत योगी ‘जाणता राजा’ होऊ शकला. म्हणजेच संसार व नात्यागोत्याचा त्याग करून संन्याशी होण्यापेक्षा जबाबदारी उचलून समाजाचे ॠण फ़ेडण्याचे कष्ट उपसताना ज्याला श्रीमंतीचा उपभोगही घ्यायला सवड मिळाली नाही, त्यालाच जाणता राजा म्हणतात. कारण त्याच्यात व्यक्तीगत लाभापेक्षा सामाजिक कर्तव्याची ‘जाण’ पदोपदी दिसते. जो राजा म्हणून ताकासाठी झुंजणार्‍या रयतेला आपल्या वाट्याचे लोणीही देऊन टाकतो. त्याला जाणता राजा संबोधले जाते. आणि आमचे आजचे जाणते राजे काय म्हणतात?

   ‘मराठा आणि मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे जर आम्हाला फायदा होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट असेल. ताकाला जाऊन भांडं लपविण्याची गरज नाही. या निर्णयाचा आम्हाला फायदा झाला तर मला नवल वाटणार नाही. आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा आम्हाला होणार असेल, तर तो फायदा आम्ही घेणारच. या निर्णयाचा फायदा आम्हाला झाल्यास मला नवल वाटणार नाही. शेवटी आम्ही साधू संताची टोळी नाही. निवडणुकीत याचा फायदा आम्ही घेणारच.’ अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या मराठा व मुस्लिम आरक्षणांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात कोणी अधिक विश्लेषण करायची गरज नाही. गेल्या दोनतीन दशकात पवारांनी दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान निर्माण करायची धडपड केली, तेव्हा देशभरच्या अमराठी पत्रकारांनी त्यांना एक खास उपाधी दिलेली आहे. ‘स्ट्रॉंग मराठा’ अशी ती उपाधी असूनही पवारांनी आपली प्रतिमा सर्वसमावेशक नेता अशी राखण्याची अखंड धडपड केली आहे. नरेंद्र मोदी यासारखा नंतरच्या पिढीतला नेता देशावर आपली छाप पाडत असताना, पवारांना आपल्या मराठी प्रांतामध्ये आपला पुर्वापार असलेला प्रभावही टिकवताना नाकी दम आलेला आहे. तर निदान आता त्यांनी कुठे व काय चुकले, याचा आढावा घ्यायला हरकत नव्हती. अशावेळी त्यांनी आरक्षणाचा लाभ मिळाल्यास नवल वाटणार नाही, म्हणावे याचे वैषम्य वाटते. कारण तसे त्यांना खात्रीपुर्वक वाटले असते, तर ‘मिळाल्यास’ असे अधांतरी बोलायची गरज नव्हती. पण इतके करूनही यशाची हमी नसल्याचीच ग्वाही पवारांनी द्यावी, याची म्हणूनच कींव करावीशी वाटते. १९९१ सालात मंडल व कमंडल असा संघर्ष सुरू झाला, तेव्हा भुजबळ-आठवले यांना बगलेत मारून मराठेपणाला तलाक देणार्‍या पवारांना आता पुणे जिल्हाही भरवश्याचा वाटेनासा झाला आहे काय? नसेल तर आरक्षणाचा लाभ उठवण्या इतके अगतिक व्हायचे कारण काय? दोनतीन वर्षापुर्वी त्यांनीच जाहिरपणे मराठा आरक्षणाच्या मागणीची खिल्ली उडवली होती. ती खरी आहे की आजची ‘फ़ायद्याची अपेक्षा’ खरी आहे? आपल्यातला मुरब्बी व धाडसी नेताच पवार हरवून बसलेत की काय, अशी कधीकधी शंका येते. लोकसभेतला पराभव आरक्षणाने धुवून काढला जाऊ शकतो, असे खरेच पवारांना वाटते काय? आरक्षणाला ताज्या निवडणूक निकालांनी झुगारल्याचेही भान त्यांना उरलेले नाही काय? तीनच महिन्यांपुर्वी युपीए सरकारने उत्तरेतील चार सहा राज्यात पसरलेल्या जाट समुदायाला आरक्षणाची भेट दिली होती. काय लाभ झाला त्याचा?

   राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाणा, उत्तरप्रदेश अशा परिसरात जाटांचे प्राबल्य आहे. इथल्या मराठा जातीप्रमाणेच तिथे जाटांची लोकसंख्या आहे. त्यांना मतदानाच्या तीन महिने आधी युपीए कॉग्रेस सरकारने आरक्षण देऊन टाकले. त्याचा किती लाभ झाला? त्या लाभाचे ‘नवल’ खर्‍या मुरब्बी राजकारण्याला वाटायला हवे होते. आजवर त्या समाजाला कुणी आरक्षण दिलेले नव्हते, तरी जितकी मते व यश कॉग्रेसला मिळत होते, ते सर्वच यावेळी भूईसपाट होऊन गेले. आरक्षणाचा लाभ व्हायचा जमाना उरला नाही, हे ओळखायची बुद्धी पवार गमावून बसले आहेत काय? पन्नास वर्षे ज्या बागपत मतदारसंघात चरणसिंग व अजितसिंग जाट जातीच्या बळावर विजयी होत राहिले, तिथे यावेळी आरक्षणाची भेट देणार्‍या अजितसिंगांना त्याच जमातीने घरचा आहेर देत घरी बसवले आहे. त्या संपुर्ण पट्ट्यातला जाट आरक्षणामुळे कॉग्रेससोबत आला नाही, की कुठल्या सेक्युलर पक्षाकडे राहिला नाही. मग तीन महिन्यापुर्वी महाराष्ट्रात दुरावलेला मराठा वा अन्य समाज निव्वळ आरक्षणाचे गाजर दाखवले म्हणून पवारांना लाभ देईल, असे आशाळभूत विधान करणे जाणतेपणाचे लक्षण आहे काय? अखेरच्या दोनतीन वर्षात विक्रमवीर सचिन जसा चाचपडत फ़लंदाजी करायचा, तसे पवारांचे आजकाल झाले आहे काय? त्यांना लाभही कळेनासा झाला आहे काय? तोटा ओळखण्याची कुवत पवार गमावून बसले आहेत काय? गेल्या पंधरा वर्षातल्या कारभाराला विटलेल्या व ग्रासलेल्या जनतेने त्यांच्या सत्ताधारी आघाडीला साफ़ नाकारल्याचे परिणामही ओळखण्याची क्षमता या जाणत्यामध्ये उरलेली नाही काय? साधू संत अशा शब्दांच्या सोबत टोळी असा शब्द जोडला जात नाही, याचेही भान नसावे? साधूसंतांची दिंडी-मेळा-वारी असते. टोळी असते ती भामट्यांची वा दरोडेखोरांची. इतकेही तारतम्य पवार हरवून बसलेत काय? राजकारणात कोणीही साधूसंत नसतो आणि असावा ही कोणाची अपेक्षाही नसते. तळे राखी तो पाणी चाखी, असे आपले पुर्वजच सांगून गेलेत. म्हणूनच सिंचनाचा घोटाळा झाल्यास कोणाला नवल वाटले नाही. पण तळ्यातले पाणी गायब, चिखलही गायब आणि तळेच गायब होऊन त्यावर उंच इमले उभे राहिले; तिथे लोकांच धीर सुटला. घोटाळा इवलासा असला तर लोकांना फ़िकीर नसते. पण एका लवासाने देशोधडीला लावल्यावर साहेब तुम्ही २६ लवासाची भाषा बोलता, तेव्हा सामान्य माणसाच्या मनाचा थरकाप उडतो. लोकांना टोळधाड आल्याची भिती भेडसावू लागते. नेता साधूसंत असावा अशी लोकांची अजिबात अपेक्षा नसते. तो व्यवहारी व स्वार्थी असला तरी चालतो. पण टोळीबाजी करणार्‍याला लोक घाबरतात. कारण टोळी एकेकटे गाठून लांडगेतोड करीत जाते. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे सोडा साहेब. सत्तेचे लोणीच फ़स्त करून उरलेल्या आरक्षणाच्या ताकावरही दावा करणार्‍यांना कंटाळून महाराष्ट्राने सत्ताधार्‍यांकडे पाठ फ़िरवलीय, एवढेही जाणत्याला उमगू नये? मग सामान्य गरीब मराठेही आरक्षणाचे ताकही फ़ुंकून पिणार ना?

No comments:

Post a Comment