Tuesday, June 10, 2014

कराचीच्या विध्वंसातले डाव आणि पेच



  रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दहा जिहादी तालिबान अकस्मात पाकिस्तानचा सर्वात मोठा नागरी विमानतळ असलेल्या कराची येथील जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावर माल वाहतूक करणार्‍या गेटने घुसले. तिथून त्यांनी जो गोळीबार सुरू केला, तेव्हा धावपळ सुरू झाली. सैनिकी वेशातच आलेले हे दहाजण दोन गटात विभागलेले होते. त्यापैकी एका गटाने तिथल्या सुरक्षा जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यांना सुरक्षा कर्मचार्‍यांचे लक्ष विचलीत करायचे होते आणि ते होताच, दुसरा पाच जणांचा गट थेट आत घुसला. तोपर्यंत जिहादी हल्ला झाल्याचा सुगावा विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेला लागला होता. त्यामुळे एकूणच विमानतळाचा ताबा जवळच्या तमाम सैनिकांनी घेतला आणि प्रवाशांना सुरक्षित करण्याबरोबर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. सहाजिकच हल्लेखोर दहा तालिबानांना मोठी मजल मारता आली नाही. त्यापैकी सात हल्लेखोर सैनिकांच्या गोळीबारात ठार झाले आणि तिघांनी स्वत:च्या भोवती गुंडाळलेली स्फ़ोटके उडवून विध्वंसाने हल्ला आटोपला. रात्री उशीरा सुरू झालेली ही चकमक पहाटेच्या सुमारास संपली. तोपर्यंत सावधानतेचा उपाय म्हणून कराचीकडे येणारी बहुतांश विमाने अन्यत्र फ़िरवण्यात आलेली होती आणि संपुर्ण विमानतळ सेनेने ताब्यात घेतला होता. त्यामुळेच मोठी थक्क करून सोडणारी घटना घडवण्याचा तालिबानांचा मनसुबा फ़सला. नंतर जी माहिती हाती आली, ती बघता मालवाहतुक टर्मिनलच्या बाजूला वर्दळ व बंदोबस्त कमी असतो हे हेरून तिथूनच घुसखोरी करण्याचे कारस्थान सोपे होते. तिथून मग प्रवासी भागात घुसून विमाने पळवणे वा प्रवाश्यांना ओलीस ठेवून मोठा हाहा:कार माजवण्याच एकूण बेत होता. पण आरंभीच्या सैनिकी प्रतिसादामुळे त्यात हल्लेखोर तालिबान पुरेसे यशस्वी ठरू शकले नाहीत. अन्यथा त्यांच्यापाशी मिळालेले साहित्य बघता दोनतीन दिवस किल्ला लढवायचा बेत स्पष्ट होणारा आहे.

   या घटनेत दहा तालिबानांसह एकूण २८ लोकांचा बळी गेला आहे. त्यात नागरिक आहेत, तसेच काही पाकिस्तानी जवान सुद्धा आहेत. पण घटनाक्रम घडत असतानाच जमात उद दावाचा वादग्रस्त प्रमुख व लष्करे तोयबाचा संस्थापक सईद हाफ़ीज, याने केलेली विधाने व आरोप या हल्ल्याच्या हेतूवर संशय निर्माण करतात. हल्लेखोर तालिबानांच्या हाती असलेल्या शस्त्रांस्त्रांवर भारतीय बनावटीचे छाप होते, किंवा तत्सम आरोप कुठलाही पुरावा समोर आलेला नसताना करायची घाई सामान्य पाकिस्तानी व्यक्तीने केली तरी समजू शकते. पण सईद हाफ़ीज? ज्याच्यावर अशाच पद्धतीचा हल्ला मुंबईवर करण्याचा व त्यासाठी जिहादी टोळी समुद्रमार्गे भारतात पाठवण्याचा आरोप आहे, त्या सईद हाफ़ीजने असला आरोप विनाविलंब करावा काय? कारण मुंबई हल्ल्याची पद्धती आणि कराची विमानतळावरचा हल्ला व त्यामागचे उद्दीष्ट समान; असावे याला योगायोग मानता येणार नाही. त्यातली साम्येही नजरेत भरणारी आहेत. मुंबईत आलेल्या हल्लेखोरांची संख्या दहा होती आणि कराचीच्या हल्ल्यातही दहाच जिहादी होते. तिथेही आधी पाचच्या गटात घुसखोरी झाली आणि नंतर हल्लेखोरांनी दोन दोनचे पाच गट बनवून मोक्याच्या जागा रोखून धरण्याचे काम केले. मुंबई व कराचीच्या हल्लेखोरांचे आणखी एक साम्य म्हणजे दोन्हीकडे नेमकी तीच हत्यारे व दारुगोळा होता. त्याचप्रमाणे सुकामेवा सोबत घेऊन दोनतीन दिवस भुकेची सोय करण्यात आलेली होती. इतकी साम्ये कराची हल्ल्याचा सुत्रधार खुद्द सईद हाफ़ीजच असावा म्हणायला पुरेशी नाहीत काय? आणि कारण नसताना त्यानेच पुन्हा कराची हल्ल्याचा आरोप थेट भारत सरकार म्हणजे पंतप्रधान मोदींवर ठेवावा, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. पण केवळ त्याच्या आरोपाचा इन्कार करण्यापुरती ही साम्ये महत्वाची नाहीत. पाकिस्तानी नागरिकांचे डोळे उघडायला ती महत्वाची आहेत.

   तहरिके तालिबान पाकिस्तान अशा जिहादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तिचा प्रवक्ता शाहिदुल्ला शहीद याने त्याची कबुली दिलेली आहे. सातत्याने अफ़गाण सीमेवर पाक सेनेकडून जे हवाई हल्ले पाक तालिबानांच्या विरोधात होत आहेत, त्याला शह देण्यासाठी कराचीवर हल्ला करण्यात आला असे हा प्रवक्ता म्हणतो. प्रवासी विमान पळवणे आणि सरकारी यंत्रणेसह मालमत्तेची नासाडी करणे; हेच हल्ल्याचे उद्दीष्ट होते असेही त्याने म्हटले आहे. मुद्दा असा आहे, की तालिबान ही कल्पनाच मुळात पाकिस्तानी सेनेने जन्माला घातली आणि तिच्या मार्फ़त रशियाने सोडलेल्या अफ़गाण भूमीवर पाकिस्तानी प्रभूत्व ठेवण्याचे खेळलेले डावपेच होते. दिसायला त्याचे नेते अफ़गाण होते. पण लढणार्‍यांमध्ये भरणा बिगर अफ़गाणांचाच होता. परिणाम पाक-अफ़गाण सीमेच्या दोन्ही बाजूंवर झाला आणि पाक भूमीवरच्या टोळीवाल्यांशी रोटीबेटी व्यवहारातून एक अजब समाज उदयास आला, ज्याला पाकिस्तानी राष्ट्र कल्पनाच मान्य नाही. आता त्याच्याशीच पाकसेनेला झुंजावे लागत आहे. कारण अफ़गाणिस्तानातील तालिबानांचा बंदोबस्त करणार्‍या पाक सेनेला, त्यांचेच टोळीवाले तालिबान विरोध करीत असतात. त्यामुळे मग त्यांचाही बंदोबस्त पाकसेनेला करायची वेळ आली आहे. जो भस्मासूर पाक हेरसंस्थेने निर्माण केला आणि पोसला, त्यानेच आता पाकिस्तानचा अफ़गाण करायचे खेळ आरंभले आहेत आणि त्याला लगाम लावताना पाकसेनेला नाकी दम आलेला आहे. थोडक्यात पाकिस्तानचेच डाव पाकिस्तानला पेचात पकडू लागले आहेत. अफ़गाण तालिबान व त्यात जीवावर धर्मासाठी उदार झालेल्यांना काश्मिरमध्ये पाठवण्याचा खेळ आता पाकीस्तानी भूमीतच उच्छाद घालू लागला आहे. त्यांची नांगी ठेचायचा सर्वोत्तम उपाय म्हणजे आयएसआय नामक पाक हेरखात्याचे पंख छाटणे होय. पण तेही आता पाक सरकार व पाक सेनेच्या आवाक्यातले काम उरलेले नाही.

   कराचीचा तालिबानी हल्ला हा पाक नागरिकांना व राजकीय नेतृत्वाला मिळालेला मोठा गंभीर इशारा आहे. जी भुतावळ भारताला सतावण्यासाठी त्यांनी निर्माण केली; तिचीच भूतबाधा आता त्यांना सतावू लागली आहे. याचेही कारण समजून घ्यायला हवे. मुंबई हल्ल्याच्या हे पुढले पाऊल आहे. मुंबईत जे हल्ले झाले ते मोक्याच्या जागी होते. पण त्या सर्वच जागा असुरक्षित होत्या वा प्रतिबंधित नव्हत्या. तिथे कोणालाही केव्हाही मुक्तपणे जाण्याची मुभा होती. कराची विमानतळ ही अतिसुरक्षित जागा आहे आणि तिथे इतक्या सहजपणे हल्लेखोर पोहोचू शकले आहेत. याचा अर्थ पाकिस्तानातच उजळमाथ्याने वावरणारा सईद हाफ़ीज तिथल्या कुठल्याही रेल्वेस्थानक, सरकारी मुख्यालये किंवा पंचतारांकित हॉटेल व पर्यटन स्थानी धुमाकुळ घालून मानवसंहार घडवण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचला आहे. ताज्या हल्ल्याची जबाबदारी पाक तालिबान संघटनेने घेतली असली; तरी अशा बाबतीत लष्कर, जैश वा मुजाहिदीन एकमेकांशी सहकार्य करतात हे उघड गुपित आहे. त्यांनी आपली लष्करी क्षमता या हल्ल्याने सिद्ध केली असेल, तर ते पुढल्या काळात पाक सरकार व सेनेला मोठे आव्हान आहे. त्यांचा बिमोड भारतावर आरोप करून होणार नाही. उलट त्यातून अशी पापे झाकली जाऊन, असले गट शिरजोर होऊन अफ़गाणिस्तानात, झाले तसे देशाची सत्ताच बळकावू शकतील. त्यांना रोखण्याचा मार्ग म्हणजे पाक हेरखात्यात व सेनेत असलेल्या तालिबानी जिहादी प्रवृत्तीला ठेचून काढणे व अशा हल्लेखोरीला हिंसेला तिथून मिळणारी सहानुभूती निपटून काढणे हाच एकमेव मार्ग आहे. त्याची सुरूवात भारत व अफ़गाण सीमेवर होणार्‍या कुरापतींना मोडून काढणे आणि पाक भूमीवर अशा जिहादी सज्जतेच्या जागा आहेत, त्या खणून काढून त्यांचे मूळातच निर्मूलन करणे आवश्यक आहे. ते भारतीय उपखंडासाठी जितके महत्वाचे, त्यापेक्षाही पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी अगत्याचे आहे. कारण आजवरचे पाकचा भारतविरोधी जिहादी डाव आता त्याच पाकिस्तानसाठी पेच म्हणजे गळफ़ास बनू लागला आहे.

1 comment:

  1. भाऊ मला नाही वाटत की पाकिस्तान यातून काही धडा घेईल. कुत्रचे शेपुट वाकडे ते वाकडेच राहणार. 'बारबार गलती करे उसकाही नाम है पाकिस्तान.' तुमचे हे लिहून होत नाही तोवर दूसरा हल्लाही झाला आहे. कराची हल्ल्यामागे मोदी आहेत असे म्हणणे म्हणजे शत्रुच्या सैन्याच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी-धनजी दिसायचे तसे झाले आहे. जसे शरद पवार यांना पुणे आणि कोल्हापुरच्या दंगलीतही मोदी दिसतात.

    ReplyDelete