Thursday, June 12, 2014

अक्कल ठिकाणावर येतेय?



   बुधवारी आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितल्याचे वृत्त वाचायला मिळाले आणि मोठी गंमत वाटली. कारण केजरीवाल यांचे निकटवर्ति मनिष शिसोदिया यांनी तसे पत्रच पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. दिल्लीच्या वीज पुरवठ्याची समस्या पंतप्रधानांच्या कानी घालून त्यावर उपाय योजण्यासाठी केजरीवाल यांना आता मोदींची भेट घ्यायची आहे. पण राजधानी दिल्लीची ही वीजटंचाई आज अचानक निर्माण झालेली नाही. याच समस्येचे राजकीय भांडवल करून केजरीवाल यांच्या नव्या पक्षाने गेल्या दिड वर्षात दिल्लीमध्ये धमाल उडवून दिली होती. वीजेचे दर कमी करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्यापासून तोडलेल्या विजेच्या जोडण्या बेकायदा जोडण्याच्या आंदोलनापर्यंत अनेक नाटके केजरीवाल यांच्या पक्षाने केली होती. त्यात विजेची थकलेली वा आलेली बिले न भरायचे आंदोलनही समाविष्ट होते. पण त्याच तमाशातून मते व सत्ता मिळाल्यावर त्याच आम आदमी पक्षाने जबाबदारी सोडून पळ काढला होता. तेव्हा विजेचे दर खाली आणायचे सोडून, तीन महिन्यासाठी अनुदान देत पळवाट काढली गेली आणि पुढल्या परिस्थितीचा विचारही न करता केजरीवाल यांच्या पक्षाला लोकसभा जिंकण्याची स्वप्ने पडू लागली होती. त्यामुळेच दिल्लीकरांना वार्‍यावर सोडून हे महाशय वाराणशीत मोदींना पराभूत करायला धावत सुटले होते. तेव्हाच दिल्लीत पाण्याचे दुर्भिक्ष व विजेची बोंब सुरू झाली होती. पण केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांना निवडणूकीच्या राजकारणाची झिंग चढली होती. त्यामुळे दिल्लीकरांच्या दुर्दशेकडे पाठ फ़िरवून ही मंडळी देशभर रोडशो करीत भरकटत होते. त्यात सार्वत्रिक मार खाल्ल्यावर पुन्हा त्यांना दिल्लीची आठवण झाली आहे. कारण हाती असलेली दिल्ली त्यांनी गमावली आहे आणि विधानसभेतही असलेल्या जागा टिकवणे अवघड झाले आहे.

   देशभर चारशेहून अधिक उमेदवार उभे करून विक्रमी डिपॉझीट गमावण्याचा पराक्रम केल्यावर दिल्लीत तोंड दाखवणे या क्रांतीवीरांना अवघड झाले आहे. मतदारांसमोर जाणे दूर राहिले. आपल्याच कार्यकर्ते व स्वयंसेवकांना तोंड देताना केजरीवाल यांच्या नाकी दम आला आहे. कारण एका बाजूला पक्षातले जुने व संस्थापक सदस्य साथ सोडून चालले आहेत आणि प्रथमच निवडून आलेले आमदार तेही पद गमावण्याच्या भयाने सैरभैर झाले आहेत. त्यासाठी मग पुन्हा दिल्लीची सत्ता मिळवण्याची कसरत करायची नामुष्की केजरीवाल यांच्या नशीबी आलेली आहे. पण मागल्या खेपेस पाठींबा देणारी कॉग्रेस यावेळी पाठींबा देण्याच्या मनस्थितीत नाही. गेल्या खेपेस भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले होते. त्यामुळे त्याला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉग्रेसने केजरीवाल यांना न मागताच पाठींबा दिलेला होता. पण त्याच्या बदल्यात किमान सभ्यताही केजरीवाला दाखवू शकले नव्हते. आता तर लोकसभा निवडणूकीत सर्वच जागा भाजपाने जिंकल्या असून दुसर्‍या क्रमांकावर पराभूत होताना ‘आप’ने कॉग्रेसची आणखी मते खेचली आहेत. म्हणूनच तो नवा पक्ष जितका विस्कळित होईल व जनमानसात बदनाम होईल, तितका कॉग्रेसला हवाच आहे. तरच गमावलेली मते पुन्हा कॉग्रेसकडे येऊ शकतील. त्यामुळेच कॉग्रेस पुन्हा केजरीवालना मुख्यमंत्री बनवण्य़ाच्या विरोधात आहे. म्हणूनच पुन्हा मतदानाची वेळ आल्यास आमदारकीही गमावण्याचे भय असलेल्या कॉग्रेस आमदारांचे दडपण पक्षाने झिडकारले आहे आणि विधानसभा बरखास्त व्हायला पाठींबा दर्शवला आहे. ‘आप’च्या आमदारात आपली आमदारकी टिकवण्यासाठी भाजपाकडे जायला एक मोठा गट उत्सुक आहे. पण भाजपाला तशी सत्ता नको आहे. कारण लोकसभेतील यशानंतर विधानसभाही मोठ्या फ़रकाने जिंकण्याची खात्री त्या पक्षाला वाटते आहे. सहाजिकच केजरीवाल चहूकडून कोंडीत सापडले आहेत.

   पक्षा़च्या संघटनेत बंडाळी माजली आहे आणि आमदारही दबाव आणत आहेत. त्यातच सहा महिन्यापुर्वी मोठ्या अपेक्षेने मत देणारा दिल्लीकर, सामान्य नागरिक कुठली समस्या सुटली नाही म्हणून आम आदमी पक्षाला धारेवर धरायची संधी सोडायला तयार नाही. त्यामुळेच देशाला भ्रष्टाचार मुक्त करायला जनलोकपाल आणायच्या आवेशात मुख्यमंत्री पदावर लाथ मारणार्‍या केजरीवाल आणि कंपनीला, आता जुन्या आश्वासनांचे स्मरण झाले आहे. त्यांनी आरोपबाजी व धरण्याचा नाद सोडून विजेची टंचाई संपवण्यासाठी मोदींना शरण जाण्याचा पवित्रा घेतला आहे. लोकसभा निवडणूकीत जाण्याची घाई केल्याचे व त्यात चुक झाल्याचा त्यांना आता साक्षात्कार झाला आहे. अर्थात भाषा नेहमीचीच मानभावी आहे. आपल्या चुका झाल्या, तरी आपली नियत खोटी नव्हती, असा युक्तीवाद चालूच आहे. त्यांची नियत खरी असून चुका झाल्या, त्याचे दुष्परिणाम सामान्य दिल्लीकराला भोगावे लागत आहेत आणि त्यापासून त्या गरीबाची सुटका नाही. मग नियत खरी असून उपयोग काय? शिवाय ज्या नेत्यावर खोट्या नियतीचे आरोप करण्यात मागचे चार महिने खर्च झाले, त्याच मोदीकडे आता आपल्या नालायकीवर उपाय शोधण्यासाठी जाण्याची नियत किती प्रामाणिक मानायची? दोनच आठवड्यापुर्वीही दिल्लीत पाण्याची बोंब होती आणि विजेची टंचाई भेडसावत होती. पण तेव्हाही केजरीवाल आपल्याच मस्तीत कोर्टाशी पंगा घेऊन गजाआड हवा खात होते. त्यांचे सहकारी लोकांच्या दुर्दशेवर उपाय शोधण्यापेक्षा नेत्याच्या सुटकेसाठी तिहार तुरूंगाच्या बाहेर वाहतुकीचा खोळंबा करणारी निदर्शने करीत होते. शेवटी त्यांच्याच अनेक सहकार्‍यांना असल्या निरर्थक नाटकाचा कंटाळा आला आणि एका व्यक्तीसाठी पक्ष, कार्यकर्ते व सामान्य जनतेच्या आयुष्याचा नुसता खेळखंडोबा होत असल्याने अनेकांनी पक्षालाच रामराम ठोकायला सुरूवात केली. तेव्हा केजरीवाल यांचे डोके ठिकाणावर आले आहे. इतर कुठल्याही पक्ष वा संघटनेप्रमाणे त्यांनी जनतेच्या प्रश्नावर सरकारचे दार ठोठावण्य़ाचा पर्याय स्विकारलेला दिसतो. अक्कल ठिकाणावर येतेय म्हणायची.

No comments:

Post a Comment