Tuesday, March 31, 2015

पानसरे हटवले, टोल वाढवला?




कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला जबाबदार असलेला गुन्हेगार सापडलेला नाही, म्हणून खुप काहुर माजवले जाते. पण त्यांनी ज्या कारणास्तव धनदांडग्यांशी शत्रूत्व पत्करले, त्याबद्दल कोणी अवाक्षर बोलताना दिसत नाही. किती चमत्कारिक बाब आहे ना? पानसरेंनी आपल्या अखेरच्या दिवसात केलेले मोठे आंदोलन, कोल्हापुरला गांजवणार्‍या टोलवसूलीचे होते. मागल्या वर्षभरात या एकाच शहरात रस्त्यासाठी भराव्या लागणार्‍या टोलविरोधी लोकमत जागे करण्यात, हे आंदोलन यशस्वी झाले होते. इतरत्र कुठे नाही इतके टोलविरोधी आंदोलनात कोल्हापूरने सातत्य दाखवले होते. हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि वारंवार अगदी जाळपोळ होण्यापर्यंत आंदोलन पेटत गेलेले होते. अगदी निवडणूक काळातही त्याचा धागा पकडून प्रचार झाला आणि एका कार्यक्रमासाठी तिथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोलचा विषय आपल्या भाषणात घ्यावा लागला होता. पण मागल्या दीड महिन्यात त्या विषयावर सगळीकडे सामसूम आहे. आंदोलनात पानसरे यांच्या सोबत असलेली मंडळी पांगली आहे आणि आंदोलनाची घडीच विस्कटून गेलेली आहे. सर्व पक्षांनी एकत्रितपणे केलेल्या आंदोलनात आता पक्षिय हेव्यादाव्यांनी वेगळेपणा आलेला आहे. या पार्श्वभूमीवर  मंगळवारी कोल्हापूरच्या टोलदरात वाढ केल्याची बातमी यावी, याचे म्हणूनच आश्चर्य वाटत नाही. जणू पानसरे यांच्या अखेरच्या आंदोलनाला संपवल्याच्या जखमेवर मीठ चोळावे, तशी ही दरवाढ करण्यात आलेली आहे. पण ‘आम्ही सारे पानसरे’ मूग गिळून गप्प आहेत. हे सुद्धा तितकेच नवल नाही काय? पानसरे यांचे कार्य पुढे घेऊन जाण्याची भाषा बोलणार्‍या कोणालाच, त्यांनी टोलविरोधात बजावलेली निर्णायक भूमिकाही आठवत नसेल का? की टोल विरोधी आंदोलनाचा पानसरे यांच्या कामगिरीशी कुठलाच संबंध नव्हता, असे या लोकांना म्हणायचे आहे?

दाभोळकर यांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हायला हवा, म्हणून सवकारवर राजकीय दबाव आणला गेला होता. पण पानसरे हत्येनंतर त्यांच्या आंदोलनाचा पाठपुरावा म्हणून कोल्हापुरातील तरी टोलबंद व्हावा, अशी मागणीही होऊ शकली नाही. सर्वात हीच संशयास्पद बाब आहे. त्या हत्याकांडासाठी अश्रू ढाळणारा प्रत्येकजण त्यात आपापले स्वार्थ शोधतो आहे. पण टोल हे त्यांचे अखेरचे मोठे आंदोलन होते आणि त्याच्या पुर्ततेसाठी त्यातला एकही समर्थक आवाज उठवायची भाषा करत नाही. दुसरीकडे आताच टोल दरात वाढ करण्याचेही काही समर्थनीय कारण नाही. शहरातील अवघ्या पन्नास किलोमिटरचे रस्ते बांधायचे आणि त्याची किंमत टोलच्या माध्यमातून वसुल करायचे कंत्राट झालेले होते. पण जे बांधले गेले ते रस्ते चांगले व दर्जेदार नाहीत. अधिक असुविधाजनक आहेत, म्हणून त्यासाठी टोल भरण्यावरून कोल्हापुरकरात नाराजीची भावना उफ़ाळली होती. त्यालाच पुढे आंदोलनाचे स्वरूप येत गेले. लोकांचा विरोध नव्हेतर संताप इतका भयंकर होता, की अनेक जागी टोलनाके दोनतीनदा जाळण्यात आले. हाणामारीचे प्रसंग ओढवले. त्या लोकक्षोभाला मार्गी लावण्यासाठी पानसरे यांच्यासारख्या बुजूर्गांनी त्यात पुढाकार घेतला होता. त्याच कारणामुळे त्यात अभिनिवेश सोडून सर्वपक्षिय कार्यकर्तेही सहभागी झालेले होते. कारण किरकोळ खर्चात बांधल्या गेलेल्या या रस्त्यांसाठी, तब्बल तीस वर्षे टोल वसुल व्हायचा होता. त्याला कुठलेच तारतम्य नव्हते. आधीच्या सत्ताधार्‍यांनी कोल्हापूरला टोलमुक्त करायचे आश्वासन दिलेले होते. तर नव्या सरकारनेही कंराटदाराला पैसे मोजून टोलमुक्तीचे वचन दिले होते. प्रत्यक्षात त्यापैकी काहीच झाले नाही. टोलमुक्ती सोडाच, होते त्यापेक्षा अधिक दराने टोलची वसुली करण्यापर्यंत आता मजल गेली आहे. मंगळवारी रात्रीपासून त्याचा अंमलही सुरू झाला आहे.

कल्पना करा, की आज कॉम्रेड पानसरे हयात असते, तर त्यांनी निमूटपणे ही दरवाढीची टोलवसुली होऊ दिली असती काय? याही वयात त्यांनी उन्हातान्हाची पर्वा न करता रस्त्यावर धाव घेतली असती आणि त्यांच्याकडे बघून कोल्हापुरचा नागरिक अधिक संतापाने टोलवाढीच्या विरोधात रस्त्यावर आलाच असता. पण पानसरे आज हयात नाहीत आणि कंत्राटदाराला वाटेल त्या दराने टोलचे पैसे वसुल करायला मोकाट रान मिळाले आहे. तो पानसरे यांना मिळालेला न्याय आहे असे कोणाला म्हणायचे आहे काय? किंबहूना पानसरे यांच्या हत्येचा लाभ कोणाला उचलता येतो आहे, त्याचा हा ढळढळीत पुरावाच नाही काय? मात्र त्यांची हत्या झाल्यापासून त्यांच्या गुणगौरवात अखंड गुंतलेल्यांनी, कधीही टोलविरोधी आंदोलनाचा उल्लेखही केलेला नाही. आणि आता टोलदरात वाढ झाल्यावर कुठेही कसली प्रतिक्रीया उमटलेली नाही. याला काय म्हणायचे? माणुस तर मारून टाकलाच. पण त्याच्या इच्छा व त्याचे आंदोलनही ठार मारले गेले आहे काय? २२० कोटी खर्चाची ही योजना अखेरीस साडेचारशे कोटीपर्यंत जाऊन पोहोचली, असे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. मात्र अजून काम पुर्ण झालेले नाही, त्यामुळे सतत नागरिकांना व वाहनांना असुविधाचाच सामना करावा लागतो. पण त्याचीच उलटी किंमत नागरिकांकडून वसुल केली जाते ना? मग त्याला लूट नाही तर काय म्हणायचे? खर्चाचे पैसे वसुल व्हावेत याला कोणाची हरकत नाही. पण खर्चाची रक्कम कशी ठरायची? झालेले काम आणि त्यावरच्या खर्चाचे मूल्यांकन कोणी करायचे? यापैकी काहीच झालेले व होत नसताना परस्पर टोल दर वाढवले जातात, ही कोल्हापुरकरांची लुट आहेच. पण पानसरे हत्याकांडाच्या जखमेवर चोळलेले मीठ आहे. मात्र त्याबद्दल ‘आम्ही सारे पानसरे’ गप्प आहेत. कोणीही टोलवाढीबद्दल अवाक्षर बोलायला तयार नाहीत.

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येपासून कोणीही कोल्हापूरच्या टोल आंदोलनाचे नाव घेतलेले नाही. जणू सगळे त्या आंदोलनाला विसरून गेले होते. त्याच्या ऐवजी कोल्हापुरात टोलविरोधी जी लोकभावना एकजुटीने उभी राहिलेली होती, तिला छेद देण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले. तिथल्या कुठल्या हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यालयावत मोर्चा घेऊन जाण्याचा विषय अटीतटीचा बनवला गेला. त्यातून शिवसेना, भाजपा इत्यादी हिंदुत्ववादी चवताळून उठले आणि टोलविरोधी आंदोलनात एकत्र आलेले सर्वच पक्ष व संघटना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. परस्परांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले. सहाजिकच टोलविरोधाचा आवाज अधिकाधिक क्षीण होत गेला. कोल्हापुरात आता कोणी टोलच्या विरोधात बोलणारच नाही, याची खात्री झाल्यावर सत्ताधार्‍यांना टोल संपवण्याची गरज उरली नाही. आणि कंत्राटदाराला टोलवसुलीची हमीच मिळाली. त्याने नुसती होती त्याच दराने नव्हेतर वाढीव दराने टोलवसुलीचा पवित्रा घेतला. जणू पानसरे इतकीच त्यातली अडचण होती. ती दूर झाली आणि ‘टोल’धाडीला रानच मोकळे मिळाले. त्या हत्येचा तपास पोलिसांवर सोपवून ‘आम्ही सारे पानसरे’ आपल्या नेत्याचा वारसा पुढे चालवायला टोलविरोधात खंबीरपणे पुढे आले असते, तर आज टोलदर वाढवण्याची हिंमत कंत्राटदाराला झाली असती काय? विविध पक्षात असलेली टोलविरोधातली एकजूट मोडली असती काय? कॉ. पानसरे यांच्या हत्येचे गुढ कायम आहेच. पण त्यांच्या अखेरच्या आंदोलनाला निष्प्रभ करण्यामागचे गुढही लहानसहान नाही. त्या आंदोलनाच्या निमीत्ताने कोल्हापुरकरांमध्ये झालेली एकजुट मोडण्याचे कारस्थानही तपासायला हवे आहे. कोल्हापूरातील ताज्या नव्या टोल दरवाढीने त्या हत्येला अधिकच रहस्यमय बनवू्न टाकले आहे. अर्थात ज्यांना पानसरे यांच्याविषयी आत्मियता असण्यापेक्षा स्वार्थ मोठे वाटतात, त्यांना टोलचे काय?

आपण बेसावध बेजबाबदार वाचक आहोत? ( लेखांक २ )



साक्षी सप्तसागर यांच्या एका सत्यकथनाच्या पोस्ट संबंधी मी आधीच काही शंका घेतल्या आहेत, तशा त्यांच्या पोस्टवरही टाकल्या होत्या. त्याचे उत्तर मिळाले नाही. मात्र आधीच तिथे साक्षीताईंची जी टिंगल टवाळी चालली होती त्याला माझ्या आक्षेपांनी जोर चढला. फ़ेसबुक व सोशल माध्यमातून अशी हमरातुमरी आता नित्याचीच बाब झाली आहे. तिथल्या लिखाणाचे गंभीर वाचन होत नाही, की त्यावरचे आक्षेपही गंभीरपणे मांडले जात नाहीत. एका बाजूचे वा ठराविक भूमिकेतले सदस्य दुसर्‍या भूमिकेवर तुटून पडतात. कधी काही लोक मुलभूत मुद्दे उपस्थितही करतात, पण त्याचे कोणी उत्तरही देत नाही. बहुतांशी उखाळ्यापाखाळ्या काढण्याचाच प्रकार चालतो. त्यासाठी फ़ेसबुकर्सना दोष देणे मला रास्त वाटत नाही. समाजातील प्रतिष्ठीत व मान्यवर लोक जसे वागतात, त्याचे बाकीची लोकसंख्या अनुकरण करत असते. टिव्हीच्या वाहिन्या व तिथल्या चर्चा बघितल्या, तर सोशल माध्यमातील उखाळ्यापाखाळ्यांचा आदर्श कुठून आला, त्याचा अंदाज येऊ शकतो. प्रस्थापित माध्यमात बुद्धीमान लोक तेच करतात. त्याचे थोडे विस्कळीत स्वरूप इथे आढळते. पण त्यात विचार, विषय व आशय मारला जातो. परिणामी चर्चा वा विषयांची अधिकच घसरगुंडी होते आहे. त्यासाठी कोणा एकाला दोष मी देणार नाही. पण जे आपली शक्ती, वेळ व बुद्धी अशा उखाळ्यापाखाळ्य़ांसाठी खर्च करतात, त्यांना आपल्या होणार्‍या नुकसानाची जाणिव व्हावी असे वाटले, म्हणून ह्या एका पोस्ट संदर्भात अधिक लिहावेसे वाटले. तसे मागल्या ब्लॉगमध्ये मी सूचित केले होते. पण तात्काळ अनेकांनी मलाच उर्जा वाया घालवू नये असा सल्ला दिला. कारण त्यांच्या मते सदरहू साक्षी सप्तसागर ही प्रोफ़ाईल बोगस आहे. असेलही, पण तसेच असेल, तर बाकीच्यांनी त्या प्रोफ़ाईलकडून लिहिल्या जाणार्‍या विषयावर इतके खवळून विरोधात वा बाजूने कशाला लिहावे? म्हणूनच मला ज्यांनी सल्ला दिला त्यांच्या सदिच्छा मी नाकारत नाही. पण माझा हेतू त्यांच्या लक्षात आलेला दिसत नाही. माझा हेतू वाचकांची जाण व सजगता यांच्याशी संबंधित आहे. कारण खरे वा खोट्या प्रोफ़ाईलच्या लोकांकडून असे काही मुद्दाम डिवचणारे लिहीले जाते, तेव्हा त्याच्यावर तुटून पडण्यापेक्षा आधी ते बारकाईने वाचले जावे. त्यातला खरेखोटेपणा डोळसपणे समोर आणावा. तो आणला गेला तरच अशा लिखाणाला आळा घातला जाऊ शकेल. खोटे असेल तर त्याची विश्वासार्हता निर्विवाद संपवणे अगत्याचे आहे. जर वाचक डोळस, चिकित्सक व चोखंदळ झाला, तरच अशा लिखाणाला प्रतिसाद मिळणार नाही आणि त्याला पायबंद घातला जाऊ शकेल. त्यासाठीच नमूना म्हणून ह्या पोस्टची मी निवड केली आहे. साक्षी सप्तसागर यांच्यावर तुटून पडलेल्या वा त्यांचेही समर्थन करणार्‍या किती लोकांनी ती पोस्ट गंभीरपणे बारकाईने वाचली आहे? असेल तर त्यात प्रत्येक वाक्यागणिक व ओळीगणिक असलेला विरोधाभास ओळखता आला पाहिजे होता आणि त्यावर झोड उठवली गेली पाहिजे होती. समर्थकांनी शंकास्पद ठरवल्या गेलेल्या मुद्दे व विषयावर भक्कम पुरावे द्यायला हवे होते. त्याचा दोन्हीकडून अभावच दिसला.

केवळ याच हेतूने मूळ पोस्टवर मी शंका नोंदवल्या होत्या आणि सदरहू पोस्ट लिहीणार्‍याला त्याचा प्रतिवाद करता आला नाही. उलट उत्तर देण्यापेक्षा धन्यवाद मानावे तशी प्रतिक्रिया आली. हे असे केवळ सोशल मीडियातच चालते का? रोजची वर्तमानपत्रे वा वाहिन्यांवरच्या बातम्या चर्चा यातला खोटेपणा वा थापेबाजी आपण किती ओळखू शकतो? नुसती कुणाला पेडन्युज वा विकावू पत्रकारिता असे म्हणून आपली सुटका होऊ शकते का? मग त्या थापा मारणारे वा दिशाभूल करणारे आणि त्याचे विरोधक यांच्यात कुठला फ़रक उरला? एखादा लेख वा पोस्ट आपल्या ठरलेल्या भूमिकेला छेद देणारी आहे, म्हणून आरोप वा प्रत्यारोप केल्याने आपण खरे ठरत नाही वा समोरचा खोटा पडत नाही. आपल्याप्रमाणे ठोस शब्दात लिहू बोलू न शकणारा प्रचंड वर्ग व लोकसंख्या आपल्या समाजात आहे. मात्र ती लोकसंख्या अशी दिशाभूल करणार्‍यांना वाटते तितकी मुर्ख वा बेअक्कल नाही. मागल्या लोकसभा निकालांनीच त्याची ग्वाही दिलेली आहे. नुसत्या माध्यमातील खोट्या गदारोळाने जनता फ़सत असती, तर माध्यमातल्या सेक्युलरांची बारा वर्षाची अपप्रचाराची मोदीविरोधी तपस्या अशी निष्फ़ळ झाली असती काय? उलट इथे साक्षी सप्तसागर वा इतरत्र सेक्युलर पत्रकार यांनी संघाच्या विरोधात काहूर माजवून जितकी संघाची खरीखोटी ओळख देशाच्या कानाकोपर्‍यात नेली, तितके काम संघाचे प्रचारक पन्नास वर्षात करू शकले नव्हते. कुठलाही प्रचार वा अपप्रचार काही प्रमाणात हानिकारक वा लाभदायक असतो. पण त्याचा अतिरेक उलटे परिणाम देणारा असतो. संघाच्या विरोधातल्या अतिरेकी प्रचाराने लोकांच्या मनात त्याविषयी कुतूहल निर्माण झाले नसते तर त्याच्याविषयी खरेखोटे तपासायचा प्रयत्नही झाला नसता. खोटा प्रचार झाला आणि प्रत्यक्षात संघ लोकांच्या सान्निध्यात आला, तो उपकारक असल्याचे जाणवल्यानेच मागल्या तीनचार दशकात संघाचा पसारा वाढत गेलेला आहे. नुसत्या प्रचारकांकडून इतका विस्तार संघाला शक्य झालाच नसता. म्हणूनच जे कोणी संघाचा खोटा बागुलबुवा करतात, त्यांचे संघानेही आभारी राहिले पाहिजे. संघ समर्थकांनीही ॠणी राहिले पाहिजे. मुळात संघाचे नावच ठाऊक नसेल, तर पहिल्यापासुन आपली ओळख करून द्यावी लागते ना?

याचीच दुसरी बाजू अशी, की संघावर टिका करण्याला वा आक्षेप घ्यायलाही अनेक जागा आहेत. कुठलीही संघटना वा गोष्ट परिपुर्ण नसते. त्यात दोष व त्रुटी असतात. त्यावर बोट ठेवले तर बिघडत नसते. पण खोटेच आरोप केले आणि सत्य समोर आले, मग आरोप करणार्‍याची विश्वासार्हता संपून जात असते. माध्यमात घुसलेल्या सेक्युलर पत्रकारांनी त्याच विश्वासार्हतेला सुरूंग लावला, त्याचा लाभ मागल्या निवडणूकीत भाजपा व मोदींना सर्वाधिक मिळाला आहे. किंबहूना त्याचे मोठे श्रेय साक्षी सप्तसागर यांच्यासारख्यांना आहे. त्यांनी बिनबुडाचे लिहील्याने बोलल्याने अन्यत्रचे लोक फ़सतात. पण लालबाग-काळचौकी अशा परिसरातल्या लोकांचा विश्वास साक्षी सप्तसागर गमावून बसतात. आज लालबाग असेल, उद्या बोरीवली वा मुलूंडबद्दल असेच लिहीले जाते. क्रमाक्रमाने त्या त्या भागातील अशा लिहीणार्‍या बोलणार्‍यांची विश्वासार्हता संपुष्टात येते. आधी ती सेक्युलर पक्षांनी गमावली आणि मागल्या निवडणूकीत माध्यमांनी गमावली. म्हणून त्यांच्या लिहीण्याचा विरोध करू नये वा आक्षेप घेऊ नये, असे माझे अजिबात म्हणणे नाही. कुठल्याही बाजूने दुसर्‍याला खोटे पाडताना शिव्याशाप देऊन वा नुसते प्रत्यारोप करून विश्वास संपादन करता येत नाही. तुमचा युक्तीवाद, प्रतिवाद, पुरावे किंवा प्रत्यारोप, आक्षेप भक्कम व सत्याधिष्ठीत असायला हवेत. आणि त्यासाठी ज्याच्यावर हल्ला करत आहात त्याचे लिखाण काळजीपुर्वक बारकाईने वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर्काने तरी समजून घेता येते काय, त्याचाही तपास केला पाहिजे. नसेल तरच पुरावे व तर्कानेच प्रतिवाद केला पाहिजे. त्यासाठी साक्षी सप्तसागर यांची पोस्ट मला उत्तम नमूना वाटला. कारण त्याच्या इतके पाठोपाठचे विरोधाभास मला आयुष्यात कुठल्याच लेख वा लिखाणात वाचायला मिळालेले नाहीत. पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत भाषा आकर्षक असली तरी पदोपदी शब्दागणिक त्यात परस्परविरोध ठासून भरलेला आहे. पण त्यांच्यावर तुटून पडलेल्या बहुतांश कोणीच एकाही विरोधाभासावर बोट ठेवले नाही. याचे कारण आजकाल छापून येते वा बोलले जाते त्याचे बारकाई्ने गंभीर वाचन वा परिशीलनच होत नाही. गंभीरपणे वाचावे कसे आणि त्यातले दोष वा खोटेपणा दिशाभूल ओळखावी कशी, याचा वस्तुपाठ म्हणून या पोस्टमधून देता येईल. साक्षीताईंनी लिहीलेल्या पोस्टची शब्द व वाक्यानुसार आपण छाननी पुढल्या काही भागात म्हणूनच करू. मग दोष त्यांना देण्यापेक्षा आपल्या उतावळ्या वाचनशैलीचा दोष आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात येऊ शकेल. (अपुर्ण)

साक्षीताई यांची मूळ पोस्ट पुढील दुव्यावर
http://jagatapahara.blogspot.in/2015/03/blog-post_30.html


Monday, March 30, 2015

कृतीशून्यतेचा इतिहास कोणी बदलायचा?



"Insanity: doing the same thing over and over again and expecting different results." -Albert Einstein 

गेल्या दोन वर्षात अनेकजण आम आदमी पक्ष सोडून गेले आणि अनेकजण नव्याने त्या पक्षात आले. पण इतका तमाशा यापुर्वी कधीच झालेला नव्हता. यापुर्वीही असे अनेक राजकीय पक्षांच्या बाबतीत झाले आहे. मात्र आज त्या पक्षात जे काही घडते आहे, त्याला सत्तेची साठमारी वा गटबाजी असे संबोधणे चुक होईल. हा दोन भूमिकांचा संघर्ष आहे. अण्णा आंदोलनाला जो भरघोस पाठींबा मिळाला, त्यामुळे अनेक निकम्मे राजकीय गट त्यात आपापले भवितव्य शोधू लागले होते. त्यात पुर्वाश्रमीच्या समाजवादी चळवळीचे विखुरलेले लोक होते. त्यांनी घाऊक संख्येने जुन्या समाजवादी चळवळीचा पक्ष बनवण्याचे स्वप्न बघितले असेल तर नवल नाही. युतीची सत्ता असताना अण्णा हजारे यांनी आरंभलेल्या आंदोलनातही असेल काही समाजवादी घुसले होते. पण तेव्हा त्यात कुणी केजरीवाल किंवा अनुभवी चतुर इव्हेन्ट मॅनेजमेन्ट करू शकणारा नव्हता. म्हणून दोन दशकापुर्वीचे ते अण्णा आंदोलन बारगळले. कुठल्याही व्यक्तीमत्वाला महात्मा बनवण्याचे लाभ मिळू शकतात. पण ते उठवण्यासाठी संघटित ताकद आवश्यक असते. अण्णा तेव्हाही एकांडे शिलेदार होते आणि आजही तसेच आहेत. तेव्हा ज्या समाजवाद्यांनी अण्णांची कास धरली, त्यांच्यापाशी लोकसंख्या नव्हती. पण माध्यमांची साथ असल्याने युती विरोधातल्या राजकारणासाठी अण्णांचे महात्म्य माध्यमातून माजवण्यात आले, व्यवहारात काहीच नव्हते. म्हणूनच आंदोलन बारगळले आणि तात्कालीन समाजवाद्यांची राजकीय उभारणीची स्वप्ने धुळीस मिळाली. पुढल्या काळात अण्णांची महत्ताही ओसरली होती. पत्रकबाजीपेक्षा अधिक काही नव्हते. चार वर्षापुर्वी जनलोकपाल आंदोलनाची कल्पना घेऊन जे मुठभर लोक कामाला लागले, त्यापैकी केजरीवाल यांच्यापाशी आपल्या संस्थेचे हुकमी पाठीराखे मोठ्या संख्येने होते.

केजरीवाल यांनी गाजलेला व देशाला ठाऊक असलेला, पण पाठबळाखेरीज दुबळा असा चेहरा म्हणून अण्णांना सोबत घेतले. त्यात पुन्हा शांतीभूषण, किरण बेदी. स्वामी अग्निवेश इत्यादी प्रसिद्ध चेहर्‍यांना सोबत आणले. त्या सर्व काळात साधने व सज्जता हे काम एकटे केजरीवाल करीत होते आणि पुढे अण्णांचा चेहरा होता. जोपर्यंत अण्णा उपयोगाचे होते, तोपर्यंतच त्यांनी अण्णांचे महात्म्य चालू दिले. अण्णांच्या आडोश्याने केजरीवाल हा देशव्यापी चेहरा झाला. तसाच बेदी, अग्निवेश, प्रशांत भूषण इत्यादी देशाला परिचित चेहरे होते. पण त्यांच्यामागे कुठलीच संघटित शक्ती वा लोकसंख्या नव्हती. केजरीवाल यांच्याकडे तशी ‘तैनाती फ़ौज होती. ज्यांना पगारी पाठीराखे म्हणता येईल, अशी टोळी केजरीवाल, शिसोदिया, संजय सिंग व गोपाल राय यांनी उभी केलेली होती. त्यांनी अन्य चमकणार्‍या प्रत्येक चेहर्‍याचा आरंभी धुर्तपणे गर्दीला झुलवण्यासाठी उपयोग करून घेतला आणि आपल्या जमावाचे राजकीय पक्षात रुपांतर करून घेतले. एकदा त्यात यश मिळू लागल्यावर अण्णा व इतरांना बाजूला करून या मुळच्या टोळीने आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पुढे आणल्या. त्यात आडवे येतील व त्रासदायक होतील त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचे डाव खेळले. पण समाजवादी नेहमी बुद्धीमान असतात आणि म्हणूनच इतरांना मुर्ख समजून विचारपुर्वक मुर्खपणा करतात. योगेंद्र यादव त्यापैकी असल्याने आजवर इतरांचे काटे काढण्य़ात त्यांनी केजरीवाल यांना मदत केली. त्यातून केजरीवाल फ़क्त आपल्यावर अवलंबून रहातील आणि पुढे वैचारिक कारणास्तव पक्षालाही आपल्या विचारसरणीने चालावे लागेल, असा त्यांचा आडाखा किंवा डाव असावा. पण तिथेच त्यांची फ़सगत झाली. कारण असे प्रथमच झालेले नाही. यापुर्वी असे अनेक पुरोगामी बुद्धीमंतांनी केलेले प्रयोग त्यांच्यावरच उलटलेले आहेत.

१९७० च्या दशकात कॉग्रेसमध्ये इंदिरा गांधी यांना पक्षातील म्हातार्‍या नेत्यांची अडचण झाली होती. त्यांना संपवायला त्यांनी रातोरात समाजवादी वस्त्रे अंगावर चढवली आणि तेव्हाच्या एकाहून एक बुद्धीमान समाजवादी साम्यवाद्यांनी कॉग्रेसलाच पुरोगामी पक्ष बनवण्याची स्वप्ने रंगवायला सुरूवात केली. कम्युनिस्टांपासून सोशलिस्टांपर्यंत अनेक जाणते दिग्गज नेते, मग इंदिराजींच्या कॉग्रेस पक्षात सहभागी होऊन गेले. न्या. एच. आर. गोखले, बॅ. रजनी पटेल, कुमारमंगलम अशा कम्युनिस्टांनी इंदिरा गांधींची पालखी उचलून विचारांपेक्षा व्यक्तीमहात्म्य सांगायचे काम हाती घेतले. त्यासाठी मोरारजी देसाई, अतुल्य घोष, कामराज, निजलिंगप्पा इत्यादींची निंदानालस्ती करण्यात हेच पुरोगामी आघाडीवर होते. त्यांच्या जोडीला मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत, शशीभूषण असे समाजवादी तरूण तुर्कही उभे ठाकले होते. या सर्वांची अशी समजूत होती, की जुन्याजाणत्या नेत्यांपासून इंदिराजींना तोडले; मग त्या डाव्या विचारांच्या अनुयायांवर अवलंबून रहातील आणि कॉग्रेसच समाजवादी-साम्यवादी पक्ष होऊन जाईल. त्यांच्या कष्टाने व बुद्धीने इंदिराजी देशाच्या व गरीबांच्या तारणहार होऊन गेल्या आणि त्यांची प्रतिमा इतकी उंचावली, की तुलनेत हे सर्व समाजवादी साम्यवादी विचारवंत खुजे बुटके होऊन गेले. मग क्रमाक्रमाने त्यांना फ़ुंकर घालून इंदिराजींनी उडवून लावले. अवघ्या चार वर्षात त्याच तरूण तुर्क पुरोगाम्यांना त्याच इंदिरा गांधी व त्यांच्या उद्धट पुत्र संजय गांधींच्या विरोधात आवाज उठवायची पाळी आली. तेव्हा त्या बोलघेवड्यांना इंदिराजींनी तुरूंगात डांबलेले होते. आज आम आदमी पक्षाला नवा समाजवादी वा डाव्या विचारांचा पक्ष वा संघटना बनवण्याचा यादव व त्यांच्या जुन्या समाजवादी सहकार्‍यांचा प्रयास, त्याचीच इवलीशी आवृत्ती होती. त्याचे परिणाम वेगळे होतील अशी अपेक्षा बाळगता येईल का?

कारण इतिहासापासून न शिकणे आणि त्याच त्याच चुका अतिशय आत्मविश्वासाने करत रहाणे, हा समाजवादी व पुरोगाम्यांचा गुणधर्म असतो. सामान्य माणसे सहज ज्या चुका करतात. पण पुरोगामी शहाणे अतिशय सुक्ष्म विचार करून चुका व मुर्खपणा करीत असतात. त्याचा हा परिणाम असतो. योगेंद्र याद्व किंवा त्यांच्याच समाजवादी गोतावळ्यातील विखुरलेल्या लोकांना या देशात कुठल्या कायद्याने वा सत्तेने आपला राजकीय पक्ष संघटना उभारण्यास प्रतिबंध केलेला नाही. जनतेमध्ये जाऊन लोकहिताच्या आपल्या भूमिकांना पाठींबा मिळवत समाजवादी साम्यवादी विचारधारेचा पक्ष उभारण्यात मग कसली अडचण आहे? अकारण दुसर्‍यांच्या आंदोलन चळवळीत घुसून आपला उल्लू सीधा करण्याची चलाखी कशाला? त्यापेक्षा आपल्यातला उल्लू झटकून व्यवहारी शहाणपण जोपासले, तरी खुप होईल. देशातल्या समस्या व लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न पन्नास वर्षापुर्वी जितके गहन होते, तितकेच आजही आहेत. तेव्हा त्यावर नुसती प्रवचने देण्यापेक्षा केजरीवाल जसा एखाद्या कोपर्‍यात गल्लीत वा शहरात इवली सुरूवात करतो, तशी या समाजवाद्यांनी लोकांच्या जगण्याशी थेट संबंध असलेली समस्या सोडवण्याचे काम हाती घेतले, तर पक्षाची उभारणी व्हायला काय अडचण आहे? त्यापेक्षा प्रसिद्धीच्या मागे लागून, माध्यमातून चळवळीचा आभास करून काहीही निष्पन्न होत नाही. म्हणून केजरीवाल दिल्ली जिंकतो. पण मेधा पाटकरांना एका मतदारसंघात डिपॉझिटही वाचवता येऊ शकत नाही. मेधासारख्या अनेक विखुरलेल्या समाजवाद्यांनी थेट प्रश्नाला भिडणारी वा लोकांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सुटतात, अशी आंदोलने लढवली, तर यादव हाकलले जाऊ शकणार नाहीत किंवा केजरीवाल शिरजोर होऊ शकणार नाहीत. पण पुरोगामी वाचाळ असतात आणि कृतीशून्य असतात, हा इतिहास कोणी बदलायचा?


एक सुंदर कथा आणि काही शंका (लेखांक पहिला)



(‎Marathi Facebooker's(फेसबुक वरील मराठी माणसासाठी) च्या सौजन्याने
 Sakshi Saptsagar
4 hrs · Mumbai · Edited
१९९२-९३ चा काळ ..नऊ-दहा वर्षाची असेन मी.. त्यावेळी आमचे वास्तव्य लालबागच्या बावला कंपाउंडमध्ये होते.. (माझ्या दहावीनंतर मग आम्ही बांद्राला शिफ्ट झालो).. गणेश टोकीज मागचे आमचे बावला कंपाउंड म्हंजे सगळी कामगार वस्ती.. खासकरून कोकणातील लोक जास्त. सकाळ झाली कि रेडिओवरील गाण्यांबरोबर "फटकी इली तुझ्या तोंडावर..मायझया.. निम्बार चडला तरी अजून उतानो पडलास " या शब्दांनी परब काकूंच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा. आमच्या ३ मजली बिल्डींगसमोर ( बिल्डींग कसली चाळच ती) परबांचे बैठे कौलारू घर होते..३ बिर्हाड होती घरात, त्यामुळे नेहमी भांडणे तर चालूच असायची. मन्याचेहि (मनोहर परब) त्यातील एक बिर्हाड. २ काका-काकू, त्यांची पोरे आणि मन्याची आई (वडील वारलेले) असे १०-१२ जण एकत्र रहायचे. मन्या तसा चुणचुणीत तरुण ..साधारण २५-२६ वर्षे वय असेल त्याचे त्या वेळी.. अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टींत पारंगत. ..भोवरे..गोट्या..पतंग..हुतुतू..काही-काही म्हणू नका..मन्याचा हात कोणीच धरूच शकणार नाही. क्रिकेट म्हणजे तर त्याचा जीव कि प्राण .. आमच्या लाल मैदानातील क्रिकेटचा तो अनभिषक्त सम्राटच होता.. असे म्हणत कि, मन्या ब्याटिंगला आला कि समोरच्याच सद्गुरु-सदन मधील पोरी मन्याला पहायला खिडक्यांवर येवून थांबत. मन्याने फटकावलेल्या प्रत्येक चेन्डूनजीक त्या घायाळ होवून जात.
पण, मला मन्या आठवतो तो दर रविवारी लाल मैदानात सकाळच्या संघाच्या प्रार्थनेला जाणारया वेशात.. त्यावेळी आमच्या लाल मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा लागायची (आता ती बंद पडली बहुतेक).. परिसरातील अनेक शाळा-महाविद्यालयातील तरुण शाखेत जायचे.. मन्याहि जायचा .. संघाचा तो सफेद रंगाचा शर्ट.. खाकी हाफ नीकर (चड्डी), डोक्यावर काळी टोपी..हातात दंड. त्या वेशात मन्या अगदी युद्धावर चाललेल्या जवानासारखाच भासे मला.. अशी काय गोष्ट आहे कि हे मन्यासारखे अनेकजण त्या लाल मैदानातील शाखेत जातात याचे नेहमीच कुतूहल माझ्या बालमनाला वाटे..कधीतरी आपणही तेथे जावे..शाखा काय असते ते पहावे असेही वाटे. पण, शाखेत सर्व पुरुषच मंडळी दिसत असल्याने माझी तशी कधी हिम्मत झाली नाही.
मन्या मात्र नियमित जायचा ..शाखेत जावून आल्यावर तर त्याचा जोश काही आगळाच.. तिन्हीसांज झाली कि आम्हा दहा-बारा लहान मुलांना बिल्डींगच्या जिन्यांवर जमवून काही-बाही बौद्धिक देत असे. लोकमान्य टिळक, साने गुरुजी, छत्रपती शिवराय, बाजीराव पेशवे आदी इतिहासपुरुषांवर भरभरून बोलत बसे... "नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।। " संघाची हि देशभक्तीने ओतप्रोत भरलेली प्रार्थना त्याने आमच्या कडून घोकून-घोकून पाठ करवून घेतली होती. आम्हीही पुढे पुढे त्याला मनोहर शिक्षक असे गमतीने म्हणू लागलो होतो... तोहि त्याला हसून दाद देई.
१९९२-९३ चा तो काळ .. मुंबईमध्ये हिंदू-मुस्लिम दंगलीला सुरुवात झाली होती. मुंबई पेटायला लागलेली. इथून-तिथून काही बाही बातम्या यायच्या ..आज इथे दंगल पेटली..उद्या तिथे जाळपोळ झाली. वर्तमानपत्रेही रक्तरंजित बातम्यांनी सजू लागली होती..आमचे आई वडील आम्हाला दोन दोन -तीन तीन दिवस बाहेर जायलाही मज्जाव करत.. कधी मधी सर्व शांत झाले कि पुन्हा शाळा सुरु होई..त्यानंतर पुन्हा मधेच दंगे.. पुन्हा काही दिवस शांतता..मग पुन्हा शाळा, हे असे काही दिवस सुरूच होते.
एक दिवस आम्ही शाळेत असतानाच आमचे शेजारी सुर्वे काका अचानक शाळेत आले.. त्यांचा अमितही आमच्याच शाळेत शिकायचा.. दंगल पुन्हा उसळली होती..सुर्वे काका त्यांच्या अमितबरोबर मलाही घरी न्यायला आले... म्हणाले, "तुझ्या आईने तुलाही घरी आणायला सांगितलेय, चल घरी". आम्ही वर्गशिक्षिकेची परवानगी घेवून घराकडे ट्याक्सीने निघालो.. गणेश टोकीजचा रस्ता पोलिसांनी आधीच बंद करून ठेवलेला त्यामुळे आम्हाला पुढून रंगारी बदक चाळीच्या समोरून यु टर्न मारून ट्याक्सी घ्यावी लागली.. यु टर्न मारून रंगारी बदक चाळीसमोर असलेल्या मस्जिदिसमोर येवून ट्याक्सीवाल्याने ट्याक्सी थांबवली, म्हणाला" साहब, इधरसे आप चलके जाव, मै अंदर नही आता".
तिथे उतरण्यावाचून पर्याय नव्हता ..आम्ही उतरलो आणि पाहतो तर काय, चक्क मन्या आणि त्याच्यासह इतर काही पोरे त्या मस्जिदिच्या शिखरावर हातात भगवे झेंडे घेवून चढली होती..आरोळ्या ठोकत होती, ' मंदिर वही बनायेंगे'..जय श्री राम...हमसे जो टकरायेगा...'
मी सुर्वे काकांना बोट दाखवत म्हटले, " काका, तो पहा मन्यादादा वरती चढलाय " .. काकांनी क्षणभर वर पहिले आणि 'चल घरी' असे खेकसत मला घरी घेवून गेले.. मी घरी गेले तरी रात्रभर तो मस्जिदिवर चढलेला मन्या काही डोक्यातून जातच नव्हता ..काय करत होता तो तिथे ?..कशाला चढला होता तो वर? ..अनेक प्रश्न माझ्या बालमनाला पडत होते.
दोनेक महिन्यांपूर्वी पुन्हा लालबागला जाण्याचा योग आला होता .. तशी मी अधून मधून तेथून पास होतच असते पण यावेळी तेथूनच जवळ असलेल्या महाजन वाडीत एका कस्टमरकडे गेले होते. काम संपल्यावर तशीच पायी-पायी निघाले आणि नजीकच असलेल्या त्याच मस्जीदिपाशी येवून थांबले.. मस्जीदीलाच लागूनच आता एक 'अगरवाल' हलवायाचे दुकान झाले आहे.. हलवायाने गरम गरम समोसे आणि स्वीट कचोरया काढल्या होत्या. न राहवून मी दुकानापाशी गेले व म्हणाले," भैया २ समोसे आणि २ कचोरी पार्सल देना..चटणी एक्स्ट्रा"..पैसे काढण्यासाठी हातातील ब्यागमधील पर्स चाचपू लागले तोच, कानावर पाठीमागून आवाज पडला " आपा, अल्लाह के नाम पे कुछ दे दो..आपा !!!" मस्जिदिच्या भिंतीला खेटून बसलेल्या भिकारयांतील एक जण उठला होता..माझ्याकडे हात पसरून पैसे मागत होता. अचानक पाठीमागून आलेल्या आवाजाने मी दचकले अन मागे वळून पहिले.. रात्रीच्या वेळी रिकाम्या फलाटावरून जोरात भोंगा मारत जाणाऱ्या मालगाडीच्या आवाजाने जो अचानक धक्का बसतो तसा धक्का मला मागे वळताच बसला.. मी स्तब्ध झाले.. "होय, तो मन्याच होता..आमचा मन्या .. आमच्या कंपाउंडचा हिरो" ..काय हि त्याची हालत आज.. वाढलेली खुजी दाढी, मातीने बरबटलेले कपडे, डोक्यावर सफेद रंगाची फाटकी गोल टोपी,पायात स्लीपर अन तोंडाला येत असलेला दारूचा दर्प ... तो हात फैलावून माझ्याकडे पाहत होता.. अल्लाह च्या नावाने नावाने भिक मागत होता. त्याने पुन्हा एकदा विचारले "आपा ..मदद ".. क्षणभरासाठी मी भानावर आले.. हातातील हलवायाने परत दिलेले उरले पैसे त्याच्या हातावर नकळत ठेवले... त्याने मन भरून दुवा दिली आणि पुन्हा खाली बसला. त्याच्याकडे वळून पाहतच मी तेथून पाउल उचलले.. क्षणभरासाठीच वर मस्जिदिच्या घुमटाकडे पाहिले.. चांदतारा अधिकच डौलाने फडकत होता.
...मान खाली घालून बस-स्टोपच्या दिशेने मी निघाले.. कानात एकच ओळ घुमत होती .. "नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे .....



माझ्या काही किरकोळ शंका

१) रंगारी बदक चाळी समोर मशीद आहे. पण तिथे कुठला य़ूटर्न आहे? पुर्वी ट्राम आणि नंतरच्या काळात डिव्हायडर. तिथून कुठे आणि कसे वळणार? काळाचौकी नाका सोडून रंगारी बदक चाळीपर्यंत जायचेच कशाला? सिग्नलपाशी राईट टर्न घेऊन दत्ताराम लाड पथावरून बावला कंपाऊंडकडे जाता येते. मात्र तिथे मशीद लागत नाही.
२) लाल मैदानात संघाच्या शाखेत कधी कोणी गणवेशात आलेला तरूण लालबागकराने कित्येक वर्षात बघितला नाही.
३) कोकाटे मास्तरांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय त्याच कंपाऊंडमधला. त्यांच्याकडून तोंडी मन्याचे नाव कधी आले नाही.
४) १९६० पासून लाल मैदानात अनंत मालवणकर क्रिकेटचे सामने भरवायचा, पण तिथल्या चाळीतल्या पोरींनी कधी क्रिकेट बघितलेले आठवत नाही. सदगुरू सदनमध्येच कृष्णा देसाई हत्याकांडातला एकमेव आयविटनेस प्रकाश पाटकर वास्तव्य करत होता. त्याच्याही तोंडी कधी मन्याचे नाव आले नाही.
५) नवहिंद बाल मित्र मंडळ हे प्रसिद्ध नाट्यमंडळ त्याच बावला कंपाऊंडमधले. मधू आंगचेकर, बागवे अशा कामगार कलावंतांनी कधी मन्याची गोष्ट सांगितली नाही.
६) नेमक्या कुठल्या शाळेतून सुर्वेकाका मुलांना घेऊन आले? दंगलीत टॅक्सी मात्र छानपैकी फ़िरत होत्या आणि रंगारी बदक चाळीच्या पुढेच जायला घाबरत होत्या? पुढे असला काय धोका होता?
७) जगभरच्या मशिदीला घुमट असतात. शिखर असलेली बहुधा पहिलीच मशीद असावी ही जगातली.
८) बहुतेक मशिदीपाशी भिकारी नेहमीच असतात. पण या मशीदीच्या दारातच एक (घासवाला) दुधाचे दुकान साठ वर्षे आहे. तिथे कधीच भिकारी बसलेला दिसणार नाही. कारण अन्य मशीदीलगत असतात, तसे भटारखान्याचे हॉटेल तिथे कधीच नव्हते.
ता.क. -आता मुद्दाम हा ‘आपा’कडे भिक मागणारा मन्या शोधायला उद्याच मशिदीला भेट देईन. बावला कंपाऊंडमध्येही परब-सुर्व्यांचा शोध घ्यायची अतीव इच्छा जागी झालीय.
=============================


(‎Marathi Facebooker's या ग्रुपवर Sakshi Saptsagar यांची उपरोक्त अत्यंत ‘मन’नीय सत्यकथा वाचनात आली. मात्र माझ्या आयुष्यातील अर्धशतकाचा काळ त्यातील घटनास्थळाच्या परिसरात गेलेला असल्याने खुप गोष्टी खटकल्या आणि त्याविषयी शंकासमाधान व्हावे म्हणून त्याची तपशीलवार कॉमेन्ट त्यांच्या पोस्टवर टाकली. पण माझ्या शंकांचे निरसन साक्षीताईंनी केले नाही. उलट त्यांना दखल घेतल्याचेच कौतुक वाटले. त्यांची आलेली प्रतिक्रीया पुढील प्रमाणे

Sakshi Saptsagar भाऊंच्या लेखणीचा स्पर्श माझ्या पोस्ट ला झाला - धन्य जाहले आज मी !

साक्षीताईंना माझ्या कॉमेन्टचे वाटलेले कौतुक बाजूला ठेवून त्यांची कथा विचार करणार्‍या प्रत्येक विवेकी फ़ेसबुकरने वाचावी असे माझे प्रामाणिक मत आहे. उत्तम चिकित्सक वाचक निर्माण होण्याच्या दिशेने टाकलेले ते पाऊल असेल. म्हणूनच मूळ लेखासह माझ्या कॉमेन्टला ब्लॉगरुप दिले आहे

=====================================

यानिमीत्ताने एकूण त्यांचा लेख पुन्हा वाचला आणि मी सुद्धा किती वेंधळा वाचक आहे त्याची जाणीव झाली. त्याबद्दलचा तपशीलवार खुलासा नंतर करीन. पण असे काही संदर्भहीन लिखाण अलिकडल्या पिढीतली पत्रकार वा बुद्धीमान झालेली पिढी का करते, त्याची चिंता वाटली. म्हणूनच या निमीत्ताने अधिक काही लिहायचा विचार आहे. विविध सेक्युलर माध्यमे आणि समर खडस यासारखे भुंकणारे प्रतिष्ठीत झाल्याचा तर हा दुष्परिणाम नसेल? खरेच पत्रकार, माध्यमकर्मी, विश्लेषक व जाणता वाचक अशा सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची ही परिथिती नाही काय? साक्षीताई नक्कीच महाराष्ट्र टाईम्स गंभीरपणे वाचत आणि त्यातल्या लिखाणाचे अनुकरण करत असाव्यात अशी शंका येते. म्हणूनच त्याबद्दल अधिक तपशीलात शिरणे अगत्याचे झाले आहे.

Saturday, March 28, 2015

चार दिवस रडून घ्या



गुरूवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फ़ेरीचा दुसरा सामना भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. त्यात अर्थातच भारताचा विजय होणार ,अशी क्रिकेटप्रेमींची समजूत होती. तशी समजूत असण्यात गैर काहीच नाही. कारण ज्यांना त्या खेळातले काही कळत नाही, त्यांच्यासाठी जय-पराजय इतकीच बाब महत्वाची असते. मग त्यांना आपला देश वा आपला संघ जिंकण्याचा हव्यास असला, तर नवल कुठले? सहाजिकच खेळाची शैली वा उत्तम खेळ, याच्याशी त्यांना कुठले कर्तव्य असायचे? अशी मनस्थिती वा श्रद्धा असली, मग जिंकण्य़ाला महत्व असते. जो जिंकतो तोच शिकंदर, अशी ती मानसिकता असते. त्यात घोडा जिंकणाराच असावा लागतो. जोवर असा घोडा जिंकतो, तोवरच त्याचे कौतुक चालते आणि त्याने पराभूत होण्याची चुक केली, मग तेच चहाते त्याच्यावर शिवीगाळीचा वर्षाव करत असतात. गुरूवारी भारताचा त्या उपांत्य फ़ेरीत तसाच पराभव झाला आणि कौतुक बाजूला ठेवून त्याच लाडक्या खेळाडूंवर जो शिव्यांचा वर्षाव सुरू झाला, त्याचे हेच कारण आहे. क्रिकेट वा त्याची महता कोणाला होती? कारण आपल्या देशात क्रिकेट हा धर्म आहे असे म्हणतात आणि धर्म म्हटला, की जाण वा बुद्धी दुय्यम व श्रद्धा निर्णायक होते. इथेही तीच स्थिती आहे. अर्थात अशा क्रिकेट भक्तांना उत्तम खेळ बघायची मनोवृत्ती असून कसे चालेल? तसे जाणते चहाते असतील, तर गल्ला भरणार कसा? जो सोहळा गल्ला भरण्यासाठी असतो, तिथे भक्तांचा मेळा भरवायला लागतो. मग तिथे बाबांनी चमत्कार दाखवावा लागतो. तो खरा नसला तरी चालतो, पण तसा आभास तरी व्हायला लागतो. इथे दोन्ही गोष्टींचा अभाव असला, मग दिवाळे वाजणारच ना?

पण त्याची दुसरी बाजूही आहे. पापभिरू भक्तांना नुसत्या चमत्काराची गरज नसते. त्यांना आपल्या आयुष्यातील नाकर्तेपणा, पोकळपणा वा वैफ़ल्याला झाकण्यासाठी अशा कुठल्यातरी नशेची, समजुतीची गरज असते. ती आसाराम वा अन्य कुठल्या बापू फ़कीरापाशी मिळणार नसेल, तर दुसर्‍या मार्गाने मिळवावीच लागते. कधी अशी झिंग क्रांतीच्या, चळवळी, आंदोलनाच्या रुपाने मिळत असते; तर कधी खेळातल्या अटीतटीच्या सामन्यातून मिळत असते. आपले कर्तृत्वहीन कर्तव्यशून्य जीवन झाकून ठेवण्याची पळवाट खुप आवश्यक असते. गेल्या दोन दशकात जी आर्थिक सुबत्ता तळागाळापर्यंत पोहोचली आहे, त्यातून मोठ्या लोकसंख्येला ही पळवाट खुप आवश्यक होत चालली आहे. जी मागणी असते ती पुरवणारे व्यापारी दुकानदार मग दुकान थाटणारच. भारतात तीन दशकापुर्वी जगमोहन डालमियांनी ती बाजारपेठ प्रथम ओळखली आणि त्यातून हा नवा बाजार उभा राहिला. १९८३ सालपर्यंत भारतात कोणा सामान्य माणसाला क्रिकेट माहित असले व आवडत असले, तरी विश्वचषक म्हणजे काय तेही ठाऊक नव्हते. पण त्यावर्षी तिसर्‍या स्पर्धेत कपील देवच्या संघाने जो उलटफ़ेर केला आणि प्रथमच बाद फ़ेरी गाठली; तेव्हा हे खुळ देशात पसरू लागले. दूरदर्शन हीच एक वाहिनी होती आणि अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारताचा सामना दाखवायलाही उपग्रह दुवा मिळू शकला नव्हता. अशा देशात आज क्रिकेट अब्जावधीच उलाढाल करणारा बिझीनेस झालाय, ते उगाच? इंग्लंडच्या प्रुडेन्शीयल कंपनीने पुढल्या स्पर्धेला प्रायोजित करणार नसल्याचे सांगून टाकले, तर डालमियांनी त्याचे यजमानपद मागून घेतले. पाकिस्तान श्रीलंकेच्या मदतीने आयोजन करताना त्यांनी हा खेळ किती अफ़ाट कमाई करून देऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक घडवले आणि भारत क्रिकेटवेडा देश होऊन गेला. आज जगातल्या क्रिकेटमध्ये पैशाच्या नाड्या भारताच्या हाती आहेत, इतके खुळ खेडोपाडी पसरले आहे.

असो. मुद्दा इतकाच, की उपांत्य फ़ेरीतील भारताच्या पराभवाने फ़ारसे बिघडलेले नाही. म्हणूनच अनेक जाणत्या समालोचक व टिकाकारांनीही भारतीय संघाचे पराभवानंतरही कौतुकच केले. कारण याच संघाने सलग सात सामने जिंकून भारतीयांना आनंद दिलेला होता. प्रत्येक सामना जिंकणे शक्य नसते आणि जय-पराजय हे खेळाचे अविभाज्य अंग असतात. पण ज्यांना त्यातले काहीच कळत नाही, त्यांच्यासाठी जय-पराजय निर्णायक महत्वाचा असतो. म्हणूनच मग आता पराभवाची मिमांसा चालू आहे. आक्रोश व मातम चालू आहे. कारण आज भारतातले क्रिकेटवेडे हे त्या खेळाचे चहाते-रसिक नाहीत. त्यांच्यासाठी भारतीय संघ म्हणजे रजनीकांत असतो. त्याला काहीच अशक्य नसते आणि सर्व शक्य असलेच पाहिजे. म्हणूनच आता रविवारी अंतिम सामना न्युझिलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात होऊन गेल्यावरही भारतात उपांत्य फ़ेरीचे सुतक चालूच राहिल. दोन आठवड्यात आयपीएलचा मोसम सुरू झाला, मग यातल्या कोणाला उपांत्य फ़ेरी आठवणार नाही. उलट त्याच ऑस्ट्रेलियाचा कोणी खेळाडू मुंबई वा कोलकाता संघातून चौके-छक्के मारील, त्यावर उड्या पडू लागतील. कारण जे कोणी मैदानात खेळतात ती माणसे कुठे असतात? ते कोंबड्याची वा बैलाची झुंज असते, त्यातले मोहरे असतात. त्यांच्या एकमेकांना रक्तबंबाळ करणार्‍या आक्रमकतेतून येणार्‍या उन्मादाला आपण क्रिकेटप्रेम समजून बसलो आहोत आणि त्या झुंजी आयोजित करणार्‍यांना क्रिकेटचे व्यवस्थापन म्हणून आपण मान्यता दिलेली आहे.

आपला देश आणि समाज किती चमत्कारिक आहे ना? इथे कोंबड्याच्या झुंजीत रक्तबंबाळ होण्याने विव्हळणारे रडतात आणि बैलाच्या शर्यतीत त्या मुक्या प्राण्याला दारू पाजून झिंग आणून झुंजायला लावले जाते, म्हणून गळा काढणारेही आपल्यातच आहेत. पण लाखो कोट्यावधी रुपयांची पुडकी देऊन साक्षात क्रिकेटपटू नामक मनुष्य प्राण्याला अमानुष खेळ करायला रिंगणात उतरवले जाते; त्याचे आपल्याला भान उरलेले नाही. एका सामन्यानंतर दुसर्‍या सामन्याला हजेरी लावताना खेळ, झोप आणि विश्रांतीचे शारिरीक घड्याळ बिघडून जाते, अशी तक्रार धोनीनेच केली. त्यावर साधी चर्चा तरी झाली कुठे? कोण चेंडू छातीवर आपटून मैदानातच गतप्राण झाला, त्ती घटना त्याच ऑस्ट्रेलियातली ना? तेव्हा संघातल्या इतर खेळाडूंच्या डोळ्यात ओघळलेल्या अश्रूंचे किती कौतुक झाले होते? दोन महिन्यात त्याच कांगारू वा अन्य देशातील खेळाडूंपैकी कोणाला त्या गतप्राण झालेल्याचे नाव तरी आठवले काय? त्याला खांदा देणारेच गुरूवारी छाती फ़ुगवून मैदा्नात नाचत होते आणि सात सामन्यात अजिंक्य राहिले, ते एका पराभवाने माना खाली घालून माघारी निघाले होते. भोवतालच्या कोट्यवधी लोकांच्या भावनात कुठेतरी ओलावा होता काय? एका बाजूला विजयाचा उन्माद होता आणि दुसर्‍या बाजूला पराभवाने डिवचलेली सूडाची भावना प्रज्वलीत झाली होती. तिचाही निचरा आठवड्याभरात होईल. श्वापदाने आपल्यातल्या एका जीवाला उचलून नेल्यानंतर तटस्थपणे काही क्षण त्याच्या तडफ़डीकडे बघणार्‍या व पुन्हा निमूट चरायला लागणार्‍या कळपापेक्षा आपल्या सामुहिक भावना तरी किती वेगळ्या आहेत? तेव्हा चार दिवस काय ते रडून घ्या. दोन आठवड्यांनी आयपीएलचा धिंगाणा घालायचा आहे ना?

केजरीवालांचे भवितव्य काय असेल?



सध्या आम आदमी पक्षात मोठे वादळ घोंगावते आहे. पण त्यामुळे फ़ार काही मोठी राजकीय उलथापालथ घडण्याची शक्यता नाही. जेव्हा माणसे सतत कारस्थानी मानसिकतेत रमतात, तेव्हा त्यांना सर्वसाधारण मनाने जगणेच अशक्य होऊन जाते. एखाद्या अट्टल जुगार्‍याप्रमाणे त्यांना त्याची नशा लागते आणि सुखनैव काही करण्याच्या अवस्थेत अशी माणसे रहात नाहीत. कुठलेही काम नीटनेटके होत असेल, तर त्यात गफ़लत उभी करण्याचा हव्यास त्यांना आवरता येत नाही. आताही आम आदमी पक्षात जे रणकंदन माजले आहे, त्यामागे तीच मानसिकता आहे. सतत कुणावर आरोप वा शंका व्यक्त करूनच राजकीय सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा पावलेल्या या टोळीला, राजकीय पक्षाची नोंदणी झाली आहे, म्हणून पक्ष संबोधावे लागते इतकेच. अन्यथा आपसात झुंजणार्‍या कळपासारखी त्यातल्या लोकांची स्थिती आहे. जोवर बाहेरच्या कोणावर ओरडायची खेकसायची संधी होती, तोवर तसा कारभार झाला. आता ती संधी संपली आहे, तर त्यांनी एकमेकांवर दुगाण्या झाडायचा पवित्रा घेतला आहे. अनेक राजकीय पक्षात आजवर दुफ़ळी माजलेली होती. पण त्यामुळे पक्षाचे तुकडे झाले आणि अनेक पक्ष आकारास आले. पण त्यातले विवाद या पक्षात चालू आहेत, तसे कधीच झाले नाहीत. एकाने दुसर्‍याची हाकालपट्टी करावी किंवा एका गटाने आपणच साथ सोडावी. मग बाहेर फ़ेकलेल्या वा बाहेर पडलेल्याने वेगळी चुल मांडावी, तसा नवा पक्ष अस्तित्वात यायचा. इथे मोठी गंमतीशीर स्थिती तयार झालेली आहे. ज्यांना हाकलायचे आहे, त्यांनी आपणच निघून जावे, ही केजरीवाल यांची अपेक्षा आहे. ते जणार नसतील, तर पक्षाने त्यांना हाकलावे, अशीही अपेक्षा आहे. पण ते नकोसे झालेले लोक मात्र बाहेर पडायला राजी नाहीत. तर हाकलून लावावे म्हणून अट्टाहास धरून बसले आहेत.

“An appeaser is one who feeds a crocodile - hoping it will eat him last” -Winston Churchill

तसे बघितल्यास पहिल्यापासून आम आदमी पक्ष हा कधीच संघटनात्मक पक्ष नव्हता, किंवा त्यात लोकशाही पद्धतीने कारभार चालला नाही. अगदी आरंभीच्या काळात उमेदवार निवडणे वा नंतर सरकार स्थापनेसाठी मतदारांचा कल विचारणे, ही समस्त नाटके होती. प्रत्यक्षात गर्दीमध्ये आपलेच हस्तक बसवून ओरड्याने जनतेचा कल घेतल्याचे नाटक रंगवण्यात आलेले होते. अगदी मोदी विरोधात वाराणशी येथील निवडणूक लढवताना केजरीवाल यांनी तोच तमाशा केलेला होता. तेव्हाही चारपाच हजार लोक दिल्लीहूनच नेलेले होते. मुंबई-बंगलोर वा गुजरातचे दौरेही अशाच आयातीत गर्दीच्या देखाव्यातून रंगवले गेले. आपण कसे थेट जनतेच्या इच्छेने चालतो आणि सामान्य माणसाच्या मताला किंमत देतो, हे दाखवण्याचे ते निव्वळ नाटक होते. पण त्याचा राजकीय लाभ पक्षाला होत असल्याने, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव इत्यादींनी त्याचेही जाहिरपणे कौतुक चालविले होते. आज त्याच दोघांवर खोटेपणाने हल्ला झाला, तेव्हा सत्य सांगण्याची हिंमत त्यांनी केली आहे. पहिल्यापासून केजरीवाल कुणाचे मत घेत नाहीत व स्वत:चे निर्णय लादतात, असे यादव आज सांगत आहेत. मग जेव्हा अशाच एकारलेपणाचे बळी जात होते, तेव्हा यांनीच कुणाची तळी उचलून धरली होती? शाझिया इल्मी, उपाध्याय, विनोदकुमार बिन्नी अशा एकामागून एक सहकार्‍यांचा बळी केजरीवाल बेमुर्वतपणे घेत चालले होते. त्यांना रोखण्याचा एक तरी प्रयत्न यादव-भूषण यांनी केला होता काय? काल पक्षात आलेल्या व आज पक्षाचे दिल्लीतील लोकसभा उमेदवार झालेल्या खेतान-आशुतोष अशा लोकांविषयी इल्मींनी तक्रार केली होती. त्यांना याच दोघांनी तेव्हा कशाला साथ दिलेली नव्हती? कुणालाही पक्षात घेऊन नेता उमेदवार बनवण्यापर्यंत केजरीवाल मनमानी करीत होते, त्यांना कोण रोखू शकणार होते? यादव-भूषण यांनीच ज्येष्ठ म्हणून ते करायला नको होते काय?

सत्तेची व अधिकाराची हाव नेहमी श्वापदासारखी असते. ती भूक जितके खात जाल, तितकी वाढतच जाते. जेव्हा बिन्नी-इल्मी यांची शिकार पचून गेली, तेव्हा केजरीवाल आणखी मोठी शिकार करायला सवकले तर नवल कुठले? हा माणुस पहिल्यापासून कारस्थानी व कुटील डावपेच खेळणारा आहे. त्याची देहबोली त्याची साक्ष देते. गेल्या दोनतीन वर्षात अखंड वाहिन्यांवर चमकलेला हा माणुस, शेकडो तास तुम्ही बघितलेला असेल. पण त्यापैकी कधीच त्याने कॅमेरात थेट नजर भिडवून कुठले विधान केलेले सापडणार नाही. ज्याच्याशी केजरीवाल बोलतात, तेव्हाही त्याच्या नजरेला नजर भिडवून ते बोलताना दिसणार नाहीत. व्यासपीठावरून भाषण करताना सातत्याने हा माणूस चुळबुळ करताना दिसेल. कायम मनातली चलबिचल त्याच्या भिरभिरणार्‍या नजरेतून लक्षात येऊ शकते. हे अस्थीर मानसिकतेचे लक्षण आहे. कुठल्याही गोष्टीत लक्ष केंद्रित करणे वा एका विषय कामावर ठाम रहाणे; त्याच्या स्वभावात नाही. सातत्याने मनात कमालीची अस्वस्थता दिसेल. आणि कुठल्याही बारीकसारीक बाबतीत हट्टीपणाने आपलेच खरे करण्याचा आग्रह असतो. लहान मुले जशी आपल्याला फ़लंदाजी मिळत नसेल, तर बॅट चेंडू घेऊन जाण्याच्या हट्टाला पेटतात, तसे केजरीवाल बोलताना वागताना दिसतील. सहाजिकच त्याचे प्रत्यंतर स्थैर्य आल्यानंतरच मिळू शकते. मागल्या खेपेस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना उत्तम कारभार करून देण्याची संधी मिळालेली होती. पण त्यांनी तडकाफ़डकी जनलोकपाल विधेयकाचा अवैध आग्रह धरून राजिनामा दिला. तेव्हाही सहकार्‍यांना विश्वासात घेतले नव्हेत. थेट जमलेल्या घोळक्यासमोर राजिनामा दिल्याची घोषणा करून टाकली. आता इतके मोठे बहूमत मिळाल्यावर पक्षात कोण कुठल्या पदावर असण्याच्या हट्टापायी पक्षाचीच धुळधाण करायचा हट्ट कशासाठी? आपल्या शब्दाबाहेर पक्ष नाही हे ठाऊक असूनही, ते दर्शवण्याचा ह्ट्ट कशाला?

कुठूनही सतत वादग्रस्त रहायचे आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, हा केजरीवाल यांचा मानसिक आजार आहे. सहाजिकच सर्वकाही सुरळीत चालू असेल, तर कुरापत वा खुसपट काढून वादाला ते आमंत्रण देतात. दिल्लीत दिलेली आश्वासने पुर्ण करणे सोपे काम नाही, त्याकडे लक्ष पुरवले आणि बाकीच्यांना पक्षाचे काम करायची मुभा दिली, तर काय बिघडणार आहे? यादव वा भूषण यांना तितकी लोकप्रियता आजही गाठता आलेली नाही. म्हणूनच ते पक्षात राहून व केजरीवाल यांच्याच नेतृत्वाखाली काम करू शकतील. नव्हे, त्यांना ते करावेच लागेल. पण त्यांनी एकत्र रहावे व केजरीवालचे नेतृत्व मानावे, त्यासाठी पक्ष शाबुत असायला हवा. तोच रसातळाला गेला तर केजरीवाल किंवा यादव यापैकी कोणालाही कवडीची किंमत रहाणार नाही. तसे झाले तर यादव-भूषण यांचे फ़ारसे बिघडणार नाही. पक्षाचे अस्तित्व आणि लोकप्रियता यावर केजरीवाल यांचे भवितव्य अवलंबून आहे. कारण सत्तापदावर ते आहेत आणि कामाच्याच आधारावर त्यांना राजकीय भवितव्य असू शकणार आहे. पक्षात अशी दुफ़ळी माजली आणि त्याचे  तुकडे पडले, तर आज सगळे आमदार केजरीवाल सोबत रहातील. पण दरम्यान ज्या सदिच्छा या पक्षाला दिल्लीकरांनी मतातून दिलेल्या आहेत, त्या मातीमोल झाल्या, तर केजरीवाल यांचे भवितव्य काय असेल? सत्तापद मिळाल्यावर मोठी जबाबदारी असते आणि ते टिकवणे ही पहिली जबाबदारी असते. या माणसाचा सत्तेचा हव्यास व त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याचे लोकसभा पराभवानंतरचे प्रयास दिसले आणि आता उघडपणे यादव-भूषण यांनी कबुल केले आहेत. मग पदाचा हव्यास असलेल्याने किती संयम दाखवायला हवा? केजरीवाल तसे वागताना दिसत नाहीत, कारण त्यांची मनस्थिती स्थीर नाही अस्थीर आहे. उभे करायचे आणि लाथ मारून मोडायचे, ह्या स्वभावाला कोणते भवितव्य असते?


insane का insane से हो भाईचारा
यही पैगाम हमारा, यही पैगाम हमारा
=========================
insane (in a state of mind which prevents normal perception, behaviour, or social interaction; seriously mentally ill.)

‘स्मार्ट मित्र नव्हे, पिसाळलेलं कुत्रं.’



आधी मला वाटले होते, समर खडसने मलाच शिवीगाळ केलेली आहे. पण एका पत्रकार मित्रानेच समर कायम कोणावरही भुंकतच असतो याचा पुरावाच पाठवून दिला. तो सोबत इथे सादर केला आहे. सलमान रश्दी यांनी भालचंद्र नेमाडे यांच्याविषयी गैरलागू शब्द वापरले, त्याचा वैचारिक प्रतिवाद म्हणून समरने कोणती सभ्य भाषा वापरली? एखाद्या मान्यवर वृत्तपत्राचा सहसंपादक अशी शिवराळ भाषा कशाला वापरतो? उपरोक्त शिवीगाळ महाराष्ट्र टाईम्सच्या सह्संपादकाने केलेली आहे. त्याने अशी भाषा कशाला वापरावी, असा कोणाला प्रश्न पडू शकेल. म्हणुन मटाने तब्बल अठरा वर्षापुर्वीच त्याचा खुलासा करून ठेवलेला आहे. अशा लोकांना खरा राग आला, मग शिव्याही सुचत नाहीत, असेही त्या रोगनिदानात नमूद केले आहे. प्रा मे. पुं. रेगे सरांचे हे रोगनिदान महाराष्ट्र टाईम्सने आपल्या संपादकीय कुटुंबात भविष्यकाळात येऊ घातलेल्या आजारपणाचे भान राखून आधीच प्रसिद्ध केलेले असावे. २३ मार्च १९९७ रोजी हा रोगनिदानाचा लेख प्रसिद्ध झालेला आहे. त्या रोगनिदानात रेगेसरांनी काय काय लिहीले ते काळजीपुर्वक वाचले. तरच समर खडसच्या भाषेचे आकलन होऊ शकेल. हळुहळू अशीच भाषा महाराष्ट्र टाईम्समध्येही आपल्याला वाचायला मिळेल ही आपण अपेक्षा बाळगायला हरकत नाही. आणि त्या दिशेने वाटचाल करताना त्या वृत्तपत्राने आपली बिरूदावलीही बदलून घ्यायला हरकत नाही. ‘स्मार्ट मित्र नव्हे, पिसाळलेलं कुत्रं’ कशी बिरूदावली आहे? असो, आधी रोगनिदान वाचून घ्या, मग पुढले बोलू.

‘समाजाच्या काही थरात शिव्यागाळी माणसांच्या तोंडात बसलेल्या असतात. संबोधने, विशेषणे, क्रियाविशेषणे व क्रियापदे म्हणून त्यांच्या बोलण्यात शिव्या सतत येत असतात. सततच्या वापराने त्या झिजून गुळगुळीत झालेल्या असतात. त्या शिव्या अशा वाटतच नाहीत. तो केवळ त्यांच्या आत्माविष्काराच्या शैलीचा भाग असतो. अशा माणसांवर जेव्हा शिव्या देण्याचा प्रसंग ओढवतो, तेव्हा त्यांना खास कल्पकता दाखवावी लागते. त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातील शिव्या केवळ उत्स्फ़ुर्त असतात.’

‘पौगंड वयात अनेकदा मुलांना सभ्यपणा हे ढोंग वाटते. माणसाच्या लैंगिकतेची चाहुल त्यांना लागलेली असते. त्याचा अनेकप्रकारे स्वत:ला अनुभव येत असतो. या स्वरूपाच्या व्यवहारात प्रौढ माणसे गुंतलेली असतात. पण आपल्या जीवनाची ही बाजू ते झाकून ठेवतात. जणू काही आपण त्या गावचेच नाही, असा आव आणतात. असे त्यांचे प्रौढांविरुद्धचे गार्‍हाणे असते. या ढोंगाचा प्रत्यय त्यांना स्वत:मध्येही येत असतो. लैंगीक जीवनाविषयी असलेली उत्कट आस्था, कुतूह्ल. या व्यवहारात गुंतण्याची तीव्र इच्छा सभ्यपणाच्या संकेताच्या दडपणाखाली त्यांना स्वत:लाही झाकून ठेवावी लागते. त्या कोंडीतून सुटण्याचा एक मार्ग म्हणजे लैंगिकतेला भाषेच्या माध्यमातून वाट मोकळी करणे. एकमेकांसोबत रांगड्या अश्लील, इ. शब्दप्रयोगांचा वापर करून बोलण्यातून लैंगिक उर्मीचे काही प्रमाणात समाधान होते असा अनुभव तर येतोच, पण असे बोलून आपण प्रौढांच्या दांभिकतेविरुद्ध आणि त्यांनी आपल्या केलेल्या गळचेपीविरुद्ध बंड करीत आहोत असे समाधानही मिळते. मुले वाढतात, जबाबदार सामाजिक व्यवहारात सहभागी होतात, सभ्यतेच्या संकेतांची अनिवार्यता त्यांच्या गळी उतरते आणि हा ‘विद्रोह’ शमतो. पण काही माणसे जन्मभर पौगंडावस्थेच्या मानसिकेतून बाहेर येत नाहीत.’

‘सभ्यपणे बोलण्याचे-वागण्याचे जे संकेत समाजात रुढ असतात, तो ढोंगाचा प्रकार नसतो. आपण इतरांशी सभ्यपणे वागतो तेव्हा तुमच्या प्रतिष्ठेची कदर मी करतो, तुमच्याशी सामंजस्याने, सुसंवादाने वागावे अशी माझी इच्छा आहे, असा संदेश आपण त्यांना देत असतो. दोन माणसे परस्परांशी सभ्यतेने वागत असली तर त्यांच्यात मतभेद होऊ शकेल, वाद होईल, पण भांडण होणार नाही. भांडताना जाणूनबुजून अपशब्द वापरण्यात येतात. हे शब्द वर्णनपर म्हणून घेतले तर बहुतेकदा ते अयथार्थ ठरतील. पण वर्णन करणे हा त्यांच्या वापरामागील उद्देशच नसतो. आपण भांडणाच्या पवित्र्यात आहोत, भांडायला सज्ज आहोत, हे जाहिर करणे एवढाच त्याचा हेतू असतो. सभ्यपणाचे संकेत पाळण्यात जी समंजस, संवादी वृत्ती व्यक्त होत असते; ती केवळ लोकशाहीलाच नव्हे ते सामाजिक एकतेला, समाज हा समाज म्हणून एकत्र रहायला आधारभूत असते. माणसाच्या शारिरीक बाजूचा शारिरीक प्रक्रियांचा निर्देश करण्याविषयीचे जे भाषिक संकेत असतात, त्यांनाही काही अर्थ आहे. त्यातून माणसाच्या खाजगीपणाविषयी कदर व्यक्त होते. माणूस म्हणजे केवळ शारिरीक प्रक्रियांची व्यवस्था नव्हे, त्याच्यापलिकडे जाणारे मानसिक जीवन जगणारी व्यक्ती आहे, आणि त्याच्यात तिची त्याची प्रतिष्ठा आहे. हा भावही त्यात अभिप्रेत आहे. त्यामुळे शिव्या या बहुतेकदा शारिरीक प्रक्रियांच्य वर्णनावर आधारलेल्या असतात. एखाद्याला शिवी देऊन त्याला केवळ एक पशू या पातळीवर आपण आणतो; त्याचे मानवी व्यक्तीमत्व हिरावून घेत असतो.’

एकूणच अलिकडल्या काही वर्षात महाराष्ट्र टाईम्सच्या संपादक मंडळात भरती करण्यात आलेली बहुतांश मंडळी अजून पौगंडावस्थेतून बाहेर पडलेली नाहीत, याचा हा पुरावा मानता येईल. अर्थात तो माझा आरोप नाही, तर खुद्द त्याच वृत्तपत्राने फ़ार पुर्वी करून ठेवलेले रोगनिदान आहे. आणि अशा लोकांच्या सहवासात राहिले, मग इतरांनाही त्याची बाधा होणारच. आपल्या शिव्यांचेही दारिद्र्य समरने त्यात लपवलेले नाही. त्याबद्दल त्याची पाठ थोपटायला हवी. त्याला शिव्या सुचत नाहीत, म्हणून तो इतरांना काही ‘सर्जनशील’ शिव्या सुचवण्याचे आवाहनही करतोय. जेव्हा मानवी प्रचलित भाषा व सभ्यपणाची भाषा बोलता येत नाही, तेव्हा आपण संवाद करू शकत नाही, तर भांडणाला सिद्ध आहोत, असेच सुचवले जात असते, त्याची ही प्रचिती. मग जेव्हा भांडायचे असते, तेव्हा शब्द दुय्यम आणि आवाज चढवुन भुंकण्याचा अविर्भाव महत्वाचा होऊन जातो. इथे मुद्दाम त्याचा पुरावाच दिला आहे. मला शिवीगाळ करताना भाऊ या शब्दाचा अविष्कारही ‘भौ’ असा कशाला झाला त्याचाही खुलासा आपोआप होऊ शकतो.

रेगे सरांनी केलेले रोगनिदान किती अचुक आहे ते लक्षात घेतले, तर मला समर सारख्या पिसाळलेल्याची चिंता का वाटते, त्याचा अंदाज वाचणार्‍याला येऊ शकेल. जेव्हा पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने माणसाला बाधा होते, तेव्हा अशा रोगबाधित माणसाच्या सहवासाने अनेकांना आणखी बाधा होऊ शकते. किंबहूना महाराष्ट्र टाइम्सला अशी बाधा झाल्याची लक्षणेही दिसू लागलेली आहेत. सहाजिकच त्यावर सार्वजनिक सुरक्षेसाठी काहीतरी उपाययोजना करावीच लागणार. त्यामुळेच महाराष्ट्र टाइम्स हल्ली कुठे व किती पिसाळल्यागत लिहीत-भुंकत असेल, त्याचाही आढावा घ्यावा लागणारच. स्मार्ट मित्र म्हणवून घेणार्‍या या वृत्तपत्राला किती आणि कशी रोगबाधा झालीय, ते लपवून ठेवणे सार्वजनिक आरोग्याला अपायकारक नाही काय? मग तो अपाय रोखण्याचे काम करावेच लागणार ना? त्यासाठी महाराष्ट्र टाईम्स आणि अशा पिसाळलेल्यांच्या सहवासाने रोगबाधित झालेल्या इतर काहीजणांना सुरक्षेचा उपाय म्हणून चौदा नाही तरी तीनचार इंजेक्शने द्यावीच लागणार. बघू किती इंजेक्शने होतात.   (अपुर्ण)

(बातम्यांपासून अग्रलेखापर्यंत महाराष्ट्र टाईम्स किती पिसाळल्यागत वागतो, त्याचे सविस्तर पोस्टमार्टेम क्रमाक्रमाने करूया)


ज्यांना रेगेसरांचा मूळ संपुर्ण लेख वाचायचा असेल त्यांनी पुढील दुव्यावर जावे
http://jagatapahara.blogspot.in/2014/12/blog-post_50.html


Friday, March 27, 2015

मोकाट उधळण्याचे कारण नाही



याच आठवड्यात सुप्रिम कोर्टाने एक महत्वपुर्ण निकाल दिला आणि सोशल माध्यमात आनंदोत्सव सुरू झाला. आता आपल्याला मोकाट अभिव्यक्ती करायला कोणी रोखू शकत नाही, असा काहीसा समज बहुतेकांनी करून घेतलेला दिसतो. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६(अ) हे कलम सुप्रिम कोर्टाने रद्दबातल केले आहे. त्यामुळे आता आपण सोशल माध्यमात वाटेल ते लिहू वा टाकू शकतो, असा एकूण समज या आनंदोत्सवाचे कारण आहे. पण वास्तव तसे अजिबात नाही. कुठल्याही माध्यमात अशी मनमानी करून मोकाट स्वैराचार करायला मुळात राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यच मुभा देत नसेल, तर कोर्टाने असे स्वातंत्र्य बहाल केल्याची समजूत कितपत खरी असावी? इथे कोर्टाने दिलेला निकाल व त्यासंबंधात व्यक्त केलेली मते आणि कोर्टासमोर मांडले गेलेले युक्तीवाद लक्षात घेण्याची गरज आहे. पालघर येथील एक मुलीने बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जो बंद पाळला गेला, त्यातून गैरसोय झाली म्हणून वैतागून फ़ेसबुकवर काही मतप्रदर्शन केलेले होते. तिचे ते खाजगी मत होते आणि ते तिने व्यक्त केले होते. दुसर्‍या मुलीने त्याला दुजोरा दिलेला होता. पण त्यांच्याशी संबंधित कोणाच्या तरी ते नजरेस आले आणि त्यापैकी कोणी पोलिसात तक्रार दिली. अशा मतप्रदर्शनाने लोकमत प्रक्षुब्ध होईल आणि शांतता धोक्यात येईल, अशी तक्रार होती. सहाजिकच फ़ेसबुकवरील ती प्रतिक्रिया चिथावणीखोर असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी त्या दोन्ही मुलींचा छडा लावून त्यांना ताब्यात घेतले. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थकांनी कल्लोळ सुरू केला. तिथेही सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि पोलिसांचे कान सरकारने उपटले. पण प्रकरण तिथेच थांबले नाही आणि कोर्टात गेले. त्यावर सुप्रिम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अमर्याद सीमा स्पष्ट करणारा निकाल नाही.

हे प्रकरणच मुळात कायद्यातील तरतुदीचा पोलिसांनी केलेल्या गैरवापर वा चुकीचा अर्थ लावण्यातून निघालेले आहे. त्या मुलींच्या मतप्रदर्शनाने शांततेला धोका निर्माण होऊ शकतो असे कुणाला वाटले असेल, तरी त्याबद्दल कारवाई करताना पोलिसांनी आपली बुद्धी वापरायला हवी होती. जे मत वा तथाकथित चिथावणी मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचणेच शक्य नसले, तर शांततेला धोका कसा निर्माण होऊ शकतो? दोन मुली आपसात काही संवाद करताना बोलल्या, तर त्यातून लोकक्षोभ कसा निर्माण होऊ शकेल? जोपर्यंत चव्हाट्यावर येऊन हजारो लोकांना खिजवण्यासाठी त्यांनी शब्द वापरलेले नाहीत, तोपर्यंत पुढली क्षुब्ध प्रतिक्रिया येऊच शकत नाही. म्हणजेच कायद्यातील ६६(अ) कलमाचा चुकीचा अर्थ लावून पोलिसांनी कारवाई केली आणि तशीच कालपरवा उत्तरप्रदेशचे मंत्री आझमखान याच्याही बाबतीत झालेली होती. इथे लक्षात येते, की कलमातील तरतुदीचा चुकीचा अन्वय लावून पोलिस मनमानी करू शकतात. म्हणून कोर्टाने त्या कलमामुळे पोलिसांना परस्पर कारवाईचा मिळालेला अधिकार रद्दबातल करून टाकला आहे. बाकीचा कायदा शाबुत आहे आणि अन्य कायद्यांमध्ये अशाच अर्थाच्या ज्या तरतुदी आहेत, त्याही कार्यरत आहेत. अन्य कायद्यातही अशा आक्षेपार्ह चिथावणीखोर अभिव्यक्तीला प्रतिबंध घालण्यात आला असून कायदेशीर कारवाईची तरतुद आहे. सवाल इतकाच आहे, की पोलिसांना त्यात परस्पर कृती करण्याची मुभा नसते. इथे ती होती आणि कोर्टाने तिथे पोलिसांचे पंख छाटले आहेत. नेमक्या अशाच पद्धतीचे प्रकरण खुद्द शिव्सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही अंगाशी आलेले होते. तेव्हा काय झाले, याचे स्मरण कोणाला आहे काय? अशाच कारणास्तव त्यांना भारतीय दंडविधानाच्या तरतुदीनुसार अटक झालेली होती. ती तरतुद कायम आहे ना?

१९९२-९३ च्या मुंबईतील दंगल काळात ‘सामना’ दैनिकातल्या अग्रलेखातून चिथावणीखोर लेखन झाल्याचा आरोप होता. तेव्हाच काही नागरिकांनी पालघरप्रमाणे पोलिसात तक्रारी केल्या होत्या आणि दादर पोलिस ठाण्यात बाळासाहेबांच्या विरोधात गुन्हे नोंदलेले होते. मात्र त्यावर थेट कारवाई अधिक संकट ठरले असते, म्हणून पोलिसांनी त्यावर कृती करण्यासाठी सरकारकडे संमती मागितली होती. पण ती मिळाली २००० सालात आणि ठाकरे यांच्या अटकेचे अभूतपुर्व नाटक रंगवले गेले. मात्र कोर्टामध्ये तो खटला काही मिनीटेही टिकू शकला नव्हता. ते दंडविधानातील कलम आजही शाबुत आहे. ज्यामध्ये धार्मिक व सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करू शकणार्‍या अभिव्यक्तीला प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. ६६(अ) रद्दबातल झाले म्हणून दंडविधानातील ते कलम निकामी झालेले नाही. तेच कलम इथेही लागू होऊ शकते. कालपरवा सुप्रिम कोर्टाने ज्या कलमाचा निचरा करून टाकला, ते माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम आहे आणि अन्य कायद्यात तशा भरपूर तरतुदी आहेत. त्यांचा प्रभाव संपलेला नाही. आजही कोणी कुठल्याही माध्यमात वा सोशल माध्यमात आक्षेपार्ह अभिव्यक्ती करील, तर त्याच्या विरोधात अन्य कुणी नागरिक न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो आणि त्यात मनमानी वा आक्षेपार्ह काही आढळले, तर कोर्ट तो उद्योग करणार्‍याला पाठीशी घालणार नाही. कारण कुठल्याही कायद्यात कुठलीही तरतुद असली म्हणून दुसर्‍या कायद्यात बेकायदा कृत्य असल्यास संरक्षण मिळू शकत नाही. इथे कोर्टाने ६६(अ) कलमामुळे पोलिसांना जी मनमानी करायला संधी होती, ती संपवली आहे. त्याचा अर्थ नागरिक वा अन्य कुणाला मनमानी करण्याची मुभा दिलेली नाही. घटनेने जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, त्यात जी बंधने व मर्यादा घातल्या आहेत, त्या कुठेही कायमच लागू असतील.

ज्या कायद्यातील कलम ६६(अ) रद्द झाले, तो कायदा कोर्टाने रद्द केलेला नाही आणि त्यात ज्याला आक्षेपार्ह मजकूर वा अभिव्यक्ती मानलेले आहे, त्याला कोर्टाने हात लावलेला नाही. म्हणूनच तसे काही होत असेल आणि एखाद्या नागरिकाने त्याच्या विरोधात कोर्टाकडे दाद मागितली, तर त्याची छाननी होणारच. त्यात पोलिस मात्र लुडबुड करू शकणार नाहीत. थोडक्यात त्या अधिकाराने पोलिस जो आगावूपणा करत होते, त्याला कोर्टाने पायबंद घातला असून ते काम आपल्याकडे म्हणजे न्यायपालिकेकडे घेतले आहे. जी अभिव्यक्ती असेल, ती खरेच आक्षेपार्ह वा चिथावणीखोर आहे किंवा नाही, त्याची वास्तववादी तपासणी करून कारवाई व्हावी, इतकीच सोय नव्या निर्णायाने झाली आहे. म्हणून आपल्याला मोकाट रान कोर्टाने दिले, अशा समजुतीमध्ये कोणी राहू नये. कायद्याचे राज्य म्हणून मनमानी करण्यास वेसण घातली, याचा अर्थ अराजकाला मान्यता दिली अशी अनेकांची समजूत झाली आहे. दोनचार दिवस त्यामुळेच सोशल मीडियात आनंदोत्सव सुरू झाले. ज्यांना एकमेकांचा कागाळ्या करायच्या असतात किंवा कुरघोड्या करण्यात रस असतो, त्यांना तर आपल्याला मोकाट रान मिळाले असेच वाटुन राहिले आहे. अशा लोकांनी सावध रहावे. कारण यातला फ़क्त पोलिस बाजूला काढला गेला असला, तरी कायदा शाबुत आहे आणि अन्य नागरिकांना कोर्टातर्फ़े मुसक्या बांधण्याचा अधिकार कायम आहे. कुठलेही स्वातंत्र्य अबाधित वा निरंकुश नसते. स्वातंत्र्य हा अधिकार असतो तशीच ती जबाबदारीही असते. जितका जबाबदारीने स्वातंत्र्याचा वापर होतो, त्तितके ते अधिक प्रभावी व परिणामकारक ठरते. त्याचा अतिरेक स्वैराचाराकडे घेऊन जातो आणि अपप्रवृत्तीला शिरजोर करत असतो. तोच समतोल ढळू लागला होता, त्याला कोर्टाने ब्रेक लावला आहे. यापेक्षा अधिक काहीही झालेले नाही.

Thursday, March 26, 2015

निकम यांनी ‘शिजवलेली’ मटन बिर्यानी



मागल्या दोनचार दिवसात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर माध्यमांनी झोड उठवली आहे आणि त्याबद्दल कोणाला दोष देता येणार नाही. जयपूर येथे जी आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी परिषद चालू आहे, तिथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना निकम यांनी केलेले विधान त्यांना गोत्यात घेऊन गेले आहे. वास्तविक आजकालची माध्यमे एक अजेंडा घेऊन चाललेली असतात. सहाजिकच तुम्ही किती महत्वाचे वा उपयुक्त बोलता, त्यापेक्षा विवादास्पद काय होईल; यावरच अशा माध्यमांचा डोळा असतो. म्हणूनच अशा पत्रकार वार्ताहरांशी खुप बोलावे, पण त्यांच्या हाती काहीच लागू नये, याची काळजी घ्यायची असते. फ़ार मोजक्या नेते व मान्यवरांना ती कला साधली आहे. पण उज्वल निकम त्यापैकी नाहीत आणि सेक्युलर अजेंडामध्ये बसणारे नसल्याने, ते माध्यमांचे नावडते वकील आहेत. सहाजिकच त्यांना कचाट्यात पकडण्याची प्रत्येक संधी शोधली जाणार; हे त्यांनी क्षणभरही विसरता कामा नये. आजवर निकम त्याचे भान ठेवून होते. जयपूरला त्यांना विस्मरण झाले असावे. अन्यथा त्यांनी स्वत:च माध्यमांच्या सापळ्यात अडकणारे विधान कशाला केले असते? आजवर कित्येक मोठ्या महत्वाच्या खटल्यात सरकारची जनतेची बाजू लढवताना आपली कुशाग्र बुद्धी पणाला लावणार्‍या ह्या वकीलाला आज माध्यमे ज्याप्रकारे झोडपून काढत आहेत, त्यांना अशाच आणखी एका मान्यवराकडे वळून बघायला ढुंकून वेळ मिळालेला नाही. याच आठवड्यात गुजरात दंगलीचा तेजीत धंदा करणार्‍या तीस्ता सेटलवाड यांच्यावर असलेल्या आरोपांची छाननी सुरू आहे. त्यात त्यांना अफ़रातफ़रीच्या गुन्ह्याखाली अटक करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे आलेला होता. त्याबद्दल कितीशी चर्चा झाली? दंगलग्रस्त पिडितांसाठी देणगी रुपाने जमवलेल्या पैशाचा अपहार केल्याचा हा आरोप, अतिशय गंभीर नाही का?

गुजरातच्या गुलमर्ग सोसायटीत जिथे एका माजी खासदाराला जिंवंत जाळले गेल्याचा चारपाच वर्षे गाजावाजा करीत, खालच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत ढोल वाजवला गेला, त्याच सोसायटीतल्या दंगलपिडीतांनी पुराव्यासह तीस्तावर हा गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा तीस्ताच्या लढ्याचे कोडकौतुक करण्यात आणि गुलमर्गच्या रहिवाश्यांसाठी आक्रोश करण्यात अहोरात्र रमलेल्या माध्यमांना, आज त्यांच्याच नावाने जमवलेल्या पैशाच्या अपहाराविषयी काडीमात्र आस्था नसावी का? असती तर कोणी तीस्तावरचे आरोप कोणते आणि त्याचा पुरावा कोणता, यावर अर्ध्या तासाची तरी चर्चा नक्कीच केली असती. दंगलपिडीतांच्या पुनर्वसनासाठी जमवलेल्या पैशाचा आपल्या चैन छानछोकी जगण्यासाठी वापर करण्याचा आरोप अनुल्लेखाने मारण्याइतका फ़डतूस असतो काय? शिवाय ज्याचे व्यवहारी कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत, त्याकडे डोळेझाक करण्याची वृती सत्यशोधनाची व सत्यकथनाची असू शकते काय? त्याकडे चार ओळीपेक्षा माध्यमांना अधिक सवड व जागा नाही. पण निकम यांच्या नगण्य पोरकट विधानावर काहूर माजवायला भरपूर वेळ व रकाने उपलब्ध आहेत. यातच माध्यमातल्या हस्तकांचा अजेंडा लक्षात येतो. त्यांना निकम याच्या विधानाचे काहूर माजवून तीस्ताच्या अपहारावर पांघरूण घालायचे असणार. अन्यथा एका फ़डतूस विधानाचा इतका गवगवा कशाला? तीस्ता हा वेगळा मांडायचा विषय आहे. पण संदर्भासाठी इथे माध्यमांच्या खोटेपणासाठी उल्लेख करावा लागला. निकम यांचे विधान कशासाठी आहे व त्यातून ते काय सांगू इच्छितात, याची दखल माध्यमांनी घेतली आहे काय? नसेल, तर त्यावर काहूर कशाला माजवलेले आहे? कसाबने मटन बिर्यानी मागितलीच नव्हती. आपणच तशी वावडी उठवली, असे निकम म्हणालेत, हे खरे. पण तसे का म्हणालो, त्याच्या खुलाश्यावर कोणी बोलायचे?

एकदा कोर्टात कसाबचे डोळे ओलावले आणि तो दिवस राखीपौर्णिमेचा होता. ते पाहून त्याला आपल्या बहिणीचे स्मरण झाल्याचा मातम माध्यमातून सुरू झाला होता. ज्या क्रुरकर्म्याला शेकडो निरपराध लोकांवर हकनाक गोळ्या झाडताना क्षणभर आपलेच नातेगोतेही आठवले नाहीत, त्याच्या भावनांचे उदात्तीकरण माध्यमे करू लागली होती. थोडक्यात एका सैतानाविषयी जनमानसात सहानुभूती निर्माण करण्याचा अजेंडा माध्यमांनी हाती घेतला होता. मग त्याला छेद देण्यासाठी आपण ‘मटन बिर्यानीचा शिजवली’ असे निकम यांनी सांगितलेले आहे. त्यांच्या संपुर्ण विधानावर झोड उठलीच पाहिजे. पण त्याच विधानाचा पुर्वार्ध दुर्लक्षित करून चालेल काय? माध्यमांनी ओलावलेले डोळे व बहिणीची आठवण, असल्या गावगप्पा पसरवून कोणता प्रामाणिकपणा चालविला होता? त्यात कितीसे सत्यकथन होते? कसाबच्या डोळ्यात पाणी आले, म्हणजे त्याला बहिणीच्या राखीची आठवण आली, हे माध्यमांना कसे उमगले होते? माध्यमांनी ती पिकवलेली कंडी नव्हती काय? त्याचा खुलासा वा स्पष्टीकरण कोणी करायचे? त्याविषयी माध्यमांना जाब कोणी विचारायचा? की कंड्या पिकवण्याचा आपला राखीव अधिकार आहे आणि निकम यांनी परस्पर कंड्या कशाला पिकवल्या, असा आज बोंबा ठोकणार्‍यांचा दावा आहे? बरे निकम खोटेच बोलले असतील, तर त्याचा इतका बिनबुडाचा गदारोळ करणारी माध्यमेही खोटी नाहीत काय? आपण कोणत्याही थापेबाजीला बिनाचौकशी प्रसिद्धी देतो, याचीच ही कबुली नाही काय? निकम यांनी माध्यमांना मुर्ख बनवलेही असेल, पण जे त्यामध्ये मुर्ख बनले, त्यांचे काय? तेव्हा निकम खोटे बोलले असतील, तर आज खरे बोलतात, याची तरी माध्यमांनी कोणती खातरजमा करून घेतली आहे? की अलिकडला कुत्रा भुंकला म्हणून पलिकडला भुंकत गावभर गलका करण्याला माध्यमकर्म म्हणायचे?

मुद्दा निकम यांच्या तेव्हाच्या व आजच्या विधानांचा नाही. कोणीही कुठेही काहीही बकवास करतो आणि त्यावर माध्यमे बेताल गदारोळ सुरू करतात, हा गंभीर विषय आहे. आधी कसाबच्या ओल्या डोळ्यांवर आक्रोश करणारी माध्यमे, दुसर्‍या दिवशी त्याच्या मस्तवाल बिर्यानी मागणीविषयी चर्चा करू लागली; असेही निकम म्हणतात. हा कसला पुरावा आहे? माध्यमे किती बेअक्कल व बेजबाबदार, त्याची साक्षच निकम यांनी अशा विधानातून दिलेली आहे. काल कसाबच्या ओल्या डोळ्यावर अश्रू ढाळणारे, आज त्याच्या बिर्यानी मागण्याला मग्रुरी म्हणू लागतात, अशा विधानातून निकम यांनी एकूणच भारतीय माध्यमांच्या निर्बुद्धतेवर बोट ठेवले आहे. माध्यमात कोंणाला तरी त्याची फ़िकीर आहे काय? निकम तेव्हा किंवा आज काय बोलले, तो त्यांच्या वकिली पेशाचा विषय आहे. वकीलवर्गाने त्याचा उहापोह करावा. पण त्या निमीत्ताने माध्यमांच्या मुर्खपणा व बेतालपणाचा पुरावा समोर आला आहे; यावर कोणी चर्चा करायची? त्या बेजबाबदारपणाला कोणी लगाम लावायचा? आज माध्यमाचा पसारा खुप वाढला आहे. पण त्याची विश्वासार्हता पुरती रसातळाला गेलेली आहे. त्याचे हेच कारण आहे. निकम यांना आरोपीच्या पिंजर्‍या उभे केले, म्हणजे आपला मुर्खपणा झाकला जातो असे कोणाला वाटत असेल, तर तो मुर्खाच्या नंदनवनात वावरतो म्हणावे लागेल. कारण आता मुख्यप्रवाहातील प्रस्थापित माध्यमांपेक्षा सोशल माध्यमे अधिक विश्वासार्ह व झपाट्याने सत्य लोकांपर्यंत पोहोचवू लागली आहेत. त्यामुळे पत्रकारी कांगावखोरीला बाजारात किंमत उरलेली नाही. म्हणूनच निकम यांच्याकडे लोक संशयाने बघण्यापेक्षा, त्यांना सवाल करणार्‍या माध्यमांकडे लोक शंकेने बघत आहेत. याचे कारण तीस्ताविषयी मौन धारण करणार्‍यांचे निकम आख्यान सामान्य माणसाला पचनी पडलेले नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान दुसरे काय?

Wednesday, March 25, 2015

इतके पक्ष हवेत कशाला?



मागल्या आठवड्यातच एक बातमी आलेली होती, आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करण्याविषयीच्या नोटिशीची. अर्थात तशी नोटिस मिळालेला तो एकमेव पक्ष नव्हता. मागल्या लोकसभा निवडणूका लढवल्यानंतर, पक्षाने केलेल्या खर्चाचा हिशोब सादर न केलेल्या अर्धा डझन पक्षांना तशा नोटिसा गेलेल्या होत्या. पण देशभर ज्याचा गवगवा झालेला आहे असा एकच पक्ष त्यात असल्याने, ‘आप’च्या नावाला प्राधान्य मिळाले. ज्या पक्षाने मागल्या दोनतीन वर्षात राजकीय पक्षांचे खर्च, उधळपट्टी, देणग्या आणि त्यातला भ्रष्टाचार यावर काहूर माजवले, त्यानेच आता आपल्यावर पाळी आली, मग अन्य पक्षांपेक्षा बेदरकारपणा दाखवावा का? पण तोही मुद्दा नाही. या पक्षाची स्थापना होण्यापुर्वी ते एक आंदोलन होते आणि त्याचा आशयच प्रचलित राजकारणातला व्यापक भ्रष्टाचार, इतकाच होता. त्यावेळी आपल्याला मिळणार्‍या देणग्या व होणारा खर्च यांचा हिशोब राजकीय पक्षांनी दिलाच पाहिजे, अशी मागणी करीत केजरीवाल इत्यादिकांनी, आपण कसे स्वच्छ चारित्र्याचे पुतळे आहोत अशी प्रतिमा उभी करून घेतली. मात्र तेव्हा तरी त्यांनी राजकीय पक्षांच्या खर्‍या अर्थकारणाचा वास्तव चेहरा त्यांनी लोकांसमोर मांडला होता काय? तोच मांडला नाही, म्हणून त्यातले खरे गांभिर्य अजून कोणाच्या लक्षात आलेले नाही. म्हणून राजकीय पक्ष स्थापन करणे वा त्याची नोंदणी करून राजरोस भ्रष्टाचाराचे कुरण उभे करणे, ही भीषण वास्तविकता लोकांसमोर येऊ शकलेली नाही. किंबहूना ती जनलोकपाल मागणार्‍यांनी पुरती येऊ दिली नाही, असेच म्हणावे लागेल. अन्यथा विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ब्रह्मा यांची ताजी घोषणा इतकी दुर्लक्षित कशाला राहिली असती?

निवडणुका लढणे, जिंकणे वा त्यावर पैशाची उधळपट्टी करून भ्रष्टाचार करणे; हे आपण नेहमी ऐकत असतो. पण कुठलीही निवडणूक न लढवताही केवळ राजकीय पक्षाची नोंदणी करून अलगद भ्रष्टाचार करता येतो, हे किती लोकांना ठाऊक आहे? करबुडवेगिरीचा सोपा व निरंकुश मार्ग म्हणजे राजकीय पक्षाची नोंदणी करणे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपल्या देशात १६००हून अधिक पक्षांची आयोगाकडे नोंद आहे. त्यातले कमीअधिक दोनशे निवडणूकात सहभागी होतात. म्हणजे कुठे ना कुठे त्यांचे उमेदवार मैदानात येतात. बाकीचे पक्ष नुसते नोंदलेले आहेत आणि त्यांनी सहसा निवडणूक लढवलेलीच नाही. लोकांना त्यांची नावेही ठाऊक नसतात. त्यांचे झेंडे, फ़लक आपल्याला कुठे दिसणार नाहीत. त्यांनी मोर्चे, धरणी, आंदोलने वा सभा संमेलने घेतल्याचे आपल्याला कधी दिसत नाही. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी नोंदणीच कशाला केली, ते कोणाला ठाऊक नाही. मग हे पक्ष आहेत कशाला आणि करतात काय? नव्या निवडणूक आयुक्तांनी तिकडेच मोर्चा वळवला आहे. त्यांनी अशा पक्षांची नोंदणीच रद्द करायचा पवित्रा घेतलेला आहे. ज्यांनी मागल्या दहा वर्षात कधीच कुठली निवडणूक लढवलेली नाही, त्यांच्यावर ब्रह्मा कारवाईचा बडगा उचलणार आहेत. प्रत्यक्षात ते कधी होईल, तो पुढला भाग आहे. पण आज इतकाच प्रश्न आहे, की ज्यांना राजकीय म्हणावे असे कुठलेच कार्य करायचे नसेल, त्यांनी अशी राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करावीच कशाला? सगळे गुढ तिथेच दडलेले आहे. ब्रह्मा यांनी त्याच दुखण्य़ावर नेमके बोट ठेवले आहे.

‘जनतेने दबाव टाकला, तर राजकीय पक्षांच्या अशा प्रकारच्या बनावट नोंदणीला आळा घालणे शक्य होईल. राजकीय पक्षाची नोंदणी झाली, की त्याचे अनेक लाभ मिळतात, प्राप्तिकरातही आर्थिक सवलत मिळते. आम्ही निवडणूक लढली, परंतु विजय मिळाला नाही, असा युक्तिवाद राजकीय पक्ष नेहमीच करतात; परंतु ज्यांनी महापालिकाच नव्हे, तर पंचायत निवडणुकांमध्येही कधीही भाग घेतलेला नाही, असे अनेक पक्ष आहेत आणि ही दुर्दैवाची बाब आहे’, असेही ब्रह्मा म्हणाले. हेच विधान त्यात बहुमोलाचे आहे. राजकीय पक्ष स्थापन करण्यात म्हणजे नोंदण्याचे अनेक लाभ आहेत, म्हणजे कायदेशीर पळवाटा आहेत. पहिली बाब आहे, की पक्ष म्हणून आयकरात सवलत मिळते. ती सवलत देणगी देणार्‍यासह देणगी घेणार्‍यालाही असू शकते. सहाजिकच त्या रकमेचा होणार्‍या खर्चालाही कोणी लगाम लावू शकत नसतो. म्हणजे काय? तर असा नुसता नोंदणी केलेला राजकीय पक्ष वाटेल तितकी रक्कम देणगी रुपाने मिळवून खर्च केल्याच्या पावत्या दाखवू शकेल. पण खरेच त्याच्याच पक्षकार्यासाठी ती रक्कम खर्च झालेली असेल असे नाही. मोठे पक्ष आपल्यासाठी होणारा खर्च असा अन्य नोंदणीकृत पक्षाच्या माध्यमातून करू शकतात. निवडणूका लढवायच्या नाहीत आणि निव्वळ आयकर सवलत घेऊन देणगीच्या पैशात चैन करायची आहे, त्यांनाही नोंदणी उपकारक ठरू शकते. जे खर्च व्यक्तीगत जीवनात कर लादू शकतात, तोच खर्च पक्षाच्या नावाने झाल्यास करमुक्त असू शकतो. साध्या भाषेत ज्याला बेनामी व्यवहार म्हणतात, तसे व्यवहार करण्याची ही कायदेशीर सुविधा झाली. म्हणून हे चौदाशेहून अधिक पक्ष नोंदलेले आहेत. पण ते कधी निवडणूका लढवत नाहीत, की आपले खर्च-हिशोब कोणाला सादर करत नाहीत. त्यांच्या खात्यात येणार्‍या पैशाची चौकशी, तपास वा छाचनी होऊ शकत नाही. ते पैसे जसे चैनीवर खर्च होऊ शकतात, तसेच ते घातपाती देशद्रोही वा गुन्हेगारी कामासाठीही खर्च होऊ शकतात. किंबहूना म्हणूनच अन्याय अत्याचार विरोधी मोठमोठ्या आंदोलनांचा भपका आपण बघतो, त्यावर खर्च झालेला पैसा कुठून आला, त्याचे आपल्याला आश्चर्य वाटत असते. पण प्रत्यक्षात अशाच मार्गाने ही उलाढाल होत असणार.

सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त ब्रह्मा यांचे हात बळकट करणारे अधिकार दिले, तर हे बोगस नामधारी राजकीय पक्ष विनाविलंब निकालात निघतील. आपोआप त्यांच्या आडोशाने होऊ शकणारी कोट्यवधींची उलाढाल संपुष्टात येऊ शकेल. पण त्याला सहजासहजी मोठ्या राजकीय पक्षांची मान्यता मिळेल असे वाटत नाही. कारण यातले बहुतांश नोंदलेले पक्ष कुठल्या ना कुठल्या मोठ्या राजकीय पक्षाचे बेनामी अवतार असणार. काही कंपन्या व उद्योगपतींचे हस्तक असू शकतील. काही राजकीय दलालांची दुकाने असतील. एक मात्र निश्चीत, राजकीय पक्षाची नोंदणी करून पुढे काहीही न करणे, ही बेनामी कंपन्या व कागदी कंपन्यांसारखी कायद्याला बगल देणारी खिंड असावी. अन्यथा जो व्यापार करायचाच नाही, त्याचे दुकान थाटून हे लोक कशाला बसलेले असतात?

(दिव्यमराठी  २६/३/२०१५)
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-editorial-about-political-party-divya-marathi-4942825-NOR.html

राणेंनी हा धोका पत्करलाच कशाला?



सहा महिन्यात पुन्हा दोन जागी विधानसभेचे मतदान व्हायचे आहे. माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटिल आणि प्रकाश बाळा सावंत, या दोन आमदारांच्या आकस्मिक निधनाने ती वेळ आलेली आहे. योगायोग असा, की दोन्ही जागी त्यांच्याच विधवा पत्नीला पक्षांनी उमेदवार्‍या दिलेल्या आहेत. त्यमागे अर्थातच सहानुभूतीची मते पारड्यात पाडून घेण्याचा बेत आहे. मात्र त्यात जितकी तासगावची लढत सोपी आहे, तितकी बांद्रा-पुर्व ही लढत स्पष्ट नाही. कारण कॉग्रेसने इथे यशाची अजिबात शक्यता नसताना नारायण राणे यांच्यासारखा मोहरा खर्ची घातला आहे. त्यामागे पक्षाचे अंतर्गत राजकारणही असल्याचे म्हटले जाते. योगायोग असा, की राणे यांनी दहा वर्षापुर्वी शिवसेना सोडली आणि कॉग्रेसची कास धरली, ती मुख्यमंत्री होण्यासाठी. त्यांच्याच कृपेने तेव्हा विधानसभेत सेनेचे आमदार कमी होऊन राष्ट्रवादीपेक्षा मोठा पक्ष होण्याची संधी कॉग्रेसला मिळालेली होती. पण म्हणून लगेच राणे मुख्यमंत्री होऊ शकत नव्हते. विलासराव ती जागा अडवून बसलेले होते आणि राणेंना आवडते खाते म्हणून महसुलमंत्री करण्यात आले. त्यासाठी अशोक चव्हाण यांना ते महत्वाचे खाते सोडावे लागले होते. मात्र त्याची किंमत त्यांना लौकरच मिळाली. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांना जावे लागले, तेव्हा आपोआप राणेच मुख्यमंत्री व्हायचे होते. तशीच चर्चा होती आणि प्रत्यक्षात त्या पदावर अशोक चव्हाण यांची वर्णी लागली. तेव्हा राणे यांनी केलेला आकांत पक्षश्रेष्ठी अजून विसरलेले नाहीत. म्हणूनच आता मोठ्या पराभवानंतर राज्यात पक्ष नव्याने उभा करायचा, तरी प्रदेशाध्यक्षाचे पदही राणेंना नाकारण्यात आले आहे. उलट तिथे पुन्हा अशोक चव्हाण यांची नेमणूक झाली असून त्यांनीच राणे यांना बांद्रा-पुर्वच्या मैदानात उतरण्याचे आदेश दिले आहेत. ह्या सर्व पार्श्वभूमीचा अर्थ काय होतो?

महाराष्ट्रात आज राणे आणि चव्हाण वगळता कोणी नेतृत्वाचे दावेदार पक्षात उरलेले नाहीत. त्यात चव्हाण यांनी राणे यांना विधानसभेत आणायची संधी दिली, असेही म्हणता येईल. पण जी संधी दिली तिचा लाभ उठवण्यासारखी परिस्थिती आहे काय? पहिली बाब म्हणजे राणे कधीच मुंबईतून विधानसभा लढलेले नाहीत. किंबहूना १९८५ ची पालिका निवडणूक सोडली, तर कुठलीच निवडणूक त्यांनी मुंबईत लढवलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर बांद्रा हे संपुर्ण नवे आव्हान आहे. अधिक तिथे सहा महिन्यापुर्वी झालेल्या मतदानात कॉग्रेस व राष्ट्रवादी मिळूनही भाजपा इतकी मते मिळवू शकलेले नाहीत. आणि भाजपा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर पराभूत झालेला होता. मात्र पराभूत भाजपाला तुल्यबळ लढत ओवायसीच्या उमेदवाराने दिलेली होती. याहीवेळी तिथे त्या पक्षाने आपला तोच उमेदवार टाकलेला आहे. म्हणजेच कॉग्रेस वा राणे मुस्लिम मतांच्या बळावर ही लढाई जिंकू शकत नाहीत. भाजपाने युतीधर्म मान्य करत आपला उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे बहुतांश भाजपा मतेही सेनेच्या पारड्यात पडतील अशी अपेक्षा करता येते. थोडक्यात सेनेचा उमेदवार फ़ारसा नावाजलेला नसला तरी सहानुभूती मिळवू शकणारा आहे. तर राणे यांच्यासाठी ही निवडणूक अशक्य कोटीतले आव्हान आहे. साधनांपेक्षा सदिच्छा ही अशा ठिकाणी मोलाची ताकद असते. त्यातच राणे तोकडे पडणार आहेत आणि कॉग्रेस पक्ष म्हणून त्यांना कुठलीही मदत करू शकणार नाही. मग नुसता पडण्यासाठी कॉग्रेसने इतका मोठा मोहरा टाकावा काय? त्यालाच राजकारण मानले जात आहे. अशोक चव्हाणांना दुसर्‍यांदा राणेंनी पराभूत व्हावे असे वाटते आहे. ते झाले तर महाराष्ट्रात राणे यांचे आव्हान संपुष्टात येईल आणि चव्हाण हेच एकमेव पक्षनेता म्हणून उभारी घेऊ शकतील. त्यात म्हणूनच तथ्य वाटते.

राणे यांनी हा धोका कशाला पत्करावा, त्याचाही मात्र उलगडा होत नाही. वास्तविक त्यांनी उमेदवारी नाकारून ज्याला उभे कराल त्याला विजयी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो, असा पवित्रा घ्यायला हवा होता. त्याचा लाभ असा झाला असता, की त्यांना पराभवाची टांगली तलवार डोक्यावर घ्यावी लागली नसती. पण पोटनिवडणुकीचे निमीत्त साधून मुंबईतील कॉग्रेस कार्यकर्त्यांना आपल्या पंखाखाली आणण्यावर लक्ष केंद्रित करता आले असते. उमेदवार जिंकणे आता महत्वाचे नसून मुंबईवरच राणेंना आपला राजकीय प्रभाव निर्माण करणे अगत्याचे आहे. या निमीत्ताने मुंबईभरच्या कार्यकर्त्यांना संघटित करून कामाला जुंपताना त्यांच्याशी संवाद साधत त्यांना आपल्या दावणीला बांधण्याची अपुर्व संधी राणे साधू शकले असते. त्यात मग अनेकजण आगामी पालिका निवडणूकीतले इच्छुक असू शकतात. त्यांना गोंजारून पक्षामध्ये आपले समर्थक निष्ठावंत नव्याने जोडता आले असते. पैशाच्या बाबतीत राणे सढळ हस्ते पुढे असतात, असे म्हटले जाते. त्याचा प्रयोग करून ही निवडणूक राणेंना प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणूनही लढवता आली असती. मग उमेदवार पडला म्हणून बिघडले नसते. राणेंवर व्यक्तीगत पराभवाचे खापर कोणी फ़ोडू शकला नसता. शिवाय प्रचारापेक्षा आपल्याच गटाचे सामर्थ्य वाढवण्याची सुवर्णसंधी साधायला पुर्ण वेळ देता आला असता. आता तसे होणार नाही. राणेच उमेदवार असल्याने पक्षातीलच त्यांचे विरोधक पराभवासाठी प्रयत्नशील असतील. अधिक कट्टर शिवसैनिक राणे पराभवासाठी आपली ताकद पणाला लावतील. म्हणजेच स्वत:च उमेदवार होऊन राणे यांनी शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काम खुप सोपे करून ठेवले आहे. दुसर्‍या बाजूला ओवायसीच्या आव्हानाने भाजपाच्या मतदाराला सेनेच्या पाठीशी उभे रहाण्याची सक्ती झाली आहे. यातून राणे कसा मार्ग काढणार, त्याचे उत्तर सापडत नाही.

म्हणूनच नारायण राणे यांनी इथे उमेदवारीचे आव्हान कशाला स्विकारले, त्याचा अर्थबोध होत नाही. केवळ बाळासाहेबांचे निवासस्थान तिथे आहे, म्हणून बांद्रा-पुर्व हा सेनेचा बालेकिल्ला नाही आणि तिथे जागा गमावल्याने उद्धव यांची प्रतिष्ठा काडीमात्र कमी होत नाही. मग राणे यांनी तिथे उडी घेऊन साधले काय? २००९ सालात त्यांनी मुद्दाम तसे केले असते, तरी समजू शकते. कारण तेव्हा आजच्या इतकी सेनेची संघटना वा आव्हान मोठे नव्हते. आज तशी स्थिती नाही. अगदी भाजपाशी आघाडी तुटली असतानाही भाजपालाच पराभूत करीत बाळा सावंत तिथे विजयी झाले होते. म्हणजेच कुठूनही कॉग्रेसला विजयाची शक्यता नाही. इथे राणेंच्या स्वभावात असलेला दोष सांगायला हवा. डिवचले मग अंगावर जाण्याचा त्यांचा मूळचा शिवसैनिकी स्वभाव, त्यांच्या शत्रूंनी नेमका जोखला आहे. त्याचाच वापर मग त्यांचे विरोधक मोठ्या धुर्तपणे करत असतात. त्याच आधारावर सापळे लावतात आणि त्यात राणे फ़सत जातात, असे मागल्या चारपाच वर्षात दिसून आले आहे. आताही मातोश्रीचे स्थान असलेला बांद्रा-पुर्व म्हणजे उद्धवचे नाक कापण्याची संधी, असा सापळा लावला गेला आणि त्यात राणे फ़सलेले आहेत. मग हा सापळा फ़क्त अशोक चव्हाणांनी लावला, की त्यातही उद्धव-चव्हाणांचे संगनमत आहे, अशी शंका येते. कारण त्याच दोघांना राणे नेहमी शत्रू मानत आले आणि राणेंचा नवा पराभव दोघांना राजकीय लाभदायक असू शकतो. चव्हाणांचे आव्हान संपते आणि उद्धवना पुन्हा गद्दार संपवला, म्हणून शिवसैनिकांची पाठ थोपटत पक्षावर आपली पकड मजबूत करायची संधी उपलब्ध होते. पण सगळे अंदाज विस्कटून राणे जिंकले तर? मग सगळी समिकरणे बदलू शकतील. पण आत्याबाईला मिश्या असत्या तर, या उक्तीप्रमाणे ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मग राणेंनी हा धोका पत्करलाच कशाला, हा एकमेव यक्षप्रश्न उरतो.

Tuesday, March 24, 2015

चार्ल्स शोभराजच्या व्याख्येतली माध्यमे




१९८०च्या दशकात संपुर्ण भारतात चार्लस शोभराज हा गुन्हेगार खुप गाजत होता. दिल्लीच्या तिहार तुरूंगातून त्याने रक्षकांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेले होते. मग त्याला गोव्यात मुंबईचे पोलिस निरीक्षक झेंडे यांनी शिताफ़ीने पकडले आणि त्यांचेही नाव खुप गाजले होते. या शोभराजने दोनतीन डझन देशात वेगवेगळे गुन्हे केलेले होते. पण प्रत्येक देशातून तो हातोहात निसटला होता. मात्र भारतातल्या कायद्याच्या कचाट्यातून निसटणे त्याला अवघड झालेले होते. त्या काळात कोणीतरी त्याची तुरुंगात जाऊन मुलाखत घेतली होती. त्यात शोभराजने भारतीय कायद्याविषयी बहुमोल मतप्रदर्शन केलेले आहे. भारतामध्येच मी पकडला गेल्यावर इतका काळ खितपत पडलो आहे, कारण इथे खोटे पुरावे निर्माण केले जाऊ शकतात आणि कायद्यातही अशा खोट्या पुराव्याच्या आधारावर तुम्हाला कित्येक वर्षे गजाआड डांबून ठेवणे शक्य असते, असे त्याचे मत होते. आज त्याच्याही पुढली परिस्थिती आलेली दिसते. कुठल्याही पुरावा किंवा साक्षीशिवाय कोणावरही वाटेल तो आरोप करायचा आणि त्यासाठी कोर्टातही जाणे शक्य नसल्याने खोट्या पुराव्यांचा गवगवा करून माणसाला आयुष्यातून उठवू शकणारी माध्यमे आता प्रभावशाली झालेली आहेत. त्याचा ताजा नमूना म्हणून आपण भारतातील ख्रिश्चन समाजावरील हल्ल्याच्या रुपाने बघू शकतो. कालपरवा मुंबई नजिकच्या पनवेल येथील एका चर्चच्या कॅमेरामध्ये मोटरबाईकवर बसून आलेल्या हल्लेखोरांनी दगड मारल्याचे चित्रणही समोर आले. काही दिवसांपुर्वी कोलकात्यातील एका ख्रिश्चन संस्थेमध्ये वयोवृद्ध सेविकेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. तिचा गवगवा झाला. पुढे हरयाणात हिस्सार येथे नव्या बांधकाम होणार्‍या चर्चची मोडतोड झाल्याचा गदारोळ उठवण्यात आला. त्याच्याआधी इथे आलेल्या अमेरिकन अध्यक्षांनी तशी वाच्यता केलेली होती.

हा सगळा प्रकार आपल्या देशात प्रथमच घडतो आहे काय? ओबामा यांनी अशी पोपटपंची करणे समजू शकते. दोन दिवसांच्या दौर्‍यावर आलेल्या माणसाला कोणी काहीही सांगून चिथावणी देवू शकतो. पण अशा घटनांचा बंदोबस्त करण्यात अवघी उमेद खर्ची घालणार्‍या मुंबईच्या माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्या सारख्या अनुभवी निवृत्त अधिकार्‍याने त्यावरून काहुर माजवावे, याचे नवल वाटते. त्यामागे काही कारस्थान शिजल्याची शंका येते. अशी शंकाही रिबेरो यांच्याच आरोपातून येते. मोदी सरकारने अमूकतमूक करावे, असे रिबेरो म्हणतात. तेव्हा यापुर्वी म्हणजे मोदी सत्तेत येण्यापुर्वी अशा घटनाच घडत नव्हत्या, असा त्यांचा दावा आहे काय? शिवाय अशा घटना खरेच त्यांनी म्हटल्याप्रमाणे केवळ हिंदूत्वाचे कोणी बोलघेवडे बरळतात म्हणून होतात काय? असेल, तर त्याही घटनांचे पोस्टमार्टेम व्हायला हवे. उदाहरणार्थ दिल्लीच्या पोलिसांनी त्या शहरी राज्यात धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ले वा गुन्ह्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मागल्या तीन वर्षात प्रत्येकी तीन हल्ले चर्चवर झालेले आहेत. यावर्षी ही पहिली एकमेव घटना आहे. पण त्याच काळात म्हणजे २०१५ मध्ये दिल्लीत १४ हिंदू धर्मस्थळे, पाच गुरूद्वारा व दोन मशिदीवर हल्ले झालेत. म्हणजेच ख्रिश्चनांच्या धर्मस्थानांच्या दुप्पट ते चौदापट अन्य धर्मस्थानांवर हल्ले झालेत. पण त्यापैकी एका तरी घटनेची बातमी धर्मस्थानावर हल्ला. अशी देण्यात आली का? नसेल तर तिथे घटनेतला धर्म लपवला गेला आहे, किंवा इथे मुद्दाम ख्रिश्चन धर्माचा उल्लेख हेतूपुर्वक करण्यात आलेला आहे. तसे करण्यामागे धर्माचे राजकारण करण्याचा बातमीदाराचा हेतू अजिबात लपून रहात नाही. दिशाभूल मात्र होते. अगदी रिबेरो यांच्याही पत्र लेखाबद्दल तसेच म्हणता येईल. ज्या वृत्तपत्राने तो लेख छापला, त्याने त्याची दुसरी बाजू लपवलेली नाही काय?

मंगलोर येथील राजकीय सामाजिक कार्यकर्ते व धर्माने ख्रिश्चन असलेले रॉबर्ट रोझारियो यांनी रिबेरो यांच्या लेखातील प्रत्येक मुद्दा खोडून काढणारा प्रतिवाद इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राकडे पाठवला होता. पण तो छापायला नकार देण्यात आला. त्यांनी तो इतरांकडे पाठविला. त्यापैकी ओपिंडीया नावाच्या वेबसाईटने तो प्रसिद्ध केलेला आहे. पण कुठलेही मुख्यप्रवाहातील माध्यम त्याची दखल घ्यायला राजी नाही. ह्याला सत्याचा शोध नव्हे, कोंबडे झाकणे म्हणतात. तेही असो. कोलकात्यातील ख्रिश्चन ननवरील बलात्काराचे आता काय झाले? आठवडाभर त्यातले आरोपी चित्रण असूनही पकडले जात नाहीत, म्हणून केंद्रातील मोदी सरकारवर आरोपांच्या तोफ़ा डागल्या गेल्या. बलात्कारी हिंदूत्वाशी संबंधित असणार हेच गृहीत होते. पण आता त्यांना पकडण्यात आल्यावर कोलकाता विषय कुणालाच नको आहे. कारण पकडण्यात आलेले आरोपी बांगलादेशी आहेत आणि ममता सरकार त्यांनाच पाठीशी घालायला आटापिटा करीत होते, हे स्पष्ट होते. ममता हिंदूत्ववादी नाही आणि बांगलादेशी हिंदू आरोपी नाहीत. मग कोणाला त्या ननच्या बलात्काराच्या वेदना व्हायच्या? रिबेरो यांना तरी आता सत्याची चाड आहे काय? की बांगलादेशी बलात्कारी मुस्लिम सुद्धा मोहन भागवत यांच्या आदेशानुसार तिथे हल्ला करायला गेले, असे या शहाण्यांना म्हणायचे आहे? आठवडाभर बलात्कारासाठी मातम करणार्‍यांची वाचा आरोपी पकडल्यावर का बसली आहे? तर त्यांचे आरोप आणि खोटेपणा तोंडावर पडला म्हणून ना? पनवेलचे हल्ल्याचे चित्रणही असेच मुद्दाम चित्रणासाठी हल्लेखोर पाठवून पुरावा निर्माण करावा, तसेच भासत नाही काय? चहूकडून काहूर माजवून दिशाभूल करण्यापेक्षा काय वेगळा प्रकार चालू आहे? हे सामान्य माणसाला कळते म्हणूनच मतदानात खोट्याच्या कपाळी गोटा बसावा, तसा सेक्युलर पुरोगामी पक्षांचा लोकांनी धुव्वा उडवला आहे.

ख्रिश्चन समाज वा धर्मस्थळावरील अकस्मात होऊ लागलेले हल्ले ओबामा येऊन गेल्यावरच कसे होऊ लागले? त्याच्या बातम्या त्यानंतरच कशा ठळकपणे प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागल्या? जे हल्ले आहेत आणि त्यातले संशयित आरोपी बघितले, तर त्यात कुठेही हिंदूत्ववादी व्यक्ती व संस्थेचा संबंध दिसत नाही. म्हणून मग त्याच्याशी भागवत यांचे मदर तेरेसा यांच्याविषयीचे विधान जोडायचे. यालाच वडाची साल पिंपळाला लावणे म्हणतात ना? हिस्सार येथे चर्चच्या बांधकामावर हल्ला झाला म्हणताना, ते बांधकामच मुळात अनधिकृत असल्याचा तपशील का लपवला जातो? घरासाठी भूखंड घ्यायचा आणि तिथे अनधिकृत चर्च उभे करायचे, ही वस्तुस्थिती लपवली गेलेली नाही काय? रिबेरो यांनी ज्या हल्ले व असुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्या तमाम घटनांचा हिंदूत्ववादी जे काही बरळतात, त्याच्याशी दूरान्वयेही संबंध जोडता येणार नाही. आणि धार्मिक उन्मादाचा व झुंडीचाच मुद्दा असेल, तर दिमापूर येथे तुरुंगावर झालेला हल्ला धार्मिक ठरू शकतो. कारण त्या हल्ल्यात बळी पडलेला मुस्लिम आहे आणि ज्या झुंडीने त्याच्यावर इतका अमानुष प्राणघातक हल्ला केला, ती लोकसंख्या ख्रिश्चन आहे. त्यावेळी कोणी पाशवी जमावाच्या धर्माचा उल्लेख कशाला करत नाही? जिथे कुणा हिंदूचा संबंधही जोडता येत नाही, ते हल्ले हिंदु संघटनांनी केल्याची आवई उठवायची आणि नसलेल्या राईचाही पर्वत करायचा. उलट दिमापूर मध्ये पर्वताएवढा धार्मिक उन्मादाचा पुरावा असताना ख्रिश्चन झुंडशाहीबद्दल लपवाछपवी करायची. इथे आपली माध्यमे चार्ल्स शोभराजच्या व्याख्येत बसलेली दिसत नाहीत काय? खोटे पुरावे बनवायचे आणि तेच खरे असल्याचे काहूर माजवायचे. आणि पुरावेच खोटे पडले, मग त्याबद्दल शब्दही बोलायचा नाही. मौनाच्या पुरोगामी बिळात दडी मारून बसायचे.
==========================
रॉबर्ट रोझारियो यांचे रिबेरोंना खडसावणारे चोख उत्तर. हे छापायला इंडियन एक्सप्रेसने नकार दिला. यातून या माध्यमांना खोट्या बातम्या व अफ़वा पिकवायच्या आहेत त्याची खात्री पटू शकते. इथे त्याचा दुवा आहे. चिकित्सक वाचक तिकडे बघू शकतात.

http://www.opindia.com/2015/03/a-christian-responds-to-a-christian-who-felt-he-was-a-stranger-in-his-own-country/

Monday, March 23, 2015

त्यांच्या खांद्यावर डोकेच नाही मग........



गेले काही दिवस अनेक सेक्युलर पत्रकार पिसाळल्या कुत्र्यासारखे मला चावे घ्यायला गुरगुरत आहेत. त्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. कारण पिसाळलेल्या कुत्र्यांना त्यापेक्षा अधिक काहीच करणे शक्य नसते. मला कींव कराविशी वाटते, ती त्यांच्या बुद्धीची. एकदा माणूस कशाच्याही आहारी जाऊन सुडाने द्वेषाने प्रवृत्त झाला, मग त्याची सारासार बुद्धी निकामी होत असते. पिसाळलेल्या कुत्र्याची अवस्था त्यापेक्षा वेगळी नसते. ते कुत्रे आपली प्रकृती वा जडलेला रोग बरा करण्यापेक्षा चावत सुटते आणि त्यातच त्याचा शेवट सामावलेला असतो. अशाच एका दिवट्याने म्हणे आपल्या पिसाळलेल्या सहकार्‍याला सल्ला दिला की भाऊसारख्याला आपले माध्यम व्यासपीठ म्हणून देवू नये. क्या बात है? यांचे व्यासपीठ मी कधी मागायला गेलो? आज बहुतेक माध्यमे आणि व्यासपीठे हेच लोक बळकावून बसले आहेत आणि सगळीकडे त्यांचा खोटेपणा उजळमाथ्याने चालू आहे. तुलनेने माझापाशी आहेच काय? कुठले मोठे, प्रस्थापित वा प्रचलीत वृत्तपत्र किंवा वाहिनी मला संधी देत नाही. एकप्रकारे गेली काही वर्षे मी माध्यमात बहिष्कृत पत्रकार आहे. मी कधी त्याबद्दल तक्रार केली नाही. मग हे बावळट भाऊला व्यासपीठ देण्याची भाषा कशाला बोलतंय? गेल्या दोन वर्षात ब्लॉग व फ़ेसबुक अशा सोशल माध्यमातून मी माझे विचार व भूमिका मांडत असतो. त्याची कोणी मुख्यप्रवाहातील माध्यमे दखल घेत नाहीत. मग ह्या दिवट्यांना माझी दखल घेण्य़ाची गरज काय? संजय आवटे असोत की समर खडस, असे लोक प्रस्थापित मोठ्या खपाच्या माध्यमात बसलेत. तुलनेने माझ्या वाचकांची संख्या नगण्य असेल. मग त्यांनी माझी दखल घ्यावीच कशाला? बरळू देत कोण मुर्ख बोलतोय ते, म्हणून ते माझ्याकडे काणाडोळा कशाला करू शकले नाहीत? या प्रश्नाच्या उत्तरातच त्यांचे दुखणे दडलेले आहे. यांच्या प्रस्थापित माध्यमे, वृत्तपत्रे वा वाहिन्यांपेक्षा माझ्या क्षुल्लक ब्लॉग व फ़ेसबुक लेखनाची विश्वासार्हता अधिक असल्याने हे हवालदिल झालेत. इतकाच त्याचा अर्थ होतो. कारण आजवर ज्यांनी त्यांच्या खोटेपणासाठी कोंबडे झाकून ठेवले, त्यांना सोशल माध्यमांनी दाद दिलेली नाही. या नव्या माध्यम स्वातंत्र्याने प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी संपवली. मोजक्या लोकांपर्यंत का होईना, सत्य पोहोचू लागल्याने या भामट्यांची गाळण उडाली आहे. असे लोक मला व्यासपीठ देवू नये असले सल्ले देतात, तेव्हा हसू येते.

कोणी मागितले आहे तुमचे व्यासपीठ? तुमच्यापाशी कुठले व्यासपीठ आहे? भांडवलदार काळेपैसेवाले किंवा कुठल्याही भल्याबुर्‍या मार्गाने पैसे मिळवलेल्यांच्या उंबरठ्यात आपली मीठभाकरी शोधत लाचारीने बसलेल्यांनी, व्यासपीठाच्या गप्पा माराव्यात? त्यांना भाऊच्या ब्लॉग वा फ़ेसबुक विरोधात मांडायची भूमिकाही तिथल्या लाचार व्यासपीठावर मांडता येत नाही. त्यासाठी पुन्हा सोशल माध्यमाचे दार ठोठावण्याची अगतिकता घेरून बसली आहे, त्यांच्या व्यासपीठाचे मोल ते काय? मला लिहायचे ते मी सोशल माध्यमासोबत उपलब्ध वृत्तपत्रातही बिनधास्त मांडतो. तिथून मिळणार्‍या मोबदल्यासाठी लाळ घोटावी लागत नाही. ज्या वृत्तपत्र मालकाला माझे लिखाण छापायची हिंमत नसेल, तिथे लिहायचे बंद करतो. त्याच्या हुकूमाची लाचारी मला पत्करावी लागलेली नाही. म्हणूनच अमुकतमूक अशा ओळखीचा पट्टा मला गळ्यात बांधून घ्यावा लागत नाही. आवटे-खडसांना ती लाचारीची चाकरी करावी लागते. तेव्हा मला व्यासपीठ नाकारण्याची गोष्ट सोडून द्या. मुद्दा सगळीच्या सगळी प्रस्थापित व्यासपीठे यांच्याकडे असून माझ्या नगण्य प्रभाव पडणार्‍या माध्यमाने हे इतके विचलीत कशाला होतात? माझ्या बेताल लिखाणाने संजय आवटे इतके विचलीत झाले असतील, तर समाजहितासाठी त्यांनी आपल्याला जे सांगायचे, ते दैनिक ‘सकाळ’मध्ये कशाला लिहीले नाही? कारण सोपे आहे, त्यात कुठलेही समाजहित नाही, याची आवटे यांना खात्री आहे. म्हणूनच सकाळमध्ये असे काही लिहीले, तर ढुंगणावर व्यवस्थापनाकडून लाथ बसण्याचे भय आहे. मग भिक्षांदेही करत दुसर्‍या दारात उभे रहायच्या भयाने भेदरलेले आवटे समाजहिताचा आव आणून सोशल मीडियात पादरेगिरी करणार. समर खडसला रिबेरोंवर भाऊ भुंकतोय असे वाटत असेल, तर त्याला शेण खायचे असेल, ते महाराष्ट्र टाईम्समध्ये खायला काय हरकत होती? तिथे शेपूट पुरती ‘आत’ घालून उदात्त शब्द लिहायचे आणि सोशल मीडियात येऊन पादापादी करायची. असे लोक व्यासपीठ देण्या नाकारण्याच्या वल्गना करतात, त्याचे हसू येते. कींव कराविशी वाटते. पण त्याला दुसरी बाजूही आहे आणि ती इथे मांडणे अगत्याचे आहे. यापैकी प्रत्येकाला स्वत:चा हुकमी वाचक नाही, म्हणून कुठल्या तरी नामवंत माध्यमाच्या धर्मशाळेत पथारी पसरावी लागते. पोट जाळण्यासाठी खैरातीच्या लंगरमध्ये फ़ुकटच्या पंगतीत जाऊन आपले नीरस निरर्थक लिखाण खपवावे लागते. माझे तसे नाही. माझा ब्लॉग कुणा काळेपैसेवाल्या किंवा शेठजीचा ओशाळा नाही. मला सामान्य वाचक व लोकांनी आधार व बळ दिलेले आहे. त्यामुळेच अशा आश्रित लाचारांना माझ्या सोशल माध्यमातील लेखनाची दखल घेणे भाग झाले आहे. ‘सांगता येत नाही आणि सहन होत नाही’ अशा दुखण्याने पछाडलेले हे चारित्र्य-‘संपन्न’ लोक, म्हणूनच माझी दखल घेत त्यावर फ़ुसक्या सोडत असतात. त्यांना आपल्याच खोटेपणाने पछाडलेले आहे. आपण खोटे आहोत याची मनोमन असलेली खात्रीच, मग तो खोटेपणा उघड होण्याच्या भयाने सतावत असते. ती थापेबाजी भाऊच्या सामान्य ब्लॉगने उघडी पडण्याचे भय त्यांची झोप उडवते. अन्यथा त्यांनी इकडे ढुंकून बघायचे दुसरे कारण काय?

अशाच एका दिवट्याने माझ्या भिंतीवर येऊन, ‘भाऊ उजव्या विचारांची चाकरी करतो’ असाही आक्षेप घेतलाय. याचा दुसरा अर्थ हे डावे विचारवंत कुणाची तरी चाकरी करण्यातच जगतात याची कबुली आहे. कॉम्रेड पानसरे यांचे दुर्दैव इतकेच, की त्यांची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणार्‍या असल्या अर्धवटांच्या खाद्यांवर स्वत:चे डोकेच नाही. असते तर पानसरे यांच्या नावाने अश्रू ढाळण्याआधी त्यांनी निदान पानसरे वाचला असता आणि समजून घेतला असता. तो समजून घेतला असता तर त्यांना आपल्या खांद्यावर (धडावर) आपलेच डोके असावे असे पानसरे म्हणतात, त्याचा अर्थ तरी उमगला असता आणि त्यांनी कुणा काळेपैसे उधळू शकणार्‍या शेठजीच्या जनानखान्यात बौद्धिक रखेल होण्याचे दु:ख तरी दाखवले असते. पण इथे त्याचेच कौतुक आहे. आपल्या जनानखान्याच्या कुणाला येवू द्यायचे नाही, त्याचे सल्लामसलती चालू आहेत. आपण कुठे फ़सलोत आणि वापरले जात आहोत, ते पानसरे उघड करून सांगतात, तेही ज्यांना आजवर समजू शकलेले नाही, त्यांच्या वैचारिक कुवतीचे काय सांगावे? कुठल्या मोठ्या प्रस्थापित भांडवली गुंतवणूकीच्या माध्यमात डाव्या बुद्धीवादाचे फ़ुटके, गळती लागलेले हौद भरत बसलेल्यांची भामटेगिरी कॉ. पानसरेंनी आपल्या (परिवर्तनाच्या दिशा) पुस्तकातून उघड करताना लिहीले आहे. ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’ तमाम मोठ्या माध्यमातून डाव्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या पत्रकार, संपादक व विचारवंतांच्या खांद्यावर त्यांचे स्वत:चे डोके आहे काय? असते, तर त्यापैकी एकाने आपल्या मनासारखे लिहीण्याची हिंमत केली असती. त्यासाठी सोशल माध्यमात येऊन भाऊवर दुगाण्या झाडायची लाचारी त्यांच्यावर कशाला आली असती? गरीबांच्या नावाने गळा काढून गरीबांचाच संघर्ष हे कमकुवत करत असतात. या एका परिच्छेदात त्यांच्या पुरोगामी लढवय्येगिरीचा बुरखाच पानसरेंनी फ़ाडून टाकलाय. मग ते वास्तव लोकांसमोर आणणारा भाऊ तोरसेकर व त्याचा इवला ब्लॉग अशा भामट्यांना खुपत असेल, तर नवल कुठले?

मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकजण ताबडतोब माझ्या लेखणीला त्याचे श्रेय देवून मोकळे होतील. तसे अजिबात नाही. माझ्या लेखणीत इतकी शक्ती असती, तर अशा भामट्यांनी मला कधीच व्यासपीठ दिले असते. आपल्यात सामावून घेतले असते. कारण शेवटी हे व्यापारी दुकानदार आहेत. त्यांना कुठल्याही बुद्धीवाद प्रामाणिकपणा यांच्याशी कर्तव्य नाही. तरीही त्यांना माझी दखल घेण्याची अगतिकता आज आलेली आहे, त्याचे श्रेय माझ्या ब्लॉगला मिळालेला तुमचा उदंड प्रतिसाद इतकेच आहे. वाचकाला आम्ही गळी मारू तेच त्याने घ्यावे, वाचावे नाहीतर गप्प बसावे, ही माध्यमांची मुजोरी सोशल माध्यमांनी संपुष्टात आणल्याचा हा सज्जड पुरावा आहे. म्हणून तर अशा दिवाळखोरांना आपल्या लेखण्या व बुद्धी कुणा काळपैसेवाल्या, भांडवल बुडवू शकणार्‍या शेठजीच्या पायाशी गहाण ठेवाव्या लागल्या आहेत. शंभर रुपयात वर्षभर वा सहा महिने घरपोच वृत्तपत्र पोहोचते होईल, अशी दिवाळखोरी चालणार्‍या रद्दीच्या माध्यमात जे बुद्धीवादाचे सोंग करतात, त्यांचे माध्यमच मुळात वृत्तपत्र नाही, ते प्रतिष्ठीत हॅन्डबिल असते. जे घरपोच फ़ुकटात देण्यासाठी वाचक किरकोळ रक्कम नोंदणीसाठी भरतो. रस्त्यावरचा वडापाव दहा रुपये आणि कटींग चहा सहासात रुपये झालेला असताना, ज्यांना सोळा वीस पानी वृत्तपत्र पाचसात रुपयात विकायची हिंमत उरलेली नाही, त्यांनी पत्रकारितेचा टेंभा मिरवण्यात कुठले हंशील? शेवटच्या काळात कुठल्या तरी गर्दीत दिसणारा भारतभूषण याने आपण हिरो असल्याचा टेंभा मिरवावा, तसाच हा हास्यास्पद प्रकार नाही काय? रद्दी लिहून छापून देण्यासाठी नेमलेल्यांनी पंडिताचा आव आणत गठ्ठे उचलण्यातला केविलवाणा अभिनय अधिक दयनीय असतो. दमडाही खर्च केल्याशिवाय मला मिळालेला ब्लॉगचा वाचक यांच्या रद्दी व्यासपीठापेक्षा लाखमोलाचा आहे. कारण त्यानेच अशा भेठजीच्या दारी चाकरी करणार्‍यांना भयभीत करून सोडले आहे. त्या सोशल मीडियातील माझ्या प्रत्येक वाचक सहकारी व आश्रयदात्याला साक्षात लोटांगण. तुमच्यावरून असे हजारो आवटे-खडस-केतकर-वागळे ओवाळून टाकावेत मित्रांनो.

कोल्हापूर ते कोलार: संशयकल्लोळ



कोलार या कर्नाटकच्या जिल्ह्यात कलेक्टरनेच आत्महत्या केली आणि लोकांचा संताप त्यांना रस्त्यावर घेऊन आला. सर्वसाधारणपणे आपल्या देशात प्रशासन आणि सरकारी अधिकार्‍याविषयी लोकांमध्ये राग असतो, नाराजी असते. सरकारी खात्यातला माणुस म्हणजे भ्रष्टाचारी, अशी एक ठाम समजूत होऊन बसली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या कोलार येथील जिल्ह्याधिकार्‍याच्या आत्महत्येने लोक इतके विचलीत व क्षुब्ध व्हावेत, हे नवल म्हणायला हवे. नुसते नाराज झालेले नाहीत, तर कुठल्याही पक्ष वा संघटनेच्या पुढाकाराशिवाय ते लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी ही आत्महत्या स्विकारायला नकार दिला आहे. त्यामागे कुठले तरी षडयंत्र असल्याचा राग लोकांना अस्वस्थ करून गेला आहे. एक अत्यंत कर्तव्यदक्ष धाडसी अधिकारी आत्महत्या करील, हेच लोकांना पटलेले नाही. म्हणूनच मग त्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे पोलिसांनी बोलून दाखवताच, लोकांच्या संयमाचा बांध फ़ुटला आणि हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. मात्र लोकांच्या भावनांचा आदर करून कर्नाटकच्या सरकारने त्याचा तपास सीबीआयकडे द्यायला हवा होता. कारण असा संशय व लोकक्षोभ सिंहासने उध्वस्त करतो, याचे इतक्या लौकर राजकारण्यांना विस्मरण झाले आहे. तीन वर्षापुर्वी अशाच एका प्रक्षोभाने दिल्लीला वेठीस धरलेले होते. एका सामुहिक बलात्काराच्या घटनेने लोकांना रस्त्यावर आणले आणि त्याचे नेतृत्व कुणा राजकीय पक्ष वा संघटनेने केलेले नव्हते. त्यातूनच दिल्लीसह देशात कॉग्रेसला देशोधडीला लागायची वेळ आली. आताही कर्नाटकात त्याच पक्षाचा उन्मत्त मुख्यमंत्री लोकभावनेला पायदळी तुडवत मस्तवालपणा दाखवतो आहे. त्याचे परिणाम नजिकच्या काळात दिसतीलच. पण पुन्हा एकदा या अधिकार्‍याच्या मृत्यूने तेच प्रश्नचिन्ह अधिक मोठे करून समोर आणले आहे.

महाराष्ट्रामध्ये लागोपाठ अशा काही हत्या झाल्या आणि त्याच्याही पुर्वी अन्य राज्यात अशा हत्या वा संशयास्पद मृत्यू झालेले आहेत. त्यामागे खेळले गेलेले राजकारण बाजूला ठेवले, तरी त्यातून निर्माण झालेल्या भयंकर प्रश्नांची उत्तरे शोधणे भाग आहे. अशा प्रत्येक हत्येमागे काही एक अस्पष्ट प्रवृत्ती साकार होते आहे. यातल्या बहुतेक हत्या वा मृत्यूमागे कुठल्या ना कुठल्या पैसेवाल्या मस्तवालपणाचा हात दिसतो आहे. आपण सत्ता व पैशाच्या बळावर काहीही करू शकतो, अशा समजूतीमध्ये वागणार्‍या प्रवृत्तीचा हा उद्दामपणा आहे. महाराष्ट्रामध्ये सतिश शेट्टी याने गैरलागू मार्गाने टोलवसुली करण्याच्या घोटाळ्याला हात घालण्याची हिंमत केली होती, तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी कोल्हापुरातील भरमसाट टोलवसुलीच्या अन्याय्य सक्तीच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार छेडलेला होता. कोलारचा जिल्हाधिकारी डी. के. रवी त्याच मार्गाने चाललेला होता. तो कार्यकर्ता वा आंदोलक नव्हता इतकेच. पण त्याने निवडलेली दिशा नेमकी तशीच होती. जनतेच्या पैशाची व संपत्तीची मोकाट लूट करण्याच्या प्रवृत्तीला त्याने आपल्या प्रशासकीय अधिकारात आव्हान देण्याची हिंमत केलेली होती. काही बिल्डर व विकासक म्हणून जे सत्तेसह पैशाचे मस्तवाल थैमान चालू आहे, त्याला रोखण्याची हिंमत रवीने केलेली होती. त्याने निर्धास्तपणे चाललेल्या या लूटमारीला रोखण्यासाठी कायद्याने दिलेला अधिकार वापरण्याची हिंमत केली होती. मुद्दा सगळीकडे तोच आहे. सत्ता आणि पैसा असलेल्यांना कोणी रोखण्याचे धाडस करू नये. तसे करायला गेलात, तर वाटेल त्या पद्धतीने तुमचे निर्दालन केले जाईल. गोळ्या घातल्या जातील किंवा अन्य मार्गाने काटा काढला जाईल. मावळमध्ये अतिरिक्त पाणी पळवण्याच्या प्रयत्नांना रोखणार्‍यांना पोलिसांनीच गोळ्या घातल्या होत्या. पानसरेंना अज्ञात मारेकर्‍याने गोळ्या घातल्या.

एकूण प्रकार बघितला, तर त्यामागे विकास व बांधकाम व्यवसायात, खाणी व उपसा अशा कामात गुंतलेल्या कंपन्या व व्यावसायिकांचे हितसंबंध गुंतलेले लपून रहात नाहीत. अवैध स्वरूपाची जी झटपट कमाई चालू झाली आहे, त्याला नियम-कायदे वा अन्याय म्हणून कोणी रोखू बघणार असेल, तर त्याची खैर नाही. अ़साच संदेश त्यातून दिला जात आहे. अशा वेळी त्यामागचे हात शोधून खरे सुत्रधार समोर आणणे अगत्याचे आहे. उपरोक्त अधिकार्‍याने ज्यांच्या विकासकामाला जाब विचारण्याचे धाडस केले, त्यातून त्याचा बळी घेतला गेला. असेच लोकांना वाटते आहे. रवी याने ज्यांना चाप लावला होता, त्यात अनेक राजकीय नेते व त्यांचे आप्तस्वकीय गुंतलेले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री ज्या कंपनीशी संबंधित आहेत, तिलाच रवीने रोखलेले होते. ज्या कंपनीला वाळू उपसा थांबवायचे आदेश दिले, तिच्या मालकीणीचा पिताच कॉग्रेसचा लोकसभेतील गटनेता आहे. अशावेळी रवीच्या आत्महत्येचे रहस्य किती लपू शकते? ज्याच्या कारवायांनी भरभरून वहाणार्‍या तिजोर्‍यांना टाळे ठोकले जाते, त्यांच्यावर आत्महत्येची पाळी येऊ शकते. असे टाळे ठोकणार्‍याने आत्महत्या कशाला करावी? याचे पुर्ण भान स्थानिक जनतेला आहे, म्हणूनच नुसत्या कोलार जिल्ह्यातच नव्हे, तर संपुर्ण कर्नाटकात या अधिकार्‍याच्या मृत्यूने संतापाची लाट उसळली आहे. याचे कारण स्पष्ट आहे. त्यामागचे कारस्थान वा लबाड्या लोकांना समजू शकल्या आहेत. त्यामागची खुनी प्रवृत्ती लोकांना उमगली आहे. तसेच रहस्य शेट्टी वा पानसरे यांच्या हत्येमागे असल्याचे लोकांना समजावणे शक्य झाले असते, तर इथेही त्यापेक्षा सौम्य प्रतिक्रिया उमटली नसती. कोल्हापुरातच नव्हेतर राज्यभरच्या टोलवसुलीच्या घोटाळ्याला पानसरे आव्हान होऊन उभे राहिले होते. त्यांचा तिथला लढा यशस्वी झाला असता, तर सगळ्याच टोलवसुलीला लगाम लागला असता.

जसे रवीच्या मृत्यूला कोलारचे काही व्यावसायिक वाळू माफ़िया कारण आहेत, तसेच पानसरे यांच्या हत्येमागेही तशीच कारणे असू शकतात. पण पहिल्या दिवसापासून या हत्याकांडाला राजकीय रंग चढवून त्यामागच्या खर्‍या हिडिस चेहर्‍यांना झाकण्याचे पाप झालेले आहे. म्हणूनच चार वर्षे उलटून गेल्यावरही सतिश शेट्टीच्या हत्येचा सुगावा लागलेला नाही. तशीच पानसरे यांची हत्या रहस्य बनत चालली आहे. त्याविषयी जितका सार्वत्रिक प्रक्षोभ दिसायला हवा होता, तसा होऊच शकला नाही. त्याला सरकार नव्हेतर काही मोजके मतलबी राजकारणी जबाबदार आहेत. आपापले क्षुल्लक राजकीय डाव साधण्यासाठी अशा हत्येचे राजकारण करण्यात आले आणि त्यामागे असलेल्या खर्‍या मतलबावर पांघरूण घातले गेले आहे. एका समर्पित व्यक्तीमत्वाचे जीवन उखडून टाकण्यात आले आहे. त्यातून राजकीय डावपेच खेळण्याला अर्थच नाही. तो त्या व्यक्ती इतकाच समाजावर अन्याय आहे. रवी याच्या मृत्यूनंतर संतप्त होऊन लोक रस्त्यावर कशाला उतरले? आपल्या वतीने तो माणुस एका हेतूने लढत होता, याची जाणिव लोकांना होती. तीच जाणिव कोल्हापूरकरांसह महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेलाही नव्हती, असे कोणाला म्हणायचे आहे काय? कोल्हापूरला टोलमुक्त करण्यात पानसरे यशस्वी झाले असते, तर उर्वरीत महाराष्ट्रालाही त्याचा पुढल्या काळात लाभ झाला असता. पण त्यासाठी त्यांची हत्या झालीच नाही, असा तर्क मांडला गेल्यावर लोकांनी काय समजावे? दुसरा रवी मिळणे दुरापास्त असल्याने लोक रस्त्यावर येतात, तसेच आपल्यासाठी लढणारा दुसरा पानसरे नसल्याच्या जाणिवेने इथेही काहुर माजले असते. पण मुठभर राजकारण्यांनी ते होऊ दिले नाही आणि पानसरेंचे हौतात्म्य राजकीय वेदीवरचा बळी होऊन गेले. एक रहस्य होऊन बसले. यासारखा त्या समर्पित जीवनावर अन्य कुठला भीषण अन्याय आजवर झालेला नसेल.

Saturday, March 21, 2015

ते जीवावर उदार झालेत म्हणून....



अविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य असे विविधप्रकारचे स्वातंत्र्य आपण उपभोगत असतो. म्हणजे निदान त्याबद्दल नित्यनेमाने बोलत असतो. पण अशी स्वातंत्र्ये आपल्याला दिलीत कोणी? अर्थात अशा प्रश्नाला एक ठाशीव उत्तर आपल्याकडे तयार असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलीत. त्यांनी राज्यघटनेत तशा नागरी स्वातंत्र्याची तरतुद केलीय, म्हणून ही स्वातंत्र्ये आपल्याला मिळाली आहेत. जगाच्या पाठीवर अनेक देशात अशी स्वातंत्र्ये नागरिकांना मिळाली आहेत व त्याचाही अंतर्भाव तिथल्या राज्यघटनेत आहे. पण काही देश असे आहेत, जिथे अशा स्वातंत्र्याचा अभाव आहे. तिथले नागरिक त्या स्वातंत्र्याला वंचित आहेत. त्यांनाही असे स्वातंत्र्य असायला हवे, म्हणून इतर देशातले स्वातंत्र्यवीर मागण्या करीत असतात. पण जी काही नागरी स्वातंत्र्ये आहेत, ती आपण किती अनुभवतो? डॉ. नरेंद्र दाभोळकर किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे यांनाही ती स्वातंत्र्ये होतीच ना? बाकीची सोडा, पण साधे जगण्याचे स्वातंत्र्य तरी त्यांना उपभोगता आले काय? कोणीही उठतो आणि एखाद्या व्यक्तीचा खुन पाडतो, त्याचा जीव घेतो. तेव्हा त्याचे जगण्याचे, जीवंत रहाण्याचेही अधिकार नाकारत असतो ना? तेव्हा मग ती राज्यघटना वा ग्रंथात बंदिस्त झालेला हो शाब्दिक कायदा, कुठे उपयोगी पडतो? हातात कायद्याचे पुस्तक घेऊन आपण आपला बचाव करू शकत नाही. मग आपल्या स्वातंत्र्याचा उपयोगच काय? तर त्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी घटनेने कायदेशीर सत्ता उभी केलेली असते. ज्याला सरकार म्हणतात आणि त्या सरकारचे कोणी अधिकारी वा मंत्री आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करीत नसतात. त्यांच्या आदेश इशार्‍यावर काम करणारी प्रशासन नावाची यंत्रणा त्यासाठी उभी असते. त्यात पोलिस, सैनिक, सशस्त्र दल अशा लोकांचा समावेश होतो. ती जिवंत माणसांचीच यंत्रणा असते. त्यांनी आपल्या स्वातंत्र्य व अधिकाराचे रक्षण करावे ही अपेक्षा असते. कारण त्यासाठीच त्यांची योजना असते. ते संरक्षण करायचे म्हणजे तरी त्यांनी काय करायचे असते? त्यांनी त्यांचे जीव धोक्यात घालून तुमचे-आमचे जीव व स्वातंत्र्ये जपायची असतात.

थोडक्यात कुणीतरी तुमच्या-आमच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे प्राण पणाला लावायचे असतात. मुंबईत कसाब टोळी बेछूट गोळ्या घालत कोणाचाही जीव घेत होती, तेव्हा त्याला सामोरे जायला कोण पुढे सरसावलेले होते? ज्यांना आपण शहीद म्हणतो किंवा जे प्रतिकार करताना जखमी जायबंदी झाले, अशा सैनिकांनीच ते काम केलेले होते ना? मग आपण ज्याला विविध स्वातंत्र्ये म्हणतो, ती देणारा कायदा महत्वाचा नसून त्यांची जपणूक करणारा तो सैनिक महत्वाचा असतो. त्या घटनेसाठी, तिच्यात समाविष्ट असलेल्या तत्व व स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणार्‍यामुळे ही स्वातंत्र्ये अबाधित असतात. कधीतरी आपण त्यांना सन्मानाने वागवतो काय? शहीद म्हणून पुतळे उभारले वा श्रद्धांजली वाहिली, की आपले कर्तव्य संपून जाते. मुंबई-महाराष्ट्र वा आणखी कुठे आसाम तामिळनाडूचे घर कुटुंब सोडुन जम्मू काश्मिरच्या सीमेवर थंडीवार्‍यात दहशतवादी देशात घुसेल म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा देणार्‍या त्या माणसांच्या कष्टाचे मोल आपल्याला वाटले आहे काय? तेव्हा २६/११ च्या घटनेत केरळच्या उन्नीकृष्णनने आपले प्राण पणाला लावले, तो आपल्याला स्वातंत्र्य देत असतो. कारण तोच आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याचे प्राण पणाला लावत असतो. पण त्याचाच दुसरा अर्थ असा, की ज्या आपल्या स्वातंत्र्यासाठी आपणच काहीही पणाला लावायला सज्ज नसतो, त्यासाठी अशी माणसे निर्भेळ मनाने त्यांचे सर्वस्व पणाला लावत असतात. म्हणूनच आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो, त्याचे खरे दाते असेच लोक असतात. आपल्याला त्याची किती कदर असते? आपण त्याविषयी किती कृतज्ञ असतो? जे स्वातंत्र्य व सुरक्षितता आपण कायद्याने गृहीत धरलेली आहे, ती कोणामुळे उपभोगता येते, त्याची साधी जाणिव तरी आपल्यामध्ये असते काय? उलट असे आपल्या स्वातंत्र्याचे दाते वा रक्षक केवळ मरण्यासाठीच जन्माला आलेत, इतकी तटस्थता आपल्यात मुरलेली नाही काय? ज्यांनी त्यांचे जीव पणाला लावण्यावर आपले जगणे वा स्वातंत्र्य अवलंबून आहे, त्याच्या एखाद्या चुकीला पोटात घालण्याचे तरी औदार्य आपण दाखवतो काय?

जनरल मुशर्रफ़ यांनी लष्करप्रमुख म्हणून सत्ता बळकावल्यानंतर देशाची घटनाच गुंडाळून ठेवली आणि तिथल्या कोर्टालाही त्यांच्यापुढे शरणागत व्हावे लागले. जगातल्या अनेक देशातल्या हुकूमशाहीपुढे तिथल्या बुद्धीमत्तेसह कायदेशीर स्वातंत्र्यालाही शरणागत व्हावे लागते. कारण त्यांच्या सुरक्षेला शस्त्र हाती घेऊन प्राण पणाला लावणारा कोणीच उभा नसतो. तिथे अशा तमाम स्वातंत्र्यांची राजरोस पायमल्ली होते. आपल्या देशात होऊ शकत नाही, कारण इथे त्याच स्वातंत्र्याच्या जपणूकीसाठी आपापले जीव पणाला लावणारा सैनिक आहे. पोलिस वा रक्षक दले सज्ज आहेत. त्यांच्यावर कुठलेही आरोप आपण करतो आणि त्यांच्या इवल्या चुकीचेही गुन्हेगारासारखे तपास करतो. तो अधिकार आपल्याला त्यांनीच दिलेला असतो. कारण ते सैनिक, पोलिस त्यांचे जीव ज्या झेंड्यासाठी, कायद्यासाठी पणाला लावतात, त्यातून कायद्याचे राज्य उभे रहात असते. मग जेव्हा त्यांच्यावरच आरोपांची सरबत्ती होते आणि त्यांचे मनोधैर्य खच्ची होते, तेव्हा प्रत्यक्षात तो सैनिक वा पोलिस निकम्मा होत नसतो. आपल्याला सुरक्षा व स्वातंत्र्य बहाल करणारी इर्षा व उर्जाच निकामी होऊन जात असते. कायदे नियमांच्या शब्दावर बोट ठेवून आपण जेव्हा अशा लोकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतो, तेव्हा आपण कोणावर हल्ला करत असतो? आपल्याच स्वातंत्र्याच्या बळावर, शक्तीवर हल्ला करून तिलाच क्षीण करत नसतो का? पोलिस-सैनिक वा कायद्याची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा उभी आहे, तेच लोकशाही म्हणून आपले बलस्थान असते. मग तिच्यावरच उठसुट होणारे आरोप व बदनामीतून आपण आपल्याच बलस्थानावर हल्ला चढवित नसतो काय? पर्यायाने आपण कोणाचे हात बळकट करीत असतो? खोट्या चकमकी वा अन्य आरोपतून कोणाचे हात बळकट होतात आणि कोणाचे मनोधैर्य खच्ची होते? याचा विचारच होत नाही, तिथली कुठलीही स्वातंत्र्ये अबाधित राहू शकतील काय? आपल्या स्वातंत्र्याचे रक्षणकर्ते असतात, त्यांच्यावरच मागून आपणच हल्ले करणार असू, तर समोरच्या शत्रूशी त्यांनी लढावे कसे?

कायदा व राज्यघटनेने आपल्याला विविध स्वातंत्र्ये जरूर दिली आहेत. पण त्यांचे रक्षणकर्ते त्यांचे प्राण पणाला लावत असतील, तोपर्यंतच आपण त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकू. कारण वास्तवात तेच आपल्याला स्वातंत्र्ये उपभोगू देत असतात. अगदी त्यांनाच अपमानित करायचे, त्यांच्यावर दगडधोंडे मारण्यापासून त्यांच्यावरच खटले भरण्याचाही अधिकार त्यांच्यामुळेच आपल्याला मिळालेला असतो. काही लोक जीवावर उदार झालेत, म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगू शकतो. अन्यथा अराजकात आपण सर्वच अधिकारांना वंचित होत असतो. कधीतरी असा विचार सुरू होईल का? की आपल्या स्वातंत्र्यासाठीच मरायला जन्म घेतलेले ते आपले गुलाम असतात, अशी आपली समजूत आहे?

 (खुसपट)  मी मराठी  (२१/३/२०१५)