Monday, March 16, 2015

न्या. काटजूंचा बोलविता धनी कोण?



राजकारण, समाजकारण वा सरकारी नोकरी अशा फ़ंदात अरविंद केजरीवाल पडले नसते, तर त्यांचे काय झाले असते, त्याचे उत्तर म्हणून आपण न्यायमुर्ति मार्कंडेय काटजू यांच्याकडे बघू शकतो. कारण दोन्ही व्यक्तींमध्ये एक दाट साम्य आहे आणि ते ‘नजरेत भरणारे’ आहे. दोघांनाही प्रसिद्धीचा भयंकर सोस आहे आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची दोघांची तयारी असते. किंचित फ़रक असेल, तर तो शैलीचा आहे. केजरीवाल अत्यंत शहाजोग व मानभावी आहेत, तर काटजू कमालीचे उर्मट-उद्धट आहेत. बाकी दोघांच्या उक्ती कृतीमध्ये जबरदस्त साम्य साधर्म्य आहे. काही काळ आपल्याकडे लोकांचे दुर्लक्ष झाले अशी जाणिव झाली, मग ते अस्वस्थ होऊन जातात आणि लक्ष वेधून घेण्यासाठी कुठल्याही थराला जातात. अर्थात केजरीवाल एक संघटना चालवत असल्याने व तिच्याशी कित्येक लोकांचे भवितव्य जोडलेले असल्याने, त्यांच्या कृतीचे उक्तीचे गंभीर परिणाम संभवतात. काटजू यांचे तसे नाही. ते एकांडे शिलेदार आहेत आणि पुर्वायुष्यात सुप्रिम कोर्टाचे न्यायमुर्ति राहिलेले असल्याने त्यांनी शहाण्यासारखे बोलावे वागावे अशी लोकांची अपेक्षा आहे. पण ती पुर्ण करण्याचे त्यांच्यावर बंधन नाही, की त्यामुळे कोणाचे नुकसान व्हायची शक्यता नाही. म्हणूनच त्यांची फ़ारशी दखल कोणी घेत नाही. केजरीवाल मात्र सतत प्रसिद्धीच्या झोतात रहातात. सध्या काटजू यांनी गेल्या काही वर्षात आपल्या उपटसुंभ उक्तींनी माध्यमात जागा संपादन केली आहे. कधी संजय दत्तला शिक्षा माफ़ करण्याचा विषय असेल, तर कधी न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मामला असेल. निषेधासाठी का होईना, त्यांनी लोकांना आपल्याकडे वळायला भाग पाडलेले आहे. मात्र अशी ख्याती झाल्यावर लोकांनी त्यांच्याकडे पाठ फ़िरवणे स्वाभाविक होते. तसे झाले, मग काटजूंना अधिकच खुळेपणा करणेही भाग नाही का?

तसे बघितले तर बुद्धीने हुशार असूनही तारतम्य सुटलेला हा विदवान आहे. त्यामुळे त्याचे हसे होऊन जाते. कायद्यासह संस्कृत पंडित अशी त्यांची ओळख आहे. शिवाय अत्यंत बुद्धीमान अशा पुर्वजांचा वारसा त्यांना लाभलेला आहे. पण त्या वारश्याला शोभणारे वर्तन मात्र मार्कंडेय यांच्याकडून सहसा झालेले नाही. सत्ताधार्‍यांच्या जवळ राहून काही लाभ पदरात पाडून घेण्यात ते यशस्वी झाले, तरी त्यांना अपेक्षा होती, तितके लाभ मिळू शकलेले नाहीत. म्हणूनच त्यांनी उफ़राटे बोलण्यातून लक्ष वेधण्याकडे वाटचाल केलेली असावी. जगावेगळे आपण एकमेव शहाणे आहोत आणि बाकी अवघे जग निर्बुद्ध आहे, अशा थाटात काटजू आपले मतप्रदर्शन करत असतात. त्याच दिशेने वाटचाल करताना त्यांनी आता महात्मा गांधींना ब्रिटीशांचा तर नेताजी सुभाषबाबूंना जपानचा हस्तक ठरवण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे संसदेला त्यांच्या निषेधाचा ठराव करणे भाग पडले. अर्थात त्याचा या गृहस्थांवर काही परिणाम होण्याची शक्यता नाहीच. कारण परिणाम त्यांना ठाऊकच होते आणि तेच साधण्यासाठी त्यांनी असे भडक चिथावणीखोर विधान केलेले होते. मुद्द इतकाच, की माध्यमांनी व जाणत्यांनी अशा खुळचटपणाला इतके महत्व द्यायचे कारणच काय? त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही काय? म्हणजे आताच नव्हेतर मागल्या काही वर्षात हा माणूस जितका बेताल बडबडतो आहे, त्याच्या निरर्थक बाष्कळ उक्तींना इतकी प्रसिद्धी देणार्‍यांना शहाणे म्हणता येईल काय? कॉग्रेसचे नेते प्रवक्ते दिग्विजय सिंग अत्यंत बेछूट खुळचट विधाने करीत असतात. ऐकणार्‍यालाही त्यात तथ्य नाही हे कळते. मग माध्यमांनी त्याचा इतका गाजावाजा करण्यातून काय साधले जाते? अशा बकवास विधानांना माध्यमांनी किती महत्व द्यावे, याचे काही ताळतंत्र असायला नको काय? की कुठलेही बेताल विधान ही ब्रेकिंग न्युज असते?

काही वर्षापुर्वी मुंबईच्या उपनगरीय रेलगाड्यांमध्ये एक माणुस अशीच गांधींजींची टवाळी केल्यासारख्या नकला करायचा. ‘जिसने खुद कभी टोपी नही पहेनी और दुनियाको गांधी टोपी पहनायी’ अशी टवाळी करायचा. कुठल्या वृत्तपत्राने वा पत्रकाराने त्याची बातमी बनवली नव्हती. कारण ती बातमीच नव्हती. अशी बेताल बडबड करणारे समाजात खुप असतात. त्यांची दखल घेण्यात शहाणपणा नसतो. तसे केल्यास तो मुर्खपणा अधिक लोकांपर्यंत जाऊ शकतो आणि नसत्या भानगडी सुरू होतात. म्हणून त्यांचा उल्लेखही केला जात नाही. हे शहाणपण आजची माध्यमे पुरती विसरून गेली आहेत. त्याचाच लाभ काटजू आ दिग्विजय सिंग यासारखे लोक उठवत असतात. त्यातून मग केजरीवाल सारखे कोणी राजकीय पक्षही उभा करू शकतात. दहशतवादी आपला धाक समाजात निर्माण करू शकतात. त्याचा दोष काटजूना किती द्यायचा आणि त्यांना इतकी अनैतिक प्रसिद्धी देणार्‍यांना किती दोषी मानायचे; हे एकदा ठरवले गेले पाहिजे. आताही काटजू यांनी जे काही बेताल विधान केले आहे, ते त्यांच्या ब्लॉगवरचे आहे. किती लोक त्यांचा ब्लॉग वाचतात? तुलनेने नगण्य संख्या असेल. पण त्याच्या लक्षावधी पटीने लोकांना माध्यमांनी त्या ब्लॉगकडे वळवले आहे. याचा अर्थ इतकाच, की काटजूंनी जितकी गांधींची बदनामी केलेली नसेल, त्याच्या हजारो पटीने माध्यमातून राष्ट्रपित्याची हेटाळणी माध्यमांनी केली, असेच होत नाही काय? मग एक प्रश्न असा पडतो, की या माध्यमांना गांधींच्या प्रतिष्ठेची काळजी असते की त्यातून खळबळ माजवण्यासाठी गांधींची प्रतिष्ठाही फ़डतूस वाटत असते? आपण काटजूंच्या दुष्ट हेतूला हातभार लावतोय, याचे भान ज्यांना नसते, असे लोक माध्यमे हाताळण्यास योग्य असू शकतील काय? दोष काटजूंना द्यायचा तर माध्यमांना का नाही?

गेल्या दोनचार वर्षात ज्याप्रकारे बेताल गोष्टींना वारेमाप प्रसिद्धी देताना नुसती खळबळ उडवणे हा माध्यमांचा हेतू बनला आहे. त्यांची काटजू ही गरज बनली आहे. कुठल्याही बिनबुडाच्या गोष्टी व गावगप्पांना ब्रेकिंग न्युज म्हणून अफ़ाट प्रसिद्धी देण्याच्या मागे माध्यमे धावत सुटली आहेत, त्यातून दिग्विजय सिंग. काटजू व केजरीवाल उदयास आलेले आहेत. खोटे आरोप करायचे आणि त्याबद्दल कोर्टाने पुरावे मागितले, तर कोर्टावरही उलट आक्षेप घेणार्‍या केजरीवालना हुतात्मा बनवण्याचा दिवाळखोरपणा माध्यमांचा नाही काय? जितक्या अगत्याने गडकरी यांच्या आरोपांना प्रसिद्धी दिली जाते, तितकी केजरीवालनी माघार घेतल्यावर बातम्या दिल्या जातात काय? मग काटजूंना गुन्हेगार कशाला मानायचे? माध्यमातील बेताल बातम्यांसाठी कच्चा माल पुरवणारे असे लोक निर्माण झालेत. काटजू त्याचे बळी म्हणता येतील. मग कोणी कोणावर दोषारोप करायचे? लेखन वा अविष्कार स्वातंत्र्य म्हणून जो बाष्कळपणा चालतो, त्यालाच बुद्धीवाद समजून जो पोरकटपणा प्रतिष्ठीत करण्यात आलेला आहे, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. त्यात एकट्या काटजूंना बाजूला काढून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे काहीही कारण नाही. आजच्या दिवाळखोर माध्यमांनी अशी बेछूट अवलाद पैदा केलेली आहे. म्हणूनच लगाम लावायचा असेल, तर अशा बेताल विधाने, आरोप वा कृतीला लावणे अगत्याचे आहेत. स्वातंत्र्य म्हणून स्वैराचार मोकाट होऊन प्रतिष्ठा पावला आहे. त्याला लगाम लावला पाहिजे. मग मुळातच काटजू उदयास येणार नाहीत. त्यावरून काहुर माजवण्यची वेळ आपोआपाच येत नाही. आजही लाखो लोक ब्लॉग लिहीतात, त्यातल्या बेतालपणाला प्रसिद्धी मिळत नाही, म्हणून त्यावर काहूर माजत नाही. काटजूंवर माजते कारण त्यांना माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिलेली असते. मग दोषी वा गुन्हेगार कोण? काटजूंचा बोलविता धनी कोण?

2 comments:

  1. जो मनुष्य सार्वजनिक रित्या महिलांविषयी काहीही बोलतो, त्याच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे हे मिडीयाला कळेनासे झाले आहे. सनसनाटी निर्माण करणे आणि टिआरपी वाढवणे हाच त्यांचा धंदा झाला आहे.
    या काटजूच्या प्रकरणात मिडीयाला सुद्धा दोषी धरले पाहिजे.

    ReplyDelete
  2. Balasaheb nehmi mhanayche
    Jayjaykar kaan bighadavto
    ani to nahi eiku aala ki manus baichen hoto!

    ReplyDelete