Thursday, March 5, 2015

तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती



हे शिर्षक नाही. हा एक असा आरोप आहे, जो आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतो. प्रामुख्याने तुम्ही सार्वजनिक जीवनात वावरत असाल, तर कधीतरी हे वाक्य कानी येतेच. अगदी सहजगत्या आपले परिचित मित्रही असे बोलून जातात. आपणही चपापतो. मला अलिकडे असे अधूनमधून ऐकायला मिळत असते. पत्रकार म्हणून जे काही लिहीतो, त्यावरून मग वाचक वा मित्रही मला हे ऐकवतात. थोडक्यात मी त्यांचा अपेक्षाभंग केला, असे त्यांना सुचवायचे असते. असा कोणता मी अपेक्षाभंग केलेला असतो? मीच कशाला, तुमच्या कोणाच्या वाट्याला असे वाक्य आलेच तर समोरच्याचा तुम्ही कोणता अपेक्षाभंग केलेला असतो? प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकते. पण मुळात त्यातून बोलणारा काय सुचवत असतो? तर तुम्ही अपेक्षाभंग केलेला आहे, म्हणूनच तुम्ही एकप्रकारचे गुन्हेगार आहात. चटकन हे वाक्य ऐकायला निरूपद्रवी वाटेल. पण तसे नाही. ते तुमच्या मनात अपराधगंड निर्माण करीत असते. आपण काहीतरी चुक केली, गुन्हा केला असे आपल्याला त्यामुळे वाटते. आपण असे काय केले, की समोरच्याचा अपेक्षाभंग व्हावा, असे आपण मनातल्या मनात विचार करू लागतो. पण त्याची दुसरी बाजू अशी, की त्याने तुमच्याकडून बाळगलेल्या अपेक्षा पुर्ण करता आल्या नाहीत, याचा एक न्युनगंड आपल्या मनात उदभवतो. इतक्या सहजगत्या हे होऊन जात असते, की त्याने अपेक्षा बाळगल्याच कशाला, असा प्रश्नही आपल्या मनाला शिवत नाही. जाणिवपुर्वक आपण एखादी चुकीची गोष्ट केलेली असेल, तर मनात अपराधी भावना उदभवणे गैर नाही. पण ज्याच्या कोणाच्या तोंडी असे वाक्य असते, त्याच्या अपेक्षांचा बोजा आपल्यावर कशाला? त्याने तशा अपेक्षा परस्पर केल्या असतील, तर त्याला आपण कसे जबाबदार असू शकतो? त्याला अशा अपेक्षा बाळगण्याचा अधिकार कोणी दिला? आपण तर दिलेला नसतो. म्हणजेच त्याने परस्पर कुठल्या अपेक्षा आपल्याकडून बाळगलेल्या असतील, तर ती त्याची चुक वा त्याचा गुन्हा असतो. पण आरोप मात्र आपल्यावर करत असतो.

उदाहरण म्हणून आपण आजचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे बघूया. हा माणुस मागले दिड वर्ष पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होता. तेव्हा तो कसा व कोणत्या कारणसाठी देशाचे नेतृत्व करायला लायक नाही, यावर प्रदिर्घ उहापोह चालू होता. असा दावा करणारेच आज अनेक बाबतीत त्याच मोदींकडून अशी अपेक्षा नव्हती, असे दावे सर्रास करीत असतात. हा उफ़राटा प्रकार नाही काय? जो माणूस पंतप्रधान होऊ शकणार नव्हता आणि त्यासाठी लायकही नव्हता, त्याने मुळात तिथपर्यंत मजल मारली; हाच त्याच्यावर टिकेची झोड उठवणार्‍यांचा अपेक्षाभंग नव्हता काय? तिथेच अशा भाष्यकार टिकाकारांच्या अपेक्षा मोदींनी पुर्ण केल्या नसतील, तर मग त्यांच्याकडून इतर अपेक्षा या लोकांनी कशाला बाळगल्या? म्हणजेच चुकीच्या अपेक्षा मोदींकडून बाळगणे ही चुक असेल, तर अशा टिकाकारांचा तो गुन्हा असतो. पण पुन्हा तेच मोदींच्या डोक्यावर आपल्या चुकीच्या अपेक्षांचे खापर फ़ोडताना म्हणतात, ‘मोदींकडून अशी अपेक्षा नव्हती’. इथे यातली लबाडी लक्षात घ्यायला हवी. मुळात मोदीसारखा माणूस देशाचे वाटोळे करणार हीच अपेक्षा होती, तर आज त्याच्याकडून काही गैर होत असेल, तर तो टिकाकारांची अपेक्षा पुर्ण करत असतो ना? मग त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे बोलणे निव्वळ भामटेगिरी नाही काय? पण हे असेच चालू असते. त्याचे बळी केवळ मोदीच नसतात. कमीअधिक प्रमाणात आपण सगळेच अशा वाक्याचे बळी असतो. कधी ना कधी आपल्याही वाट्याला असे वाक्य येतच असते. त्यामागे एक धुर्त चाल असते. अकारण तुमच्या मनात अपराधगंड निर्माण करून तुम्हाला दबावाखाली ढकलण्याची ती खेळी असते.

जर तुमच्या काही अपेक्षा माझ्याकडून असतील, तर त्या बोलून दाखवल्या पाहिजेत आणि त्या मी स्विकारल्या, तर अपेक्षाभंगाचा मी गुन्हेगार असू शकतो. मनातल्या मनात तुम्ही काही गृहीत धराल आणि त्याची पुर्तता माझ्याकडून होत नसेल, तर त्याला मी कशाला जबाबदार असेन? अर्थात काही अपेक्षा गृहीतच धरलेल्या असतात आणि त्या चुकीच्या म्हणता येणार नाही. डॉक्टर, वकील वा शिक्षक, पोलिस असे काही पेशे आहेत, जिथे तुम्ही योग्य तेच कराल अशी अपेक्षा गृहीत असते. ते गृहीत म्हणजे तुमच्यावरचा विश्वास असतो. परस्परांशी सभ्यपणे वागणे, ही अपेक्षा गैरलागू नाही. पण त्याच्यापलिकडे बहुतेक अपेक्षा गैरलागू असतात. कारण नागरिक म्हणून जगताना जितक्या अपेक्षा असाव्यात, त्यापेक्षा दुसर्‍याकडून अधिक अपेक्षा परस्पर बाळगण्याचा इतरांना अधिकारच नसतो. तेव्हा अपेक्षाभंगाचे दुसर्‍याच्या माथी खापर फ़ोडणे, हीच मुळात लबाडी असते. मी काय कोणाच्या बाजूने लिहावे किंवा बोलावे ते अन्य कोणी गृहीत धरले, तर त्याच्या अपेक्षा मी कशाला पुर्ण करायच्या? मला जे सुचते वा वाटते तेच मी लिहीत असतो. ज्यांना आवडेल वा वाचनीय-उपयुक्त वाटेल, ते स्विकारतील. नावडेल ते दुर्लक्ष करतील. कोणाला आवडण्यासाठी मी लिहू लागलो, तर मला माझे मत मांडण्याची मुभाच उरत नाही. सहाजिकच मी अमूकतमूक लिहावे अशी अपेक्षा कोणी बाळगली असेल, तर तो माझ्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणत असतो. तो त्याचा गुन्हा वा चुक आहे. त्याचा बोजा माझ्यावर असायचे काही कारण नाही. त्यांची पुर्तता करायलाही मी बांधील असू शकत नाही.

पण सहसा आपल्याला असे ऐकावे लागते. त्यामागचा हेतू लक्षात घ्यायला हवा. सर्वमान्य अशी जी गृहीते असतात, त्याच्यापलिकडे कोणी अपेक्षाभंग झाल्याचा दावा करत असेल, तर तो मुर्ख तरी असला पाहिजे. किंवा जाणिवपुर्वक भामटेगिरी करतो असे मानायला हरकत नाही. भामटेगिरी अशासाठी म्हणायचे, की त्यातून त्याला तुमच्या मनात अकारण अपराधगंड जोपासायचा असतो. जो गुन्हाच नाही, तो तुमच्याकडून घडला असल्याचे तुमच्या मनावर बिंबवण्याचा कुटील हेतू अशा विधानामागे असतो. एकदा असा अपराधगंड मनात जोपासला गेला, मग तुम्ही त्याच दबावाखाली कुठल्याही गैरलागू अनाठायी गोष्टींना मान तुकवू लागता. अशा अपराधगंडाच्या अदृष्य शृंखलांनी तुमचे स्वातंत्र्य जखडता येत असते. कुठल्याही धार्मिक वा पाखंडी सत्तेची तीच खरी ताकद असते. सामान्य माणसाच्या निरागस मनामध्ये अपराधी भावना जोपासली, मग त्याच्या गळी कुठलेही पापकृत्य उतरवायला किंवा तशी कृती करायला सोपे जात असते. त्यातून त्याच्या स्वयंभू विचारशक्तीला खच्ची करून वस्तुप्रमाणे त्या व्यक्तीला खेळवणे शक्य असते. विवेकाचा तिथे पहिला बळी पडत असतो. त्याची सुरूवात अशी अगदी अलगद होत असते. तुमच्यासारख्याने असे बोलावे, लिहावे? हा आरोप म्हणूनच दगाबाज असतो. म्हणूनच कोणी असे वाक्य तुमच्या तोंडावर फ़ेकले, तर बिचकण्याचे अजिबात कारण नाही. उलट त्यालाच ऐकवावे, तुझ्याकडूनही अशा शब्दांची अपेक्षा नव्हती. त्याने आपल्यावर सोडलेल्या अपराधगंडाच्या बाणाने घायाळ होण्यापेक्षा, तोच त्याच्या अंगावर परतून लावा. बघा, कसे मस्त मुक्त वाटेल.

4 comments:

  1. Wisdom,your make is Bhau Torsekar.

    ReplyDelete
  2. भाऊ ब्लॉग एकदम पर्सनल झाला.

    ReplyDelete
  3. Mala hich apexa hoti ...
    Konachya apexa aamhi ka purn karaychya???
    To aamchya SWATANTRYA vr gada asu shakat nahi ka????

    ReplyDelete