Wednesday, March 18, 2015

संघवाल्यांनी रिबेरोंचे आभार मानावेत



Christians have consistently punched above their weight — not as much as the tiny Parsi community, but just as noticeably. Education, in particular, has been their forte. Many schools, colleges, related establishments that teach skills for jobs have been set up and run by Christians. They are much in demand. Even diehard Hindus have sought admission in such centres of learning and benefited from the commitment and sincerity of Christian teachers. Incidentally, no one seems to have been converted to Christianity, though many, many have imbibed Christian values and turned “pseudo-secularist”.   - Julio Ribeiro

रिबेरो साहेबांनी कसे नेमके दुखण्यावर बोट ठेवले आहे. पण त्याला दुखणे न म्हणता, त्यालाच ते भारतीयत्व ठरवू बघतात, ही खरी समस्या आहे. स्युडो सेक्युलर म्हणजे काय असते? जे धर्मांतर करत नाहीत, पण त्यासाठी भाडोत्री लढवय्ये होतात. हिदूत्ववाद्यांची ही खरी तक्रार संघ वा त्यांच्या संघटनांनाही समोर आणता आलेली नाही, इतके स्युडो सेक्युलरांना रिबेरोंनी उघडे पाडले आहे ना, या एका परिच्छेदातून? उपरोक्त परिच्छेदाच्या अखेरीस रिबेरो काय कबुली देतात? ख्रिश्चन मिशनर्‍यांनी चालविलेल्या शाळा कॉलेजात जाऊन शिक्षण घेताना अनेकांनी ख्रिश्चन जीवनमूल्ये आत्मसात केली आणि ते ‘स्युडो सेक्युलर’ झाले. ही काय भानगड आहे? स्युडो सेक्युलर याचा भारतीय अर्थ दांभिक धर्मनिरपेक्ष. चर्चच्या अंतर्गत चालणार्‍या शिक्षणसंस्थांनी इथल्या जाणत्यांना आपली मूळची जीवनमूल्ये झिडकारण्यास शिकवले, असाच त्याचा अर्थ होत नाही काय? त्यांनी ख्रिश्चन धर्ममूल्ये आत्मसात केली आणि ते स्युडो सेक्युलर झाले. हा शब्द कोणासाठी वापरला जातो? जे म्हणून कोणी केवळ हिंदू धर्म व त्याच्या संस्कारावर जहरी टिका करून अन्य धर्माच्या चालिरितींना पाठीशी घालण्याचे बहुमोल कार्य आज करतात, त्यांनाच स्युडो सेक्युलर म्हटले जाते ना? यातला कोणी कधी इस्लामिक दहशतवाद, हिंसा यावर तोंड उघडून बोलणार नाही. जेव्हा कुठे घरवापसी असे धर्मांतराचे हिंदूत्व पुरस्कत कार्यक्रम चालतात, तेव्हा हलकल्लोळ करणारे त्याच पंथात मोडतात. कुठे लव्हजिहादचा विषय आला, मग त्यावर प्रेमाचे पांघरूण घालायला हिरीरीने पुढे येतात, त्यांना स्युडो सेक्युलर म्हणतात ना? आदिवासी भागात जाऊन विविध आमिषे दाखवून धर्मांतराचे उद्योग चालतात, तेव्हा त्याला ख्रिस्ती धर्माचा घटनात्मक अधिकार ठरवायला ‘हिंदू’ विचारवंत म्हणून पुढे येतात, त्यांना स्युडो सेक्युलर म्हणतात ना? रिबेरो कोणाविषयी बोलत आहेत? कुठला धर्मांतरीत जितक्या आक्रमकपणे हिंदुत्वाच्या विरोधात बोलत नाही, तितक्या आवेशात कोण बोलताना दिसतात? ज्यांच्यावर स्युडो सेक्युलर असा आरोप होतो, तेच ना? त्यातून इथल्या ख्रिस्ती शाळा व शिक्षणसंस्था कोणते महान कार्य करत आल्या, त्याचीच साक्ष रिबेरो देत नाहीत काय? आजही खुद्द रिबेरो किंवा तत्सम कधीकाळी धर्मांतर केलेल्यांचे आजचे वंशज वारस जितके आपल्या मूळ हिंदूत्वाच्या वारसा व जीवनमूल्याच्या विरोधात आवाज उठवणार नाहीत, तितक्या तावातावाने स्युडो सेक्युलर शहाणे बोलताना दिसतील. आणि तेच काम कोणी केले म्हणतात रिबेरो?

संघवाले किंवा कुणी हिंदू संघटनांनी कधी चर्चच्या गुन्ह्यावर इतके नेमके बोट ठेवलेले नाही. आज स्वत:ला हिंदू म्हणवणारे व त्याच धर्माच्या जीवनशैली व मूल्यांसाठी झगडणारे आहेत, त्यांना सर्वात मोठी अडचण आपल्याच दिखावू हिंदू स्युडो सेक्युलर शहाण्यांकडून होत असते. जे दिसायला हिंदू असतात, पण आपल्याच धर्माच्या विरोधात लढायला कंबर कसून उभे रहात असतात. त्यासाठी रिबेरो किंवा कुणा फ़ादर मौलवीला समोर यावेच लागत नाही. ती जबाबदारी घेतल्यासारखे स्युडो सेक्युलर मैदानात उतरलेले आपण बघतो. पण जेव्हा प्रसंग उलटा असतो, तेव्हा यातला कोणीही उलट्या बाजूने आपण हिंदू असल्याने घाबरलो आहोत वा आपल्या जीवाला धोका असल्याचे बोलायला पुढे येत नाही. कुठे हिस्सारच्या चर्चवर दोन दगड पडले, तर बॉम्बस्फ़ोट झाल्यासारखा कल्लोळ रिबेरो करीत नाहीत. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त असे पत्रकार करू लागतात. पण गोध्रा येथे धावत्या गाडीच्या रेलडब्याला आग लावून साठ निष्पाप जीवांचे बळी घेतले जातात, तेव्हा यापैकी कोणी एक स्युडो सेक्युलर छाती बडवून आक्रोश करताना दिसणार नाही. कारण या देशातील हिंदू जीवनशैली व जीवनमूल्य संपुष्टात आणण्याची तर खरी लढाई आहे आणि ती कुठल्याही मार्गाने होत असेल, तर तिचे समर्थनच हे लोक करणार. ज्यांना रिबेरो स्युडो सेक्युलर अशी उपाधी देतात. तीच उपाधी संघवाले व हिंदूत्ववादीही देत असतात. ती उपाधी संघवाल्यांनी दिलेली असली, तरी तसे भाडोत्री लढवय्ये निर्माण करण्याचा आरोप मिशनरी वा चर्चवर संघाने कधीच केलेला नव्हता. मात्र आवेशात बोलताना रिबेरो मात्र सत्यकथन करून गेले आहेत. चर्चच्या शिक्षण संस्था धर्मांतर करवित नाहीत, तर त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करू शकणारे कुशल कामगार तयार करतात, असाच रिबेरो यांचा दावा नाही काय? खरे तर या लेखातून त्यांनी संघाच्या अस्पष्ट आरोपाला वा संशयाला दुजोराच दिलेला आहे.

इस्लामच्या इतिहासात मक्केच्या अबु तालीबने तशी महत्वपुर्ण भूमिका पार पडली होती, ज्याला रिबेरो स्युडो सेक्युलर म्हणतात. इस्लामच्या इतिहासामध्ये प्रेषित महंमदाला मक्का सोडून हिजरत करावी लागली आणि त्यांनी मदिनेला आश्रय घेतला, हे आपण ऐकत असतो. पण तसे कशामुळे झाले? तर आपल्या नव्या धर्माच्या प्रसारासाठी महंमद मक्केतील प्रस्थापित धर्माची निंदा करीत होते आणि त्यामुळे तिथले मुळ धर्माचे श्रद्धाळू अस्वस्थ झालेले होते. त्यांचे प्रेषितांशी खटके उडायचे आणि हाणामारीचेही प्रसंग येत. अशा वेळी महंमदांचे चुलते अबु तालिब मध्यस्थी करून पुतण्याला पाठीशी घालायचे. त्याची तरफ़दारी करायचे. ते मक्केतील प्रतिष्ठीत गृहस्थ असल्याने त्यांच्या शब्दांना वजन होते. मात्र इतके करून स्वत: अबु तालिब कधी मुस्लिम झाले नाहीत, की त्यांनी आपल मूळ धर्म सोडला नाही. त्यांच्या अशा ऐतिहासिक कार्यामुळे इस्लामच्या प्रसार प्रचाराला बहुमोल हातभार लागला होता. पुढे मदिनेत इस्लामची पहिली सत्ता प्रस्थापित झाल्यावर पुतण्याला काकाच्या मदतीची गरज उरली नाही. असा इतिहास आहे. काहीशी तशीच स्थिती आज भारतात आपण स्युडो सेक्युलर लोकांमध्ये बघू शकतो. अबु तालिब म्हणजे पलिकडून हल्ला आला मग लढणारी पहिली फ़ळी. जी मध्यस्थाच्या भूमिकेत असल्याचे भासवत असते. पण प्रत्यक्षात एका बाजूची पक्षपाती असते. मिशनरी शिक्षण संस्थांनी इथे भारतीय जीवनमूल्याविषयी न्युनगंड निर्माण करण्याचे काम उभे केले. ज्यांना शिकवले कुशल बनवले असा रिबेरो यांचा दावा आहे, त्यांना पद्धतशीरपणे आपली जीवनमूल्ये हीनदर्जाची असल्याचे आणि ख्रिश्चन धर्मतत्वे महान असल्याचे डोक्यात घालण्याचे काम केले. धर्मप्रसार म्हणजे तरी काय असते?

ख्रिश्चन धर्ममार्तंडांनी क्रुसेड चालविताना केलेला अमानुष अत्याचार वा हिंसेचे थैमान, यातली कुठली शिक्षणसंस्था धर्ममूल्य म्हणून आपल्या विद्यार्त्यांना शिकवत असते काय? ज्याला ख्रिश्चन जीवनमूल्ये असे रिबेरो म्हणतात, त्यापासून क्रुसेडचा अमानुष हिंसाचार वेगळा असू शकतो काय? ज्या मानवतावादाच्या गप्पा रिबेरो मारतात, तसे संत व सेवाभावी महानुभाव भारतात व हिंदू समाजात झालेले नाहीत काय? विवेकानंद कसली जीवनमूल्ये शिकवित होते? अशा कित्येक ख्रिश्चन संस्था व शाळा कॉलेजातून महिलांचे लैंगिक शोषण झालेले आहे. त्याचे स्मरण रिबेरोंना कशाला होत नाही? मिशनरी जसे चांगले तसेच भयंकरही आहेत आणि त्याचीच प्रतिकृती इथे हिंदुत्ववादी संस्था संघटनांमध्ये दिसेल. आपल्यातल्या चांगल्याचा अगत्याने उल्लेख करायचा आणि दुसर्‍यातल्या फ़क्त वाईट वृत्तीचे दाखले द्यायचे, याला लबाडी म्हणतात. रिबेरो यांच्या एकूण लेखाचा सूरच कांगावखोर आहे. आजवर त्यांनी आपल्या कर्तबगारीने जी प्रतिष्ठा व लोकप्रियता संपादन केली, तिला असल्या पक्षपाती वर्तनाने व धर्मांध ढोंगबाजीचे तडा गेला आहे. यापुढे किती लोक त्यांच्याकडे धर्माच्या पलिकडे जाऊन एक भारतीय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बघतील याची शंकाच आहे. पण एक गोष्ट संघवाल्यांनी मान्य करायला हवी आणि त्यासाठी रिबेरो यांचे आभारही मानायला हवेत. रिबेरो यांनी ‘स्युडो सेक्युलर’ ही अवलाद ख्रिश्चन शिक्षण संस्था व शाळांनी पैदा केल्याची ठामपणे कबुली दिली आहे. ‘स्युडो सेक्युलर’ बुद्धीवादाचा मुखवटा रिबेरो यांनी टराटरा फ़ाडून टाकला आहे.

2 comments:

  1. तर्क आवडला ! बहुसंख्य हिंदू मध्यमवर्गीय( उजव्या राजकारण्यांसकट) अशा शाळांमध्ये आपल्या पाल्याला शिकवण्यास प्राधान्य देतात ते मुळात दांभिक असतात की त्या शाळांमध्ये शिकल्यामुळे दांभिक बनतात.

    ReplyDelete
  2. भारतात हिंदूंना दाबायचे आणि इतर धर्मांना चुचकारायचे हे तर गांधींच्या काळापासून चालू आहे. त्याला रिबेरो अपवाद नाहीत.

    ReplyDelete