Monday, March 2, 2015

पुरोगामीच आता प्रतिगामी होऊन गेलेत



"आगर्‍याजवळील फ़िरोझाबाद येथे आकस्मिकपणे जातीय दंग्याचा डोंब उसळून, त्यामध्ये आठ माणसांचे बळी पडले आणि सुमारे साठ माणसे जखमी झाली, हा वृत्तांत वाचल्यापासून आम्ही अत्यंत बेचैन झालो आहोत. एका माणसाने दुसर्‍या निरपराध माणसावर गावठी बॉम्ब फ़ेकून त्याच्या चिंधड्या उडवणे, अगर सुरा खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढणे सदगतीचा नि मोक्षप्राप्तीचा मार्ग होय, असे कुठल्या धर्माच्या खर्‍या तत्वज्ञानात सांगितले आहे कोण जाणे! पण धर्माच्या नावाने अशा प्रकारचे अत्याचार आपल्या देशात आजतागायत होत आहेत. या धर्मांधतेच्या राक्षसानेच अखेर आपल्या राष्ट्राची फ़ाळणी करून त्याची चिरफ़ाड केली, या फ़ाळणीपायी लक्षावधी निरपराध माणसांची भेसूर कत्तल झाली. असंख्य स्त्रियांच्या अब्रुची होळी झाली, कोट्यावधी माणसांच्या सर्वस्वाचा सत्यानाश झाला आणि अगणित माणसे देशोधडीला लागली. पण एवढी भयानक आहुती घेऊनही या राक्षसाचे अजून समाधान झाले नाही आणि तो देशात मिळेल त्या संधीची वाट पहात दबा धरून बसला आहे, असाच प्रत्येक जातीय दंग्याचा अर्थ आहे. म्हणून जातीय दंगा म्हटले- मग तो कुठल्याही कानाकोपर्‍यात असो- तो लहान असो की मोठा असो- आमच्या काळजात चर्र होते. हा राक्षस जोवर जिवंत आहे, तोवर हे राष्ट्र सुरक्षित नाही, त्याचे स्वातंत्र्य सुरक्षित नाही, लोकशाही सुरक्षित नाही, साधी माणुसकीदेखील सुरक्षित नाही. म्हणून या राक्षसाला थारा न देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचा नि:पात करून त्याला गाडून टाकणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण स्वराज्य मिळून बारा वर्षे होत गेली तरी हे होत नाही. ‘इश्वर अल्ला तेरे नाम, सबको सन्मती दे भगवान’, अशी भजने तारस्वरात आळवूनही हे होत नाही. आमची राज्यघटना निधर्मी आहे, असा अहोरात्र पुकारा करूनही हे होत नाही. हिंदु-मुस्लिम ऐक्यावर प्रवचने झोडूनही हे घडत नाही. कारण जातीय दंगे हे केवळ साध्यासुध्या माणसांच्या धार्मिक भावनांमुळे घडत नाहीत. या दंग्यांमागे संघटना असते, पद्धतशीर चिथावणी असते, पैसाही असतो. अशा दंग्यांमागे वरकरणी धर्मकारण असले तरी त्याच्या मू्ळाशी राजकारण असते. ब्रिटीश राजवटीने या देशातील स्वातंत्र्याच्या आंदोलनात दुफ़ळी माजवण्यासाठी या धर्मद्वेष्ट्या राजकारणाचा भरपूर उपयोग केला.

दंगे ज्या दंगलखोरांमुळे होतात, त्यांना शासन करून जनतेच्या नागरिक हक्कांचे रक्षण हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्याऐवजी दंगा टाळण्याच्या सबबीखाली वाद्यबंदीचा हुकूम काढणे हा चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचाच प्रकार आहे. जातीयवाद्यांपुढे सपशेल शरणागती स्वीकारण्याच्या या धोरणामुळे त्यांचे निर्मूलन होण्याऐवजी ते जास्तच माजल्याखेरीज रहाणार नाहीत. किंबहूना, सध्या नव्याने जो ऊत आला आहे, तो या देशातील जातीयवादी व धर्मांध गटांनी नव्याने उचल खाण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत, त्याचाच एक भाग आहे.

केरळातील कम्युनिस्ट सरकार उलथवून पाडण्यासाठी तेथील कॉग्रेसवाल्यांनी कॉग्रेसश्रेष्ठींच्या आशीर्वादाने राष्ट्रद्रोही मुस्लिम लीगवाल्यांशी तत्वशून्य जी युती केली, तिच्यामुळे देशभर मुस्लिम जातीयवाद्यांना नवे उत्तेजन मिळाले आहे. देशात ठिकठिकाणी लीगच्या शाखांचे पुनरूज्जीवन करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर आक्टोबरमध्ये लीगची अखील भारतीय परिषद भरवून या संघटनेचे कार्य पुन्हा देशभर सुरू करण्याचीही घोषणाही करण्यात आली आहे. ज्या मुस्लिम लीगच्या कारस्थानामुळे अखेर भारताची फ़ाळणी झाली, ती भारताच्या राष्ट्रीय जीवनात पुन्हा जातीयवादाचे विष फ़ैलावण्यासाठी नव्याने अवतार घेत आहे. जातीय नि धार्मिक तेढ हेच लीगचे एकमेव भांडवल आहे. त्यामुळे तिच्या पुनरूज्जीवनाची नांदी जातीय दंग्यांनी व्हावी यात नवल ते काय? या प्रतिगामी, लोकशाहीविरोधी नि देशद्रोही प्रवृतीला देशात पुन्हा थारा मिळता कामा नये; म्हणून सर्व शक्ती पणाला लावून झटणे हे राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकशाही नि समाजवाद यांच्याबद्दल निष्ठा बाळगणार्‍या मुस्लिम नागरिकांना देखील या जातीयवादी विचाराला प्रतिबंध करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे." २४

उपरोक्त तीन परिच्छेद मुद्दाम अशा एका जुन्या लेखातून घेतले आहेत, की नव्या कम्युनिस्ट व पुरोगाम्यांना आपलाच इतिहास कळावा. कारण हा लेख आजचा नाही तर तब्बल पंचावन्न वर्षे जुना आहे. तो कुणा हिंदू महासभा, रा. स्व. संघाच्या नेत्याने लिहीलेला नाही की सनातनच्या ताज्या अंकातला नाही. तो एका कम्युनिस्ट सहप्रवाशी अशी हेटाळणी झालेल्या दिग्गज संपादकाने लिहिलेला आहे. आज जे लोक शिवाजी खरा कोण होता, त्याचा शोध घेतल्याचे तावातावाने सांगायला पुढे सरसावलेले आहेत, त्यांना भारतातला ‘कम्युनिस्ट खरा कोण होता’, त्याचे तरी भान व ज्ञान आहे काय? असते तर साडेतीन चारशे वर्षे जुन्या इतिहासाचे हवाले देत बसण्यापेक्षा त्यांनी आपल्याच भारतातील पुरोगामी इतिहासाचा थोडा तपास केला असता. कॉम्रेड पानसरे यांची हत्या झाल्यावर जातीयवादाची घासून गुळगुळीत झालेली टेप वाजवण्यापेक्षा आपल्याच अंतरंगात थोडे डोकावून बघितले असते. १९६० सालात जेव्हा संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यासाठीच लढलेल्या सर्वपक्षीय समितीमध्ये फ़ुट पडली, त्याच काळात त्यापैकी एक नेते व दैनिक ‘मराठा’चे संपादक आचार्य अत्रे यांनी लिहीलेला हा अग्रलेख आहे. त्यात त्यांनी जातीयवादाला कॉग्रेस कशी चुचकारते आहे आणि ती कुठल्या राजकारणासाठी चुचकारते आहे, त्याचे दाखले दिले आहेत. कम्युनिस्टांचीच एकमेव केरळी सत्ता खच्ची करण्यासाठी कॉग्रेस पक्षाने मुस्लिम लीग या जातीयवादी पक्षाला हाताशी धरून कसले विष फ़ैलावण्याचे पाप देशात केले, त्याचा तो पुरावा आहे. त्यात कुठे हिंदूत्ववादी वा संघाचा उल्लेखही आढळत नाही. त्याही काळातले कम्युनिस्ट साहित्य व विवेचन संघाच्या नावाने खडे फ़ोडताना दिसत नाही. कारण तेव्हा तमाम पुरोगामी आजच्या भाजपाच्या भाषेत मुस्लिम जातीयवाद व मुस्लिम लीगवर खापर फ़ोडत होते. मात्र आज तेच कम्युनिस्ट व समाजवादी त्याच मुस्लिम जातीयवादाला जोजवत अंगाईगीते गाताना दिसत असतात. मतांच्या राजकारणासाठी तेव्हा कॉग्रेसने जे पाप केले असे आरोप पुरोगामी करायचे, ते आरोप आता भाजपाने केल्यावर लगेच प्रतिगामी होतो? उपरोक्त लेखात प्रतिगामी कोण व कोणत्या कारणाने त्याची वर्णन आलेले आहे.

‘या प्रतिगामी, लोकशाहीविरोधी नि देशद्रोही प्रवृतीला देशात पुन्हा थारा मिळता कामा नये’ असे १३ सप्टेंबर १९६० रोजीच्या अग्रलेखात अत्रे लिहीतात. ती प्रवृत्ती कोणाची आहे? कुणात सामावलेली आहे? आजचे कम्युनिस्ट कोणाला हाताशी धरून उलट्याबोंबा मारत असतात? ५५ वर्षे जुन्या सिद्धांताचा आधार घेतला तर आज पुरोगामी म्हणून मिरवणारेच प्रतिगामी होऊन गेलेले नाहीत काय? कारण देशाची फ़ाळणी ज्यामुळे झाली, त्याच प्रतिगाम्यांची कास आजचे पुरोगामी धरून आज चालले आहेत. त्यांना लीग चालते, त्यांना ओवायसी चालतो. किंबहूना तेच सेक्युलर पुरोगामी वाटतात. त्यांच्यामुळे देश जोडला जाईल अशा थाटात यांचे पुरोगामी राजकारण चालते. मुस्लिम लीग बदललेली नाही की त्यांच्या राजकारणातील प्रतिगामी प्रवृत्ती बदललेली नाही. बदललेले आहेत ते कम्युनिस्ट आणि समाजवादी पुरोगामी. आपलाच अगदी अलिकडचा इतिहास त्यांना आठवत नाही आणि इतिहासाचे नव्याने संशोधन व लेखन करण्याच्या गमजा चालू आहेत. आणि तोंडावर पुरावे दाखले टाकले, मग इतिहासात कशाला जायचे, असे उफ़राटे सवाल केले जातात. ज्यांना आपण कोण होतो, काय होतो आणि कसे होतो, तेही आठवत नाही, त्यांनी इतरांचे वा समाज देशाचे विश्लेषण करावे, हा हास्यास्पद प्रकार नाही काय? कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या संबंधात नुसता शोकप्रस्तावच नको तर निषेधाचा प्रस्ताव विधीमंडळात आणायला हवा. त्याला जर भाजपाचा विरोध असेल, तर तो त्यांचा मुर्खपणाच नव्हेतर दिवाळखोरी आहे. पण त्यासाठी आक्रोश करणार्‍यांनी थोडाफ़ार अशा शोकप्रस्तावाचा आपला इतिहासही तपासून बघितला आहे काय?

(उपरोक्त उतारे ‘कर्‍हेचे पाणी’ खंड ६ मधून)

2 comments:

  1. बुद्धि शाबूत असलेले म्हातारे पत्रकार म्हणजे भाऊ. सुरेख पुरावे , अगदी चपखल , व पुढच्या तोंड बंद करणारे

    ReplyDelete
  2. अंशतः सहमत ... पण बुद्धि शाबूत असलेले कवी, कलाकर, पत्राकार कधीच म्हातारे होत नाहीत. त्यांची बुध्दी त्यांना व इतरांनाही चिरतरूण ठेवते.

    ReplyDelete