Showing posts with label भांडी घासा आमची. Show all posts
Showing posts with label भांडी घासा आमची. Show all posts

Friday, July 17, 2015

मुंबई तुमची, भांडी घासा आमची



मी वांद्रा पुर्व येथील म्हाडाची वसाहत गांधीनगर येथे रहातोय. मागली तीस वर्षे. माझ्या शेजारच्याच खोलीत पटणी नावाचे गुजराती ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करून आहे. किमान पाच दशकापासून ते तिथे रहातात आणि त्यांचे कुणाशीही कसले भांडण नाही. शनिवार ७ जुनची गोष्ट आहे. म्हणजे महिनाभर जुनी. आमचे घर साफ़ करायला काढले होते, म्हणून बाहेर गॅलरीत बसलो होतो. आजचा त्या पटणी कुटुंबातला कर्ता मुलगा हेमांग माझ्याशी नेहमीच्या गप्पा मारत होता. पुढे गाडी राजकारणावर आली आणि तो अकस्मात म्हणाला, ‘आमचे हे गुजराती लोक मोदीला बुडवणार बघा भाऊ.’ मी अवाक झालो. कारण तोही गुजराती असून असे कोणत्या संदर्भात बोलतोय, तेच लक्षात येत नव्हते. तर त्याने आपल्या ऑफ़ीसमधले अनुभव सांगायला सुरूवात केली. तो शेअर ब्रोकर कंपनीत काम करतो. तिथले लोक बोलताना आता भारत गुजराती मालकीचा झाला असे काही बोलतात, त्यामुळे हेमांग अस्वस्थ झालेला होता. तितकेच नाही तर अन्य भारतीयांविषयी अत्यंत तुच्छ भाषेत बोलतात, त्यामुळे तो कमालीचा विचलीत होता. मोदी केवळ गुजरात्यांमुळेच पंतप्रधान झाले आणि यापुढे देशात गुजरात्यांचाच वरचष्मा राहिल, असा एकूण ऑफ़िसातला सूर असतो. त्यामुळे हेमांग विचलीत होता. कारण ही मानसिकता गुजरात्यांना अन्य भारतीयांपासून दुरावणारी व एकटे पाडणारी आहे, अशी त्याची रास्त भिती आहे.

हेमांग या आशंकेतून मला थेट माझ्या बालपणात साठ वर्षे मागे घेऊन गेला. तेव्हा मी लालबागला दिग्विजय मिल समोरच्या सुदाम भुवन चाळीत तिसर्‍या मजल्यावर वास्तव्य करत होतो. सात आठ वर्षाचा अजाण मुलगा. तिथेही समोरच्याच खोलीत बाबुलालशेठ जैन नावाचे कापड दुकानदार वास्तव्य करीत होते आणि शेजारी म्हणून आमच्या दोन्ही कुटुंबात झकास गट्टी होती. वर चौथ्या मजल्यावर आणखी तीन गुजराती कुटुंबे वास्तव्य करीत होती. ते लोक मात्र उर्वरीत चाळकर्‍यांशी फ़टकून वागत. बाकी राजकारण समजण्याची अक्कल नव्हती. पण मोठी माणसे बोलत, त्यांचे ऐकण्याकडे कल होता. १९५४-५५ च्या दरम्यान भाषिक प्रांतरचना या विषयाने उचल खाल्ली होती आणि मुंबईसह महाराष्ट्रात मराठी राज्य व्हावे म्हणून भावना तापू लागल्या होत्या. त्या मराठी रोषाचा सगळा रोख प्रामुख्याने कॉग्रेसच्या विरोधात होता. त्याचे प्रमुख कारण मुंबईच्या कॉग्रेसमध्ये गुजराती नेत्यांचाच वरचष्मा होता. मजेची गोष्ट अशी, की मुंबई नावाच्या द्विभाषिक राज्याचा दुसरा भाग असलेल्या गुजरात प्रांतातही महागुजरात आंदोलनाचे सूतोवाच झालेले होते. मात्र मुंबईतले गुजराती कॉग्रेस नेतृत्व मुंबईसह द्विभाषिकाचे आग्रही होते आणि म्हणूनच मुंबईसहीत महाराष्ट्राची मागणी इथल्या ‘गुजराती’ मुंबई कॉग्रेसी नेत्यांच्या खिल्ली उडवण्य़ाचा विषय होता. त्याचा रोख नुसताच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या विरोधातला नव्हता, तर एकूणच मुंबई गुजरात्यांची आहे असा होता. म्हणूनच मग नुसते मराठी नव्हेतर बिगर गुजराती कुणावरही गरळ ओकण्याची मानसिकता गुजराती दाटवस्तीमध्ये दिसून यायची. बाबुलालशेठ त्यानेच अस्वस्थ होते. अशा वागण्याने गुजराती भाषिकांच्या विरोधात वातावरण तापत चाललेय, अशी भिती ते चाळीतल्या वडिलधार्‍यांशी बोलताना व्यक्त करायचे. हेमांगच्या परवाच्या आशंकेने मला त्यांचे बोल आठवले.

मुंबईच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती आहेत म्हणून मुंबईत सर्वांना आपल्याच गुलामीत जगावे लागेल; अशी एकूण तेव्हाची मानसिकता होती आणि तिचेच प्रतिबिंब गुजराती नेतृत्व असलेल्या कॉग्रेसच्या भूमिकेत पडलेले असायचे. त्याच्याच आहारी गेलेले मराठी सदोबा पाटील मग मराठी माणसाचे गुजरात्यांपेक्षा अधिक शत्रू बनुन गेले. कारण त्याच गुजराती उन्मत्त उद्दाम मानसिकतेला प्रोत्साहन देताना सदोबा पाटील म्हणाले होते, ‘यावश्चंद्र दिवाकरौ, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.’ आजच्या गुजराती उद्दामपणावर पांघरूण घालणार्‍या मुठभर भाजपा समर्थक नेत्यांची सारवासारवी बघितली, मग मला तेव्हाचे सदोबा पाटील आठवतात. अर्थात त्या मुंबईतल्या मराठी-गुजराती वादाचा गुजरातच्या लोकसंख्येवर कुठलाही प्रभाव पडला नव्हता, की तिथल्या कुणा बिगर गुजराती माणसांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागलेले नव्हते. ही व्यावसायिक यशाची गुर्मी आहे आणि ती दिर्घकाळ जगाच्या पाठीवर गुजरात्यांनी नेहमीच दाखवलेली आहे. तिचा प्रत्येक गुजराती वा गुजरातच्या जनतेशी काडीमात्र संबंध नाही. तेव्हा त्यांच्यासाठी मोरारजी देसाई पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याने आणि त्यांच्या हाती मुंबई या द्विभाषिक राज्याची सत्ता असल्याने; मुंबईतल्या सर्व गुजराती व्यावसायिक पैसेवाल्यांना आपण मुंबई ‘रोख रक्कम’ मोजून खरेदी केल्याची मस्ती चढलेली होती. आज साठ वर्षांनी त्याचाच पुन:प्रत्यय येतोय असे जाणवते. लोकसभा मोदींनी जिंकल्यापासून प्रामुख्याने गुजरात नव्हे इतकी मस्ती मुंबई परिसरातील गुजराती भाषिकांना चढलेली आहे. त्यातले बहुतांश व्यावसायिक व्यापारी दिसून येतील. आपण मुंबईच्या व पर्यायाने सर्व मुंबईकरांच्या आर्थिक नाड्या आवळू शकतो, असा त्या मस्तीमागचा रोख आहे. व्यापार व व्यवसाय नुसताच भांडवलावर चालत नाही, तर ग्राहकाच्या ‘कृपेने’ भरभराटतो याचे भान सुटल्याचा तो परिणाम आहे.

असो, तर तेव्हा असा जो मस्तवालपणा होता, त्याचे एक उदाहरण म्हणजे, ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’, अशी कोणी तरी केलेली मल्लीनाथी. त्यातून मग मराठी राज्याच्या लढ्याचा सगळा रोख थेट गुजराती भाषिकांकडे वळला आणि एकाकी रहीवासी असलेले गुजराती वा चहूबाजूंनी वेढलेल्या गुजराती वस्त्या त्या रोषाची शिकार होत गेल्या. त्यावेळी चौथ्या मजल्यावरचे तिन्ही गुजराती परिवार विनाविलंब गाशा गुंडाळून अहमदाबादला पळून गेले होते. आमच्या समोरच्या खोलीतल्या बाबुलाल शेठला किती गुंडांनी चाकू पोटाला लावून लुटले, ते माझ्या इवल्या डोळ्यांनी मी बघितले आहे. त्यातला एक होता रघ्या दादा. तो थोर शहीद कृष्णा देसाई सोबत आलेला आणि त्याच रघ्याने रामपूरी उपसलेला मला अजून आठवतो. ज्यांना तो कृष्णा ठाऊक नाही त्यांना आजच्या गुजराती मानसिकतेचेही दुखणे कळू शकणार नाही. माझे वडील व शेजारचे मिल जॉबर साहेबराव महाजन हस्तक्षेप करायला पुढे झाले होते. तर कृष्णाने त्यांची समजूत काढली, ‘चार घागरी उपसल्या म्हणून विहीर कधी ओस पडत नाही’. मात्र त्या अनुभवानंतर आपण बाबूलालशेठला वाचवू शकत नसल्याचे लक्षात येऊन माझ्या वडीलांनी डॉ. पाटकर यांच्या गाडीतून तेव्हाच्या कर्फ़्युतही त्यांना बॉम्बे सेंट्रलच्या रेल्वेस्थानकावर पोहोचवले. इतका तेव्हा गुजराती द्वेष पराकोटीला पोहोचला होता. त्याचे कारण बाबुलालशेठ सारखे सामान्य गुजराती नव्हते, तर मोरारजी देसाईंच्या उर्मटपणाने मस्तावलेले, गठ्ठ्याने वस्ती करणारे गुजराती त्याला जबाबदार होते. मग त्याचा परिणाम नंतरच्या निवडणूकीत कॉग्रेसला भोगावा लागला.

आज अनेक निष्ठावान भाजपावाले नेमक्या त्याच बचावात्मक कॉग्रेसी भाषेत बोलत आहेत व सारवासारव करीत आहेत. त्यांना मराठीच नव्हे तर इतर बिगर गुजराती मुंबईकर कसा विचलीत होत चालला आहे; त्याचेही भान उरलेले नाही. तेव्हाही मराठी राज्याच्या आंदोलनात गुजराती सोडून सर्वभाषिक मुंबईकर एकत्र आलेला होता आणि आज तशीच गुजराती विरोधातली भावना मुंबई परिसरात आकाराला येताना दिसू लागली आहे. त्याचा भाजपाशी संबंध काय? तर तेव्हाच्या कॉग्रेसमधील त्याच उर्मट गुजराती वर्चस्वाची मानसिकता, भाजपात एकत्रित गोळा होणार्‍या व्यावसायिक वा व्यापारी गुजराती लोकांमध्ये दिसू व अनुभवास येऊ लागली आहे. दहिसरमधला प्रकार त्याचीच प्रचिती आहे. अगदी तेलगू, हिंदी व मद्रासीही तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मागे एकवटला होता आणि त्याची प्रेरणा मस्तवाल गुजरात्यांना धडा शिकवण्याचीच होती. मोदींच्या लोकसभेतील यशानंतर अमित शहांची भाषा व इथल्या एकूणच गुजराती वर्तनात, ती सहा दशकांपुर्वीची ‘भूमिका’ ठळकपणे समोर येऊ लागली आहे. तिच्या प्रतिकारात जो कोणी पुढाकार घेईल, त्याला सर्व बिगर गुजराती भाषिक मुंबईकरांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मिळत जाणार यात शंका बाळगण्याचे काही कारण नाही. शिवसेना भले मराठी अस्मितेच्या गोष्टी करील. पण तिचा गुजराती विरोध अन्य भाषिक व प्रांतियांच्या वेदनेवरही फ़ुंकर घालणारा असल्याने असे उन्मत्त गुजराती व पर्यायाने भाजपा एकाकी पडत जाणार आहे. (अपुर्ण)