२०१५ या वर्षाचा आज शेवटचा दिवस! कालप्रवाह अखंड चालतच असतो. खरे तर कालप्रवाह ही मानवी संकल्पना आहे. विज्ञानाने विश्वाचा शोध घेण्याचा अखंड प्रयास चालविला आहे, त्यात आपल्या समजूतीसाठी कालगणना शोधून काढली. म्हणूनच वर्ष दिवस वगैरे मानवी कल्पना होत. अन्य प्राणीमात्रांसाठी सर्व दिवस सारखेच असतात. त्यात वर्ष नसते की महिने नसतात. सूर्यास्त असतो आणि सूर्योदय असतो. बाकी निसर्गाने दिलेले मोसम असतात. त्यांच्यासाठी वर्ष नसते म्हणून वर्षाची अखेरही नसते. पण माणसाला आपल्या बुद्धीची चिकित्सकवृत्ती शांत बसू देत नाही. म्हणून त्याने निसर्गाचे रूप उलगडण्याचा प्रयास आरंभला. त्यातून त्याला विज्ञान गवसले आणि त्यातूनच कालगणनेचे काम सुरू झाले. ही गणना सुरू झाली त्याला आता हजारो वर्षे उलटून गेली आहेत आणि म्हणूनच नोंदलेली वर्षे आणि त्याच्याही पुर्वीचा काळ, अशी गणना होत असते. कालगणनेच्या शोधानंतर घटनाक्रम नोंदवण्याचा शोध लागला. लिखाण व चित्रलिपीतून माणसाने पुढल्या पिढीला आपली माहिती देण्याचा मार्ग शोधून काढला. आता तर जग खुपच पुढे गेले आहे आणि पुर्वजांनी नोंदवून ठेवलेले नाही, असेही अनेक प्रसंग अवशेषातून उलगडण्यापर्यंत माणसाने मजल मारली आहे. म्हणून काळ अव्याहत चालू असतो आणि आपण वर्ष सुरू झाले वा संपले म्हणतो, ती केवळ आपण मानवी बुद्धीची केलेली एक सोय सुविधा आहे. अन्यथा उद्या नवे वर्ष असेल आणि आज जुने वर्ष संपेल, या भाषेला फ़ारसा अर्थ नसतो. आपण वर्षाचा आकडा बदलून वापरू लागणार. पण मानवी जगापलिकडे जे विश्व पसरले आहे, त्याच्यासाठी कुठले जुने वर्ष संपणार नाही, की नवे वर्ष सुरूही होणार नाही. विज्ञान इतके कोरडे व भावनाशून्य असते. पण तेच विज्ञान माणसाने शोधून काढले व आपल्याच सोयीसाठी शोधले असल्याने, त्या नोंदी व आकड्यात माणसाच्या भावना गुंतलेल्या असतात.
भावनांपासून माणसाची सुटका विज्ञान करू शकलेले नाही. म्हणून काळाच्या नोंदी कराव्या लागतात आणि त्या करताना भावनांना रजा देता येत नाही. विज्ञान भले माणसाने आपल्या चिकित्सक वृत्तीने जन्माला घातले आणि त्यातून मानवी जीवन अधिक सुकर सुसह्य करण्याचा प्रयास आरंभला. पण कितीही सुविधा मिळाल्या तरी माणसाला भावनांपासून मुक्त होता आले नाही. विज्ञान निसर्गाची कोडी उलगडते. पण मानवी मनाचे वा त्यातल्या भावनाविश्वाचे कोडे उलगडत नाही. कारण ती गुंतागुंत विज्ञानाच्या चौकटीत बसवणे माणसाला अजून शक्य झालेले नाही. सहाजिकच विज्ञान कोरडे व भावनाशून्य असते. म्हणून ते अमानुषच असते. कालप्रवाहात डुंबणार्या माणसाला विज्ञान मार्गदर्शन करते. पण त्यातून काय घ्यावे आणि काय टाळावे, हा विवेक माणसालाच राखावा लागतो. त्यासाठी मग अनुभवाचे दाखले खुप मोलाचे ठरतात. ज्यांची दखल व नोंद कालगणनेतून झालेली असते. इतिहास त्यासाठीच मोलाचा असतो, ज्याची सुरूवात कालगणनेची पुढली पायरी आहे. संपणारे वर्ष वा येऊ घातलेले वर्ष, हे निव्वळ अंतर मोजणारे मैलाचे दगड असतात. त्या ठराविक कालखंडात म्हणजे वर्षात वा महिन्यात, दशकात वा शतकात काय घडले, त्याच्या नोंदी म्हणून भावनाशील माणसासाठी महत्वाच्या ठरतात. ज्याच्याशी निसर्गाला वा विज्ञानाला कर्तव्य नसते, माणसाला असते. माणसालाच इतिहास असतो, कारण माणूस हा एकमेव सजीव प्राणी विचार करतो. जन्ममृत्यूच्या तारखा नोंदतो, आयुष्यही मोजतो. त्या आयुष्याचेही कालखंड पाडून त्याच्या विविध नोंदी करून ठेवू बघतो. कारण त्या नुसत्या घटना नसतात, तर त्यात मानवी भावभावनांची गुंतवळ असते, ज्यापासून मुक्त होण्याच्या भयालाच जगणे म्हणतात. ही भावनाच २०१५ वर्षाला त्याची ओळख देते आणि २०१६ ला नवा नातलग म्हणून स्विकारत असते.
२०१५ हे वर्ष उद्यापासून नित्य दैनंदिन वापरात शिल्लक उरणार नाही. पण संदर्भ म्हणून अनेक घटना व प्रसंगासाठी त्याची आठवण येतच राहिल. अमेरिकेचा अध्यक्ष भारताच्या प्रजासत्ताक दिनाला सन्मान्य पाहूणा म्हणून प्रथमच हजर राहिलेले वर्ष किंवा भारताचा पंतप्रधान अकस्मात पाकिस्तान भेटीला जाऊन धडकला ते वर्ष; म्हणून २०१५ कुणाला विसरता येईल? ही कालगणनेची महत्ता आहे. कारण अनेक घटना मानवी जीवनावर किंवा सामुहिक जीवनावर दिर्घकालीन प्रभाव पाडत असतात आणि म्हणूनच त्यांचे संदर्भ शोधत इतिहासात जावे लागते. काळाची गणना म्हणून अगत्याची व आवश्यक होऊन जाते. गेल्या वर्षाच्या मध्यास देशात मोठे राजकीय परिवर्तन घडले आणि पुढले सहा महिने भाजपाची मोदीलाट उसळतच राहिली. पण याच २०१५ वर्षाच्या आरंभीच भाजपाला दिल्ली विधानसभेत पहिला दणका बसला आणि अखेर होता होता बिहारमध्ये मोदीलाट ओसरल्याचे संकेत मिळाले. इतक्या वेगवान घटना घडत असताना बारा महिन्यांपुर्वीचे जग कुठल्या कुठे बदलून गेले आहे. विस्कटलेली भारत-पाक बोलणी वर्षाची अखेर येता येता पुन्हा सुरू झाली. तीन संसद अधिवेशने उधळली गेली आणि निर्भयाच्या गुन्हेगाराला शिक्षेतून सूट मिळण्याच्या बातमीने संसदेतला विसंवाद संपून विधेयके संमत करण्याच्या प्रक्रीयेला वेग आला. अशा कित्येक लहानमोठ्या घटनांनी २०१५ हे वर्ष भरलेले आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील घटनांची नोंद त्याच्यापुरती असते आणि सामुहिक घटनांची नोंद देशा्चा समाजाचा इतिहास म्हणून लक्षात रहात असतो. सतत घडणार्या अशा कित्येक घटना एकूण समाजजीवनावर दिर्घकालीन प्रभाव पाडत असतात.
म्हणूनच दूर असलेल्यांनाही घडणार्या घटनेविषयी आत्मियता असते. त्यांचेही हितसंबंध त्यात गुंतलेले असू शकतात. म्हणूनच आपल्यापासून दूर कुठे घडलेल्या घटनांची माहिती माणसाला हवी असते. ती त्याच्यापर्यंत घेऊन जाण्याचे काम पत्रकारितेला पार पाडावे लागते. त्यालाच नियतकालिक म्हणतात. पत्रकारिता ही म्हणूनच कालप्रवाहाचा एक अविभाज्य घटक बनून गेला आहे. आधुनिक काळात वर्तमानपत्र म्हणजे फ़क्त बातम्या देणारी सुविधा किंवा छापील कागद उरलेला नाही. उद्याच्या पिढ्यांना पुर्वजांचा इतिहास अधिक नेमका व तपशीलवार मिळावा म्हणून त्याच्या अहोरात्र नोंदी करणारी स्वयंभू यंत्रणा; असे आता पत्रकारितेचे स्वरूप झाले आहे. छपाईच्याही पुढे जाऊन चित्रित, ध्वनीमुद्रीत इतिहास नोंदवणारी व्यवस्था, असे आधूनिक स्वरूप पत्रकारितेने धारण केले आहे. त्यातले एक पर्व, एक अध्याय असे मग वर्ष येत-जात असते. त्याचा पहिला दिवस आणि अखेरचा दिवस म्हणूनच एका अफ़ाट कथेचे आरंभ-अखेर असतात. अन्य कुठल्याही माणसापेक्षा पत्रकाराला वर्षाची सुरूवात वा अखेर जिव्हाळ्याची वाटत असते. त्याला मागे वळून त्या ३६५ दिवसांकडे हरवलेल्या आप्ताप्रमाणे भावविवश होऊन बघावेच लागते. कारण त्यातला प्रत्येक दिवस काहीतरी घडवून गेलेला असतो आणि बातमी म्हणून त्याची पत्रकाराने आपल्या परीने नोंद केलेली असते. त्या घटनेचा अर्थ शोधण्याचा व समजावण्याचा प्रयास केलेला असतो. त्या दिवसाच्या घटनांची नोंद पत्रकाराच्या स्मरणात झालेली असते. अशा वर्षाला निरोप देताना पत्रकाराच्या भावना हळव्या होणे स्वाभाविक आहे. तितकीच येणार्या वर्षाच्या पोटात काय गुढ दडलेले आहे, त्याविषयी पत्रकाराच्या मनातली उत्सुकता अनाकलनीय असू शकते. काही तासांनी संपणार्या या वर्षाला म्हणून अखेरची सलामी!
Happy new year Bhau
ReplyDeletewish you happy new year sir. you made me reader.
ReplyDeleteएक अप्रतिम तात्वज्ञानिक लेख. एक ठेवा. सुंदर अप्रतिम विचार. पण भाऊ पत्रकारिता इतिहास लेखनास उपयोगी साधन होते ते तुमच्या किंवा तुमच्याही आधीच्या काळी. आता नो इंट्रीगीटी, त्यामुळे बिनधास्त कुछभी छपवाओ ! पैसा फेको तमाशा देखो. फुल्ल धमाल. पण यांचा आणि इतिहासलेखकांचा जितका कमी संबंध येईल तितके चांगले बर का. नाहीतर घोटाळा व्हायचा.. बाकी लेखाचे एकेक वाक्य कोटेशन म्हणून कितीतरी वर्ष उपयोगी पडेल इतका खास लेख लिहिलाय तुम्ही. ! नेहमीपेक्षाही सरस आहे .
ReplyDeleteHappy new year bhau.
ReplyDeleteनमस्कार भाऊ येणाऱ्या मानवी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteभाऊ परमेश्वर आपणाला शतायुषी करो आपले blog आम्हाला असेच वाचायला मिळो
ReplyDelete