Sunday, December 6, 2015

बुरख्यातल्या लेकीला सावित्रीआईचे पत्र

 

चि. वर्षा,

तुझे ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेले माझ्या दुसर्‍या लेकीला म्हणजे पंकजाला लिहीलेले पत्र वाचनात आले आणि मनापासून हसू आले. तुम्ही पोरी अजून तरी मला समजून घेऊ शकला नाहीत, याची खंतही वाटली. किती उथळ बुद्धीने शाब्दिक झिम्माफ़ुगड्या खेळता ग? पंकजाने जे काही मतप्रदर्शन केले, त्याविषयी मला काही म्हणायचे नाही. कारण तिचे मत जगासमोर आहे. तिने सहसा कधी माझ्या नावाचा वा वारश्याचा व्यापार तरी मांडला नाही. जितकी तिची बुद्धी आहे, त्यानुसार वागताना तिने काही पल्ला गाठला आहे. पण वर्षा, तुझ्यासारख्या बुद्धीमान लेकी जेव्हा हास्यास्पद बौद्धिक कसरती करतात, तेव्हा खुप वाईट वाटते. अर्थात तुमच्या राजकीय सामाजिक भामटेगिरीचे वाईट नाही वाटत. माझ्या नावाचा गैरवापर करता त्याची खंत वाटते. तेव्हा पारतंत्र्यात वा रुढीपरंपरांमध्ये रुतून बसलेल्या समाजातही मला जितके मतस्वातंत्र्य होते आणि उपभोगता आले, तितकेही आज तुम्हाला मिळवता नाही, याची खंत वाटते. अन्यथा माझ्या नावाने वाटेल ते बरळणार्‍या तुझ्यासारख्या लेकीकडून अशी अवहेलना सहन करायची वेळ माझ्यावर कशाला आली असती वर्षा? तुला आठवते तीन वर्षापुर्वी सातार्‍यातच म्हणजे माझ्या जन्मभूमीपासून खंबाटकी घाटाच्या पलिकडे तो लक्ष्मण माने नावाचा सैतान गरजू बहुजन महिलांचे लैंगिक शोषण करीत होता. तेव्हा त्यांनी आवाज उठवला, त्याही माझ्या लेकीच होत्या आणि त्यांच्या मदतीला तू किती धावून गेली होतीस वर्षा? उलट आपल्याच भगिनीवरचा अत्याचार करणार्‍याकडे पाठ फ़िरवून, तुही सारवासारव करीत बसली होतीस ना? तिकडे दूर मराठवाड्यात भृणहत्येच्या विरोधात आवाज उठवायला धावणारी माझी लेक वर्षा तेव्हा मूग गिळून गप्प बसली, त्याच्या किती यातना मला झाल्या होत्या? माझ्या त्या अत्याचारग्रस्त लेकींना धीर द्यायला पुढे जायची तुझ्यात हिंमत नव्हती याच्या यातना असह्य होत्या ग?

असो, असे किती प्रसंग सांगू? आज कोणीही उठून माझे यजमान जोतिराव यांच्या नावाने कुठलेही उद्योग करीत असतात, तेव्हा आम्हाला होणार्‍या यातना कोणाला सांगायच्या व कुठे व्यक्त करायच्या, असा प्रश्न सतावतो. आणि तुम्ही मात्र आमच्या त्याच मौनाचा गैरफ़ायदा उठवत आमच्या नावावर कुठलीही थापेबाजी करता, तेव्हा दु:खाचे आवेग अनावर होतात. आमच्या हयातीत रुढीपरंपरावाद्यांनी मारलेले धोंडे व शेणगोळे झेलताना जितक्या यातना झाल्या नाहीत, त्यापेक्षा भयंकर वेदना तुझ्यासारख्या भामट्या लेकींच्या मानभावीपणामुळे होतात ग वर्षा! मला एक सांग, आम्ही कधी देवधर्माच्या गुंत्यात पडलो का? कर्मकांड वा देवदेवस्की यांच्या विरोधात आम्ही अवघी हयात खर्ची घातली. आणि आज कोणी कुठल्या मंदिरात जाण्याचा अधिकार आमचाच वारसा म्हणून मागते, ही आमची विटंबना नाही काय? कुठल्याही मंदिरात जाण्यापेक्षा आपली बुद्धी हीच देवता मानून तिचीच साधना करण्याचे व्रत आयुष्यभर निष्ठेने आम्ही जोपासले. धर्मकर्मकांडाच्या जंजाळातून बाहेर पडण्याचीच तपस्या करणार्‍या मला तू कुठल्या पातळीवर आणते आहेस? शनिचे मंदिर सोडून दे, कुठल्याही मंदिरात जाण्यासाठी माझ्या कार्यात स्थान होते का? मग तसा अधिकार मागणारी वा त्यासाठी मंदिराचे नियम तोडणार्‍या मुलीशी माझा काय संबंध असू शकतो? मुळात कुठल्याही महिलेला मुलीला आज मंदिरात जायची इच्छा होणे, हाच माझ्या वारश्याचा पराभव नाही काय? आणि त्याच पराभवाला माझा मोठा विजय ठरवण्याची कसरत तू करते आहेस, ती शुद्ध भामटेगिरी नाही काय? किती म्हणून माझा अवमान व अवहेलना कराल ग? यासाठी का महिला शिक्षणाचा मी पाया घातला होता? सामान्य माणसाची बौद्धिक दिशाभूल करण्याचा लबाड हेतू त्यामध्ये नव्हता, हे तुमच्या कधी लक्षात येणार आहे?

आमच्या हयातीत देशात लोकशाही नव्हती आणि राज्यघटनाही अस्तित्वात आलेली नव्हती. आम्ही तर हयात पारतंत्र्यात घालवली. पण किती स्वतंत्र बुद्धीने वागलो नि जगलो? आमचा देश व समाज पारतंत्र्यात होता. पण ते परकीय साम्राज्य आमच्या बुद्धीला पारतंत्र्यात ढकलू शकले नव्हते. आम्ही स्वयंभू स्वतंत्र बुद्धीने विचार करू शकत होतो आणि तितकेच स्वतंत्रपणे विचार मांडण्याची क्षमताही जपलेली होती. विवेकबुद्धीला धार लावण्यातून आम्ही वास्तवाला भिडण्याची हिंमत जुळवू शकलो. तुम्हा एकविसाव्या शतकातल्या मुलींचे म्हणूनच नवल वाटते. किती स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तू तर कायद्याचा अभ्यास केला आहेस आणि त्या तुझ्या पत्रात राज्यघटनेचाही हवाला दिला आहेत. देशातला कुठल्याही नागरिकाला धर्म, पंथ, लिंग वा कसलाही भेदभाव न करता स्वतंत्र असल्याचा तू हवाला दिलेला आहेस. मग वर्षा, मला सांग, त्या मुस्लिम मुली माझ्या लेकी नाहीत काय ग? त्यांना बुरख्यातून बाहेर पडायचे स्वातंत्र्य आहे काय? त्यापैकी कितीजणींना त्यांचेच श्रद्धास्थान असलेल्या मशिदीत जाण्याची मूभा आहे? त्यांच्यासाठी तू वा तुझ्यासारख्या माझ्या तोतया लेकींनी कधी आवाज उठवला आहे काय ग? कशाला गप्प बसता त्यावेळी? सावित्रीबाई फ़ुले अशी सोयीचे प्रसंग बघून पत्र लिहीणारी वा न्यायाचा आवाज उठवणारी कुणी होती, असा तुझा समज आहे काय? तुमच्याकडे बघून अनेकांना आज तसेच वाटत असेल ना? आपापल्या राजकीय भूमिका व विचारांना सोयीचे असेल तेव्हा जोतिराव किंवा माझी नावे घेता, तेव्हा किती यातना होतात ग पोरी? इथल्या मुस्लिम मुलीही माझ्याच लेकी आहेत, असे तुम्हाला वाटत नाही काय? मग त्यांना बुरख्यातून बाहेर काढायचा व जग खुल्या हवेत श्वास घेऊन बघण्याचा आधिकार राज्यघटनेने दिलेला नाही काय? माझी लेक म्हणून मिरवताना तुझ्या मनाला असा प्रश्न कशाला शिवला नाही ग?

वर्षा, सावित्रीची लेक होणे म्हणजे काही मिरवणे नाही. ते असिधारा व्रत आहे. ती तपस्या आहे. त्यात मौजमजा किंवा प्रतिष्ठा नसते. त्यात त्रास व कष्ट असतात. ते सहन करण्याची अमर्याद शक्ती असावी लागते. कुणाला पत्र लिहीण्यापुरते माझी लेक होणे सोपे नाही. प्रवाहाच्या विरोधात जाण्याची व समाजाचा क्षोभ ओढवून घेण्याची तयारी असावी लागते. पण तुम्ही माझ्या मिरवणार्‍या सर्वच लेकी स्वत:ला समजूतीच्या व प्रतिष्ठेच्या बुरख्यात झाकून बसलेल्या आहात. तुम्हाला सावित्रीच समजून घेता आली नाही, तर तिचे कार्य वा वारसा याच्याशी तुमचा संबंध तरी काय? माझ्या किंवा जोतिरावांच्या नावाने वार्षिक मेळे जत्रा भरवण्याचे कर्मकांड करून तुम्ही आमच्या वारश्याचे लाभ उठवण्याचा व्यापार करून टाकला आहे. समाजोपयोगी काम करून अशा यातना वाट्याला येतील ही अपेक्षा कधी केली नव्हती ग वर्षा! तात्कालीन समाजाचे व कर्मठ धर्ममार्तंडांचे शेणगोळे व दगडगोटेही आम्ही हसत हसत झेलले आणि त्यामुळे झालेला जखमा फ़ुंकर घालून दागिन्यासारख्या मिरवल्या आम्ही! पण तुमचे हे आमच्याविषयीचे गुणगान किंवा लेकी म्हणून मिरवणे कमालीचे यातनामय होऊन गेले आहे. कारण जे विचार व तत्वे आम्ही इहलोकीच्या सुखसमाधान व  गरजांपेक्षा पवित्र मानली, त्यांचीच विटंबना तुमच्याकडून होत असताना तुम्हाला रोखताही येत नाही, याची खंत असह्य होते. तुला ठाऊक आहे, आम्ही काय मोठे कार्य केले? वर्षा, आधी जोतिराव आपल्याच समजुती व भ्रमातून बाहेर पडले आणि विवेकबुद्धीच्या बळावर स्वतंत्र झाले. मग त्यांनी मलाही क्रमाक्रमाने समजूतीतून बाहेर काढले. स्वत:ची दिशाभूल व फ़सगत करण्यातून आम्ही मुक्त झालो आणि पर्यायाने भोवतालच्या समाजाला भ्रमातून बाहेर पडण्याचे जीवंत उदाहरण घालून दिले. तुम्ही माझ्या लेकी म्हणून मिरवताना त्याच समजुती व लबाडीच्या बुरख्यात कितीकाळ झाकोळून रहाणार आहात? वर्षा, उत्थानाचा आरंभ प्रामाणिकपणातून होत असतो. शाब्दिक वा तार्किक भामटेगिरीतून नव्हे ग! तेवढी समजूतीच्या बुरख्यातून बाहेर पड, म्हणजे मलाही अभिमान वाटेल तुला लेक म्हणून स्विकारायला!

(खिन्न) सावित्री

8 comments:

  1. सावित्रीच्या लेकी म्हणवून घेत स्वतःला आणि त्याबरोबर समाजालाही फसवणार्या स्वार्थी महिलांसाठी उत्तम कानऊघाडणी!

    ReplyDelete
  2. भाऊ शनी मंदिरा मधे मुलगी गेली दंगा झाला परंतु बुरखा घालतात या बाबत काहिही का होत नाही??

    ReplyDelete
  3. मुळात शिंगणापूरचे शनी मंदिर एका आख्यायिकेवर म्हणजे पुरोगामी ज्याना देव धर्म मान्यच नाही अश्यांच्या मते अंधश्रध्देवर आधारित आहे तर मग त्यांनी त्यां देवळात जाणंच मुळात संशयास्पद आहे.
    देव मान्य नसणार्‍या बाबा साहेब आंबडेकरांना त्यांचे भक्त देव मानतात व आमचा आक्षेप नाही कारण त्यांची तशी श्रध्दा आहे. काश्मिरात हजरत बाल आहे व मुसलमानांची तशी श्रध्दा आहे. आमचा आक्षेप नाही. मग शनी बाल ब्रम्हचारी आहे अशी जर हिंदूंची श्रध्दा आहे तर त्यात कोणी ढ्वळाढवळ करू नये.
    ज्यांना शनी ब्रम्हचारी वाटत नाही त्यांनी त्यांचं निराळं मंदिर बनवावं. तेही जमत नसल्यास अंबरनाथ, ठाणे इथे समस्त शनी भक्त माता-भगिनींनी जरूर यावं. आमच्या अंबरनाथ मधे जे शनी मंदिर आहे तिथे माता भगिनी थेट गाभार्‍यात जातात व मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेतात.
    जर पुरोगाम्यांनी त्याचां एखादा नवा शनी शोधला असेल तर त्यांनी त्यांचं निराळं शनी मंदिर बनवावं. माझ्या माहितीत तर बुवा, शनी एकच आहे व ही गोष्ट मान्य असेल तर मग अंबरनाथ मधे काय नि शिंगणा पुरातकाय कुठेही शनीचे दर्शन घ्या काय फरक पडतोय ?

    ReplyDelete
  4. भाऊराव,

    मासिक पाळीत स्त्रियांना मंदिरबंदी असते याचा सामाजिक समतेशी काय संबंध? मासिक पाळी ही मलमूत्रविसर्जनासारखी नैसर्गिक क्रिया आहे. कोणीही मलमूत्राने माखलेला असतांना देवदर्शन घेत नाही. त्यानंतर स्वच्छ होऊन हात पाय तोंड धुवून मगंच दर्शन घेतो. त्याप्रमाणे मासिक पाळी संपल्यावर त्या स्त्रीने सुस्नात होऊन मग दर्शन घ्यायला हरकत नाही. हा साधा नियम पाळायची तयारी नसेल तर देवदर्शन न घेणेच इष्ट.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  5. ते गामा पैलवान तोंड लपवून का येतंय ? पैलवान बुरखा घालतो काय की पदर घेतो डोक्यावर ?

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हीही नाहीतरी तोंड लपवून बोलत आहात ना?

      Delete
  6. झणझणीत अंजन, जागे असलेल्यांसाठी.

    ReplyDelete