Saturday, December 19, 2015

‘रामलिला’नंतरच्या मर्कटलिला



मंगळवारी लोकसभेत हंगामा करणार्‍या ‘आप’च्या सदस्याला शेवटी घशाला कोरड पडली आणि घ्सा ओल करण्यासाठी तो पाणी शोधू लागला. तेव्हा जवळच बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टेबलवर असलेले पाणी त्याला दिले. काय मजेशीर प्रसंग आहे ना? दिल्ली सरकारला व मुख्यमंत्र्याला पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार काम करू देत नाहीत, असा आरोप करीत हा खासदार हंगामा करत होता. संसदेचे कामकाज बंद पाडण्यासाठी ओरडत होता. तर त्याचे जे लोकसभेचे कामकाज बंद पाडण्याचे ‘काम’ चालू होते, त्यात मोदींनी कुठला व्यत्यय आणला नाही. उलट आपल्याच नावाने शिमगा करणार्‍या या आप सदस्याला त्यातही मदतच केली. आणि असे लोक मोदी आपल्याला काम करू देत नाही, असा आरोप करतात. अर्थात यातला विरोधाभा सदरहू सदस्याला शोभणाराच आहे. कारण दिड वर्षापुर्वी अकस्मात आम आदमी पक्षात भरती झालेला हा गृहस्थ मूळात हास्यकलाकार आहे. तुम्हाला आठवत असेल तर चारपाच वर्षापुर्वी भारतीय उपग्रहवाहिन्यांवर ‘लाफ़्टर चॅलेंज’ नावाची एक मालिका नव्याने सुरू झाली. त्यात हास्य कलाकार व नकलाकारांची स्पर्धा योजलेली होती. त्यातून अनेक नवे कलाकार पुढे आले. त्यातला एक हास्यकलाकार भगवंत मान नावाचा होता. दिड वर्षापुर्वी तोच केजरीवाल यांच्या पक्षात सहभागी झाला आणि केवळ योगायोगाने लोकसभेवर निवडून आला. त्यानंतर त्याच्याकडून आपण कुठली अपेक्षा करू शकतो? त्याने हास्यास्पद काही करावे इतकेच ना? मग लोकसभेत त्याने तितकेच काम केले आहे. मोदींनी मंगळवारी ज्याच्या घशाची कोरड भागवण्यासाठी आपला पाण्याचा पेला पुढे केला, ते हेच गृहस्थ, भगवंत मान! मजेची आणखी एक गोष्ट म्हणजे त्यानेही सभागृहाच्या बाहेर पंतप्रधानांचे आभार मानले. हे आजच्या संसदेचे खरे वास्तव चित्र आहे.

एकूण संसदेत जे काही चालले आहे, त्यात लोक एक बघतात आणि त्याविषयी भलतेच काही ऐकत असतात. त्याचीच एक मजेशीर नक्कल या नकलाकाराने सादर केली म्हणायची. अन्यथा राहुल, सोनिया वा अन्य काही कॉग्रेसचे नेते यापेक्षा काहीही वेगळे करत आहेत काय? रोज कुठले तरी खुसपट काढायचे आणि संसदेचे कामकाज ठप्प करायचे, हाच एककलमी कार्यक्रम राबवला जात आहे. अर्थात यात नवे काहीच नाही. भाजपाच्या काही मुर्खपणामुळे प्रचंड यश मिळवून दिल्लीसारख्या छोट्या राज्यात पुन्हा सत्तेवर आलेले केजरीवाल, त्यानंतर निराश विरोधकांचे म्होरके झाले आहेत. लोकसभेतील दारूण पराभवानंतर निराश झालेल्या बहुतांश विरोधी पक्ष व प्रामुख्याने कॉग्रेसला, केजरीवाल यांनी राजकारणाचा नवा मार्ग खुला करून दिलेला आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यापासून व बहूमत पाठीशी असल्यामुळे केजरीवाल यांनी पहिल्या दिवसापासून केंद्राशी संघर्षाचा पवित्रा घेतला. प्रत्येक बाबतीत त्यांनी आडमुठी भूमिका घेऊन जितके म्हणून घटनात्मक व प्रशासकीय पेचप्रसंग उभे करता येतील, तितकी नाटके आरंभली. नायब राज्यपालांना झुगारून निर्णय घेणे किंवा पोलिस खात्याशी भांडणे उकरून काढणे, असा सपाटा लावला होता. आणि काहीही झाले की पंतप्रधान मोदी आपल्याला काम करू देत नाहीत, अशी बोंब ठोकायची. सरकारमध्ये असताना काम करायचे म्हणजे तरी काय असते? सामान्य लोकांना त्याची जाण नसते. कायदे, घटना अधिक नियम यांच्या चाकोरीत राहुन सत्ताधार्‍यांना काम करावे लागते. निर्णय सुद्धा त्याच चाकोरीत राहुन करावे लागतात. पण केजरीवाल मुद्दाम नियम वा कायद्यांना बगल देवून वाटेल ते करू बघतात. कारण आपण मोदी विरोधात बोललो, की उर्वरीत विरोधी पक्ष आपल्याच पाठीशी उभा रहाणार, याची त्यांना खात्री आहे. कारण मोदी विरोधात बोलायला कोणाकडे काही निमीत्त उरलेले नाही.

दिल्लीला राज्याचा दर्जा देण्यात आलेला असला तरी तिथली लोकसंख्या मुंबईपेक्षा जास्त नाही आणि ते एक महानगर आहे. तिथल्या सरकारला मर्यादित अधिकार देण्यात आलेले आहेत. सनदी अधिकारी म्हणून परिक्षा उत्तीर्ण झालेल्या केजरीवाल यांना ते नेमके ठाऊक आहे. पण ते जाणिवपुर्वक असे गैरसमज निर्माण करतात व आपल्याला खुप काही करायचे आहे पण मोदी करू देत नाहीत, असा कांगावा करीत रहातात. फ़ेब्रुवारी महिन्यात त्यांना सत्ता मिळाली आणि विनाविलंब त्यांनी आपला फ़ंडा सुरू केला. त्यांना मिळणारी प्रसिद्धी बघितल्यावर राहुल गांधी व सोनियांनाही प्रेरणा मिळाली आणि तिथूनच मग संसदीय कामकाजाचा बोर्‍या वाजण्याचा कार्यक्रम सुरू झाला. कुठलेही खुसपट काढायचे आणि त्यावरून संसद ठप्प करायची, हा कॉग्रेसचाही कार्यक्रम होऊन बसला. त्यातच दिल्लीत मार खाल्ल्यावर काहीही धडा न शिकलेल्या भाजपाने बिहारमध्ये आपला पराभव ओढवून आणला आणि कॉग्रेसच्या हाती कोलितच मिळाले. केजरीवाल मग भलतेच फ़ुशारले तर नवल नाही. त्यातून आजची परिस्थिती उदभवली आहे. मात्र अशा जाळ्यात स्वत: केजरीवाल आता फ़सत चालले आहेत. कारण सध्या जे राजेंद्रकुमार प्रकरण उफ़ाळले आहे, त्यात केजरीवाल यांची देहबोलीच त्यांचा धीर सुटल्याचे दाखवते. सीबीआयने ज्या धाडी टाकल्या, त्यात चौदापैकी एक जागा मुख्यमंत्री कार्यालयातील सचिवाची केबीन आहे. ते संपुर्ण कार्यालय नाही, की मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाला कुठे धक्का लागलेला नाही. मग केजरीवाल इतके अस्वस्थ कशाला झाले आहेत? तर त्यांच्या विश्वासातील ज्येष्ठ अधिकार्‍यावरच बालंट आलेले आहे. वास्तविक भ्रष्टाचार निर्मूलनाचा गाजावाजा करीत सत्तेवर आलेल्या केजरीवाल यांनी राजेंद्रकुमार यांची विश्वासू अधिकारी म्हणून केलेली निवडच शंकास्पद होती. कारण हा माणूस दिर्घकाळ दिल्लीतला भ्रष्ट नोकरशहा म्हणून ओळखला जात होता.

राजेंद्रकुमार यांच्याप्रमाणेच आशिष जोशी या अधिकार्‍याला केजरीवाल यांनी अगत्याने आपल्या प्रशासनात बोलावून घेतले. त्यांच्यावर एका महत्वाच्या योजनेची जबाबदारी सोपवली होती. पण तिथे आशिष खेतान या राजकीय सहकार्‍याचे व जोशी यांचे वाजले आणि त्यांनी तक्रार केली. आम आदमी पक्षाचे नेते व कार्यकर्ते सरकारी कामकाजात ढवळाढवळ करतात, अशा तक्रारी जोशी यांनी केजरीवाल यांच्याप्रमाणेच गृहमंत्री, नायब राज्यपालांकडेही केल्या. तेव्हा केजरीवाल यांनी जोशींचीच उचलबांगडी करून त्यांना केंद्रात परत पाठवून दिले. तिथेच त्याच्यावर पडदा पडेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण जोशी गप्प बसले नाहीत आणि त्यांनी केजरीवाल सरकारच्या भानगडी बाहेर काढण्याचा चंग बांधला. त्यातूनच राजेंद्रकुमार प्रकरण चव्हाट्यावर आलेले आहे. तशा त्यांच्याविषयी अनेकांच्या तक्रारी होत्या आणि युपीए सत्तेत असतानाही राजेंद्रकुमार यांच्यावर सीबीआयने पाळत ठेवलेली होती. पण कारवाई होऊ शकली नव्हती. असा संशयास्पद माणूस मुळात केजरीवाल यांनी आपला विश्वासू सहकारी म्हणून निवडणेच शंकास्पद होते व आहे. की त्यांना सराईत भ्रष्टाचारी हवा होता? नसेल तर भ्रष्टाचार निर्मूलनाच्या म्होरक्याने राजेंद्रकुमार यांनाच निवडून नेमणूक देण्याचा अर्थच लागत नाही. २००६ पासून ज्याच्यावर भ्रष्टाचार व घोटाळ्याचे आरोप आहेत, त्याविषयी केजरीवाल यांना काहीच ठाऊक नसेल यावर कोणी विश्वास ठेवायचा? आणि नजरचुक असेल तर धाडी पडल्यावर आळ आपल्या आंगावर घेत केजरीवाल राजेंद्रकुमार यांच्या बचावाला कशाला धावून आले आहेत? कुछ तो गडबड जरूर है. शिवाय आपल्या कार्यालयावर धाडी घातल्याचा कांगावा कशासाठी? जो पुरावा म्हणून केजरीवाल पुढे करतात, ती कागदपत्रे व फ़ायली सुद्धा राजेंद्रकुमार यांच्याच कार्यालयातून जप्त केलेल्या आहेत.

कशी गंमत आहे बघा. ज्याच्या तक्रारीवरून राजेंद्रकुमार यांच्याविरुद्ध एफ़ आय आर दाखल झाला, तो आशिष जोशी केजरीवाल यांचाच लाडका अधिकारी होता आणि त्यानेच राजेंद्रकुमार या दुसर्‍या लाडक्या विरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे. जेव्हा आतल्या गोष्टी बाहेर येतात, तेव्हा केजरीवाल तक्रार करणार्‍याला घरभेदी म्हणून बाहेर काढतात, असा इतिहास आहे. अगदी लोकपाल आंदोलनापासूनचा तोच इतिहास आहे. स्वामी अग्निवेश यांच्यापासून सुरूवात करून आपण किरण बेदी व योगेंद्र यादव किंवा प्रशांत भूषण यांच्यापर्यंत लांबलचक यादी तयार करू शकतो. आणि अशा प्रत्येकवेळी केजरीवाल यांच्यावर व्यक्तीगत आरोप करून हे लोक शत्रू झालेले आहेत. उलट सोमनाथ भारतीपासून जितेंद्र तोमर अशा विश्वासू सहकार्‍यांविरुद्ध सज्जड पुरावे कोर्टात आल्यावरच केजरीवाल यांनी त्यांची साथ सोडलेली दिसेल. म्हणजे़च आपले जे विश्वासू आहेत व निष्ठावान आहेत, त्यांच्यावर भयंकर गुन्ह्याचे वा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा चांगल्या चारित्र्यसंपन्न सहकार्‍यांचा केजरीवाल यांनी राजरोस बळी दिलेला आहे. त्याचवेळी भ्रष्ट गुन्हेगारांचे समर्थन केलेले आहे. आताही गोष्ट वेगळी नाही. राजेंद्रकुमार यांच्याविषयी कुठलाही भक्कम बचाव मांडायला केजरीवाल धजावलेले नाहीत. म्हणजेच आपला हा सचिव भ्रष्ट व गुन्हेगार असल्याची केजरीवाल यांना पुरेपुर खात्री आहे. त्याच्या विरोधात पुरावे आहेत आणि तो सुटणार नाही, याचीही खात्री आहे. मग त्याला वाचवता येत नाही म्हणून सगळ्या तपासाला चौकशीला राजकीय रंग देण्याचा तमाशा त्यांनी सुरू केला आहे. त्यातही काही नवे नाही. दोन वर्षापुर्वी सोमनाथ भारती यांनी एका वस्तीतील महिलांना अटक करण्यावरून पोलिसांशी हाणामारीपर्यंत प्रसंग आणला. तेव्हाही मुख्यमंत्री असून रेलभवन समोर धरण्याचा तमाशा केजरीवाल यांनी केला नव्हता का?

आज केजरीवाल यांनी तमाशा करण्यामागचे तर्कशास्त्र समजून घेतले पाहिजे. राजेंद्रकुमार यांना वाचवणे शक्य नाही. पण ही कारवाई करताना गप्प बसले, तर लोक आपल्याकडेही संशयाने बघणार म्हणुन कांगावा चालू आहे. इतका भ्रष्ट अधिकारी मुख्य सचिव नेमला, म्हणजे केजरीवाल भ्रष्टाचारी गुन्हेगारांना आश्रय देतो आणि त्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करतो, असे मत होण्याच्या भयाने केजरीवाल भेडसावले आहेत. दुसरी गोष्ट अतिशय आत्मकेंद्री असल्याने त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तर ते नेहमी उफ़राटी उत्तरे देतात, पण मूळ प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. ही अत्यंत असुरक्षित मानसिकतेची खुण असते. त्यांच्या प्रत्यारोपातील पोकळपणा स्पष्ट आहे. जी दिल्ली क्रिकेट संघटनेची फ़ाईल मिळवण्यासाठी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ह्या धाडी घडवून आणल्या असे केजरीवाल म्हणतात, ती फ़ाईल अथवा आरोपपत्र हवे असतील, तर भाजपाला पक्षांतर्गतही मिळू शकतात. कारण ते आरोप व त्याविषयीचे पत्र भाजपाचे बिहारमधील खासदार किर्ती आझद यांचेच आहे. मग भाजपाला त्यांच्याकडून ती कागदपत्रे मिळू शकतात. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाण्याची गरज काय? आणि त्यासाठी राजेंद्रकुमार यांच्याशी संबंधित आणखी तेरा जागी धाडी घालण्याचे तरी कारण काय? हे केजरीवालही पुरते जाणुन आहेत. पण तोंड लपवायला जागा नसली, मग तमाशा मांडणे हा त्यांचा स्वभावच झालेला आहे. प्रश्न इतकाच आहे, की आता केजरीवाल हे पुरोगामी विरोधकांचे नवे गुरू झाले आहेत. अगदी कॉग्रेस व सोनियाही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ लागले आहेत. यापेक्षा सव्वाशे वर्षे जुन्या कॉग्रेसची आणखी मोठी शोकांतिका दुसरी कुठली असू शकेल? हा तमाशा पुढली साडेतीन वर्षे असाच चालू राहिला, तर मोदींना पुन्हा लोकसभा जिंकण्याचे काम अतिशय सोपे होऊन जाईल आणि विरोधकांची स्थिती लोकपाल आंदोलनासारखी निष्फ़ळ होऊन जाईल. मंगळवारी भगवंत मान यांना ‘पाणी पाजून’ मोदींनी त्याचा सूचक इशाराच दिला असावा.

(पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर)

रविवार   २०/१२/२०१५

No comments:

Post a Comment