Monday, December 14, 2015

शरद पवारांचे ‘अमृताचे बोल’



गेल्या शनिवारी शरद पवार यांचा अमृत महोत्सव साजरा झाला आणि त्या निमीत्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यापैकी काहींमध्ये खुद्द पवार सहभागी झाले, तर काही बाबतीत त्यांचे मतप्रदर्शन व्यक्त करण्याचे आयोजन झालेले होते. लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर देशातला सर्वात अनुभवी किंवा जाणता राजकारणी म्हणून आज पवारांची ओळख आहे. पण त्या अनुभवाचे वा राजकीय प्रतिभेचे सार्थक करण्यात अपेशी ठरलेले नेते, अशीच दोघांची ओळख असावी हे देशाचे मोठे दुर्दैव आहे. यातले अडवाणी उत्तरार्धात बहकत गेले, तर शरद पवार ऐन उमेदीत असताना बहकले. पण दोघांचाही उत्तरार्ध तितकाच शोकांत आहे. पंतप्रधान व्हायच्या गुणवत्ता व पात्रतेचे असूनही अडवाणींना योग्य तो पाठींबा आपल्या पक्षात निर्माण करता आला, तरी बाहेरची मदत मिळवण्यातल्या अपयशाने अडवाणींना मागे पडावे लागले. तर पवार यांना सतत धुर्तपणाच्या आहारी जाऊन केलेल्या प्रत्येक खेळीने तात्पुरते यश मिळत जाऊन, आपलीच घसरगुंडी रोखता आली नाही. असे दोन नेते ऐन भरात असताना अजिबात राजकीय महत्वाकांक्षा नसलेला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखा (थेट निवडून येऊही न शकणारा) माणूस देशाचा दहा वर्षे पंतप्रधान राहू शकला, हे जितके सोनियांच्या राजकारणाचे फ़लित आहे, तितकेच पवार-अडवाणींचे नाकर्तेपण आहे. म्हणूनच पवारांचा अमृत महोत्सव किंवा त्यानिमीत्त झालेल्या चर्चेचा, मनोगताचा उहापोह करताना; तत्कालीन राजकारण दुर्लक्षून चालणार नाही. पवारांच्याच शब्दात सांगायचे, तर आरंभी तुफ़ान वेगाने दौडत सुटलेल्या स्पर्धकाला मॅराथॉन जिंकता येत नाही. कारण आधी तो मोठा पल्ला गाठण्यात व इतरांना मागे टाकण्यात सर्व शक्ती पणाला लावतो आणि अखेरचा निर्णायक टप्पा येतो, तेव्हा त्याच्या अंगी बळच उरलेले नसते. त्याच्याही मागे पडलेले मग सहज मॅराथॉन जिंकतात.

दोन वर्षापुर्वी गुजरातची विधानसभा तिसर्‍यांदा सलग जिंकल्यावर लगेच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलेले नरेंद्र मोदी, यांच्याविषयी शरद पवार यांनी व्यक्त केलेले हे मत किंवा शेरा होता. तो मोदींच्या बाबतीत चुकीचा ठरला, म्हणून मुद्दा चुकीचा नव्हता. तो विचार वा अंदाज नव्हता. शरद पवार यांचा तो अनुभव होता. आमदार झाल्यापासून दहा वर्षात थेट मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांनी मारलेली मजल आणि पुढल्या दहा वर्षात विरोधी पक्षात बसून आशाळभूत राजकारण केल्यावर पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी पत्करलेली शरणागती; त्यांना काही शिकवून गेली नाही. म्हणून मग पुन्हा मुख्यमंत्री पदावरून थेट पंतप्रधान पदापर्यंत झेप घेण्यातून, दिल्ली पादाक्रांत करण्याचे मॅराथॉन स्वप्न भंग होताना बघण्याचे त्यांच्या नशिबी आहे. पेयाचा पेला ओठापाशी न्यायचा आणि त्याचा घोटही घेता येऊ नये, इतकी शोकांतिका त्यांच्या नशिबी आली. त्यासाठी दुसर्‍या कोणाला दोषी ठरवता येत नाही, इतका पवारांचा धुर्तपणा त्याला जबाबदार आहे. तो धुर्तपणा असण्यापेक्षा नेहमी उतावळ्या दिखावू खेळी राहिल्या. त्यानेच या प्रतिभावान राजकारण्याला शोकंतिकेचा नायक करून टाकले. १९९१ सालात राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर कॉग्रेसमध्ये त्यांच्याइतका खरेच कोणी अन्य नेता पंतप्रधान पदाला लायक नव्हता. पण सोनियांच्या पाठींब्याविना त्यांना त्यापासून वंचित रहावे लागले. किंबहूना सोनियाच त्यातला मोठा अडसर बनून गेला. त्याची वाच्यता त्यांनी पुर्वी कधी केली नाही. पण पुढे सोनियांची मर्जी संपादन करण्यासाठीच सीताराम केसरी यांची उचलबांगडी करण्यात पवार यांनीच पुढाकार घेतला होता. मात्र या धुर्त नेत्यापेक्षा अननुभवी सोनिया अधिक धुर्त निघाल्या आणि एक शब्दही न बोलता त्यांनी पवारांना खड्यासारखे बाजूला ठेवले. किंबहूना तसे होण्याची खेळीही पवारांकडून सोनियांनीच खेळून घेतली. पण म्हणून धुर्त पवार काही धडा शिकले असे म्हणता येत नाही.

आताही विधानसभेच्या निकालानंतर किंवा मतदानापुर्वी शिवसेना-युतीत दुफ़ळी माजवण्याची आपण ‘खेळी’ केल्याचेच त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवले आहे. सकारात्मक राजकारणापेक्षा आपली उर्जा पवारांनी कायम नकारात्मक डावपेच वा खेळी खेळण्यात खर्ची घातली. म्हणून ते आपल्या राजकारणाचा किल्ला कधी उभा करू शकले नाहीत, तर इतरांचे बुरूज ढासळण्यात रममाण राहिले. म्हणून त्यांचा किल्ला उभा राहिला नाही, की साम्राज्य निर्माण होऊ शकले नाही. १९९९ सालामध्ये वाजपेयी सरकार सत्तेत होते आणि विरोधातही त्यांना सोनियांनी संसदीय नेतेपद मिळू दिले नव्हते. फ़ार कशाला डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या प्रयत्नांनी जयललितांनी पाठींबा काढून घेतल्याने पेच निर्माण झाला आणि विश्वास प्रस्ताव संमत करण्याची नामुष्की भाजपावर आली. तेव्हा पवार विरोधीनेता होते. त्या प्रस्तावावर विरोधीनेता म्हणून बोलण्याचा अग्रहक्क त्यांचा होता. पण सोनियांनी तोही नाकारला आणि कॉग्रेसतर्फ़े माधवराव शिंदे बोलले होते. पवारांना बोलूही दिलेले नव्हते. पण तोच प्रस्ताव बारगळला आणि वाजपेयी सरकार कोसळले. तर सोनियांची मर्जी संपादन करण्याचा शेवटचा अगतिक प्रयास पवारांनी तिथल्या तिथेच केला. संसद भवनाच्या पायरीवर उभे राहून त्यांनी सोनियांच्या नेतृत्वाखाली पर्यायी सरकार बनवण्याची घोषणा केली. हा धुर्तपणा नव्हता तर मुर्खपणा होता. कारण मुलायमसारखे विरोधक खुद्द पवारांच्या नावाची मागणी करण्याच्या तयारीत होते आणि त्यांचा सोनियांना विरोध होता. तर गप्प राहुनही पवार बिगरकॉग्रेसी विरोधकांचे नेता होऊ शकले असते आणि सोनियांना परस्पर शह मिळू शकला असता. पण धुर्त खेळीच्या हव्यासाने पवार आपल्याच पायावर धोंडा मारून बसले. शेवट काय झाला? सोनियांना देशाचे पर्यायी पंतप्रधान बनवायला निघालेले पवारच परकीय नागरिक म्हणून सोनियांवर आरोप करीत पक्षातून बाहेर पडले.

हा सगळा जुना इतिहास एवढ्यासाठी सांगायचा, की प्रतिभा, गुण व अनुभव पाठीशी असलेला हा नेता, सतत धुर्तपणाच्या आहारी जाऊन स्वत:लाच उध्वस्त करीत राहिला. कॉग्रेसला नेहरू-गांधी घराण्यापासून फ़ारकत घेता येणार नसली, तरी त्यांची मर्जी संभाळून पर्यायी नेतृत्व कॉग्रेसमध्ये उभे राहू शकते, असे पवार आज सांगतात. तेव्हा तसे आपण करू शकलो असतो, असेच त्यांना म्हणायचे व सूचवायचे आहे. किंबहूना सोनियांनी आपल्याला ती संधी नाकारल्यानेच आज कॉग्रेसची इतकी दुर्दशा झाली आहे, असेही त्यांना म्हणायचे आहे. मात्र त्याच कारणास्तव त्यांना राज्यातही आपल्या नेतृत्वाखाली भक्कम प्रादेशिक पक्ष उभा करता आला नाही, हे वास्तव त्यांना अजून स्विकारता आलेले नाही. त्याला भौगोलिक कारणे पवार देतात, हा शुद्ध बनवेगिरीचा प्रकार आहे. त्यांनी तसा प्रयत्नच कधी केला नाही. किंबहूना पक्ष व संघटना बांधण्यापेक्षा आणि स्वत:विषयी विश्वास निर्माण करण्यापेक्षा उनाड धुर्त खेळी करण्यातच पवार दिर्घकाळ धन्यता मानत राहिले. त्यातून त्यांनी आपल्या गुणवत्तेचा पुर्ण विचका करून टाकला. म्हणून मग त्याच्यापेक्षा कमी कुवतीचे वा दुय्यम दर्जाचे नेते अधिक यशस्वी होताना दिसले. मोठा पल्ला गाठताना दिसले. स्वबळावर देशातही पवार मोठे राजकारण करू शकले असते. पण सकारात्मक कृतीपेक्षा झटपट यशासाठी त्यांनी धुर्तपणाच्या आहारी जाऊन नकारात्मकतेची विघातक कास धरली. म्हणून मग त्यांचे दिर्घकालीन मित्र राहुल बजाज विषण्ण मनाने म्हणतात, ‘शरद पवार हा देशाला न लाभलेला सर्वात उत्तम पंतप्रधान होता.’ त्यातली वेदना बजाजना सतावते आहे. पण खुद्द पवारांना त्याचे कितपत वैषम्य आहे, याचीही शंका येते. आपण या प्रदिर्घ वाटचालीत काय गमावले, याचे सिंहावलोकन तरी पुढल्या काळात पवार यांनी करावे आणि त्याचे प्रामाणिक विश्लेषण आत्मटिका म्हणून लिहून काढावे, ही त्यांच्याकडून अपेक्षा! कारण त्यांच्या इतक्या उत्तुंग प्रतिभा, गुण व अनुभव असलेल्या भविष्यातल्या राजकीय कार्यकर्ते व नेत्यांसाठी ते ‘अमृताचे बोल’ ठरू शकतील

10 comments:

  1. शरद पवारांचे यथायोग्य मूल्यमापन
    आपल्या जागता पहारा या ब्लॉग लेखनाद्वारे आपण शरद पवारांचे यथायोग्य मूल्यमापन केले आहे. पक्ष व संघटना बांधण्यापेक्षा आणि स्वत:विषयी विश्वास निर्माण करण्यापेक्षा उनाड धुर्त खेळी करण्यातच पवार दिर्घकाळ धन्यता मानत राहिले. त्यातून त्यांनी आपल्या गुणवत्तेचा पुर्ण विचका करून टाकला. तसेच सकारात्मक कृतीपेक्षा झटपट यशासाठी त्यांनी धुर्तपणाच्या आहारी जाऊन नकारात्मकतेची विघातक कास धरली.
    या त्यांच्या गुणांमुळेच त्यांच्या बारामतीच्या परिसरातील विकास कामे, किल्लारी भूकंपाच्या वेळी तत्परतेने केलेले पुनर्वसनाचे यापेक्षा त्यांनी केंद्रातून सुधाकर नाईकांना हटवून परत मुख्यमंत्री म्हणून येण्याची केलेली खेळी, तसेच पुण्याच्या कसबा पेठेतील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा नीचपणे मध्यरात्री कापून काढण्याची कृती अधिक लक्षात राहते. यामागे शरद पवार निश्चितपणे नाहीत हे ते स्वतःसुद्धा सांगू शकणार नाही.
    विद्याधर(विजय) कुलकर्णी

    ReplyDelete
  2. तोरसेकर जी , आपले अमृताचे बोल वाचले, आपण तर्क चांगला मांडला , यात काव्य अधिक दिसले पण वास्तविकता मांडण्यात तुम्ही हात अखुडता घेतलेला दिसतोय. जर आपण दिल्लीतील राजकारणाशी परिचित असाल तर मा. यशवंतराव यांचे बाबत काय घडले हेही आपण मांडू शकला असता. पण ते आपण का मांडले नाही कि जाणून बुजून ते टाळले . मुळातच १९८० पासून कॉंग्रेस हि तळागाळातील कार्यकर्त्यांपासून दूर गेलेली संघटना झाली आहे हे सत्य आपण टाळले आहे . कॉंग्रेस चे नेतृत्व हे केंद्रीय झालेले आहे , तेथील विकेंद्रीकरणाची प्रक्रिया संपलेली आहे व हाय कमांड ची संकल्पना रुजवल्या गेली आहे म्हणूनच कॉंग्रेस सामान्या पासून दूर दूर जात आहे . तिथे संघटन शक्तीत विश्वास ठेवणार्याची किंमत राहिली नाही तर तोंड्स्तुती करणाऱ्या हुज्र्यांची किंमत होते . म्हणूनच विचारवंतांच्या भूमीत जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब , मा. यशवंतराव व मा. शरद पवार या महाराष्ट्रातल्या ची प्रतारणा झाली हे सत्य आपण समजून घ्यायलाच हवे . दिल्लीत इतर कुणीही चालेल पण मराठी माणूस चालत नाही हे आम्ही जवळून पाहिले आहे . उपरोक्त उल्लेखिलेले नेते त्याचे बळी ठरलेत .

    ReplyDelete
  3. फार छान लेख !!.........आतापर्यंत गेले चार दिवस सर्वजण फक्त ' छान छानच ' बोलत होते पवारांबद्दल. तुमचा लेख हा खरी खरी ' झाडा-झडती ' घेणारा आहे. ' सह्याद्री ' वाहिनीवर जब्बार पटेलांनी इतकी गुडी गुडी मुलाखत घेतली ............कि ती फक्त ' आरती ' ओवाळणेच होते. .................पण हे जे काही त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केले ते तरी किमान त्यांच्या पुढील पिढीला जमेल का हाच प्रश्न आहे.

    ReplyDelete
  4. शरद पवारांचे यथायोग्य मूल्यमापन.

    ReplyDelete
  5. Pawar sahebache anek gun ahe pan tyapeksha tyancha vishayi je sanshyane bolle jate te ki te je boltat te kadhi karat nahi.tyamule kaykarte che jale asle tari saheb kay kheli kartil ya var koni vishwas theu shakat nahi. Agdi lahnan pasun mothan paryant sarvanche hech mat ahe.

    ReplyDelete
  6. Hat's off for the perfect analysis Bhau. I think this baseline can be referred by all.

    ReplyDelete
  7. भाऊ … आपण छान विश्लेषण करता , अचूक व स्पष्ट.
    या मुळे मला पुढील म्हणी आठवल्या -
    तुझे आहे तुजपाशी … परी तू मार्ग चुकलासी !
    जसे पेराल …तसे उगवेल !
    चांगला विचार करा , चांगले होईल … वाईट केला तर …

    ReplyDelete
  8. पवार बाहेर पडले कि पवारांना रितसर हाकलले सोनिया मॅडम ने ??

    ReplyDelete
  9. शरद पवारांचे यथायोग्य मूल्यमापन.पण मराठी माणूस दिल्लीत चालत नाही हे हि तितकेच खरे

    ReplyDelete