Saturday, February 13, 2016

पुरोगामी जिहादी मोडस ऑपरेंडी

पुरोगामी झाले की आपली विवेकबुद्धी व तर्कबुद्धी कशी लोक गमावून बसतात, त्याचे सुंदर नमूने सध्या बघायला मिळत आहेत. सीताराम येच्युरी हे मार्क्सवादी पक्षाचे सर्वोच्च नेते त्याचीच ग्वाही जाहिरपणे देत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारतविरोधी उचापती झाल्याचा पुरावा म्हणून जे चित्रण समोर आले, ते त्यांना खोटे वाटते आहे. अर्थात ते खोटे पाडण्यासाठी त्यांनी एक अतिशय नेमका मुद्दा उपस्थित केला आहे. नेहरू विद्यापीठात कुठेही कॅमेरेच नाहीत, मग हे चित्रण आलेच कुठून, असा येच्युरी यांचा सवाल आहे. एएनआय नामक वृत्तसंस्थेच्या ट्वीटर खात्यावर ती बातमी छायाचित्रासह प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे तमाम पुरोगामी फ़ुशारले तर नवल नाही. कारण त्यापैकी कोणालाही सत्याची चाड नसतेच. तशीच मुर्खपणाही आवडत असतो. मग येच्युरींनी तद्दन बावळटपणा केल्यावर पुरोगाम्यांना हायसे वाटल्यास नवल नाही. पण जो प्रश्न येच्युरी यांनी विचारला आहे, तो त्यांच्या प्रगत म्हणजे पुरोगामी असण्याची साक्ष नसून पक्के प्रतिगामी व मागास मानसिकतेचा व अज्ञानाचा सज्जड पुरावा आहे. चित्रण कुठेतरी बसवलेल्या कॅमेरातून होते, अथवा फ़त स्टुडिओतच होते, अशा समजूतीत हा मार्क्सवादी नेता जगतो आहे. त्याला छुपे कॅमेरे कुठेही केव्हाही नेवून चित्रण होऊ शकते, त्याचा थांगपत्ता अजून लागलेला नाही. स्मार्टफ़ोन हे तर आज कोट्यवधी लोकांच्या हातातले हत्यार बनले आहे. पण त्याहीशिवाय छुपे इवलेसे शक्तीशाली कॅमेरेही बाजारात उपलब्ध आहेत. तेच नाही तर त्याच शक्तीशाली कॅमेराच्या छुप्या चित्रणाच्या बळावर मागली दहाबारा वर्षे अनेक पुरोगामी क्रांत्या झालेल्या आहेत. आशिष खेतान, तरूण तेजपाल आदि इत्यादी पुरोगामी क्रांतिकारक त्यातूनच नावारूपाला आल्याचे येच्युरी यांच्या ध्यानीमनीही दिसत नाही. चित्रणासाठी विद्यापीठाने कॅमेरे तैनात करायची गरज आता नसून कोणीही विद्यार्थी साध्या फ़ोनवरही चित्रण करू शकतो. पण हे लक्षात यायला आणि असले प्रश्न विचारून आपले खुळेपण सिद्ध न करण्यासाठी, किमान विवेकबुद्धी अंगी असायला हवी ना?
वादासाठी आपण येच्युरी यांच्या महान शोधाचे अभिनंदन करू आणि त्यांच्या अकलेचे थोडे मोजमाप करूया! आजपासून तब्बल बारा वर्षे मागे जाऊन तरूण तेजपाल आणि अनिरुद्ध बहल यांनी ‘तहलका’ नामक वेबसाईटवर काही चित्रण टाकले होते. त्यावरून प्रचंड गदारोळ याच येच्युरी वंशियांनी आरंभला होता. कारण तिथे असेच काही चित्रण वाजपेयी सरकारच्या भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून प्रदर्शित केले होते. ते चित्रण बंगारू लक्ष्मण आणि जॉर्ज फ़र्नांडीस यांच्या सरकारी बंगल्यातील होते. त्यावेळी येच्युरी यांनी सरकारी बंगल्यात कॅमेरे कुठे लावलेले असतात, असा प्रश्न विचारला होता काय? कारण तेव्हा तर याप्रकारचे छोटे व छुपे कॅमेरे सहज उपलब्ध नव्हते. आज कुठल्याही स्मार्टफ़ोनमध्ये हे कॅमेरे तैनात आहेत. त्यावेळी कॅमेरे कुठले, असा प्रश्न येच्युरी यांना पडला नव्हता, की त्यांच्या कुणा पुरोगामी घराण्यातील किराण्यालाही त्या प्रश्नाने सतावले नव्हते. कारण सवाल आरोप कोणावर होतो आहे, त्यानुसार पुराव्याची वैधता नक्की करणे, हा डाव्यांचा निकष असतो. विरोधकांवर कुठलाही आरोप केला वा कसलाही पुरावा दिला, मग साक्षीपुराव्याची गरज नसते तर खोटा पुरावाही पुरेसा असतो. पण आपल्यातला कोणी फ़सला असेल, तर मात्र पुरावेच नाकारायचे असतात. जसा पाकिस्तान कसाब वा पठणकोटच्या हल्ल्यानंतर इन्कार करतो. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदु दहशतवादाचा आरोप केल्यावर तोयबाचा जनक सईद हाफ़ीज त्यांच्याकडे कुठला पुरावा मागत नाही, तर त्यांचे तात्काळ अभिनंदन करतो. पण भारताने कसाबविषयी पुरावे दिले, मग तोच हाफ़ीज वा त्याचा बोलविता धनी पाकिस्तान पुराव्यांवर संशय व्यक्त करतात. आजकाल पाकिस्तान व डाव्या पुरोगाम्याची मोडस ऑपरेंडी कशी एकसारखी होत चालली आहे ना? डावे नुसते पाकिस्तानवादी झालेले नाहीत, ते थेट पाकिस्तानी भाषेत बोलू लागले आहेत. पाक, मुशर्रफ़, हाफ़ीज वा येच्युरी इत्यादींचे शब्द व युक्तीवाद बारकाईने तपासून बघा, त्यात जबरदस्त साम्य आढळून येईल. कारण आता पुरोगामीत्व जिहादी वस्त्रे चढवून मैदानात येऊ लागले आहे.
येच्युरी व हाफ़ीज यांच्या भाषेतील, शंका प्रश्नातील साम्य लक्षात आले, तर नेहरू विद्यापीठात अफ़जल गुरूचा उदो उदो कशाला होऊ शकतो, त्याचा उलगडा होऊ शकेल. काही महिन्यांपुर्वी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. शेषराव मोरे यांनी अंदमान येथे ‘पुरोगामी दहशतवाद’ अशी शब्दावली वापरली होती. त्यावरून खुप गदारोळ माजवण्यात आला. मोरे यांच्याकडून एक शब्दाची चुक झाली होती. त्यांना ‘पुरोगामी जिहाद’ म्हणायचे असावे. पण सतत बुद्धीमंतांच्या सहवासात राहिल्याने त्यांनी दहशतवाद असा भ्रामक शब्द वापरला. कारण मोदींच्या हाती सत्ता येण्याच्या आधीपासून भारतातल्या पुरोगाम्यांनी हाय खाल्ली आहे. आता त्यांना जिहादच आपल्याला वाचवू शकेल, अशी खुळी आशा वाटते आहे. म्हणून त्यांनी थेट जिहादी मानसिकतेचे अनुकरण सुरू केले आहे. जिहादचा कार्यक्रम पुरोगामी म्हणून मान्य केला आहे. त्यामुळे त्यांना मार्क्स, लेनिन वा माओकडे पाठ फ़िरवून ओसामा बिन लादेन, सईद हाफ़ीज वा मौलाना अझहर मसूद यांच्या विचारसरणीचा अवलंब करणे भाग आहे. तसे नसते तर नेहरू विद्यापिठात जी घटना घडली, त्यानंतर सईद हाफ़ीज भारतीय पुरोगाम्यांच्या समर्थनार्थ कशाला मैदानात आला असता? तिथे विद्यार्थ्यांना वा आंदोलकांना अटक झाल्यावर सर्वात पहिली संतप्त प्रतिक्रिया पाकिस्तानातून हाफ़ीज यांनी दिलेली आहे. कारण आता पुरोगामीत्व किंवा सेक्युलर क्रांतीला जिहादींनी दत्तक घेतले आहे. यामागची मनोवृत्ती व वास्तविकताही कधीतरी तपासून बघण्याची गरज आहे. तिथे हैद्राबादेत रोहित वेमुला नावाचा विद्यार्थी आत्महत्या करतो त्याचे खापर भाजपा वा मोदींच्या माथ्यावर फ़ोडायला सगळेच पुरोगामी उतावळे होतात. त्याला दाभोळकर पानसरेंच्या हत्येचा संदर्भ जोडला जातो. पण बाजूच्या केरळात मार्क्सवाद्यांचा मोठा नेता जयराजन याला संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येसाठी पोलिसांनी अटक केल्याविषयी सार्वत्रिक मौन धारण केले जाते. येच्युरी त्याबद्दल काहीच कसे बोलत नाहीत? केरळात कॉग्रेसचे सरकार आहे. तिथे तर पुरोगाम्यालाच खुनी म्हणून पकडले आहे ना?
सगळा मामलाच गोलमाल आहे. सगळे शब्दच गोलमाल आहेत. पुरोगाम्यांशी बोलताना किंवा त्यांचे काही ऐकताना सामान्य माणसाच्या बुद्धीला माहित असणरे शब्द वा त्यांचे अर्थ बदलत असतात. नेमक्या उलट अर्थाने त्यांचे शब्द घ्यावे लागतात. त्यांनी राष्ट्रप्रेम म्हटले की आपण त्याला राष्ट्रद्रोह मानायला अजिबात हरकत नाही. त्यांनी प्रेम म्हटले की आपण त्याचा अर्थ द्वेष असा घ्यायचा असतो. त्यांनी संहिष्णूता म्हटले की त्याला खुशाल असंहिष्णूता समजावे. येच्युरींचे अज्ञान म्हणूनच अगाध ज्ञान असते. आजवर भाजपाला गोत्यात टाकण्यासाठी शेकडो स्टींग ऑपरेशन झाली आहेत. पण तेव्हा त्या जागी कॅमेरा नसतो, हा प्रश्न त्यांना सुचत नाही, याचे कारण हे असे आहे. १९६२ सालात भारतावर चीनी लालसेनेने आक्रमण केले, तेव्हा येच्युरींचे पुर्वज नंबुद्रीपाद वा बी टी रणदिवे यांनी त्याला मुक्तीची पहाट ठरवले होते. त्यासाठी त्यांच्यासारख्या मार्क्सवाद्यांना उचलून गजाआड टाकण्याचे महान ‘प्रतिगामी’ कार्य करणार्‍या पंतप्रधानाचे नाव जवाहरलाल नेहरू असे होते. येच्युरी जिथल्या कॅमेराबद्दल बोलत आहेत, त्या विद्यापीठाचे नावही योगायोगाने जवाहरलाल नेहरू असेच आहे. येच्युरींच्या पुर्वजांकडून देशाच्या एकात्मतेला धोका नसता, तर नेहरूंनी त्यांना तुरूंगात कशाला टाकले असते? तेव्हाच्या मार्क्सवाद्यांच्या मुक्तीच्या घोषणा आणि आज विद्यापीठामध्ये झालेल्या ‘भारतकी बरबादी’च्या घोषणा, यात तसूभर फ़रक नाही. फ़रक किरकोळ आहे. तेव्हा त्या मार्क्सवाद्यांना अटक करण्याची मागणी करणार्‍या समाजवादी नेत्यांचे आजचे वंशज त्याच मार्क्सवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून पाकिस्तानवादी भाषा बोलत आहेत. डॉ. राममनोहर लोहिया किंवा बॅ. नाथ पै अशा नेत्यांचे आजचे वारस येच्युरी व जिहादी यांच्या साथीने देशद्रोहाला चालना देण्यात पुढाकार घेत आहेत. संघद्वेषाने त्यांना इतके आंधळेपण आलेले आहे, की आपल्याच महान समाजवादी पुर्वजांच्या विचारांचा ठेवाही त्यांनी उकिरड्यात फ़ेकून दिला आहे. म्हणूनच आगामी काळात जिहाद व पुरोगामीत्व यांच्यातला नातेसंबंध शोधणे व उलगडून समजून घेणे, अगत्याचे होत जाणार आहे.

5 comments:

  1. It is a perfect comment.These people are still under the impression that they can fight Narendra Modi only by this way.And, it shows that now they donot have any valid point to put forward.

    ReplyDelete
  2. भाऊ सनातन वर बंदीची भाषा चालू आहे पण आधी कांग्रेस secular व jnu वर बंदीची गरज आहे

    ReplyDelete
  3. खर तर डी राजा ,जितेंद्र आव्हाड ,राहुल गांधी या सर्वांना रस्त्यावर घेऊन हव तस तुडवा . तरच हे शांत बसतील

    ReplyDelete
  4. भाऊ, येचुरीची कॉमेंट अजिबात मूर्खपणाची नाही, बदमाशीची आहे. त्याला माहीत आहे कॅमेरा कसे असतात ते, पण मुद्दा हा आहे की त्याला त्याचा बाइट घेतेवेळी हा प्रश्न कसं कोणी विचारला नाही. मेख तिथेच आहे. शेंबडं पोर ही विचारेल असा प्रश्न त्याला अनुभवी पत्रकार का विचारात नाहीत आणि ही मुलाखत तशीच्या तशी एयर कशी केली जाते आणि रेकॉर्ड बनून राहते हा मुद्दा विचारात घेण्याचा आहे. मीडिया मॅनेजमेंट ती हीच.

    ReplyDelete
  5. भाऊ हे लाेक बेशरमाहून जायल आहे मह्णून हे देशाची अस्मिता ची अहवेलना करतील कारण जाे पयँत या देशाची स्वाभिमानी जनता यांना चोप देनार नाही तो पयँत यांच्या उचापति चालु राहणार खरतर भाऊ वेळ आलेली आहे जनतेन ठरवाव तरच या गद्ारांना कोणीच विचारनार नाही फक्त मिडीया वाले

    ReplyDelete