Wednesday, March 22, 2017

द्रोणाचार्य कामाला लागले

yogi adityanath के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेत्याची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली हे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या इशार्‍यावरच ही निवड झालेली आहे. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांना अशा पदावर बसवले, तर कोणत्या प्रतिक्रीया उमटतील व काय होईल, याचा अंदाज मोदींनी आधीच बांधलेला नसेल, असे कोणी म्हणू शकत नाही. सहाजिकच आज जे कोणी योगींच्या नावाने शंख करीत आहेत, त्यांनी थोडा वेगळा विचार करायला हरकत नाही. मागल्या दिड दशकात नरेंद्र मोदी या भाजपा नेत्याला कोंडीत पकडण्याचे एकाहून एक खतरनाक डावपेच फ़सत गेल्यानंतरही, विरोधकांना वेगळा विचार करण्याची गरज वाटू नये, ही मोदी विरोधकांची खरोखरच शोकांतिका होऊ लागली आहे. कारण हळुहळू आजकाल मोदीही आपल्या विरोधकांवर मोठ्या प्रमाणात विसंबून राहू लागले आहेत. म्हणजे आपल्या धोरण व हेतूसाठी आपण काय करायचे, ते मोदीच ठरवत असतात. पण आपल्या हेतूसाठी विरोधकांनी काय करावे वा कसे वागावे, तेही आता मोदी ठरवू लागले आहेत. दुर्दैवाने विरोधक सुद्धा बिनदिक्कत मोदींना हवे तसे वागू लागले आहेत. थोडक्यात मोदींनी काहीही केले तरी त्याच्या विरोधात उभे ठाकणे, हा एककलमी कार्यक्रम होऊन गेला आहे. सहाजिकच कशाला विरोध होईल ते बघून मोदी तसेच मुद्दे घेतात वा तशाच खेळी खेळत असतात. आताही योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदी नेमल्यास कडवा विरोध होणार, हे मोदींचे गृहीत असणार. पण त्याच विरोधाच्या भट्टीत आदित्यनाथ यांना टाकले, तर हा तरूण तावून सुलाखून निघू शकेल, अशी मोदींची अपेक्षा असावी. कारण मोदी स्वत:च अशा आगीतून निघालेले आहेत आणि विरोधकांनीच मोदींच्या नेतृत्वाला पैलू पाडलेले आहेत. जे काम भाजपाचा कोणी नेता किंवा संघाच्या शिबीरात होऊ शकत नाही, ते सेक्युलर द्रोणाचार्यांकडून होऊ शकते, हा मोदींचा अनुभव आहे.

२००१ सालात अकस्मात तरूण मोदींवर गुजरातचा मुख्यमंत्री होण्याची कामगिरी सोपवण्यात आली, तेव्हा त्यांना कसलाही प्रशासकीय अनुभव नव्हता की निवडणूकीचाही अनुभव नव्हता. सहाजिकच त्यांच्याकडून चाचपडत जो कारभार झाला, त्यातून मोदी एका भीषण सापळ्यात ओढले गेले. संघाच्या शिबीर, अभ्यासवर्गात वा प्रशिक्षणात जे काही ऐकले व आत्मसात केले होते, त्याची कसोटी त्यानंतर लागत गेली. आपल्यावरचे संस्कार व प्रशिक्षण गैरलागू नाही, हे सिद्ध करण्याचे आव्हान गुजरातमध्ये मोदींसमोर विरोधकांनीच उभे केले. पुढल्या काळात आपली गुणवत्ता, कर्तृत्व सिद्ध करण्याचे आव्हान पेलून, मोदी ठामपणे उभे रहात गेले. विरोधकांना खोटे पाडताना जे काही गुण उफ़ाळून आले, त्यातून बारा वर्षांनी भारताला पंतप्रधान मिळाला. खरे तर अननुभवी मोदींकडून काही चुका होत असतील, तर त्यांना समजून घेऊन सुधारणा करायला सहाय्य देण्याची गरज होती. पण विरोधात उभा ठाकलेला प्रत्येकजण मोदींना बळी द्यायला सिद्ध झालेला आणि त्यातून आपले संरक्षण करताना मोदींना प्रत्येक धडा अनुभवातून शिकावा लागला होता. जसा महाभारत काळातला एकलव्य एकाकी शिकला व द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास साफ़ नकार दिला होता, तशाच स्थितीतून मोदींना जावे लागले. पण देशातल्या तमाम सेक्युलर द्रोणाचार्यांनी एक असा नेता उभा केला, की तोच तमाम द्रोणाचार्यांना पुरून उरला. अवघ्या दहाबारा महिन्यात या सर्व द्रोणाचार्यांनी मोदींना साधा मुख्यमंत्री होण्यास नालायक ठरवून टाकलेले होते. पण या द्रोणाचार्यांना चुकीचे ठरवित मोदी वाटचाल करीत गेले आणि एक तपानंतर तोच नाकर्ता मुख्यमंत्री थेट देशाचा सामर्थ्यशाली पंतप्रधान म्हणून उदयास आलेला आहे. अलिकडे मोदींचे प्रस्थ इतके वाढलेले आहे, की त्यांना पराभूत कसे करावे, याचीच चिंता बहुतांश द्रोणाचार्यांना भेडसावू लागली आहे.

गंमतीची गोष्ट अशी, की अजून पहिल्या एकलव्याला निकालात काढण्याचे उत्तर या द्रोणाचार्यांना मिळालेले नाही. इतक्यात त्यांनी नवा एकलव्य शोधून काढला आहे. मोदींनी फ़क्त उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री निवडला आहे. योगींची निवड पंतप्रधानांनी एका राज्याचा म्होरक्या म्हणून केली आहे. पण त्यानंतर उमटलेल्या सेक्युलर व विचारवंती प्रतिक्रीया बघता, देशातल्या पुरोगाम्यांनी २०२४ चा पंतप्रधान निश्चीत केला, असेच मानावे लागते. कारण जितक्या उत्साहात मोदींना बदनाम करून संपवण्याचे मनसुबे २००२ मध्ये रचले गेले होते, त्याचीच झलक आता पंधरा वर्षांनी योगींच्या बाबतीत आढळून येत आहे. त्या व्यक्तीने आपल्या पदाची शपथ घेतली नाही वा सत्तेची सुत्रेही हाती घेतली नाहीत, इतक्यात त्याच्या विरोधात काहूर माजलेले आहे. त्याच्या रुपाने देशात हिंदूत्व अक्राळविक्राळ होऊ लागल्याची भिती व्यक्त होते आहे. त्याच्यातून भारत हिंदूराष्ट्र होणार असल्याची स्वप्ने अनेकांना पडू लागली आहेत. उत्तरप्रदेश हिंदूत्वाची आगामी प्रयोगशाळा आहे. वगैरे गोष्टी सहजगत्या बोलल्या जात आहेत. मात्र हेच चौदा वर्षापुर्वी आपण बोललो, लिहीले व त्यातूनच नरेंद्र मोदी नावाचा अवतार साकार झाला, याचे भान कोणालाही दिसत नाही. त्या कालखंडात त्यांनी मोदींविषयी व्यक्त केलेली मते व भिती कितपत खरी ठरली? नसेल, तर आज निदान सावधपणे मतप्रदर्शन करावे. असे कुठलेही भान एकाही द्रोणाचार्यापाशी आढळून येत नाही. तसे भाजपाचे अनेक मुख्यमंत्री नेहमी वादग्रस्त बनवले गेले आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना वेगळी वागणूक मिळण्याची अपेक्षा कोणी करू शकणार नाही. पण जितक्या आवेशात व ज्या भाषेत योगींवर आसूड ओढले जात आहेत, ते फ़क्त मोदींच्याच वाट्याला आलेले होते. म्हणूनच असे वाटते, की सेक्युलर मंडळींनी मोदींचा भावी वारसदार निश्चीत केलेला असावा.

हे चमत्कारीक प्रशिक्षण आहे, इथे प्रत्येक पावलावर मोदींना नाकर्ते ठरवण्याची स्पर्धा रंगलेली होती आणि त्यांना चुकीचे ठरवताना मोदी अप्रतिम व प्रभावी प्रशासन उभे करत गेले. निवृत्त झाल्यावर सचिन तेंडूलकर याने आपल्या गुरूविषयी एक गोष्ट सांगितली. कितीही उत्तम खेळला वा त्याने कितीही विक्रम केले, तरी त्याचे प्रशिक्षक आचरेकर यांनी सचिनची पाठ थोपटली नाही. जेव्हा केव्हा भेट व्हायची, तेव्हा आधीच्या कुठल्याही सामन्यातील सचिनच्या चुकाच आचरेकर दाखवत असायचे. पण कधी म्हणून त्याच्या उत्तम खेळी वा डावाचे कौतुक त्यांनी केले नाही. पर्यायाने आधीच्या चुका सुधारत व गुरूंच्या अपेक्षांना पार पाडण्याच्या नादात सचिन अविरत खेळतच राहिला आणि जगातला एक महान खेळाडू होऊन गेला. मोदींची कहाणी काहीशी तशीच आहे. टिकाकार, विरोधकांच्या हल्ल्यातून सावरताना आपल्यातल्या गुणवत्तेला त्यांनी सतत कसोटीला उतरण्याच्या स्थितीत ठेवले. टिकाकार बोलतात, त्यातली बोच बाजूला ठेवून सुधारणांना संधी दिली. राहुलच्या नशिबी ती संधी आली नाही. पण तीच संधी आता आधुनिक द्रोणाचार्यांनी योगींना देऊ केलेली आहे. मोदींना वाजपेयींनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवडले, तेव्हा त्यांनी भावी पंतप्रधान निवडला नव्हता. पण पुरोगामी द्रोणाचार्यांनी त्यातून आजचा पंतप्रधान घडवून दाखवला. आजही मोदींनी योगी आदित्यनाथ यांना केवळ राज्याचा मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. पण अत्यंत चाणक्ष सेक्युलर द्रोणाचार्यांनी योगीमधला हिंदूराष्ट्राचा भावी पंतप्रधान नेमका ओळखलेला दिसतो. सहाजिकच पुढल्या काळात योगींची सत्वपरिक्षा सुरू झालेली आहे. एका मठाचे महंत असलेली ही व्यक्ती आता कुठली महान शिखरे गाठते ते बघायचे. पुरोगाम्यांनी त्यांच्यासमोर अभूतपुर्व संधी सादर केलेली आहे. सगळेच्या सगळे द्रोणाचार्य झपाटल्यासारखे कामाला लागले आहेत. बेस्ट लक योगीजी!

No comments:

Post a Comment