Tuesday, March 28, 2017

अकलेमाजी उजवे-डावे

Image result for TV debate on yogi

बुद्धीमंत हा डावा किंवा पुरोगामीच असतो आणि उजवा म्हणजे प्रतिगामी असतो, अशी एक ठाम समजूत आहे. निदान वैचारीक क्षेत्रात तरी ही समजूत पक्की असते. म्हणून तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला लोकसभेत बहूमत मिळाल्यावर उजवे विचारवंत कुठे आहेत, त्याचा शोध सुरू झाला. मजेची गोष्ट अशी असते, की हा शोध घेणारे वा तत्सम प्रश्न विचारणारे ज्याला उजवा ठरवतात, त्याला बुद्धीच नाही वा तो बुद्धीला घाबरतो असे गृहीत धरून बसलेले असतात. सहाजिकच उजवा म्हणजेच निर्बुद्ध असेल, तर त्यातून बुद्धीमंत कसा सापडायचा? त्याच्या बुद्धीची काही कसोटी लावून परिक्षा घेण्यापुर्वीच त्याच्यावर निर्बुद्ध असे लेबल लावून टाकले, मग त्यात बुद्धीची झलक दिसायची कशी? बुद्धीची झलक दिसण्यासाठी वा समजण्यासाठी आपली बुद्धी मुळात तल्लख व चिकित्सक असायला हवी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रश्न विचारले जात नाहीत वा नंदीबैलाप्रमाणे माना डोलवणारे अनुयायी निर्माण केले जातात; अशी ठाम समजूत करून तपासणीला बसले, मग माना डोलताना दिसू लागतात. त्या माना खरेच डोलत असण्य़ाची अजिबात गरज नसते. मनि वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात, तशीच अवस्था होऊन जाते. संघ वा उजव्या विचारांच्या लोकांकडे डोळे झाकून बघितले, तर त्यांच्यात कोणी विचारवंत सापडण्याची शक्यताच शिल्लक रहात नाही. मात्र अशा समजुतीच्या नंदनवनात वावरणारे स्वत:ला मोठे पुरोगामी वा बुद्धीमंत समजत असतात. पण त्यापैकी अनेकांना वास्तवाचे व वर्तमानाचेही भान नसते. कोणाही डाव्या किंवा डावे लेबल लावलेल्या पंडिताने काहीतरी सांगितले, मग जे तमाम विचारवंत माना डोलवू लागतात, त्यांना आजकाल पुरोगामी संबोधले जाते. अशा माना डोलावणार्‍यांकडून उजव्या विचारवंतांची पारख कशी व्हायची? थोडक्यात असे डावे विचारवंतच आजकाल प्रत्यक्षात प्रतिगामी होऊन गेले आहेत.

आता ताजी घटना घ्या. कालपरवा उत्तरप्रदेशच्या निवडणूका झाल्या. त्या चालू असताना वा मतदानाच्या फ़ेर्‍या चालू असताना, वाहिन्यांवरील चर्चेपासून वृत्तपत्रातल्या विवेचनापर्यंत कोणीही पुरोगामी वा डावा अभ्यासक मोदी वा भाजपाला तिथे दैदिप्यमान यश मिळेल, असे भाकित करू शकला नव्हता. त्या राज्यातील जनता मोदींना वा भाजपाला कोणत्या कारणास्तव मते देणार नाही, याची लांबलचक यादीच त्यांच्यापाशी तयार होती. किंबहूना लोकसभेत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करणे मोदींना कसे अशक्य आहे, त्याचे शास्त्रशुद्ध विज्ञानवादी खुलासे या लोकांकडून चालू होते. साधे बहूमतही मिळवणे भाजपाला अशक्य असल्याचाच डाव्यांचा सार्वत्रिक दावा होता. पण मतमोजणी सरकत गेली आणि तमाम डाव्या अभ्यासक विचारवंतांच्या अकलेचे इमले धडधडा कोसळत गेले. समजा अशा निवडणूक प्रक्रीयेत कुठल्या राजकीय विचारवंताने भाजपाला प्रचंड बहूमत मिळणार असा दावा केला असता, तर याच बुद्धीमंत डाव्या विश्लेषकांनी त्या व्यक्तीला वेड्यातच काढले असते. किंबहूना काढलेही जात होते. जो कोणी भाजपाचा प्रवक्ता यशाची भाषा बोलत होता, त्याची यथेच्छ टिंगल करून त्याच कालावधीत त्याला उजवा वेडगळ ठरवण्य़ाची स्पर्धाच चालू होती. पण निकाल सरकात गेले आणि तथाकथित डाव्या विचारवंत बुद्धीमंतांच्या अकलेचे दिवाळे वाजवूनच निकाल संपले. आकडे अखेरीस समोर आले तेव्हा ज्यांची बोटे तोंडात गेली होती, त्यांना आपल्याकडे डावे विचारवंत मानतात. कारण त्यांना नवा विचार वा नव्या गोष्टी डोळसपणे बघता येत नाहीत. भविष्यात होऊ घातले आहे, त्याकडे डोकावून बघायचे धाडस होत नाही, त्यांना आजकाल पुरोगामी संबोधले जाते. थोडक्यात आपल्या नसलेल्या बुद्धीचे जाहिर प्रदर्शन मांडून सातत्याने जे हास्यास्पद ठरतात, त्यांना आपण आज पुरोगामी विचारवंत म्हणून ओळखतो.

आता गंमत बघा. उत्तरप्रदेशात भाजपा वा मोदींना साधे बहूमतही मिळणार नाही, याची अशा डाव्या अभ्यासक विचारवंतांना खात्री होती. तिचाच प्रभाव पडलेला असल्याने मतचाचण्या घेणार्‍यांनाही छातीठोकपणे भाजपाला बहूमत मिळेल, हे दिसत असूनही बोलण्याची हिंमत नव्हती. प्रणय रॉय हा भारतातील मतचाचणीचा जनक आहे. पण त्यानेही अशी हिंमत दाखवली नाही. मात्र निकाल लागल्यानंतरच्या एका चर्चेत त्याने त्याची कबुलीही दिलेली आहे. उत्तरप्रदेशात फ़िरत असताना भाजपाला तिथे २६० पेक्षा अधिक जागा मिळतील, असे आपल्याला वाटत होते. आपल्या मित्रांना एका कागदावर आपण तो आकडा लिहूनही दिला होता, असे रॉयने नंतर सांगितले. मग त्याला उजवा किंवा माना डोलवणारा नंदी बैल समजावे काय? ज्या शास्त्रात म्हणजे मतचाचणीत तो पारंगत आहे, त्याच शास्त्राने त्याला भाजपाला प्रचंड बहूमत मिळत असल्याची ग्वाही दिलेली होती. पण ते सत्य बोलायला तो निकालापुर्वी कशाला धजावला नव्हता? सत्य आणि नवे काही सांगण्याला डाव्या गोटात प्रतिबंध आहे. म्हणूनच त्याला गप्प बसावे लागले. तथाकथित विचारवंत म्हणजे केवळ डाव्यांच्या गोतावळ्यात विचारवंत म्हणून मिरवायचे असेल, तर नंदीबैल होऊन माना डोलावण्याला पर्याय नसतो. असेच एकप्रकारे प्रणय रॉयने त्यातून सांगितलेले आहे. पण जेव्हा भाजपा तिनशेच्याही पलिकेडे गेला, तेव्हा त्याला सत्य बोलण्याचे धाडस झाले. अशा नंदीबैलांना आजकाल विचारवंत वा बुद्धीमंत म्हणायची फ़ॅशन आहे. मग अशाच माना डोलवत हे लोक जगाकडे बघतात आणि त्याना आपल्यापेक्षा थोडे कोणी वेगळे वा भिन्न बोलताना दिसला, तर तोच डोलतोय असे आभास होतात. सहाजिकच हे नंदीबैल त्या स्थीर विचारी व्यक्तीला माना डोलावणारा नंदीबैल म्हणून मोकळे होतात. ही आजच्या डाव्या विचारवंतांची शोकांतिका झालेली आहे.

अशा दिवाळखोरांनी पुरोगामीत्वालाच प्रतिगामी करून टाकलेले आहे. पुरोगामी म्हणजे पुढे वा भविष्याकडे बघणारा, असे मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. पण असा प्रत्येक पुरोगामी सतत मागल्या कथापुराण झालेल्या गोष्टींना सतत उजाळा देताना दिसेल. मतदान चालू असताना मतदार भाजपाला कशासाठी मते देणार नाही, याची अशा प्रत्येकाला खात्री होती. पण आता त्याच मतदाराने प्रचंड संख्येने भाजपाला मते दिल्यावर मात्र याच पुरोगामी विचारवंतांचे दावे तपासा! योगी आदित्यनाथ सारख्या कडव्या हिंदूत्ववाद्याला लोकांनी मतदान केलेले नाही, असे हेच लोक आता सांगत आहेत. लोकांनी मोदींच्या विकासाच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे. योगींसाठी कौल दिलेला नाही, असाही दावा आहे. पण महिनाभरापुर्वीच्या याच पुरोगामी बुद्धीवर विश्वास ठेवायचा, तर लोक मुळातच भाजपाला साधे बहूमतही देणार नव्हते. तेच खरे असेल तर निकाल कसेही लागोत, या विचारवंतांनी आपल्या शब्दाशी प्रामाणिक रहावे आणि भाजपाला बहूमतही मिळालेले नसल्याच्या समजुतीमध्ये रमून जावे. तेच बहूमत मिळालेले नसेल तर भाजपाचा योगी मुख्यमंत्रीही झालेला नाही, अशाच समजुतीत जगावे. उगाच त्याचा उहापोह तरी कशाला करायचा? मोदी वा भाजपाला मतदार कशासाठी मते देणार नाही, याचे दावे करणार्‍यांना जी मते मिळाली, ती कशासाठी मिळाली हे कसे व कधी समजले? मतदार कशासाठी कोणाला मतदान करतो, त्याचा थांगपत्ता ज्यांना नाही, तेच योगींना लोकांनी कौल दिला नसल्याचे दावे करणार आणि बाकीचे तमाम डावे विचारवंत अभ्यासक वा तत्सम संपादक मंडळी नंदीबैलासारखी माना डोलावणार. ही आता पुरोगामीत्वाची शोकांतिका होऊन बसली आहे. जग एकविसाव्या शतकात आले आहे आणि इथले पुरोगामी शहाणे बुद्धीमंत मात्र अजूनही १९९० च्या जमान्यात अडकून पडलेले आहेत.

No comments:

Post a Comment