Monday, March 6, 2017

आहेराची परतफ़ेड

महाराष्ट्रातील ताज्या निवडणूक निकालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांचे नेतृत्व तावून सुलाखून बाहेर पडले, यात शंकाच नाही. पण त्यात त्यांच्या पक्षातील विरोधक व प्रतिस्पर्ध्यांनी हातभार लावला, तितकाच पक्षाबाहेर असलेल्यांनीही हातभार लावलेला आहे. खरेतर मागल्या वेळी भाजपाने युती मोडीत काढून शिवसेना पक्षप्रमुखांना त्यांचे नेतॄत्व प्रस्थापित करायला फ़ार मोठी मदत केली होती. भाजपा व सेनेची युती १९८८ नंतर अस्तित्वात आली. तेव्हा शिवसेना मुंबई ठाण्यापुरती मर्यादित होती व नुकतीच महाराष्ट्रात हातपाय पसरू लागलेली होती. पण शिवसेनेची वाढती लोकप्रियता बघून युतीचा प्रस्ताव घेऊन आलेल्या महाजन मुंडे या भाजपा नेत्यांना सेनेची शक्ती उमजलेली होती. किंबहूना आपल्या राज्यव्यापी लोकप्रियतेचा शिवसेनेलाच थांगपत्ता तेव्हा लागलेला नव्हता. म्हणूनच सेनेशी युती करण्यातला लाभ ओळखून मुंडे महाजनांनी छोटेपणा घेऊन, युतीचा प्रस्ताव आणलेला होता. तो स्विकारला गेल्यावर सेनेच्या पाठीवर बसून आपला राज्यव्यापी विस्तार करण्याचा प्रयास भाजपाने केला. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे शिवसेनेला राज्यात आपले वर्चस्व कुठे आहे, त्याचा थांगपत्ता लागू नये अशीही खेळी भाजपाच्या त्या मागल्या पिढीच्या नेत्यांनी खेळली होती. ती इतकी यशस्वी झाली, की जिल्हा तालुका पातळीवर शाखा झाल्या, तरी सेनेला कधीच आपले बालेकिल्ले नक्की करता आले नाहीत. किंबहूना राष्ट्रीय वा राज्यपातळीवर आपली स्वतंत्र भूमिकाही सेनेला कधी निश्चीत करता आली नाही. मागल्या पंचवीस वर्षात शिवसेना भाजपाच्या मागे फ़रफ़टतच राहिली. शिवसेना युतीत सडली असे उद्धव म्हणतात, त्याचा अर्थ हा असा आहे. पण त्यातून बाहेर पडण्याची संधी विधानसभेच्या वेळी भाजपानेच सेनेला उपलब्ध करून दिलेली होती आणि सेनाही त्यातून सव्वा दोन वर्षापुर्वी बाहेर पडली.

थोडक्यात युती मोडीत काढून भाजपाने सर्वात मोठा पक्ष होण्याचा डाव यशस्वी केला. पण सेनेलाही भ्रमातून बाहेर पडायची संधी दिली. त्यामुळे प्रथमच राज्यातल्या सर्व जागा लढवताना शिवसेनेला मोठा भाऊ हे स्थान राखता आले नाही. तरी आपल्या प्रभावक्षेत्राची चाचपणी करता आली. आपण राज्यात स्वबळावर कितीशी मजल मारू शकतो, त्याचा अंदाज सेनेला प्रथमच आलेला होता. खरे तर तिथूनच उद्धव ठाकरे यांनी नवी सुरूवात केली होती. कारण बाळासाहेबही कधी स्वबळावर संपुर्ण राज्यात विधानसभेची लढाई लढले नव्हते. भाजपाने युती मोडून ते धाडस उद्धवला करायला भाग पाडले आणि ते शिवधनुष्य या नव्या पक्षप्रमुखाने यशस्वीरित्या उचलूनही दाखवले. ६३ जागा एकट्या शिवसेनेने मिळवणे सोपी गोष्ट नव्हती. राष्ट्रवादी स्थापन केल्यावर किंवा त्याच्याही पुर्वी समांतर कॉग्रेसची वेगळी चुल मांडणार्‍या मुरब्बी अनुभवी शरद पवारांनाही, स्वबळावर कधी ६३ आमदार निवडून आणता आलेले नव्हते. पण हे अपलेच यश उद्धवना ओळखता आले नाही, की त्यांच्या सहकार्‍यांना समजून घेता आले नाही. खरेतर तीच शिवसेनेची नवी सुरूवात होती. डळमळीत वाटणारा व भासणारा शिवसेनेचा नवा पक्षप्रमुख, बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचे ठाम नेतृत्व करू शकतो, याची मतदाराने दिलेली ती ग्वाही होती. त्याचा अर्थच मतदार उद्धवकडे आशेने बघत होता आणि शिवसेनेला संधी देणार असल्याचे सांगत होता. आपण भाजपाला पर्याय म्हणून सेनेकडे बघतोय, असा मतदाराने दिलेला तोच संकेत होता. मात्र अशावेळी सत्तेच्या मागे धावण्यापेक्षा ठामपणे विरोधात बसून आपणही कुटील डावपेच खेळून सत्तेत बसलेल्यांना खेळवू शकतो, याचा साक्षात्कार मतदार व पाठीराख्यांना घडवण्याची गरज होती. तीच मतदाराची अपेक्षाही होती. पण मतांची लढाई जिंकलेला पक्षप्रमुख सत्तापदांच्या आमिषाला शरण गेला, तिथून सडण्याची नवी प्रक्रीया सुरू झाली.

विधानसभेला भाजपाने नुसती युती मोडली नव्हती, तर उद्धवना आपले नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. किंबहूना संधीच दिलेली होती. ती साधताना उद्धव ठाकरे यांनी सेनेला केवळ ६३ आमदार मिळवून दिले नव्हते वा भाजपाचे आव्हानच पेलले नव्हते. पक्षांतर्गत जुन्या पिढीतल्या नेत्यांनाही पादाक्रांत करीत आपले एकमुखी नेतृत्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर आपल्या नेतृत्वाची मांड ठोकून पक्षात आपला शब्द प्रमाण ठरवण्याची प्रक्रिय़ा आवश्यक होती. आपल्या शब्दाखातर सर्व नेते व आमदार सत्तेवर लाथ मारू शकतात व सत्तेच्या बाहेर बसू शकतात, हे आव्हान होते. एकतर अल्पमतात सत्ता चालवणे भाजपासाठी कसरत झाली असती आणि दुसरे म्हणजे बाहेरून त्याला पाठींबा देऊनही उद्धव मुख्यमंत्र्याला खेळवू शकले असते. त्यातून भाजपाचा केविलवाणा मुख्यमंत्री मराठी मतदारासमोर पेश करता आला असता. राज्याच्या राजकारणाचा सुत्रधार अशी मोक्याची भूमिका उद्धवच्या वाट्याला आली असती. भाजपा व त्याचे नेते सत्तेसाठी किती लाचार आहेत, त्याचेही प्रदर्शन जगाला घडवता आले असते. सेना सत्तेवर लाथ मारू शकते अशी उजळ प्रतिमाही उभी करण्याला मदत मिळाली असती. काश्मिरच्या निकालानंतर आणि मुफ़्र्ती महंमद यांच्या निधनानंतर तसा संयम राखून, महबुबा मुफ़्ती यांनी तोच खेळ करीत भाजपाचा चाणक्यांना माकडउड्या मारण्याची वेळ उगाच आणली नाही. पत्ते तुमच्या हाती कोणते असतात, याला महत्व नाही. जे काही पत्ते हाती आहेत, ते कसे चतुराईने डावात वापरले जातात, याला महत्व असते. महबुबा आपले पत्ते चतुराईने खेळल्या आणि ६३ आमदार हाताशी असूनही उद्धवनी भाजपाला शिरजोरी करू दिली. तिथून शिवसेना युतीत सडण्याची दुसरी प्रक्रिया सुरू झाली. भाजपाने युती मोडून बहाल केलेला मोठा आहेर नंतरच्या सत्ताकारणात उद्धवनी मातीमोल करून टाकला.

युती मोडून भाजपाने पक्षप्रमुख म्हणून ठामपणे उभे रहाण्याची सुवर्णसंधी उद्धव ठाकरे यांना दिली व त्यात त्यांनी मोठी बाजी मारली होती. पण सत्तेचा मोह टाळणे शक्य झाले नाही, तिथून त्यांची घसरण सुरू झाली. त्यांनी आपल्या हाती मोक्याची असलेली आमदारसंख्या चतुराईने, नव्या भाजपा सरकार व मुख्यमंत्र्याला खेळवायला वापरण्यापेक्षा, सत्तेतील किरकोळ वाट्याला प्राधान्य दिले. अन्यथा विरोधात बसून राष्ट्रवादीच्या पाठींब्याने सरकार चालवण्यास भाजपला भाग पाडले असते, तर फ़डणवीसांची अधिक नाचक्की झाली असती. त्यांनीही दोन दिवसात त्याची कबुली दिली होती. राष्ट्रवादीच्या पाठींब्याने सरकारचे बहूमत सिद्ध झाल्यामुळे आयुष्यात नव्हे इतक्या शिव्या बहूमतानंतर खाव्या लागल्या असे फ़डणवीसांनी सोशल मीडियातूनच कबुल केले होते. याचा साधासरळ अर्थ असा, की शिवसेनेचा पाठींबा ही भाजपाची अगतिकता होती. तो पाठींबा बाहेरून देऊन मुख्यमंत्र्याला खेळवता आले असते, किंवा आपल्या निवडीनुसार खाती मागूनही भाजपाला झुकवता आलेच असते. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला संयम व धीर पक्षप्रमुखांना दाखवता आला नाही, तिथेच फ़डणवीस बाजी मारून गेले. आपले नेतृत्व राज्य व राजकारणावर प्रस्थापित करायला इवलीशी संधी शिवसेनेकडून मिळाल्यावर त्या तरूण मुख्यमंत्र्यांनी मागे वळून बघितले नाही. नंतर पदोपदी सत्तेसाठी सेना कशी लाचार आहे, त्याचा साक्षात्कार जनतेला घडवीत आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रत्येक डाव फ़डणवीसांनी यशस्वी केला. थोडक्यात सांगायचे जर विधानसभेत युती मोडून जो मोठा आहेर भाजपाने उद्धवना दिलेला होता, त्याची परतफ़ेड करीत पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांना त्यांची प्रतिमा राज्यव्यापी समर्थ नेता, अशी उभी करण्याची संधी बहाल केली. त्याला आहेराची परतफ़ेड नाही तर काय म्हणायचे?

(२७/२/२०१७)

No comments:

Post a Comment