Monday, March 27, 2017

कॉग्रेसचे र्‍हासपर्व

rahul cartoon के लिए चित्र परिणाम

सध्या बाजारात सर्वत्र द्राक्षांचे ढिग दिसत आहेत. विविध फ़ळांनी बाजार सजला आहे. यापैकी बहुतेक फ़ळांच्या बागायतीचा एक नियम आहे. एकदा फ़ळे काढली व बाग मोकळी केली, की शेतकरी वा बागायतदार पुढील मोसमाच्या कामाला हात घालतो. यावेळी आलेली फ़ळे उत्तम व पीक चांगले होते की वाईट, त्याचाही अभ्यास होतो आणि त्यामागची कारणेही शोधली जातात. केले त्यापेक्षा उत्तम काय करता येईल वा जिथे मेहनत कमी पडली तिकडे अधिक लक्ष कसे देता येईल, याचा विचार सुरू होतो. म्हणूनच हाती आलेल्या पीकाचे लाभ घेताच, पुढल्या कामाकडे लक्ष वेधण्य़ाला प्राधान्य असते. बाकी जग उत्तम पीकाचे कोडकौतुक करीत असताना, असा जाणता शेतकरी नेहमी पुढल्या चिंतेत गुंतलेला असतो. राजकारण त्यापेक्षा वेगळे नसते. सार्वजनिक जीवनात काम करणार्‍याला लोकमतावर जगावे लागत असते आणि लोकमत कधी नाराजीकडे ओढले जाईल, त्याची कोणी हमी देऊ शकत नाही. नुकतेच उत्तरप्रदेश व अन्य राज्यात भाजपासाठी मोठे अपुर्व यश हाती आले. त्याचे आज देशभर कौतुक वा विश्लेषण चालू आहे. पण त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेला कष्टकरी नरेंद्र मोदी मात्र पुढल्या कामाला लागलेला आहे. यशाचे अभिनंदन स्विकारताना, दुसर्‍याच दिवशी केलेल्या भाषणात त्यांनी यशापेक्षा वाढलेल्या जबाबदारीचे भान पाठीराख्यांना करून दिले. फ़ळभाराने वृक्ष झुकावा तसे यशस्वी पक्षाने नम्र व्हायला हवे, असे त्यांनी सांगितले. हीच भाजपाच्या आजच्या अपुर्व यशाचे खरीखुरी मिमांसा आहे. त्यातच कॉग्रेसच्या दारूण अपयशाचे कारण सामावलेले आहे. पण त्याकडे ढुंकूनही बघायला कोणी कॉग्रेसनेता तयार नाही, की पक्षाचे सर्वेसर्वा झालेले राहुल गांधींना अशा प्रश्नांकडे बघण्याचीही गरज वाटलेली नाही. कॉग्रेसच्या र्‍हासाचे तेच मुख्य व एकमेव कारण आहे.

द्राक्ष वा फ़ळबागायतीत एक मोसम झाला, मग फ़ळांनी लगडलेल्या फ़ांद्यांची छाटणी केली जाते. प्रत्येक मोसमानंतर ही छाटणी अगत्याची असते आणि त्याच छाटणीतून नवे फ़ुटवे येत असतात. झाडाचे खोड कायम ठेवून प्रत्येक मोसमात फ़ांद्या छाटल्या जातात. कारण यावर्षी कितीही फ़ळे त्या फ़ांदीने दिलेली असली, तरी त्यावरच पुढला मोसम भरघोस फ़लधारणा होण्याची अजिबात शक्यता नसते. तेच कॉग्रेसचे झालेले आहे. या शतायुषी पक्षाचा पाया मजबूत आहे. पण खोडावर आलेल्या फ़ांद्या खुप जुन्या व निकामी वांझोट्या झालेल्या असून त्यांची छाटणी दिर्घकाळ झालेली नाही. उलट प्रत्येक मोसमात जुन्या खोडाला जे नवे फ़ुटवे येतात, तेच छाटण्य़ातून बाग फ़ुलण्याची अपेक्षा केली जात राहिली आहे. मध्यंतरी चार वर्षापुर्वी राहुल गांधी यांच्या हाती पक्षाची सुत्रे सोपवण्याचा विचार पुढे आला, तेव्हा दिग्विजयसिंग यांनीच हा विषय छेडला होता. तीन दशकांपुर्वी राजीव गांधींनी ज्या पिढीला नेते म्हणून पुढे आणले, त्यांची एक्सपायरी डेट संपली आहे. त्यांनी पक्षाच्या म्होरकेपणातून बाजूला झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केलेले होते. पण स्वत: दिग्विजयच अजून बाजूला झालेले नाहीत. बाकीच्या नेत्यांविषयी काय बोलावे? ज्या खोड झालेल्या फ़ांद्यांना फ़ुलेही येत नाहीत वा येऊ शकत नाहीत, त्यातूनच कॉग्रेसचे झाड अखेरचे श्वास घेत असून, प्रत्येक मोसमात त्याच्यात आणखी पडझड झालेली बघायला मिळत आहे. मग त्याचे खापर फ़ोडायला कोणीतरी हवे, म्हणून राहुल गांधी यांना पुढे केले जाते. प्रत्येक ज्येष्ठ कॉग्रेसनेता राहुलना दोष देऊ नका म्हणून बजावत असतो. पण खरेतर त्याच्या मनात तेच तर घडावे अशी अपेक्षा असते. त्या भाटगिरीमुळे एकतर कालबाह्य होऊनही त्यांची पक्षात चलती राहिली आहे आणि दुसरीकडे कॉग्रेसचा र्‍हास होत चालला आहे. नव्या पिढीला डोके वर काढायला जागा शिल्लक राहिलेली नाही.

२०१२ च्या उत्तरार्धात कॉग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या हाती बरेच अधिकार सोपवण्यात आले. त्याचे कौतुक नुसते ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांनीच केलेले नाही, तर दिल्लीतील बहुतांश पत्रकार विश्लेषकांनीही मोठा उत्सव साजरा केलेला होता. त्यासाठी नरेंद्र मोदी व राहुल यांची सतत तुलना होत राहिली. मात्र जसजसे दिवस गेले, तसतसे राहुल नावाच्या भ्रमाच्या भोपळ्याचे पितळ उघडे पडत गेले. एकामागून एक निवडणूकांमध्ये कॉग्रेसचा दारूण पराभव होत गेला आणि त्याचा कळस लोकसभेच्या निकालांनी केला. त्यात कॉग्रेसच्या दिर्घायुष्यात कधी नव्हे इतका लज्जास्पद पराभव बघावा लागला. पण अजूनही त्याचे विश्लेषण वा आत्मपरिक्षण होऊ शकलेले नाही. याचे एकमेव कारण राहुल गांधी वा नेहरू खानदानातील कोणीही चुका करत नाहीत, अशी अगाध श्रद्धा होय. त्या भ्रमात केवळ जुनेजाणते कॉग्रेसजन आहेत असे मानण्याचे कारण नाही. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आलेले राजकीय अभ्यासक व विश्लेषकही त्याच समजुतीचे बळी आहेत. म्हणूनच राहुलनी प्रत्येक निर्णयातून व कृतीतून पक्षाला आणखी खड्ड्यात घातले असतानाही, त्यांच्याच कौतुकाचे ढोल पिटले जात राहिले. त्यासाठी संदर्भहीन इतिहासही सांगण्याची स्पर्धाही चाललेली आहे. इंदिराजींनी दोनदा तरी गाळातून कॉग्रेसला बाहेर काढले आणि संपलेल्या कॉग्रेसचे पुनरुज्जीवन केले, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यामागची कारणे व वास्तव संपुर्ण भिन्न आहे. तशा कुठल्याही संकटातून सोनिया कॉग्रेसचा जिर्णोद्धार करू शकलेल्या नाहीत किंवा राहुल गांधी कॉग्रेसला नवजीवन देण्याची शक्यता नाही. इंदिराजींनी कॉग्रेसचे पुनरुज्जीवन केले नव्हते, तर त्यातला एक फ़ुटवा होऊन कॉग्रेसचा नवा विस्तार केलेला होता. तेव्हा इंदिराजीशी सिंडीकेट वा श्रेष्ठी जसे वागले, तसेच आज राहुल सोनिया वागत आहेत, ही बाब विसरता कामा नये.

गेल्या तीनचार वर्षात कॉग्रेसची जी दुर्दशा चालली आहे, त्याविषयी अनेक नेत्यांनी तक्रार केली आहे, दुखण्याकडे बोटही दाखवलेले आहे. पण त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचीच पक्षातून हाकालपट्टी झालेली आहे. जयंती नटराजन, हेमंतो बिस्वाल अशी अनेक नावे सांगता येतील. इंदिराजींच्या अशाच तक्रारींची दाद घेण्यापेक्षा तात्कालीन कॉग्रेसश्रेष्ठी निजलिंगप्पा वा संजीव रेड्डी अशांनी इंदिराजींची पक्षातून हाकालपट्टी केली होती. तेव्हा बंड करून इंदिराजींनी आपणच खर्‍या कॉग्रेसचे प्रतिनिधीत्व करतो म्हणत वेगळी चुल मांडली होती. त्या नव्या झंजावातापुढे विरोधकच नव्हेतर मुळची श्रेष्ठींची कॉग्रेस उध्वस्त होऊन गेलेली होती. १९६९ वा १९७८ नंतर इंदिरा गांधींनी कॉग्रेसला नवजीवन दिले, ते जुन्या खोडाला फ़ुटलेले नवे फ़ुटवे होते. आजकाल अशा नव्या फ़ुटव्यांनाच छाटून जुन्या वांझ झालेल्या फ़ांद्यांवर फ़ळे येण्याची आशाळभूत प्रतिक्षा केली जात आहे. राहुल वा सोनिया गांधी इंदिराजींची भूमिका पार पाडत नसून, इंदिरा विरोधातील तात्कालीन कॉग्रेसश्रेष्ठीच्या भूमिकेत काम करीत आहेत. म्हणूनच इंदिरा गांधींप्रमाणे त्यांना पक्षाचे पुनरुज्जीवन करता आलेले नाही. उलट दिवसेदिवस पक्ष गर्तेत ओढला जात आहे. १९६७ सालात इंदिराजी पंतप्रधान असताना कॉग्रेसला प्रथमच नऊ राज्यात सत्ता गमवावी लागली होती. ते सत्य स्विकारून त्यांनी विरोधकांवर तोफ़ा डागण्यापेक्षा आपल्याच पक्षातील जुन्या वांझोट्या फ़ांद्यांची काटछाट केली. त्याच टाकावू नेत्यांना घेऊन विरोधकांना आव्हान दिले नाही. निजलिंगप्पा, स. का पाटिल, कामराज, मोरारजी, चंद्रभानु गुप्ता, अजय मुखर्जी अशा दिग्गज नेत्यांना कठोरपणे बाजूला करून, त्यांनी नव्या राजकारणाचा पाया घातला होता. राहुल वा सोनिया गांधींना गुलाम नबी आझाद वा तत्सम लोकांना नाकर्ते असूनही बाजूला सारणे शक्य झालेले नाही. मग कॉग्रेसचे भवितव्य काय असेल?

कुठल्याही राज्यात वा दिल्लीत आज लोकांवर प्रभाव टाकू शकेल असा कोणी कॉग्रेस नेता शिल्लक राहिलेला नाही आणि नव्या नेत्यांना प्रोत्साहन देण्याचा एकही निर्णय घेण्याचे धाडस मायलेकांना करता आलेले नाही. आंध्रप्रदेशात राजशेखर रेड्डी यांच्या पुत्राने आपली लोकप्रियता सिद्ध करूनही त्याला नामशेष करण्यत धन्यता मानली गेली. तर पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करताना आढेवेढे घेतले गेले. मुंबईत किंचितही प्रतिमा नसलेल्या संजय निरूपम या वाचाळाला नेतृत्व सोपवण्यात आले. गुरूदास कामत वा नारायण राणे अशा नेत्यांना नाराज करण्यात धन्यता मानली गेली. सोनिया वा राहुल यांच्यापाशी इंदिराजींचा करिष्मा नाही. म्हणजेच त्यांना राज्यातील पक्षाला संभाळणारे व जोपासना करणारे स्वयंभू नेतृत्व उभे करणे अगत्याचे आहे. तसे त्यांनी कधीच केले नाही. पण एखाद्या राज्यात तसे नेतृत्व उभे रहाताना दिसले, तर त्याला खच्ची करण्याचे डावपेच मात्र नक्की खेळले आहेत. त्यातून आजच्या कॉग्रेसची दुर्दशा झालेली आहे. त्या पक्षाला धड नेतृत्व राहिलेले नाही, की कुठली दिशाही उरलेली नाही. दिशाहीन भरकटण्याने पक्ष उभारी घेत नसतो. जनता पक्षाचा विजय असो वा त्याहीपुर्वी संयुक्त आघाड्यांच्या राजकारणाने बसलेला दणका असो. त्यात व्यत्यय आणण्याचे नकारात्मक डावपेच इंदिराजी कधी खेळल्या नाहीत. त्यांनी विरोधकांना मनसोक्त सत्ता भोगू दिली व चुका करण्याची मुक्त संधी दिली. पण चुका केल्यावर मात्र किंचीतही सवलत दिली नाही. सतत उठून विरोधात बकवास केली नाही वा कामात व्यत्यय आणला नाही. दबा धरून बसलेला शिकारी जसा सावज टप्प्यात आल्यावर झेप घेतो, तशीच इंदिराजींनी खेळी केली. त्यातून जुन्या कॉग्रेसचा एक धुमारा नवा वृक्ष होऊन फ़ुलला व फ़ळला होता. ते राहुल व सोनियांनाच उमजलेले नसेल, तर त्यांची भाटगिरी करणार्‍यांना कुठून उमजावे?

यापुर्वी दोनदा कॉग्रेसचे पुनरूज्जीवन झाले, म्हणून त्याची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा प्रत्येक आशाळभूत कॉग्रेसवाला करीत असतो. पण तशा पुनरूज्जीवनासाठी आवश्यक अशा दोन गोष्टी त्यांना ठाऊकच नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे त्यासाठी इंदिराजी नावाचे धाडसी कष्ट उपसणारे नेतृत्व आवश्यक असते. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्या डावपेचांना पुरक ठरतील, अशा चुका विरोधकांनीही कराव्या लागतात. त्या चुका करण्याची संधी द्यावी लागते. सोनिया वा राहुल यांच्यापाशी इंदिराजींचे धाडस नाही की दूरदृष्टी नाही. म्हणूनच पराभवानंतर संयम राखून अपयश पचवून, प्रतिस्पर्ध्याला चुका करण्याची मुभा देण्याची चतुराई यांना दाखवता आलेली नाही. उलट त्याच इंदिराजींचा वारसा समजून व ओळखून, नरेंद्र मोदी त्याचे काटेकोर अनुकरण करीत आहेत. राहुल सोनियाच नव्हेतर अन्य विरोधकांनी चुका करण्याची मोदींना प्रतिक्षा असते आणि त्या चुका हाती लागल्या; मग मोदी किंचीतही दयामाया दाखवत नाहीत. गेल्या तीन चार वर्षात त्याचाच वारंवार अनुभव येतो आहे. राहुल सोनिया आपल्या चुका समजून घ्यायला तयार नाही,त की मोदींना चुका करण्याची सवलत देत नाहीत. त्यामुळे गर्तेतून कॉग्रेसला बाहेर काढणे दूर राहिले असून, पक्ष अधिकच रसातळाला चालला आहे. आंध्रप्रदेशात त्याच पक्षाचे राजशेखर रेड्डी यांनी एकविसाव्या शतकाच्या आरंभी पक्षाचे पुनरुज्जीवन केले होते आणि पक्षातून बाहेर पडून ममता बानर्जी यांनी वेगळ्या नावाने बंगालमध्ये कॉग्रेसला संजीवनी दिली आहे. मग त्याचीच पुनरावृत्ती देशभर कशाला होत नाही? तर राहुल सोनियांमध्ये ममता वा राजशेखर रेड्डी यांच्याइतकी झुंजारवृत्ती नाही, की दुरदृष्टी नाही. देशव्यापी वा राज्यव्यापी राजकारणात जे नेतृत्वगुण आवश्यक असतात, त्याचा सोनियांसह राहुलपाशी दुष्काळ आहे. मात्र तमाम कॉग्रेसजनांना त्यांच्याकडूनच पक्षाच्या जिर्णोद्धाराची आशा आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जनमानसावर प्रभूत्व गाजवणारा, वक्तृत्वाची जादू आत्मसात असलेला, मुत्सद्दी खेळी करू शकणारा व यशाची प्रचिती आणुन दिली मगच पाठीराख्यांवर हुकूमत गाजवणारा नेता अगत्याचा असतो. मोदींनी मागल्या तीन वर्षात आपल्यातील त्याच गुणांचे सातत्याने प्रदर्शन मांडले आहे आणि कॉग्रेससह अन्य पक्षातील दुय्यम नेते व कार्यकर्तेही मोदींसाठी भाजपात जाण्याचा लोंढा वहातो आहे. दिवसाचे चोविस तास व आठवड्याचे सलग सात दिवस, मोदी पक्ष कार्यामध्ये गर्क झालेले असतात. राहुल तर पक्षाचा दारूण पराभव झाल्यावर पाठीराखे व कार्यकर्ते यांच्या सांत्वनालाही उपलब्ध नसतात. महिनाभर राजकीय मोहिम उरकली, मग राहुलना विश्रांती वा विरंगुळ्यासाठी परदेशवारी करावी लागते. आताही उत्तरप्रदेशात पक्ष भूईसपाट झालेला असताना राहुल परदेशी निघून गेले. गोवा किंवा मणिपुर येथील स्थानिक नेत्यांनी काय करावे, ते सांगणारा कोणीही दिल्लीत उपलब्ध नव्हता. राज्यसभेत मागल्या दाराने पोहोचणारे आज कॉग्रेसची सुत्रे हाती घेऊन बसलेले आहेत आणि लोकांमध्ये जाऊन निवडणूका जिंकणार्‍यांना तिथे कवडीचे मोल राहिलेले नाही. राहुलनी कुठलही मुर्खपणा करावा, त्यातील वैधता वा घटनात्मकता सांगत बचाव मांडणार्‍या वाचाळ प्रवक्त्यांच्या बळावर कॉग्रेसचा पुनरुद्धार कसा होणार, हे राहुल वा श्रेष्ठीच जाणोत. येत्या लोकसभेपर्यंत कॉग्रेस आपले असलेले स्थानही टिकवू शकणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण राहुल व सोनिया हे पक्षासमोरच्या समस्यांचे उत्तर वा समाधान नसून, तेच दोघे समस्या आहेत. जेव्हा दुखण्यालाच कोणी उपाय समजून कवटाळतो, तेव्हा त्याला कुठले औषध बरे करू शकत नाही. राहुल सोनियांसह अन्य श्रेष्ठींना झुगारून पक्षाचा जिर्णोद्धार करणारा कोणी पक्षातून पुढे आला, तरच कॉग्रेसला भवितव्य असेल. अन्यथा २०१९ मध्ये लोकसभेतही कॉग्रेस २०-२५ जागांचा पल्ला गाठण्याच्या स्थितीत आता राहिलेली नाही.

No comments:

Post a Comment