बुडणार्या माणसाला वाचवावे अशी कोणाचीही इच्छा असते. पण अशा कामात बुडणार्याचेही सहकार्य आवश्यक असते. म्हणजे असे, की बुडण्यातून आपले प्राण वाचवावे, यासाठी त्यानेही प्रयत्न करायचे असतात. अन्यथा त्याला वाचवायला जाणार्याही असा बुडणारा बुडवू शकत असतो. कारण बुडणार्याला वाचवताना त्यानेच हातपाय गाळलेले असतील, तर त्याचे वजनच (ज्याला इंग्रजीत डेडवेट म्हणतात) त्याच्या विरोधात असते आणि ते त्याला बुडवत असते. तो भार वाचवायला जाणारा सहन करू शकत नसतो. आज कॉग्रेस पक्षाची स्थिती काहीशी तशीच झाली आहे कारण त्या पक्षाला गांधी खानदानाच्या पलिकडे कोणी आपले नेतृत्व करू शकेल असे वाटत नाही आणि ह्या घराण्याचे आजकालचे वंशज बुडणार्या पक्षाला अधिकच खोलात घेऊन जायला धडपडत असतात. राहुल गांधी यांनी मागल्या पाच वर्षात प्रयत्नपुर्वक तशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहेच. पण आता त्यांच्या मदतीला धाकटी भगिनी प्रियंका वाड्रा आल्यात, असे म्हणायची वेळ आलेली आहे. दोन महिन्यापुर्वी प्रियंकाला पक्षात आणावे म्हणून प्रयत्न करणार्यांची अपेक्षा पक्षाला उभारी मिळावी अशी होती. फ़क्त पक्षाचे समर्थकच नाहीत, तर नरेंद्र मोदी व भाजपाच्या सरकारमुळे निराश्रित झालेल्या दिल्लीतल्या अनेक बुद्धीमंतांनाही प्रियंकाच कॉग्रेससह आपल्यालाही गाळातून बाहेर काढील, अशी अपेक्षा होती. म्हणूनच पुर्वाश्रमीचे कुठलेही कर्तृत्व नसतानाही नुसत्या घोषणेनंतर प्रियंका संपुर्ण उत्तरप्रदेशात कॉग्रेसचा डंका पिटणार; अशी वर्णने सुरू झालेली होती. पण मागल्या दोन आठवड्यात प्रियंकाच्या कर्तबगारीने मोदींची निद्रिस्त लाट उघड दिसायला लागली. तेव्हा अनेक दिल्लीकर बुद्धीमंतांचाही भ्रमनिरास होऊन गेला आहे. तेव्हा त्यांना मराठीतली प्रसिद्ध उक्ती आठवली असेल. घरचं झालं थोडं आणि व्याह्याने पाठवलं घोडं, अशी ती उक्ती आहे.
यातलं थोडं कोण आणि घोडं कोण? आधीच राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष होऊन कॉग्रेस छानपैकी डबघाईला आणलेली आहेच, त्यात आता प्रियंकांची भर पडलेली आहे. त्या आपल्या आजीसारख्या दिसतात अशा आवया पिकवून दिशाभूल करता येते. पण जिथे कसोटीची वेळ येते, तिथे नुसत्या दिसण्याने भागत नसते. लढायची वेळ आल्यास पळ काढून चालत नाही. काही दिवसांपुर्वी अमेठीत प्रियंका फ़िरत होत्या आणि कोणीतरी त्यांना निवडणूक लढवण्याविषयी प्रश्न विचारला. तर वाराणशीतून उभी राहू काय, असा प्रतिप्रश्न करून त्यांनी खळबळ माजवली. अशा विधानांना हेडलाईन व प्रसिद्धी मिळते याची जाणिव त्यांना असावी. पण त्याचे परिणाम सुद्धा असतात. ते परिणाम झटकून टाकता येत नाहीत. एका जागी असे विधान केल्यावर तशी हेडलाईन मिळालीही. पण नंतर तोच विषय प्रियंकाचा पाठलाग करू लागला. जिथे जातील तिथे त्यांना किंवा पतिदेव रॉबर्ट वाड्रा यांना त्याविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले. आता गरजले मग बरसणार नाही, असे ठामपणे सांगता येत नसते. म्हणून मग टाळाटाळ सुरू झालेली होती. त्यामुळे वाड्राने आपली पत्नी सज्ज सज्ज असल्याची भाषा केली, तर प्रियंकानेही पक्षाने आदेश दिला तर वाराणशीतही लढायला तयार असल्याची दर्पोक्ती केली. पणा तशी वेळ आली, तेव्हा मग घाम फ़ुटला. वाराणशी म्हणजे एक नुसता मतदारसंघ नाही, तर पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे आणि तिथून लढायचे तर पराभवाची तयारीही ठेवायला हवी. जी हिंमत मागल्या खेपेस केजरीवाल यांनी दाखवली आणि पुर्वी राजनारायण इत्यादींनी दाखवलेली आहे. पण गांधी खानदानाला पराभवाची मोठी भिती वाटते. त्यांना गुंगीत झोपलेल्या सावजाला मारण्याची शिकार करण्यात पुरूषार्थ वाटत असतो. मग त्यांनी साक्षात शिकारी वाघाच्या गुहेत घुसण्याची हिंमत कशी करावी? ते काम सामान्य स्मृती इराणी करू शकतात. प्रियंकाला तितके क्षुद्र काम कसे जमणार ना?
ही वस्तुस्थिती प्रत्येक कॉग्रेसवाला जाणतो आणि म्हणूनच कोणीही त्यावर बोलायचे टाळलेले होते. हा डाव आपल्यावरच उलटण्याची भिती कॉग्रेसच्या मुरब्बी जाणकार नेत्यांना होती. म्हणून तसा कोणी हुशार नेता त्यावर जास्त बोलत नव्हता. पण अलिकडे जे काही तोंडाळ वाचाळवीर कॉग्रेसने प्रवक्ते म्हणून भरती केलेले आहेत, त्यांना परिणामांची कशाला फ़िकीर असेल? त्यांनी लंब्याचवड्या गप्पा करायला मागेपुढे बघितले नाही आणि अमेठीत प्रियंकांनी केलेल्या गंमतीचा त्यांच्यासाठीच मग राजकीय फ़ास होऊन गेला. त्यात अधिक फ़सू नये म्हणून मग मोदींनी अर्ज भरायच्या दिवशी त्याचीच चर्चा चालू झाल्यावर, त्याला पुर्णविराम देण्यासाठी लगबगीने वाराणशीत गेल्यावेळी पुरता तोंडघशी पडलेल्या उमेदवाराचे नाव कॉग्रेसने जाहिर केले. त्यामागचा हेतू चुकीचा म्हणता येणार नाही. त्यांना प्रियंकाला फ़ा्स लागण्यातून सुरक्षित करायचे होते. पण तसे करण्यासाठी दोन दिवस आधी अजय राय यांचे नाव घोषित करता आले असते आणि मोदींच्या भव्य रोडशोच्या दिवशी त्यावर चर्चाच होऊ शकली नसती. पण ऐन रोडशोचा रंग चढत असताना दुसरेच नाव घोषित झाल्याने प्रियंकाने पळ काढल्याचा अर्थ लावला गेला आणि कॉग्रेस अधिकच गाळामध्ये फ़सत गेली. तसे झाल्यावर खुलासे व उत्तरे देत बसण्याला अर्थ नसतो. कोळ्याच्या जाळात फ़सलेला किटक जितका सुटायची धडपड करतो, तितका अधिकच फ़सत जातो. कॉग्रेसचे प्रवक्ते व नेत्यांनी नेमकी तशी आपल्या पक्षाची दुर्दशा करून टाकलेली आहे. ते जितके खुलासे देत आहेत, तितके अधिकच सापळ्यात फ़सताना दिसत आहेत. प्रियंकाची विधाने चित्रीत व ध्वनीमुद्रित झालेली व नोंदलेली असताना, हे प्रकरण माध्यमांनीच पिकवलेल्य अफ़वा असल्याचे खुळे खुलासे अधिकच केविलवाणे आहेत. पण आता सामान्य प्रवक्त्यांना बाजूला सारून प्रित्रोडा वा राजीव शुक्ला असले उपरे नेते अधिक दिवाळखोरी करू लागले आहेत.
प्रियंका व तिचा पतीही लढायला राजी असताना राहुलने आपल्या भगिनीला उमेदवारी नाकारली, अशी एकूण चर्चा होती आणि तशी ती राहिल्याने फ़ारसे काही बिघडणार नव्हते. पण पित्रोडा यांनी प्रियंकालाच राहुलनी निर्णय घ्यायला सांगितले आणि तिनेच माघार घेतल्याचे सांगितले. मग शुक्ला यांनी वेगळा युक्तीवाद करीत राहुलनी त्यावर निर्णय घेतल्याची घोषणा केली. म्हणजे पक्षात काय चालले आहे, त्याचा थांगपतत्ता गांधी कुटुंबियांच्या निकटवर्तियांनाही नसावा अशी खात्री पटायला हरकत नाही. असे खुलासे लोकांचे व पत्रकारांचे समाधान करण्यापेक्षा अधिकच प्रश्न निर्माण करीत असतात. त्यामुळेच प्रियंका घाबरली की राहुलना आपल्या भगिनीला लढवणे असुरक्षित वाटले; याची चर्चा सुरू झाली. मुळात त्याची गरज होती काय? सपा बसपा यांनी सोबत घेतले नाही म्हणून राहुलनी स्वबळावर उत्तरप्रदेश निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला होता आणि त्यासाठी प्रियंकाला मैदानात आणल्याची चर्चा झाकली मूठ होती. प्रत्यक्षात आजपर्यंत अमेठी रायबरेलीतही प्रियंकांना आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. म्हणूनच मतमोजणी व निकाल लागण्यापर्यंत फ़ुगा फ़ुगलेला ठेवण्यात धन्यता मानायची असते. म्हणूनच वाराणशीत लढायची भाषा किंवा तत्सम वाचाळता गरजेची नव्हती. आधीच बंधूराज धमाल करीत आहेत. त्यात आता भगिनीची भर पडली आहे. हे घरातलेच थोडे म्हणायचे तर शुक्ला वा पित्रोडा अशा व्याह्यांनी आपापली घोडी दामटण्याची गरज होती काय? पण पक्षच एक अराजक असेल तर कोण कोणाला वेसण घालणार आणि कोण कशाला लगाम लावणार? अशी स्थिती आज कॉग्रेसची आहे. त्यात कॉग्रेसचा जिर्णोद्धार बाजूला राहिला आणि दिल्लीसह देशातले बुद्धीमंत मात्र गाळात रुतत चालले आहेत. त्यातल्या काहीजणांनी आता वाराणशीतून माघार घेणार्या प्रियंका व कॉग्रेसला शेळपट म्हणण्यापर्यंतही मजल मारली आहे. मतदान संपेपर्यंत काय काय होईल ते बघायचे.