Tuesday, April 9, 2019

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

 modi bigger than life के लिए इमेज परिणाम

आजही अश्वारूढ शिवरायांचा पुतळा प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला भुरळ घालतो. त्याच्या हातात उपसलेली तलवार असेल, तर छाती भरून येते. पण किती लोक आज तलवारीने युद्ध करण्याची कल्पना करू शकतात? मोठ्या नेत्याला सन्मानाने आजही तलवार भेट दिली जात असते. तेव्हा ती तलवार प्रतिक झालेली असते. प्रत्येक शीखधर्मिय कंबरलेला खंजीर वा तलवार लावून जगतो. वरीष्ठ सेनाधिकारीही सन्मानपुर्वक तलवार मिरवत असतात. पण ते हत्यार उरलेले नाही. त्यापेक्षा भेदक शस्त्रास्त्रे आता विकसित झालेली आहेत. पण तरीही जगात आजही त्यांचा प्रतिक म्हणून वापर होत असतो. आयसीस सारखी संघटना किंवा सौदी अरेबियासारखा देश, तलवार आपल्या मानचिन्हात सहभागी करून घेतात. मात्र त्यांचा प्रत्यक्ष युद्धात उपयोग राहिलेला नाही. त्याप्रमाणेच जगण्यातल्या व युद्धातल्या अनेक सुविधा व रणनिती बदलून गेलेली आहे. कालबाह्य ठरलेल्या अशा हत्यारे वा उपायांनी आज युद्ध जिंकता येत नाही, की लढवताही येत नाही. अगदी विविध खेळात किंवा व्यापार व्यवहारातही नियम व पद्धती पुरत्या बदलून गेल्या आहेत. त्यात नव्या कल्पना विकसित झाल्या आहेत. त्यामुळे नव्याच पद्धतीने नव्या लढाया जिंकाव्या लागत असतात. मग त्यातून लोकशाहीतल्या निवडणूका कशा सुटू शकतील? स्वातंत्र्योत्तर काळातील आरंभीच्या निवडणूका व १९७० नंतरच्या जमान्यातील निवडणूका; यात मोठा फ़रक पडला होता आणि १९९० नंतर आणखी बदल झाले. नवनवी साधने उपयोगात आणली जाऊ लागली आणि नवी तंत्रे विकसित होत गेली. नेतृत्वाचे नवे चेहरे व स्वभाव कार्यशैली उगम पावली. २०१४ ची निवडणूक आजवरच्या सर्व निवडणूकांच्या पद्धतीला व निकालांना पुसून टाकणारी होती. या निखळ वास्तवाकडे पाठ फ़िरवून किंवा त्याचीच नक्कल करून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली जाऊ शकत नाही

नरेंद्र मोदी हा एक मुख्यमंत्री देशव्यापी कॉग्रेसला आव्हान देऊन पुढे आला आणि त्याने नुसते निकाल वदलले नाहीत, तर एकूण निवडणूक लढण्याचे तंत्रच बदलून टाकलेले आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोदींनी नव्याने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा आपल्या मोहिमेत पुरेपुर वापर करून घेतला. त्याचवेळी जुन्या काळातील संघटनेवर निवडणूक लढवण्याची पद्धती पुनरुज्जीवित केली. अशा दोन टोकाच्या बेमालूम मिश्रणातून गेली लोकसभा निवडणूक लढवली गेली होती. त्यात मोदी वा त्यांच्याच नेतॄत्वाखालचा भाजपा नवे प्रयोग करीत असताना, अन्य पक्ष जुन्या कालबाह्य चक्रात फ़सून राहिले आणि चमत्कार घडला होता. त्याला मोदीलाट किंवा करिष्मा ठरवून निकालांचे विश्लेषण करणे म्हणजे सत्याकडे पाठ फ़िरवणे आहे. सत्याकडे पाठ फ़िरवली म्हणून ते संपत नाही, की त्याचे परिणाम टळत नाहीत. २०१४ मध्ये मोदींनी भाजपाकडे असलेल्या संघटनेला पुर्ण शक्तीनिशी वापरले आणि नव्या तंत्रज्ञान व साधनांची त्याला जोड दिलेली होती. त्यातून युपीए वा आघाडीच्या राजकारणाला पर्याय असू शकतो, असे चित्रही निर्माण केले. त्यातून जी मोदींची प्रतिमा निर्माण झाली, तिच्याशी कसा सामना करावा, याचे उत्तर त्यांच्या विरोधकांपाशी नव्हते. त्यातूनच पहिली फ़ेरी मोदी जिंकून गेलेले होते. एका बाजूला सोशल मीडिया व नवे डिजिटल माध्यम मोदींनी कुशलतेने वापरले. तर दुसरीकडे बुथ म्हणजे मतदान केंद्रापर्यंत जाऊन पोहोचलेल्या संघटनात्मक शक्तीचा काटेकोर वापर करून घेतला. विरोधक किंवा कॉग्रेस तिथेच तोकडी पडली. त्यांना मोदी नावाचा झंजावात कळलाच नाही. किंवा समजला असेल तर त्याला सामोरे जाण्याची कुठलीही व्यवहारी कल्पना त्यांच्यापाशी नव्हती. म्हणूनच असे सर्व विरोधक १९९० च्या युगात असल्यासारखे चाचपडत राहिले आणि त्यांना निकालाच्या दिवशीचे आकडे बघून चकीत व्हायची पाळी आली.

१९९० नंतर कुठल्याच पक्षापाशी देशव्यापी संघटनेचे जाळे उरलेले नव्हते आणि कॉग्रेसपाशी निदान संघटनेचा ढाचा शिल्लक होता. दुसरीकडे रा. स्व, संघाच्या सोबतीने भाजपाकडेही देशव्यापी संघटनात्मक सांगाडा सज्ज झालेला होता. त्याचा वापर करण्याची कुशलता मोदी व त्यांच्या नव्या पिढीतल्या सवंगड्यांपाशी होती. त्याचा प्रभाव कॉग्रेस व अन्य पक्षांना ओळखता आला नाही, की राजकीय विश्लेषक म्हणून मिरवणर्‍यांनाही समजून घेता आला नाही. निवडणूक ही उमेदवार व पक्ष लढत असले, तरी त्यातले सर्वात भेदक शस्त्र सामान्य मतदाराच्या हाती असते. त्याने ते कुठल्या व कशा पद्धतीने वापरले, त्यानुसार निकाल लागत असतात. त्या सामान्य मतदाराच्या मनात ज्या प्रतिमा उभ्या रहातात किंवा उभ्या केल्या जातात, त्यानुसार मत नावाचे शस्त्र वापरले जात असते. म्हणूनच ही प्रतिमांची लढाई असते. जी प्रतिमा भावते तिच्या बाजूने मतदार लढायला मैदानात उतरत असतो आणि त्याला लढायला प्रवृत्त करणारी संघटनात्मक शिस्तबद्ध फ़ौज निर्णायक ठरत असते. एका बाजूला मोदी अशी प्रभावशाली प्रतिमा उंचावण्यासाठी राबत राहिले आणि दुसर्‍या बाजूला अमित शहा किंवा तत्सम संघटक लढवय्यांनी गल्लीबोळात व गावखेड्यात मतदाराला घराबाहेर काढून मतदानकेंद्राच्या रणांगणात आणायची कामगिरी पार पाडलेली होती. त्याच्या उलट विरोधक मात्र रणवाद्ये वाजवूनच युद्ध जिंकण्याच्या शैलीत गुरफ़टून राहिले होते आणि त्यांचे कायकर्ते वा लढवय्या मतदार विखुरलेला वा निष्काळजी घरी बसलेला होता. अशी ती २०१४ ची विषम लढाई होती. एका बाजूला नरेंद्र मोदींची प्रभावी होत गेलेली प्रतिमा आणि दुसर्‍या बाजूला कुठलीही नजरेतही न भरणारी अन्य प्रतिमा, अशा लढाईला विषमच म्हणावे लागेल ना? त्यामुळे आठ लोकसभांच्या नंतर एका पक्षाला थेट बहूमत मिळण्याचा चमत्कार घडला होता. तो चमत्कार नव्हता तर बदलत्या कार्यशैली व काळाचा परिणाम होता.

मागल्या पाच वर्षात विरोधकांनी मोदींची वा भाजपाची ही कार्यशैली समजून घेण्याची व अभ्यासण्याची गरज होती. ती गरज भाजपाची नव्हेतर विरोधकांची गरज होती. पण ते करण्यापेक्षा या लोकांनी निव्वळ टिकाटिप्पणी व आरोपबाजी करण्यात वेळ वाया दवडला. पर्यायी संघटनात्मक शक्ती उभी केली नाही, की असलेल्या संघटनेची डागडुजी करण्यालाही महत्व दिले नाही. नुसता गवगवा किंवा गोंगाट करून बाजी मारण्याची १९९० पुर्व पद्धत आता निकालात निघालेली आहे. मोदींनी लोकसभेत बहूमत मिळवताना ती जुनी कार्यशैली निकालात काढलेली आहे. त्यामुळे यापुढे निवडणूका मैदानात उतरून वा जनमानसात प्रभावी प्रतिमा रुजवूनच जिंकण्याला पर्याय उरलेला नाही. प्रत्येक खात्यात पंधरा लाख रुपये किंवा दोन कोटी रोजगार असल्या आश्वासनांनी मोदींना बहूमत दिलेले नाही. मुळात तसे कुठलेही आश्वासन मोदींनी दिलेले नव्हते. तर विरोधकांनी केलेला तो अपप्रचार आहे. मोदींनी तात्कालीन युपीए सरकार लुळेपांगळे व कृतीहीन असल्याचा डांगोरा पिटून, आपली कठोर निर्णय घेणारा नेता अशी प्रतिमा उभी केली. त्यातून त्यांना बहूमतापर्यंत मजल मारता आली. पण अपप्रचाराने मोदी संपवता येईल, अशा भ्रमात विरोधक पाच वर्षे राहिले आणि आता पुढली लोकसभा दारात येऊन उभी राहिली. तरी विरोधक आपणच केलेल्या अपप्रचारात गुंतून पडलेले आहेत. त्यामुळे विशेष प्रयत्न केल्याशिवायही मोदींचे पारडे जड दिसते आहे. महागठबंधन करण्यापासून एकास एक उमेदवार देण्यापर्यंतचा विरोधकांच्या डरकाळ्या पोकळ ठरल्या असून, मोदी व भाजपा मात्र संघटनात्मक शक्तीबरोबर प्रतिमा उभारण्यातही पुढे गेलेले आहेत. आजही आपल्यासमोर विरोधकांचा कुठलाही एक चेहरा नाही, असे मोदी उघडपणे सांगतात, त्यातला आत्मविश्वासच बोलका आहे. तो राहुल गांधींच्या आक्रस्ताळ्या घोषणांसारखा नसून जनतेला जाऊन भिडणारा आहे.

पाच वर्षे बहूमताचे सरकार चालवुनही मित्रपक्षांना गुण्यागोविंदाने निवडणूक काळात जवळ घेण्यातली भाजपाची चपळाई दुर्लक्षित करता येणार नाही. उलट मागल्या वेळी सपाटून मार खाल्लेल्या व अनेक राज्यात असलेली सत्ता गमावलेल्या कॉग्रेसला मित्रपक्षांनाही जवळ राखता आलेले नाही, हा फ़रक नजरेत भरणारा आहे. निवडणूकीपुर्वी म्हणजे सत्ता दुर असताना कॉग्रेस मित्रपक्षांना सोबत घेऊ शकत नाही, तर निकालानंतर अशा रागावलेल्या मित्रांना घेऊन कॉग्रेस वा राहुल सरकार कसे चालवणार आहे? ही सामान्य जनतेच्या मनातली शंका आहे. उद्या निकालानंतर मित्र होऊ शकणारे आजच एकमेकांना शिव्याशाप देत लोकांसमोर आलेले आहेत. मोदीना हटवल्यावर एकत्रित सरकार चालवण्याची आश्वासने देत आहेत. हा केवढा विरोधाभास आहे? लढाईत एकत्र येण्याची इच्छा नसलेले लढाई संपल्यावरची लुट समजूतीने आपापसात वाटून घेऊ म्हणतात ना? लुटमारीपुर्वीच दरोडेखोरांमध्ये हाणामार्‍या होत असतील, तर त्यांचे भवितव्य काय असू शकते? ज्यांच्यात एकवाक्यता नाही, असे लोक चांगले खंबीर सरकार चालवू शकत नाहीत, अशीच प्रतिमा यातून तयार होते. उलट मोदी व भाजपा यांनी एकमुखी नेतृत्व आणि एकदिलाने लढाई, अशी प्रतिमा मोदींनी उभी केलेली नाही काय? कारण त्यांना निवडणूक व बहूमत जिंकायचे आहे आणि ते एका प्रभावी प्रतिमेतून शक्य असल्याची जाणिव त्यामागे आहे. आजकाल लोकांना स्थीर सरकार व एकपक्षीय खंबीर सरकारचा अर्थ उमजलेला आहे. त्यावर मात करण्यासाठी तरी विरोधकांनी आघाड्या व जागावाटपात समजूतदारपणा दिसेल याची काळजी घ्यायला हवी होती. अधिक जागा मागण्यापेक्षा वाट्याला येतील त्यातील अधिक जागा जिंकण्याला प्राध्यान्य द्यायला हवे होते. आपापली संघटनात्मक शक्ती वाढवून बूथ पातळीवर भाजपाशी दोन हात करायला सज्ज व्हायला हवे होते. त्याचा कुठे मागमूस दिसतो काय? प्रतिक व प्रतिमा यात मोदी मतदानापुर्वीच जिंकलेले दिसतात ना?

10 comments:

  1. प्रतिमि आणि प्रतिभा यामधला फरक‌‌ बारकाव्यानिशी उदा.सह आपण माडलाय....

    भाऊ आपणांस एक विचारायच आहे ‌,समझोता बाॅंम्ब खटल्याच्या निकालावर आपण जे भाष्य केले ते तर बिनतोडच आहे.त्यामध्ये आपण निवृत्त अधिकारी आरव्हिएस मणी यांचे 'द मिथ ऑफ हिंदू टेरर' या पुस्तकाचे वर्णन केले आहे ते पुस्तक मराठीत उपलब्ध आहे काय कृपया मार्गदर्शन करावे ‌‌‌हि विनंती......

    ReplyDelete
    Replies
    1. हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड - Anuwad Arun Karmarkar
      Below is Link -
      https://www.akshardhara.com/en/samajik-bharat/30715-Hindu-Dahashatavad-Navache-Thotand-R-V-S-Mani-Param-Mitra-Publications-buy-marathi-books-online-at-akshardhara-9789386059598.html

      Delete
  2. खरय भाउ पण यंदाची निवडणुक निरुत्साही आहे.

    ReplyDelete
  3. bhau, mala vatate ki modinni pratima ani pratike yacha ati-vapar talayla hava.. mi modi supporter ahe ani majhya baghanyatale anek mhanje majority tyanche supporter ahet.. but there are many youngsters who were first time voters in the last election. they voted modi in last election but now they have gone in opposition. Because they feel that modi does not connect with them. te havetach boltat.. khare bolayla taltat.. they are especially vidarbh-marathwada rural ares. at times I also feel the same.. te modi dweshi nahit pan tyanchyapasun tutale ahet.. he needs lot of corrective actions in the second term..

    ReplyDelete
  4. मोदी हारले तर काश्मीरमधे असलेला इस्लामी जिहाद आपल्या दारात येईल. मोदी हारले तर हिंदू म्हणून जगणे अशक्य होईल.

    ReplyDelete
  5. तुमचं विश्लेषण पटणार नाही अस होत नाही भाऊ. विरोधक मोदींना हुकुमशाह म्हणतात, लोकशाही न मानणारा म्हणतात परंतु मित्र पक्षांना एकत्र तेच घेऊन लढतायत.

    ReplyDelete
  6. हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड ,अनुवादक - अरुण करमरकर , परम मित्र पब्लिकेशन

    ReplyDelete
  7. मोदींचे विरोधक भांबावलेले आहेत. त्यांना काय करावे तेच समजत नाही. सोनिया मॅडमना आपल्या युवराजांना कधी राज्याभिषेक होतोय , त्याची घाई झालीय . मोदींच्या इतर विरोधकांना युवराज नको आहेत. अशी ही तीन पायांची शर्यत विरोधक धावत आहेत. मोदी दोनच पायावर यांना धोबीपछाड देणार , यात अजिबात संशय नाहीच !

    ReplyDelete
  8. भाऊ २०१४ ला ही असेच वाटले होते..मग का हरले भाजप व मित्र पक्ष?
    फील गुड मध्ये राहू नये भाजप नेत्यांनी

    ReplyDelete
    Replies
    1. २०१४ मध्ये भाजप आणि मित्रपक्ष हरले? तुम्हाला २००४ म्हणायचं आहे का?

      Delete