Tuesday, April 14, 2015

ताकाला जाऊन भांडे कशाला लपवता?



गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा संमत झाल्यावर अनेक नाटकी पुरोगाम्यांना नवे कोलित मिळाले आहे. त्यांनी आपापल्या पद्धतीने पोरकटपणा सुरू केला आहे. एका बाजूला साध्वी वा महंत जे काही बोलतात, त्याचे तर्कशात्र विचारणार्‍यांनी आपणही तकशुद्ध वागावे, इतकी तरी काळजी घ्यायला नको काय? म्हणजे कोणी दहा मुले जन्माला घालण्याचे हिंदू समाजाला आवाहन करणे खुळेपणाचे असेल, तर गोमांस आपण खात नसताना त्याच्या समर्थनासाठी कंबर कसून बाहेर पडणे, कितपत तर्कशुद्ध आहे? प्रसिद्ध नाटककार साहित्यिक गिरीश कर्नाड यांनी तो पराक्रम केला आहे. अर्थात असे त्यांनी प्रथमच केलेले नाही. आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी अलिकडल्या काळात त्यांच्यासारख्या अनेक मान्यवरांची स्पर्धाच चालू असते. लोकसभा निवडणूक काळात त्याला खुपच ऊत आलेला होता. आता पुन्हा बारीकसारीक निमीत्ते शोधून त्याचे प्रयोग चालूच असतात. त्यापैकी एक म्हणून कर्नाड यांनी गोमांसाचे पदार्थ वाटण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामागे त्यांचा भाजपा वा हिंदुत्व विरोध आहे, हे कोणालाही समजू शकते. पण आपला असला चेहरा लपवून उदात्त मुखवटा चढवून कर्नाड बोलतात. आपण गोमांस खात नाही, कारण माझ्या खाद्यसवयीचा तो भाग नाही. पण ज्यांची ती खाद्यसंस्कृती आहे, त्यांचा तो अधिकार हिरावून घेण्याला माझा विरोध आहे. म्हणूनच त्यांच्या त्या अधिकाराच्या समर्थनासाठी मी यात सहभागी झालो, असा खुलासा कर्नाड यांनी केला आहे. हिंदूत्वाचे राजकीय विरोधक हा आपला खरा चेहरा त्यांनी लपवण्याचे काहीही कारण नाही. तो त्यांचाही अधिकार आहे. राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला आपले राजकीय मत बाळगण्याचाही अधिकार दिलेला आहे. म्हणूनच राजकीय विरोधकांच्या कृतीच्या विरोधात उभे ठाकण्याचाही अधिकार कर्नाड यांना आहे. मग हे भलतेच नाटक कशाला?

दुसर्‍यांच्या अधिकाराचे जतन करण्यासाठी कर्नाड कधीपासून झटू लागले? गेल्या बारातेरा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काहूर माजलेले होते. त्यांनाही लोकसभेला उभे रहाण्याचा व निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. त्यांना उमेदवार करण्याच्या विरोधात इतका गदारोळ कशाला, असा सवाल कर्नाड यांनी विचारलेला नव्हता. हिंदूत्वाचे जे कोणी राजकारण करतात, त्यांना आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे, असे कर्नाड यांना वाटत नाही काय? नथूरामवरचे जे नाटक काही वर्षापुर्वी आले होते, त्याच्या विरोधात प्रचंड आवाज उठवला गेला आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली होती. तेही नाटक कायद्याच्या कसोटीवर उतरलेले होते आणि बंदी घालण्याची मागणी कोर्टाने फ़ेटाळून लावलेली होती. त्यावेळी कर्नाड काय करत होते? त्यांना ते नाटक आवडणे वा नावडणे हा वेगळा भाग होता. जसे आज ते गोमांस खात नाहीत, तरी खाणार्‍यांच्या समर्थनाला पुढे आले, तसे तेव्हा नथूराम नाटकाच्या समर्थनालाही त्यांनी तितक्याच हिरीरीने पुढे यायला हवे होते. वास्तविक नाट्यक्षेत्र हा त्यांचा प्रांत आहे आणि अविष्कार स्वातंत्र्याचे तेच मोठे योद्धे आहेत. मग तेव्हा त्यांची वाचा कशाला बसलेली होती? गोमांस न खाताही खाण्याच्या हक्क अधिकाराच्या बचावाला पुढे आले, तसेच त्यांनी नाटक न बघताही ते बघणार्‍यांच्या समर्थनार्थ पुढे यायला हवे होते. मग त्यांना तटस्थ असल्याचा दावा करता आला असता. पण तेव्हा बिळात दडी मारून बसायचे आणि आता मुखवटे लावून उदात्ततेचे नाटक रंगवायचे; हा शुद्ध दांभिकपणा असतो. बंगलोरला गोमांस विरोधाचे आंदोलन झाले, त्यात कर्नाड यांनी सहभागी होण्यावर कोणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण आपण तटस्थपणे त्यात सहभागी होत असल्याचे नाटक करू नये. आणि तटस्थ असलात तर प्रत्येक बाबतीत त्याची साक्ष द्यावी लागेल.

उदाहरणार्थ हिंदूत्व किंवा संघाचे जे काही काम चालते, त्याला कर्नाड यांनी समर्थन देण्याची गरज नाही. त्याला विरोध करण्याचा त्यांचा अधिकार अबाधित आहे. परंतु तटस्थ असतील, तर तितक्याच ठामपणे संघालाही आपली भूमिका व विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे म्हणायची कर्नाड यांनी हिंमत दाखवायला हवी ना? कधी एकदा तरी अशारितीने कर्नाड नावडत्याच्या अधिकाराचे समर्थन करायला बाहेर पडलेले आहेत काय? नसतील तर उदात्ततेचा मुखवटा कशाला? हाच पुरोगामीत्वाचा दांभिकपणा होऊन बसला आहे ज्याला लोक कंटाळून गेले आहेत. अमर्त्य सेन, अनंतमुर्ति वा कर्नाड अशा लोकांनी समाजात उजळमाथ्याने पक्षनिरपेक्ष असल्याचे मुखवटे लावून वावरायचे आणि कसोटीच्या प्रसंगी मात्र राजकीय पक्षपाताच्या भूमिका घ्यायच्या. त्यामुळेच लोकांना आता असल्या नाटकांवर विश्वास उरलेला नाही. त्यातून पुरोगामी म्हणजे दांभिकता, असा एक सार्वत्रिक समज निर्माण होत गेला आहे. वास्तवात पुरोगामी विचारसरणी अशी वा इतकी दांभिक नाही. कुठल्याही अन्य विचारसरणी वा तत्वज्ञानाप्रमाणे तो एक विचार आहे. पण अलिकडल्या काळात त्या विचारांनी प्रवृत्त होऊन काम करणारे प्रामाणिक लोक मागे पडले असून; भलत्याच भंपक नाटकी लोकांनी पुरोगामी विचारांचा ताबा घेतला आहे. हे पाखंडी नाटकी लोक पुरोगामी विचारांचे म्होरके होऊन बसल्याने व असली नाटके करीत असल्याने, तो विचार घेऊन चालणारी चळवळ व संघटना नामोहरम होत गेल्या. भाजपा वा हिंदूत्ववाद्यांसाठी त्यामुळे लढाई एकदम सोपी होऊन गेली आहे. लोकशाहीत विचारांचा संघर्ष व्हायला तुल्यबळ लढती व्हाव्या लागतात. एका बाजूला नाटक आणि एका बाजूला व्यवहार होत असेल, तर व्यवहार विजयी होतो आणि त्याचीच राजकारणात मक्तेदारी प्रस्थापित होऊन जाते. कर्नाडसारखी माणसे म्हणूनच पुरोगामी बाजूचे मारेकरी झाली आहेत.

बारातेरा वर्षात गुजरातमध्ये भाजपा व मोदी विरोधात कुठला पक्षच शिल्लक उरला नाही. कारण तिथले राजकारण आता मोदी विरोधाच्या अतिरेकाने तीस्ता सेटलवाड यासारख्या नाटकी व्यक्तींकडे गेले. माध्यमांनी तिला इतके उचलून धरले, की कॉग्रेस पक्षही तिच्या मागे फ़रफ़टत गेला आणि आपली ओळख व अस्तित्व विसरून बसला. आपल्या अफ़रातफ़री सापळ्यात तीस्ता फ़सली आणि कॉग्रेस पक्षाला आता आपल्याच पायावर कसे उभे रहावे, तेही कळेनासे झाले आहे. अन्य प्रांतात लालू, मुलायम वा मायावती हे व्यवहारी पुरोगामी नेते अशा नाटक्यांच्या आहारी गेले नाहीत, म्हणून तग धरून राहिले आहेत. पण महाराष्ट्र गुजरात, मध्यप्रदेश वा तत्सम काही राज्यातून पुरोगामी चळवळ जवळपास संपुष्टात आलेली आहे. कारण पुरोगामी म्हणजे दांभिक लोकांची टोळी, अशी एक सार्वत्रिक समजूत निर्माण होत गेली. ती पुसून काढण्यापेक्षा तिलाच खतपाणी घातल्यासारखे होत राहिले. लोकसभेपुर्वी कर्नाड, अमर्त्य सेन अशा लोकांची पोरकट विधाने आणि आताही गोमांसविषयी कर्नाड यांनी केलेली वक्तव्ये; तशीच फ़सवी आहेत. मात्र आता लोक त्याला फ़सेनासे झाले आहे. पुरोगामीत्व यापेक्षा वेगळे व पर्यायी राजकीय विचारसरणी आहे. तो नुसती प्रतिक्रीयावाद नाही की सत्तधार्‍यांना निरर्थक विरोध करण्यातून सिद्ध होत नाही. पुरोगामीत्व हे पर्यायी राजकीय व्यवस्था, धोरणे व कार्यक्रमातून लोकांपुढे आले पाहिजे आणि मतदार जनतेला तो मोदी भाजपासाठी समर्थ उपाय वाटला पाहिजे. कर्नाडसारखी नाटके मनोरंजन जरूर करतात. लोकांचे लक्ष वेधून घेतात. पण परिवर्तन घडवून आणत नाहीत. अशा निरूपयोगी नामवंताचे चेहरे वापरून मते मिळत नाहीत, की लोकांचा विश्वास संपादन करता येत नाही. म्हणूनच त्यांनीही ताकाला जाऊन भांडे लपवण्याची गरज नाही. पुरोगाम्यांनीही असल्या पाखंडातून स्वस्त:ची मुक्तता करून घ्यावी. तरच पुरोगामी विचारांना भवितव्य असेल.

3 comments:

  1. भाऊराव,

    कर्नाड माकडचेष्टा करताहेत कारण त्यांना एक आदेश आलेला आहे. Perform or perish! हा आदेश पाळला नाही तर त्यांचा दाभोलकर / पानसरे / नेमेत्सोव्ह होऊ शकतो.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. बहुतेक महाराष्ट्र टाइम्सची गफलत झाली असावी कारण त्यांनी कर्नाड यांनी बीफ खाऊन विरोध प्रकट केला असे लिहिले होते.

    http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Girish-Karnad-Beef-Ban/articleshow/46874853.cms

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    तुम्ही म्हणता की :

    >> वास्तवात पुरोगामी विचारसरणी अशी वा इतकी दांभिक नाही. कुठल्याही अन्य विचारसरणी वा
    >> तत्वज्ञानाप्रमाणे तो एक विचार आहे.

    हे विधान तितकसं पटलं नाही. पुरोगामी विचारसरणी नेमकी काय आहे ते पुरोगाम्यांना स्वत:लाच मुळी ठाऊक नाही. ते दुसऱ्यांना काय सांगणार!

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete