Friday, April 3, 2015

नासिरुद्दीन भाय.........दाग अच्छे है



भारतात लोकांचे ब्रेन वॉशिंग करून पाकिस्तान द्वेष शिकवला जातो, अशी मुक्ताफ़ळे प्रसिद्ध अभिनेते नासिरुद्दीन शहा यांनी उधळली आहेत. त्याचा विचार करता एक शंका अशी आली, की हे गृहस्थ गेली कित्येक वर्षे नेमके कोणत्या देशात वास्तव्य करून आहेत? जर भारतात असतील, तर अशा ब्रेन वॉशिंगमधून त्यांचाही मेंदू धुतला जाणार ना? आणि तसे असेल, तर त्यांनाही पाकिस्तानविषयी प्रेम वाटण्याचे काही कारण नाही. पण तसे घडलेले नाही. म्हणजेच इथल्या ब्रेनवॉशिंगचा त्यांचा दावा खोटा असावा किंवा दुसर्‍या प्रकारच्या ब्रेनवॉशिंगचे नासिरभाय बळी असावेत. म्हणजे भारतात राहून ज्यांना पाकिस्तानच्या हिंसाचारी जिहादचे उमाळे यावेत असेही ब्रेन वॉशिंग चालते, त्यात शहांचा मेंदू ड्रायक्लिन होऊन निघालेला असावा. त्यामुळे भारतात नित्यनेमाने जिहादला बळी पडणार्‍या निरपराधांविषयी इतका कोरडेपणा व्यक्त झाला असावा. की असल्या ब्रेनवॉशिंगच्या अतिरेकाने त्यांचा मेंदूच पुरता विरून विरघळून गेला आहे?

मध्यंतरी भारताचे एक अनुभवी कुशल अभिनेते नासिरुद्दीन शहा यांनी पाकिस्तानी दौरा केला आणि ते तिथे मिळालेल्या प्रेमाने कमालीचे भारावून गेले. सहाजिकच त्यांना आपला देश किती मागासलेला व धर्मांधतेने बरबटला आहे, त्याचा साक्षात्कार झाला. मग अशा साक्षात्कारी महानुभावाने लोकांचा उद्धार करण्यासाठी उपदेश करण्याला पर्यायच शिल्लक उरत नाही. म्हणूनच त्यांनी भारतीयांना पाकिस्तानचा द्वेष शिकवला जातो असे सुविचार व्यक्त केले. तेवढ्यावर न थांबता त्यांनी निरमा किंवा अन्य कुठली वॉशिंग पावडर वापरून भारतीयांचे मेंदू धुवून काढण्याचा उद्योग केला. सहाजिकच कोणी तरी उठून त्यांना समजावणे भाग आहे, की आपल्या देशात ‘दाग अच्छे है’ अशी एक जाहिरातही चालते. इथेही तेच करणे भाग आहे. मात्र ते डाग पाकिस्तानातूनच आयात केलेले आहेत. हे डाग पाकिस्तानी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या अभ्यासपुर्ण लेखातून आणलेले आहेत. म्हणूनच त्याबद्दल नासिरुद्दीन शहा यांना आक्षेप असायचे कारण नसावे.

ब्रेनवॉशिंग असा शब्दप्रयोग शहा यांनी वापरला आहे. त्याचा अर्थ असा, की कोवळ्या निरागस मनात काहीबाही भरवून देणे आणि त्याला त्याच पद्धतीमध्ये विचाराना प्रवृत्त करणे होय. हे कधी शक्य असते? वय कोवळे व मुले निरागसपणे समोर अनुभवास येणार्‍या व मिळणार्‍या माहितीचा नि:शंक मनाने स्विकार करायच्या अवस्थेत असतात, तेव्हाच हे सहजशक्य असते. थोडक्यात ज्याला शालेय शिक्षणाचे वय म्हणतात, तेव्हाच प्रामुख्याने ब्रेनवॉशिंग होऊ शकत असते. म्हणजेच शालेय पुस्तके वा शालेय शिक्षण हे कुठल्याही समाजाचे ब्रेनवॉशिंग करण्याची उत्तम जागा असते. पाठ्यपुस्तके त्याचे सर्वात प्रभावी साधन असतात. भारतात कुठल्याही शालेय पाठ्यक्रमात वा पुस्तकात किंचित जरी बहुसंख्यांक धर्माचा प्रभाव दिसला, तरी त्यावर विनाविलंब बोंबाबोंब सुरू होत असते. संपुर्ण पाठ्यक्रम सोडाच. एखाद्या धड्यात किंचितसा धार्मिक द्वेष वा भेदभाव होण्याची शक्यता दिसली, तरी भारतात कल्लोळ माजतो. शिक्षणमंत्री व सरकाराला पळता भूई थोडी व्हायची पाळी येते. म्हणजेच शहांनी म्हटले आहे, तशी ब्रेनवॉशिंग सार्वत्रिक व्हायची सोय इथे सहजासहजी उपलब्ध नाही. पण नासिरुद्दीन यांना प्रेमाने न्हाऊ घालणार्‍या पाकिस्तानच्या शालेय पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रमाची अवस्था काय आहे?

पाकिस्तानच्या शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम केवळ इस्लामचे श्रेष्ठत्व शिकवताना हिंदू व भारताविषयी द्वेषाची शिकवण देतो, अशी तिथल्याच पत्रकार व बुद्धिजीवींनी डझनावारी लेख लिहून तक्रार सातत्याने चालविली आहे. इतिहासापासून सामाजिक असत्ये मुलांच्या कोवळ्या वयात गळी मारली जातात आणि त्यातूनच पाकिस्तानात धर्मांध लोकसंख्या वाढत गेली. प्रामुख्याने झिया उल हक यांच्या लष्करी हुकूमशाहीच्या काळामध्ये जे इस्लामीकरणाचे राष्ट्रीय धोरण राबवले गेले, त्याचेच परिणाम पुढल्या काळात त्या देशाच्या दुर्दशेला कारण झाले आहेत, असा टाहो तिथले पत्रकार फ़ोडत असतात. नासिरुद्दीन शहांनी कधीतरी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार्‍यांची ही वास्तविकता बघितली असती, तर त्यांना द्वेषाचे संस्कार म्हणजे काय, त्याचा थोडाफ़ार अंदाज आला असता. ‘द न्युज’ दैनिकाच्या स्तंभलेखक व माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार कोमिला हयात लिहीतात,

‘खरे सांगायचे तर आपल्याला असलेले धोके व दहशत तालिबानांच्या पलिकडचे आहेत. आणि ही बाब अशी आहे, की आपल्याला त्याकडेच अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लोकांच्या मनाचा कब्जा ज्या अतिरेकाने घेतला आहे तो कदाचित खुद्द दहशतवाद्यांपेक्षा अधिक भयंकर धोका आहे. आणि अशी मानसिकता सर्वत्र आढळून येते आहे. चारही प्रांतांच्या मोठ्या महानगरात, आणि छोट्या शहरात व गावागावात ते जाणवते. प्लेगच्या साथीप्रमाणे तो धोका सर्वत्र वेगाने पसरतो आहे.’

‘म्हणूनच आपल्याला ज्याप्रमाणे दहशतवादाशी लढायची गरज आहे; तसेच आपल्याला अज्ञान व धर्मांधतेशी लढावे लागणार आहे. कारण त्यामुळे जो द्वेष व भ्रम निर्माण केला जातो, त्यातूनच अतिरेक व माथेफ़िरूपणा जन्माला येत असतो. शिक्षणक्षेत्रात याची सुरूवात खुपच पुर्वी झाली होती. पण जनरल झिया उल हक यांच्या लष्करी क्रांतीनंतर तिला अधिक वेग आला. आज आपल्याला ती प्रक्रिया उलट्या दिशेने माघारी फ़िरवण्याची गरज आहे. पण त्यासाठी योग्य निर्णय घेतले जात नाहीत. शालेय पाठ्यपुस्तकात अजून तोच चुकीचा विकृत पाढा वाचला जात आहे. वास्तवा पलिकडचे ठरलेले नायक व हिरो मुलांसमोर मांडले जात आहेत.’

ज्या देशात बुद्धीजिवी व विवेकी मुस्लिमांनाही वास्तव्य करायची आता भिती वाटू लागली आहे, अशा देशात काही तास वा एकदोन दिवस वास्तव्य करून, नासिरुद्दीन शहा यांना मायदेशात ब्रेनवॉशिंग होत असल्याचा साक्षात्कार झालेला असेल, तर काय बोलायचे? जगभरच्या क्रिकेट संघांनी पाकिस्तानात जाऊन खेळायला नकार दिला, तर त्याला झुगारून श्रीलंकेच्या संघाने तिथे दौरा करायची हिंमत केली होती. किती प्रेमाचा वर्षाव झाला त्यांच्यावर? भर चौकात त्या खेळाडूंची बस अडवून त्यावर गोळ्यांचा भडीमार झाला होता. ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने बस स्टेडियमपर्यंत पोहोचली आणि तिथून सामना तसाच सोडून हेलिकॉप्टरने जखमी श्रीलंकन खेळाडूंना  मायदेशी परतावे लागले होते. ह्या सगळ्या घडामोडी नासिरुद्दीन शहा यांना ठाऊकच नसतील असे कोणी म्हणू शकणार आहे का? मग असे असताना भारतात पाकिस्तानचा द्वेषच करायला शिकवले जाते आणि ब्रेनवॉशिंग होते असाच त्यांचा दावा असेल, तर त्यांनी धुतलेल्या मेंदूवर असे वास्तवाचे डाग पाडणे आवश्यक नाही का? शहाणे मानले जाणारे हे लोक असे चमत्कारिक का बोलतात, तेच समजत नाही.

 मी मराठी लाईव्ह (खुसपट)  ४/४/२०१५   

2 comments:

  1. भाऊराव,

    महाविद्यालयात शिकायला होतो तेव्हा वसतिगृहात राहायचो. तिथे नवछळ (रॅगिंग) च्या वेळेस नव्या बकऱ्याला संडासात घेऊन जात. तिथल्या भांड्यात त्याचं डोकं बुडवीत. मग वरून साखळी ओढून पाणी सोडंत असंत. या प्रक्रियेस ब्रेनवॉश म्हणायचे. पाकिस्तानात जाऊन नसीरभाईंचा असाच ब्रेनवॉश झालेला दिसतोय.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. Bhau, tumhi namud kelel, pakistani buddhivadyanche lekh chya links aplya blig var taka mhanje amhala sudhha vajata yetil..Links pathvavyat hi vinnanti

    ReplyDelete