Sunday, January 24, 2016

दहशतवादाला धर्म नसतो?



कालपरवा पाकिस्तानात मोठा घातपाती हल्ला पेशावर येथे झाला, तेव्हा तिथल्या पंतप्रधानांनी कुठल्याही भारतीय राजकारण्याला शोभेल अशा भाषेतली प्रतिक्रिया दिलेली होती. नवाज शरीफ़ तेव्हा मायदेशी नव्हते. तर शिया-सुन्नी संघर्षात तडजोड घडवून आणण्यासाठी सौदी-इराणच्या दौर्‍यावर गेलेले होते. तिथून दावोसला जागतिक व्यासपीठावरून बोलताता शरीफ़ यांनी दहशतवादाला धर्म नसतो, अशी भाषा वापरली. त्याचे कारण स्पष्ट आहे. पाकिस्तानात जिहादने जो उच्छाद सध्या मांडलेला आहे, त्यात मारणारे व मरणारे मुस्लिमच आहेत. म्हणूनच त्याचा धर्माशी संबंध नाही, असे शरीफ़ यांना म्हणायचे आहे. पण भारतात त्या अर्थाने ही भाषा वापरली जात नाही. भारतात हिंसाचारी हिंदू असला मग दहशतवादाला धर्म असतो आणि त्यात कोणते मुस्लिम नाव आले, मग दहशतवादाला धर्म नसतो, अशी भाषा सुरू होते. बिचारे नवाज शरीफ़ यांची एक अडचण अशी, की त्यांच्या देशात साधे मानवी हक्क मागण्याइतकीही हिंमत मुठभर हिंदूंना नाही. कसेबसे जीव मुठीत धरून तिथले नगण्य हिंदू जगत असतात. मग हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग शरीफ़ यांना कसा वापरता येईल? म्हणून त्यांनी मुस्लिमांच्याच जीवावर उठलेल्या मुस्लिमांचा मुद्दा मांडण्यासाठी अशी भाषा वापरलेली आहे. मात्र अशा दहशतवादाला धर्म नसला, तरी धर्माना अनुसरूनच सर्व नावे जिहादी संघटना घेतात. त्याचे काय करायचे? कारण प्रत्येक जिहादी दहशतवादी संघटनेचे नाव धर्माधिष्ठीत आहे आणि त्यांनी आपल्या दहशतवादासाठी धर्मग्रंथातूनच उतारे व तत्वज्ञान शोधलेले आहे. मग शरीफ़ यांना काय म्हणायचे असेल? जेव्हा मुस्लिमच मुस्लिमाच्या जीवावर उठतो, तेव्हा त्यात धर्म नसतो आणि बिगर मुस्लिमाचा बळी घेतला जाणार असेल, तर त्यात धर्म असतो, असे तर शरीफ़ना सुचवायचे नसेल ना?

पाकिस्तानच्याच बाजूला किंवा व्याप्त काश्मिरच्या पलिकडे अफ़गाणिस्तानची चिंचोळी सीमारेषा आलेली आहे. काही किलोमिटर्सच्या ता भूप्रदेशाला ओलांडले, मग आणखी एक मुस्लिम देशाची हद्द सुरू होते. तिथली जवळपास सर्वच लोकसंख्या मुस्लिम आहे. त्याचे नाव ताजिकीस्तान! अलिकडेच भारताच्या पंतप्रधानांनी त्याच देशाला भेट दिलेली होती. त्या ताजिकीस्तानातले सत्ताधीश मात्र भारतीय वा पाकिस्तानी जिहादी पुरोगाम्यांशी सहमत होत नाहीत. ताजिकीस्तानचे २२ वर्षे राष्ट्राध्यक्ष असलेले इमामोली यांनी तर दहशतवादापेक्षा धर्माची धास्ती घेतलेली आहे. अर्थात तिथे इस्लाम हाच प्रमुख किंवा एकमेव धर्म आहे. पण त्याच धर्माच्या धास्तीने सरकार कामाला लागले आहे आणि धर्माच्या खाणाखुणा जाहिरपणे दाखवल्या जाऊ नयेत, यासाठी कठोर कारवाई त्या सरकारने सुरू केली आहे. अलिकडेच ताजिकीस्तानतील एकमेव मुस्लिम धर्माचे नाव घेतलेला राजकीय पक्ष कायदा करून, बरखास्त करण्यात आला. सुप्रिम कोर्टानेच त्यावर शिक्कामोर्तब केले. पण तेवढ्यावर इमामोली वा त्यांच्या राजकीय सहकार्‍यांचे समाधान झालेले नाही. गेल्या काही दिवसात त्यांनी रस्त्यावर दिसेल त्या नागरिकाला पकडून त्याची दाढी करून घेण्याची सक्ती केली आहे. पोलिसांनी जोरदार मोहिमा चालवून एका दिवसात दुशानबे या राजधानीच्या शहरातील १३ हजार लोकांची दाढी गुळगुळीत करून टाकली. अनेक कर्तनालयात दिवसाचे अठरा तास काम करून न्हावीही थकलेले आहेत. प्रत्येक कर्तनालयात दाढी काढून टाकण्यासाठी गर्दी लोटलेली आहे. उघडपणे धर्मनिष्ठा किंवा इस्लामनिष्ठा दिसणार नाही, अशी काळजी घेण्याचा दंडक नागरिकांना घालण्यात आलेला आहे. आसपासच्या बहुतेक मुस्लिम देशात इसिस वा जिहादींनी घातलेल्या धुमाकुळाची बाधा आपल्या देशाला होऊ नये, म्हणून या मुस्लिमबहुल देशाने कठोर पावले उचालली आहेत.

त्या देशात महिलांनी बुरखा किंवा पायघोळ वस्त्रे परिधान करू नयेत, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. तसेच पुरूषांनीही इस्लामचे प्रतिक वाटेल याप्रकारे वेषभूषा करू नये, असे सरकारने सुचवले आहे. त्याच्याही पुढे जाऊन अरबी इस्लामिक वाटतील अशी नावेही मुलांना ठेवू नयेत, असे सरकारचे प्रयत्न आहेत. दहशतवाद हा धर्माशी संबंधित नसेल, तर ताजिकीस्तानच्या सत्ताधीशांचे हे प्रयास कशासाठी चालू आहेत? जिथे सध्या जिहादी हिंसाचाराने धार्मिक दहशतवादाचे थैमान घातले आहे, त्याच्या उत्तरेस पुर्वीच्या सोवियत संघराज्यातील पाच इस्लामिक देश मध्य आशिया म्हणून ओळखले जातात. ताजिकीस्तान त्यापैकीच एक असून सोवियत युनियन बरखास्त झाल्यावर स्वतंत्र होण्यासाठी जी लोकशाहीवादी यादवी माजली, त्यात तेव्हाही धार्मिक प्रवृत्तीने पुढाकार घेतला होता. लोकशाहीवाद्यांच्या खांदाला खांदा लावून इस्लामिस्ट लढलेले होते. त्यानंतर आजतागायत तिथे इमामोली हे दिर्घकाळ राष्ट्राध्यक्ष आहेत. एकप्रकारे अधिकारशाही असली, तरी कुठली तक्रार होताना दिसत नाही. अशा मुस्लिमबहुल देशाला इस्लामी दहशतवादाची भिती वाटते, कारण त्यांच्या दक्षिणेला बहुतेक सर्व अरबी मुस्लिम देशात तशाच धार्मिक दहशतवादाने धुमाकुळ घातला आहे. त्यापासून सुरक्षित रहायचे असेल, तर धर्माचे अवडंबर माजवण्यास आतापासूनच पायबंद घातला पाहिजे, असे त्यामागचे धोरण आहे. ज्याचा अभाव बहुतेक निधर्मी वा सेक्युलर देशात आढळतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येऊ शकते, की इस्लामी दहशतवाद जी धर्माने उभी केलेली समस्या नसून पुरोगामी लोकांच्या धार्मिक पक्षपाताने त्याला खतपाणी घातलेले आहे. मात्र त्यापासून कटाक्षाने अलिप्त राहिलेल्या देशांना वा मुस्लिम देशांना त्याची बाधा होऊ शकलेली नाही. म्हणूनच दहशतवाद ही धार्मिक समस्या नसून पुरोगामी समस्या आहे.

भारतात ज्या घटनात्मक प्रतिबंधाला इथले मुस्लिम नेते झुगारतात किंवा पाश्चात्य देशात जिथे धार्मिक चोचले पुरवले जातात, तिथेच जिहादचा प्रादुर्भाव अधिक आहे. तशी कटकट मध्य आशियातील या पाच मुस्लिमबहुल देशात नाही. जर ताजिकीस्तानात बुरख्याला प्रतिबंध घातला जाऊ शकत असेल, तर त्यासाठीच फ़्रान्स वा ब्रिटन अशा देशात बुरख्याचा आग्रह मुस्लिम स्थलांतरीत कशाला धरत असतात? जे बिगर मुस्लिम देश आहेत, तिथल्या कायद्यांना झुगारण्याची मानसिकताच त्यातून पुढे येते. अशा मानसिकतेला नाकारण्यापेक्षा त्याला धार्मिक स्वातंत्र्य ठरवण्याचा लाभ, मग जिहादी लोक उठवित असतात. भारतातले महान सेक्युलर मणिशंकर अय्यर पॅरीसच्या स्फ़ोटानंतर काय म्हणाले होते आठवते? फ़्रान्सने बुरख्यावर बंदी घातली त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील. हे पुरोगामीत्व आहे. ज्यातून धार्मिक अतिरेक व जहालवादाचे पोषण होते आणि त्यातूनच जिहादचा हिंसाचारी भस्मासूर उदयास येत असतो. तशी शक्यताच आपल्या देशात असू नये, याची काळजी आता ताजिकीस्तान सारखे देश घेत आहेत. मुस्लिम देश व बहुसंख्य मुस्लिम असूनही त्यांना धर्माच्या प्रभाव आपल्या समाजावर नको आहे कारण तिथूनच दहशतवादाचे पोषण सुरू होते, हा गेल्या दोनतीन दशकातला अनुभव आहे. त्यापासून मुस्लिम देश धडा शिकू लागले आहेत. पण पुरोगामीत्वात आकंठ बुडालेल्या देशांना त्यापासून काही शिकायची इच्छा नाही. मग फ़्रान्स वा ब्रिटन जर्मनीचा सिरीया-इराक झाल्यास नवल ते काय? भारत त्यापेक्षा किंचितही वेगळा नाही. म्हणूनच इथे दहशतवादाला धर्म नसतो, असली बाष्कळ बडबड चालते. त्याच्या परिणामी नित्यनेमाने घातपात सुरू असतात आणि हकनाक निरपराधांचा बळी जात असतो. तो बळी घेणारे जिहादी असतात. पण त्या मारेकर्‍यांचा खरा पोशिंदा पुरोगामीच असल्याचे दिसू शकते.

6 comments:

  1. ताजीकीस्तानातील तिथल्या प्रशासकांचे आपल्या पुरोगाम्यांसाठी तर मोठे अवघड कोडे असेल!हा हा .....

    ReplyDelete
  2. त्रिकाल सत्य...मांडल्या बद्दल धन्यवाद !

    ReplyDelete
  3. छान भाऊ शंकराचे नाव लाऊन हिंदूंचा गळा घोटताना मणीला (पुरोगामी) मजा येत असेल

    ReplyDelete
  4. वैयक्तिक कपडे, राहाणी याद्वारे स्वत:ची धार्मिक ओळख प्रदर्शित करणे उचित नाही हे खरेच आहे. परंतु, त्याचबरोबर हेही खरे आहे कि एखाद्या व्यक्तिने कोणते कपडे परिधान करावे, पुरुषाने दाढी ठेवावी कि नाही या सर्व बाबी वैयक्तिक स्वातंत्र्यात मोडतात. त्यावर बंधने घालणे गैर आहे.
    माणसांच्या मनावरील देव, धर्म, धार्मिक कर्मकांड यांचा पगडा कमी होण्यासाठी प्रबोधन हाच खात्रीचा मार्ग आहे. दडपशाही केली तर देवा धर्माचा पगडा अधिकच घट्ट होईल.

    ReplyDelete
  5. दहशतवादाला धर्म नसतो म्हणजे तो निधर्मी असतो.....निधर्मी दहशतवाद......secular terrorism. म्हणूनच इथले सेक्यूलर लोक दहशतवाद्यांविरूदध्ध बोलत नाहीत.... दहशतवादी सेक्यूलर आणी सेक्यूलर दहशतवादी.

    ReplyDelete