Wednesday, January 6, 2016

शरीफ़ यांचा मुजीबूर करावा लागेल



पठाणकोट हा विषय सध्या वाहिन्यांच्या चर्चेतला आहे. कारण स्पष्ट आहे. याच्या परिणामी पुन्हा भारत-पाक बोलणी फ़िसकटतील काय, असाही प्रश्न आहे. पाकिस्तान वा त्याचे नेते कितीही मैत्रीचे नाटक करीत असले तरी त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा; असे अनेक प्रश्न पठणकोट हल्ल्याने निर्माण केलेले आहेत. अशाच वाहिन्यांच्या चर्चेत पाकिस्तानात दिर्घकाळ राहिलेले भारताचे जाणते मुत्सद्दी पार्थसारथी यांचे मत बोलके आहे. त्यांनी काही वर्षे पाकिस्तानात भारतीय राजदूत म्हणून काढली आहेत आणि तिथे त्यांचे अनेक मित्रही आहेत. म्हणूनच पार्थसारथी यांच्या पठाणकोट घटनेनंतरच्या मतप्रदर्शनाला महत्व आहे. मुळातच मुत्सद्दी असल्याने त्यांच्यावर कोणी युद्धाची खुमखुमी असल्याचा आरोप करू शकत नाही. असा माणूस पठाणकोट हल्ल्यानंतर वेगळी भाषा बोलतो आहे आणि ती भाषाही कमालीची सुचक आहे. बाकी अभ्यासक मुक्ताफ़ळे उधळत असताना पार्थसारथी यांनी बोलणी थांबवावीत किंवा चालू ठेवावी, यासंबंधी मतप्रदर्शन केलेले नाही. ते म्हणाले, पाकिस्तानला असे हल्ले परवडणारे आहेत. म्हणून हा उद्योग चालू आहे. त्या देशात बलुचिस्तान वा अन्य अनेक भागात बंडखोर व तालिबानांचा उच्छाद माजला आहे. म्हणूनच सर्व सैन्य फ़क्त भारताच्या सीमेवर तैनात करणे पाकिस्तानला परवडणारे नाही. जितका आतला धुमाकुळ वाढत जाईल, तितके पाकसेनेला भारतशी लढणे वा सीमांचे रक्षण करणे अशक्य होऊ शकते. म्हणूनच मग जिहादी खेळ चालू ठेवणे परवडणारे नाही. त्याच दिशेने भारताला काही करावे लागेल. पाकसेनेला शह देण्याचा एकमेव तोच उपाय आहे. पार्थसारथी यांचे मत अतिशय सूचक भाषेतील आहे. त्याचा अर्थ असा, की पाकिस्तानातच पाकसेनेला जितके सुरक्षा व बचावात्मक कारवायांमध्ये गुंतून ठेवता येईल, तितके त्यांना जिहादी खेळापासून दूर रहाणे भाग पडेल.

याचा अर्थ फ़ारसा रहस्यमय नाही. पाकसेनेला तिथल्या राजकीय सत्तेत रस असेल तर त्यांना पाकिस्तान टिकवून ठेवणे भाग आहे. म्हणूनच पाकिस्तानचे तुकडे पडतील वा अंतर्गत बंडाळी माजेल, तर ती रोखण्याला पाकसेनेला प्राधान्य द्यावे लागेल. ते द्यायचे तर भारतात गडबडी करण्यासाठी त्यांच्यापाशी शक्ती वा सवड उरणार नाही. पाकसेनेला भारताशी बोलणी नको असली तरी त्यात नाक खुपसण्याची संधी नाकारणे, हाच त्यावरचा उपाय आहे. हे काम भारताने कसे करावे? त्याचा उलगडा हवा असेल तर आठ महिन्यापुर्वी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढलेले सूचक वक्तव्य विचारात घ्यावे लागेल. एका सेमिनारमध्ये बोलताना पर्रीकर यांनी जिहादी घातपात्यांनाच पाकिस्तानी कारवायांच्या विरोधात उभे करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. काट्याने काटा काढणे, असे त्यांचे नेमके शब्द होते. पाकिस्ताननेच तयार केलेले व नाराज निराश असलेले घातपाती पाकिस्तान विरोधात वापरले जाऊ शकतात, असेच पर्रीकरांना सुचवायचे होते. तसा एक प्रयोग माजी सरसेनापती जनरल व्ही. के. सिंग यांनी काश्मिरमध्ये वापरलाही होता. काश्मिर व व्याप्त काश्मिरात भारतीय सेनादलाच्या प्रेरणेने अनेक जिहादी पाकिस्तान विरोधातल्या कारवाया करीत होते. त्या खास विभागाला ‘टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन’ असे नाव दिलेले होते. पण त्यातून ज्या छुप्या कारवाया चालू होत्या, त्याला सुरूंग लावण्याचे पाप तीन वर्षापुर्वी भारतीय माध्यमातील काही दगाबाजांनी केलेले होते. काश्मिरात सुरक्षेच्या नावाखाली सेनादलाचे लोक राजकीय उचापती करतात, असा गाजावाजा बातम्यातून झालेला होता आणि त्यामुळे तात्कालीन सेनाप्रमुखांनी तो विभागच बरखास्त करून टाकला होता. पर्रीकर वा पार्थसारथी त्याच ‘टेक्नीकल’ कारवायांचा सूचक उल्लेख करीत आहेत. पाकिस्तानात अशा ‘टेक्नीकल’ कारवाया होऊ लागल्या, तर पाकसेनेला पठाणकोटकडे बघायला सवड मिळू शकणार नाही.

थोडक्यात भारतीय हेरखात्याने पाक हेरखात्याप्रमाणेच पाकिस्तानी भूमीत घातपात व हिंसाचाराचे थैमान घालावे, अशी ही सूचना आहे. इवलासा दरिद्री पाकिस्तान इथे भारतातल्या नाराज वा गद्दारांना हाताशी धरून इतकी धमाल उडवून देवू शकत असेल, तर अधिक साधनसंपत्ती असलेल्या भारताला इवल्या पाकिस्तानात घातपाताची मालिकाच घडवून आणणे अजिबात आघड नाही. अर्थात त्यासाठी दिर्घकाळ प्रयास करून प्रयत्नपुर्वक आपले विश्वासू हस्तक निर्माण करावे लागतात. त्यांच्यामार्फ़त मग विविध घटना घडवून आणल्या जाऊ शकतात. पाकिस्तानप्रमाणे प्रशिक्षित परकीय घातपाती पाठवण्याची गरज नाही. जे जिहादी पाकसेनेनेच सज्ज केलेले आहेत, त्यांना अधिक मोबदला देवून पाकिस्तान विरोधात वापरले जाऊ शकते. त्याची जबाबदारी कुठल्याही देशाचे सरकार घेत नसते. अशा कारवाया आजही चालू आहेत. पाकिस्तानी वर्तमानपत्रे चाळली तर तिथे भारतीय हेरखात्याचे हस्तक पकडले वा त्यांचे कुठले कारस्थान होते, त्याची माहिती सहज मिळू शकते. भारत सरकारने त्याचे उत्तरदायित्व कधी पत्करलेले नाही. फ़रक एकच आहे. भारतात मारले वा पकडले जाणारे घातपाती पाकिस्तानी नागरिक असतात. पाकिस्तानने पकडलेले घातपाती संशयित त्यांच्या देशाचे नागरिक असतात. त्यांची गद्दार म्हणून संभावना केली जाते. अशाच लोकांना मोठ्या प्रमाणात हाताशी धरून पाकिस्तान अंतर्गत अशांतता व अराजक निर्माण करणे हाच भारताने पाकिस्तानला मुहतोड जबाब देण्याचा उत्तम उपाय आहे, असेच पार्थसारथी सुचवत आहेत. त्याची दुसरी बाजूही लक्षात घेण्याची गरज आहे. बोलणी वा वाटाघाटी रद्द करण्याची गरज नाही, तर त्याचीच पाकसेनेला निकड वाटण्याइतकी त्यांची तारांबळ उडवून देणे, हाच उपाय त्यांनी सुचवला आहे. वाटाघाटी व बोलणी करण्यासाठी पाकसेनेला दबावाखाली आणणे, हा तो पर्याय आहे.

कुठलाही देश वा तिथले सरकार आपण परदेशी वा शत्रू राष्ट्रामध्ये घातपात दगाबाजी करतो, हे मान्य करणार नाही. पण म्हणून त्यात तथ्य नसते. भारतही त्यामधला अपवाद नाही. आपला शेजारी मित्र असो किंव शत्रू असो, त्याला दुर्बळ वा गुंतलेला ठेवणे, हा सुरक्षेचा उत्तम उपाय असतो. त्यासाठीच पडद्याआडून परदेशी कारवाया चालू असतात आणि तेच तर हेरखात्याचे काम असते. भारताचे तसे जाळे पाकिस्तानात नाही, असे म्हणण्यात म्हणूनच अर्थ नाही. तसा मुर्खपणा मोरारजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल यांनी पंतप्रधान असताना केलेला होता. अन्यथा भारतीय हेरखात्याने सतत आपल्या शत्रू किंवा शेजारी देशांना दबावाखाली राखलेले आहे. बांगलादेशची लढाई आपण त्यामुळेच जिंकू शकलो होतो. तिथल्या नेतृत्वाने म्हणजे शेख मुजीबूर रेहमान यांनी मदत मागितली आणि म्हणूनच त्या ‘राजकीय नेत्याला’ पाठींबा देताना तिथल्या तात्कालीन ‘पाकसेनेला’ भारताने पाणी पाजले होते ना? त्या विजयाचा खरा आधार तिथल्या जनतेला पाकसेनेपासून वेगळे पाडण्यात सामावला होता. आजही पाकसेना आणि पाक नागरी समाज वा राजकीय नेतृत्व यांना वेगळे पाडण्यात भारतीय मुत्सद्देगिरी यशस्वी ठरली, तर त्याचाही बांगलादेश होऊ शकतो. लढाई वा प्रतिहल्ला यापेक्षा पाकसेनेला दाती तृण धरायची वेळ आणणे, हाच उपाय आहे. यात युद्धापेक्षा पाकसेनेला अंतर्गत सुरक्षेच्या समस्येखाली दडपून टाकणे आवश्यक आहे. दोन देशातले मुत्सद्दी वा राजकीय नेते आणि सेनादले काय करतात, यापेक्षा त्यापैकी कुणाचे हेरखाते कुरघोडी करून दाखवते, यावर परिणाम अवलंबून असतील. पाकिस्तानला आतून बाहेरून ओळखणारे पार्थसारथी काय म्हणतात, ते म्हणूनच जाणून घेतले पाहिजे. त्यातला गर्भितार्थ ओळखला पाहिजे. भावनांनी प्रश्न सुटत नसतात. विचारपुर्वक योजलेल्या उपायांनी सुटू शकतात.

5 comments:

  1. अशा संयत आणि संतुलित प्रतिक्रियांचे माध्यमांना वावडे असते.त्यांचेtrp वाढण्यासाठी संजय राऊतसारखे 'विद्वान ' वाचाळवीर लागतात व त्यांनाच प्रसिद्धी मिळते.

    ReplyDelete
  2. भाऊ छान लेख !! ........पठाण कोट मध्ये कोम्बिंग ऑपरेशन चालू असताना .........एन डी टी वि ची बरखा दत्त आणि कोणी गोखले नामक पत्रकार मिनिटा मिनिटाला त्यांच्या ' ट्विटर ' वर अपडेट्स देत होते. या दोघांना एवढी माहिती कशी काय मिळत होती ? या दोघांच्या ' ट्वीटस बघून असे जाणवते कि जणू काही ते दोघे लपून बसलेल्या अतिरेक्यांना आपल्या लष्कराचे ' अपडेट्स ' देत होते.............हे सर्व ' भयानक ' आहे. ( अशी देशद्रोही माणसे येथे असणे ) ...त्यासाठी बलुचिस्तान वेगळे व्हायला हवे ( लवकरात लवकर )

    ReplyDelete
  3. <>
    अशा उचापती करणाऱ्या उचापत्याना हेरखात्याच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्यांचा देशद्रोह लोकांपुढे आणला गेला पाहिजे. आणि हे प्राधान्याने व्हावे यासाठी भाऊ, तुम्ही असाच एखादा माहितीपूर्ण लेख जरूर लिहावा.

    ReplyDelete
  4. भाऊ उत्तम लेख !! ४ दिवसापूर्वी बंगाल मध्ये २.५ लाख मुसलमानांनी जो हिंसाचार आणि जाळपोळ केली ती झी न्यूज सोडली तर कुठल्याही चान्नेल ने दाखवली नाही. जे सेकुलर लोक दादरी प्रकरणावरून आकांड तांडव करीत होते ते सगळे मुग गिळून गप्प बसलेत ! असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पुरस्कार वापसी करणारे आता का शांत आहेत ? भाऊ कृपया यावरही तुम्ही लेख लिहावा अशी अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  5. आपलेच लोक परदेशातल्या चौकात जमवून त्यांच्याकडून टाळ्या मिळवत मिरवत फिरणा-या पेक्षा एकच जबर झटका देऊन टाकणा-या इंदिराजी आज असत्या तर त्यांनी केंव्हाच बलुचिस्तान स्वतंत्र करून आपली पश्चिम सीमा सुरक्षित करून टाकली असती. पण आम्ही स्वत:च्याच प्रेमात इतके आकंठ बुडलो आहोत की सतत लोक जशी स्वत:च्या कॅमेराने स्वत:चीच सेल्फी काढीत बसतात तसे आम्ही सतत जगभर एक ताम्हण घेऊनच फिरत असतो आणि स्वत:च स्वत:भोविती ते फिरवत स्वत:चीच आरती गाण्यात रममाण झालेलो असतो.

    ReplyDelete