Wednesday, November 1, 2017

लंबी रेसका घोडा (उत्तरार्ध)

fadnavis uddhav pawar के लिए चित्र परिणाम

तीन वर्षापुर्वी देवेंद्र फ़डणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पक्षाने त्यांची निवड केली, तेव्हा त्यांच्याकडे नागपूरचे वा विदर्भाचे नेते म्हणून बघितले जात होते. विदर्भवादी अशी त्यांची हेटाळणी शिवसेनेने केलेली आहे. ती काहीशी वस्तुस्थिती होती. कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले, तरी राज्याच्या पक्षीय राजकारणात तेव्हाही मुंडे खडसे यांचाच वरचष्मा होता. त्यापैकी विधानसभा लागली तेव्हा मुंडे हयात नव्हते आणि खडसे मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी इर्षेने कामाला लागले होते. ते गमावल्यामुळे खडसे प्रतिस्पर्धी झालेले होते. उलट राज्यात स्वबळावर ६३ आमदार निवडून आणणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख अधिक राज्यव्यापी नेतृत्व म्हणून उदयास आलेले होते. त्यामुळेच पुढल्या तीन वर्षात फ़डणवीस यांची खरी राजकीय स्पर्धा पक्षात खडसे यांच्याशी, तर राज्यात उद्धव ठाकरे यांच्याशी रंगलेली होती. त्यापैकी खडसे यांना त्यांच्याच एका आगावूपणाने गोत्यात आणले आणि स्पर्धेतून बाजूला केले. मग उरले उद्धव ठाकरे आणि शिवसेना! त्यांच्याशी नाजूक संबंध संभाळत सरकार चालवण्याची कसरत फ़डणवीस यांना करावी लागली. वास्तविक उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागी होण्यापेक्षा बाहेरून पाठींबा दिला असता, तर तेच मुख्यमंत्र्याला आपल्या बोटावर नाचवू शकले असते. पण ती शक्यता सहभागी झाल्यामुळे राहिली नाही. तिथे फ़डणवीस यांनी पहिली बाजी मारली. त्यांनी कुठलेही महत्वाचे खाते सेनेला दिले नाही, पण मंत्रीपदे मात्र डझनभर दिली. त्यामुळे सत्तेत असूनही शिवसेनेला कुठलाही निर्णायक अधिकार मिळू शकला नाही. पण अनेक नेत्यांना सत्तापदाची चटक लागली. त्यामुळे शिव्याशाप कितीही दिले तरी सेनेची सरकारामधून बाहेर पडण्याची शक्यता संपून गेली. तिथेच त्यांनी उद्धव ठाकरे यांचा मोठा पराभव केलेला होता. म्हणूनच मागल्या तीन वर्षात वारंवार धमक्या देऊनही सेनेला सत्तेबाहेर पडणे शक्य राहिलेले नाही.

यातली गोम लक्षात घेण्यासारखी आहे. विधानसभेत तुटलेली युती सत्तेत परत एकत्र आली, तशीच ती अनेक महापालिका वा जिल्हा परिषदेतही सत्तेसाठी एकत्र आली. पण जवळपास कुठल्याच महत्वाच्या निवडणुकांमध्ये भाजपाने शिवसेनेला मतदानाच्या वेळी युतीमध्ये घेतलेले नाही. निवडणूकपुर्व युती हा विषय गेल्या तीन वर्षामध्ये कायमचा निकालात काढला गेलेला आहे. या कालावधीमध्ये शिवसेनेला सबळावर लढताना भाजपाला मागे टाकण्यात यश मिळू शकलेले नाही. अगदी मुंबईतही भाजपाने शिवसेनेला तुल्यबळ नगरसेवक निवडून आणताना आपली मते वेगळी राखली व टिकवलेली आहेत. या कालखंडात शिवसेनेने सतत राज्य सरकार वा केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार झोड उठवलेली आहे. पण त्याचा लाभ सेनेला मिळू शकला नाही की अन्य विरोधी पक्षांनाही त्याचा फ़ायदा घेता आलेला नाही. पण दरम्यान या प्रत्येक निवडणुकीत राज्यातील भाजपाच्या प्रचाराची एकहाती सर्व जबाबदारी देवेंद्र फ़डणवीस यांनी उचललेली आहे. विधानसभेच्या वेळी तशी स्थिती नव्हती. फ़डणवीस हे भाजपाचे स्टार प्रचारक नव्हते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ती जबाबदारी पेलावी लागत होती. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणूकीत फ़डणवीस यांनी एकट्याने शेकड्यांनी प्रचारसभा घेऊन आपली भूमिका लोकांपर्यंते नेली आणि मतांच्या रुपाने तिला प्रतिसाद मिळत असल्याचेही सिद्ध केलेले आहे. थोडक्यात तीन वर्षात स्थिती कशी बदलली, ते लक्षात घेण्याची गरज आहे. तेव्हा एकट्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रचाराची आघाडी संभाळली होती. तर पलिकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा दिग्गज आखाडयात उतरला होता. तरीही सेनेने ६३ आमदार निवडून आणले होते. पण ती आघाडी गेल्या तीन वर्षात शिवसेना गमावून बसली आहे आणि त्याच काळात भाजपाचा आघाडीचा प्रचारक म्हणून फ़डणवीस समोर आले आहेत.

शिवसेना वा अन्य विरोधकांशी दोन हात करायला, आता भाजपाला पंतप्रधानांची मदत मागायची गरज राहिलेली नाही. गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यव्यापी नेता म्हणून निर्माण झालेली पक्षातील पोकळी, फ़डणवीस यांनी भरून काढली आहेच. पण त्याच कालावधीत उद्धव ठाकरे यांच्याशी झुंज देत त्यांना तुल्यबळ होऊन पुढे मुसंडी मारली आहे. या तीन वर्षात आपण काय मिळवले वा काय गमावले, याचा विचार शिवसेनेने करायचा असेल, तर ही बाब लक्षणिय आहे. गेल्या महापालिका व जिल्हा तालुका मतदानात राज्यभर दौरे करून फ़डणवीसांनी आपली एक प्रतिमा जनमानसात ठसवलेली आहे. विधानसभेच्या वेळी तशी प्रतिमा एकहाती प्रचार करून उद्धव ठाकरे यांनी उभी केलेली होती. मोदी सोडल्यास उद्धव ठाकरे यांच्याइतका कोणी अन्य राज्यनेता तेव्हा दुसरा नव्हता. मागल्या तीन वर्षात तीच जागा देवेंद्र फ़डणवीस यांनी बळकावली आहे. त्याला राजकारण म्हणतात. सत्तत भागिदारी द्यायची आणि लढाईच्या रिंगणात मात्र परस्पर विरोधात दोन हात करायचे, अशी काही चमत्कारीक स्थिती या तीन वर्षात राहिलेली आहे. त्यातला धुर्तपणाही समजून घेतला पाहिजे. शिवसेनेने सतत फ़डणवीस यांच्यावर झोड उठवली आहे. पण तिचे मंत्री मात्र गप्प असतात. तर मुख्यमंत्री सहसा अकारण शिवसेनेवर तोंडसुख घेत नाहीत. जिथे गरज असेल तिथे अत्यंत बोचरे शब्द वापरून सेनेला घायाळ करीत असतात. शिवसेना सत्तेसाठी अगतिक आहे आणि तिच्यात लढण्याची क्षमता राहिलेली नाही, असे चित्र निर्माण करण्यात फ़डणवीस कमालीचे यशस्वी झाले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता त्यांनी दाखवली आहे आणि प्रसंगी आपण आक्रमकही होऊ शकतो, याचा पुरावा दिलेला आहे. राजकारण वाचाळतेने साध्य होत नाही तर अनेकदा शब्दांपेक्षाही कृती प्रभावी असते, याची साक्ष त्यांनी दिलेली आहे.

मध्यंतरी शिवसेनेच्या एका नेत्याने जुलै महिन्यत भूकंप करणार असल्याचे बोलून दाखवले. तेव्हा फ़डणवीस यांनी दिलेले उत्तर मोठे सुचक होते. आपला पक्ष कधीही मध्यावधी निवडणुकीला सज्ज असल्याचे त्यांनी जाहिरपणे सांगितले. मजेशीर गोष्ट अशी, की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती निवडणूकीच्या निमीत्ताने भेटणार होते. त्याच दरम्यान फ़डणवीसांनी मध्यावधीची भाषा केलेली होती. त्याचा अर्थ कुठल्याही क्षणी सरकारचा पाठींबा काढून घेण्याच्या धमक्यांना भाजपा वा मुख्यमंत्री भीक घालत नाहीत, इतकेच त्यांना सांगायचे होते. किंबहूना आपण तशी तयारीच करत आहोत आणि शिवसेनेसह इतर पक्षांनी हिंमत असेल तर ते आव्हान स्विकारावे, असा इशाराच त्यातून दिलेला आहे. इतकी टोकाची भाषा बोलण्याची हिंमत या मुख्यमंत्र्यात कुठून आली? एक तर त्याला आता तीन वर्षाच्या अनुभवाने काही शिकवलेले आहे. दुसरी गोष्ट आजच्या परिस्थितीत कुठलाही विरोधक आपल्याशी दोन हात करण्याइतका सबळ उरलेला नाही, अशी खात्री आहे. किंबहूना आज कॉग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष निवडणुका लढण्याची वा जिंकण्याची इच्छाशक्तीच गमावून बसलेले आहेत. त्यामुळे फ़डणवीसांना ते आव्हानच वाटेनासे झाले आहे. तर उरलेली शिवसेना मित्र की शत्रू; अशा गोंधळात स्वत:च फ़सलेली आहे. तिलाही राज्यव्यापी लढतीची इच्छा उरलेली नाही. अन्यथा जिल्हा पालिका मतदानाच्य वेळी पक्षप्रमुख राज्यभर फ़िरताना दिसले असते. राज्याचा कारभार संभाळतानाही फ़डणवीस राज्यभर सभा घेत होते आणि उद्धव ठाकरे मुंबई पुणे नाशिकच्या पलिकडे फ़िरकू शकले नाहीत. यातून विधानसभा लढण्याची अनिच्छाच स्पष्ट होते. जिंकण्याची गोष्ट दुरची झाली. मागल्या तीन वर्षात देवेंद्र फ़डणवीस या तरूणाने आपण मोदी, शिवराज चौहान वा वसुंधरा राजे यांच्यापेक्षा कमी नसल्याचे कृतीने सिद्ध केले आहे.

आता तीन वर्षांनी देवेंद्र फ़डणवीस यांनी महाराष्ट्राचा नेता म्हणून आपली यशस्वी प्रतिमा उभी केलेली आहे. या कालावधीत मराठा क्रांती मोर्चा व शेतकरी कर्जमाफ़ी अशा दोन मोठ्या पेचप्रसंगातून त्यांना जावे लागलेले आहे. त्यांनाही समर्थपणे सामोरे जाऊन त्यांनी आपले राजकीय बस्तान इतके पक्के केले आहे, की निदान आजच्या क्षणाला तरी त्यांच्या स्पर्धेत कोणी दिसत नाही. त्यांच्या पक्षात वा अन्य पक्षात त्यांच्या राज्यव्यापी प्रतिमेला तुल्यबळ ठरू शकेल, अशी कोणी राजकीय व्यक्ती दृष्टीपथात नाही. अर्थात हे स्थान प्राप्त करण्यासाठी त्यांना अनेक टक्केटोणपे खावे लागले आहेत. प्रसंगी ठामपणा व वेळ आलीच तर विनम्र पवित्राही घ्यावा लागलेला आहे. ही लवचिकता कुठल्याही महत्वाकांक्षी राजकीय नेत्यामध्ये असावीच लागते. नुसती महत्वाकांक्षा अनेकांकडे असते. पण त्यासाठी आवश्यक अशी परिस्थिती हाताळण्याची पात्रता मोलाची ठरत असते. कधी त्यासाठी प्रतिक्षा करावी लागते तर कधी धोके पत्करावे लागत असतात. शरद पवारांनाही अखेरीस मराठा जातीच्या अस्मितेचा आश्रय घेण्याची आज नामुष्की आलेली आहे आणि ब्रिगेडी मानसिकेतेला चुचकारण्याची वेळ आली. त्याला ही तीन वर्षे व त्या कालखंडात घडलेले राजकारण जबाबदार आहे. त्यात कर्जमाफ़ी व मराठा मोर्चाचही समावेश आहे. त्यानंतरही अल्पमतातले सरकार फ़डणवीस सहजगत्या टिकवू शकले, त्यामुळेच पवारांचाही धीर सुटलेला दिसतो. अन्यथा कालपरवा त्यांनी अफ़जलखानाचा विषय उकरून काढण्याचा धोका पत्करला नसता. आजवर भले बहूमताचा पल्ला पवारांना गाठता आला नसेल, पण राज्यव्यापी चेहरा वा नेता म्हणून पवारांकडेच बघितले जात होते. अगदी विलासराव वा अन्य नेत्यांना पक्षातही इतका एकहाती वरचष्मा दाखवता आलेला नव्हता. अनेक पक्षांना व नेत्यांना हाताळण्याचे कौशल्य इतर कोणाला दाखवता आले नव्हते. फ़डणवीस आता तिथे जाऊन पोहोचले आहेत.

आपण मध्यावधीला सज्ज आहोत असे ठामपणे म्हणताना तशी वेळ आली तर आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वासही आहे. किंबहूना त्यातले शब्द बारकाईने वाचले तर तथ्य लक्षात येऊ शकते. बहूमत मिळवण्याच्या गमजा या मुख्यमंत्र्याने केलेल्या नाहीत. तर पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष होऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे. याचा अर्थच आपल्याला भले राज्यातील जनतेचे निर्विवाद पाठबळ मिळणार नाही. पण अन्य कोणी आपल्या स्पर्धेतही नाही, असा विश्वास त्यामध्ये नक्कीच सामावला आहे. इतका पल्ला हा तरूण का गाठू शकला, त्याचाही उहापोह आवश्यक आहे. देवेंद्र फ़डणवीस यांची सर्वात जमेची बाजू म्हणजे ते सत्तेसाठी हपापलेले नाहीत. केव्हाही सरकार कोसळेल अशा स्थितीत त्यांनी राज्याची सत्ता हाती घेतलेली होती. आजही ते गणित बदललेले नाही. तीन मोठे पक्ष एकत्र आले तरी त्यांचे बहूमत होऊ शकते. तशीच परिस्थिती कायम आहे. पण तसे हे पक्ष एकत्र आले तर त्यांचीच राजकीय विश्वासार्हता निकालात निघू शकते आणि त्यांनी एकत्र टिकणेही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. हे इतकेच भांडवल घेऊन फ़डणवीस यांनी सरकार बनवलेले होते. त्याचा चतुराईने वापर करीत त्यांनी इथवर मजल मारलेली आहे. पण तसे करताना कधीही सरकार पडेल आणि सत्ता जाईल. याचीही मानसिक तयारी ठेवलेली होती. ही अलिप्तता त्यांची खरी शक्ती आहे. तिथेच त्यांनी शिवसेनेतील सत्तालोलूप नेत्यांना गळाला लावून सरकारमध्ये आणले आणि सरकार टिकवलेले आहे. या तीन वर्षात व्यक्तीगत पातळीवर कुठलाही आरोप त्यांच्यावर होऊ शकला नाही, हे त्यांचे दुसरे पाठबळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निखळ पाठींबा ही त्यातली तिसरी बाजू आहे. अशा विविध अनुकुल गोष्टी व प्रतिकुल बाबी, आपल्या राजकीय डावपेचांसाठी चतुराईने कशा वापराव्यात, त्याचे कौशल्य या तरूणाला राजकारणात यशस्वी करून गेले आहे.

पवारांसारखा दिग्गज मराठा नेता समोर असताना आणि शिवसेनेसारखा सतावणारा मित्रपक्ष पाठीशी असताना, देवेंद्र फ़डणवीस हे सरकार तीन वर्षे चालवू शकले, यात त्यांची कसोटी लागलेली आहे. त्यातून एक नवा नेता महाराष्ट्राला मिळालेला आहे. आपली कुठलीही राज्यव्यापी प्रतिमा नसताना केवळ मोदींच्या लोकप्रियतेमुळे आपण सत्तेपर्यंत पोहोचलो आहोत, याचे भान फ़डणवीस राखू शकले हे त्यांच्या यशाचे गमक आहे. पण त्या संधीचे सोने करून त्यांनी राज्यभर आपल्या कारभाराचा व पर्यायाने आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवण्याची केलेला प्रयत्न याला कारणीभूत झाला आहे. मोदींनी बोट धरून उभे केले व चालायला शिकवले असेल. पण बोट सोडून आपल्या पायावर उभे रहाणे व चालायला लागणे, हे या तरूणाचे कर्तृत्व नाकारून चालणार नाही. मुंडे-महाजन यांच्यानंतर पक्षात निर्माण झालेली राज्यव्यापी नेतृत्वाची पोकळी त्यांनी भरून काढली आहे. त्यांचे सुदैव इतकेच, की आधीच्या नेत्यांसमोर जसे पवार व बाळासाहेब असे दिग्गज नेते उभे होते. तितक्या उंचीचा कोणी आज फ़डणवीस यांना आव्हान देण्यासाठी समोर नाही. पण पक्षात वा पक्षाबाहेर काही आव्हान नसल्याने मुजोरीही येऊ शकते. त्याच्या आहारी जाऊन मिळवलेले कर्तृत्वही मातीमोल होऊ शकते. तसे होऊ नये याही बाबतीत हा तरूण मुख्यमंत्री सावध असल्याची साक्ष वेळोवेळी मिळत असते. वयही त्याच्या बाजूचे असल्याने पुढल्या काळात मराठी राज्याला गुजरातसारखा खमक्या निर्विवाद नेता मिळू शकेल काय? त्याचे उत्तर फ़डणवीसच देऊ शकतील. कारण समोर असलेले विस्कटून टाकणे त्यांच्याच हातात आहे आणि त्याची जपणूक करणेही त्यांच्यावरच अवलंबून आहे. स्वत:विषयी खोटा आत्मविश्वास वा अहंकार नसणे, ही या तरूणाची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याने महाराष्ट्राच्या जातीय राजकारणाला मूठमाती देण्याचे काम त्याच्याकडून व्हावे, हीच अपेक्षा!

अमिताभ बच्चनच्या शब्दात सांगायचे तर हा लंबी रेसचा घोडा आहे.

(समाप्त)

किस्त्रीम विशेषांकातील लेख 
ऑगस्ट २०१७

14 comments:

  1. How to tackle the difficult situation with great mind and concentration without blaming anyone else of the party, government, coalition partner or opposition parties is the great lesson.

    ReplyDelete
  2. खरोखरीच ते एक उत्कृष्ट बहुआयामी आणि अभ्यासु नेते आहेत
    ठाकरे बंधूनी त्यांना लाखोली वाहण्यापेक्षा राहिलेल्या कालावधी साठी किमान शुभेच्छा द्याव्यात व होताहोईतो मदत करावी
    महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्या करिता तरी

    ReplyDelete
  3. भाऊ हा लंबी रेसका घोडा नाही हे लवकरच सिद्ध होईल . पवारांनी पाठींब्याची कुटील खेळी केली नसती तर कदाचित हे लबी रेसके घोडे तबेल्यातच घुटमळताना दिसले असते . येणारा काळ यांचा खरा वकुब समोर आणेल .

    ReplyDelete
    Replies
    1. या वाक्प्रचाराचा अर्थ माहीत आहे का?

      Delete
  4. श्री फडणविस "पुरोगामी" नसल्यामुळे "सर्प योगाने" मुख्यमंत्री झाले नसावेत. "ब्राम्हण" असल्यामुळे त्यांना "पाठीत खंजिर" खुपसता येत नसावेत.
    कसं होणार यांच, देवच जाणे.

    ReplyDelete
    Replies
    1. पाठीत खंजीर खुपसायला पण हिंमत लागते ती 'ब्राह्मणात' नसते हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवल्याबद्दल धन्यवाद. बाकी फडणवीसांच शब्दचित्र भाऊंनी छान उभं केलंय

      Delete
    2. असा निर्लज्जपणा ब्राह्मणात नसतो, तेथे पाहिजे 'जातीचे'हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद..!

      Delete
    3. हो 'जातीचे'च हवे नाहीतर आपण ही कमेंट करताना स्वतःचे नाव लपवले नसते. 😂 की स्वतःच नाव सांगायला लाज वाटते 😉

      Delete
    4. कर्तृत्व नसताना नाव मिरवायची लाज वाटते..तो गुण विशिष्ट लोकांसाठी 'आरक्षित'...!!

      Delete
  5. शाल जोडीतला लगावला

    ReplyDelete
  6. भाऊराव,

    तुम्ही म्हणताय खरं की हा लंबी रेसका घोडा म्हणून. पण सत्ताकेंद्रात आज परिस्थिती काये? मंत्रालयात कोणी पादला की तात्काळ पवारांना खबर लागते. आघाडीच्या काळात जे दलाल मुख्यमंत्र्यांना घेरून होते, तेच आजही आहेत. अच्छ्या दिनांच्या दृष्टीने लंबी रेसच्या घोड्याला कितपत महत्त्व द्यायचं? समजा उद्या जर हा घोडा लंबी रेस खेळायला राष्ट्रीय पातळीवर निघून गेला तर मग परसदार सांभाळायचं कुणी? बरेच प्रश्न आहेत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
    Replies
    1. मनोहर पर्रिकरांचं उदाहरण लक्षात ठेवायला हरकत नसावी.. लोकसभेच्या दृष्टीने राज्य महत्त्वाचे आहे याची जाणीव पक्ष नेतृत्वाला आहे.. त्यामुळे निदान २०१९ पर्यंत आणि कदाचित त्यानंतरही फडणवीसच नेतृत्व करतील असं वाटतंय..

      Delete
  7. भाऊ, एक अद्भुत निष्पक्ष लेख के लिए मेरी पीढ़ी की ओर से आपका नितांत आभारी हूँ. नेतृत्व विरोधाभास की अवस्था में ज्यादा खुलकर और खिलकर उभरता है, देवेन्द्र फडनवीस, इसके बेहतरीन उदाहरण है. आज उनका उदार बालसुलभ ईमानदार चेहरा राज्य के युवाओं के मन में एक निर्मल विश्वास जगाता है. भाषा, धर्म और जाति की सीमाओं को लांघकर लोग उनमें अपने भविष्य का निर्माण होता देख रहे हैं

    ReplyDelete