विनय सहस्त्रबुद्धे हे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि त्याचवेळी ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने अध्यक्षही आहेत. भाजपाच्या बुद्धीमान प्रतिभावान नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. म्हणूनच भाजपाच्या वा एकूण राजकीय स्थितीच्या संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याकडे काणाडोळा करून चालणार नाही. मागल्या एका वर्षात देशातली मोदीलाट ओसरत चालली असल्याचे अनेकांनी वक्तव्य केले. त्याची अनेक कारणेही दिली आणि विवेचनही केले. त्यातले एक महत्वाचे कारण म्हणजे भाजपापाशी प्रतिभावान लोकांचा दुष्काळ! सर्वात प्रथम ही गोष्ट कोणाच्या नजरेस आलेली असेल, तर सागरिका घोष नामक विदुषीच्या! सीएनएन-आयबीएन नामे वाहिनीच्या ज्येष्ठ संपादिका म्हणून त्या कार्यरत होत्या आणि योगायोगने संपादक राजदीप सरदेसाई यांच्या पत्नीही आहेत. फ़िल्म इन्स्टीट्य़ुट या सरकारी संस्थेच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची नेमणूक मोदी सरकारने केल्यावर कल्लोळ माजला, त्याच्या आसपास सागरिकाने ही त्रुटी लक्षात आणून दिलेली होती. ती भाजपापुरती नव्हती. तर भारतीय उजव्या राजकारणात विचारवंतांचा अभाव आहे, असे तिचे म्हणणे होते. किंबहू्ना उजव्या राजकारणाने विचारवंत प्रतिभावंतच निर्माण केले नाहीत अशी सागरिकाची तक्रार होती. पण त्याचे कारण मात्र तिला स्पष्ट करता आलेले नव्हते. कोणी शोधण्याचाही प्रयत्न केला नाही. त्याची गरजही नसते. एकदा ‘उजवा’ असा शिक्का मारला, की आपोआप समोरचा माणूस निर्बुद्ध होत असतो. आणि मग ती माणसे निर्बुद्ध असतील, तर त्यातून कोणी प्रतिभावंत निर्माण होण्याचा विषयच कुठे शिल्लक उरतो? त्याच्या उलट ‘डावा’ असा शिक्का मारला, मग उकिरडे फ़ुंकणारे गाढवही आपोआप बुद्धीमान होत असते. त्याला प्रतिभा म्हणजे तरी काय तेही ठाऊक असण्याची गरज नसते. प्रतिभावान असण्याची व्याख्या-पात्रता इतकी सोपी आहे. सहस्त्रबुद्धे यांनाही आता तसेच वाटू लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिर्घकाळ आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार व फ़ेरबदल करायचे आहेत. पण त्यांना उपयुक्त ठरतील अशा प्रतिभावंतांचा भाजपात दुष्काळ आहे अशी उपयुक्त माहिती सहस्त्रबुद्धे यांनी एका मुलखतीतून दिलेली आहे. अर्थात तिथेच थांबतील तर सहस्त्रबुद्धे भाजपाचे उपाध्यक्ष कसले? म्हणूनच त्यांनी आपल्या मूळ विधानाला एक पुस्ती जोडली आहे. भाजपापेक्षा कॉग्रेसमध्ये प्रतिभावंत अधिक आहेत आणि तुलनेने भाजपात नगण्य आहेत, असेही त्यांनी म्हटलेले आहेत. त्यांचे हे प्रवचन ऐकल्यावर त्यांनी हे प्रतिभासंपन्नतेचे धडे कुठे गिरवले, असा पहिला प्रश्न मनात येतो. कारण आज सहस्त्रबुद्धे यांना झालेला साक्षात्कार काही महिन्यापुर्वी सागरिका घोष यांना झालेला होता. किंबहूना त्यानंतरच मोदी सरकारने केलेल्या अनेक नेमणूका व अन्य बाबतीत सांस्कृतिक क्रांती सुरू झालेली होती. असंहिष्णुतेचे वादळ त्यातूनच उठले. तमाम प्रतिभावंत मोदी सरकारच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आणि पुरस्कार वापसीची लाट आलेली होती. खरे तर त्याचे सहस्त्रबुद्द्धे यांनी बाहू पसरून स्वागत करायला हवे होते. मोदी नाही तरी पक्षाध्यक्ष अमित शहांची तातडीने भेट घेऊन पुरस्कार वापसीत गुंतलेल्या डझनावारी रिकामटेकड्या प्रतिभावंतांना भाजपात आणायची मोहिमच हाती घ्यायला हवी होती. म्हणजे एका बाजूला संहिष्णूतेचे भाजपा विरोधात उठलेले वादळ शमले असते आणि दुसरीकडे पक्षात असलेली प्रतिभावंतांची टंचाई भरून काढणेही शक्य झाले असते. पण तेव्हा तर यापैकी कुठलीच गोष्ट सहस्त्रबुद्धे यांनी केली नाही. मग आजचे त्यांचे प्रतिभा दुष्काळाचे वक्तव्य खरे मानायचे, की तेव्हाचे त्याविषयीचे मौन खरे मानायचे, असा प्रश्न पडणार ना? आणि भाजपात प्रतिभेचा असा दुष्काळ असेल तर त्याला जबाबदार कोण? खुद्द सहस्त्रबुद्धेच नाही काय?
सव्वा वर्षापुर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका चालल्या होत्या. तेव्हा कुठल्याही पक्षातला जिंकू शकणारा उमेदवार म्हणून कोणालाही भाजपात आणायचा सपाटा लावलेला होता. त्याविषयी पक्षनेत्यांना खुपच उलटसुलट प्रश्न विचारले जात होते. कालपर्यंत ज्यांच्यावर विविध आरोप केलेत, त्यांना भाजपा आता सुधारणार कसे? हा प्रश्न विचारला जात होता. तर मुनगंटीवार यांनी अशा नवागतांना म्हाळगी प्रबोधिनीत नेवून संस्कार करणार असल्याची खास उपाययोजना कथन केलेली होती. म्हणजे भाजपात प्रतिभासंपन्न नेते कार्यकर्ते निर्माण करण्याचे कार्य प्रबोधिनीकडेच असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मग त्यातच दुष्काळ पडलेला असेल, तर जबाबदारी सहस्त्रबुद्धे यांचीच नाही काय? दोनतीन दशके प्रबोधिनी आपले काम करते आहे. त्यांना इतक्या वर्षात भाजपाची सत्ता आल्यास मंत्री होऊ शकतील, असे प्रतिभावान नेते का तयार करता आलेले नाहीत? खुद्द सहस्त्रबुद्धे काही कमी प्रतिभासंपन्न नाहीत. जो प्रतिभावान माणसांचे निर्माण करतो, त्याची प्रतिभा तर उत्तुंग असणार ना? मग पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मोदींचे लक्ष कशाला गेलेले नाही? जी काही प्रतिभेची त्रुटी मोदी सरकारला सतावते आहे, त्यात सहस्त्रबुद्धे यांना सोबत घेतल्यास थोडीफ़ार त्रुटी तरी भरून येईल ना? तिथे घुसायचा प्रयत्न करण्यापेक्षा सहस्त्रबुद्धे अशी वक्तव्ये करण्यात आपली प्रतिभा कशाला खर्ची घालतात? की योग्यवेळी सीटवर रुमाल टाकायला सहस्त्रबुद्धे विसरून गेलेत? महाराष्ट्रात सत्तेचे गणित जमवताना शिवसेना रुसून बसली, तेव्हा बहुमताचा आकडा पुर्ण करण्यात अडचण आलेली होती. शरद पवारांनी बाहेरून फ़डणवीस सरकारला पाठींबा देवू केला. तेव्हा त्याच लबाडीला सहस्त्रबुद्धे यांनी दिलेले प्रतिभासंपन्न उत्तर कितीजणांच्या आज लक्षात राहिलेले आहे?
बस सुटायची वेळ जवळ येते आहे आणि रिझर्व्हेशन केलेला प्रवासी रुसून बसला आहे. पण अन्य कोणी खि्डकीतून सीटवर रुमाल टाकलेला आहे. बस सुटली तर रुमाल टाकणार्याला आत घ्यावेच लागेल ना? असा काहीसा युक्तीवाद सहस्त्रबुद्धे यांनी तेव्हा केलेला होता. ह्याला प्रतिभावंत म्हणतात. किंबहूना त्यावेळी तरी भाजपाचे अनेक नेते त्याच भाषेत बोलत होते आणि खुद्द सहस्त्रबुद्धे यांनीच हा युक्तीवाद उभा केलेला होता. त्यातून भाजपातील प्रतिभासंपन्न नेत्याची कल्पकता कशी ओसंडून वहाते आहे, त्याचीच साक्ष त्यांनी दिली होती. मग आताच त्यांना पक्षात प्रतिभेचा दुष्काळ कशाला जाणवू लागला आहे? की त्यांना डावे राजकारण किंवा भूमिका म्हणजेच प्रतिभा असल्याचा काही नवा साक्षात्कार झालेला आहे? सुधींद्र कुलकर्णी वा कुमार केतकरांच्या सहवासात जास्त काळ राहिल्याचाही तसा परिणाम असू शकतो. पण तोही विषय बाजूला ठेवून एक शंका सहस्त्रबुद्धे यांना विचारावीशी वाटते. कॉग्रेसपाशी इतकी प्रचंड प्रतिभा व गुणीजन असतील, तर त्यांच्यावर अशी नामशेष व्हायची पाळी का यावी? एका नेहरू घराण्याच्या पलिकडे कोणी पक्षाचे नेतृत्व करायला पुढे कशाला येऊ शकलेला नाही? पक्षाच्या मुखपत्रातच पक्षाचा मुखभंग करणारी प्रतिभा कालपरवाच जगाने बघितली. तशा लोकांची भाजपात भरती केली जावी, असे सहस्त्रबुद्धे यांना म्हणायचे आहे काय? की मोदींना जो मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे, त्यात आपल्याला ‘सीट’ मिळावी म्हणून सहस्त्रबुद्धे प्रतिभेचा ‘रुमाल’ या वक्तव्यातून टाकत आहेत? म्हणजे निवडून आलेले सदस्य भले रिझर्व्हेशन केलेले प्रवासी असतील. पण त्यांची लायकी नसेल तर पंतप्रधानांनी सहस्त्रबुद्धे यांच्यासारख्या खिडकीतून ‘सीटवर रुमाल’ टाकणार्यांना मंत्री बनवावे, असे त्यांना सुचवायचे आहे? रुमाल टाकणारा भांडतो आणि सहस्त्रबुद्धे मात्र विनयाने सीटवर दावा करत आहेत काय?
क्या बात है भाऊ, एखाद्याला परफेक्ट मापत बसवावे ते तुम्हीच! रुमाल टाकायची प्रतिमा केवळ अप्रतिम ! आपण जातीयवाद मानत नाही. परन्तु काही आडनावाचे लोक हे मुळात सर्वज्ञ म्हणुनच जन्माला येत असतात. मग त्यांच्या जबरदस्त विद्वत्तापूर्ण विधानामुळे आणि परफेक्ट तेही अगदी टाईमिंग साधून करण्याच्या कौशल्यामुळे अख्खा बिहार लालूला तबकात टाकून देणारे नागपूरकर असोत की भाजपमध्ये अकलेचे दिवाळे आहे हे गुपित जाहीर करणारे सहस्त्रबुद्धे असोत. यांच्या तर नावातच इतरांच्या १००० पट जास्त बुद्धी असल्याचा दावा आहे. ह्या लोकांनी जर येत्या २०१९ ला २८२ खासदारांचे रोख २८ खासदार नाही केले तर नाव बदलेन असे अनेक भविष्यवेत्ते आताच सांगत आहेत. ते खरे करून दाखवणार ही खात्री सहस्त्रपटीने वाढली !
ReplyDeleteविनय सहस्त्रबुद्धे याच्या विधानाबद्दल आपले ' विवेचन ' आवडले........ परंतु मला या बाबत एक दुसरी बाजू दिसते आहे. ' खान्ग्रेस ' खूप वर्षे ( ६० वर्षे ) केंद्रात सत्तेवर होती. अनुभवाने का होईना त्यांच्याकडे काही व्यक्ती केंद्रीय राजकारणात तयार झालेल्या आहेत. तसेच ' युवराजांच्या ' राज्य भिशेकामुळे अथवा त्यानंतर अनेक ज्येष्ठ खान्ग्रेसजन बेकार होणार आहेत. ( उदा : जयराम / जयंती नटराजन / दिग्गी राजा / मनीष तिवारी / कपिल सिब्बल ) ..........तसेच नवीन युवा पिढीतील ( उदा : ज्योतीरादित्य शिंदे / सचिन पायलट / सचिन देवरा ) हेही युवराजांच्या ' प्रमोशन ' वर मनातून नाराज आहेतच. खान्ग्रेसच्या संस्कृतीत अशा नाराजांना ओळखणे जरा अवघड जात असावे. त्यामुळे अशा लोकांना ' गाजर ' दाखवायचा हा उद्योग असावा अशी दाट शंका येते. पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्षच असे बोलतो आहे म्हणजे वर उल्लेखलेल्या खान्ग्रेसी लोकांचे ' डोळे ' लकाकले नाहीत तर नवलच. अजून पुढील ४ वर्षे सत्तेविना राहावयाचे आहे. ..........' पाहिजे आहे ' आणि ' मिळतच नाही ' अशी बोंब ठोकल्यावर असे नाराज ' निष्ठावंत लोक निश्चितपणे ' डळमळणार ' .............तसेच अंतर्गत असंतुष्ठाना ' इशारा ' मिळतो तो वेगळाच. या नाराजवंतमध्ये मध्ये काही मंत्री पदासाठी लायक असतीलहि. त्यामुळे अशी धेंडे खान्ग्रेस मधून ते ' फुटल्यास ' होणारा लाभ वेगळाच. पुढील काही आठवड्यातच याबाबत खुलासा होईलच असे वाटते.
ReplyDeleteMastach bhau
ReplyDeleteExcellent eye opener.
ReplyDelete