Sunday, July 31, 2016

काश्मिर मरू देत, कराची संभाळा!



(मोहाजिर चळवळीचे म्होरके अल्ताफ़ हुसेन)

‘पाकिस्तानातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे शहर मानल्या जाणार्‍या कराचीला संभाळा. काश्मिरची गोष्ट हवी कशाला? ज्यांना फ़ाळणीनंतर पाकिस्तानात आलेल्या मुस्लिमांना संभाळून व सामावून घेता येत नाही, ते काश्मिरी मुस्लिमांना कसला न्याय देणार आहेत? काश्मिरी मुस्लिमांवर भारतात अन्याय होतो, म्हणून गळा काढणार्‍यांनी जरा कराचीतल्या मोहाजिर मुस्लिमांवरचे अत्याचार डोळे उघडून बघावेत. तिथे पंजाबी अहंकाराने पछाडलेले मुस्लिम नेते व सेनाधिकारी नित्यनेमाने अन्य मुस्लिमांची कत्तल करीत आहेत.’ अशा शब्दात अमेरिकेच्या राजधानीत गेल्या आठवड्यात निदर्शने झाली. ती करणार्‍यात पाकिस्तान्यांचाच भरणा होता. त्यात जसे कराचीतून पळालेले मुस्लिम होते, तसेच बलुची निर्वासितही होते. त्यांनी वेळ ठरवून वॉशिंग्टन येथे जोरदार निदर्शने केली. ही निदर्शने पाकिस्तानला झोंबणारी होती. म्हणून की काय, अमेरिकेत स्थायिक असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी प्रतिनिदर्शनेही केली. या दोन गटांना एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापुर्वी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मोहाजिर पाकिस्तान्यांची ही निदर्शने योजलेल्या कार्यक्रमानुसार झाली. हा पाकिस्तानातला निर्वासित मुस्लिमांचा पक्ष असून कराची महानगर व सिंध प्रांतात त्याचे वर्चस्व आहे. त्या पक्षाचा म्होरक्या अत्लाफ़ हुसेन दोन दशकांपुर्वी लंडनला पळून गेलेला असून, तिथेच त्याने आश्रय घेतला आहे. पण त्याच्या पक्षाचा कराची व आसपासच्या प्रदेशात प्रभाव मोठा आहे. मात्र त्याच्या अनुयायांना भारतीय हेरखात्याचे हस्तक ठरवून तुरूंगात डांबले जाते, किंवा बारीकसारीक कारणावरून त्यांच्यावर खटले दाखल केले जातात. त्यांना देशद्रोही वा भारताचे छुपे हस्तक म्हणून बदनाम केले जाते. वास्तविक हे बहुतांश मोहाजिर फ़ाळणीच्या वेळी भारतीय प्रदेशातील घरदार विकून पाकिस्तानात वास्तव्याला गेलेले व फ़सलेले मुस्लिम आहेत.

पाकिस्तानी राजकारणावर पहिल्यापासून पंजाबी मुस्लिमांचा वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळेच त्याला आव्हान देणार्‍यांना खच्ची केले जाते. त्याला प्रामुख्याने लष्करात पंजाबी अधिकारी वर्गाचे असलेले वर्चस्व कारण आहे. सहसा कुणाही बिगरपंजाबी मुस्लिमाला लष्कराचे प्रमुखपद दिले जात नाही आणि राजकारणातही बिगरपंजाबी मुस्लिम नेत्याला नेतृत्व मिळत नाही. १९७१ च्या युद्धानंतर याह्याखान यांना राजकीय सत्ता सोडावी लागली, तेव्हा त्यांनी सिंधी नेता असलेल्या झुल्फ़ीकार अली भुत्तो त्यांना सत्तासुत्रे सोपवली होती. लौकरच पंजाबी लष्करप्रमुख जनराल झिया उल हक यांनी भुत्तोंना पदच्युत करून लष्करी हुकूमशाही आणली. मग राजकीय प्रतिकार होऊ नये म्हणून, भुत्तो यांच्यावर भ्रष्टाचार इत्यादी आरोप ठेवून त्यांना फ़ाशीची शिक्षा देण्यास कोर्टाला भाग पाडले. पुढे भुत्तो यांना भर चौकात रानटी पद्धतीने फ़ासावर लटकवण्यात आले. अशा रितीने बिगरपंजाबी मुस्लिमाचा काटा काढण्याचा एक शिरस्ताच आहे. अपवाद जनरल मुशर्रफ़ यांचा होता. ते मोहाजिर असूनही लष्करप्रमुख होऊ शकले. खरे तर ते नवाज शरीफ़ यांचेच पाप होते आणि त्याची किंमत शरीफ़ यांना मोजावी लागली. मोहाजिर असल्याने मुशर्रफ़ आपल्या मुठीत रहातील, म्हणून शरीफ़ यांनी पायंडा मोडून मुशर्रफ़ यांना लष्करप्रमुखपदी नेमले. पण वेळ आली व शरीफ़ लष्कराला जुमानेसे झाले, तेव्हा मुशर्रफ़ यांनी शरीफ़ना गजाआड पाठवून सत्ता काबीज केली. एका पंजाबी राजकीय नेत्याला लष्कराचा बंदी व्हावे लागले. पण शेवटी लष्कराच्याच हाती सत्ता राहिली. कारण मुशर्रफ़ मोहाजिर असले तरी लष्करात पंजाबी वर्चस्व होते. पर्यायाने सत्ता पंजाबी मुस्लिमांच्याच हाती राहिली. मग एकवेळ आली, तेव्हा बहुतांश पंजाबी सेनाधिकार्‍यांनी मुशर्रफ़ यांना सत्तेसह लष्करप्रमुख पदावरून खाली उतरायला भाग पाडलेच होते. अल्ताफ़ हुसेन त्याच दुखण्यावर बोट ठेवत आहेत.

पंजाब हा प्रामुख्याने दोन मोठ्या लोकसंख्यांवर तयार झालेला देश आहे. तिथे पंजाब व सिंध असे दोन भारतीय प्रांत एक झालेले आहेत. मुस्लिमबहुल लोकसंख्येच्या आधारे देशाची स्थापना झाल्यापासून तिथे पंजाबी हुकूमत सुरू झाली. त्यातून सिंधी व अन्य निर्वासित मुस्लिमांची ससेहोलपट होऊ लागली. त्यातूनच मग स्थलांतरीत वा निर्वासित मुस्लिमांना अन्यायाच्या विरोधात उभे रहावे लागले. त्यांचा भरणा प्रामुख्याने कराची व सिंध प्रांतात असल्याने, तिथे पर्यायी राजकीय पक्ष उदयास आला. अल्ताफ़ हुसेन हा त्याच्याच नेता असून जीव मुठीत धरून त्याला लंडनला पळावे लागले. मात्र त्याचे अनुयायी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात वसलेले आहेत. त्याच्या पक्षाला निवडणूकीत मोठे यश मिळत असते. बेनझीर भुत्तो यांना त्याच पक्षाच्या मदतीने पाकिस्तानचे पंतप्रधान होणे शक्य झालेले होते. जसजसा तालिबान व मुजाहिदीनांचा प्रभाव वाढत गेला, तसतसे हे विरोधाभास चव्हाट्यावर येत गेले. कारण मुजाहिदीन व जिहादचा खरा जन्मदाता असलेल्या पाक लष्कराने मोहाजिर मुस्लिमांचा काटा काढण्यासाठीही जिहादींचा वापर करून घेतला. आता तर एका बाजूला जिहादी व दुसरीकडून पाकसेना, मोहाजिर मुस्लिमांना जगायला अशक्य करून सोडत आहेत. तीच कथा बलुची लोकांची आहे. सिंध व बलुच प्रांतामध्ये स्थानिक व मोहाजिरांची राजरोस कत्तल चालते. व्याप्त काश्मिरातही जवळपास तोच प्रकार चालतो. अशा अंतर्विरोधाने पाकिस्तानला ग्रासलेले आहे. मग पंजाबी वर्चस्वाला आव्हान देईल, त्याला देशद्रोही वा भारताचा हस्तक ठरवून अटक वा चकमकीत ठार मारणे, असले प्रकार सरसकट होत असतात. त्याकडेच अमेरिकन सरकार व पाकसमर्थका अभ्यासकांचे लक्ष वेधण्यासाठी मोहाजिर कौमी मुव्हमेन्ट या अल्ताफ़च्या संघटनेने वॉशिंग्टनमध्ये ही निदर्शने योजलेली होती. त्यातला इशारा समजून घेतला पाहिजे.

भारत-पाक संबंध बिघडले आहेत वा बिघडत चालले आहेत. ते आवाक्यात येण्याची शक्यता नाही. कारण नवाज शरीफ़ यांना ते शक्य राहिलेले नाही. आपण त्यात हात घातला तर आपलाही बळी जाईल, अशी त्यांना भिती आहे. म्हणूनच त्यांनी रावळपिंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन खरी सत्ता कोणाकडे आहे, त्याची साक्षच दिलेली आहे. बाकी काश्मिर पाकमध्ये सहभागी करून घेण्याच्या वल्गनांना काडीचा अर्थ नाही. पण लष्कराच्ता दबावाखाली तसे बोलणे, त्यांनाही भाग आहे. पण प्रत्यक्षात आज पाकची जी भूमी वा प्रांत आहेत, त्यांना एकत्र ठेवतानाही नागरी व लष्करी यंत्रणा मेटाकुटीला आलेल्या आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी भारतविरोधी गर्जना करण्याला पर्याय नाही. कारण तितकेच एक भावनिक आवाहन पाकला एकत्र राखण्यास आजवर उपयुक्त ठरलेले आहे. मात्र आता त्यातली जादू संपत आलेली आहे. तसे नसते तर मोहाजिर व बलुच पाक नागरिकांनी अमेरिकन राजधानीत इतकी मोठी निदर्शने केलीच नसती. तिथे जमलेली गर्दी बघता, पाकविरोधी घोषणा करणारी गर्दी मोठी व समर्थकांचा जमाव किरकोळ होता. मागल्या खेपेस भारताचे पंतप्रधान अमेरिका भेटीला गेले असताना. बलुच निर्वासितांनी मोदींच्या स्वागताचे फ़लक झळकवले होते आणि भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याचे आवाहनही त्यात होते. अशा स्थितीत पाकिस्तान आज किती डबघाईला आलेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. खरेच उद्या भारत-पाक युद्ध झाले, तर असे दुखावलेले व नाराज पाक नागरिक मोठ्या प्रमाणात पाकसेनेच्या विरोधात कारवाया करतील. मग युद्ध हाताळणे पाकिस्तानला अशक्य होऊन बसेल. ४५ वर्षापुर्वीच्या युद्धात पाकचे दोन तुकडे अशाच कारणाने व अंतर्गत विरोधामुळे झालेले होते. पाक नेते व प्रामुख्याने पंजाबी नेते त्यापासून काही शिकलेले नाहीत. म्हणून तर मोहाजिर व बलुची उठावाची चिन्हे दिवसेदिवस ठळक होत चालली आहेत.

मुलायम, मायावती आणि उद्धव



अर्थातच लोकसभा जिंकल्यापासून भाजपाचे हसण्याचे दिवस आहेत आणि त्यांनी पराभूत कॉग्रेससह अन्य पक्षांना मिळेल त्या विषयावरून हिणवणेही समजू शकते. पण ती लोकसभा जिंकताना भाजपाला एकट्याच्या बळावर तितके यश मिळालेले नव्हते आणि मिळणारही नाही. त्यासाठी जितके कष्ट मोदींनी अहोरात्र प्रचार करून उचलले, तितकाच त्या यशाला मित्र पक्षांचा हातभार लागला होता. २००४ च्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला असेच यश मिळाले आणि त्यात मित्र पक्षांचे असलेले योगदान कॉग्रेस विसरून गेली. तरीही समोर आव्हान नसल्याने २००९ सालात कॉग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली आणि जागाही वाढल्या होत्या. त्यामुळे इतकी मस्ती चढली, की अल्पमताचे सरकार असूनही कॉग्रेस एकहाती निर्णय घेत गेली. मित्रपक्षांना चार मंत्रीपदे देऊन सर्व निर्णय एकट्याने घेण्याची मुजोरी अनेक मित्रांना कॉग्रेसपासून दूर घेऊन जात होती. त्याचेच प्रतिबिंब नंतर २०१४ च्या निकालात पडले. कॉग्रेसच्या इतक्या दारूण अपयशाला त्या पक्षाचे नेतृत्व जबाबदार होते, तितकेच मित्रांनी दुरावणेही कारण झाले. विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याइतक्याही जागा कॉग्रेसला मिळू शकल्या नाहीत. कारण त्यांना कोणी मित्र उरले नव्हते. पण ते निकाल समोर येईपर्यंतचे कॉग्रेस नेते प्रवक्त्यांचे चेहरे आणि भाषा आठवा. त्यातून ओतप्रोत मस्तवालपणा पाझरत होता. आज त्याचीच नक्कल भाजपाकडून होत असेल तर नवल नाही. त्यालाच यशाची नशा म्हणतात. कारण त्याचे परिणाम तात्काळ दिसत नसतात. काही महिने-वर्षे जावी लागतात. ते परिणाम दिल्ली विधानसभेच्या मध्यावधीमध्ये आणि बिहारच्या मतदानात दिसले. लोकसभेत मिळालेली मतेही टिकवता आली नाहीत. त्याला मोदींची लोकप्रियता घटली हे कारण नव्हते, तर भाजपा नेत्यांच्या मस्तवालपणाला बसलेला तो दणका होता. जेव्हा मनस्थिती अशी असते, तेव्हा टिका आणि विरोध यातला फ़रक उमजणे अशक्य होते.

महाराष्ट्रात युती म्हणून एक राजकीय आकार मागली पंचवीस वर्षे अस्तित्वात होता. हिंदूत्व ही त्यामागचे सुत्र होते. पण अधिक जागा व सत्तासुत्रे आपल्या हाती घेण्याचा मोह त्याला तडा देऊन गेला. त्यामुळे अधिक जागांची मागणी करीत भाजपाने युती तोडली. यात शिवसेना दिर्घकाळ आपले वेगळे अस्तित्व विसरून भाजपाशी एकच राजकीय आकार म्हणून काम करत राहिली. पर्यायाने जिथे भाजपाची जागा तिथे सेनेने आपले स्थानिक नेतृत्व उभे करण्यात हयगय केली. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यापासून युतीत राहिल्याने वाढलेल्या शिवसेनेची मुंबईबाहेर कुठे बलस्थाने आहेत; याचा थांगपत्ता कधी सेना नेतृत्वाला लागला नव्हता. किंबहूना युती करून महाजन-मुंडे यांनी तो सेनेला त्याचा थांग लागू दिलेला नव्हता. परिणामी सेनेला महाराष्ट्रातले आपले प्रभावक्षेत्र किंवा बालेकिल्ले कधी नेमके समजू शकले नाहीत. कारण तिने कधी सर्वच्या सर्व जागा लढवल्याच नव्हत्या. मागल्या विधानसभेत तशी वेळ सेनेवर आणली गेली आणि त्यातून कुठे आपल्याला अजिबात स्थान नाही, किंवा कुठे आपले निर्विवाद बळ आहे, त्याचा आराखडाच सेनेच्या हाती आला. २८८ जागांपैकी दोनशे जागा अशा आहेत, की जिथे सेना आपला उमेदवार लढवू शकते. कारण तिथे सेनेला पहिल्या तीन क्रमांकाची मते मिळालेली आहेत. अगदी मोदी लाटेत ही मते मिळाली असल्याने त्याला सेनेचे तिथले किमान बळ असे म्हणता येते. त्याचा दुसरा अर्थ असा, की त्यात अजून खुप वाढ होण्यास वाव आहे. मात्र मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपाला अन्य पक्षातून उमेदवार आणूनही मिळालेली मते व जागा, त्यांच्यासाठी कमाल मर्यादा सिद्ध करणार्‍या आहेत. यातले उसने उमेदवार माघारी गेले तर त्यात घट होणार ते वेगळेच. मात्र प्रतिकुल काळात लढताना सेनेने संपादन केलेली मते व निश्चीत केलेल्या जागा, त्यांच्यासाठी पुढील निवडणूकीतला पाया आहे.

उद्धव ठाकरे स्वबळावर लढायची व बहुमताने आपलेच सरकार आणायची भाषा बोलतात, त्याचा असा आधार आहे. तो नाकारण्यात दोन वर्षे आधीच गेलेली आहेत आणि पुढली तीन वर्षे केव्हा जातील त्याचा पत्ताही लागणार नाही. पण युती तुटण्याचा अनुभव घेतल्यानंतर शिवसेनेत तो कडवेपणा आलेला आहे. त्यामुळे यापुढल्या कुठल्याही निवडणूकीत पडते घेऊन, युती करण्याची सेनेतली मानसिकता संपलेली आहे. पण दुसरीकडे आपण कुठे लढू शकतो, त्या जागा मात्र सेनेला उमजल्या आहेत. यातली गंमत अशी, की पहिल्या तीन क्रमांकाची मते मिळवलेल्या जागा सेनेला हक्काने लढवता येतील. उरलेल्या ८८ जागा हरायला किंवा कोणी सोबत येऊ इच्छित असलेल्या मित्रपक्षांना वाटून द्यायला सेना मोकळी आहे. बदल्यात अशा किरकोळ पक्षांनी उर्वरीत जागी दोनतीन हजार मतांची भर टाकली, तरी सेनेला काही दुबळ्या जागा जिंकायला हातभार लागू शकतो. हे गणित उद्धव ठाकरे किंवा सेनेच्या नेतृत्वाच्या डोक्यात असेल, तर त्यांच्या स्वबळाच्या डरकाळ्या पोकळ मानता येणार नाहीत. कारण सेना व भाजपा यांच्या विधानसभेत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत अवघा साडेसात टक्के इतकाच फ़रक आहे. तो फ़रक मोदी लाटेतला आहे. मोदी लाट हे भाजपाचे वजन होते. तेच पुढल्या वेळी शिल्लक राहिलेले असेल असे होत नाही. दिल्ली-बिहार त्याची ग्वाही देतात. आसाममध्ये सत्ता हाती आली तरी त्यासाठी दोन अन्य पक्षांच्या कुबड्या भाजपाला घ्याव्या लागल्या आणि मतांमध्ये आजही भाजपा कॉग्रेसच्या मागेच आहे. जिंकलेल्या जागा मुदतीत संपतात. खरी ताकद मतांची टक्केवारी सांगत असते. त्या टक्केवारीशी महाराष्ट्रातील भाजपाचा मस्तवालपणा जुळणारा नाही, म्हणूनच तो आत्मघाताला आमंत्रण देणारा आहे. म्हणून आज उद्धव किंवा सेनेची टवाळी सोपी असेल. पण त्याची मोठी किंमत उद्या मोजावी लागेल.

विधानसभेला दोन्ही कॉग्रेसनी मिळवलेल्या मतांची बेरीज केल्यास ती भाजपापेक्षा आठ टक्के अधिक आहे. त्यामुळे मिळालेल्या १२३ जागा मोदी लाटेपेक्षा शरद पवार यांची कृपा अधिक आहे. कारण त्यांनीच ऐनवेळी आघाडी मोडून भाजपाचे स्वबळाचे काम सुकर केले होते. ती पुढल्या खेपेस कायम राहिल अशी शक्यता कितपत आहे? उत्तरप्रदेशात आपल्या बळावर लढताना युत्या आघाड्य़ा टाळून मायावती व मुलायम यांनी आपले बस्तान बसवले. परिणामी भाजपा कॉग्रेस यासारखे राष्ट्रीय बलदंड पक्ष त्या मोठ्या राज्यात पुरते नामोहरम होऊन गेले. शिवसेनेला स्वबळावर मिळवता आलेली २० टक्के (लाटेविरुद्धची) मते, ६३ आमदारांपेक्षा महत्वाची आहेत. कारण त्यात स्वबळावर सत्ता मिळवण्याची क्षमता दडलेली आहे. संपलेल्या कॉग्रेसला सोनियांनी जीवदान देऊन दोनदा सत्ता काबीज करून दाखवली, ती हक्काची २० टक्केहून जास्त मते पारंपारीक असल्याने. आज दुर्दैवी पराभवातही कॉग्रेसने १७ टक्के मते टिकवलेली आहेत. एकुणच महाराष्ट्राची लढत आता उत्तर प्रदेशप्रमाणे चौरंगी झाली आहे. त्यात आज २७-२८ टक्के मते मिळवणारा राजा असतो आणि २०-२२ टक्के मिळवणारा त्याच्यासाठी पुढल्या वेळचा आव्हानवीर असतो. मायावतींनी दिड टक्का मते व सत्ता गमावली, तर मुलायमच्या समाजवादी पक्षाने साडेचार टक्के मते वाढवून स्वबळावर सत्ता पादाक्रांत केली. मायावतींनी अपवाद सोडल्यास निवडणूकपुर्व युती आघाडी नाही केली आणि आपला मतांचा टक्का वाढवत नेला. आपल्या हत्ती चिन्हावर शिक्का मारणार्‍यांना मित्र पक्षाचे चिन्हही कळू दिले नाही. स्वबळावर लढण्याची किमया अशी असते. दिड वर्षासाठीचे मुख्यमंत्रीपद भोगून झाल्यावर पक्षाचा पाठींबा कल्याणसिंग सरकारला देणार्‍या मायावती, नंतर सतत भाजपाला लक्ष्य करत राहिल्या. त्याचे फ़ळ त्यांना व भाजपाला काय मिळाले होते? उद्धव काय करीत आहे, त्याचे उत्तर त्या उत्तरप्रदेशी इतिहासात सापडू शकेल.

Thursday, July 28, 2016

निवडणूकपुर्व युती अशक्य



आपल्या वाढदिवसाच्या निमीत्ताने किंवा पालिका निवडणूकांच्या तयारीच्या दिशेने असेल, उद्धव ठाकरे यांची प्रसिद्ध झालेली प्रदिर्घ मुलाखत चर्चेचा विषय झाली आहे. अनेकदा बाळासाहेब अशी मुलाखत देऊन विविध विषयांवरील आपले व्यापक मतप्रदर्शन करीत असत. याचे कारण नेहमीचा ‘सामना’ अग्रलेख बाळासाहेब लिहीत नाहीत हे सर्वश्रुत होते. म्हणून अशा भूमिका वेळोवेळी मांडण्याची त्यांना गरज भासत असे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे तोच वारसा पुढे चालवित आहेत. ताज्या मुलाखतीने म्हणूनच काहीसा गदारोळ केला आहे. त्यात बाकीचे विवादचे मुद्दे बाजूला ठेवले, तरी युतीविषयक उद्धव यांनी व्यक्त केलेले मत एक स्पष्ट संकेत देत आहे. यापुढे भाजपाशी निवडणूकपुर्व युती करणार नाही, असा त्यातला संदेश आहे. ‘पंचविस वर्षे युतीत शिवसेना सडली’, या विधानातला गर्भितार्थ लक्षात घेण्यापेक्षा त्यातले शब्द धरून अर्थ लावायचा प्रयत्न केल्यास मनोरंजन खुप होईल., पण साध्य काहीच होणार नाही. हल्ली सोशल मीडियामुळे अशा गावगप्पांना जोर आला आहे. म्हणून अशा शब्द व विधानावर प्रचंड मल्लीनाथी होत असते. तशीच या सडलेल्या विधानाने झाली तर नवल नाही. पण त्यातून एका महत्वाच्या पक्षाचा प्रमुख, युतीचे युग संपले असे सुचवतो आहे, याची गांभिर्याने दखल घेतली गेली नाही. दुर्दैवाने सोशल मीडियाच्याच आहारी गेलेल्या मुख्यप्रवाहातील माध्यमातही तोच उथळपणा आला असल्याने, खुसखुशीत चर्चेलाच प्राधान्य मिळते. तर त्यातला स्पष्ट संदेश मात्र नजरेआड राहिला आहे. पण त्याने शिवसेनेला फ़ारसा फ़रक पडणार नाही. फ़रक ज्यांना पडू शकतो, त्यांनी याचा विचार करायला हवा आहे. पण तेही मल्लीनाथी करण्यातच रमले आहेत. त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, तेव्हा जाग येते. पण खुप उशीर झालेला असतो. जसा दिल्ली बिहारमध्ये झाला.

युतीत शिवसेना सडली याचा अर्थ बाळासाहेबांना राजकारण कळत नव्हते काय? त्यांच्या चतुराईवर त्यांचाच वारस शंका घेतोय, इथपर्यंत भल्याबुर्‍या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. बाळासाहेबांना राजकारणातली चतुराई जमली असती, तर त्यांनी भाजपाशी १९८८ सालात युती नक्कीच केली नसती. आणि केलीच असती, तर ममता बानर्जी, मायावती किंवा नितीशकुमार यांच्यासारखी केली असती. या दोन्ही नेत्यांनी आपल्या गरजेनुसार भाजपाशी युती केली. पण गरज संपताच किंवा भाजपा जास्त लाभ उठवतो दिसताच, मैत्रीला तिलांजली दिली होती. मैत्री वा युतीत राजकीय लाभ उठवित मैत्री टिकवण्याचे डाव बाळासाहेबांना खेळता आले नाहीत. म्हणून युतीतली पंचवीस वर्षे शिवसेना मागे पडत गेली, असा उद्धव यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. युती किंवा आघाडी होते, तेव्हा त्यावर प्रभावी नेत्याचे वर्चस्व असते. १९८० नंतरच्या काळात कॉग्रेस सोडून विरोधात आलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद आकाराला आली. तेव्हा पवार अवघे २२ आमदार घेऊन आले होते. पण मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी १०० आमदारांच्या जनता पक्षाला दुय्यम केले. पुढे त्यातून जनता पक्ष व भाजपा असे दोन गट झाले. त्यांच्याशी निवडणूकपुर्व युती न करता पवारांनी आपले बळ वाढवत नेले. १९८० ते १९८६ पर्यंत हे बाकीचे पक्ष पवारांच्या इतके आहारी गेले होते, की आपले वेगळे अस्तित्वही विसरून बसले. म्हणूनच पवार माघारी कॉग्रेस पक्षात परतल्यावर शेकाप, जनता, भाजपा यांना आपले अस्तित्व शोधण्यासाठी चाचपडावे लागले होते. त्याच दरम्यान पवारांनी सोडलेली पोकळी भरून काढत शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष म्हणून उदयास आली. त्यात आपला हिंदूत्ववादी चेहराही गमावत चाललेल्या भाजपाला सेनेच्या आश्रयाला यावे लागले होते. बाळासाहेब चतूर असते, तर त्यांनी पवारांनी दिला त्यापेक्षा अधिक वाटा भाजपा दिलाच नसता.

पार्ले विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाने सेनेच्या हिंदूत्वाला विरोध करीत जनता पक्षीय प्राणलाल व्होरांचे समर्थन केले होते. तरी अमराठी बहुल भागातून रमेश प्रभू स्वबळावर जिंकले. औरंगाबाद नगरपालिकेत भाजपा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होता. शिवसेनेचा मागमूस नव्हता. तिची महापालिका झाली आणि प्रथमच तिथे निवडणूक लढवताना सेनेने सर्वात मोठा पक्ष होत, ६० पैकी २७ जागा जिंकल्या होत्या. पण त्यालाही महत्व नाही. तिथे भाजपाचा तेव्हा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यानंतरच भाजपाला सेनेशी युती करायची उपरती झालेली होती. थोडक्यात आपले महाराष्ट्रातील अस्तित्व टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी शिवसेनेची मदत भाजपाला आवश्यक वाटली. म्हणून युतीचा प्रस्ताव घेऊन मुंडे-महाजन मातोश्रीवर पोहोचले होते. बाळासाहेबांचा भोळेपणा व तात्कालीन सेनानेतृत्वाचे  ग्रामिण महाराष्ट्राविषयीचे अज्ञान; त्या युतीत सेनेचे नुकसान करून गेले. कारण सेना दिवसागणिक खेड्यापाड्यात पसरत होती आणि बिगरकॉग्रेसी मतदार कार्यकर्ता तिच्यामागे धावत होता. पण त्याचे नेमके भान मुंबईस्थित सेना नेत्यांना नव्हते. मुंबई ठाण्यापलिकडे कधी निवडणुका न लढवलेल्या शिवसेनेला, मग अवघ्या दिड वर्षात लोकसभा निवडणूकीला सामोरे जाण्याचा प्रसंग होता. त्याचा ग्रामीण महाराष्ट्रात पसरलेल्या भाजपाला लाभ होऊ शकणार होता. दिल्लीच्या राजकारणात रस नसलेल्या बाळासाहेब वा सेना नेतृत्वाने म्हणूनच लोकसभेच्या बहुतांश जागा भाजपाला देऊन टाकल्या होत्या. बदल्यात विधानसभेच्या बहुतांश जागा सेनेला असा सौदा झाला होता. पण विधानसभेचे पडघम वाजू लागल्यावर जागावाटपाचे वाद सुरू झाले. सेनेच्या मदतीने १० खासदार आल्याने भाजपा विधानसभेतही जादा जागांवर तेव्हाही दावा करत होता. त्याला बाळासाहेबांची चतुराई नव्हेतर भोळेपणा युतीला कारणीभूत होता. तर चतुराई मुंडे-महाजनांनी केली होती.अ


या जागावाटपात आपल्या प्रभावक्षेत्राची ओळखही नसलेल्या मुंबईकर सेनानेत्यांनी ज्या जागा भाजपाला सोडून दिल्या, त्या बहुतांश बिगर कॉग्रेसी प्राबल्याच्या होत्या. तर सेनेच्या वाट्याला आलेल्या बहुतांश जागा पश्चीम महाराष्ट्रातल्या किंवा भक्कम कॉग्रेसी बालेकिल्ले असलेल्या म्हणून अवघड होत्या. ही चतुराई भाजपाची होती, तर सेनेचा मुर्खपणा होता. जेव्हा असे जागावाटप होते तिथे मित्रपक्षाला गेलेल्या जागी पक्षाची वाढ होऊ शकत नाही. कारण तिथे पक्षाची पाळेमुळे रुजवणारा झुंजार कार्यकर्ता नेता उभा राहू शकत नाही. कारण त्या जागी आपण उमेदवारीचा दावा करू शकत नाही, याची खात्री असल्याने त्याने मेहनत करून उपयोग नसतो. करायची असेल तर दुसर्‍या कुठल्या पक्षात जाण्याचा पर्याय शोधावा लागतो. थोडक्यात जिथे १९८६ नंतर सेनेचा प्रभाव वाढला होता, अशा बिगर कॉग्रेसी सुपिक जमिनीत युतीमुळे सेनेला आपली पाळेमुळे घट्ट रोवून उभे रहाणे शक्य झाले नाही आणि पक्षाची वाढ खुंटली. हे वास्तव उद्धवनी अप्रत्यक्ष शब्दात मांडले आहे. किंबहूना शिवसेना महाराष्ट्रव्यापी झाल्यावर यापुर्वी ग्रामीण महाराष्ट्रात एकही निवडणूक स्वबळावर लढलीच नसल्याने, तिला आपली प्रभावक्षेत्रे कधी अनुभवाने शोधता आली नाहीत. मागल्या विधानसभेनंतर सेनेला तशा जागा प्रथमच उमजल्या आहेत. २८८ पैकी १९९ जागी सेनेचा उमेदवार पहिल्या, दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकाची मते मिळवू शकला आहे. ह्या जागा सेनेला प्रयत्न करून लढवणे व त्यातल्या बहुतांश जिंकणे शक्य होईल. ज्या जागा युती तुटण्यापर्यंत शिवसेनेला कधी माहितही नव्हत्या. काहीअंशी भाजपाचेही तसेच झालेले असु शकते. पण युतीत सडल्याची भाषा अशा वेगळ्या अंगाने समजून घेतली, तर त्याचा अर्थ लागू शकतो. नुसताच उथळपणा करायचा असेल, तर गोष्ट वेगळी. म्हणूनच असे पाय रोवायचे असल्याने यापुढे निवडणूकपुर्व युती होणार नाही, असेच उद्धव स्पष्टपणे सुचवत आहेत.

आपले मुल जगावेगळे कसे? (जोपासनापर्व - ६)


मी कधी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला नाही किंवा बालमानसशास्त्राचा जाणकारही नाही. पण विविध वयातल्या शेकड्यांनी मुलांचे जवळून निरीक्षण व अभ्यास, हा माझा छंद राहिलेला आहे. योगायोगाने मी त्याकडे ओढला गेलो आणि योग्यवेळी त्यातले गुरूही भेटले. माझी मुलगी अवघ्या काही महिने वयाची असताना तिच्यामध्ये काही शारिरीक दोष असल्याची शंका डॉक्टरांनी काढली आणि मला विशेषज्ञाकडे जावे लागले. माझी थोरली मेहुणी मेडीकल कॉलेजातील प्राध्यापिका. ती वैद्यक शिक्षण घेताना तिचे एक प्राध्यापक होते डॉ. एस एन लोहे. अतिशय खडूस माणूस! प्रथमच मुलीला दाखवायला गेलो असताना त्यांनी चक्क कान उपटले होते. तेव्हा त्यांचा खुप राग आला. पण आज तो योग्यवेळी भेटलेला गुरू होता, असे जाणवते. एक कुठले खास औषध त्यांनी लिहून दिले होते आणि बारा तेरा दुकाने शोधूनही ते मिळाले नाही. म्हणून तसाच पुन्हा लोह्यांना भेटलो आणि पर्यायी औषध विचारले. त्यांनी दिलेले उत्तर सर्द करणारे होते. ते म्हणाले, ‘मी लिहून दिले म्हणजे हे औषध बाजारात उपलब्ध आहे आणि तुझ्या मुलीसाठी तेच योग्य आहे. बारा दुकानात मिळाले नसेल तर शंभर दुकानात शोधायचे. पण तेच द्यायचे. तुझ्या मुलीच्या जागी दुसरी पर्यायी कुठली मुलगी आणून दिली तर घेशील का? पर्यायी मुलीचे पालनपोषण करशील का?’ काय बोलू शकत होतो? निमूट खालमानेने तिथून बाहेर पडलो आणि ३७ दुकाने पालथी घातली व ते औषध मिळवले. तेव्हा त्या डॉक्टरांचा खुप राग आला होता. पण अनवधानाने त्यांनी माझे मुल जगावेगळे असेल, तर त्यासाठी मी जगावेगळा बापही असायला हवा, याची शिकवण दिली. पत्रकार असल्याने त्यांच्या उत्तराचा अर्थ अनेक दिवस शोधत राहिलो. काही वर्षांनी तो उलगडा झाला आणि ज्याचा संताप आला होता, तोच डॉक्टर आज योग्यवेळी भेटलेला गुरू वाटतो.

आयुष्यात अशी माणसे भेटणे खुप नशीबाची गोष्ट असते. मला असे अनेक लोक अनवधानाने भेटले आणि जेव्हा भेटले तेव्हा त्यांची महत्ता उमजलीही नव्हती. पुढल्या काळात त्याचा साक्षात्कार झाला. प्रत्येक मुल कसे हाताळावे हे त्याच्या जन्मदात्यांनाच अधिक उमजले पाहिजे. मुले त्यासाठी अनेक संकेत देत असतात. आपल्याला ते संकेत ओळखता आले पाहिजेत. मुलाची जोपासना हा बोजा समजून त्याकडे बघितले, तर यातले काहीही शक्य नाही. रांगणारे मूल बसू लागते आणि उभे राहुन चालूही लागते. जितकी अशी वाढ होत असते तशीच मुलाची बौद्धिक भूकही वाढत जात असते. त्याला बोर्नव्हीटा किंवा आणखी काही पौष्टीक खायला घालून भागणार नसते. त्याच्या वाढत्या ज्ञानोपासनेची भुकही भागवण्याची गरज असते. त्यात पालक कमी पडतात, तिथून खरी समस्या सुरू होते. पायावर उभे राहू लागलेले मुल आता पुर्णपणे पालकांवर अवलंबून नसते. त्याला तुमच्या आधाराची गरज उरलेली नसते. त्यामुळे आजवर दुरून बघितलेल्या जगाला जवळून. स्पर्ध करून, समजून घेण्याच्या उर्मी प्रखर होतात. त्याच्यापासून दुर ठेवलेल्या वस्तु हाताळण्याची अनिवार इच्छा त्याला शांत बसू देत नाही आणि दुसरीकडे तुम्ही पालक अशा सर्व वस्तुंपासून त्याला सदोदित दुर ठेवत असता. इथून पालक बालक यांच्यातला पहिला संघर्ष सुरू होत असतो. पालकांशी लबाडी करण्याचे पहिले प्रयोग तिथून मुल शिकू लागते. तुम्ही त्याला नाहीच म्हणणार आहात हे ठरलेले असेल. तर तुम्हाला अंधारात ठेवून ती गोष्ट करणे त्याला भाग होऊन जाते ना? त्यापेक्षा नव्या गोष्टी त्याला समजावून घेण्यात मदत केली तर? मुलातली उर्जा व कुतुहल त्याच्याच सहकार्याने वापरले. तर मुल सहजगत्या तुमच्याशी समरस होत जाते. त्याला लपवाछपवीची गरज उरत नाही. तुम्ही अधिक काळ मुलाच्या सहवासात रहाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला हाताळणे अवघड अजिबात नाही.

मुल पायावर उभे राहून चालू बोलू लागले, मग ते एक स्वतंत्र माणूस झालेले असते. पण त्याला कुटुंबात पुरेसे स्वातंत्र्य मिळत नाही, की समानतेची वागणूक मिळत नाही. आपोआप त्याच्यातली बंडखोर वृत्ती उफ़ाळून येऊ लागते. शक्य तिथे मुल तुमच्याशी झुंज देऊ बघते किंवा तुमची नजर चुकवून काही उपदव्याप करू बघते. त्याला विश्वासात घेतले, तर हे सहज टाळता येते. इतर प्रत्येकजण मोठा म्हणून त्याला लहानपणाची वागणूक देत असतो. त्याचे लाभ मुलांना हवे असतात. पण जिथे लहान असल्याने भेदभाव होतो, तिथे लहानपण नकोसे होते. तिथून ही बंडखोर वृत्ती डोके वर काढत जाते. अशावेळी त्या बंडखोरवृत्तीला थेट सामोरे जाणे अगत्याचे असते. त्याकडे पाठ फ़िरवून किंवा तिला चेपून काहीही साध्य होत नाही. एक परिणाम मुले कोमेजण्याचा असतो किंवा बंडखोरी प्रबळ होण्याचा धोका संभवतो. म्हणून मुलांच्या अपेक्षा व गरजांना सामोरे जाणे अधिक सुलभ सोपे असते. त्याला समान वागणूक मिळत असल्याचा अनुभव देण्यापासून त्या़ची सुरूवात होऊ शकते. सर्वसाधारणपणे मुल लहान असते आणि उभ्याने त्याच्याशी बोलणे झाले. तर त्याला नजर उंचावून तुमच्याकडे बघावे लागते. उलट तुम्ही खाली नजर करून त्याच्याशी बोलत असता. याऐवजी तुम्ही खाली बसून नजर समोरासमोर करून बोललात, तर तुम्ही एका पातळीवर असता. मुले अशा स्थितीत तुम्हाला समजून घ्यायला राजी असतात. आपली अपेक्षा बाजूला ठेवून त्याची अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याविषयीचा मुलांचा पुर्वग्रह निर्माण व्हायला हातभार लागत नाही. सामंजस्य निर्माण व्हायला मदत होते. आपण लहान आहोत म्हणून आपल्यावर दादागिरी होते, अशी समजुत मुलांना बिघडायला व पालक-बालक दरी वाढवायला मदत करते. म्हणूनच आपल्या अपेक्षा विसरून मुलाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा जाणण्याला महत्व आहे. अलिकडले त्यातले अनुभव मी पुढल्या लेखात मांडणार आहे.

मुले निरागस असतात आणि त्यांच्या अपेक्षाही खुप किरकोळ असतात. त्यांना तुम्ही विश्वासात घेऊ शकलात तर कुठल्याही मोठ्या किंवा अशक्य मागण्या मुले करत नाहीत. बहुतांश वेळी मुलांना पालकांचे लक्ष वेधून घेण्यात रस असतो. म्हणून मुले आपल्या कामात व्यत्यय आणतात. तेव्हा चिडचिडेपणा करण्यापेक्षा त्याच्या अशा अपेक्षांचा आपल्या अपेक्षापुर्तीसाठी सहजगत्या वापर करून घेता येतो. व्यवहारात ती मुले आपले म्हणणे मान्य झाले वा अपेक्षा पुर्ण झाली म्हणून खुश होत असली, तरी प्रत्यक्षात ती तुमचीच अपेक्षा पुर्ण करत असतात. त्यांच्या उर्जेचा व इच्छांचा त्यांच्याच नकळत त्यांच्या अभ्यास व विकासामध्ये झका़स वापर करणे त्यामुळे शक्य होते. अखंड बडबड किंवा प्रश्न विचारणार्‍या माझ्या दिड वर्षाच्या कन्येला गप्प करण्यासाठी मी पाढे पाठ करून गाण्यासारखे गुणगुणत गेलो आणि तिही त्यात रमली. तिच्या नकळत तिला कोवळ्या वयात ३०० पर्यंत पाढे पाठ होऊन गेले होते. त्यातले आकडे वा त्यांचे परस्पर संबंध तिला अजिबात कळत नव्हते. पण गुणगुणताना ते पाढे तिच्या स्मरणात राहुन गेले. असेच कित्येक प्रयोग सहजगत्या होऊ शकतात. पायावर उभे राहू लागलेले मुल स्वतंत्र माणूस असतो आणि त्याला तसे आपण वागवू शकलो, तर त्याच्यात आत्मविश्वास भरणे सोपे होऊन जाते. तो आत्मविश्वास त्या बालकाला पुढल्या आयुष्यातील मोठमोठी शिखरे पार पाडायला उपयुक्त असतो. ते काम फ़क्त पालक करू शकतो. कारण त्या अतिशय कोवळ्या वयात पालक हा मुलासाठी विश्वासाचा सर्वात सुरक्षित कोपरा असतो. एकाचवेळी धाक व विश्वास अशा दोन गोष्टी आपण मुलाच्या मनामध्ये निर्माण करू शकतो. पुढल्या काळात मुलांना हाताळण्यासाठी ती अतिशय निर्णायक अवजारे असतात. हे किती सहजशक्य असते? किती होकरात्मक असू शकते? त्यासाठी काय करायचे?

Wednesday, July 27, 2016

रोगापेक्षा उपाय भयंकर



अहमदनगर येथील सामुहिक बलात्काराची घटना अंगावर शहारे आणणारी आहे. कारण तिथे नुसता बलात्कार झालेला नाही. तर त्या अत्याचारानंतर सदरहू मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आलेली आहे. दिल्लीच्या निर्भया कांडानंतरही तिच्या गुप्तांगाची अशीच विटंबना झालेली होती. याचा अर्थ असे गुन्हेगार नुसतेच लैंगिक विकृत नसतात, तर ते स्त्रीदेहाविषयी किमान माणूसकीनेही वागण्याच्या पलिकडे गेलेले पशू असतात. त्यातला बलात्कार दुय्यम इतकी ही अमानवी वृत्ती असते. म्हणूनच असे कृत्य करणार्‍यांना जितकी कठोर शिक्षा होईल, तितकी थोडीच आहे. पण त्या निमीत्ताने जी मुक्ताफ़ळे उधळली जात आहेत आणि पर्याय सुचवले जात आहे, त्यात किती माणुसकी आहे? त्याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा आहे. पहिली बाब म्हणजे अशा घटना घडतात, तेव्हा त्या जळणार्‍या भावनांच्या चितेवर आपापल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी राजकीय नेत्यांची झुंबड उडत असते. मग त्यातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्पर्धा चालू होते. सहाजिकच आधी जे काही बोलून झाले आहे, त्यापेक्षा चटकदार बोलण्याकडे कल असतो. त्यामुळेच कोपर्डीला भेट दिल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिक्रीयेकडे सावधपणे बघण्याची गरज आहे. त्यांनी थेट अरबस्थानातील शरीयत कायद्याची मागणी करून टाकली आहे. कारण त्यात बलात्कार्‍याचे हातपाय तोडण्याची तरतुद असते, इतकेच भारतातल्या अनेकांचे ज्ञान आहे. पण अशी शिक्षा होण्यासाठी बलात्कार सिद्ध व्हावा लागतो, ही बाब त्यांना अजिबात ठाऊक नसावी. किंबहूना बलात्कारापेक्षा त्याविरुद्धच्या खटल्यात अशा पिडीत महिलेची किती विटंबना होते, त्याविषयीचे अज्ञान अशा मागणीचे मूळ असू शकते. अन्यथा इतक्या तडकाफ़डकी राज ठाकरे शरीयतची मागणी करून मोकळे झाले नसते.

खरे तर बलात्कार्‍याचे हातपाय तोडण्यासाठी अरबस्थान किंवा शरियतपर्यंत जाण्याची काहीही गरज नव्हती. ज्या महाराष्ट्राविषयी मनसेला सर्वाधिक अभिमान आहे, त्याच मराठी भूमीत अशी शिक्षा शिवशाहीत दिली गेली आहे. रांझे पाटलाच्या अशा गुन्ह्यासाठी हातपाय तोडण्याची शिक्षा फ़र्मावून शरीयतशिवाय शिवरायांनी कायद्याची हुकूमत सिद्ध करून दाखवली होती. महिलांना त्यातून सुरक्षा बहाल करण्याची धमक कायद्यात निर्माण केलेली होती. जी शिक्षा इथे शरीयतनुसार राज्य चालवणार्‍या अनेक सुलतानांनीही फ़र्मावली नव्हती. म्हणूनच शरीयत हा पर्याय नसतो. कारण हातपाय तोडण्याची शिक्षा शरीयतमध्ये जरूर आहे. पण त्यासाठी आधी आरोपीवरचा गुन्हा सिद्ध व्हावा लागतो. तो सिद्ध करण्यासाठी लागणारे साक्षीपुरावे जमवणे पिडीत महिलेला अशक्यप्राय असते. अन्यथा पाकिस्तानात किंवा बांगला देशात सरसकट हिंदू महिलांना अशा अत्याचाराचे बळी आजच्याही काळात व्हावे लागले नसते. काही प्रकरणे अशी आहेत, की बलात्कारीत महिलांनाच व्याभिचारी ठरवून अनन्वीत अत्याचाराच्या शिक्षा भोगाव्या लागल्या आहेत. त्याविषयी अनेक सत्यकथाही आज उपलब्ध आहेत. तालिबानांनी तर कठोरपणे शरीयतचा अवलंब केलेला होता. तिथे महिलांना बलात्कारापासून संरक्षण मिळाले होते काय? इसिस किंवा बोको हरामसारख्या संघटना शरीयतनुसारच आपल्या प्रभावक्षेत्रात कारभार हाकत असतात. पण जगातले सर्वात भयंकर बलात्कार व महिला अत्याचार त्याच क्षेत्रातील महिलांना भोगावे लागत आहेत. शरीयत जिथे लागू आहे असा दावा केला जातो, तिथल्या महिला व बलात्कार पिडीतेच्या सत्यकथा अंगावर शहारे आणणार्‍या आहेत. कारण भारतासारखी त्यांना दाद मागायलाही कुठे जागा नाही. यापैकी काहीच ठाऊक नसल्याने बहुधा राज ठाकरे यांनी शरीयतच्या पुस्तकी माहिती आधारे असे विधान केलेले असावे.

शरीयत हा एक कायदा नाही की फ़क्त गुन्हेगारीपुरता नियम नाही. ती संपुर्ण जीवनशैलीचे मार्गदर्शन करणारी संहिता आहे. त्यात धर्मानुसार विवरण केले आहे. त्यात बिगरमुस्लिम असणार्‍यांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानले जाते. सहाजिकच राज ठाकरे किंवा तत्सम बिगर मुस्लिमाचे न्यायविषयक अधिकार शरीयतनुसार संकुचित होत असतात. सामान्य मुस्लिमाला जे कायदे लागू होतात, तितका समान न्यायाचा अधिकार खुद्द राज ठाकरे यांनाही शरीयत देत नाही. तिथे मुस्लिम असण्याला प्राधान्य आहे आणि त्याला शरीयतने न्यायाच्या बाबतीत झुकते माप दिलेले आहे. म्हणूनच मुस्लिमांना त्यात न्याय मिळू शकतो. तितकाच तोडीस ओड न्याय अन्य कुठल्या धर्माचे असाल, तर मिळू शकत नाही. किंबहूना नास्तिक असाल तरीही मिळू शकत नाही. उलट अशा पिडीताला न्याय मिळण्यात शरीयतने अनेक अडथळे निर्माण करून ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ मुस्लिम त्यात गुंतलेला असेल, तर एकच साक्षीदार पुरेसा असतो. पण बिगर मुस्लिम असेल, तर दुप्पट साक्षिदार आणावे लागतात. बलात्कार पिडीतेने महिला असल्याने तसे साक्षिदार आणाय़चे कुठून? बलात्कार सार्वजनिक ठिकाणी साक्षिदार ठेवून केला जात नाही. सहाजिकच अनेकदा असा आरोप करणार्‍या महिलेलाच कुलटा व्याभिचारी ठरवून शिक्षा दिली जाते. किंबहूना तसे अनेक किस्से उपलब्ध आहेत. ह्यापैकी कुठली बाब भारतामध्ये महिलांना उपकारक ठरू शकेल? शरीयत म्हणून मोकळे होताना त्यातले बारकावेही लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून तर भारताल्या मुस्लिम संघटना इतर बाबतीत शरीयतचे झेंडे फ़डकवतात. पण आरोपी मुस्लिम असेल तर त्यांना भारतीय दंडसंहिताच हवी असते. कारण तितकी सुविधा शरीयत देत नाही. तलाक किंवा तत्सम घरगुती प्रकरणात शरीयतचा आधार घेतला जातो. पण अफ़जल याकुब मेमनच्या बाबत भारतीय कायदा शिरसावंद्य मानला जातो.

कोपर्डी वा अन्य बाबतीत लोकांच्या भावना प्रक्षुब्ध आहेत यात शंका नाही. कुठल्याही अशा गुन्ह्यासाठी अधिकाधिक कठोर शिक्षा असायलाच हवी आणि कायद्याचा अंमल लोकांच्या नजरेत भरणारा असायला हवा. कायद्याचा धाक व सरकारचा वचक असलाच पाहिजे. पण तो निर्माण करण्याचा शरीयत हा मार्ग नाही. उपायापेक्षा अपाय त्यात अधिक होणार याविषयी निश्चींत असावे. आहेत त्याही कायद्यात खुप कठोर कारवाईचे मार्ग उपलब्ध आहेत. पण कायदा यंत्रणा राजकीय दबावाखाली राबवली जाते आणि पक्षपात सुरू होतो. तोही कमी आहे म्हणून की काय, मानवाधिकाराचे थोतांड माजवून ठेवलेले आहे. एखाद्या गावात वस्तीत गुंड गुन्हेगार बलात्कार करतो किंवा चोर्‍यामार्‍या करतो. तो तसे करताना हाती लागला; मग लोकच त्याला कठोर शिक्षा देतात. त्यावेळी बुद्धीजिवी लोकांची प्रतिक्रीया कशी असते? गुन्हेगाराचे समर्थन केल्यासारखे जाणते लोक सामान्य पिडीत जनतेची निंदानालस्ती करण्यात पुढे असतात. एखादा पोलिस अधिकारीही अशा गुन्हेगाराला लोकांच्या समक्ष धडा शिकवू बघतो, त्यालाही आयुष्यातून उठवणारे विचारवंत आजच्या गुन्हेगारीचे खरे आश्रयदाते बनलेले आहेत. त्यांच्या मुसक्या कुठल्या कायद्याने बांधता येतील, त्याचा विचार करायला हवा आहे. कालपरवा रस्त्यावर येऊन सेनादल व पोलिसांवर दगडफ़ेक करणार्‍यांना पेलेट गनने थोपवण्याची कारवाई आक्षेपार्ह ठरवली गेली. पण असला दंगलखोर जमाव कुठले शांतताकार्य करायला घराबाहेर पडला होता, त्याचे स्पष्टीकरण देण्याची कोणाला गरज वाटलेली नाही. जेव्हा अशी सार्वत्रिक कारवाई होते, तेव्हा घराच्या आडोश्याला बसलेल्यांचाही त्यात अनवधानाने बळी जातो. याची शुद्ध नसलेले लोक कायद्याच्या अंमलबजावणीचे विश्लेषण करत असतात. त्यातून मग कायद्याचा वचक संपतो आणि बलात्कारी व दंगलखोरांचे मनोधैर्य वाढत असते. परिणामी कायद्याचा पांगळेपणा गुन्हेगारांसाठी प्रोत्साहन ठरू लागतो. त्यावर शरीयत हे उत्तर नाही की औषध नाही.

Tuesday, July 26, 2016

गुलाम आणि ‘सुलतान’



कायदा आणि न्याय यांच्याविषयी काय बोलायचे अशी शंका अधूनमधून येत असते. कारण नुकताच बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान जोधपूर प्रकरणातून निर्दोष सुटलेला आहे. हायकोर्टाने त्याचे अपील मान्य करून त्याला खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा रद्दबातल ठरवली आहे. काही वर्षापुर्वी एका चित्रीकरणासाठी जोधपूरला गेलेल्या सलमान खानने आपल्या मित्र सहकार्‍यांना घेऊन एक पिकनिक केलेली होती. त्यात हा शिकारीचा खेळ झाला होता. स्थानिक रहिवाशी काळवीटाला देवासम मानतात. म्हणूनच ही माहिती कळल्यावर राहिवाश्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यांनी स्थानिक पातळीवर आवाज उठवला आणि त्याला राष्ट्रीय पातळीवर माध्यमांची साथ मिळाल्याने खुप उशिरा सलमान टोळीवर गुन्हा दाखल झाला होता. काळवीट हा दुर्मिळ होत चाललेला प्राणी असल्याने कायद्याने त्याच्या शिकारीला प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. म्हणूनच अन्य काही आक्षेपांसह काळवीट शिकारीचा गुन्हा सलमानवर दाखल झाला होता. आपल्या देशात कासवापेक्षाही संथगतीने चालणार्‍या तपास व न्यायप्रक्रीयेमुळे त्याचा निकाल व्हायला कित्येक वर्षे खर्च झाली. अखेरीस स्थानिक सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून शिक्षा फ़र्मावली होती. पण अशा शिक्षा भोगायला सलमान ‘सामान्य नागरिक’ थोडाच आहे? त्याने कनिष्ठ कोर्टाच्या त्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सरकारही प्राणीप्रेमींच्या आग्रहास्तव अपीलात गेलेले होते. त्यात सलमानने आपल्यावरील आरोप नाकारून निवाडा रद्द करण्याची मागणी केली होती. तर प्राणीप्रेमींनी अधिकच कठोर शिक्षा देण्यासाठी अपील केले होते. त्याच निकालात सलमान निर्दोष सुटला आहे. पण हा विषय फ़क्त कायदे व त्यातल्या शब्दांपुरता मर्यादित आहे काय? जर सलमान सुपस्टार म्हणून नामवंत असेल, तर त्याला सामान्य नागरिक म्हणून वागवणे न्याय्य आहे काय?

कायदा सर्वांना समान असतो, असे नेहमी कानीकपाळी ओरडून सांगितले जाते. पण खरोखरच कायदा नियम सर्वांना समान वागणूक देतात हे दिसावेही लागते. सलमान किंवा अन्य कुठल्या अशा गाजणार्‍या प्रकरणात त्याची कधी प्रचिती येते काय? संजय दत्त ह्या अन्य बॉलिवुड सुपरस्टारच्या बाबतीत हेच झालेले होते. मुंबई स्फ़ोट खटल्यात त्यालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. मोठमोठे वकील युक्तीवाद करायला उभे करण्यात आले. पण तो निसटू शकला नाही. दिर्घकाळ खटले लढवूनही त्याला शिक्षा भोगावीच लागली. पण शिक्षा भोगताना त्याला मिळालेली वागणूक व अन्य सामान्य दोषींना मिळालेली वागणूक; यात जमिन अस्मानाचा फ़रक दिसलाच. सलमानचे प्रकरण वेगळे नाही. मुंबईत भरधाव गाडी हाकताना त्याने दोन लोकांचा जीव घेतल्याचे प्रकरण जुने झालेले नाही. त्यातही खुप गवगवा झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्यातून त्याला निर्दोष ठरवण्यासाठी वकीलांची फ़ौज उभी करण्यात आली. अखेर खालच्या कोर्टाने त्याला दोषी मानून शिक्षा फ़र्मावली. तेव्हा कायद्याच्या किती कसरती करण्यात आल्या? निकालपत्राची प्रत हाती येण्यापुर्वी सलमानचे वकील हायकोर्टात हजर झाले आणि संपणार्‍या जामिनाची मुदत वाढवून घेतली गेली. इतकी ‘समान’ वागणूक सामान्य माणसाला मिळते काय? त्याच्यामागे मोठ्या वकीलांची फ़ौज नसते आणि वेळोवेळी त्याला न्याय व कायद्याचे चटके सोसावेच लागत असतात. पण नामवंत प्रतिष्ठीत व्यक्ती असल्या म्हणजे तोच कठोर कायदा कमालीचा लवचिक होऊन जातो. म्हणजेच सामान्य माणसासाठीचा कायदा आणि प्रतिष्ठीत नामवंतांसाठीचा कायदा, यांच्या अंमलात फ़रक असतो. शब्दात कायदा तोच असतो. पण त्याच्या अंमलबजावणीत जमिन अस्मानाचा फ़रक पडलेला असतो. म्हणून सलमानला सामान्य नागरिक म्हणून न्यायासमोर समान वागणूक मिळणे विषमता होऊन जाते.

समजा उद्या कुठे चित्रण असेल किंवा कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सलमान येणार असेल, तर तिथे वावरणार्‍या अन्य नागरिकांसारखे त्याला वागवले जाते काय? तिथे प्रवेशाची रांग असेल किंवा झडती घेतली जात असेल, तर सलमानला त्याच मुशीतून जावे लागत नाही. अवघी सुरक्षा यंत्रणा त्यांना खास मार्गाने अपेक्षित जागी घेऊन जाते. म्हणजेच तिथे नियम कायदे गुंडाळून नामवंत म्हणून खास वागणूक दिली जाते. तेव्हा नियम कायदे लवचिक होतात. पण तिथेच वावरणार्‍या नागरिकांना तशी कुठलीही लवचिकता कायदा वा प्रशासन दाखवत नाही. म्हणजेच कायदा समान असला तरी त्याची अंमलबजावणी व्यक्तीनुसार बदलत असते. सलमानला अन्यत्र कायदा समान वागवत नसेल व झुकते माप देत असेल, तर न्यायाच्या दरबारात त्याला समान वागणूकीची अपेक्षा करता येईल काय? कारण त्याने नामवंत म्हणून तो समान वागणूकीचा हक्क गमावलेला असतो. म्हणूनच न्यायाच्या दारात त्याच्यासाठी कायदा अधिक कठोर व्हायला हवा. कारण अशी नामवंत माणसे आपल्या वागण्याने समाज मनावर प्रभाव पाडत असतात आणि म्हणूनच कायद्यावरील लोकांची श्रद्धा वाढवण्यास त्यांनी हातभार लावणे आवश्यक असते. तीच सवलतीच्या बदल्यात त्यांच्यावर येऊन पडणारी नैतिक जबाबदारी असते. कितीही त्रासदायक जाचक असले तरी कायदे आपण पाळतो, असे या लोकांनी कृतीतून दाखवून दिले तरच कायद्याच्या राज्याचे बळ वाढत असते. म्हणून मग अशा लोकांची न्यायाच्या दारात प्रतिष्ठीत म्हणून अधिक क्ठोर अग्नीपरिक्षा घेतली जाणे आवश्यक आहे. सामान्य माणसाला न्यायदानामध्ये ज्या सवलती वा मुभा आहेत, त्या नामवंतांना असता कामा नयेत. कारण कारण नामवंत हेच कायद्याला प्रतिष्ठीत करू शकणारे असतात. त्यांनाच सवलती मिळाल्या, तर सामान्य माणसालाही कायद्याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका निर्माण होतात.

कुठलाही पैसेवाला, गर्भश्रीमंतांची मुले किंवा राजकीय नेते मंत्र्यांची मुले अरेरावी करतात, त्याची मानसिकता यातूनच आलेली असते. सलमान किंवा संजयदत्त यांच्यासह विजय मल्या यांच्याविषयीच्या घडामोडी लोकांना काय शिकवत असतात? पैसे मिळवा, कुठल्याही भल्याबुर्‍या मार्गाने प्रचंड संपत्ती मिळवा. नामवंत व्हा, बदनाम झालात म्हनून बिघडत नाही. कायदा व न्याय-नियम पैशाच्या शक्तीसमोर नतमस्तक असतात. हाच धडा त्यातून मिळत असतो. कायद्याला धाब्यावर बसवण्याची वाढणारी प्रवृत्ती त्यातूनच शिरजोर झालेली आहे. त्यापासून मुक्ती मिळू शकली तर कायद्याचे न्यायाचे राज्य बलवान होऊ शकेल. त्यासाठी नवनवे किंवा आणखी कठोर कायदे बनवण्याची गरज नाही. असलेल्या कायद्यांच्या कठोर अंमलातून आदर्श धडे निर्माण करण्याची गरज आहे. असे धडे संजय दत्त किंवा सलमान खान यांच्या खटल्यातून उभे राहू शकतील. इतका मोठा नावाजेलला माणूस, हाताशी प्रचंड पैसा असूनही कायद्याला झुकवू शकत नाही. न्यायाची दिशाभूल करू शकत नाही, अशा अनुभवातून जेव्हा समाज सातत्याने जाऊ लागेल, तेव्हा कायद्याचा व न्यायाचा धाक निर्माण होऊ शकतो. म्हणूनच सलमान, संजयदत्त यांच्या खटल्याला सामान्य माणसावरील आरोपासारखे हाताळले जाता कामा नये. त्यांना अधिक कठोर पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न शासन प्रशासनांनी केला पाहिजे. त्यातून निसटण्याची तारांबळ करताना हे लोक लोकांना दिसतील, तेव्हाच कायदा अधिक प्रभावी व कृतीशिल असल्याची प्रचिती येऊ शकेल. म्हणून सलमानवर एक व्यक्ती म्हणून खटला चालवला जाणे चुकीचे आहे. त्याकडे सामाजिक विकृतीचा खटला म्हणून बघण्याची गरज आहे. तशी दृष्टी असेल, तर न्याय अधिक प्रभावी होतो आणि लोकांचा न्यायावरील विश्वास दृढमूल होऊ शकतो. सलमानचा खटला सामान्य नागरिकाच्या न्यायाने, कायद्याने लढवणे म्हणूनच मुलभूत चुक आहे.

खोडकर मुलांचे काय करावे? (जोपासनापर्व - ५)



आपल्या घरात नवे अपत्य जन्माला येते, तेव्हा कुठल्याही जन्मदात्यांचा उत्साह आनंद दुथडी भरून वहात असतो. पुढली दोनतीन वर्षे तरी प्रत्येक क्षणी आपल्या अपत्याचे कौतुक त्यांच्याकडून कुणालाही ऐकावेच लागते. कुठल्याही मात्यापित्यांची अवस्था वेगळी नसते. मग सुखवस्तु सुशिक्षित कुटुंबाची कहाणी वेगळी कशाला असेल? आपले मुल कसे जगावेगळे आहे, त्याचे शेकड्यांनी किस्से मी ऐकले आहेत. पण तो सगळा उत्साह मुल जसजसे वाढू लागते, तसा तसा मावळू लागतो. आधीची माया पातळ होत जाते आणि व्यवहारी पातळीवर आपल्या अपत्याला अद्वितीय बनवण्याची इर्षा कामाला लागत असते. आजवर अन्य कोणी आपल्या अपत्यासाठी केले नसेल, ते सर्व काही आपण आपल्या मुलांना देण्य़ाची आकांक्षा मुळ धरते. पण मजेची गोष्ट अशी असते, की आपले मुल ज्यांना अद्वितीय वाटत असते, त्याच्यासाठी सर्व गोष्टी मात्र नेहमीच्या ठराविक चाकोरीतल्या देण्याचे मनसुबे असतात. आपले मुल जगातले अपुर्व असेल, तर त्याच्या गरजा वा अपेक्षाही अपुर्व असल्याचे किती पालकांना मान्य असते? त्या लाडक्या बाळाच्या गरजा अन्य मुलांसारख्या नसतील याची फ़िकीर किती पालकांना असते? ती फ़िकीर असेल तर मग आपल्या बालकासाठी खास काही जगावेगळे करायला किती पालक राजी असतात? उलट जसजसे मुलाचे वय वाढत जाते, तसतशी त्याला चाकोरीत ढकलण्याची घाई पालक करू लागतात. जगात आज्ञाधारक मानले जाणारे दंडक त्याला लावू बघतात, किंवा कुठलाही हट्ट पुरवून त्याला बिघडवत तरी जातात. पण बहुतांश पालक त्या आपल्या लाडक्याला समजून घेण्याचा प्रयत्नही करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक मुल खरोखरच अद्वितीय असते. त्याच्यासारखे दुसरे मुल नसते. म्हणूनच आपले मुल जगावेगळे आहे, ते समजून घेण्याची गरज असते. तर त्याला जगावेगळे घडवण्याला हातभार लावता येत असतो.

जोवर मुल पाळण्यात असते तोपर्यंत त्याचे अखंड कौतुक चालू असते आणि उपडे पडून रांगू लागते तेव्हा कौतुकाचा भर ओसरू लागतो. जसजसे मुल पायावर उभे राहुन चालू लागते, तसा कौतुकाचा बाजार मंदीत जाऊ लागतो. इतके दिवस अखंड लक्ष वेधून घेणार्‍या बालकाचा आता त्रास जाणवू लागतो. कारण इतके दिवस मुल पाळण्यात असते आणि निर्धास्तपणे आपण त्याला तिथे टाकून आपले उद्योग करायला मोकळे असतो. पण मुलाला पाय फ़ुटले, की त्याच्या सुरक्षेसाठी अखंड पाळत ठेवावी लागते. त्याच्यामागून पळापळ करावी लागत असते. तिथे आपली दमछाक सुरू होते. काही मिनीटे मुल शांत बसत नाही, अशी पालकांची तक्रार असते. खरे तर दोनचार मिनीटे ते मुल आपल्याला विश्रांती घेऊ देत नाही, ही तक्रार असते. क्वचितच मुले वाढत्या वयात शांत पडून रहातात. अन्यथा अखंड चुळबुळ चालू असते. वास्तवात त्याला शारिरीक वाढीचे कारण असते. खाऊ घातलेले पचवण्याची प्रक्रिया शारिरीक हालचालीखेरीज शक्य नसते. मग अशा अखंड हालचाली चुळबुळीला आपण मस्ती असे नाव देतो. प्रत्यक्षात तो बालकाचा व्यायामच असतो. पण त्यात त्याला इजा दुखापत होईल, म्हणून ती हालचाल आपल्याला नकोशी वाटत असते. कारण आपल्यापाशी त्याच्या इतकी उर्जा नसते. आपण नेहमीच्या कामाने जबाबदार्‍यांनी थकलेले असतो आणि वेगळा विचारही करायला आपल्याला सवड नसते. उलट त्या कोवळ्या बालकापाशी प्रचंड सवड असते. भरपूर उर्जा असते आणि जगातली प्रत्येक प्रथमच दिसणारी गोष्ट त्याच्यासाठी कुतुहलाचा विषय असतो. जाणून घेण्याची अतीव इच्छा त्याला नवनवे काही करायला भाग पाडत असते. त्यातले धोके किंवा सुविधा याविषयी बालक पुर्णतया अजाण असते. त्याच्या त्या कुतुहलाचे समाधान निरसन करण्याचा आपला कंटाळा कबुल करण्याचा प्रामाणिकपणा पालकापाशी नसतो. म्हणून आपण त्याला मस्ती, खोडकरपणा अशी नावे देऊन टाकतो.

काही प्रसंगी एक प्रयोग करून पालकांनी बघावा. मुले उपडी होण्याचा प्रयत्न करून रांगू लागतात. मग बसायचा व उभे रहाण्याचा प्रयत्न करतात, किंवा पाऊल उचलून चालू बघतात. त्या वेळी तुम्ही त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर थांबा आणि त्यांना त्यांचेच प्रयास करू देऊन बघा. कुठलेही मुल आपला जीव संभाळून इजा होऊ नये याची पुरेशी काळजी घेऊन, त्य कसरती करताना आढळून येईल. कारण प्रत्येक प्राणिमात्राला आपला जीव जपण्याची उपजतवृत्ती लाभलेली आहे. एखादे मुल आगावूपणा करीत असेलही, त्यासाठीच जवळ थांबून त्याला इजा होणार नाही, अशी पाळत ठेवावी. मुले लौकर शिकतात आणि स्वतंत्रपणे शिकतात, असा माझा अनुभव आहे. अनेक मुलांच्या बाबतीतला माझा अनुभव आहे. जी गोष्ट अशा गोष्टीतून अनुभवास येते, तीच पुढल्याही वाढत्या वयात बघायला मिळते. उभे रहाणारे किंवा चालू लागलेले मुल, अनेक वस्तु ओढते पाडते अशी तक्रार सार्वत्रिक आहे. पण त्याला काहीही पाडायचे नसते किंवा मोडायचे नसते. त्याला त्या बाबतीतले कुतुहल तिकडे खेचुन घेत असते. संभाळून अशा वस्तु बालकाला हाताळू दिल्या, तर त्या विषयातले कुतुहल संपते आणि मग मोकळ्या जागी पडलेली वस्तु दिसली. तरी मुले त्याला हात लावत नाहीत. त्यांचे कुतुहल हे शिकणे असते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. अर्थात प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे अनुभव वेगवेगळे असतात. इथेच आपले मुल जगावेगळे असते. मात्र जन्मापासून ज्या वेगळेपणाचे कौतुक केलेले असते, ते करणारे पालकच आपल्या मुलातले जगावेगळेपण विसरून जातात. कारण त्यांना मुलाचे जगभर कौतुक व्हायला हवे असले, तरी त्यासाठी कुठलेही कष्ट नको असतात. तिथून बालक-पालक झगडा सुरू होतो. मग खोडकर मस्तीखोर असे शिक्के मारून आपण पळवाट शोधतो. मला म्हणूनच अशी मुले खुप आवडतात. त्यांच्या वेगळेपणासाठी!

अशी मुले हाताळावित कशी, ही प्रत्येक पालकाला सतावणारी गोष्ट असते. त्यासाठीच मग मुलांना कोवळ्या वयात नर्सरी अंगणवाडी अशा कोंडवाड्यात काही तासांसाठी डांबण्याची पळवाट शोधून काढण्यात आलेली आहे. आपोआप त्याचा धंदा होऊन गेला तर नवल नाही. मग अनेक संस्थांनी नर्सरीतच मुलांना प्रवेश देऊन चाकोरीबद्ध करण्याचे कारखाने सुरू केले आहेत. परिणामी आपले जगावेगळे मुल तिथे एखाद्या कारखान्यात उत्पादन होणार्‍या वस्तुसारखे एकसाची बनत जाते. ज्याला जगावेगळे म्हणून कौतुक केलेले असते, त्याला आपणच चाकोरीतले मुल बनवून टाकतो. त्याच्यातल्या उपजत शिकण्याच्या वृत्तीला बोथट करण्याचा उद्योग तिथून सुरू होतो. ज्ञान प्राप्त करण्याची त्याच्यातली इच्छा, अशी कोवळ्या वयातच मारण्यावर आपण पैसे खर्च करतो. कारण आपल्यापाशी पैसे भरपूर आहेत. फ़क्त मुलांसाठी वेळ नाही, की सवड नाही. त्याचा एक आणखी परिणाम असा असतो, की त्या कोंडवाड्यातून मुलाला जेव्हा कधी मुक्ती मिळते; तेव्हा ते मनसोक्त बागडू लागते. तीच आपल्याला मस्ती वाटू लागते. मुक्त विहरण्याचे त्याचे वय असते आणि तसे वागू लागले, तर मुल मस्ती करते अशी आपली धारणा होते. त्याच्यातल्या उर्जेचे निस्सारण अगत्याचे असते. हे आपण विसरून गेलोत, म्हणून आपल्याला मुले खोडकर वाटतात. मुले चिकित्सक असतात, समजून घ्यायला उतावळी झालेली असतात. अंगातली मस्ती म्हणजे उर्जा मोकळी करून घ्यायला धडपडत असतात. त्याला खोडकरपणा असे नाव देणेच त्यांच्यावरचा अन्याय असतो. काही तास मनमोकळे मुलांशी बोलावे, खेळावे आणि त्यांना दमवून टाकावे. पालक एवढे करू शकले, तर खोडकरपणा कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जाईल. मात्र हे खेळ दमवण्याबरोबर शिकवणारेही असायला हवेत. त्या बालकाच्या वाढत्या बुद्धीची भुक भागवणारे असायला हवेत. कल्पक असायला हवेत. आव्हान असायला हवेत.

‘रॅडीकलायझेशन’चा सोपा अर्थ



सोनी नावाच्या वाहिनीवर क्राईम पेट्रोल नावाची एक मालिका चालते. त्यात देशातील विविध प्रांतातील घडलेले गुन्हे व त्याचा पोलिसांनी केलेला तपास, असे सत्याधारीत कथानक रंगवलेले असते. फ़क्त त्यातील वास्तव पात्रांची नावे व स्थाने बदलून सादरीकरण होत असते. माणूस एखाद्या गोष्टीच्या आहारी गेला, मग कसा बहकत जातो, त्याचे अस्सल नमूने त्यात बघायला मिळतात. दोन महिन्यापुर्वी त्यात उत्तरप्रदेशातील एका तरूणाची सत्यकथा बघायला मिळाली. कॉलेजमध्ये शिकणार्‍या तरूण तरूणीची मैत्री आणि त्यांनी युपीएससी परिक्षेला बसण्याची धडपड त्यात आहे. दोघेही हुशार असतात आणि प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा बाळगून असतात. कसेही करून ते ध्येय गाठण्याची नशा त्यातल्या तरूणावर स्वार झालेली असते आणि त्यासाठी एका नवाजलेल्या क्लासमध्ये भरती होण्यासाठी त्याला लाख रुपयांची गरज असते. पण शेतीवर पोट भरणार्‍या पालकांकडून ती मागणी पुर्ण होऊ शकत नाही. पण अमूक एका क्लासमध्ये भरती झालो मग परिक्षा उत्तीर्ण झालोच, अशा समजूतीने त्या मुलला पछाडलेले असते. मग पैसे आणायचे कुठून ह्या विवंचनेत तो गावातून पुन्हा शहराकडे निघालेला असताना त्याला विमनस्क अवस्थेत बालपणीचा एक मित्र त्याला भेटतो. उनाड वाया गेलेला हा मित्र त्याला पैसे सहज मिळवण्याचा एक झटपट मार्ग सुचवतो. त्यातला धोका या गुणी तरूणाला दिसत असतो. पण लालबत्तीचे स्वप्न झाला खुणावत असते आणि तो मित्राच्या आग्रहात सहज ओढला जातो. मैत्रीणीच्या श्रीमंत घरमालकाच्या मुलाचे अपहरण करून काही लाखाची खंडणी उकळायची, की विनाविलंब क्लासच्या मोठ्या फ़ीची सोय लागणार असते. प्लान अचूक असतो. कलेक्टर किंवा कायद्याचा अंमलदार व्हायला निघालेला हा हुशार बुद्धीमान तरूण, त्या जाळ्यात कसा ओढला जात असेल? त्याची बुद्धी कुठे गेली अशावेळी?

त्या सत्यघटनेत तो गुणी मुलगा गुन्हा करायला प्रवृत्त होतो. कारण त्याला क्लासमध्ये प्रवेश हवाच असतो आणि तो घेतला तरच स्वप्न साकार होणे शक्य असते. त्याच क्लासमध्ये प्रवेश आणि पर्यायाने प्रशासकीय अधिकार्‍याची लालबत्ती त्याला खुणावत असते. अशी इच्छा अनावर होते. याला त्या क्लासच्या जाहिराती कारण असतात. आपण क्लासला गेल्यानेच उत्तीर्ण होऊ शकतो, स्वत: अभ्यास करून मजल मारू शकणार नाही, हा न्युनगंड त्याला क्लासच्या मोहात ओढत असतो. तसे नसते तर स्वबळावर अभ्यासातून उत्तीर्ण होण्या्ची जिद्द त्याने दाखवली असती. त्यात गुन्हा अपेशी ठरतो आणि अंमलदार व्हायला निघालेला तरूण तुरूंगाच्या गजाआड जाऊन पडतो. त्या्च्या या उद्योगातली भागिदार असल्याच्या संशयाने त्याच्या मैत्रीणीमागेही पोलिसांसा ससेमिरा लागतो आणि अब्रु गेली म्हणून ती होतकरू मुलगी आत्महत्या करते. एकूणच शोकांतिका होऊन जाते. पण मग असा प्रश्न पडतो, की मुळातच हुशार असलेल्या त्या मुलाची बुद्धी गुन्हेगारी आपल्याला रसातळाला घेऊन जाईल, असा सारासार विचार कशाला करू शकत नाही? त्याची बुद्धी निकामी कशी होते? डोळसपणे असे हुशार तरूण विघातक मार्गाकडे वळतातच कसे? त्या सत्यकथेतला होतकरू तरूण आणि कालपरवा इसिसमध्ये सहभागी झालेले भारतातील मुस्लिम उच्चशिक्षित तरूण, यात कितीसा फ़रक आहे? तेही तसेच कुठल्या तरी मोहात भरकटत गेलेले आहेत. या तरूणाला महत्वाकांक्षेने आंधळे करून फ़रफ़टत नेलेले होते, तर इसिसमध्ये सहभागी होणार्‍यांना आपण काही उदात्त धार्मिक पवित्र कार्य करीत असल्याच्या भावनेने गुरफ़टून टाकलेले असते. त्यासाठी वाटेल ते करायला ते सज्ज होत असतात. त्यांचे परिणाम दिसले, मग त्यांचे ‘रॅडीकलायझेशन’ झाले असे म्हटले जाते. आपले उद्दीष्ट गाठण्यासाठी कुठलाही भलाबुरा मार्ग अवलंबण्याचा अतिरेक म्हणजे ‘रॅडीकलायझेशन’!

इन्डॉक्ट्रीनेशन पुरेसे झालेले असेल, तरच पुढली पायरी ‘रॅडीकलायझेशन’ने गाठता येऊ शकते. आरंभी सहजगत्या गप्पा गंमतीतून तुमच्या समजुती, विचार करण्याची क्षमता यांना निष्क्रीय केले जाते. अगदी नकळत तुमच्या अशा उपजत वृत्तींना निकामी केले जात असते. कसले दगडाचे देव पुजता? गाय हा पशू आहे आणि माणूस असून पशूच्या पाया पडता, ही गंमत असते. तर्काला बुद्धीला पटणारी असते. त्यामुळे तुम्ही आपण बुद्धीमान असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्या बालपणापासूनच्या समजुतीना नाकारण्याने त्याचा आरंभ करत असता. त्यात गैर काहीही नाही. पण आपल्या श्रद्धा समजुती सोडताना बुद्धी व तारतम्यालाही सोडण्यापर्यंत जाऊ नये, याचे भान असलेले पुढल्या पायरीपासून सावध राहू शकतात. ज्यांची तितकी तयारी वा कुवत नसते, त्यांच्या डोक्यात मग इन्डॉक्ट्रीनेशन करणे सोपे असते. आजवरची श्रद्धा चुकीची असेल, तरी तो जगण्याचा आधार असतो. तो तुटल्याने निराधार झाल्यासारखे वाटणार्‍यांना दुसरी श्रद्धा आधारासाठी हवी असते. त्यांच्या मनात नवी श्रद्धा अपुर्व किंवा अपरिहार्य म्हणून सहज प्रस्थापित करता येते. ती श्रद्धा म्हणजेच अंतिम सत्य असल्याचे पक्के झाले, मग ‘रॅडीकलायझेशन’ची पायरी सुरू होत असते. आपण बुद्धीमान असल्याने प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो, हे एकदा मनात पक्के झाले, मग तो टप्पा गाठण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नाही. त्यासाठीचा मार्ग शोधला जाऊ लागतो. स्वबळावर अभ्यास करून तिथपर्यंत जाण्यात काहीही गैर नाही. पण आत्मविश्वास नसला, मग आधार हवासा वाटू लागतो. मग आजवर अनेक परिक्षार्थींना त्यात यश मिळवून दिल्याचा दावा करणारे क्लास, तो आधार वाटणे स्वाभाविक असते. पण तिथे प्रवेशासाठी लागणारे पैसे नसले की झटपट ते पैसे मिळवून देण्य़ाची कल्पना तारतम्य सोडून पटणे अपरिहार्य होऊन जाते.

सहजपणे हा तरूण क्लासच्या पैशासाठी बालकाचे अपहरण करून खंडणीच्या मार्गाने पैसे उभे करू बघतो. त्याची कुशाग्र बुद्धी त्याला रोखू शकत नाही, तशीच काहीशी अवस्था इसिसमध्ये भरती होणार्‍या मुस्लिम तरूणांची आहे. त्यांच्या डोक्यात धर्माची महत्ता सहजासहजी इतकी पक्की भिनवली जात असते, की त्यापेक्षा आयुष्यात काहीही साध्य करण्यासारखे नाही, असे त्यांनाही वाटू लागते. प्रथम घरात टिव्हीच्या मालिका, सिनेमा बघणे धर्मबाह्य असल्याचे पाप डोक्यात घातले जाते आणि त्यात रमणारे कुटुंबिय शत्रूसम वाटू लागतात. त्यांच्यासोबत जगणे, वास्तव्य करणे पापकृत्य वाटू लागते. तो न्युनगंड धार्मिक पावित्र्याचा अहंगंड जोपासू लागतो आणि इन्डॉक्ट्रीनेशची प्रक्रिया पुर्ण होते. ती जितकी प्रभावी असते, तितकी ‘रॅडीकलायझेशन’ची पायरी जवळ येत असते. जेव्हा तुमची बुद्धी व तारतम्य निकामी होऊन जाते तेव्हा तुम्ही किती सुशिक्षित वा अशिक्षित आहात, यात काहीही फ़रक शिल्लक उरत नाही. तुम्ही विचार करण्याची कुवत गमावलेली असते आणि प्रभावी व्यक्तीमत्व असलेल्या इतर कुणाच्या हातचे बाहुले म्हणून तुम्ही वागू लागलेले असता. मग तो तरूण मदरशातला असेल किंवा उच्चशिक्षण देणार्‍या संस्थेतला विद्यार्थी असेल, काहीही फ़रक नसतो. ती एक कठपुतळी असते. त्याच्या मनावर ताबा मिळवलेल्यांसाठी अशी माणसे एक हत्यार वा अवजार बनून जातात. त्यामुळे ही सुशिक्षित बुद्धीमान मुले कशी बहकली, त्याचा शोध घेण्यासाठी फ़ारसे प्रयास करण्याची गरज नाही. झाकीर नाईक यांच्यासारखे लोक त्यांचे इन्डॉक्ट्रीनेशन करतात. पुढले काम इसिस वा तत्सम संस्थांमधील व्यक्ती वा प्रसारसाधनांच्या माध्यमातून होते, ज्याला ‘रॅडीकलायझेशन’ म्हटले जाते. पकडले गेलो तर गुन्हेगार म्हणून उर्वरीत आयुष्य मातीमोल होईल, हे त्या होतकरू तरूणाला सुचत नाही आणि जिहादमध्ये मारले गेल्यानंतरचे जीवन कोणी बघितलेलेच नाही, तर साध्य काय होणार, हे जिहादमध्ये ओढल्या जाणार्‍या सुशिक्षित मुस्लिम तरूणांना समजत नाही. कारण अशी माणसे बुद्धी निकामी होऊन भरकटत गेलेली असतात.  (संपुर्ण)

Sunday, July 24, 2016

इन्डॉक्ट्रीनेशन म्हणजे काय?



गेल्या काही दिवसात केरळातून इसिसमध्ये काही तरूण मुले भरती झाल्याच्या बातमीने धुमाकुळ घातला आहे. या मुलांच्या पालकांनाही आपल्या घरात व कुटुंबात काय घडामोडी घडत होत्या, त्याचा थांगपत्ता लागला नाही. कारण ही बहुतांश मुले मदरशातील नाहीत तर उच्चशिक्षण घेणारी होती. त्यामुळेच अंधश्रद्धा वा धर्मवेडेपणा त्यांना प्रभावित करू शकेल, अशी पालकांना शक्यताही वाटलेली नव्हती. त्यात पुन्हा काही मुस्लिम तरूणांनी अन्यधर्मिय मुलींना प्रेमबंधनात गुरफ़टून धर्मांतराच्या मार्गाने मुस्लिम केल्याचाही दावा आहे. पण पुढे त्या मुलीही अशा जिहादी मानसिकतेमध्ये गेल्याने, मोठी खळबळ माजली आहे. एका बाजूला मुस्लिम घरातील पालक चिंतेत आहेत आणि दुसरीकडे धर्मांतरीत मुलींच्या पालकांना हा धक्कादायक प्रकार कसा घडू शकला, त्याचाही अंदाज येत नाही. पण कुठल्याही बातम्या वा चर्चेमध्ये याविषयी कुठला तपशीलवार उहापोह होऊ शकला नाही. त्यापेक्षा इन्डॉक्ट्रीनेशन आणि रॅडीकलायहेशन अशा शब्दांचा सरसकट वापर मात्र खुप झाला आणि होत असतो. पण हे इन्डॉक्ट्रीनेशन म्हणजे काय? ते कसे होते किंवा कसे केले जाते, त्याचा कुठलाही खुलासा कोणी करीत नाही. त्यामुळे हे शब्द फ़सवे ठरतात. सामान्य माणसाला त्याचा अर्थ लागत नाही, की परिणाम कळत नाही. याचे मुख्य कारण या विषयात लोकांचे प्रबोधन करण्यापेक्षा लोकांना संभ्रमित करण्याचीच स्पर्धा चालते. किंबहूना ज्यांना यातले थोडेफ़ार काही कळते, त्यांनाही त्याचे गांभिर्य समजलेले नसावे, किंवा सामान्य माणसाला समजू नये, याची फ़िकीर सतावत असावी. म्हणून मग दहशतवादाला धर्म नसतो किंवा इन्डॉक्ट्रीनेशन असे फ़सवे शब्द दिशाभूल करण्यासाठी सरसकट वापरले जातात. म्हणूनच ह्याला जिहादपेक्षा मोठा धोका म्हणावे लागते. त्यावरचा उत्तम उपाय म्हणजे त्या शब्दांचा वास्तविक अर्थ समजून घेणे हाच आहे.

उकिरड्यावर किंवा कचर्‍याच्या ढिगावर उभे राहून कचर्‍याला दुर्गंध नसते असे कोणी म्हणत असेल, तर तो शहाणा आहे असे कोणी सामान्य बुद्धीचा माणूसही मान्य करणार नाही. पण जेव्हा तसा डंका पिटला जातो, तेव्हा सामान्य माणसाचे भान सुटत जाते. डंका पिटणे म्हणजे शुद्ध जाहिरातबाजी असते. ती जाहिरातबाजी इतक्या आवेशात व जोशात केली जाते, की त्यातून प्रथम तुमचे भान हरपले पाहिजे. तुमची विचारशक्ती व तारतम्य निष्क्रीय झाले पाहिजे. एकदा तशा संमोहनाच्या प्रभावाखाली तुम्ही आलात, मग समोरचा जे विचार तुमच्या डोक्यात घालत जाईल, ते विचार तुम्हालाही आपलेच वाटू लागतात आणि तुम्ही बिनदिक्कत तसे बोलू वागू लागता. किंबहूना ते विचार तुमचे नाहीत, वा तुम्ही तसे नाहीत हे म्हटले तरी तुमचा संताप होऊ लागतो. अशा स्थितीला इन्डॉक्ट्रीनेशन असे म्हणतात. झाकीर नाईक वा त्याची इस्लामीक रिसर्च फ़ौंडेशन संस्था जे काम करीत आहे, त्याला इन्डॉक्ट्रीनेशन म्हणतात. त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी जाहिरातबाजीचा प्रभाव समजून घेतला पाहिजे. तुमच्या घरात कुटुंबात लहान मुलांना जाहिरातीमध्ये लक्ष्य केलेले असते. घराघरात जाऊन पोहोचलेल्या टिव्ही व वाहिन्यांवर अशा जाहिरातींचा अहोरात्र वर्षाव चालू असतो. सहसा लोक त्या जाहिराती आल्या मग चॅनेल बदलतात. पण तशी कितीही कसरत केली, तरी त्यापैकी कुठल्या तरी दोनचार जाहिराती तुम्हाला बघाव्याच लागतात. प्रामुख्याने अशा जाहिराती लहान मुलांना आवडतात. कारण त्या झटपट आटोपत असतात आणि त्यातून नेमका संदेश मुलांच्या मनाचा कब्जा घेत असतो. ‘डब्बा है रे डब्बा, अंकल का टिव्ही डब्बा’, हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. मुलांनी सहज गुणगुणावी अशी ही जाहिरात मुलांच्या खेळण्याचा एक भाग बनून जाते. मग त्या कंपनीचा तो टिव्ही विकण्य़ासाठी घरातच एक विक्रेता तयार होत असतो.

आपल्या घरात हाय डेफ़ीनेशन टिव्ही नाही, म्हणजे आपण अगदीच फ़ालतू हलक्या दर्जाचे कोणी आहोत, असा न्युनगंड बालकाच्या मनात निर्माण केला जातो. मग बालकच पालकांच्या गळी तो टिव्ही मारण्यासाठी अखंड हटवादी बनत जाते. तशीच कुठल्या तरी फ़्रीजची जाहिरात आहे. लहान मुले खेळताना आपसात आपल्या घरच्या गोष्टी सांगत असतात. एका घरातला तो नवा फ़्रीज बघायला मुले येतात आणि आंटी त्यांना त्याची महानता समजावते. मग त्यातला डोक्यावर बुचडा असलेला शीख मुलगा म्हणते, ‘ओह तेरे’. अशा कोवळ्या बालकांना त्या वस्तू वा तिच्या उपयुक्ततेबद्दल काडीची अक्कल नसते. पण तशी वस्तु आपल्या घरात असणे, ही त्यांच्यासाठी एकदम प्रतिष्ठेची गोष्ट बनून जाते. सहाजिकच पालक ती वस्तु आणत्त नसतील तर पालक व आपल्या घरातील तशीच वस्तु त्या मुलांना अपमानकारक वाटू लागते. थोडक्यात त्या वस्तु आपल्यापाशी नाहीत, याविषयी त्या मुलांमध्ये एकप्रकारचा न्युनगंड तयार होत जातो. त्यांना आपण जे कोणी आहोत, त्याची लाज वाटू लागते. किंवा आपण कोण नाही आहोत तसे होण्यासाठी त्यांच्या मनात आकर्षण निर्माण होते. तसे होण्याची ओढ त्यांना खुणावू लागते. पर्यायाने अशी मुले वा त्याच प्रभावाखाली असलेली व्यक्ती कमालीची न्युनगंडाने वेढली जाते. त्याला इन्डॉक्ट्रीनेशन म्हणतात. कुठलेही वास्तविक व्यवहारी कारण नसताना तुमच्या मनात न्युनगंड निर्माण करायचा आणि अन्य कशासाठी तरी तुमच्या मनात अभिमानाची धारणा जन्माला घालायची, याचा अर्थ इन्डॉक्ट्रीनेशन होय. आपल्या प्रत्येकाच्या घराघरात हे काम नित्यनेमाने जाहिराती करीत असतात आणि आपण त्याबाबतीत संपुर्णपणे अनभिज्ञ असतो. आपल्या मुलांमध्ये ही भावना समजूत कुठून आली, त्याचा आपल्याला थांग लागत नाही. मात्र त्याच्याच परिणामी आपले मुल पालकापासून दुरावत जात असते.

सामान्यत: ग्राहकाच्या बाबतीत जे होते, तेच अन्य बाबतीतही होत असते. अमूक बाब हाताशी उपलब्ध असणे म्हणजे श्रीमंती, प्रतिष्ठा किंवा अमूक पद्धतीने विचार करणे म्हणजे बुद्धीमान; अशा समजूती माणसाला प्रथमत: संभ्रमित करत असतात. त्याच्याभोवती असे माहोल उभे केले जाते, की त्याला तारतम्याने विचारही करता येऊ नये. किंबहूना त्याला अशा समजूतीत ओढताना आधी त्याच्या श्रद्धा भावना व समजुतींना सुरूंग लावायचा असतो. फ़्रिज वा टिव्ही या घरातल्या सुविधा आहेत. त्याचा मानवी जगण्यातल्या प्रतिष्ठा वा सन्मानाशी काडीमात्र संबंध नाही. पण इतक्या सहज त्याविषयी तुमच्या हळव्या मनाशी खेळ केला जातो, की त्या वस्तु तुमची प्रतिष्ठा बनून जातात. त्या मिळवण्यासाठी काहीही करण्यापर्यंत तुमची मजल जाऊ शकते. इतक्या थराला तुमचे विचार घेऊन जाण्याला इन्डॉक्ट्रीनेशन म्हणतात. मग मुले भारावल्यासारखी पालकाकडे त्या वस्तु मागू लागतात. आपले उत्पन्न वा परिस्थिती तुम्ही मुलाला विश्वासात घेऊन पटवू शकलात, तरी त्याच्या मनातली ओढ कमी होत नाही. पण तडजोड म्हणून अनेक मुले वस्तुस्थिती स्विकारतात. काही मुलांच्या बाबतीत ती ओढ कमालीची आग्रही असते. अशी मुले ते मिळवण्यास उतावळी होऊन जातात. त्यानंतरच रॅडिकलायझेशन होऊ शकते. अशी मुले मागणी मान्य होण्यासाठी हट्टी होणे, उचापती करणे किंवा पालकांशी हुज्जत भांडण करण्यापर्यंत जाऊ लागतात. पण त्यांचे इन्डॉक्ट्रीनेशन झाले आहे, ही बाब आपल्या डोक्यात कधीही शिरत नाही. कारण आपण ज्यांना टिव्हीवरच्या साध्या जाहिराती समजून दुर्लक्ष करीत असतो, ते व्यवहारातील इन्डॉक्ट्रीनेशन असते. साध्या भाषेत जाळ्यात ओढणे असते. झाकीर नाईक काय करतात त्याचा अर्थ असा सोपा व सरळ आहे. पण तो आपल्याला कोणी समजावला आहे काय? इन्डॉक्ट्रीनेशन सारखा फ़सवा शब्द तोंडावर फ़ेकून आपली दिशाभुल केली जात असते. (अपुर्ण)

बेशरमपणाचा कहर



राजकारणात बेशरमपणा ही एक गुंतवणूक असते. आम आदमी पक्ष म्हणून जो काही गोतावळा अलिकडल्या जमान्यात राजकीय क्षेत्रात आला, त्यांच्यापाशी बेशरमीचे मोठे गोदाम असावे. कारण त्यांनी कसलीही लाजलज्जा शिल्लक ठेवलेली नाही. उलट त्याविषयी प्रश्न विचारले तर ते आणखी निर्लज्जपणा बिनदिक्कत करू शकतात. कारण बेशरमपणा म्हणजेच इज्जत, अशी त्यांची नवी व्याख्या आहे. त्याचीच प्रचिती सातत्याने येऊ लागली आहे. राजकारण हा चिखल आहे असे अण्णा हजारे सतत सांगायचे आणि त्यांचा चेला म्हणून जी मंडळी लोकपाल आंदोलनाचा बुरखा पांघरून सार्वजनिक जीवनात आली, त्यांनी चिखलालाही लाजवील अशी घाण करण्याचे नवनवे विक्रम चालविले आहेत. राजकीय परिस्थितीचा व लोकभावनेचा धुर्तपणे लाभ उठवण्यात हे लोक वाकबगार आहेत. क्षणात या बोटावरची थुंकी त्या बोटावर फ़िरवण्याइतके समर्थ आहेत. आपल्याला राजकारणात जायचे नाही अशा आणाभाका घेतलेल्या या टोळीने, अण्णांनाच टांग मारून पक्ष स्थापन केला व अण्णांच्या त्या आंदोलनाची पुण्याई वापरून निवडणूका जिंकण्याचे कारस्थान यशस्वी केले. कुठल्याही चोरांच्या टोळीत जसे लुट वाटून घेण्य़ावरून वाद भांडणे होतात, तशी आपच्या टोळीत विवाद उफ़ाळले. त्यात केजरीवाल हाच निर्विवाद टोळीप्रमुख असल्याचे सिद्ध झाले. त्याला आव्हान देऊ शकेल असा टोळीत आता कोणी उरलेला नाही. अशी ही माणसे नितीमत्ता व लाजलज्जेची गोष्ट बोलतात, तेव्हा कोणी चारित्र्यसंपन्न माणसालाही भिती वाटेल. अशी नाटके काही काळ चालतात आणि हळुहळू त्याची पापे चव्हाट्यावर येतातच. मात्र त्यामुळे घाबरून जाण्याइतके केजरीवाल बावळट किंवा सभ्य नाहीत. म्हणूनच ते अधिक भितीदायक पात्र आहे. तसे नसते तर हा माणूस गुजरातच्या उना येथील दलितांपाशी अश्रू गाळायला गेला नसता.

उना गुजरात येथे काही दिवसांपुर्वी दलित कुटुंबातील तरूणांना गोरक्षक म्हणून मिरवणार्‍यांनी पकडले आणि हाणामारी केली. ती घटना अमानुष होती व आहे. त्यासाठी भाजपाचे वाचाळवीर जबाबदार आहेत यातही शंका नाही. पण त्यांच्याविषयी केजरीवाल टोळीला उमाळा येण्याचे कारण काय? त्यांना माणसाचे हाल अत्याचार किवा हिंसेविषयी कळवळा कधीपासून आला? अडीच वर्षापुर्वी लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम आयोगाने जाहिर केला, तेव्हाही केजरीवाल गुजरात दौर्‍यावर होते आणि नाटकेही यथेच्छ चालू होती. आचारसंहिता लागू झाल्याने त्यांच्या मोटारींचा ताफ़ा पोलिसांनी अडवला. तर ही टोळी खवळली. मोदींच्याच आदेशावरून आपल्या गाडीवर पोलिसांनी दगडफ़ेक केली, असा आरोप करून तमाशा सुरू झाला होता. मग त्यांच्या दिल्लीतील गुंडांनी त्यासाठी भाजपाच्या मुख्यालयावर चाल करून प्रचंड दगडफ़ेक केलेली होतॊ. उना येथील गोरक्षकांनी कुणाला मेलेल्या गायीसाठी जबाबदार धरून हाणामारी करणे आणि गुजरातच्या पोलिसी कारवाईसाठी दिल्लीतल्या केजरी टोळीने भाजपाच्या मुख्यालयावर हिंसक हल्ला करणे; यात नेमका कोणता गुणात्मक फ़रक असतो? की केजरीवाल टोळीतले गुंड म्हणजे स्वयंसेवक असतात. कारण त्यांच्या डोक्यावर टोपी असते आणि उनाचे मारेकरी बिनाटोपीचे असतात, म्हणून गुंड ठरतात काय? किती बेशरमपणा असावा? उठसूट केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांवर शाईफ़ेक वा तोंड काळे करणारे हल्ले होत राहिले आणि तपासानंतर आरोपी त्यांचेच सहकारी अनुयायी असल्याचे निष्पन्न होत राहिले. कधी अशा खोटारडेपणासाठी या आपनेत्यांनी क्षमा मागितली होती काय? अशी माणसे कुणाचे सांत्वन करणार म्हणजे काय? पावलापावलावर खोटेपणाशिवाय ज्यांचे पान हलत नाही, त्यांनी राजा हरिश्चंद्राचा अवतार असल्याचा टेंभा किती काळ मिरवावा?

आज केजरीवाल यांना उना गुजरातच्या दलितांचा उमाळा आला आहे. कारण त्यांना त्याचा लाभ भाजपा विरोधात राजकारण खेळण्यासाठी होतो आहे. नशीब अजून त्यांनी उनाच्या दलितांना मोदींच्याच आदेशावरून मारहाण झाल्याचा आरोप केलेला नाही. अन्यथा केजरीवाल यांच्या आयुष्यातल्या तमाम समस्यांना मोदीच जबाबदार असतात. काही वेळा असे वाटते, की या माणसाच्या आईवडीलांचा विवाह हे सुद्धा मोदींचेच कारस्थान असावे. ते यशस्वी झाले म्हणून केजरीवाल यांच्या जन्माची शक्यता निर्माण झाली. तो जन्म झालाच नसता तर केजरीवाल जन्माला आले नसते आणि त्यांना कुठल्या समस्या प्रश्नाने सतावलेही नसते. माणूस किती बेताल बोलू शकतो, याचा अजब नमूना म्हणून केजरीवाल यांचा दाखला देता येईल. सव्वा वर्षापुर्वी जमिन अधिग्रहण कायद्याला विरोध करण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षातर्फ़े जंतरमंतर येथे मेळावा भरवला होता. यांची भाषणे जोरात चालू होती आणि त्यांचाच एक कार्यकर्ता तिथल्या झाडाला गळफ़ास लावून मरण पावला. गळफ़ास आवळला गेल्याने तो लटकून तडफ़डत होता आणि भोवतालच्या गर्दीतला कोणी मायका लाल केजरी समर्थक त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावला नाही. उलट पोलिस धावले त्यांना गजेंद्रपर्यंत पोहोचू देण्यात आले नाही. स्टेजवरून ती तडफ़ड दिसत असतानाही केजरीसह तमाम नेते शांतपणे भाषणे करीत राहिले. अशा हृदयशून्य टोळीस चाळीस पन्नास पावलावरची तडफ़ड दिसत नाही, त्यांना दूर गुजरातच्या उनामधील दलितांच्या वेदना कशा समजू शकतील? पण रडण्याचे, हसण्याचे, खोकण्याचे अथवा मौन उपोषणाचे नाटकच रंगवण्यात ज्यांनी कौशल्य प्राप्त केले आहे, त्यांच्याकडून यापेक्षा अन्य कुठली अपेक्षा बाळगता येऊ शकते? मेलेल्या टाळूवरचे लोणी खाण्याचा बेशरमपणा यापेक्षा वेगळा असतो काय?

तेव्हा जंतरमंतरवर बळी पडलेल्या गजेंद्र सिंग याच्या कुटुंबाला काही लाखाची भरपाई देण्याचे औदार्य केजरीवाल यांनी दाखवले होते. त्यांना त्यांची औकात गजेंद्राच्या भगिनीने दाखवून दिली होती. पैशाने कुटुंबातल्या वेदना दु:खाची भरपाई होते, असे समजणार्‍या केजरीवालना गजेंद्राच्या भगिनीने आव्हान दिले होते. ‘तुम्ही जितके लाख रुपये भरपाई देत आहात, त्याच्या दुप्पट रक्कम तुम्हाला देते, जरा गळफ़ास लावून घ्या.’ अजून ते आव्हान केजरीवाल पेलू शकलेले नाहीत. त्यांना मागल्या पंधरा महिन्यात राजस्थानला गजेंद्रच्या कुटुंबाला भेटायची हिंमत झालेली नाही, की सवड झालेली नाही. कारण त्या व्याकुळ भगिनीला भेटण्याचे साहस केजरीवाल यांच्यापाशी नाही. सच्चाई इतकी भीषण असते आणि पोकळ पुरूषार्थाला अशीच विवस्त्र करीत असते. केजरीवाल खरा प्रामाणिक कार्यकर्ता असता किंवा निष्कलंक नेता असता, तर त्याने राजस्थानला जाऊन गजेंद्राच्या भगिनीचे शिव्याशाप ऐकण्याची हिंमत दाखवली असती. राजघाटावर गांधी स्मारकासमोर काही मिनीटे शांत बसून कोणी गांधीवादी होत नाही की प्रामाणिक होत नाही. मग तो उना येथे जाऊन कुणाचे सांत्वन करू शकणार आहे? आपल्या बेशरमीचे आणखी एक प्रदर्शन, अधिक काहीही नाही. सुवर्ण मंदिरात भांडी घासण्याची नामुष्की त्यातूनच आलेली आहे. कारण तिथे शिखांचा पवित्र स्थानाची अवहेलना झाली, त्याचे प्रायश्चित्त मतातून मोजावे लागण्याचे भय या माणसाला अमृतसरला घेऊन गेले. तो प्रामाणिकपण नव्हता तर मते गमावण्याची अगतिकता त्याचे कारण होती. म्हणून तर तिथे भांडी घासून ओले झालेले हात सुकण्यापुर्वी बेशरमपणे माणूस उना गुजरातला धावला. मोठमोठे मुरब्बी बनेल राजकारणी झक मारले इतके हे नवे गांधीवादी केजरीवाल व त्यांची पिलावळ भामटे आहेत. ज्यांच्यासमोर बेशरमपणाही लाजेने मान खाली घालेल.

Friday, July 22, 2016

आशिष शेलार आगे बढो.....



बारा वर्षापुर्वी वाजपेयी सरकारच्या हातून सत्ता गेली आणि सोनिया गांधींनी गोळा केलेल्या पक्षांची युपीए सत्तेत आली; तेव्हा भाजपाच्या नेत्यांनाही सत्ता कशामुळे गेली त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. अपयश पचवण्यात पुढली पाच वर्षे गेली आणि २००९ सालात दुसर्‍यांदा युपीए सत्तेत आली. तेव्हा भाजपावाले काहीसे शुद्धीवर येऊ लागले. त्याच दरम्यान भारतात प्रसारमाध्यमांचा विस्तार सुरू झाला होता. त्यावर झळकण्याची नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झालेली होती. आपण टिव्हीच्या पडद्यावर दिसतो याचे इतके अप्रुप होते, की प्रत्येकाला लक्ष वेधून घेण्याचा छंद जडू लागला होता. त्यामुळे अकस्मात प्रत्येक पक्षाला प्रवक्ता नावाच्या वस्तुची टंचाई जाणवू लागली. कोणीही उठून पक्षाची भूमिका मांडायला वाहिन्यावर हजेरी लावू लागला आणि नेता होण्यापेक्षा प्रवक्ता होण्याला महत्व येत गेले. त्याच काळात तेव्हाचे भाजपा सर्वेसर्वा लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते, की आमच्या पक्षात आता नेत्यांपेक्षा प्रवक्ते अधिक झाले आहेत. प्रवक्ता म्हणजे काय याचा थांगपत्ता नसलेले कोणीही कॅमेरा समोर उभे राहून वा बोलून पक्षाची प्रतिमा उभी करू लागले होते. हळुहळू तंत्रज्ञान विकसित होते गेले आणि शेकडो वाहिन्या सुरू झाल्या. त्यासाठी राजकीय पक्षांना प्रवक्ते प्रशिक्षित करण्याची वेळ आली. कारण राजकीय धुमकुळ घालणारी चर्चा, हा वाहिन्यांचा प्रमुख कार्यक्रम बनून गेला. अशा चर्चेत प्रतिपक्षाला चितपट करण्याची स्पर्धा आणि त्यात ओरडण्याची कुवत, हे दोन मुख्य गुण आवश्यक ठरू लागले. प्रसिद्धीच्या मागे धावत सुटलेल्या अशा अनेक बोलघेवड्या नेत्यांनी गेल्या दहाबारा वर्षात आपापल्या पक्षाचे किती नुकसान केले, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. कार्यकर्त्याने संघटनेने उभारलेले मनोरे अशा वाचाळवीरांनी नुसती तोंडाची वाफ़ दवडून जमिनदोस्त केल्याचा तो अभ्यास अतिशय उदबोधक ठरू शकेल.

आज अशाच बोलघेवडेपणाने भाजपा व मोदी सरकार गोत्यात सापडले आहे. कोणालाही अपेक्षा नसताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत बहुमत मिळवले आणि सत्ताही संपादन केली. त्यातले कष्ट मोदींनी व्यक्तीश: किती उपसले ते जगासमोर आहे. पण अशा मोहिमेत किरकोळ काम केलेल्या अनेकांना आपणच पक्षाला असे अभूतपुर्व यश मिळवून दिले, अशा भ्रमाने पछाडले आहे. सहाजिकच असे लोक आपल्या पक्षाला अधिक यश मिळवून द्यायला उत्सुक व उतावळे असल्यास नवल नाही. खडसे-शेलारांपासून विविध राज्यातील अशा नेत्यांची भाजपाला गणती करावी लागणार आहे. कारण लोकसभेचा भर ओसरला असून मोदीलाटही संपली आहे. आता लोकांचे बारीक लक्ष सत्ता हाती आल्यावर काय केले, यावर असणार आहे. प्रामुख्याने ज्या उत्तरप्रदेशने ७१ जागा देऊन भाजपासाठी सत्तेचा मार्ग मोकळा केला, तिथे विधानसभाही जिंकणे भाजपा भाग आहे. अन्यथा तो पंतप्रधान मोदींचा व्यक्तीगत पराभव मानला जाणार आहे. अशा वेळी मंत्रिमंडळ व पक्षात उत्तरप्रदेशची जमवाजमव मोदी करत आहेत. त्यासाठीच नवे मंत्री घेण्यात आले आणि प्रदेश भाजपाचीही नवी रचना करण्यात आली. त्यातल्या उपाध्यक्षाला थेट चौकशीविना अल्पावधीत पक्षातूनच बडतर्फ़ करण्याची वेळ आलेली आहे. दयाशंकर सिंग यांनी आपल्याला नेमून दिलेले काम करण्यापेक्षा कुठल्या तरी वाहिनीच्या कॅमेरासमोर आपली अक्कल पाजळली. त्यांनी मायावतींच्या संदर्भात अशी काही मुक्ताफ़ळे उधळली, की भाजपाची उत्तरप्रदेश रणनितीच डबघाईला आली आहे. किंबहूना त्यातून मायवतींच्या बहुजन समाज पक्षाला नवी संजिवनी देण्याचे काम हा भाजपाचा नेता करून गेला आहे. मागल्या लोकसभेतील पराभवानंतर शांतपणे माध्यमांकडे पाठ फ़िरवून काम करणार्‍या मायावती आता एकदम प्रकाशझोतात आल्या आहेत.

लोकसभेत फ़टका बसल्यापासून मायावती प्रसिद्धीपासून अजिबात दूर होत्या. उत्तरप्रदेशात मुलायमसिंगना आव्हान देण्याची कुवत त्यांच्यापाशीच आहे. पण अलिकडेच त्यांच्या पक्षातले दिग्गज नेते व विधानसभेतील पक्षनेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी साथ सोडली होती. मौर्य आरंभापासूनचे बसपाचे नेते आणि त्यांनीच मायावतींवर गंभीर आरोप केलेले होते. कांशीराम यांच्या काळातला दलीत पिडितांचा बहुजन समाजपक्ष मायावतींनी उच्चवर्णियांना विकून टाकला. पैसे देणार्‍याला मायावती पक्षाच्या उमेदवारीचे तिकीट विकतात; असा मौर्य यांचा आरोप होता. त्यामुळे मायावती यांची खुप तारांबळ उडालेली होती. या एका व्यक्तीच्या पक्ष सोडण्याने मायावती इतक्या विचलीत झाल्या, की तिनदा पत्रकार परिषद घेऊन त्यांना आपली बाजू मांडावी लागली होती. त्यांचा हक्काचा दलित मतदार स्वामीप्रसाद मौर्य यांच्या आरोपाने विचलीत झालेला होता. सहाजिकच त्यातून बाहेर पडणे मायावतींना अवघड झालेले होते. थोडक्यात विधानसभा मतदानात पहिल्या दोन स्पर्धकापैकी एक असलेल्या मायावतींना त्यांच्याच जुन्या सहकार्‍याने घायाळ केलेले होते. म्हणूनच तिथल्या स्पर्धेत पुढे मुसंडी मारण्याची राजकीय स्थिती भाजपाला पोषक झालेली होती. त्यावरच डोळा ठेवून भाजपाने प्रदेश पक्षाचा अध्यक्ष म्हणून मौर्य नामक दलित नेत्याची नेमणूकही केलेली होती. दलित मतदार आपल्याकडे ओढण्याचा व आपणही दलितांचे कैवारी आहोत, असे भासवण्याचा डाव भाजपा खेळत होता. पण दयाशंकर नावाच्या त्यांच्याच उतावळ्या उपाध्यक्षाने अशी काही मुक्ताफ़ळे उधळली, की संसदेत भाजपाला दलितविरोधी ठरवण्याचे कोलित विरोधकांच्या हाती दिले. बसपातील बंडातून सावरण्यासाठी मायावतींना संधी हवी होती. भाजपाच्या वाचाळवीर नेत्याने त्यांना मुसंडी मारून पुढे येण्याची लॉटरीच त्यांना बहाल केली. या एका घटनेने विस्कळीत हताश मायावतींना संजीवनी मिळाली.

सव्वा दोन वर्षापुर्वी भाजपाने सत्ता मिळवली किंवा लोकसभेची मोहिम राबवली, तेव्हा पक्षाचा एकच आवाज होता. पक्षाचा एकच नेता होता. त्याचे नाव नरेंद्र मोदी. आज भाजपामध्ये प्रत्येकजण नेता प्रवक्ता आणि रणनितीकार झाला आहे. मग तो मुंबईचा पक्षाध्यक्ष असो किंवा उत्तरप्रदेश भाजपाचा उपाध्यक्ष असो. अलिकडेच मोदींनी वाचाळ सुब्रमण्यम स्वामींना लगाम लावलेला होता. पण पक्षाच्या प्रत्येक पायरीवर लहानमोठे स्वामी बुडवेगिरीसाठी दबा धरून बसलेत, याची सुतराम कल्पना मोदींना अजून आलेली नाही. त्याचे कारण सोपे आहे. हे यश मोदी किंवा भाजपाचे नाही, तर आपल्या गल्लीत आपण शेर आहोत, म्हणून मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकल्याची ठार समजूत त्याचे कारण आहे. खरे तर मायावतींचे दिर्घकालीन सहकारी स्वामीप्रसाद मौर्य यांनी पैसे घेऊन तिकीट विकण्याचा तोच आरोप केलेला होता. त्याविषयी भाजपा नेत्याने अक्कल पाजळण्याचे काहीही कारण नव्हते. त्यामुळे चार मते भाजपाच्या पारड्यात वाढणार नव्हती. पण अक्कल नसली, मग तीच अक्कल पाजळण्याची अधिक सुरसुरी येत असते आणि आजकाल भाजपामध्ये अशा शूरवीरांची रेलचेल झालेली आहे. तशाच एकाने उत्तरप्रदेशातील भाजपाच्या रणनितीचा असा पुरता बोर्‍या वाजवून दिला आहे. जुन्या सहकार्‍याच्या आरोपाने गोत्यात सापडलेल्या मायावतींची या भाजपा वाचाळवीराने मुक्तता केलीच. पण त्यानिमीत्ताने राज्यात विखुरलेल्या मायावतींच्या पाठीराख्यांना शक्तीप्रदर्शन करण्याची अपुर्व संधी मिळवून दिली. आठ महिन्यांनी व्हायच्या मतदानात मायावतींचे पारडे यातून किती जड झाले, त्याची प्रचिती मुलायम यांच्या मौनव्रताने येऊ शकते. इतर पक्षातले बिभीषण शोधणार्‍यांनी आता किमान आपल्यातच बोकाळलेल्या भीषणांची मोजदाद केली, तरी खुप झाले. आशिष शेलार आगे बढो, दयाशंकर तुम्हारे साथ है!

इमान की नियत ठिक नही



पश्चीम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. त्यासाठी अन्य काही राज्यांचे मुख्यमंत्री अगत्याने हजर होते आणि त्यांना ममता बानर्जींनी अगत्याने आमंत्रित केले होते. त्यात दिल्लीचे अरविंद केजरीवाल हजर होते. तसेच ते बिहारच्या नितीशकुमार यांच्याही शपथविधीला उपस्थित होते. तिथे त्यांना लालूप्रसादांनी आलिंगन दिल्यावरून काही काळ वादंग माजले होते. जगातल्या संपुर्ण पावित्र्याचा मक्ता आपल्याकडेच असल्याचा सतत दावा करणार्‍या केजरीवालांनी लालूंना आलिंगन दिले, तर गाजावाजा व्हायचाच. कारण केजरीवालांचा भारतीय राजकीय क्षितीजावरचा उदय भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आंदोलनातून झाला आणि त्याच काळात देशातील सर्वात भ्रष्ट मानल्या गेलेल्या लालूंना कोर्टाकडून भ्रष्टाचारासाठी शिक्षा होऊन त्यांची खासदारकी रद्दबातल झालेली होती. अशा दोन टोकाच्या भिन्न वर्तुळातील व्यक्तींनी परस्परांना आलिंगन दिल्यास गदारोळ न झाला असता तरच नवल. पण केजरीवाल यांचे हे बदलणारे रंग नवे नाहीत. ममताविषयी त्यांचे प्रेम नवे नाही. आरंभीच्या काळात त्यांनी ममतांना आपल्या बालेकिल्ल्यात हिसका दाखवला होता. तेव्हा औट घटकेसाठी केजरीवाल कॉग्रेसच्या पाठींब्याने मुख्यमंत्री झाले होते आणि तेव्हाच अण्णा हजारे दिल्लीला गेलेले होते. तिथे त्यांची भेट ममता बानर्जी यांच्याशी झाली. दोघांनी रामलिला मैदानावर सभा घेण्याच घोषित केले. पण गर्दी जमली नाही, म्हणून अण्णा तिकडे फ़िरकले नाहीत आणि गर्दी जमू नये याची काळजी अण्णांचे भक्त केजरीवाल यांनी घेतलेली होती. शेवटी अण्णा नसतानाही ममतांनी ओसाड मैदानावर सभा साजरी केली होती. अशी ममता केजरीवाल यांची कहाणी आहे. पण दरम्यान एक मोठा फ़रक पडला आहे. केजरीवाल यांच्या डोक्यावरची टोपी गायब झाली आहे.

केजरीवाल हा माणूस किती व कसे रंग बदलतो, त्याची ही कहाणी आहे. त्यांच्या उपोषणाची सांगता करायला कधीकाळी विविध पक्षाचे नेते व्यासपीठावर आलेले होते. त्यात शरद यादव या नितीशच्या सहकार्‍याचा सहभाग होता. त्यांच्या दाढीचा उल्लेख करून केजरीवाल यांचे सहकारी शिसोदियांनी ‘चोर के दाढीमे तिनका’ अशी मल्लीनाथी केलेली होती. त्याच चोराला पाठींबा द्यायला पुढे केजरीवाल बिहार विधानसभेच्या प्रचाराला गेले होते. ज्या कॉग्रेस विरोधात भ्रष्टाचाराचा आवाज उठवला त्याच कॉग्रेसचा नितीशच्या आघाडीत समावेश असूनही केजरीवाल यांना फ़रक पडला नाही. कॉग्रेसच्या पाठींब्याने सरकार बनवावे किंवा नाही म्हणून प्रत्येक वॉर्डात सभा घेऊन जनमताच अकौल घेणारे केजरीवाल, तेव्हा बंगला-गाडी नको म्हणत होते. पण मुख्यमंत्री होताच घेतलेला बंगला व गाडी त्यांनी सत्ता गमावल्यानंतर अनेक महिने सोडलेली नव्हती. त्याचे प्रचंड भाडे कोणी कशासाठी भरले, त्याचा खुलासा कोणी कधी दिला नाही. बाकी प्रत्येकाकडे पुरावे आणि हिशोब मागणार्‍या केजरीवाल यांनी कधी आपल्या अशा खाजगी खर्च व वर्तनाचे पुरावे कोणाला दिले नाहीत. सरडा परिस्थितीनुसार रंग बदलतो म्हणतात. केजरीवालही प्रसंगानुसार गरजेनुसार धोरणे रंग बदलत असतात. अशा केजरीवाल यांची ओळख म्हणजे अण्णांची टोपी होय. लोकपाल आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्याच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी धुर्तपणे अण्णांच्या टोपीचा वापर केला होता. जमणार्‍या गर्दीला अण्णांची पांढरी गांधीटोपी घालायला त्यांनी भाग पाडले आणि त्यावर ‘मै अण्णा हू, मुझे चाहिये लोकपाल’ अशा घोषणा लिहून प्रचाराची धमाल उडवली होती. जणू ती टोपी म्हणजे लोकपाल आंदोलनाचे प्रतिक होऊन गेले आणि अण्णांशी फ़ारकत घेऊन केजरीवाल यांनी राजकीय चिखलात उडी घेतली, तरी टोपी मात्र सोडली नाही.

अण्णांशी फ़ारकत घेऊन केजरीवालांनी राजकारण सुरू केले, तेव्हा नव्या पक्षाला आम आदमी पक्ष असे नाव दिले. त्याच्या प्रचारासाठी ‘मै हू आम आदमी’ अशी घोषणा असलेल्या टोप्या घातलेले लोक रस्तोरस्ती फ़िरू लागले. खुद्द केजरीवाल व त्यांचा प्रत्येक सहकारी अगत्याने ती टोपी घालून वाहिन्यांवर मिरवत होते. गबाळग्रंथी दिसणारी ती टोपी एक प्रतिक होते. आपण अण्णांच्या वतीने व लोकपाल आंदोलनाच्या वतीने राजकारणात प्रतिनिधीत्व करतो, असा आभास त्यातून निर्माण करण्यात आला होता आणि त्याचा मोबदला पुरेपुर मिळवण्यात आला. दिल्लीत वा अन्यत्र केजरीवाल व त्यांच्या पक्षाला मिळालेला प्रतिसाद त्याचीच किंमत होती. मात्र जसजसे त्यात यश मिळाले, तसतसे टोपीचे महत्व कमी करून केजरीवाल यांची महत्ता उभी करण्याचा प्रयोग सुरू झाला. दिल्ली सरकारचे पैसे वापरूनही केजरीवाल आपलीच जाहिरात करू लागले. त्यात न्यायालयाला हस्तक्षेप करण्यापर्यंत त्याचा अतिरेक झाला होता. अखेर कोर्टानेच लगाम लावल्यावर पाठमोरी केजरीवालांचॊ प्रतिमा दाखवून टोपीला जोडून मफ़लरही प्रतिकात साहभागी करण्यात आला. मध्यावधी विधानसभा निवडणूकीत तर ‘पाच साल केजरीवाल’ असे व्यक्तीमहात्म्य तयार करण्यात आले. आता केजरीवाल हेच एक प्रतिक होऊन गेले आहे. सहाजिकच त्यांना अण्णांची टोपी किंवा मफ़लर अशा प्रतिकाची गरज उरलेली नाही. आपण आम आदमी असल्याचेही सांगण्याची गरज उरलेली नाही. राजकारणात सगळे सारखे असतात, तसे आपणही खास आदमी झाल्याचे कृतीतून मान्य करण्याची वेळ आली आहे. म्हणून मध्यंतरी केव्हा केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी त्या अण्णाटोपीला तलाक दिला, कोणाच्या लक्षात आलेले नाही. आजकाल केजरीवाल कशाला; कुठलाच आम आदमी पक्षाचा नेता कार्यकर्ता ती टोपी परिधान करून कुठे वावरताना दिसत नाही.

राजकारणात दिर्घकाळ वावरलेल्या लोकांनाही आपले पक्ष, प्रतिमा किंवा रंग बदलण्यास वेळ लागतो. केजरीवाल अतिशय वेगाने आपले रंग व भूमिका बदलत असतात. सोयीचे असलेले सहकारी, प्रतिमा किंवा मान्यवर क्षणात कचर्‍यात फ़ेकून देण्याची केजरीवाल यांची कुवत वाखाणण्यासारखी आहे. आधी त्यांनी सहजगत्या अण्णांनाच आपल्या वाटेतून बाजूला केले. अण्णा राजकारणाला विरोध करणार हे ठाऊक असल्याने, केजरीवाल बाजूला होऊन त्यांनी राजकीय पक्ष काढला. तेव्हा राजकारणासाठी आपली प्रतिमा फ़ोटो वापरू नयेत अशी अट अण्णांनी घातली होती. पण अण्णांचा वापर कसा करायचा, ते केजरीवाल यांनी आधीच ठरवून टाकले होते. अण्णांचा फ़ोटो दुय्यम करणारी प्रतिमा म्हणजे अण्णांची टोपी होती. ती कधीच वेगळी काढून केजरीवाल यांनी आपल्या ओलीस ठेवलेली होती. अण्णांचा चेहरा कोणाला हवा होता? ती टोपी पुरेशी होती आणि म्हणून सरसकट टोपीचा वापर पक्षासाठी करून आपली ओळख निर्माण करण्यात केजरीवाल यशस्वी झाले. ते शक्य झाल्यावर त्यांनी अण्णांना बाजूला केले. त्यांच्याप्रमाणेच किरण बेदी आदिंना खड्यासारखे बाजूला केले. ज्यांना तसे बाजूला करणे शक्य नव्हते, त्या प्रशांत भूषण वा योगेंद्र यादव इत्यादिंना गुंड अंगावर घालून बाजूला करण्यात आले. शेवटी राहिली होती अण्णांची टोपी, म्हणजे लोकपाल आंदोलनाचे शेवटचे प्रतिक! आता केजरीवाल मुरब्बी राजकारणी झाले आहेत. या बोटावरची थूंकी त्या बोटावर करण्यात वाकबगार होऊन गेले आहेत. त्यांना आत टोपीचॊ गरज उरलेली नाही. कदाचित म्हणून असेल, त्यांनाही टोपीचा पुरता विसर पडला आहे. हल्ली केजरीवाल टोपी घालत नाहीत की त्यांच्या पक्षाचा कोणी ती आम आदमीची टोपी घालत नाही. लोकांना टोपी घालून झाल्यावर तिचा उपयोग तरी काय राहिला? एक जुने गाणे आठवते,

निकला न करो तुम सजधज कर
इमान की नियत ठिक नही
इस रंग बदलती दुनियामे

Wednesday, July 20, 2016

सिद्धूशैली, ठोको ताली



क्रिकेटमुळे नावारूपाला आलेला आणि आपल्या विनोदी शैलीच्या समालोचनाने कलाकार म्हणून प्रसिद्धी पावलेला नवज्योतसिंग सिद्धू भाजपामुळे राजकारणात आला. बारा वर्षानंतर आता त्याने भाजपाला रामराम ठोकला आहे आणि त्यामुळे तसा राजकारणात वादग्रस्त नसलेला हा माणूस गाजतो आहे. त्यातही मजेची गोष्ट अशी, की सिद्धू नेहमी त्याच्या चटकदार बोलणे वा विधानाने गाजत असतो. पण यावेळी बहुधा प्रथमच चमत्कार घडला आहे. सिद्धू गाजतोय त्याच्या अबोल्याने वा मौनव्रत धारण केल्याने. सोमवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि त्याच दिवशी सभागृहाचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, यांच्याकडे सदस्यत्वाचा राजिनामा देऊन सिद्धू अज्ञातवासात निघून गेला आहे. त्याच्या पत्नीलाही पत्रकारांनी खोदून खोदून विचारले. पण हे गृहस्थ कुठे आहेत, त्याचा पत्रकारांना थांगपत्ता लागू शकलेला नाही. सहाजिकच पहिल्या दिवसापासून सिद्धूच्या भवितव्याविषयी तमाम लोक चिंतेत किंवा उत्सुक आहेत. कारण त्याने राज्यसभा सदस्यत्वाबरोबरच पक्षाचाही राजिनामा दिल्याचे वृत्त होते. त्याच्यासहीत त्याच्या पत्नीनेही पंजाब विधानसभेतील आमदारकीचा राजिनामा देऊन भाजपा सोडल्याचे वृत होते. पण ब्रेकिंग न्युज नेहमीच खरी नसते. म्हणून असेल, मंगळवारी सिद्धूच्या पत्नीने आपण आमदारकी वा पक्ष सोडला नसल्याचा खुलासा केला. सिद्धूने आम आदमी पक्षात प्रवेश केल्याची व तोच आपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होणार असल्याचीही ब्रेकिंग न्युज होती. त्यामुळे हुरळलेल्या आपनेत्यांनीही त्याचे स्वागत करून टाकले. मात्र मंगळवार उजाडण्यापर्यंत धुरळा बसत गेला. आपल्या अस्सल स्वभावानुसार त्याने इथेही प्रेक्षक सहकार्‍यांना चकवा दिला. त्याच्याच शब्दात नेमके सांगायचे तर ‘अरे, रुको रुको रुको; अब ठोको ताली’ अशी अवस्था माध्यमांची होऊन गेली.

सिद्धू त्याच्या क्रिकेटमुळे नाही इतका टिव्हीच्या कार्यक्रमांनी गाजला व गाजतो आहे. त्याच्या खास शैलीला सिद्धूवाद असेही संबोधले जाते. कुठलीतरी शेरोशायरी वा तात्विक विधान करून सिद्धू टाळ्या मिळवतो. क्रिकेटमध्ये समालोचनातला त्याचा हा गुण ओळखून त्याला विनोदी प्रहसनांच्या कार्यक्रमात ओढले गेले. त्याच्याच खास किस्से शेरोसायरीसह त्याच्या हास्याच्या गडगडाटासाठी तो ख्यातनाम झाला. असा सिद्धू भाजपाने २००४ सालात अमृतसरच्या लोकसभा जागेसाठी उमेदवार म्हणून पुढे आणला आणि दोनदा जिंकून त्याने आपली कुवत सिद्ध केली. शिवाय टिव्हीस्टार असल्याने अन्यत्रही त्याला लोकप्रिय वक्ता म्हणून भाजपाने प्रचारसभात वापरले. आताही त्याच्या अनेक जुन्या भाषणांची चित्रणे काढून त्याने केजरिवाल यांची उडवलेली भंबेरी सोशल मीडियातून फ़िरते आहे. पण भाजपात रमलेल्या सिद्धूला पंजाबमध्ये अकाली दलाशी जुळवून घेता आले नाही. परिणामी २०१४ मध्ये त्याच्या उमेदवारीला अकाली दलाने विरोध केला आणि सिद्धू तेव्हापासून नाराज होता. कारण त्याला बाजूला करून भाजपाने अमृतसर येथून अरूण जेटलींना उभे केले आणि पराभव ओढवून घेतला. पराभव स्पष्ट असतानाही भाजपाने लोकसभेत अकाली दलाचा पाठींबा हवा, म्हणूनच सिद्धूला दुखावले होते. तरीही सिद्धू शांत राहिला. त्याने अन्य कुठून उभे रहाण्यास नकार दिला होता. म्हणून त्याला राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत आणले गेले. दोनच महिन्यांपुर्वी त्याची ही नियुक्ती झालेली होती. तेव्हाही तो त्याला नकार देऊ शकत होता. पण त्याने सदस्यत्व घेतले. याचा अर्थ त्याला पक्षात रहायचे होते. मात्र नंतर काही घटना अशा घडलेल्या असाव्यात, की त्याला खासदारकी पुरेशी वाटेना आणि त्याने भाजपाला रामराम ठोकण्याचा पवित्रा घेतला. मात्र त्याचा पुरता राजकीय लाभ उठवण्याची त्याची मनिषा असावी.

आज अकाली दल पंजाबमध्य आपली सर्व कुवत गमावून बसली आहे. त्याचे प्रत्यंतर गेल्या लोकसभेतच आलेले आहे. कॉग्रेसला जोर आला आहे आणि नगण्य नवखा असलेल्या आम आदमी पक्षाचे सर्व चार खासदार निवडून आले ते पंजाबमधून! याचे कारण ते आपचे कोणी झुंजार नेते वा कार्यकर्ते नव्हते. पंजाबमध्ये मागल्या दहा्पंधरा वर्षात जो नशेचा विळखा घट्ट होत गेला आहे, त्यामुळे राजकीय पक्षांविषयी नाराजी आहे. त्याच नशेबाजी विरुद्ध जे सेवाभावी कार्यकर्ते व संस्था कार्यरत आहेत, त्यांचेच म्होरके आपतर्फ़े लोकसभेला उभे होते आणि जिंकले. ती केजरीवालची वा लोकपालची किमया नव्हती. त्यापासूनही अकाली धडा घेऊ शकले नाहीत व विधानसभा दार ठोठावत असताना आपचे पारडे जड झालेले आहे. मात्र त्या राज्यात शीखधर्मिय असा कोणी चेहरा ‘आप’पाशी नाही. केजरीवाल त्यासाठी अनेकदा फ़ेटे बांधून मिरवूनही आले आहेत. पण त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारले जाणे अशक्य आहे. दुसरा कोणी राज्यव्यापी चेहरा नाही. अशा स्थितीत नाराज सिद्धू आपचा उमेदवार होऊ शकतो. हे ताडल्यावर ‘सिद्धूपाजी’ भाजपाला विटले असतील, तर त्यांची कृती गैरलागू म्हणता येणार नाही. आपल्याला पंजाबसाठी काही करायचे आहे. पण त्यासाठी भाजपात वाव नाही. भाजपा स्वबळावर पंजाबमध्ये लढायला तयार नाही, अशी तक्रार करून त्यांनी पक्ष सोडला आहे. त्यांच्या पत्नीवर विश्वास ठेवायचा तर स्वबळावर पंजाब लढण्याचे व अकालींशी आघाडी तोडण्याचे आश्वासन सिद्धूला भाजपा नेतृत्वाने दिले होते. ते पाळले गेले नाही, म्हणून त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. त्यात तथ्य असेल, तर सिद्धूला मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेले आहेत. ते भाजपा अकाली दलाशी आघाडीत राहुन शक्य नव्हते. मग पक्षात राहुन उपयोग काय? त्यापेक्षा आपमध्ये जाऊन किस्मत आजमावणे अपरिहार्य नव्हते काय?

पण अजून तरी सिद्धूनी आपमध्ये प्रवेश केल्याची बातमी खरी ठरलेली नाही. केजरीवालसह अनेकजण त्यांच्या स्वागताला हारतुरे घेऊन सज्ज आहेत. इतक्यात कॉग्रेसचे अमरिंदर सिंग यांनी सिद्धूचे स्वागत करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता सिद्धूला अनेक ऑप्शन खुले आहेत. थोडक्यात मुख्यमंत्री कोण करणार किंवा तसे गाजर कोण दाखवणार, त्याच्या प्रतिक्षेत हा नेता दडी मारून बसला आहे. पण त्याच निमीत्ताने भारतीय राजकारणाची अगतिकताही समोर आलेली आहे.  कुठल्याही पक्षातून फ़ेकलेला किंवा पक्ष सोडणारा नेता, इतर पक्षात किती पवित्र असतो ना? प्रामुख्याने निवडणुक काळात तर अशा त्यक्त वा मुक्त नेत्यांचा बाजार खुप तेजीत चालतो. बुधवारी लोकसभेत दलित विषयावर बोलताना विरोधी नेते मल्लिकार्जुन खर्गे नेमके बोलले. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी कॉग्रेस युपीए कालखंडात दलितांवर किती अत्याचार झाले, त्याची यादीच वाचून दाखवली होती. त्यावर प्रतिक्रीया देताना खर्गे म्हणाले, जी आकडेवारी गृहमंत्र्यांनी सादर केली, त्या कालखंडात आजच्या सत्ताधारी पक्षातील ऐशी टक्के सदस्य कॉग्रेस व युपीएमध्येच होते. हे आजचे राजकारण आहे. कॉग्रेस काळात अत्याचाराचे समर्थन करणारे भाजपा काळातही सत्तेतच असतात. मग कालपर्यंत केजरीवालच्या खोकल्याची टवाळी करणारे सिद्धू आता आम आदमी पक्षाचे उमेदवार झाले तर वावगे काय? त्यालाच तर आपल्या देशात राजकारण म्हणतात. सगळाच कॉमेडी शो झालेला असेल तर त्याच्यावर सिद्धू खळाळून हसण्यात गैर काय? या देशात गंगाजल शिंपडून पापही पुण्य बनवता येते अशी ख्याती आहे ना? मतभेद असतात गंगा कोणाला म्हणावे आणि कुठले पाणी गंगाजल समजावे इतकाच! बघू सिद्धूचे शुद्धीकरण करणारी गंगा कुठली आणि ते गंगाजल कुणाच्या हातातून शिंपडले जाते.

नवे जागतिक समिकरण



अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूका व्हायच्या आहेत. त्यातली स्पर्धा आता स्पष्ट झाली आहे. जग अतिशय वेगाने बदलते आहे आणि त्याचा अंदाज अभ्यासक विश्लेषक म्हणवणार्‍यांना येईनासा झाला आहे. तसे नसते तर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होऊ शकले नसते आणि आज दोन वर्षात त्यांनी जागतिक राजकारणावर आपला ठसा उमटवला नसता. विश्लेषक तर त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या पलिकडे मोजायलाच तयार नव्हते. पण आज त्याच नेत्याने जागतिक व्यासपीठावर आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. किंबहूना नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर प्रथमच भारताच्या राष्ट्रीय नेत्याला जागतिक मान्यता मिळते आहे. हा मोदींचा जितका गौरव आहे, त्यापेक्षा अधिक तो विश्लेषक अभ्यासकांचा पराभव आहे. अशी पुस्तकी माणसे वास्तवापासुन किती भरकटली आहेत, त्याचाच तो पुरावा आहे. अर्थात ही बाब भारतापुरती मर्यादित नाही. त्याची प्रचिती आता अमेरिकन निवडणूकीतही येत आहे. जॉर्ज बुश यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाला कोणी दांडगा उमेदवार मिळाला नव्हता आणि राष्ट्रीय नेतृत्वाची लढत डेमॉक्रेटीक पक्षातच मर्यादित होऊन गेली होती. तिथे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांची महत्वाकांक्षी पत्नी हिलरी क्लिंटन त्यासाठी आधीपासून तयारीला लागल्या होत्या. बुश यांच्या निवृत्तीपुर्वीच त्यांनी अध्यक्षीय आखाड्यात उडी घेतली होती. तेव्हा बराक ओबामा तिथे आव्हान म्हणून उभे रहातील अशी अपेक्षाही त्यांनी केली नव्हती. मग त्यांच्यातल्याच लढतीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि रिपब्लिकन पक्षाला तितका दमदार नेताच मिळाला नव्हता. आताही आठ वर्षांनी हिलरी पुन्हा आखाड्यात उतरल्या, तेव्हा त्याच निर्विवाद जिंकणार अशीच समजूत होती. कारण यावेळी त्यांना पक्षांतर्गत कोणी प्रतिस्पर्धी नव्हता आणि रिपब्लिकन पक्षातही कोणी खास दिसत नव्हता. पण या समजूतीला डोनाल्ड ट्रंप नावाच्या अनपेक्षित व्यक्तीने धक्का दिला.

डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेतले एक ख्यातनाम उद्योगपती आहे आणि आपल्या चमत्कारीक वागण्याचे प्रसिद्धी पावलेले आहेत. म्हणूनच मग त्यांना पक्षातच फ़ारसा पाठींबा मिळणार नाही, अशी सार्वत्रिक अपेक्षा होती. किंबहूना इथे मोदींची टवाळी चालू होती, तशीच पहिल्या दिवसापासून ट्रंप यांची अमेरिकन बुद्धीवादी वर्गात ट्रंपची टवाळी चालू झाली होती. कोणी त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीचीही खास दखल घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. पण प्राथमिक प्रचार व भूमिका मांडल्या जाऊ लागल्या आणि क्रमाक्रमाने आपल्या आक्रमक पवित्र्याने ट्रंप जनमानस फ़िरवू लागले. थोड्याच दिवसात त्यांनाच रिपब्लिकन उमे़दवारी मिळणार असे स्पष्ट होऊ लागल्यावर विश्लेषकांचे धाबे दणाणले आणि काहीही करून हिलरीच उमेदवार म्हणून समोर याव्यात, अशी चर्चा सुरू झाली. हिलरीही ट्रंप यांना लक्ष्य करू लागल्या, तर राष्ट्राध्यक्ष असूनही ओबामाही ट्रंप यांच्यावर ताशेरे झाडू लागले. मजेची गोष्ट म्हणजे ट्रंप यांना त्यांच्याच पक्षातून पुरेसा पाठींबा मिळत नव्हता. शक्यतो त्यांना संधी मिळू नये, असेही प्रयास त्यांच्याच पक्षात सुरू झाले होते. कारण ट्रंप हा प्रस्थापित व प्रचलीत राजकारणातला अपवाद आहे. त्याला पोलीटीकली करेक्ट बोलता वागता येत नाही. याचा साध्या मराठीतला अर्थ असा, की शहाणे म्हणून जे काही मुठभर लोक समाजावर भावनिक वैचारिक हुकूमत गाजवत असतात, त्यांच्यासमोर आपल्या विचारांना गुंडाळण्याची तयारी असावी लागते. त्याला पोलीटीकल करेक्टनेस म्हणतात. मोदी किंवा पुतीन यांच्याप्रमाणेच डोनाल्ड ट्रंप यांच्यापाशी ती गोष्ट नाही. अशा बुद्धीवादी पुस्तकी आगावूपणाला झुगारण्याची हिंमत त्या नेत्यामध्ये आहे. त्यामुळेच शहाण्यांनाच नव्हेतर सामान्य माणसालाही नावडते बोलण्याची कुवत त्याच्यापाशी आहे. आज तीच त्याच्यासाठी शक्ती व ताकद बनली आहे.

अवघ्या जगाला आज इस्लामी जिहाद किंवा दहशतवाद भेडसावतो आहे. त्याचा थेट इस्लाम धर्माशी संबंध आहे. पण तरीही तसे धर्माचे नाव दहशतवादाशी जोडण्यावर वैचारिक निर्बंध घातलेले आहेत. बुश असोत की ओबामा, यापैकी प्रत्येकाने मध्यपूर्वेत मुस्लिम देशातील जिहाद विरोधात हत्यार उपसले, पण इस्लाम धर्माच्याच नावाने हा हिंसाचार माजवला जात असल्याचे बोलायची त्यांना कधी हिंमत झाली नाही. आजही तसे बोलणे पुरोगामी मानले जात नाही. तुमच्यावर तात्काळ प्रतिगामीत्वाचा शिक्का मारला जातो. हे गुढ सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. मग तो सामान्य नागरिक भारतातला असो किंवा युरोप अमेरिकेतला असो. कालपरवा अमेरिकेच्या फ़्लोरीडा राज्यात ऑरलॅन्डो नामक शहरामध्ये एका नाईटक्लबमध्ये पन्नास माणसे एका जिहादीने किडामुंगीसारखी मारली. त्याहून अधिक जखमी केली. पण मुस्लिम असूनही व त्याने धर्माच्याच नावाने हा उद्योग केला असूनही, त्यात धर्माचा संबंध नाही असेच बोलण्याची स्पर्धा चालू होती. ट्रंप यांनी त्या दांडगाईला शरण जाण्यास नकार दिलेला आहे. त्यांनी या विषयावर बोलताना खुलेआम इस्लामिक अतिरेक व जहालवादाने जगाला वेढले असल्याची भाषा वापरली आहे. तिथेच न थांबता पुरोगामी किंवा सेक्युलर म्हणवणारे लोक सामान्य नागरिकाला जिहादी मारेकर्‍यांच्या तोंडी देत असल्याचा गंभीर आरोप ट्रंप यांनी केला आहे. हिलरींनी हत्यार बाळगण्याचा अमेरिकन नागरिकांचा अधिकार काढून घेण्याची भूमिका मांडली आहे. पण त्याचवेळी मध्यपुर्व किंवा मुस्लिम देशातून येणार्‍या आश्रित निर्वासितांना अमेरिकेत मोकाट प्रवेश देण्याचीही मागणी केली आहे. त्याचा अर्थ तिथून आश्रित म्हणून येऊन आपल्या धर्मांधतेसाठी निरपराध अमेरिकनांची कत्तल करण्याची हिलरीची योजना आहे, असाही गंभीर आरोप ट्रंप यांनी केला आहे. तो अर्थातच त्यांना अधिक लोकप्रिय करीत आहे.

जे सत्य जागतिक नेते वैचारीक शहाणपणा म्हणून बोलायला कचरतात, किंवा कायद्याच्या जोखडामुळे बोलत नाहीत, ते ट्रंप खुलेआम बोलत आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतीनही त्यावर आपले मत बेधडक मांडत असतात. मोदींवर तर यापुर्वीच जगातल्या अशा पुरोगामी मंडळींनी मुस्लिमांचे शत्रू असा आरोप केलेला आहे. अशा स्थितीत ट्रंप यांचा विजय जगाचा चेहरामोहरा बदलू शकेल. कारण मोदी सतत दहशतवादाचे नाक दाबा म्हणत असतात. पुतीन यांनी अमेरिकेने मध्यपूर्वेत माजवलेल्या सिरीया इराकच्या जिहादी मानसिकतेला हवाई हल्ले करून चोख उत्तर दिले आहे. आता ट्रंप तीच भूमिका घेऊन अमेरिकेचे अध्यक्ष व्हायला निघालेले आहेत. रिपब्लिकन नव्हेतर अमेरिकन मतदारालाही असा नेता भुरळ घालतो आहे. त्यामुळे तो जिंकला, तर जगभरची जिहाद दहशतवाद याविषयीची भूमिका एकदम बदलून जाऊ शकणार आहे. युरोप डबघाईला आलेला असून नाटोची अमेरिकन जबाबदारी सोडून देण्य़ाची ट्रंप यांची भाषा जग बदलू शकेल. रशियाशी बिघडलेले संबंध सुधारून नवी सुरूवात करण्याचा मनोदय ट्रंप यांनी व्यक्त केला आहे आणि त्याला पुतीनही प्रतिसाद देण्याची भाषा बोलत आहेत. असे तीन नेते एकत्र येऊन एकाच भूमिकेने काम करायला लागले, तर जागतिक समिकरण बदलून जाऊ शकते. यापैकी पुतीन व मोदी आधीच सत्तेत बसलेले आहेत आणि त्यांच्यामागे राष्ट्रीय ताकद उभी आहे. अमेरिकेसारखी महाशक्ती त्यात सहभागी झाली, तर जिहाद किंवा इस्लामी दहशतवादाची मोठीच कोंडी होऊन जाईल. कारण आज जिहादचा मोठा आश्रयदाता पुरोगामी विचारवंत असून, अमेरिकेसारखी महाशक्ती त्यामागची खरी ताकद आहे. तीच ट्रंप यांनी काढून घेतली, तर पुरोगामी सेक्युलर थोतांडाच्या आडोशाने धुमाकुळ घालणारा इस्लामिक जिहाद ढासळत जाऊ शकतो. यातला हुकूमाचा पत्ता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असेल. थोडक्यात डोनाल्ड हे त्यातले ‘ट्रंप’कार्ड ठरणार आहे.

Tuesday, July 19, 2016

गांधीहत्या आणि राहुल



कालच अरुणाचल प्रदेशच्या सुप्रिम कोर्ट निकालावर राहुल गांधींच्या प्रतिक्रीयेचा समाचार घेतला होता. ज्या माणसाला शिकायची इच्छा नाही, त्याने धडा किंवा शिकवण्याविषयी बोलावे, यासारखा विनोद नाही. मोदींना सुप्रिम कोर्टाने धडा शिकवला. लोकशाही शिकवली, अशी मुक्ताफ़ळे राहुलनी उधळली होती. पण त्यातला खरा धडा त्यांच्यासह त्यांच्याच मातोश्रींसाठी होता, हे त्यांच्या भक्तांच्याही लक्षात आलेले नाही. किंबहूना त्यामुळेच कॉग्रेस अशा दुर्दशेला पोहोचली आहे. पण दुर्दशेलाच प्रगती समजून चालणार्‍यांना कोण शिकवणार? राहुलचे ते शब्द हवेत विरून गेले नाहीत, इतक्यात सुप्रिम कोर्टानेच त्यांचे कान उपटले आहेत. गांधींचे मारेकरी असा एक सरसकट आरोप रा. स्व. संघावर होत असतो. खरे तर खुप आधीपासूनच कोणी तरी त्याला आव्हान देण्याची गरज होती. पण राजकारणात लुडबुडायचे आणि जेव्हा तसे आव्हान उभे राहिले, मग त्याकडे पाठ फ़िरवून सेवाभावात गुरफ़टून जायचे, असा पलायनवाद संघाने नेहमीच पत्करलेला आहे. म्हणून हा गांधीहत्येचा आरोप संघाला चिकटून राहिला आहे. हल्ली तो सरसकट केला जातो. राहुल गांधी त्यातच फ़सले आणि यावेळी कोणा एका संघ स्वयंसेवकाने मनावर घेऊन, त्या आरोपाला कोर्टामध्ये आव्हान दिले. आता तोच मामला सुप्रिम कोर्टात आला आहे आणि तिथे राहुलना चक्क सणसणित थप्पड खावी लागली आहे. मात्र उलट उत्तर देण्याची सोय नाही. कारण आता कोर्टानेही राहुलना कचाट्यात पकडले आहे. नेहरू गांधी खानदानाने चव्हाट्यावर येऊन असभ्य वर्तन करावे आणि त्यालाही कोणी कायद्याने विचारता कामा नये, अशी काहीशी त्यांच्या वारसांची समजूत असावी. म्हणून ते न्यायालयालाही दाद देत नसतात. त्यासाठी नामवंत वकीलांची फ़ौज उभी केली जाते. आताही तसेच झाले. पण सुप्रिम कोर्टाने त्यालाही दाद दिलेली नाही.

खटला झाला, की मोठ्या वकीलांना उभे करून विलंबाचे डावपेच खेळले जातात. राहुलच्या बाबतीतही तसेच झालेले आहे. बेताल वक्तव्ये करायची आणि तोंडघशी पडायची वेळ आली, मग वकीलाच्या पदराआड लपायचे, ही त्यांची खानदानी परंपरा आहे. आताही हे प्रकरण कोर्टात आल्यावर आपल्या वकीलाला वेळ नाही, असे सांगून सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. पण दोन आठवड्याची मुदत नाकारून कोर्टाने थेट दोन पर्याय राहुल पुढे ठेवले. त्यांनी आपले विधान मागे घेऊन संघाची माफ़ी मागावी, किंवा खटल्याच्या सुनावणीला सामोरे जावे. त्यासाठी २७ जुलै ही तारीखही पक्की केली आहे. म्हणजे त्या दिवसापासून बदनामी खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. त्यातून सुटायचे असेल, तर तत्पुर्वी राहुलनी संघाची माफ़ी मागायचा पर्याय खुला आहे. म्हणजे टाळाटाळ वा पळवाट शिल्लक राहिलेली नाही. अर्थात जे विधान आपण इतक्या ठामपणे करतो, ते आपणच सिद्ध करण्यासाठी वेळ कशाला हवा असतो? वकीलाच्या मागे लपावे कशाला लागते? कोर्टाने अशा पळवाटा नाकारलेल्या आहेत. असे विधान राजकीय प्रचारसभेतले आहे आणि त्यातला संदर्भ तपासून अर्थ काढायला हवा, अशीही मल्लीनाथी राहुलच्या वकीलांनी केली होती. पण कोर्टाने ती साफ़ फ़ेटाळून लावली आहे. कुणा एका व्यक्तीच्या कृत्यासाठी संपुर्ण संघटनेला आरोपी ठरवण्याच्या प्रवृत्तीला चाप लावताना कोर्टाने उलट सवाल केला, की अशी आरोपबाजी करण्यातून कुठले जनहित साधले जाते? त्याचेही उत्तर राहुल गांधींपाशी नाही. खरे तर त्यांच्यापाशी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नाहीच. अन्य कुणी लिहून दिलेल शब्द समजूनही न घेता बडबडणार्‍याची अक्कल ती किती असू शकते? मग आपण बोललो तर लिहीणारा नव्हेतर आपणच जबाबदार धरले जाऊ, इतके भान तरी अशा पोरसवदा माणसाला कुठून असेल?

त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अर्थात कॉग्रेसची स्थिती झाली आहे. राहुलने कायदेशीर पळवाट म्हणून माफ़ी मागितली, तर पक्षासाठी ती नाचक्की असेल. पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून राहुलनी संघाची जाहिर माफ़ी मागितली, तर तो मोठा ऐतिहासिक दस्तावेज बनून जातो. मग गांधीवधाचा वाडगा घेऊन पुरोगामीत्वा़चे राजकारण करण्याचे मोठे हत्यार बोथट होऊन जाईल. शिवाय शिर्षस्थ नेत्यानेच संघाची माफ़ी मागितली तर संघाची प्रतिष्ठा वाढते आणि कॉग्रेसची पत धुळीला मिळते. सहाजिकच राहुलनी अशी माफ़ी मागणे पक्षाला परवडणारे नाही. आणि माफ़ी मागितली नाही तरी कॉग्रेसची नाचक्की ठरलेली आहे. राहुलना बदनामीचा खटला सोसावा लागेल. त्यात संघ जबाबदार असल्याचे सिद्ध करावे लागेल. ते अशक्यप्राय काम आहे. कारण गांधीहत्येचा खटला सहा दशकापुर्वीच निकालात निघालेला आहे आणि त्यात संघाचा संबंध नसल्याचे आधीच सिद्ध झालेले आहे. म्हणजेच कायदेशीर खोटे व दिशाभूल करणारे विधान राहुलनी केलेले आहे. त्याला कायदेशीर बचाव नाही. म्हणजेच खटला चालवून आणि कितीही युक्तीवाद करून त्यातून दोषी ठरण्याला पर्याय नाही. किंबहूना मंगळवारच्या सुनावणीत राहुलच्या वकीलांनी त्याची कबुलीच देऊन टाकलेली आहे. ‘विधान संदर्भाने घ्यावे’, असे वकील सांगतो, म्हणजेच शब्दश: घेऊ नये, असेच म्हणतो. म्हणजे संघाने गांधीहत्या केली हे विधान सत्य नसल्याचीच कबुली आहे. मग खटला चालवून दोषी ठरणे अपरिहार्य नाही काय? तेव्हाही माफ़ी मागावी लागेल, किंवा तरतुद असेल तितकी शिक्षा भोगावी लागेल. आता माफ़ी मागून खटल्याचा ससेमिरा संपुष्टात येऊ शकतो आणि खटला चालवून आजचे मरण उद्यावर टाकले जाऊ शकते. शतायुषी पक्षाचा उपाध्यक्ष इतका मुर्खपणा बेधडक करू शकतो. कारण त्याला काहीही शिकायचे नसते.

यातली आणखी एक बाजू लक्षात घेण्यासारखी आहे. सुप्रिम कोर्टाने असे बेछूट आरोप संघावर करणार्‍यांनाच जणू इशारा दिलेला आहे. ह्या आरोपात तथ्य नाही आणि तसे आरोप करणे गंभीर गुन्हा आहे. उद्या तशाच भूमिकेवर खटल्यानंतर शिक्कामोर्तब झाले, मग काय? त्यानंतर असा बेताल आरोप करणार्‍यांवर कुठल्याही कोर्टात कोणीही खटला भरू शकतो आणि तसा आरोप हा सुप्रिम कोर्टाची अवहेलना म्हणून दाद मागू शकतो. राहुलवरील या खटल्याचे तेच खरे महत्व आहे. संघाला सातत्याने ज्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे, त्यावर कायमचा निर्बंध यातून येऊ शकेल. कारण आज राहुलनी माफ़ी मागून विषयावर पडदा पाडला, तर हा विषय आहे तसा गुलदस्त्यात राहिल. त्यावर कोर्टाचे मतप्रदर्शन होणार नाही. पण एकदा कोर्टाने तसा आरोप खोटा असल्याचा निर्वाळा दिला, मग त्याचा पुनरूच्चार प्रतिबंधित होऊन जाईल. म्हणजेच राहुलचा अहंकार पक्षासह तमाम पुरोगाम्यांना गोत्यात आणणारा आहे. त्याच्या उचापतीने पुरोगाम्यांच्या हातातले मोठे हत्यार हिसकावून घेतले जाणार आहे. राहुलना माफ़ी मागण्यासाठी आठवडाभर अवधी आहे. पण त्यांच्या समर्थकांनी व कॉग्रेसने माफ़ीचा विषयच येत नाही, असे सांगितले आहे. त्यावर विश्वास ठेवायचा तर खटला पुढल्या बुधवारपासून सुनावणी सुरू होईल. थोडक्यात त्यातून जो निकाल येईल त्यात राहुलना शिक्षा दंड किती होईल ही बाब दुय्यम आहे. त्यातून संघाच्या हातात एक मोठे हत्यार येईल. गांधीहत्येचा आरोप करणार्‍या कोणालाही वचकून रहावे लागेल. मुद्दा तोही नाही. कॉग्रेस कितीकाळ अशा पोरकटपणाचे समर्थन व पाठराखण करणार आहे? कारण दिवसेदिवस हा दिवाळखोर गांधी-नेहरू वारस त्या शतायुषी पक्षाला गाळात घेऊन चालला आहे. कान उपटले तरी त्याला धडा कोणाला तेही समजत नाही. त्याच्यासमोर नतमस्तक झालेल्यांना भवितव्य नसते.