Saturday, July 2, 2016

नवजात अर्भक आणि मनुष्यप्राणी (जोपासनापर्व -२)



घरात मूल जन्माला आले की नव्याची नवलाई थोडेच दिवस असते. पहिले काही दिवस ते कुणासारखे दिसते किंवा किती सुदृढ आहे, याची चर्चा चालते आणि सहासात महिन्यातच त्या मुलाचे भविष्य हल्लीच्या पालकांना भेडसावू लागते. अजून त्या नवजात अर्भकाला आपले जन्मदातेही ओळखण्याची समजूत आलेली नसते, इतक्यात जन्मदाते मात्र त्या अर्भकाच्या उज्ज्वल भवितव्याच्या योजना आखू लागलेले असतात. मूल आपल्या पायावर उभे राहू लागण्यापुर्वीच त्याने जग पादाक्रांत करण्याची पालकांनी त्याच्याकडून अपेक्षा बाळगणे, ही आजच्या पालकत्वाची खरी समस्या झालेली आहे. आपण कोण व आपल्या इच्छाआकांक्षा कोणत्या, त्याची मुलाला जाणिव होण्याआधीच, त्याचा निर्णय पालक घेऊन टाकतात. तिथून समस्या सुरू होत असते आणि पुढल्या काळात बालक-पालक यांच्यातली दरी प्रतिदिन वाढण्याचा आरंभ होत असतो. हा माझा आरोप नाही, तर अनुभव आहे. जन्माला आलेले मूल एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे आणि त्याच्यातही विचारपुर्वक निर्णय घेण्याची क्षमता असणार आहे, याची कुठलीही सुतराम कल्पना नसल्यासारखे जन्मदाते वागू लागतात. सहाजिकच त्यांच्या योजना अपेक्षेनुसार मुलाने जगावे, वागावे आणि कर्तबगारी पार पाडावी, ही सक्ती त्या जीवावर जन्मापासून लगेच सुरू झालेली असते. त्याची पहिली पायरी दोन अडीच वर्षात अंगणवाडी केजी अशा शाळांपासून होत असते. अभ्यास नावाचा बोजा त्या कोवळ्या जीवाच्या डोक्यावर चढवला जात असतो. याला काय व किती पेलवेल, याची तमा पालकांना नसते. नेमक्या याच बाबतीत माझी कन्या वसुद सुदैवी होती. मी किंवा तिच्या आईने तिच्यावर तशी सक्ती होणार नाही, इतकेच कर्तव्य बजावले असे म्हणता येईल. अभ्यासाविषयीच्या एकूणच पालकांच्या सार्वत्रिक समजुती, ही आजच्या पालक-बालक पिढीची मोठी जटील समस्या झाली आहे.

शिक्षण म्हणजे अभ्यास आणि अभ्यास म्हणजे औपचारिक शिक्षण, ही समजूत त्याचा पाया आहे. पण या दोन गोष्टी कुठलाही सजीव जन्मत:च सुरू करीत असतो. मातेच्या उदरातून या जगात प्रवेश केल्यापासून प्रत्येक क्षणी सजीवाला आपल्या अस्तित्वाचा झगडा स्वतंत्रपणे करावा लागत असतो. त्यासाठी त्याच्या गाठीशी कुठला अनुभव नसतो, की प्रशिक्षण मिळालेले नसते. म्हणूनच मृत्यूपासून सुरक्षित रहाण्याची धडपड, हे जगणे असते आणि स्वाभाविकच मूल पहिल्या क्षणापासून नवे अनुभव घेत शिकायला सुरूवात करीत असते. डोळे किलकिले करून जगाला प्रथमच बघणार्‍या त्या जीवाला आपली जन्मदाती कोण तेही ओळखणे शक्य नसते, की कुठलीही संपर्काची भाषा त्याला ज्ञात नसते. रडणे-ओरडणे इतकीच त्याची भाषा असते. त्याला कुठले नावही नसते. आपले हितेच्छु कोण आणि कोणापासून आपल्याला धोका आहे, त्याचीही जाण नसलेला हा जीव जगण्याची धडपड सुरू करतो, तिथून त्याच्या शिक्षणाला आरंभ झालेला असतो. तुम्ही त्याला काय शिकवता ते दुय्यम असते. त्यापेक्षा ते अर्भक काय शिकते, हे महत्वाचे असते. अगदी आजच्या व्यवहारी भाषेत सांगायचे संगणक वा स्मार्टफ़ोन घेतल्यावर लगेच तसाच्या तसा उपयोगात येऊ शकत नाही, तसे हे नवजात बालक असते. त्यात विविध एप्स डाऊनलोड करत त्याला जगावे लागत असते. मग आपले जन्मदाते कोण, यापेक्षा जगण्याच्या त्या धडपडीत मदतनीस ठरणारे कोण, यानुसार हे डाऊनलोड सुरू होतात. भुक लागली तर खावे काय आणि कसे, तेही माहित नसलेल्या या जीवाला आपल्या छातीशी धरून आपले स्तन त्याच्या मुखी देणारी व आपल्या देहाची उब त्याला देणारी स्त्री, त्याच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा असल्याचे हे बालक अनुभवातून शिकते. त्याला आधी भूक व देहाची उब समजते आणि खुप नंतर जन्मदाती आई उमजते.

थोडक्यात शाळा व शिक्षण खुप नंतरचा विषय असतो. तिथपर्यंत जाण्यासाठी लायक असा मनुष्य प्राणी घरातल्या कुटुंबाला तयार करावा लागतो. जन्माला आलेले प्रत्येक मुल एक सजीव प्राणी असतो. त्याचे मनुष्य प्राण्यात रुपांतर करण्याची प्रक्रिया अनवधानाने आपल्याच घरात सुरू झालेली असते. त्यात जन्मदात्यांखेरीज अनेकजण त्या प्रक्रीयेत सहभागी असतात. यातल्या कुणालाही आपण त्या नवजात बालकाला शिकवित आहोत, याची किंचीतही जाणिव नसते. पण जगातला सर्वाधिक उत्तम शिक्षकवर्ग तोच असतो. नवजात बालकाला नव्या जगाची ओळख करून देण्यासाठी धडपडणारा व अनेक नवनव्या अदभूत कल्पना वापरून त्या बालकाला जगाची ओळख करून देणारा, हा आप्तस्वकीयांचा शिक्षकवर्ग कुठेही कुणीही प्रशिक्षित केलेला नसतो. त्यासाठी कुठले ठोकताळे वा पद्धती विकसित केलेल्या नसतात. जसजशी गरज निर्माण होते, तसतसे त्या त्या घरातले कुटुंबातले लोक त्या नवजात बालकाला अखंड शिकवण्याचे कर्तव्य आपल्या परीने पार पाडत असतात. तेही बालक त्यातून शेकडो गोष्टी अजाणतेपणी शिकत असते. नवजात बालकाला स्तनातले दूध चोखून शोषून प्यावे, हे कोण शिकवतो? आणि त्याचे इवले तोंड आईने स्तनापाशी नेलेच नाही, तर त्या बालकाची भूक त्याने कशी भागवावी? बालकाला नुसते छातीशी धरले म्हणून ते दूध पिण्याची शक्यता नसते. कारण त्याला त्यापैकी काहीच ठाऊक नसते. पण त्याचे ओठ स्तनापाशी नेऊन त्याच्यातली चोखण्याची उपजतवृत्ती आई जोपासते. इथून दूध मिळते आणि भुक भागते असा शोध मग बालकाला लागतो. त्या नवजात बालकाला दूध प्यायला शिकवणारी कुठली शाळा किंवा अभ्यासक्रम आहे काय? अभ्यास वा शिक्षणाचा कंटाळाच असता, तर हे नवजात बालक स्तनपान शिकू शकले असते काय? शाळेत जाण्याइतक्या वयापर्यंत जगू शकेल काय?

मुद्दा इतकाच, की कुठलेही सुदृढ नवजात बालक जन्म घेतल्यापासून शिकायला आरंभ करीत असते. त्यातले पहिले शिक्षण त्याला मनुष्य प्राणी बनवण्याचे असते. हे शिक्षण देणारी कुठलीही शाळा वा शिक्षणपद्धती नाही. ते काम घरातली, कुटुंबातली माणसेच निष्ठेने कर्तव्य भावनेने पार पाडत असतात. कुठल्याही पुस्तकात त्याविषयीचे मर्गदर्शन मिळणार नाही. प्रत्येक घरात व कुटुंबात त्याचे विभीन्न प्रकार आढळून येतील. आपापल्या अनुभवातून वा गरजेतून ही कुटुंबिय मंडळी आपापले सोयीचे उपाय शोधून, त्या नवजात सजीवाला मनुष्य प्राणी बनवण्याची जबाबदारी पार पाडतात. थोडक्यात पालक असे ज्यांना म्हटले जाते, ते लोक प्राथमिक स्वरूपाचे डाऊनलोड करून घेण्यात त्या नवजात बालकाला सहाय्य करीत असतात. त्यातून एक नवा मनुष्यप्राणी घडवला जात असतो. हे सर्वात जिकीरीचे काम आहे. जगातले हे सर्वात गुंतागुंतीचे अवघड शिक्षण आहे. पण त्याच्या कुठे शाळा नाहीत की व्यवथा उपलब्ध नाहीत. ते काम करणाराच बालकाचा खरा प्राथमिक शिक्षक असतो. कारण तो त्या सजीवाला ‘शिकायला’ शिकवत असतो. शिकणे म्हणजे आत्मसात करणे असते आणि ती सवय अंगवळणी पडणे, हा शिक्षणाचा पाया असतो. तसे काही केले नाही, तर तुम्ही जन्माला घातलेल्या बालकाला मुळातच मनुष्य प्राणी बनता येत नाही आणि पुढल्या शाळा इत्यादी शिक्षणासाठी त्याला प्रवेशही मिळू शकणार नाही. म्हणून मुलभूत शिक्षण घरात, कुटुंबात आणि आप्रस्वकीयांच्या सहवासात होत असते. पालकांनी त्या कोवळ्या वयात बालकाला आपला सहवास व त्यासाठी वेळ देणे, ही सर्वात महत्वाची बाब असते. माझ्या मुलीला त्या वयात तितका नव्हेतर सगळाच वेळ देण्यास मी सज्ज होतो आणि बहुतांश पालक तिथेच कंजुषी करतात, हे माझे एक ठोस निरीक्षण आहे. बहुतांश पालक आपल्या मुलांना उत्तम सुविधा देण्यासाठी धडपडतात, पण बिनखर्चात उपलब्ध असलेला सर्वोत्तम शिक्षक नाकारतात, ही आजकालची खरी समस्या म्हणावे लागते.

===========================
जोपासनापर्व
ज्यांच्या घरात कुटुंबात मुले दहाबारा वर्षाच्या आतल्या वयोगटात आहेत आणि ज्यांना त्यांच्या जोपासनेविषयी चर्चा करावी असे वाटते, त्यांच्यासाठी हा फ़ेसबुक समुह सुरू करीत आहे. आपल्याला मुलांविषयी पडलेले प्रश्न, सतावणार्‍या समस्या, यांची चर्चा, त्यातले अनुभव वाटून घेता यावेत, अशी त्यामागची कल्पना आहे. अनेकदा एकाचा अनुभव दुसर्‍याला मार्गदर्शक ठरू शकतो. काहीवेळा अनेकजण मिळून समान समस्येवर विचारविनिमयातून उपाय शोधू शकतात. कारण पौगंडास्थेतील मुले हा आता निव्वळ त्यांच्या शिक्षण व संस्काराचा विषय राहिला नसून, आर्थिक, सामाजिक व व्यवहारी प्रश्न बनला आहे. त्यासाठी हा समूह हे व्यासपीठ व्हावे ही अपेक्षा! ज्यांना आवश्यक वाटते त्यांनी त्याचे सदस्य व्हावे. आपल्या पालक मित्रांनाही आमंत्रित करावे. मी सध्या लिहीत असलेल्या ‘जोपासनापर्व लेखमालेतील लेख इथेही पोस्ट केला जाईल. - भाऊ तोरसेकर

3 comments:

  1. Khupach mahitipurn lekh...
    Me ajun palak vagaire zalo nahi aahe, pan pudhil aayushyat nakkich upayogi padel ase likhan.....

    ReplyDelete