Monday, July 4, 2016

झोपेचे सोंग सोडणार का?



Shall we expect some transatlantic military giant to step the ocean and crush us at a blow? Never! All the armies of Europe, Asia, and Africa combined, with all the treasure of the earth (our own excepted) in their military chest, with a Bonaparte for a commander, could not by force take a drink from the Ohio or make a track on the Blue Ridge in a trial of a thousand years. At what point then is the approach of danger to be expected? I answer. If it ever reach us it must spring up amongst us; it cannot come from abroad. If destruction be our lot we must ourselves be its author and finisher. As a nation of freemen we must live through all time or die by suicide. - Abraham Lincoln

कुठल्याही देशाला वा समाजाला धोका कुठून असतो? अब्राहम लिंकन यांनी त्याचा खुलासा तब्बल १७८ वर्षापुर्वी करून ठेवला आहे. कुठल्याही मोठ्या महासत्तेची प्रचंड फ़ौज किंवा कोणी महान कर्तबगार सेनापती तुमच्या स्वाभिमानी देश समाजाचा विनाश घडवून आणत नाही. तो विनाश तुमच्यातच दबा धरून बसलेले आत्मघातकी गद्दार घडवून आणतात. हे त्या महापुरूषाने कथन करून ठेवलेले आहे. त्याची दखल आजच्या अमेरिकन वा पाश्चात्य बुद्धीमंतांना घ्यावीशी वाटली नाही, तिथूनच त्या जगज्जेत्या पाश्चात्य संस्कृतीचा विनाश सुरू झाला आहे. कारण त्यांना आपल्यात वावरणारा धोका किंवा सत्य बघण्याचीही हिंमत राहिलेली नाही. ऑरलॅन्डो शहरातील एका नाईटक्लबमध्ये घुसलेल्या एका मुस्लिम तरूणाने बेछूट गोळीबार करून पन्नासहून अधिक निरपराधांना ठार मारले आणि अमेरिकेतही अमेरिकन नागरिकाला तिथले सरकार सुरक्षितता बहाल करू शकत नाही, हे सिद्ध केले. त्याच्याआधी पंधरा वर्षे, अमेरिकन प्रवासी विमाने जुळ्या मनोर्‍यावर आदळून काही मुस्लिम तरूणांनी अमेरिकेला हादरा दिला. इतके होऊनही दहशतवादाला धर्म नसतो, असली पोपटपंची करणार्‍यांनीच अमेरिकेला धोक्यात आणले आहे. मग त्या देशापाशी किती शस्त्रास्त्रे वा अण्वस्त्रे आहेत, किती मोठी खडी सुसज्ज फ़ौज आहे, याला अर्थ उरत नाही. कारण त्या फ़ौजेला आपल्यातच दडी मारून बसलेल्या घातपाती गद्दारांना संपवण्याचे हक्क अधिकार नाहीत. तिथेच अमेरिकेचा विनाश सुरू झालेला आहे. जगातल्या अनेक देशात आज जिहादने घातलेला धुमाकुळ, त्यांना विनाशाकडे घेऊन चालला आहे, कारण त्यांना आपल्यातच दबा धरून बसलेल्या गद्दारांना हात लावण्याची हिंमत वा इच्छा उरलेली नाही. किंबहूना ते सत्य बोलण्याचे धाडस त्यांच्यात उरलेले नाही. म्हणून तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेत्द यांचे कौतुक आहे, त्यांनी लिंकनचे शब्द मनावर घेतले आहेत.

ढाक्यातील घातपाती हल्ल्यानंतर हसिना वाजेद यांनी ‘हे कसले मुस्लिम’ असा सवाल करून त्या दहशतवादामागे कुणीतरी का असेना, पण जे आहेत ते मुस्लिमच आहेत, ह्याची थेट कबुली देऊन टाकली आहे. हे कोणी बाहेरून आलेले हल्लेखोर वा शत्रू नाहीत, तर आपलेच सगेसोयरे बनून वावरणारे शत्रू आहेत, असे बोलण्याची स्पष्ट हिंमत म्हणून मोलाची आहे. कारण ती हिंमत अधिक भेदक व धारदार असते. हत्यार कितीही बोथट असले तरी चालेल. पण ते उचलून प्रतिहल्ला वा बचाव करण्याची इच्छा व हिंमत धारदार असायला हवी. जगातल्या कुठल्याही राष्ट्रीय नेत्यापाशी ती हिंमत दिसत नाही. आज जगातल्या कुठल्याही देशात हिंसाचार दहशतवाद माजला असेल, तर त्यामागची प्रेरणा धार्मिक व मुस्लिम आहे, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. जे कोणी अशी कृत्ये करतात, त्यांनी इस्लामचा चुकीचा अर्थ लावला, हा निव्वळ युक्तीवाद आहे. वास्तव ते मुस्लिम आहेत आणि त्यांच्या अर्थानुसार ते इस्लामचे वर्चस्व प्रस्थापित करायला घराबाहेर पडलेत, हेच सत्य आहे. तीच समस्या असेल, तर ती नाकारून त्यावर उपाय शोधता येत नाही, की उपाय योजता येणार नाही. त्यावर पांघरूण घालण्याने रोग अधिक बळावत जातो. गेल्या दोन दशकात तेच झाले आहे. सत्य नाकारून रोग बळावत गेला आहे. तेच सत्य बोलण्याचे धाडस हसिना वाजेद यांनी केले आहे. कारण त्यांच्यासमोर इराक सिरीया किंवा ट्युनिशिया लिबीया आहेत. तेही मुस्लिम देशच आहेत आणि तिथे बहुतांश मुस्लिमच लोकसंख्या आहे. पण त्यांचा पुरता विनाश घडून आला आहे, त्यामागची प्रेरणा कुठली आहे? मूठभर लोकांची आपली अशी जी इस्लामी राज्याची संकल्पना आहे, ती सर्वांनी मान्य करावी व तिलाच शरण जावे; म्हणून हे मूठभर लोक हत्यार उपसून बाहेर पडले आहेत. त्यांनी जगासमोर अन्य कुठलाही पर्याय शिल्लक ठेवलेला नाही.

जिहादची संकल्पना समजून घेतल्याशिवाय त्याच्याशी लढता येणार नाही, की त्यावर मात करता येणार नाही. जिहाद म्हणजे धर्मयुद्ध वा धर्मग्रंथात कथन केलेल्या गोष्टी, अशा भ्रमात आजचे आधुनिक विचारवंत गुरफ़टले आहेत. पण जे जिहाद म्हणून जगात हिंसाचार माजवत आहेत, त्यांच्या मनात कुठलाही गोंधळ नाही. आजच्या युगाला, कालखंडाला किंवा कायद्यांना सुटसुटीत ठरेल; अशी त्यांची जिहादची व्याख्या वा संकल्पना आहे. जिथे आपल्याला अमान्य असलेल्या कायद्याचे लाभ मिळू शकतात, ते घ्यायचे आणि ते कायदे झुगारण्यासाठी त्याच कायद्याचा आडोसा घ्यायचा, ही त्यातली रणनिती आहे. आपण कितीही बेछूट हत्याकांड केले तरी तितका बेछूट कुठल्याही देशाचा कायदा आपल्याला वागणूक देणार नाही, हे प्रत्येक जिहादींचे खरे हत्यार आहे. जिथे तशी सुविधा नाही, तिथे कुणी जिहादी फ़िरकत नाही. दुबई, कुवेत किंवा सौदी अरेबियात यातला कोणी जिहादी धुमाकुळ घालत नाही. उत्तर कोरियात त्याची मस्ती चालत नाही. कारण तिथे त्यांच्यापेक्षाही हिंसाचारी सत्ता असून, शतपटीने क्रुर न्याय लावला जातो. उलट जिथे कायदा नेभळट किंवा बोटचेपा आहे, तिथे आरामात धुमकुळ घालता येतो. म्हणून असे जिहादी लोकशाहीचा आश्रय घेऊन आपला ‘पराक्रम’ घडवत असतात. ते तुमच्या आमच्यातच येऊन उजळमाथ्याने वावरत असतात. ते कुठल्या बाहेरच्या देशातून येत नाहीत. त्यातले बहुतेक आपल्याच मातीत निपजलेले असतात. शेख हसिना वाजेद यांनी व त्यांच्या सरकारने ते सत्य बोलण्याचे धाडस केलेले आहे. ढाक्याच्या हत्याकांडामागे कोणी परदेशी जिहादी नाहीत, तर स्वदेशी जिहादी आहेत, इतके खुले सत्य बांगलादेश सरकारने बोलून दाखवले आहे. आज युरोप, अमेरिका वा भारत बांगलादेशात असे मायदेशाशी गद्दारी करणारे जिहादी निपजलेले आहेत. तशाच लोकांनी इराक, सिरीया वा लिबीयाची काय दुर्दशा करून टाकली आहे ना?

जगातले मूठभर जिहादी इसिसमध्ये भाग घ्यायला गेलेले असतील. अफ़गाण जिहादमध्येही किरकोळ परदेशी घातपाती होते. बहुतांश तिथलेच मुस्लिम तरूण जिहादचे शिलेदार होते, हे विसरता कामा नये. आज जगात कुठेही जिहादची निर्यात करणार्‍या पाकिस्तानची तरी काय अवस्था आहे? तिथेच जन्मलेले अनेक तालिबानी जिहादी पाकिस्तानातही उत्पात घडवित आहेत. त्यामागची प्रेरणा धार्मिक आहे आणि ती एक जागतिक प्रवृत्ती बनत गेलेली आहे. तीच प्रवृत्ती प्रत्येक देशाला भेडसावते आहे. त्याला कुठून पैसे मिळतात वा प्रशिक्षण दिले जाते, ही बाब दुय्यम आहे. असे विनाशाला कवटाळण्यासाठी सज्ज झालेले तरूण प्रत्येक देशातले आपलेच आहेत. त्यांना देशापेक्षा, आपल्या समाजापेक्षा कुठल्यातरी काल्पनिक स्वर्गाने भुरळ घातली आहे. तो स्वर्ग प्राप्त करण्यासाठी ते जीवावर उदार झालेत आणि असलेले जग विध्वंसाच्या खाईत लोटून देण्याची त्यांना घाई झालेली आहे. त्यांना चुचकारण्याने धोका अधिक अक्राळविक्राळ झाला आहे. कुठल्याही स्वतंत्र स्वयंभू देश समाजाला अन्य कुठली शक्ती स्वतंत्र राखत नाही, की संरक्षण देत नाही. त्या समाजाला स्वतंत्र रहाण्यासाठी कायम सज्ज असावे लागते. त्यांनी लढून आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवावे किंवा निष्क्रीयतेतून आत्महत्या करावी. बाहेरच्या शत्रूशी लढणे सोपे असते. त्याला तपासून बघावे लागत नाही. पण आपल्यात़च मुक्तपणे वावरणारे गद्दार अधिक धोकादायक असतात. ते स्फ़ोटकाच्या गोदामासारखे घातक असू शकतात. कारण ते तुम्हाला गाफ़ील पकडून बळी घेत असतात. लिंकन त्याचाच इशारा देऊन गेलेत. तो त्यांनी त्या काळात स्वदेशी जनतेला दिलेला इशारा होता. पण आज अवघ्या जगाला तो धोक्याचा इशारा जसाच्या तसा लागू होऊ शकतो. झोपेचे सोंग सोडून त्याकडे बघायचे असेल तर उपयोग आहे.

1 comment: