Tuesday, July 5, 2016

म्हणून रामदास ‘आठवले’



आपल्या सरकारची कारकिर्द सुरू होऊन पंचवीस महिने उलटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खराखुरा पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. त्यात कोण व किती आणि कुणाची मंत्री म्हणून वर्णी लागली, त्यावर आता दोनतीन दिवस चर्चा चालत राहिल. पण त्या शपथविधीच्या निमीत्ताने काही विनोद झाला आणि त्याचीच चर्चा सोशल माध्यमातून रंगली होती. दिर्घकाळ मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, यांची अखेर केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तो अर्थातच त्यांना आपला अधिकार वाटत होता आणि तसे त्यांनी वारंवार बोलूनही दाखवले होते. पण दोन वर्षे उलटून गेली तरी पंतप्रधानांनी आठवलेंना दाद दिलेली नव्हती. मग आता अकस्मात आठवले यांचा समावेश कशासाठी झाला असेल? मंत्रीपदाची शपथ घ्यायला रामदासभाई आकर्षक व लक्ष वेधून घेणारी वेशभूषा करून पोहोचले होते. मात्र वेशभूषेत जास्त व्यग्रता राहिल्याने त्यांचे शपथेवरून लक्ष उडालेले असावे. म्हणून की काय, त्यांनी शपथ घेताना हातातला कागद वाचायला आरंभ केला. पण राष्ट्रपती ‘मै’ म्हणून थांबतात, त्याच्यापुढे नवोदिताने आपले नाव घेऊन शपथ वाचायची असते. रामदासभाई आपले नावच घ्यायला विसरले आणि पुढे शपथ वाचत गेले. राष्ट्रपतींनी त्यांना थांबवून नावासह शपथ घ्यायला भाग पाडले. १९८९ सालात तात्कालीन राष्ट्रपती वेंकटरामन यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारचा शपथविधी पार पाडला होता. त्यात हरयाणाचे चौधरी देवीलाल उपपंतप्रधान झालेले होते. पण शपथ घेताना त्यांनी ‘प्रधानमंत्री’ असा शब्द उच्चारला, तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांना थांबवून ‘उपप्रधानमंत्री’ म्हणायला सांगितले होते. तर वेंकटरामन यांच्याकडे रागीट तिरपा कटाक्ष टाकून देवीलाल यांनी दुसर्‍यांना ‘प्रधानमंत्री’ अशीच शपथ घेतली होती. रामदास आठवल्यांनी तसे काही केले नाही, तर दुरूस्ती केली.

असो, मंगळवारी १९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आणि मोदी सरकारचा विस्तार पार पडला. त्यामागे उत्तरप्रदेश विधानसभेत यश मिळवण्याचा हेतू असल्याचा आरोप सर्वांनीच केलेला आहे. मग त्यातून उत्तरप्रदेश विधानसभा मतदानावर कसा प्रभाव पडू शकतो, त्याचा उहापोह बहुतेक वाहिन्यांवर राजकीय पंडीत अगत्याने करीत होते. त्यात मग वाराणसी परिसरातील दोन किंवा तीन मंत्री कसे समाविष्ट करून घेतलेत. कुठल्या जातीचे मंत्री घेतलेत. त्यामुळे सोशल इंजिनियरींग कसे साधले आहे, त्याचाही उहापोह खुप झाला. पण यापैकी कोणीही रामदास आठवले यांचाही समावेश महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशच्या विधानसभांसाठी झाल्याचा साधा उल्लेखही केला नाही. त्याचबरोबर आपल्याला आमंत्रण मिळाल्यावर आदल्या दिवशी रामदासभाई काय बोलले, त्याचाही कुठे फ़ारसा गाजावाजा झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तारात आपला नंबर लागतोय हे निश्चीत झाल्यावर; रामदास आठवले यांनी विविध विधाने केली असतील. पण त्यातले एक वक्तव्य खुप सांकेतिक वा सूचक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर प्रथमच एका रिपब्लिकनाला केंद्रीय मंत्रीपद लाभते आहे, असे रामदासभाई कुठेतरी म्हणाले. ते सूचक अशासाठी आहे, की ती वस्तुस्थिती आहे. बाबासाहेबांना नेहरू मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते. तेव्हा किंवा त्यानंतर अनेक दलित मागास समाजाचे मंत्री केंद्राच्या सत्तेत बसलेले आहेत. पण कुठल्याही राज्यात वा केंद्रात कधी बाबासाहेबांचे स्वप्न म्हणून जन्माला आलेल्या रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळत नव्हते. १९९१ सालात प्रथमच महाराष्ट्रात शरद पवारांनी रिपब्लिकन ऐक्य मोडीत काढायला रामदास आठवले यांना हाताशी धरले आणि त्याला वजन येण्यासाठी नंतर त्यांना सरकारमध्ये सामिल करून मंत्रीपद दिलेले होते. त्यापुर्वी कोणा रिपब्लिकन नेत्याला त्याच पक्षाचा म्हणून मंत्रीपद मिळू शकलेले नव्हते.

अर्थात बाबासाहेब नेहरू मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे सदस्य म्हणून सहभागी झालेले नव्हते. कारण तेव्हा तो पक्ष स्थापनही झालेला नव्हता. त्यांच्या हयातीत त्याची स्थापनाही होऊ शकलेली नव्हती. पुढल्या काळात तर एक एक करून रिपब्लिकन पक्षात फ़ुट पाडून, त्यातल्या नेत्यांना उचलण्याचेच राजकारण कॉग्रेसने केले. रामदास आठवले त्याला अपवाद होते. त्यांनी शरद पवारांच्या राजकारणाला हातभार लावला. पण रिपब्लिकन पक्षाचा नेता ही बिरुदावली कायम राखली. त्यांच्यानंतर कॉग्रेसने चंद्रकांत हंडोरे या रिपब्लिकन नेत्यालाही मंत्रीपद बहाल केले होते. पण कॉग्रेस पक्षात आल्यानंतर. त्यामुळे रामदास आठवले यांचा दावा खरा आहे. बाबासाहेबांनंतर कोणी आंबेडकरी चळवळीचा व पक्षाचा नेता केंद्रात मंत्री होऊ शकलेला नाही. तो मान आठवले यांच्या रुपाने रिपब्लिकन नेतृत्वाला प्रथमच मिळाला आहे. पण केवळ रिपब्लिकन नेतृत्वाला न्याय देण्यासाठीच हा समावेश झाला आहे काय? मोदी हे धुर्त राजकारणी आहेत आणि म्हणूनच ते कुठलाही निर्णय राजकारणाच्या बाहेर जाऊन घेत नाहीत. रामदास आठवले भले महाराष्ट्रातील नेता आहेत. पण इथे त्यांचा राजकीय लाभ जितका मिळू शकतो, त्यापेक्षा अधिक राजकीय फ़ायदा उत्तरप्रदेशात मोदी उठवू शकतात. त्याचा धागा शोधायचा असेल, तर आठवले यांचे वक्तव्य काळजीपुर्वक वाचायला हवे. बाबासाहेबांच्या नंतर प्रथमच कोणी रिपब्लिकन नेता केंद्रात मंत्री होतोय. त्याचा अर्थ आपणच खरे बाबासाहेबांच्या राजकारणाचे वारस आहोत, असे आठवलेंना सुचवायचे आहे. आणि त्याची दुसरी बाजू अशी, की मायावतींपेक्षाही आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहोत, असे रामदासभाई सुचवित आहेत. तो वारसा घेऊनच कांशीराम यांनी उत्तर भारतात बसपा उभा केला आणि मायावती त्याचीच फ़ळे चाखत आहेत. त्याला शह देण्यासाठी भाजपाला उत्तरप्रदेशात रिपब्लिकन नेता व पक्ष किती उपयोगी असेल?

मायावती आणि मुलायम हे उत्तरप्रदेशातील तुल्यबळ प्रादेशिक नेते आहेत. त्यापैकी मुलायमच्या पक्षातच नव्हेतर कुटुंबातच रणधुमाळी माजलेली आहे. तशातच बसपामध्ये दुसर्‍या क्रमांकाचे नेते व विधानसभेतील विरोधी नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी मायावतींना सोडचिठ्ठी दिली आहे. मायावतींवर मौर्य यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यात वरीष्ठ जातीच्या नेत्यांना प्राधान्य दिल्याचाही आरोप आहे. सहाजिकच मौर्य ज्या जातीचे आहेत, तो घटक मायावतींपासून दुरावला आहे. त्यामुळे बसपाचा पाया सैल झाला आहे. त्यात उरलेले मायावतींचे जातव ज्ञातिबांधव आंबेडकरांना दैवत मानतात. त्यांच्यासमोर आठवले-मोदी जोडीने उभे राहिले; तर मायावतींचे राजकीय आव्हान आणखी खिळखिळे होऊन जाते. मायावतींनी सतत केंद्रीय राजकारणात कॉग्रेसला साथ दिली, पण त्यांच्यासह आंबेडकरी बसपाच्या कुठल्याही नेत्याला कॉग्रेसने मंत्रीपद कधी दिले नाही. त्याचाही गवगवा आठवले उत्तरप्रदेशच्या प्रचारात करू शकतात. बाबासाहेबांच्या नंतर मायावतींना केंद्रात संधी मिळत नसूनही, त्या कॉग्रेसच्या सोबत राहिल्या. पण भाजपाने आपल्याला बाबासाहेबांचा वारसा म्हणून न्याय दिला, असाही दावा उद्या आठवले करू शकतील. किंबहूना तोच करण्यासाठी आज त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहे. दोन वर्षे आठवलेंनी सतत मागणी करूनही मंत्रीपद मिळत नव्हते. मग आताच भाजपा वा मोदींना रामदासभाई कशामुळे ‘आठवले?’ त्या प्रश्नाचे हे उत्तर(प्रदेशात सामावलेले) आहे. म्हणूनच रामदासभाईंच्या शपथविधीतील चुकीची चर्चा करण्यापेक्षा त्यांनी त्याच्याआधी केलेल्या वक्तव्याची राजकीय दखल घेतली गेली पाहिजे. दुबळे मुलायम व खिळखिळ्या मायावती अशी राजकीय लढत झाली; तर त्यात भाजपाला उत्तरप्रदेशात विधानसभेचे बहूमत मिळवून द्यायला हेच रामदास आठवले खुप मोठी कामगिरी बजावू शकतात.

No comments:

Post a Comment