Tuesday, July 19, 2016

विनोदवीर नवाज शरीफ़



कधी कधी मोठी माणसे वि्नोदी बोलतात. प्रामुख्याने राजकारणात अशा विनोदी माणसांचा खुप भरणा असतो. पाकिस्तानात तर कोणीही महत्वाच्या पदावरचा माणूस नेमण्यापुर्वी त्याच्या विनोदबुद्धीची परिक्षा घेतली जात असावी, अशी शंका येते. कारण सतत विनोदी बोलत रहाणे इतके सोपे काम नाही. अमेरिकेने भारताला अणू पुरवठेदार गटात सहभागी करून घेण्याला मान्यता दिल्यावर पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी त्यामुळे पाकिस्तान चिनकडे झुकेल, असे विधान केलेले होते. यांच्या प्रत्येक पापावर पांघरूण घालायला चिन हजेरी लावत असेल, तर पाकिस्तान चिनकडे झुकण्याची शक्यता असते काय? जो चिनच्या मांडीवर बसून खोड्या करतो, त्याने आपण चिनला पितृत्व देऊ; असे बोलण्याला अर्थ असतो काय? पण पाकिस्तानी नेते व अधिकारी असे अधूनमधून बोलत असतात. आताही काश्मिरात जिहादी घातपाती बुर्‍हान वाणी चकमकीत मारला गेल्यावर वादळ उठले; तर पोलिस कारवाई झाली. तेव्हा पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांची विनोदबुद्धी तात्काळ जागृत झाली आणि त्यांनी काय विधान करावे? ‘काश्मिरी जनतेचा आवाज दडपू नका.’ हे विधान ज्यांनी ऐकले असेल, त्यांना हसू आल्याशिवाय रहाणार नाही. किंबहूना आवाज दडपणे म्हणजे काय ते तरी या शरीफ़ाला कळते काय, अशीच शंका येईन ना? कारण ज्यांची हयात पाकव्याप्त काश्मिरातील जनतेचा आवाज दडपून ठेवण्यात गेली, तेच असली मुक्ताफ़ळे उधळत आहेत. खुद्द शरीफ़ यांचे तरी काय? पाकिस्तानात त्यांना तरी मोकळेपणाने आपले मन व मत व्यक्त करण्याची सोय आहे काय? खुलेपणाने बोलता यावे इतके स्वातंत्र्य पाकिस्तानच्या पंतप्रधानाला तरी आहे काय? शरीफ़ आपल्याच आयुष्यातले भीषण अनुभव पुर्ण विसरून गेलेत की काय?

२००० सालात कारगिलची लढाई झाली आणि त्यात पाकिस्तानला माघार घ्यावी लागली, तेव्हा त्या देशाचा पंतप्रधान कोण होता? शरीफ़च तिथे पंतप्रधान होते आणि त्यांनीच वाजपेयी यांच्याशी हस्तांदोलन करून दिल्ली-लाहोर बससेवा सुरू केली होती ना? त्यात पाचर मारण्याचा उद्योग कोणी केला होता? पाकचे तात्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ़ यांनी त्त्या मैत्रीत बिब्बा घालण्यासाठी कारगिलमध्ये घुसखोरी केली आणि दोन देशात युद्ध छेडले गेले होते. पण अमेरिकेने त्यात हस्तक्षेप करून शरीफ़ यांना माघार घ्यायला लावले. पुढे त्याचा सुड जनरल मुशर्रफ़ यांनी कसा घेतला होता? एके दिवशी मुशर्रफ़ आपला श्रीलंका दौरा संपवून माघारी मायदेशी येत होते. तर त्यांचे विमान पाक विमानतळावर उतरू देण्यास शरीफ़ यांनी मनाई केलेली होती. त्यावर लष्कराने उठाव करून शरीफ़ यांनाच अटक केली आणि मायदेशी येताच मुशर्रफ़नी आपल्या पंतप्रधानाला गजाआड ढकलले होते. देशात लष्करी सत्ता जाहिर करून नागरी हक्क रद्दबातल केले होते. शरीफ़ यांना देशाचे पंतप्रधान असूनही मायदेशात आपली बाजू मांडण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते काय? लष्करी बंदोबस्तामध्ये त्यांच्यावर खटला भरला गेला. त्यात न्यायालयानेही हस्तक्षेप करू नये म्हणून सरन्यायाधीशालाही गप्प बसवण्यात आले होते. त्या देशाचे नाव पाकिस्तानच होते ना? ज्याचा आवाज दडपला गेला, त्याचे नाव नवाज शरीफ़ असेच होते ना? मग शरीफ़ आज कुठल्या आवाजाबद्दल व दडपशाहीबद्दल बोलत आहेत? प्रकरण तिथेच थांबले नाही. शरीफ़ यांना जीव वाचवण्यासाठी संपुर्ण कुटुंब घेऊन अंगावरच्या कपड्यानिशी मायभूमी सोडावी लागली होती. सौदी अरेबियाच्या सुलतानाने हस्तक्षेप करून त्यांना आश्रय दिला, म्हणून शरीफ़ आज जिंदा आहेत. हे त्यांना अजिबात आठवत नाही काय?

विस्मृती किती असावी? शरीफ़ यांना नुसते परागंदा व्हावे लागले नव्हते, तर त्यांच्या कुटुंबाच्या जितक्या मालमत्ता व उद्योगधंदे आहेत त्यावर पाणी सोडावे लागले होते. आवाज दडपणे म्हणजे काय, याचा यापेक्षा भयंकर अनुभव अन्य कुठल्या जागतिक वा राष्ट्रीय नेत्याला आलेला नसेल. असा अनुभव घेणार्‍याने काश्मिरातील भारतीय पोलिस कारवाईला आवाज दडपणे म्हणायचे हा विनोद नाही काय? अशी ही एकमेव घटना नाही. लियाकत अली नावाच्या प्रारंभिक पंतप्रधानालाही याच मार्गाने थेट जन्नतमध्ये पाठवून दिलेले होते. शरीफ़ नशीबवान म्हणायचे. त्यांना जन्नतमध्ये पाठवण्याऐवजी मक्का मदिनेच्या यात्रेला जाऊ देण्यात आले. पाकिस्तानात किती अभिव्यक्ती स्वातंत्र आहे आणि आवाज कुणाला स्पष्टपणे बोलण्याइतका मोठा करता येतो; हा शास्त्रीय संशोधनाचा विषय आहे. अशा देशाचा पंतप्रधान भारतातील जनतेचा आवाज दडपला जातो, म्हणून टाहो फ़ोडतो. हा विनोद नाही तर दुसरे काय असू शकते? त्याच देशाचे राष्ट्रसंघातले माजी राजदूत हक्कानी दिर्घकाल अमेरिकेत ठिय्या देऊन बसले आहेत. कारण पाकिस्तानचे सत्य बोलल्याने त्यांना मायदेशी परतण्याची भिती वाटते आहे. शरीफ़ सौदीमध्ये आश्रय घेऊन बसले असताना त्यांना पाकिस्तानात परत येण्याची मुभा होती काय? ती कोणाची गळचेपी होती? पुढल्या काळात त्यांचीच गळचेपी करणारे जनरल मुशर्रफ़ परदेशी पळून गेले आणि दिर्घकाळ न्यायालयाला सामोरे जायचे भय असल्याने दुबई-लंडन अशा वार्‍या करीत होते. तेव्हा कोणाचा आवाज दडपला गेला होता? निवडणूकीच्या सभेतच बेनझीर यांच्यावर बॉम्ब फ़ेकून हत्याकांड झाले, त्याला उच्चार स्वातंत्र्य म्हणतात काय? शरीफ़ कुठल्या देशाबद्दल व कसल्या स्वातंत्र्याबद्दल मुक्ताफ़ळे उधळत आहेत? ज्यांना ब्रिटिश गेल्यानंतरही स्वातंत्र्याची चव चाखता आलेली नाही, अशा जनतेला जग पाकिस्तान म्हणून ओळखते ना?

काही वर्षापुर्वी सिंध प्रांताचे गव्हर्नर असलेल्या व्यक्तीला कोणी कशासाठी ठार मारले होते? पाकमधील वादग्रस्त धर्मनिंदा कायदा रद्द व्हावा, अशी मागणी काही लोकांनी केलेली आहे. तिला पाठींबा देणारे मतप्रदर्शन केले म्हणून त्या गव्हर्नरवर त्याच्याच अंगरक्षकाने गोळ्या झाडल्या होत्या. बलुचिस्तानपासून बाल्टीस्थान, फ़ाटा अशा अनेक प्रदेशात सरसकट सामान्य माणसांची मुस्कटदाबी चालू असल्याच्या बातम्या येत असतात. तिथून परदेशी फ़रारी परागंदा झालेले शेकडो निर्वासित युरोप अमेरिकेत आश्रय घेऊन आहेत. ते सदोदित पाकच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवत असतात. त्यांना पकिस्तानातच आवाज उठवता आला असता, तर परदेशी परागंदा आयुष्य जगावे लागले असते काय? पंतप्रधान गव्हर्नरपासून सामान्य जनतेपर्यंत कुणालाही आपला आवाज उठवण्यासाठी परदेशी आश्रय घ्यावा लागतो, अशा देशाचा पंतप्रधान म्हणून नवाज शरीफ़ जेव्हा काश्मिरी जनतेचा आवाज उठवण्याच्या गोष्टी बोलतात, तेव्हा म्हणूनच विनोद होत असतो. त्यांना स्वातंत्र्य, न्यायासाठी आवाज उठवणे अशा शब्दांचे अर्थ तरी ठाऊक आहेत काय? काश्मिरी नेत्यांना परदेशी परागंदा होऊन आश्रय घ्यावा लागलेला नाही. इथेच बसून फ़ुटीरपणाच्या घोषणा देण्य़ाचेही स्वातंत्र्य उपलब्ध आहे. त्यातला कोणीही परदेशी पळून जाण्याचा विचारही करत नाही. ह्याला आवाज दडपणे म्हणतात काय? मग आवाज उठवण्याची व्याख्या शरीफ़ कशी करतात? त्यांनाच मुशर्रफ़ यांनी जीव मूठीत धरून पाकिस्तानातून पळायला भाग पाडले; ते आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य असते काय? मुर्खाच्या नंदनवनात हे लोक वावरत असतात. त्यांना आपले अनुभव सुद्धा काहीही शिकवू शकत नाहीत. त्यांचे भवितव्य काय असी शकते? सिरीयातून लाखो नागरिक अंगावरच्या कपड्यानिशी पळत सुटले आहेत, तशी स्थिती आल्याखेरीज यांना अक्कल येणार नाही.

1 comment: