Thursday, June 29, 2017

आभारी आहोत, हाशमीजी

shabnam hashmi teesta के लिए चित्र परिणाम

स्वत:ला समाजसेवी किंवा समाज हितकर्ते म्हणवून घेणारी एक जमात सध्या देशोधडीला लागलेली आहे. मागल्या दहापंधरा वर्षात त्यांची दुकाने फ़ार तेजीत चालली होती. त्यापैकीच शबनम हाशमी या एक आहेत. त्यांच्याइतक्याच ख्यातनाम तीस्ता सेटलवाड आजकाल कुठे गायब झाल्यात, त्याचा पत्ता नाही. अशा लोकांच्या टोळ्या देशभर पसरलेल्या आहेत आणि ते अधूनमधून आपल्या जुन्या नाटकाचे नव्या संचामध्ये प्रयोग सादर करीत असतात. गुजरातच्या दंगलीने त्यांना मोठीच संधी दिली होती. पण त्याचा अशा लोकांनी इतका अतिरेक केला, की लोकांनी त्यांच्या समवेत त्यांच्या राजकीय प्रायोजकांनाही राजकारणातून हद्दपार करून टाकलेले आहे. पण सवयीचे गुलाम कधी सुधारत नाहीत. त्यामुळेच आता शबनम हाशमी यांनी त्यांचा कुठलासा पुरस्कार परत देण्याचे नाटक नव्याने आरंभले आहे. त्यांच्यामागून इतर कोण कोण पुरस्कार परत करतात, ते बघायचे. दिड वर्षापुर्वी अशीच एक स्पर्धा जो्रात सुरू झालेली होती. दिल्लीनजिक दादरी येथे एका मुस्लिम गृहस्थाला गोमांस खातो अशा संशयावरून जमावाने घरात घुसून ठार मारण्याची दुर्दैवी घटना तेव्हा घडलेली होती. अशा घटना वेळोवेळी अनेक प्रांतात घडत असतात. तेव्हा यापैकी कोणा समाजसेवकाला उमाळा आलेला नव्हता. आताही अधूनमधून केरळात विविध जागी संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्येचा सपाटा चालला आहे. पण त्याची दखल घेऊन एक निषेधाचे पत्रक काढण्याची इच्छाही या हाशमी बाईना झालेली नव्हती. त्यांना कुठे कोण मुस्लिम मारला जातो याची प्रतिक्षा होती आणि हरयाणातील जुनैद नामक मुस्लिम तरूणाची भोसकून हत्या झाल्यावर उमाळा आला. तात्काळ त्यांनी आपला पुरस्कार परत करण्याची डरकाळी फ़ोडून टाकली. पण हा पुरस्कार त्यांना मिळालाच कशाला होता, त्याची कोणी चर्चा करत नाही.

गुजरात दंगलीत त्यांनी म्हणे फ़ार अप्रतिम काम केले व दंगलपिडीतांना न्याय देण्यासाठी अफ़ाट कार्य केले; म्हणून अल्पसंख्य आयोगाने त्यांना हा पुरस्कार दिला होता. तो पुरस्कार २००८ सालात मिळाला आणि तेव्हा देशाची सत्ता युपीएपाशी होती. ज्या युपीए सरकारने इशरत जहान ह्या तोयबा पुरस्कृत तरूणीच्या हत्येसाठी गुजरात पोलिसांना आरोपी बनवण्याचे कारस्थान शिजवले, त्यानेच हाशमी यांना पुरस्कार दिलेला होता. यातच सर्व काही आले. इशरत ही पाकिस्तानची हस्तक होती. तरीही तिला निर्दोष ठरवून तिचा इतिहास शोधणार्‍या राजेंद्रकुमार नावाच्या गुप्तचार अधिकार्‍याला गुन्हेगार ठरवण्यासाठी युपीए सरकार अहोरात्र कष्ट घेत होते. शिवाय गुजरात सरकार व पोलिसांना गुन्हेगार ठरवण्यासाठी हाशमी व सेटलवाड अखंड राबत होते. त्यामुळे यांना कसला व कशाला पुरस्कार मिळाला होता, ते लक्षात येऊ शकते. उलट त्याच काळात हिंदू दहशतवाद नावाचा एक भ्रम अगत्याने पसरवला जात होता. त्याही कामी असे समाजसेवी लोक सरकारला हातभार लावत होते. त्यांना पुरस्कार कशासाठी मिळालेला असू शकतो? आता त्याला आठ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. पण अजून कुठलाही हिंदू दहशतवादाचा पुरावा यापैकी कोणी समोर आणू शकलेला नाही. पण त्यासाठी मालेगावचा बॉम्बस्फ़ोट व त्यात गोवलेले लोक यांचा सातत्याने वापर झाला. हा हिंदूफ़ोबिया ज्यांनी आजवर पोसला, त्यात हाशमी आघाडीवर राहिलेल्या आहेत आणि त्याच फ़ोबियातून इसिस सारख्या दहशतवादी संघटना जगभर हिंसा करीत आहेत. त्यांनी इस्लामोफ़ोबिया असा आरोप करून आपला पुरस्कार परत केला असेल, तर त्यांच्याकडून मोठेच पवित्र कार्य झाले असे म्हणायला हवे. कारण जोवर अशी दिशाभूल करणारी व समाजात गैरसमज पसरवणारी मंडळी देशात उजळमाथ्याने वावरत असतात, तोवर देशातील लोकसंख्येला सुरक्षित जगता येणार नाही.

काश्मिरात अनेक पोलिस व सुरक्षा रक्षक मुस्लिमांचीच अलिकडे लागोपाठ हत्या झालेली आहे. कालपरवा मशिदीच्या आवारात शेकडोच्या जमावाने महंमद अयुब नामक पोलिसाची ठेचून हत्या केली, तेव्हा हाशमी यांना कळवळा वाटल्याचा कुठला पुरावा आहे काय? अयुबही मुस्लिम होता आणि जुनैदही मुस्लिमच आहे, पण हाशमीबाई अस्वस्थ तेव्हा होतात, जेव्हा बिगर मुस्लिमाकडून मुस्लिम मारला जातो. मुस्लिमच मुस्लिमाकडून मारला गेला, तेव्हा हाशमीबाई ईद साजरी करत पक्वान्ने झोडत होत्या काय? तेव्हा त्यांच्याकडून चकार शब्द का उच्चारला गेला नाही? काश्मिरात वा केरळात अनेक हिंदूचे मुडदे पाडले गेले आहेत. ज्यांच्या हाती हत्यारे आहेत, अशा सैनिकांची हत्या झालेली आहे. तेव्हा यापैकी कोणाला जंतरमंतर येथे जाऊन आक्रोश करावा अशी बुद्धी होत नसेल, तर बुद्धी तरी कशाला म्हणायचे? मुस्लिम मारला गेला म्हणून ओवायसीने चिडावे किंवा बगदादीने बदल्याचा इशारा द्यावा, त्यापेक्षा हाशमी यांची भूमिका किती वेगळी आहे? त्यांच्यासारख्या तथाकथित सुबुद्ध म्हणवून घेण्यार्‍यांना कधी अन्य कुठल्या हत्याकांडाने उमाळा आलेला आहे काय? कालिचक या बंगालच्या तालुक्यात जमावाने पोलिस ठाणेच पेटवून दिले आणि अनेक हत्या केल्या. त्यात मारले जाणारे बहुतांश हिंदू होते. ज्यांची दुकाने व घरे जळून खाक झाली, तेही हिंदू होते. पण मालदा जिल्ह्यातील त्या पिडीतांसाठी ढाळायला यांच्यापाशी दोन तरी अश्रू होते काय? नसतील, तर त्यांचा आक्रोश निव्वळ नाटक असते आणि त्यांची बुद्धी विकृत असते, असेच मानायला हवे. किंबहूना असल्याच विकृतीला कंटाळून लोकांनी नरेंद्र मोदी यांना देशाची सत्ता सोपवलेली आहे. ज्या कारणाने देशातील बहुतांश मतदाराला मोदींची ओळख झाली, ती ओळख करून देण्यात शबनम हाशमी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासारख्यांनी गुजरात दंगलीतील तथाकथित पिडीतांच्या न्यायासाठी काही केलेच नसते, तर आज मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले नसते. या दांभिकतेला कंटाळूनच लोकांनी मोदींना कौल दिलेला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात देशामध्ये शेकड्यांनी दंगली झालेल्या आहेत आणि त्या गुजरातपेक्षाही भयंकर होत्या. अगदी गुजरातमध्येही भाजपाचे सरकार येण्यापुर्वी सातत्याने दंगली होत राहिल्या आहेत. मोदींच्या कारकिर्दीत झाली ती शेवटची दंगल होय. त्यानंतर मागल्या चौदा वर्षात तिथे एकही दंगल होऊ शकली नाही. सहाजिकच अशा समाजसेवी लोकांचा, मढ्यावरचे लोणी खाण्याचा धंदा अगदी बुडीत गेलेला आहे. त्यामुळे त्यांना काय करावे हेच सुचनासे झालेले आहे. अशा पुरस्कार वापसीने बिहार विधानसभेचे निकाल बदलले, अशी त्यांची समजूत असल्याने, पुन्हा नव्या दमाने त्यांनी जुन्या नाटकाचा प्रयोग आरंभला असेल तर बिघडत नाही. कारण अशा भंपक पुरस्कारवापसी वा निदर्शनांना आता सामान्य जनता किंमत देत नाही. त्यातला धंदा लोकांनी ओळखला आहे. ज्यांना काश्मिरात वा बंगाल केरळात मारल्या जाणार्‍या निरपरधांसाठी दोन अश्रू ढाळता येत नाहीत, त्यांच्या माणुसकीवर कोण विश्वास ठेवणार? पण एक गोष्ट साफ़ आहे. त्यांच्या अशा प्रयत्नांमुळेच मोदींना यश मिळालेले आहे आणि जितकी अशी नाटके अधिक होतील, तितका मोदींचा लाभच होणार आहे. कारण आता मुस्लिम वस्ती व भागातही या नाटकाचा लोकांना कंटाळा आलेला आहे. हे लोक आपल्या मृत्यू व यातनांवर गिधाडासारखे मेजवानी झोडतात, हे आता मुस्लिमांच्याही लक्षात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी नवनवी वा जुनीपुराणी नाटके रंगवण्याने काहीही बिघडणार नाही. त्यांचीच उरलीसुरली पत बाजारात शिल्लक उरणार नाही. कितीही वेगवेगळे मुखवटे त्यांनी पांघरले, तरी त्यांचा चेहरा लोक ओळखू लागले आहेत. म्हणूनच त्याला कोणी फ़सायचे दिवस राहिलेले नाहीत. मोदी सत्तेत असल्याने कोणाचे मुडदे पडत नसतात आणि पुरोगामी सरकार असल्याने मुस्लिम वा हिंदू सुरक्षित होत नसतात, हे आता अडाण्यांनाही उमजलेले आहे.

‘आप’की औकात



चार वर्षापुर्वी आम आदमी पक्षाची स्थापना झालेली होती आणि तेव्हा आपल्याला राजकारण करायचे नाही, तर राजकारण बदलायचे आहे, असे अरविंद केजरीवाल व त्यांची टोळी अगत्याने प्रत्येक क्षणी बोलत होती. आज चार वर्षानंतर त्यांनी राजकारणात कुठला बदल घडवून आणला, ते आपण स्वच्छ बघू शकतो आहोत. वास्तव जीवनात आपण ज्याला चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणतो, त्यापेक्षा या नव्या राजकारण्यांनी नवी कुठली भर राजकीय क्षेत्रात घातलेली नाही. गुंडगिरी, दंगलखोरी वा भ्रष्टाचार हे मागल्या तीनचार दशकात भारतीय राजकारणाचे महत्वाचे घटक बनलेले होतेच. पण निदान असे काही उघडकीस आले, म्हणजे त्यात गुंतलेल्या व्यक्तीला त्या त्या पक्षाने हाकलून लावले, किंवा पक्षातून गचांडी दिलेली होती. पण केजरीवाल यांनी अशा प्रत्येक गुन्ह्याचे आणि त्यातल्या बदमाशीचे उदात्तीकरण करण्याचा नवा पायंडा पडलेला आहे. कलमाडी वा तत्सम भ्रष्टाचाराचा गाजावाजा देशात चालू होता, त्याच काळात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी केजरीवाल टोळीने कंबर कसलेली होती. त्या भ्रष्टाचाराला आळा घालणे दूरची गोष्ट झाली. या टोळीने मनसोक्त भ्रष्टाचार करून अल्पावधीत किती मोठा भ्रष्टाचार व अफ़रातफ़री बेधडक कायदे धाब्यावर बसवून करता येतात, त्याचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. आता तर त्यांनी विधानसभेतही नित्यनेमाने हाणामारी व गुंडागर्दी करता येते त्याचा नवा दाखला पेश केला आहे. याच विधानसभेत प्रथम बोलताना मुख्यमंत्री झालेले केजरीवाल म्हणाले होते, आम्हाला राजकारणात येण्य़ाचीच गरज नव्हती, जर आधीच्या पक्षांनी उत्तम राजनिती केली असती, तर आम्हाला नवख्यांना इथे येण्याची काय गरज होती? आमची काय औकात आहे? पण आम्ही आलोय, कारण आम्हाला राजकारणाची परिमाणे बदलायची आहेत. ती कोणती? त्याचे उत्तर आता आम आदमी पक्ष देत आहे.

पहिली गोष्ट म्हणजे इतक्या वेगाने कुठल्याही मंत्रीमंडळातील इतक्या मंत्र्यांना दोन अडीच वर्षात लाथ मारून हाकलण्याची पाळी आजवर कुठल्याही भारतीय मुख्यमंत्री वा सरकारवर आलेली नव्हती. अवघ्या सहा सदस्यांच्या मंत्रिमंडळातील तीन सदस्यांना पहिल्या वर्षातच फ़ौजदारी गुन्हे व आरोपासाठी हाकलून लावण्याची वेळ आलेली होती. उलट कुठलाही आरोप नसलेल्या कपील मिश्रा नामक मंत्र्याला मात्र केजरीवालनी अकारण हाकलून आपल्याला निष्कलंक सहकारी वा मंत्री चालत नसल्याचा निर्वाळा अलिकडेच दिलेला आहे. दोन महिन्यापुर्वी दिल्लीतल्या महापालिका निवडणूका झाल्या, तेव्हा कपील मिश्रा यांनी पाणी खात्यामध्ये किती अप्रतिम कामे केलेली आहेत, त्याचे हवाले देत केजरीवाल यांनी दिल्लीकरांकडे मते मागितली होती. पण निकाल समोर आल्यावर त्याच मंत्र्याला हाकलून लावत बडतर्फ़ही केले. पण त्याच कपील मिश्रावर अजून कुठलाही आरोप होऊ शकलेला नाही. तरी केजरीवालनी त्यालाच बडतर्फ़ केले. याच्या उलट बाकीच्या तीन मंत्र्यांवर सतत आरोप होत असताना केजरीवाल त्यांना पाठीशी घालत राहिले होते. किंबहूना त्यांच्यावरील आरोप फ़ेटाळण्यात केजरीवाल यांचाच पुढाकार होता. त्याच केजरीवाल यांच्यावर मिश्राने भ्रष्टाचाराचा आरोप केला. तर त्याच्या आरोपाचा खुलासा करण्यापेक्षा केजरीवाल बिळात जाऊन बसले आणि त्यांचे बगलबच्चे उलटे कपील मिश्रावर आरोप करण्यात मशगुल झाले. थोडक्यात आपल्यावर आरोप झाले वा त्याचे पुरावे समोर आणले गेल्यास, उलट आरोप करून पळ काढणे ही या नव्या राजकारण्यांची कार्यशैलीच होऊन गेली. आजवरच्या मुरब्बी भ्रष्टाचार्‍यांनीही थक्क होऊन बघावे, इतका भ्रष्टाचार व राजरोस गुन्हे करण्याची अशी हिंमत, ही आम आदमी पक्षाने भारतीय राजकारणाला दिलेली मोठी भेटच मानावी लागेल. त्यातून त्यांनी जणू आपली औकातच सिद्ध केलेली आहे.

Image may contain: 1 person, text

बेशरमपणाचे उदात्तीकरण ही या नव्या पक्ष व त्याच्या नेत्यांनी भारतीय सामाजिक जीवनाला दिलेली अत्यंत हिडीस देणगी आहे. मागल्या खेपेस कपील मिश्रा नावाच्या यांच्याच माजी मंत्री व आमदाराने विधानसभेत काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयास केला असता, त्याच्यावर पक्षाचे आमदार धावून गेले. दोनतीन अन्य पक्षाचे आमदार हाकलून बाहेर काढण्यात आले. थोडक्यात विधानसभेत निर्विवाद वा क्रुर बहूमत असल्याच्या बळावर जे दोनचार विरोधी आमदार आहेत, त्यांचा आवाजही ऐकू येऊ नये, इतकी मुस्कटदाबी करून दाखवण्याचा नवा विक्रम या पक्षाने व केजरीवाल यांनी करून दाखवला. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला तर त्याचाही आपण किती सहजपणे गळा घोटू शकतो, त्याचा यशस्वी प्रयोग या लोकांनी करून दाखवला आहे. पण त्यांचे समर्थन करणार्‍या तथाकथित बुद्धीवादी शहाण्यांना या गुन्हेगारी प्रवृत्तीची अजून शरम वाटलेली नाही. आपण कधीकाळी या व्यक्ती व त्यांच्या चळवळीचे समर्थन केले वा त्यांना मदत केली, याचीही ज्यांना शरम वाटत नाही, त्यांना कोणी कसे बुद्धीवादी म्हणावे? इतकी इतरांची गळचेपी करणार्‍यांनी इतरांवर मात्र मुस्कटदाबीचे आरोप करीत रहावे, याला सामान्य भाषेत बेशरमपणा म्हणतात. पण आजकाल बेशरमपणालाच अब्रुदार मानले जात असेल, तर केजरीवाल त्याला कसे अपवाद असतील? अर्थात यात नवे काहीच नाही. आपल्या आरंभीच्या वागण्यातून व कृतीतून त्यांनी अशा पराक्रमाची चाहुल दिलेली होती. काही क्षणात कुठेही जमाव उभा करून दगडफ़ेक व दंगल पेटवण्याची क्षमता केजरीवाल वा शिसोदियांनी आधीच दाखवलेली होती. तरीही उत्साहाच्या भरातला आगावूपणा म्हणून दिल्लीकरांनी काणाडोळा केलेला होता. पण एका वर्षातला अनुभव घेतल्यावर त्यांनी पोटनिवडणूक व पालिका निवडणूकीत या नव्या प्रयोगाला साफ़ नकार दिलेला आहे.

असल्या नव्या प्रयोग व स्वच्छ राजकारणापेक्षा भाजपा वा कॉग्रेसचा भ्रष्ट कारभार परवडला, असाच निकाल पालिका मतदानातून लोकांनी दिलेला आहे. मागल्या दहा वर्षात भाजपाने काही उत्तम कारभार दिल्लीमध्ये केलेला नव्हता. तरीही लोकांनी मोठ्या संख्येने भाजपाला पुन्हा महापालिकेची सत्ता दिली. कारण भाजपाचा गैरकारभार वा भ्रष्टाचार आम आदमी पक्षाच्या अराजक लूटमारीपेक्षा खुपच सुसह्य आहे. असेच दिल्लीकरांना वाटू लागलेले आहे. अर्धवट खड्डे व कचर्‍याचे ढिग माजलेले परवडले. पण कुठल्याही कामाशिवाय नुसती कागदी बिले बनवून दिल्लीच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची लूटमार करणारा केजरीवाल यांचा कारभार लोकांना भयभीत करून गेला आहे. त्याविरुद्ध कपील मिश्रा व भाजपाच्या आमदारांचा आवाज दडपला गेला, तर आता पक्षाचेच कार्यकर्ते विधानसभेत निदर्शने करू लागले आहेत. अशाच दोघा आप कार्यकर्त्यांनी बुधवारी विधानसभेत पत्रके फ़ेकून घोषणा दिल्या, तर आमदारांनी तिथेच त्यांना गाठून इतके मारले, की इस्पितळात उपचारासाठी न्यावे लागले. असे विधानसभेत गोंधळ घालणे ही त्या कार्यकर्त्यांची चुकच होती. पण त्यांना गुन्हेगार गुंडासारखी मारहाण करणार्‍या आमदारांचे काय? जशी तीन वर्षापुर्वी दिल्लीत भाजपा मुख्यालयावर आपच्या गुंडांनी दगडफ़ेक केली होती, तशीच आता विधानसभेतही होऊ लागली आहे. मग केजरीवाल यांनी देशाच्या राजकारणाला कोणती नवी कार्यशैली दिली, त्याची चुणूक मिळू शकते. म्हणूनच विधानसभेत त्यांनी प्रथमच काढलेले उदगार आठवतात. आमची औकात काय आहे? आपण काय लायकीचे आहोत त्याविषयी आम आदमी पक्षाच्या नेते आमदारांनी सादर केलेला हा पुरावा आहे. आपण अट्टल गुन्हेगार आहोत, याची यापेक्षा अन्य कुठली कबुली असू शकते? गुंड पांढरपेशा असला, तर किती भयंकर असू शकतो, त्याचे हे उदाहरण आहे.

Wednesday, June 28, 2017

वाचाळ धर्मगुरूंची बडबड

khameni rohani के लिए चित्र परिणाम

एका बाजूला चीन चरफ़डतो आहे. कारण भारताने अफ़गाणिस्तानसह इराणला हाताशी धरून पाकला एकाकी पाडणारा हवाई महमार्ग करार केला आहे. त्यात पाकिस्तानच एकाकी पडलेला नाही, तर चीनने पाकिस्तानमधून आपल्या पश्चीमेकडील झिंगझॅंग प्रांताला जोडणारा महामार्ग उभारण्यात घातलेली गुंतवणूक कामाची राहिलेली नाही. कारण ह्याच मार्गाने अरबी सागरात आपला वरचष्मा चीनना स्थापित करायचा होताच. पण त्याबरोबर त्याला आसपासच्या अन्य लहानमोठ्या देशांना या महामार्गाशी जोडून आपले वर्चस्व स्थापन करायचे होते. पण भारताने इराणच्या चबाहार बंदराच्या विकासातून नवा पर्याय दिलेला आहे. अफ़गाणिस्तानला सागरी किनारा नाही. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर मालवाहतुक व व्यापार करण्यासाठी त्याला सतत पाकिस्तानवर अवलंबून रहावे लागले आहे. त्याला चबाहारच्या रुपाने पर्याय उभा रहातो आहे. त्यात भारतानेच पुढालार घेतला आहे. अफ़गाणिस्तानला इराणच्या या नव्या बंदराशी थेट जोडणारा महामार्गही भारताने उभारून दिलेला आहे. मग चिनच्या पाकिस्तानातील ग्वादार बंदरासाठी कोण लाचार होणार? म्हणूनच सध्या चीनचा जळफ़ळाट सुरू झाला आहे. कारण चबाहारमुळे अफ़गाणिस्तानातील महामार्ग मध्य आशियातील अन्य देशांनाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चीनी-पाकिस्तानी ग्वादार बंदराची अपरिहार्यता निकालात निघाली आहे. ही व्यवहारी बाजू झाली, तरी त्यामुळे राजकीय बाबतीत सर्व गोष्टी सरळ होत नसतात. अन्य देशांप्रमाणेच इराणमध्येही सत्तेचा संघर्ष आहे. सहाजिकच तिथल्या सत्तेला अपशकून करणारेही कमी नाहीत. इराणमध्ये कट्टरपंथी व मवाळपंथी अशी विभागणी झालेली आहे. त्यातला मवाळपंथ सत्तेत आल्याने कट्टरपंथी विचलीत झालेले आहेत. त्यांनी देशाच्या हितापेक्षाही स्थानिक राजकारणाला फ़ोडणी दिलेली दिसते.

भारतात जसे काही राजकीय गट मोदी विरोधासाठी देशांच्या शत्रूला उपयुक्त ठरेल इथपर्यंत बेताल वागतात, तसेच काहीसे इराणमध्ये घडू लागलेले आहे. रुहानी नावाचे अध्यक्ष दुसर्‍यांदा इराणमध्ये निवडून आले. त्यांच्या विरोधात तिथले धर्मगुरू एकवटलेले आहेत. तरीही रुहानी यांनी सत्ता पुन्हा मिळवली आहे. सहाजिकच आपला घटणारा प्रभाव त्या धर्मगुरूंना विचलीत करत असल्यास नवल नाही. म्हणूनच हा धर्मगुरूंचा गट सतत सत्ताधारी रुहानी यांना अपशकून करण्याचे उद्योग करत असतो. आताही अफ़गाण, इराण व भारत यांच्यात हवाई महामार्ग व अन्य बाबतीत संगनमत झालेले आहे. तर त्याला अपशकून करण्याची खेळी इराणचे आयातुल्ला खामेनी यांनी केलेली आहे. काश्मिरच्या बाबतीत भारत हळवा असताना इराणने कधीच पाकिस्तानची तळी उचलून धरलेली नाही. पण अकस्मात रमझान इदच्या निमीत्ताने मुस्लिमांना शुभेच्छा देताना खामेनी यांनी काश्मिरचा विषय उकरून काढलेला आहे. जगातल्या मुस्लिमांनी येमेन, बहारीन व काश्मिरी लोकांना अत्याचाराच्या विरुद्ध समर्थन द्यावे, असे आवाहन खामेनी यांनी केलेले आहे. यापैकी बहारीन वा येमेनमध्ये मुस्लिमांवर कोण अत्याचार करतो आहे? तो कोणी गैरमुस्लिम नसून सुन्नी पंथीय मुस्लिम राजकारणीच दडपशाही करीत आहेत. त्या दोन्ही देशात शिया मुस्लिमांना मताचा अधिकार नाही व दुय्यम नागरिक म्हणून वागणूक मिळत असते. त्यांनी मोर्चे काढले वा निदर्शने केली तर त्त्यांच्यावर गोळीबार करून मारलेही जाते. पण तसे काहीही काश्मिरात घडलेले नाही. उलट काश्मिरात मुस्लिमांना मतदानाचा अधिकार आहे आणि निदर्शने होतात. तेव्हा लष्करावरही दगडफ़ेक व हल्ले होत असतात. म्हणून बहारीन वा येमेनशी काश्मिरची तुलना होऊ शकत नाही. पण खामेनी यांनी तो अव्यापारेषु व्यापार केलेला आहे.

यातला गुंता समजून घेतला पाहिजे. भारत, अफ़गाण व इराण या तीन देशातील राजकीय सत्ता पाकिस्तानच्या उचापतखोरीने गांजलेल्या आहेत. त्यातून त्यांनी आपल्या सहकार्याचे धोरण आखलेले आहे. तर त्यात पाचर मारून आपल्याच देशाचे अध्यक्ष रुहानी यांना अडचणीत आणण्यासाठी खामेनी यांनी असे गोंधळ माजवणारे विधान केलेले आहे. आपल्याकडे सर्जिकल स्ट्राईकनंतर केजरीवाल यांनी शंका व्यक्त करून पाकिस्तानच्या हाती कोलित देण्य़ाचा उद्योग केला होता. तसाच काहीसा प्रकार आता खामेनी यांनी केला आहे. देशांतर्गत राजकारणाला शह देण्यासाठी खामेनी यांनी पाकिस्तानला काश्मिर विषयातले कोलित देऊन भारताला डिवचण्याचा उद्योग केला आहे. जेणे करून रुहानी यांच्यावर भारत सरकारने नाराज व्हावे. अ्साच खामेनी यांचा हेतू आहे. म्हणून त्यांनी सराईतपणे काश्मिर इतकाच उल्लेख न करता, त्याला बहारीन व येमेन जोडलेले आहेत. पण त्या दोन देशातील मुस्लिम शियापंथीय आहेत आणि वादही मुस्लिमांच्या दोन पंथातील राजकारणाचा आहे. काश्मिरातील समस्या तशी मुस्लिम पंथीय विवादातून आलेली नाही. ती प्रादेशिक व विभाजनवादी नाही. काश्मिरात मुस्लिमांचा प्रश्न कुठेच नाही. तिथल्या काही लोकांना पाकमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे आणि उर्वरीत बहुतांश मुस्लिम स्वत:ला भारतीय नागरिक मानून जगण्यात सुखी आहे. त्यामुळे मुस्लिम वा शिया म्हणून काश्मिरात कोणावर कुठला अत्याचार होत नाही. ही समस्या काहीशी इसिससारखी आहे. इराक वा सिरीयातील काही प्रदेश बळकावून बसलेल्या व तिथल्या शियापंथीयांना कापून काढणार्‍या सुन्नी वहाबी अतिरेकाने इसिस नावाचे भूत उभे केले आहे. काश्मिरही त्याच इसिसच्या भूमिकेतली समस्या आहे. म्हणूनच खामेनी यांनी काश्मिरच्या समस्येला येमेन बहारीनशी जोडणे निव्वळ दिशाभूल आहे.

अर्थात धर्मगुरू म्हणून धर्माचे काम करण्यापेक्षा राजकीय महत्वाकांक्षेने प्रवृत्त झालेल्या इराणच्या अशा धर्ममार्तंडांनी त्या देशाच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे नेह्मीच आणलेले आहेत. इराण दोन गटात विभागला गेलेला आहे. एका बाजूला प्रगत विचारांचा वर्ग तिथे बहुसंख्य आहे आणि दुसरीकडे इस्लामी क्रांतीनंतर संकुचीत वृत्तीच्या धार्मिक बंधनात नवी राज्यघटना बनवण्यात आली होती. त्यामुळेच लोकमताने निवडून आलेल्या सरकारचा लगाम, धर्मगुरूंच्या हाती सोपवण्यात आलेला आहे. त्यात तात्कालीन आयातुल्ला खोमेनी यांचा हात होता. पण त्यांच्यानंतर त्या पदावर येऊन बसलेल्या धर्मगुरू खामेनी यांना जनमानसावर तितके प्रभूत्व मिळवता आलेले नाही. सहाजिकच निवडणूका जिंकणारा राजकीय नेता आणि घटनेने अधिकार दिलेला धर्मगुरू, यांच्यात सातत्याने संघर्ष होत असतो. त्यांच्या आधीर्वादाने सत्ता प्राप्त केलेल्या अहमदीनिजाद यांनी मोठा घोळ घालून ठेवलेला होता. पण त्यांच्या जहाल राजकारणाला कंटाळलेल्या जनतेने अखेर मवाळपंथी नेत्यांना प्रतिसाद दिलेला आहे. पण त्यांचे पाय ओढण्याचे राजकारण धर्ममार्तंड खेळत असतात. आता अकस्मात खामेनी यांनी अकारण काश्मिरच्या बाबतीत केलेले विधान, त्यापैकीच एक आहे. मात्र त्याचा तितकासा परिणाम इराणच्या परराष्ट्र संबंधांवर होण्याची शक्यता नाही. कारण भारत सरकार त्यामागचा हेतू ओळखून आहे आणि अफ़गाण सरकारलाही खामेनी यांची लबाडी कळते आहे. सहाजिकच पाकिस्तानला काही काळ खाजवण्यासाठी असे वक्तव्य उपयोगी ठरले तरी त्याचा फ़ारसा राजकीय लाभ उठवता येणार नाही. कारण चीन, अमेरिका व भारत यांच्याही दरम्यान काही मुत्सद्देगिरी चालू आहेच. जागतिक राजकारणात व घडामोडीत अशा किरकोळ वक्तव्याचा फ़ारसा प्रभाव पडू शकत नाही. पण केजरीवाल यांच्याप्रमाणे खामेनी यांना त्याच्याशी कर्तव्य नसते. ते आपल्या संकुचित स्वार्थाने भारावलेले असतात.

Tuesday, June 27, 2017

मोदी‘भक्त’ कामाला लागले

modi cartoon kureel के लिए चित्र परिणाम

नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांना मोदीभक्त म्हणायची एक फ़ॅशन मागल्या तीन वर्षात निर्माण झाली. पण त्यामागे टवाळीचा हेतू असतो. वास्तविक अशा समर्थकांना भक्त संबोधणे, ही त्या शब्दाची विटंबना आहे. कारण खरा भक्त आपल्या दैवतासाठी झीज सोसत असतो, त्याग करत असतो. पण ज्यांना मोदीभक्त संबोधले जाते त्यातल्या क्वचितच कोणी मोदींसाठी कुठला त्याग केला असेल वा त्रास घेतला असेल. हे लोक बहुतांश बोलघेवडे आणि तोंडपाटिलकी करणारे आहेत. त्यांनी मोदींनी निवडून यावे किंवा राजकारणात यशस्वी व्हावे, म्हणून काय केले, त्याचा हिशोब कधी मिळू शकत नाही. मात्र मोदींचे खरे भक्त व त्यांच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट उपसणारे बाजूला पडलेले आहेत. त्यांच्या माथी मोदीत्रस्त वा मोदीद्वेषी असा शिक्का मारला जात असतो. त्यामध्ये ज्या शेकडो लोकांचा सामवेश आहे त्यापैकी एक म्हणून आपण महाराष्ट्रातले एक बुद्धीमान संपादक व व्यासंगी पत्रकार कुमार केतकरांना मोजू शकतो. अशा खर्‍या त्यागी भक्तांचे योगदान मिळाले नसते, तर मोदींना इतकी मोठी मजल मारता आली नसती, की पंतप्रधान होऊन जगभर मिरवता आले नसते. किंबहूना देशाला नरेंद्र मोदी नावाचा कोणी माणूस गुजरातचा मुख्यमंत्री आहे वा त्याची पंतप्रधान होण्याची क्षमता असू शकते, याचा जगाला थांगपत्ता लागला नसता. मोदीही शिवराज चौहान वा रमणसिंग यांच्याप्रमाणे आपल्या राज्यातच कुंठीत राहिले असते. पण केतकर आदिंनी तसे होऊ दिले नाही आणि आज आपल्या ह्या दैवताला पुढल्याही लोकसभा निवडणुकीता अभूतपुर्व यश मिळावे, म्हणून आतापासून असे भक्त कामाला लागलेले आहेत. तसे नसते तर इतक्यातच केतकरांनी २०१९ मध्ये अयोध्येचा राम अवतरला तरी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अशक्य. असल्याचा निर्वाळा देण्याची काय गरज होती? याला म्हणतात खरी भक्ती!

सध्या नरेंद्र मोदी त्यांनीच नियुक्त केलेले राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना निवडून आणण्य़ाच्या खटाटोपात गुंतले आहेत. इतक्या व्यापात असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मोदींना बोलावून घेतले. सहाजिकच मोदींना २०१९ च्या लोकसभा निवडणूकीचा विचारही करायला सध्या सवड नाही. अशा स्थितीत केतकरांनी एका संमेलनात ती जबाबदारी उचलली आहे. त्यांनी मोदींच्या पुढल्या लोकसभा प्रचाराचा नारळच फ़ोडला आहे. पाच वर्षापुर्वीही लोकसभा निवडणूकीला तब्बल दोन वर्षे बाकी असताना केतकर वा तत्सम लोकांनी मोदींची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा दिवास्वप्न ठरण्य़ाची आगंतुक भाषा सुरू केली होती. वास्तवात त्यावेळी मोदींना गुजरातचे मुख्यमंत्रीपद टिकवण्याची शर्यत धावायला लागत होती. आधी दोनदा जिंकलेली विधानसभा पुन्हा तिसर्‍यांना जिंकण्याच्या खटाटोपात मोदी गुंतलेले होते. त्यांनी सदभावना यात्रा काढलेली होती. तिथे शेकडो लोकांना नित्यनेमाने भेटून आपली प्रतिमा सुधारण्यात मोदी गर्क झालेले होते. तेव्हा केतकरांसारख्यांनीच असा माणूस पंतप्रधान व्हायला कसा नालायक आहे; त्याचे ढोल पिटायला सुरूवात केली. त्याच्या परिणामी मोदी पंतप्रधान पदाला लायक आहेत किंवा नाहीत, त्याचा विचार भारतीय जनमानसात रुजवला गेला. तेव्हा तर भाजपातही कोणी नेता प्रवक्ता याविषयी अवाक्षर बोलायला धजावत नव्हता. कितीही डिवचले, तरी भाजपाचे प्रवक्ते मोदींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबद्दल बोलायची हिंमत करत नव्हते. केतकर वा तत्सम कुणी प्रश्न केलाच, तर भाजपा नेते प्रवक्तेही बगल देऊन टाळाटाळ करीत होते. पण अशा खर्‍या मोदीभक्तांची चिकाटी मोठी दांडगी होती. त्यांनी भाजपाच्या अधिवेशनात मोदींना लोकसभेतील प्रचारप्रमुख नेमले जाईपर्यंत आपला हट्ट सोडला नाही आणि भाजपाला मोदींना राष्ट्रीय नेतृत्वासाठी निवडणे भाग पाडले होते.

नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले होते आणि त्यांनी पक्षाच्या संसदीय मंडळातूनही मोदींना डच्चु दिला होता. अशा भाजपाला मोदी राष्ट्रीय नेतृत्व करायला नकोच असल्याचा आणखी कुठला पुरावा हवा? पण केतकरांसारख्या निस्सीम मोदीभक्तांनी आपला हट्ट सोडला नाही आणि अखेरीस गडकरींच्या जागी अध्यक्ष झालेल्या राजनाथसिंग यांनी गोव्याच्या अधिवेशनात मोदींना प्रचारप्रमुख नेमले. तिथून मग केतकर आदि मोदीभक्तांना इतका जोश आला, की रोजच्या रोज भाजपाच्या नेत्यांवर आणि सामान्य भारतीयांवर त्यांनी मोदीनिंदेचा भडीमार केला. त्यातून या गुजरातच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आणूनच विश्रांती घेतली होती. हळुहळू त्यांच्या प्रयत्नांना यश येत गेले आणि मग उगवत्या सूर्याला दंडवत घालणारे अनेक तोंडपुज्ये वाचाळ मोदीसमर्थक जमा होत गेले. पण त्यापैकी कोणी कधी मोदींना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणण्यासाठी कवडीचे योगदान दिलेले नव्हते. आता त्याला पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला असून, आणखी दोन वर्षांनी पुढल्या लोकसभा निवडणूका व्हायच्या आहेत. अशावेळी पुन्हा खरे मोदीभक्त आघाडीवर येताना दिसत आहेत. तसे नसते तर केतकरांनी नांदेडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात अयोध्येतील रामाच्या नामाचा जप कशाला केला असता? नोटाबंदीपासून अनेक विषयामुळे लोक मोदींवर नाराज आहेत. म्हणूनच मोदींचा पराभव केतकरांनी वर्तवला आहे. सामान्य लोक सध्या संमोहनात असून लौकरच त्यांना शुद्ध येईल आणि २०१९ साली मोदी पराभूत होतील, अशी ग्वाही केतकरांनी दिली आहे. सहाजिकच संमेलनात उपस्थित असलेले तमाम मोदीभक्त सुखावले नसते, तरच नवल होते. मागल्या पाच वर्षात आपण कुठल्या संमोहनात गुंगून गेलेलो आहोत, त्याचा शोधही न लागलेल्यांच्या संमेलनात इतर काय अपेक्षित असू शकते?

केतकर म्हणतात, संमोहन अवस्थेतून बाहेर पडले मग दुखायला लागते. हे सत्य आहे. पण पाच वर्षाहून अधिक काळ उलटत आला तरी केतकरांसारखे मोदीभक्त अजून आपल्या पुरोगामी संमोहनातून बाहेर पडू शकलेले नाहीत. खरेच संमोहनातून बाहेर पडल्यावर दुखायला लागत असते, तर लोकसभेच्या त्या दारूण पराभवानंतर कॉग्रेस वा अन्य पुरोगामी पक्षांना दुखते आहे याची जाणिव नक्की झाली असती. आपण पराभूत झालोय इतके तरी नक्की उमजले असते. पण इतकी वर्षे उलटून गेली तरी केतकरांसह त्यांचे पुरोगामी सवंगडी कुठल्या संमोहनात फ़सलेत? मोदींची नोटाबंदी वा अन्य जुमले यांचा प्रभाव संपला, मग महागाईचे चटके लोकांना बसतील असे केतकर म्हणतात. ते कधी बसणार? कारण त्यानंतर अनेक निवडणूका झाल्या आणि त्यातही मोदींच बाजी मारून गेलेत. पण त्या निकालांनी आपल्याला दुखापत करणार्‍या कुठल्या किती जखमा झाल्यात, त्याकडेही वळून बघण्याची बुद्धी पुरोगाम्यांना सुचत नाही. तेव्हा हे पुरोगामी संमोहन किती प्रदिर्घकालीन असू शकते, त्याचे नवल वाटू लागते. त्याच संमोहनाची झिंग उतरली म्हणून लोकांनी पुरोगामी पक्षांना धुळ चारली. त्याचा परिणाम म्हणून मोदी जिंकलेले दिसतात. मोदींची लोकप्रियता त्यांना सत्तेवर घेऊन गेलेली नाही. पुरोगामीत्वाच्या चटके व वेदनांनी केतकरांच्या लाडक्यांना पराभूत केले आहे. खुज्या पुरोगामीत्वाच्या समोर मोदी उत्तुंग वा उंच वाटत आहेत. अन्यथा मोदी आहेत तितकेच सामान्य आहेत. मोदींच्या कर्तृत्वापेक्षाही सामान्य भारतीयांना पुरोगामी नाकर्तेपणाच्या भितीने भेडसावलेले होते. म्हणूनच मोदींना लोकांनी पसंती दिली. आता तीच पसंती कायम राखण्यासाठी केतकरांनी कंबर कसली आहे. मग मोदींना भिती कशाची? त्यांच्या विजयासाठी तमाम पुरोगामी सर्वशक्तीने मैदानात उतरले असतील, तर घरी बसूनही मोदी पुन्हा पंतप्रधान होणारच ना? मोदींना रामाचे वरदान नकोच आहे. केतकरांचे वरदान पुरेसे आहे.

Sunday, June 25, 2017

बेटी: लालूकी आणि बिहारकी

tejashwi-and-tej-pratap-yadav-and-misa-bharti

भाजपाने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार करून मोठा बेमालूम डाव टाकला; असे अनेक संपादक पत्रकारांचे आकलन आहे. पण त्या डावाला उत्तर देताना कॉग्रेस वा विरोधक कुठे फ़सले, ते अजून कोणाला सांगता आलेले नाही. दरम्यान चोख उत्तर म्हणून सोनियांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये मीराकुमार यांना विरोधकांचे एकमुखी उमेदवार घोषित करण्यात आले आहे. सहाजिकच दलित विरुद्ध दलित, अशी ही लढाई होऊ घातली आहे. मीराकुमार या लोकसभेच्या माजी सभापती आहेत आणि भारत सरकारच्या राजदूत मुत्सद्दी म्हणून त्यांनी अनेक देशात कामगिरी बजावलेली आहे. पण तेवढ्यासाठी त्यांना या पदासाठी उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपाने दलित उमेदवार टाकला, म्हणून युपीएने दलित उमेदवार पुढे करायची खेळी झाली आहे. त्यात योगायोगाने मीराकुमार बिहारच्या असल्याने त्यांच्यावर ‘बिहारकी बेटी’ असा शिक्का मारून त्या राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मतासाठी साकडे घालण्यात आलेले आहे. म्हणून तात्काळ नितीश यांचे सत्तेतील सहकारी लालूप्रसाद यांना बिहारच्या बेटीची ममता दाटून आलेली आहे. त्यांनी आपल्या सत्तेतील दोस्ताला कळवळून बिहारच्या बेटीला पाठींबा देण्यासाठी आवाहन केलेले आहे. लालूंचा हा कळवळा अनेकांना दांभिक वाटत असेल. पण आपली बेटी मिसा भारती व मीराकुमार यांच्यातले साम्य बहुधा लालूंना त्यातून प्रकट करायचे असावे. मात्र लालूंच्या अ़सल्या भावनात्मक आवाहनाला नितीश यांनी दाद दिलेली नाही. उलट त्यावर असा चोख खुलासा केला आहे, की त्यातून लालुंसह युपीएची बोलती बंद व्हावी. मीराकुमार यांना पराभूत होण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण त्याच लबाडीचे उदात्तीकरण मात्र तावातावाने चालू आहे. त्याचाच फ़ुगा नितीशनी फ़ोडून टाकला आहे.

‘बिहारकी बेटी’ या शब्दाचे अनेक अर्थ निघत असतात आणि त्याचे चटके यापुर्वी नितीशना अनेकदा बसलेले आहेत. दहा वर्षापुर्वी अहमदाबादच्या सीमेवर इशरत जहान नावाच्या एका ठाण्यातल्या मुलीला पोलिसांनी चक्मकीत ठार मारले होते. वास्तवात ती ठाण्याजनिक कळवा-मुंब्रा भागातील अनोळखी मुलगी होती. पण नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यात त्यांच्याच पोलिसांकडून इशरतचा चकमकीत मृत्यू झाल्यामुळे, विनाविलंब तिचे उदात्तीकरण सुरू झालेले होते. पुढे शोध लागला की इशरतचे मातापिता मुळचे बिहारचे असून, ते महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेले होते. सहाजिकच इशरतविषयी अनेकांना उमाळा आलेला होता आणि त्यात निती-लालूंचा पुढाकार असेल, तर नवल नाही. इशरत काय दिवे लावत होती, त्याची दखल अशा कोणाही नेत्याने कधी घेतली नाही. पण खोट्या चकमकीचा विषय आला म्हणताच, अनेकांना अकस्मात इशरत ‘बिहारकी बेटी’ असल्याचे साक्षात्कार झालेले होते. तेव्हा बिहारकी बेटी असा शब्दप्रयोग आला, की तो काळजीपुर्वक समजून घेण्याची गरज आहे. आता अचानक अनेकांना मीराकुमार ‘बिहारकी बेटी’ असल्याचा शोध लागला आहे आणि इशरतचे ‘वडिलधारे’ नितीशही ती जबाबदारी घ्यायला पुढे सरसावले आहेत. मात्र यंदा त्यांचा मूड बदलला आहे. बिहारकी बेटी पराभवाच्याच वेळी कशी आठवते, असा नितीशनी उलटा सवाल केलेला आहे. युपीएने मागल्या दोन राष्ट्रपती निवडणूका सहज जिंकल्या. तेव्हा विजयाची खात्री होती आणि बिहारच्या बेटीला तो मान मिळवून देण्याची इच्छा सोनिया किंवा युपीए यांना कशाला झाली नव्हती? यावेळी पराजयाची खात्री असताना मात्र बिहारची बेटी म्हणून मीराकुमारना पुढे करण्यात आले आहे. अशी चपराक नितीशनी हाणली आहे. इतकेच बेटीचे महत्व होते तर लालूंना आपलीच कन्या मिसा भारतीही बिहारची बेटी म्हणून पुढे करता आले असते ना?

मीराकुमार यांनी अलिकडल्या कालखंडात आपली स्वतंत्र ओळख दिली आहे. वास्तविक त्यांना राजकारणात संधी मिळाली ती पिताजींचा वारसा म्हणून. त्यांचे वडील बाबु जगजीवनराम हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता म्हणूनच सतत मंत्रीमंडळात राहिलेले होते आणि इंदिराजींनी आणिबाणी लादली, तिचा लोकसभेतील प्रस्तावही त्यांनीच मांडलेला होता. पुढे आणिवाणी उठली आणि निवडणूका लागल्या, तेव्हा बदलत्या राजकारणात बाबूजींनी इंदिराजींची साथ सोडून जनता पक्षात प्रवेश केला होता. अशा पित्याचा वारसा मीराकुमार यांना मिळाला आणि त्यांनीही पित्याच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण केले. पण सहसा त्यांची ओळख दलित नेता म्हणून कधी करून देण्यात आली नव्हती. तशी ओळख प्रथमच होत आहे. पण लालूंना या बिहारच्या बेटीविषयीचे कौतुक वेगळ्याच गोष्टीसाठी असण्याची शक्यता आहे. आजकाल भारत सरकारचे आयकर खाते व सक्तवसुली संचालनालय मिसा भारती व तिचे पतिराज, यांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. कारण या दोघांनी करोडो रुपयांचे व्यवहार करताना करबुडवेगिरी केल्याचा आरोप आहे. किंबहूना लालूंचे  संपुर्ण कुटुंबच सध्या आयकर बुडवेगिरीच्या जंजाळात फ़सलेले आहे. बहुधा त्याच कारणास्तव लालूंना साम्य आढळलेले असावे. कारण १९७० च्या दशकात मीराकुमार त्यांचे पिताश्री स्वर्गिय जगजीवनराम यांनाही त्याच कारणास्तव प्रसिद्धी मिळालेली होती. त्यांनी आयकर बुडवल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. पण त्यांनी बुडवेगिरीला विस्मरणाचे नाव दिलेले होते. तब्बल दहा वर्षे बाबुजींनी आयकर भरला नव्हता आणि चौकशी झाली तेव्हा आपण विसरूनच गेलो; असा खुलासा दिला होता. लालू त्याही पलिकडे गेलेले आहेत. त्यांनी असे कुठले व्यवहार झाले नाहीत वा आपल्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा कांगावा केला आहे.

बाबु जगजीवनराम यांची कन्या म्हणून मीराकुमर यांची ओळख करून देणार्‍यांना, त्या नेत्याच्या विस्मृतीचे विस्मरण आज कशाला झालेले असावे? अर्थात लालूप्रसाद यादवांना तितके विस्मरण झालेले नाही. म्हणून त्यांना मिसा भारती व मीराकुमार यांच्यातली ‘बिहारकी बेटी’ नेमकी ओळखता आलेली असावी. म्हणूनच त्यांनी आपल्या परममित्र नितीशकुमारांना पाठींब्यासाठी आवाहन करताना ‘ऐतिहासिक भूल’ होऊ नये असा इशारा दिलेला असावा. त्यातला हा इतिहास बहुधा जनता दल युनायटेडच्या अनेक नेत्यांनाही आठवत नसावा. त्या पक्षातल्या एका ‘त्यागी’पुरूषानेच त्या जनता काळात मीराकुमार यांचे बंधू सुरेश कुमार यांच्या अश्लिल छायाचित्रांचा गौप्यस्फ़ोट घडवून आणायला हातभार लावला होता. तो इतिहास खुप वादग्रस्त आहे. त्यात जाण्याची गरज नाही. आजच्या काळाशी सुसंगत असे एकच साम्य लालूकी बेटी आणि बिहारकी बेटी यांच्यात आहे, हे आयकराच्या संबंधीत. अर्थात जुना इतिहास कोणाला हवा असतो? जो सोयीचा असेल तितका इतिहास अभिमानाचा असतो, तर अडचण करणारा इतिहास विसरून जायचा असतो. राजकारणात हाच निकष असतो. त्यामुळेच नितीशना युपीएच्या दहा वर्षात मीराकुमारना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेली नव्हती, हा इतिहास आठवतो. पण आपल्याच ‘त्यागी’ सहकार्‍याच्या उचापती आठवत नाहीत. उलट लालूंना मीराकुमारच्या पित्याशी असलेले आपले साधर्म्य आठवून, मीराकुमार ‘बिहारकी बेटी’ असल्याचा साक्षात्कार होत असतो. राजकारण हा भामट्यांचे शेवटचे आश्रयस्थान असल्याचे सांगितले जाते, त्याचीच यातून प्रचिती येते. कधी त्यातला इतिहास सांगायचा तर कधी प्रादेशिक वा रक्ताचे नाते पुढे करायचे असते. बाकी कोणी कोणाचा नसतो. मग बोलणारे इकडले असोत की तिकडले असोत. तसे नसते तर परस्परांच्या उरावर बसलेले अण्णाद्रमुकच्या तिन्ही गटांचे कोविंद यांना मत देण्यविषयी एकमत कशाला झाले असते?

चळवळ अणि राजकीय पक्ष

गेल्या काही दिवसात शिवसेनेची प्रत्येक कृती हास्यास्पद होत असल्याने, तिच्या समर्थकांनाही आपली बाजु मांडणे अवघड होऊन बसले आहे. कुठली भूमिका कशाला घेतली वा नंतर कशाला बदलली, त्याचे उत्तर सापडत नाही. शेतकरी कर्जमाफ़ी असो किंवा राष्ट्रपती निवडणुकीचा विषय असो, त्यात सेनेच्या भूमिका वा वक्तव्ये सतत हास्यास्पद झाली आहेत. त्याला धरसोडवृत्ती म्हणायचे की वैचारिक गोंधळ म्हणायचे, असा प्रश्न समर्थकांनाही पडणे स्वाभाविक आहे. उदाहरणार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतात आम्ही मतांसाठी भूमिका घेत नाही. दलित उमेदवार भाजपाने राष्ट्रपती पदासाठी निश्चीत केल्यावर वर्धापनदिन सोहळ्यात असेच मतप्रदर्शन उद्धव ठाकरे यांनी केले होते. राजकारणात व निवडणूकीत वावरणार्‍या पक्षाला मतांसाठी भूमिका घ्यायच्या नसतील, तर त्यांनी लढतीमध्ये उतरायचे कशाला? निवडणूकीतला प्रत्येक पक्ष नेहमी मतांवर डोळा ठेवूनच भूमिका घेत असतो आणि नंतर त्या भूमिका बदलतही असतो. अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबही त्याला अपवाद नव्हते. १९७३ साली वंदेमातरम हा मुद्दा अटीतटीचा झाला आणि शिवसेनेने त्यावरच आपली मते मिळवण्याची पराकाष्टा केली होती. पण मतदान होऊन निकाल लागल्यानंतर साहेबांनी महापौर निवडून आणण्यासाठी चक्क मुस्लिम लीगचा पाठींबा घेतला होता. वास्तविक त्या निवडणूकीत वंदेमातरम विरोधात मते मागायला उभा असलेला पक्षच लीगचा होता. तरीही नंतर त्यांचा पाठींबा साहेबांनी घेतला होता. पण अशा दोन भूमिका निवडणूकीच्या आधी व नंतरच्या असतात. एकाच वेळी वा ऐन निवडणूकीत भूमिका कोणी बदलत नाही. त्या बदलल्या तर हास्यास्पद होण्याची पाळी अपरिहार्य असते. पण आजकाल शिवसेनेची तशी स्थिती सातत्याने होत आहे. कारण आपण राजकीय पक्ष आहोत की एक सामाजिक चळवळ आहोत, त्याचा निर्णय नव्या नेतृत्वाला करता आलेला नाही.

बाळासाहेबांनी शिवसेनेचे दोन भाग केले होते. ते दिसणारे नसले तरी व्यवहारात ते कायम होते. त्यांनी संघटनेवर आपले पक्के प्रभूत्व ठेवले होते आणि राजकारणात निवडणुका लढवणार्‍या नेत्यांना संघटनेत फ़ारशी ढवळाढवळ करू दिलेली नव्हती. कारण संघटना ही चळवळीच्या स्वरूपात होती. तर नेते व लोकप्रतिनिधी राजकारणाची धुरा संभाळत होते. जेव्हा या दोन गोष्टींची गल्लत सुरू होते, तेव्हा राजकारणात अपयश येते व तसेच चळवळही निकामी होऊ लागते. जेव्हा ठराविक भूमिका वा विचार घेऊन आपण प्रस्थापिताच्या विरोधात उभे रहात असतो, तेव्हा ती चळवळ असते. तिच्या राजकीय वा अन्य यशाशी लढणार्‍यांना कर्तव्य नसते. मेधा पाटकर किंवा अरविंद केजरीवाल यांनी ज्या चळवळी केल्या, त्यात त्यांना काय मिळाले; असे कोणी विचारू शकत नाही. त्याचे उत्तर त्यांनी अमूक एका विषयात लोकजागृती करायचे काम हाती घेतलेले असते. त्यातून त्या विषयात प्रस्थापित संकल्पनांना बदलण्याची प्रक्रीया सुरू करण्याचा उद्देश असतो. तो शंभर टक्के यशस्वी होतोच असे नाही. पण त्या विषयावर विचारमंथन सुरू होत असते. प्रस्थापित रचना वा नियम कायद्यांना त्यातून धक्का दिला जात असतो. हमीद दलवाई यांनी चार दशकापुर्वी मुस्लिम समाजातील तलाकपिडीत महिलांचा विषय हाती घेतला व चळवळ उभारली होती. त्यांच्या हयातीमध्ये त्यात एक पाऊलही पुढे पडले नव्हते. परंतु त्या जटील विषयाला तोंड फ़ोडले गेले होते. आज त्यावरून मुस्लिम समाजात मोठी घुसळण सुरू झाली आहे. सरकार व सर्वोच्च न्यायालयालाही त्यात दखल घ्यावी लागलेली आहे. हमीद दलवाईंची ती चळवळ होती. पण त्यांनी अशा चळवळीचे भांडवल करून कधी मते मिळवण्याचा वा निवडणूका लढवण्याचा विचारही केला नव्हता. उलट त्या चळवळीला विरोध करून अनेक पक्षांनी मुस्लिमांची मते मिळवण्याचे यशस्वी राजकारण दिर्घकाळ केले.

विषय एकच होता, तलाकचा! पण त्याच्या दोन बाजू बघता येतील. एका बाजूने लोकजागृतीला प्राधान्य दिले होते. तर त्यात राजकीय स्वार्थ बघणार्‍यांनी विरुद्ध बाजू घेऊन मतांचे राजकारण केले. त्यांना गुन्हेगार मानले जाणे सोपे आहे. पण राजकीय यश मिळवू बघणार्‍यांना लोकभावनांना झुगारून पुढे जाता येत नाही. त्यांना लगेच काही यश मिळवून दाखवावे लागते. सहाजिकच ज्यांना मुस्लिमांची मते हवी होती, त्यांनी तलाकपिडीतांपेक्षा मुस्लिम मतांचे गठ्ठे मिळवून देणार्‍या विरोधी भूमिकेचे समर्थन केले होते. अगदी कालपरवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने बांद्रा येथील बेहरामपाडा भागातील एका मुस्लिम उमेदवाराला तेवढ्यासाठीच उमेदवारी दिलेली होती. तो ओवायसी यांच्या पक्षातला कट्टर धार्मिक राजकारणाचा कार्यकर्ता होता. पण त्याच्या लोकप्रियतेमुळे शिवसेनेला एक नगरसेवक आयता मिळू शकतो, म्हणून पक्षप्रमुखांनी त्याच्या ओवायसी पार्श्वभूमीकडे काणडोळा केला होताच ना? त्याचा लाभ शिवसेनेला मिळालाच ना? कारण लोकशाहीत व निवडणुकीच्या र्मैदानात मते हीच शक्ती असते आणि तेच उद्दीष्ट असते. पण अलिकडल्या कालखंडात शिवसेनाच नव्हेतर अनेक पक्षांना आपण राजकीय पक्ष असल्याचा पुरता विसर पडला आहे आणि ते चळवळ असल्यासारखे वागून अपयश पदरी घेण्यात धन्यता मानू लागले आहेत. शिवसेना हा राज्यापुरता पक्ष आहे. कॉग्रेस किंवा डाव्या विचारांचे पक्ष तसेच वागत असतात. त्यांना मते देणार्‍या लोकांच्या भावनांची फ़िकीर राहिलेली नाही. त्यातून अपयश आले, मग त्यातले सत्य बघण्यापेक्षाही आपण भूमिकेशी पक्के असल्याचा टेंभा मिरवला जातो. पण म्हणून परिस्थिती बदलत नाही. त्यांनी चळवळ म्हणून भूमिका घ्यायला हरकत नाही. पण निवडणुकीच्या आखाड्यात उतरायचे अ़सेल तर चळवळ विसरून मतांची फ़िकीर करायला हवी.

शिवसेनेने शेतकरी हितासाठी आंदोलने करण्यात काही गैर नाही. समाजाच्या कुठल्याही घटकाचे हित विचारात घेऊन केलेल्या आंदोलनातून लोकांचा पाठींबा वाढतच असतो. त्याचा राजकीय लाभ दुरगामी असतो. पण चळवळ आंदोलन करताना त्यात आपल्या राजकीय भूमिका पणाला लावायच्या नसतात. चळवळ वा आंदोलन एका समाज घटकासाठी असते आणि राजकारण सर्वव्यापी सर्वसमावेशक असते. म्हणूनच राजकीय भूमिका वेगळी ठेवावी लागते. शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हायचे ठरवले असेल आणि त्यांचे काही मंत्री सरकारमध्ये सहभागी असतील, तर त्या सरकारचे सर्व निर्णय शिवसेनेलाही जबाबदार धरत असतात. म्हणूनच सरकारच्या विरोधात सतत बोलण्याने पक्ष व आंदोलन यांची गल्लत होत असते. शेतकरी हितासाठी शिवसेना राजकारणाला महत्व देत नसेल, तर कसोटीचा प्रसंग आल्यावर एका बाजूला ठामपणे उभे रहाणे भाग असते. सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा म्हणूनच चुकीची व हानिकारक असते. संघटना म्हणून आंदोलनात उतरणे भिन्न असते आणि सत्तेमध्ये सहभागी राहून शेतकरी हिताला बाधक निर्णयाला शक्ती देणे भिन्न असते. त्यातून दोन्हीकडला तोल जात असतो. आताही शेतकरी आंदोलनात आवेशपुर्ण बोलणार्‍या शिवसेनेला म्हणूनच राजकारणात निर्णायक पाऊल उचलण्याची हिंमत झाली नाही. मंत्र्यांना सत्तेबाहेर पडण्याचे धाडस करता आले नाही. पण त्यामुळे आंदोलनात पुढे असलेल्या शिवसेना नेते व कार्यकर्त्यांची तारांबळ उडत असते. विधानसभेत शेतकरी कर्जमाफ़ीचा विषय आल्यावर सेनेला गप्प बसावे लागले. त्याला अन्य कोणी जबाबदार नसून नेतृत्वच जबाबदार आहे. आपण आंदोलन आहोत, चळवळ आहोत, की राजकीय पक्ष आहोत, याचाच निर्णय पक्षनेतृत्वाला करता आलेला नाही. इथेच बाळासाहेबांचे वेगळेपण नजरेत भरणारे होते. त्यांची स्थिती अशी कधी द्विधा झाली नाही.

बाळासाहेब सत्तेपासून अलिप्त होते आणि ज्यांच्यावर सत्ता राबवणे सोपवले होते, त्यात त्यांनी धोरणात्मक बाजू सोडल्यास ढवळाढवळ केली नव्हती. सत्तेत आपला असो की विरोधक असो, त्यांनी चळवळ्या शिवसैनिकांची फ़ळी वेगळी राखलेली होती. ते आंदोलनाचा भडका उडवून देत आणि सत्तेतले वा राजकारणातले शिवसैनिक नेते कार्यकर्ते त्यांची पाठराखण करीत. पण दोघांची गल्लत कधी झाली नाही. निवडणुकीतल्या शिवसेनेला लागणार्‍या मतांची फ़िकीर बाळासाहेब करायचे. पण त्यात चळवळ करणार्‍यांचा बळी जाणार नाही, याचीही काळजी घ्यायचे. बोलघेवड्या आंदोलनाला तेव्हा स्थान नव्हते. कृतीला प्राधान्य होते. कृती करणार्‍यांना रसद व मदत देण्याची जबाबदारी निवडणुका लढवणार्‍यांवर होती. निवडणूकीत उतरणार्‍यांना मतांची पर्वा करावीच लागते. हाच भाजपा कॉग्रेस आणि मेधा पाटकर यांच्यातला फ़रक असतो. कारण सत्तेच्या लढाईत जिंकण्याला महत्व असते, नुसताच पराभूत व्हायला लढणार्‍यांना कोणी महत्व देत नाही, की त्यांची शक्ती कधी वाढत नाही. ह्याच तोंडाळपणाने समाजवादी, कम्युनिस्ट वा शेकाप असे डावे पक्ष महाराष्ट्रात रसातळाला गेले. कारण त्यांना चळवळ आणि निवडणूका यातला फ़रक निश्चीत करता आला नाही. मग त्यांच्याच मुर्खपणाने शिवसेनेला पोकळी निर्माण करून दिली आणि पाव शतकापूर्वी शिवसेना हा राज्यव्यापी राजकीय पक्ष बनून गेला. त्यातल्या नेत्यांवर पक्ष सोपवून बाळासाहेब शिवसेनेची चळवळ जोपासत राहिले आणि दोन्ही गोष्टी तोलामोलाने चालत राहिल्या. आज शिवसेनेचा तोच गोंधळ उडाला आहे. आपण पक्ष आहोत की एक चळवळ आहोत, त्याचेच स्पष्टीकरण नसलेले कार्यकर्ते, अशी सेनेची कोंडी झाली आहे. त्यात चळवळ थंडावली असून तोंडाळपणाने पक्षालाही नामोहरम करून टाकलेले आहे. त्यातून शिवसेना कधी बाहेर पडेल, तो सुदिन!

नितीश नावाचा भूकंप

nitish sonia के लिए चित्र परिणाम

सोमवारी भाजपाने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहिर केला, त्याने अजून प्रत्यक्षात अर्जही दाखल केलेला नाही. इतक्यातच महागठबंधन म्हणून मोर्चेबांधणी करणार्‍यांच्या बुडाखाली सुरूंग उडाला आहे. त्याचे खापर अर्थातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या माथी फ़ोडले जाईल यात शंका नाही. पण नितीशकुमार इथपर्यंत कसे पोहोचले, त्याकडेही बघणे अगत्याचे आहे. राजकारणाची वा त्यातही नेत्यांची बांधिलकी मानणार्‍यांना त्यांच्या चुका कधी दिसत नसतात आणि दिसल्या तरी त्या मान्य करायच्या नसतात. म्हणूनच मग अशा चुकांची किंमत मोजण्याची पाळी आली, मग नेत्यापेक्षाही त्याच्या स्तुतीपाठकांची तारांबळ उडत असते. लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी नितीश यांनी भाजपाची साथ सोडली होती आणि त्याची किंमत त्यांच्या इतकीच पक्षालाही मोजावी लागली होती. अखेरीस त्यांना आपली प्रतिमा व सत्ता जपण्यासाठी लालूंना शरण जावे लागले होते. पुरोगामीत्वाच्या नावाखाली त्याचा कितीही गौरव करण्यात आला, तरी प्रत्यक्षात आपली व्यक्तीगत प्रतिष्ठा धुळीस मिळते आहे; याचे भान नितीशना होते. म्हणूनच लालूंच्या मदतीने सत्ता संपादन केल्यापासून नितीश पुन्हा एनडीएमध्ये जाण्याचा रस्ता शोधू लागले होते. त्याचे कारणही खुद्द लालूप्रसादच होते. पहिली गोष्ट म्हणजे मोदी विरोधातील नितीशच्या अगतिकतेचा लालूंनी हवा तितका गैरफ़ायदा घेण्याला मर्यादा राहिली नाही. आपल्या दोन मुलांना मंत्रीमंडळात घ्यायला लालूंनी संख्याबळावर भाग पाडले आणि लालूंचे गुंड अनुयायी पुढल्या काळात बेताल होत गेले. त्यामुळेच पुरोगामीत्वाची झिंग उतरून नितीश पर्याय शोधू लागले होते. पण पर्याय सन्मानपुर्ण असावा लागतो. किंवा किमान लालूंना लगाम लावणारा तरी पर्याय हवा होता. तो पर्याय शोधण्याची पाळी नितीशवर ज्यांनी आणली, त्यांनी आता नितीश इथपर्यंत आलेले आहेत.

बिहार विधानसभेत मुख्यमंत्री रहाण्यासाठी नितीशना महागठबंधनाची गरज आहे. पण लालू व कॉग्रेसने साथ सोडल्यास भाजपाच्याही मदतीने नितीश मुख्यमंत्री पदावर कायम राहू शकतात. भाजपाची साथ सोडल्यावर जर लालू पाठींबा देऊ शकतात, तर लालूंची साथ सोडल्यावर भाजपाही नितीशना साथ देऊ शकतो. हे गणित डोक्यात आल्यापासून नितीशनी भाजपाविषयी आस्था दाखवण्यातून लालूंना लगाम लावलेला आहे. त्यामुळे नितीशना मुख्यमंत्रीपद गमावण्याचे भय उरलेले नाही. कारण प्रसंगी लालू विरोधात नितीशना पाठींबा देण्याचे सुतोवाच भाजपा नेत्यांनी करून ठेवलेले आहे. मग त्या समजूतीला खतपाणी घालण्याचे राजकारण नितीश मागले वर्षभर खेळत राहिलेले आहेत. त्यांनी तसे अनेक संकेत वारंवार दिलेले आहेत. त्यातून सत्तेत टिकण्यासाठी आपण नव्हेतर लालूच लाचार असल्याची स्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. कोणाला आठवत नसेल तर नोटाबंदीचा काळ आठवा. बाकी तमाम पुरोगामी पक्षांनी मोदी विरोधात झोड उठवलेली असताना, नितीशनी नोटाबंदीचे जबर समर्थन केलेले होते. लालू रस्त्यावर आणि त्यांचे सहकारी नितीश नोटाबंदीच्या बाजूने बोलत होते. त्याच दरम्यान एका सार्वजनिक समारंभासाठी पंतप्रधान पाटण्याला आले असताना, त्या मंचावरून मोदींनी नितीशच्या दारूबंदीचे कौतुक करून महागठबंधन सैल करण्याला हातभार लावला होता. अशारितीने वेळोवेळी नितीश लालूंना हुलकावण्या देत राहिले आहेत आणि त्याच काळात लालूंच्या कुटुंबाच्या भानगडी केंद्राने चव्हाट्यावर आणण्याचा सपाटा लावलेला आहे. ही पार्श्वभूमी बघितली तर नितीश कुठे बघून वाटचाल करीत आहेत, त्याचा अंदाज येऊ शकत होता. पण लालूंनी तिकडे बघितले नाही की कॉग्रेस अध्यक्षा सोनियांनी त्याची दखल घेतली नाही. परिणामी आता ऐन राष्ट्रपती निवडणूकीत नितीशनी त्या दोघांना तोंडघशी पाडलेले आहे.

खरेतर ज्या दिवशी प्रथमच राष्ट्रपती निवडणूकीचा विचार करायला विरोधकांची पहिली बैठक बोलावण्यात आली, तिथे नितीश गैरहजर राहिले. पण दुसर्‍याच दिवशी ते पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या एका भोजन समारंभाला दिल्लीत मुद्दाम आलेले होते. यातली गोम समजून घेतली पाहिजे. तेव्हाच्या गैरहजेरी विषयी विचारले असता नितीशचे सहकारी म्हणाले होते, विरोधी पक्षांची बैठक बोलावण्याची कल्पनाच नितीशनी सोनियांना सुचवलेली होती. याचा अर्थ असा, की खुप आधी नितीशनी त्यासाठी हालचाली केल्या होत्या. पण सोनियांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही वा दिरंगाई केली. त्यामुळे नितीश नाराज असावेत. त्यांनी वेगळा विचार आधीच सुरू केलेला असावा. आज आपल्याला संसदे्त पुरेसे बळ नाही आणि पुर्वीची शक्ती पक्षात नाही, याचे भान सोनियांना असते; तरी त्यांनी अशा मित्रपक्षांना वेळोवेळी विश्वासात घेण्याला प्राधान्य दिले असते. पण राहुल असोत की सोनिया, त्यांना कॉग्रेसी नेत्यांच्या लाचारीची सवय झाली आहे. सहाजिकच अन्य मित्रपक्षाच्या नेत्यांनीही अगतिक होऊन आपल्या दारी यावे, अशा अहंकारात हे कॉग्रेसश्रेष्ठी वागत जगत असतात. त्यामुळे अधिकाधिक मोदीविरोधी पक्ष व नेते कॉग्रेसपासून दुरावत गेलेले आहेत. मग महागठबंधन व्हायचे कसे? उत्तरप्रदेशात समाजवादी कॉग्रेस युतीची घोषणा करण्याचे निश्चीत झाले असताना, राहुल तिकडे फ़िरकले नाहीत. मग संतापलेल्या अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादीच घोषित करून टाकलेली होती. आपला पक्ष नगण्य झाला असल्याचे भान सोनिया राहुलना नसल्याचा हा परिणाम आहे. म्हणून नवे कोणी त्यांच्या घोळक्यात यायला तयार नाही आणि असलेलेही टिकवण्याची कुवत या मायलेकरात नाही. अशा स्थितीत मोदी मात्र एकेक विरोधकाला चुचकारण्यात कसूर करत नाहीत. नितीश हे त्याचे झणझणित उदाहरण आहे.

नितीश हा महागठबंधन आघाडीचा भावी पंतप्रधान चेहरा म्हणून बोलले जात होते. त्यानेच राष्ट्रपती निवडणूकीत भाजपाला कौल दिला असेल, तर पुढे व्हायचे कसे? राष्ट्रपती निवडणूक मोदींना शह देण्याचे राजकारण नव्हते, तर तो मुहूर्त साधून विरोधातील महागठबंधन अधिक मजबूत करण्याचा डाव खेळण्याला महत्व होते. त्यात अधिक पक्षांना सहभागी करून घेण्याचे राजकारण होण्याला प्राधान्य होते. तसे त्यात मायावती व मुलायम यांच्याही पक्षाने हजेरी लावली होती. पण पुढे काहीच झाले नाही आणि आता तर त्यापैकीच अनेकजण भाजपा उमेदवाराला समर्थन देऊन मोकळे होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपा उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापुर्वीच जिंकली आहे. पण त्याचा विजय होण्य़ापुर्वीच २०१९च्या लोकसभेसाठी महागठबंधन नामक रणनितीला अपशकून झाला आहे. त्यातला सर्वसंमत होऊ शकेल असा अत्यंत समतोल मानला जाणारा नेताच दुरावला आहे. आता त्याच्यावर दुगाण्या झाडल्या गेल्या, तरी तो भाजपाच्या अधिक जवळ जाण्याचे भय आहे. पर्यायाने बिहारमधील आघाडीचा कौतुकाचा प्रयोगच संपुष्टात येण्याचा धोका, २०१९ साठी बडी आघाडी बनवण्याचे स्वप्न रंगवणार्‍यांना भेडसावू लागला आहे. अतिशय धुर्तपणाने राजकारण खेळत असल्याचा आव मोदी विरोधक वाहिन्यांच्या कॅमेरासमोर आणत असतात. पण त्यांच्या प्रत्येक धुर्त खेळीने मोदी अधिक मजबूत होतात आणि यांच्या राजकीय खेळाला लाजिरवाणा पराभव बघावा लागतो आहे. नितीश यांच्या पाठींब्या खेरीजही भाजपाचा उमेदवार सहज जिंकू शकत होता. पण नितीशच्या या निर्णयाने २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणूकीचे समिकरण विस्कटून टाकलेले आहे. नवी आघाडी उभारली जाणे दुर राहिले. असलेली मोदी विरोधातील आघाडीही पुढल्या संसदीय अधिवेशनात कितपत टिकून राहिल, इतकी दुरावस्था पुरोगामी राजकारणाची होऊन गेली आहे.

Saturday, June 24, 2017

वेड पांघरून बारामतीला?

sharad pawar cartoon के लिए चित्र परिणाम

अमिताभच्या कुठल्या तरी एका चित्रपटात गर्दीच्या ग्रामिण प्रसंगात एक चेहरा मला खुप ओळखीचा वाटला होता. म्हणून तो चित्रपट अगत्याने दुसर्‍यांदा बघितला होता. पण जेव्हा त्या चेहर्‍याची ओळख पटली, तेव्हा मनापासून खुप दु:ख झाले होते. तो चेहरा १९५०-६० च्या जमान्यातील एक लोकप्रिय अभिनेता नायकाचा होता. त्याचे नाव भारतभूषण! त्याचा काळ संपल्यावर त्याची ओळखही कोणाला राहिली नव्हती. मग टिकून रहाण्यासाठी वा उदरनिर्वाहासाठी त्याच्यावर अशी नामुष्की आली होती काय,? ह्या प्रश्नाचे उत्तर मला तेव्हा सापडले नव्हते. तसेच काहीसे भगवान दादांना नाचणार्‍या घोळक्यात किरकोळ व्यक्ती म्हणून बघितल्यावर वाईट वाटायचे. आजही ज्या भगवान दादांच्या ‘भोली सुरत’ गीतावर चौथी पिढी डोलू लागते, त्यांनी असे कुठल्या घोळक्यात नगण्य म्हणून पेश होणे, त्यांच्या इतिहासाला काळिमा फ़ासणारे असते. ज्यांनी दिर्घकाळ सत्ता प्रतिष्ठा ताठ मानेने भोगलेली असते, त्यांच्या अगतिकतेकडे बघवत नाही. अशी माणसे आपणच कमावलेली प्रतिष्ठा वा मानसन्मान धुळीस मिळवत असतात. सहा महिन्यांपुर्वी जगाचे राजकारण सलग आठ वर्षे खेळलेले बराक ओबामा आता निवृत्त झालेले आहेत. पण अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवलेल्या याच ओबामांनी आपल्या अनुभवाचा आधार घेऊन नव्या अध्यक्षांना खडेबोल ऐकवावेत, असे प्रसंग तिथे वारंवार येत असतात. पण पन्नाशीतल्या ओबामांनी तो मोह टाळला आहे. आपण जे पद भूषवले. त्यातून जी जगन्मान्यता मिळवली, ती धुळीस मिळणार नाही, याची काळजी त्या मुरब्बी राजकारण्याने घेतली आहे. कारण अशा उच्चपदाचा अनुभव घेतलेल्यांची प्रतिष्ठा अन्य कोणी पुसून टाकू शकत नसतो. तो इतिहास असतो आणि त्याची विटंबना तीच व्यक्ती करू शकत असते. आपल्या छचोर वर्तन वा वक्तव्यातून तीच महान व्यक्ती आपल्या प्रतिमा जमिनदोस्त करू शकत असते.

शरद पवार आता वरीष्ठ राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. ज्येष्ठ वरीष्ठ म्हणजे प्रचलीत काळात संदर्भहीन झालेले, असा त्याचा अर्थ घ्यावा किंवा कसे, असा प्रश्न म्हणून पडतो. कारण हल्ली पवार कायम कुठल्या ना कुठल्या निमीत्ताने आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधले जावे, अशी चमत्कारीक विधाने सरसकट करू लागलेले आहेत ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’, अशी त्यांची अवस्था झाली आहे. पाव शतकापुर्वी देशाचा पंतप्रधान होण्यासाठी मुंबईहून दिल्लीला झेपावलेल्या पवारांना, राजधानीत आपले बस्तान बसवता आले नाही. म्हणून पुढे मनमोहन सिंग यांच्यासारख्या दुबळ्या पंतप्रधानाच्या सरकारमध्ये नगण्य पदावर समाधान मानावे लागले होते. पुढल्या पिढीला आशीर्वाद देणे किंवा युक्तीचे चार शब्द सांगावेत, अशा वयात आज पवार आहेत. सहाजिकच त्या पुढल्या पिढीने त्यांच्या वयाचा व अनुभवाचा लाभ घेत भविष्य बघायला हवे. पण त्याच वयात पवार काहीतरी निमीत्त शोधून वादग्रस्त होण्याचा जो हास्यास्पद प्रयास करतात, ते बघून त्यांच्या समकालीन पिढीलाही वैषम्य वाटत असेल. आताही पुण्यात कुठल्या समारंभात पवारांनी इतिहासाच्या संदर्भात आपले ज्ञान म्हणून जी काही मुक्ताफ़ळे उधळली आहेत, ती केविलवाणी आहेत. शिवरायांचा इतिहास नव्याने लिहीला जात असल्याचे म्हटले जाते. त्याला कोणाची हरकत नसावी. पण त्यात चुकीच्या इतिहासातून चुकीचे राजकीय डाव खेळण्याचा पवारांचा प्रयास, म्हणजे वेड पांघरून बारामतीला जाण्यासारखा प्रकार आहे. शिवराय किंवा आणखी कोणाला पुरोगामी वा सेक्युलर ठरवण्याची खेळी नवी नाही. त्या खेळाला अधूनमधून नव्या फ़ोडण्या देत शिळ्या कढीला ऊत आणला जातच असतो. शेवटी सत्य काहीच नसते आपापल्या सोयी व गरजेनुसारच कथाकथन होत असते आणि पवारही त्याला अपवाद नाहीत. मग इतिहास शिवकालीन असो किंवा पवारकालीन असो.

शिवराय हे कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हते, हे नव्याने कथन करण्याची गरज नाही. एक हिंदू राजा हा कधीच धर्माच्या नावाने राज्य करीत नसे. किंबहूना कुठलाही हिंदू राजा आपला धर्म जनतेवर लादत नव्हता. हिंदूराज्य असे कुठे कधी नव्हते. अलिकडल्या काळात नेपाळ तसा हिंदू देश होता आणि तरीही त्याने आपल्या धर्माची सक्ती कोणा सामान्य माणसावर केली नाही. मग शिवराय तर चार शतके मागले आहेत. ते हिंदू धर्माचे राज्य करीत नव्हते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या नावाच्या मागे ‘गोब्राह्मण प्रतोपालक’ अशी बिरूदावली कुठून आली, त्याचाही शोध करण्याची गरज नाही. बाबासाहेबांनी सात दशकापुर्वी लिहीलेली राज्यघटना आज तरी जशीच्या तशी कुठे उरली आहे? प्रत्येक पिढीने व काळाने त्यात आपल्याला हवे तसे बदल करून घेतले आहेत. मग शिवकालीन इतिहासात इथे तिथे काही बदल असू शकतात. असे बदल कशासाठी केले जातात आणि काही प्रसंगी ते जनहिताचे कसे असतात, हे माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने पवारांसारख्या दिग्गजाला सांगण्याची गरज आहे काय? शिवराय बाजूला ठेवा आणि शरद पवार नावाच्या राज्यकर्त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक खोट्या गोष्टी जनहित म्हणून केल्या,. पुढे त्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. अनेकदा सामान्य जनतेच्या भल्यासाठीच काही खोट्या गोष्टी तिच्या मनात भरवाव्या लागत असतात, असा पवारांचाच सिद्धांत आहे. शिवराय मुस्लिमांचे शत्रू नव्हते की कुठल्या धर्माचे विरोधक नव्हते, असे पवार म्हणतात. मग पवार इस्लामी धर्माचे प्रचारक पुरस्कर्ते आहेत, की हिंदू धर्माचे विरोधक आहेत? नसतील तर त्यांनी आपल्या कारकिर्दीत कसे वर्तन केले होते? त्यांनी हिंदूंना हकनाक कशाला मरू दिले? हिंदूंना मारणार्‍या इस्लामी दहशतवादाला पाठीशी घालताना, पवार हिंदू धर्माचे शत्रू झाले होते असे मानावे काय?

कालपरवाच मुंबई १९९३ सालच्या बॉम्बस्फ़ोटातील दुसर्‍या सुनावणीचा निकाल लागला आणि त्यात सातपैकी सहा आरोपींना शिक्षा झाली. ते सर्व मुस्लिम आहेत. ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेने दोषी मानलेले नाही. पण त्यांनी तोच गुन्हा केला व हिंदूंना मारण्यासाठीच असे भीषण कारस्थान शिजवून अंमलात आणले, तेव्हा पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अशा घातपाती मुस्लिमांना पाठीशी घालण्यासाठी कोणते गैरसमज निर्माण करण्याचा विडा उचलला होता? ज्या दिवशी ती भयंकर घटना घडली, त्या संध्याकाळी मुंबईकरांना शांतता राखण्याचे आवाहन करायला मुख्यमंत्री शरद पवार दूरदर्शनच्या पडद्यावर अवतरले. तिथे त्यांनी कोणते भयंकर सत्य कथन केले होते? मुंबईत सर्व अकरा स्फ़ोट घडलेले होते आणि ते सर्व हिंदूबहूल भागात घडलेले होते. म्हणजेच त्यातून अधिकाधिक हिंदूना ठार मारण्याचा डाव होता. किंबहूना अन्य कोणापेक्षाही तो सर्वात आधी पवारांनाच कळलेला होता. तरी तसेच्या तसे सत्य लोकांना उमजू नये, म्हणून पवारांनी कोणते उपाय योजले होते? तर त्यांनी मुस्लिम वस्तीतही स्फ़ोट झाल्याची थाप दूरदर्शनच्या आवाहनातून मारलेली होती. इतिहास सोडा, पवार तर वर्तमानातही दिशाभूल करत होते. लोकांमध्ये गैरसमज पसरवीत होते. किंबहूना त्यांनी वर्तमानाविषयी मुंबईकर जनता व भारतीयांची शुद्ध फ़सवणूक केलेली होती. मग तेव्हा पवार हिंदूविरोधी होते, की इस्लामचे पुरस्कर्ते होते? त्यांनी सत्य लपवून असत्य दडपून कशाला सांगितले होते? तर जनतेमध्ये वैमनस्याची भावना वाढून दंगली पेटू नयेत, म्हणुन खोटेपणा केला होता, असा त्यांचाच दावा आहे. असायला हरकत नाही. पण सर्वच वेळी सत्य सांगता येत नाही आणि उपकारकही नसते, इतकाच त्याचा अर्थ आहे. इतिहास वा वर्तमान सांगताना जनहिताचेही भान ठेवावे लागते, असाच त्याचा अर्थ नाही काय?

‘गोब्राह्मण प्रतिपालक’ अशी उपाधी नंतरच्या काळात लावली गेली वा घुसवली गेली, असे सांगताना सत्यशोधक झालेले पवार मुंबईतले शेकडो लोक रक्ताच्या थारोळ्यात आक्रोश करत असताना, खोट्याचे पुजारी कशाला झालेले होते? आपले खोटे हे जनहिताचे आणि दुसर्‍याचे खोटे हानिकारक असल्या भंपकपणाला सत्यशोध म्हणता येत नाही की मानता येत नाही. शिवराय मुस्लिम विरोधी नव्हते, तर मुस्लिम धर्म लादण्याच्या विरोधात होते. तसे नसते तर त्यांना स्वराज्य स्थापण्याची काही गरज नव्हती. आपल्या धर्मपरंपरा वा श्रद्धास्थानावर गदा आली, म्हणून त्यांना लढाईत उतरावे लागले होते. ते नुसते परकीय आक्रमण नव्हते. तो प्रादेशिक संघर्ष नव्हता तर आक्रमणाचा विषय होता आणि आक्रमण हे प्रादेशिक असण्यापेक्षाही सांस्कृतिक व धार्मिक होते. तेव्हा धार्मिक सत्ता लादण्याच्या विरोधातली ती लढाई होती. अफ़जलखान असो किंवा आणखी कोणी सुलतान बादशहा असो, त्यांनी देवळे उध्वस्त करण्यातून हा संघर्ष अधिक पेटला होता. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे तरी काय होते? स्वराज्य कशासाठी हवे होते आणि टिकवायचे होते? शिवरायांनी त्यासाठी अफ़जलखानाला मारला आणि त्याच्या कोथळा बाहेर काढला, तो त्याचा धर्म संपवण्यासाठी नव्हे. तर आपला धर्म वाचवण्यासाठी होता. ती बचावात्मक लढाई होती. आपला धर्म वाचवताना शिवराय इस्लामला नष्ट करायला निघालेले नव्हते. म्हणून त्यांच्या सेनेत मुस्लिम सैनिक वा लढवय्येही सहभागी झालेले होते. त्यामुळे शिवराय धर्मप्रसारासाठी लढत नव्हते की लढाया करत नव्हते, हे अर्धसत्य आहे. ते आपला धर्म नष्ट होऊ नये म्हणून लढाईच्या आखाड्यात उतरले होते आणि त्या लढाईतला शत्रू मुस्लिम सुलतान बादशहाच नव्हते. अगदी मराठे सरदार व हिंदू राजे सरदारही कापून काढावे लागले होते. पण इथेही पवारांना अर्धसत्य कथन केल्याशिवाय श्वास घेता येत नाही.

शिवराय हिंदूधर्माचे पुरस्कर्ते असते, तर त्यांनी अफ़जलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वाचला नसता, असा आणखी एक शोध पवारांनी लावला आहे. अर्थात तोही शिळ्या कढीला आणलेला ऊत आहे. आपणही ‘पुरूषोत्तम’ असल्याचे सिद्ध करण्याची ती केविलवाणी कसरत आहे. खरेच पवारांना जातिपातीचे कौतुक नसते, तर त्यांना कुलकर्ण्याखेरीजही अनेक हिंदूंना शिवरायांच्या तलवारीचे बळी व्हावे लागले होते, त्याचे स्मरण झाले असते. पण अशा इतर बळींची जात पवारांना आडवी आली ना? शिवराय जातीपाती धर्म असले भेद मानत नव्हते, हे सांगण्यासाठी कोणी ‘कोकाट’ण्याची गरज नाही. अठरापगड जातीतल्या तरूणांमध्ये राष्ट्रीयत्व वा स्वाभिमान जागवून त्यांच्या पुरूषार्थाला आवाहन करणार्‍या शिवरायांना, आज कुणा पुरूषोत्तमाने संशोधन करून शोधण्याची गरज नाही. साडेतीनशे वर्षे शिवराय भारतीय जनमानसात अढळ स्थान प्राप्त करून बसले आहेत. कारण त्यांनी कुठल्या धर्मजातीचा भेदभाव केला नाही, याची प्रत्येक भारतीयाला जाण आहे. आडनावे वा जातीचा शोध घेऊन त्यांनी ‘श्रीमंत पवारांचे’ राजकारण केले असते, तर इतिहास वेगळा घडला असता. तेव्हा ‘श्रीमंत’ पवार साहेब, सवाल शिवराय कोणाकडे मुस्लिम म्हणून बघत होते असा नसून, आजचे किती मुस्लिम शिवरायांकडे धर्मनिरपेक्ष राजा म्हणून बघतात, असा प्रश्न आहे. खरेच मुस्लिम नेत्यांना किंवा मुस्लिमांकडे मताची माधुकरी मागणार्‍यांना त्याची जाणिव असती, तर अफ़जलखानाच्या कोथळ्यात कुणाला धर्म दिसला नसता. तशी छायाचित्रे वा पोस्टर्स बघून कोणाच्या धर्मभावना दु्खावल्या नसत्या. सांगली मिरजची दंगल त्याच चित्राने घडवली होती. कारण अफ़जलखानाच्या त्या कोथळ्यात अनेकांना इस्लामची विटंबना दिसली होती. दंगलीला प्रवृत्त झालेल्यांना अफ़जलखानातला मुस्लिमच दिसला होता.

पवार साहेब अफ़जलखानाचा धर्म कुठला होता वा शिवराय कुठल्या धर्माचे पुरस्कर्ते होते हा सवाल नाही. आजचा सवाल आहे, तो शतकांपुर्वीच्या इतिहासातला स्वराज्याचा शत्रू असलेल्या त्या अफ़जलखानामध्ये ज्यांना आपला धर्मबंधू दिसतो, त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. त्यांच्या विकृत मनोवृत्तीला आजही ती लढाई किंवा तो संघर्ष धर्माची लढाई वाटतो. त्या कोथळा काढणार्‍या लढाईत आपल्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून जे अफ़जलखानाकडे मुस्लिम लढवय्या म्हणूनच आजही बघतात, त्यांच्याच ऐतिहासिक समजूतीची समस्या आहे. त्यांची समजूत बदलण्याची गरज आहे. आज इथला मुस्लिम समाज खरेच प्रामाणिक राष्ट्रवादी असेल, तर त्याला अफ़जलच्या कोथळ्याचा खरा इतिहास सांगायला हवा आहे, अफ़जलचा कोथळा मुस्लिम म्हणून काढला नव्हता, तर स्वराज्याचा शत्रू म्हणून काढावा लागला, हे कोण समजावणार? आजही तो कोथळा काढणार्‍या शिवरायांना स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे लढवय्ये समजण्यापेक्षा इस्लामचे शत्रू मानणार्‍या मानसिकतेला कोणी विकृत बनवले, त्याचा खेद व्हायला हवा. पण वेड पांघरून बारामतीला जाण्यातच हयात गेल्यावर यापेक्षा दुसरा योग्य युक्तीवाद ‘श्रीमंत’ पवार साहेबांना कुठून सुचायचा? शिवराय हिंदूधर्मासाठी लढत नव्हते तर कृष्णाजी भास्कर कुलकणी तरी कुठे धर्मासाठी लढत होता? त्याने तर अफ़जलखानाला साथ दिली होती. जेव्हा कोणी हिंदू लढत असतो तेव्हा लढाई धर्माची कधीच नसते. हिंदू नेहमी स्वराज्य व स्वराष्ट्रासाठी लढतो. तो पवारांसारखा ‘श्रीमंत’ नसतो. उपाशीपोटी तो देशासाठी लढतो. आजही सीमेवर लढणारा प्रत्येक मराठा वा भारतीय तितकाच धर्मनिरपेक्ष आहे. त्याची प्रेरणाही शिवरायांकडून आलेली आहे. ‘श्रीमंती’ बादशहाकडून येत असते. आपल्या वयाला व प्रतिष्ठेला शोभणारे वर्तन साहेब कधी सुरू करणार? कधी श्रीमंतीची हाव सुटायची?

अरबी सुरस कथा



लोकांना अल जजीरा नावाची वृत्तवाहिनी ठाऊक असेल. ती वाहिनी अरबी समर्थन करणारीही वाटेल. पण व्यवहारात ती वाहिनी पाश्चात्य माध्यमांना शह देण्यासाठी न्युयॉर्कच्या हल्ल्यानंतर सुरू झाली. तेव्हा सगळीकडून अरबी हल्लेखोर व अल कायदाचा गवगवा झालेला होता. कुठल्याही अरबी वा मुस्लिम देशामध्ये तशा प्रचाराचा प्रतिवाद करणारी यंत्रणा नव्हती. अशावेळी कतार या देशाने पुढाकार घेतला आणि अल्पावधीतच अल जजीरा नावाची अरबी वृत्तवाहिनी सुरू केली. अरबी देशात तिचा जम बसल्यावर तिचे इंग्रजी भावंड सुरू झाले. बीबीसी वा सीएनएन अशा पाश्चात्य माध्यम साम्राज्याला धक्का देण्याचा मनसुबा घेऊनच, ही नवी यंत्रणा उभी करण्यात आली होती. आता ती वाहिनी वा तिचे नेटवर्क इतके प्रभावी झाले आहे, की ती वाहिनी बंद करावी अशी मागणी चार अरबी देशांनी कतारकडे केली आहे. त्यात सौदी अरेबियाचाही समावेश आहे. माध्यमाची ताकद किती प्रभावी असते, त्याची प्रचिती यातून येऊ शकते. पश्चीम आशियात सौदी अरेबिया हा सर्वात मोठा तेलसंपन्न देश मानला जातो. म्हणूनच त्याच्या श्रीमंतीपुढे इतरांनी गुडघे टेकावेत अशी तिथल्या सुलतानांची अपेक्षा असते. पण त्यांना इराणच्या शिया सत्ताधीशांनी कधी दाद दिली नाही व कतार हा सुन्नी देश असूनही सौदीपुढे झुकला नाही. अलिकडल्या काळात तर कतारने आपल्या तेलाच्या पैशातून इतकी प्रगती केली, की नुसत्या तेलाच्याच पैशावर ऐषाराम करणार्‍या सौदीला आता जाग आलेली आहे. कारण सुन्नी वहाबी जगाचे नेतृत्व करण्यासाठी कतारने कंबर कसली आहे. त्यातून सौदी व अन्य अरबी सुलतानशाही देशांचे धाबे दणाणले आहे. तितकीच तिथे धर्माचे नाव पुढे करून हुकूमशाही गाजवणार्‍यांची झोप उडाली आहे. कारण कतारचा सुलतान अरबी व पाश्चात्य वर्चस्ववादाला आव्हान द्यायला उभा ठाकला आहे.

कतार म्हटल्यावर चटकन लक्षात येणार नाही. पण भारतातला वादग्रस्त चित्रकार फ़िदा हुसेन नक्कीच आठवेल. हिंदू दैवतांची विकृत चित्रे काढल्याने त्याच्यावर खटले दाखल करण्यात आले, तेव्हा त्याने भारत सोडुन पळ काढला होता. दिर्घकाळ लंडनमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्याने भारतीय न्यायालयांचा ससेमिरा टाळण्यासाठी अन्य देशात आश्रय घेतला होता. त्याला कतारने आपले नागरिकत्व बहाल केलेले होते. अर्थात फ़िदा हुसेन तसा खुपच निरूपद्रवी म्हटला पाहिजे. कतारच्या सुलतानाने जगातल्या कुठल्याही खतरनाक दहशतवादी व जिहादींना आपल्या देशात आश्रय दिला आहे. तालीबान वा अल कायदा यांचे जगात कुठे अधिकृत कार्यालय नव्हते. पण असे खुले कार्यालय उघडण्याची मुभा त्यांना कतारच्या सुलतानाने दिलेली होती. जगातल्या अनेक बंदी घातलेल्या जिहादी संघटनांचे घातपाती कतारमध्ये उजळमाथ्याने वावरत असतात. त्यात जसे इसिसचे लोक आहेत, तसेच अलकायदा वा इतरही संघटनांचे हिंसाचारी आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली सौदीचे सुलतान शरणागत होत असताना कतारने मात्र जगातल्या कुठल्याही महाशक्तीला दाद दिलेली नाही. म्हणूनच कुठलाही जिहादी असो, त्याला कतार आश्रयस्थान वाटते. सहाजिकच घातपाती राजकारणात कतारने पैसा व अन्य मार्गाने जिहादींना आपल्या मित्र गोटात ठेवलेले आहे. त्यांचा वापर मोठ्या खुबीने अन्य अरब सुलतान व राजेशाहीच्या विरोधात केला आहे. म्हणूनच कतार हा सौदी व अन्य अरबी मुस्लिम देशांना डोकेदुखी बनला आहे. अशा सुन्नी देशांच्या आघाडीने कतारला आपला शत्रू मानले आहे व त्याच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्याला शह देण्यासाठी कतारने तुर्कस्थानला आपला मित्र करून घेतले आहे. थोडक्यात सुन्नी व वहाबी इस्लामी आघाडीत दुफ़ळी माजली आहे. कदाचित ती युद्धाचा भडका उडवू शकेल.

कतार हा सुन्नी वहाबी अरबी देश आहे, आकाराने छोटा असला व त्याचे तेलाचे उत्पन्न कमी असले, तरी आलेला पैसा त्याने विविध उद्योग व पायाभूत विकासामध्ये गुंतवून आपली स्थिती मजबूत केली आहे. उलट सौदी अरेबियाच्या सुलतानांनी आपल्या रयतेला मोठमोठ्या अनुदानातून ऐषाराम शिकवलेला आहे. विकासामध्ये पैसा गुंतवला नाही, तर लोकांनाही तेलाच्या आयत्या पैशावर मौजमजा करण्याची सवय लावली आहे. कतार म्हणूनच सौदीपेक्षा प्रगत अरबी देश मानला जातो. एका बाजूला अशा रितीने पैशाची गुंतवणुक करून कतारने आपल्याला आधुनिक बनवतानाही वहाबी शुद्धता राखलेली आहे. म्हणूनच आळसावलेल्या सौदी सत्तेला तो आव्हान देऊ शकला आहे. आता हे वितुष्ट विकोपास गेले असून, कतारने शियापंथीय इराण व हिजबुल्ला यांनाही हाताशी धरलेले आहे. एका बाजुला शियांना हाताशी धरायले आणि दुसरीकडे सुन्नी कट्टरपंथाचेही नेतृत्व करायचे; अशी दुटप्पी राजनिती खेळत कतारने अमेरिकन, रशियन व युरोपियन राजकारण्यांनाही पेचात टाकलेले आहे. पण ही दोन अरबी देशातील सत्ता स्पर्धा दिवसेदिवस पश्चीम आशियातील वेगळाच संघर्ष बनू लागला आहे. दोन आठवड्यापुर्वी आखाती देशांची आघाडी वा सुन्नी आघाडीतील देशांनी कतारची कोंडी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या देशाशी होणारे सर्व व्यापारी व अन्य व्यवहार थांबवले आहेत. ती कोंडी फ़ोडण्यासाठी तुर्कस्थानने कतारला जीवनावश्यक माल पुरवठा करण्यात पुढाकार घेतला आहे. या वादामध्ये कतार सोबत राहिल तो आपला शत्रू; अशी भूमिका सौदीच्या राजांनी घेतली असल्याने कदाचित अरबस्थानात नवे युद्ध छेडले जाण्याची चाहुल लागली आहे. त्या देशात भारताचे आठ लाखाहून अधिक नागरिक कामधंद्याच्या निमीत्ताने स्थायिक झालेले असल्याने त्यांना माघारी येण्याची सुचना भारत सरकारने दिलेली आहे.

कतारची कोंडी जाहिर केल्यावर आखाती आघाडीने त्याच्याकडे तेरा मागण्यांची यादी दिलेली आहे. त्यातली एक मागणी अल जजीरा नावाची वृत्तवाहिनी बंद करण्याची आहे. तसेच अनेक जिहादी संघटनांचा आश्रय बंद करण्याचीही मागणी आहे. पण त्यापेक्षाही महत्वा़ची मागणी म्हणजे विविध जिहादी मानल्या जाणार्‍या खतरनाक फ़रारी लोकांना, त्यांच्या देशाच्या हवाली करण्याचीही मागणीही समाविष्ट आहे. जगातल्या कुठल्याही जिहादींना कतारने नेहमी आश्रय व अभय दिले आहेच. प्रामुख्याने ज्यांनी सौदी, बहारीन वा अमिराती सुलतानांच्या विरोधात बंडखोरी केली, त्यांनाही कतारने आश्रय दिला आहे. हे बंडखोर आपापल्या देशातील सुलतानशाही उलथून पाडण्याच्या कारवाया करीत असतात. खरे वितुष्ट बहुधा त्याच शेवटच्या मागणीत लपलेले आहे. कतारच्या सुलतानाने आपल्याखेरीज अन्य अरबी सुलतानांच्या बुडाखाली सुरूंग लावलेले आहेत आणि त्यामुळेच हा नवा पेचप्रसंग अरबस्थानाला भेडसावतो आहे. यात इजिप्तचाही समावेश आहे. कारण इजिप्तला भेडसावणार्‍या मुस्लिम ब्रदरहुड या जिहादी संघटनेलाही कतारने अभय दिले आहे. आर्थिक मदतही चालविली आहे. आणखी एका आठवड्यात मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या भाऊबंदकीमध्ये घुसमट झाल्यामुळे पाकिस्तानचे माजी सेनाप्रमुख जनरल राहिल शरीफ़ मायदेशी पळून आले आहेत. पाकसेनेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी आखाती सेनेचे म्होरकेपण पत्करलेले होते. आता त्या आघाडीने युद्धाचा पवित्रा घेतला तर त्यात पाकसेनेलाही उतरण्याची मागणी केली जाईल. त्यात उडी घेतली तर पाकच्या सीमा राखण्यासाठी कोणी मागे उरणार नाही अशी पाकची चिंता आहे. आजवर अरबी पैशावर मौज करणार्‍या पाक सेनेला व सरकारला आता अरबी सुरस कथेचे चटके बसू लागले आहेत.

Thursday, June 22, 2017

दाखवायचे ‘सुळे’

supriya sule pawar के लिए चित्र परिणाम

सुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गेल्या लोकसभेत जिंकणे इतके अवघड झाले होते, की पित्याला कन्येसाठी नरेंद्र मोदींना बारामतीत प्रचाराला येऊ नका, अशी गळ घालावी लागली होती. मोदींनीही पवारांना अभय दिले आणि म्हणून आज सुप्रिया सुळे संसदेत दिसू शकत आहेत. कारण निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच सर्वात कमी फ़रकाने बारामतीत कुणा पवारांना यश टिकवावे लागलेले आहे. अशी आपली अवस्था कशामुळे झाली, त्याचा विचार अजून शरद पवार करायला तयार नाहीत, तर त्यांची कन्या कशाला करील? त्यापेक्षा नित्यनेमाने तोंडाची वाफ़ दवडण्याला त्यांनी प्राधान्य देणे स्वाभाविक आहे. मग अशी वाफ़ भाजपावर सोडली जाते तर कधी ती शिवसेनेसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोडली जात असते. योगायोग असा, की गेल्या वर्षी पित्याने जे उद्गार काढले; त्याच दिव़शी यंदा सुप्रियाताईंना शिवसेनेची महत्ता आठवली आहे. पुर्वीची किंवा बाळासाहेबांची शिवसेना कशी महान होती आणि आजची सेना कशी लेचीपेची झाली आहे; त्याचे किर्तन करण्यात या बापलेकींची वाचा थकत नाही. पण अशी इतरांची कुंडली मांडून भवितव्य सांगण्यापेक्षा सुप्रियाताईंनी आपला भूतकाळ व भविष्याची चिंता करायला काय हरकत आहे? किमान आपल्या वर्तमानाची तरी थोडीफ़र फ़िकीर करावी ना? नाव सुळे आहे म्हणून खायचे दात लपवलेच पाहिजेत, अशी सक्ती नसते सुप्रियाताई! अजून महाराष्ट्राचा बिहार झालेला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे वा देवेंद्र फ़डणवीस यांची परिक्षा घेऊन उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुळे मॅडमवर कोणी सोपवलेले नाही. पण खुमखुमी त्यांना गप्प बसू देत नसेल, तर ताईंनी तरी दुसरे काय करावे? दात लपवले तरी सुळे दिसणारच ना?

विदर्भात ताई संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी कोणाशी संवाद साधला ते माहित नाही. पण संवाद दौरा संपल्यावर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर तोंडसुख घेतलेले आहे. राज्याचा मुख्यमंत्री ‘ढ’ विद्यार्थी असल्याचे प्रमाणपत्र ताईंनी देऊन टाकलेले आहे. सध्या विविध परिक्षांच्या निकालाचे दिवस असल्याने ताईंनाही निकाल लावण्याचा मोह झाल्यास नवल नाही. म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा विषय काढला. त्यांच्या मते राज्याचा मुख्यमंत्री सलग तीन वर्षे एकाच वर्गात कायम आहे आणि अभ्यासच करत बसला आहे. त्यामुळे त्याला ढ संबोधण्याखेरीज ताईंना पर्याय उरला नाही. एकाच वर्गात म्हण्जे नेमके काय, तेही ताईंनी सांगितले असते तर खुप बरे झाले असते. अर्थात विविध विषयांवर निर्णय घेण्यापुर्वी फ़डणवीस अभ्यास करू असे सांगतात, त्यामुळे ताईंना मुख्यमंत्र्यांची परिक्षा घेण्याचा अनावर मोह झालेला असावा. म्हणून मग अभ्यास आणि परिक्षा अशी सुसंगत शब्दावली त्यांनी वापरलेली असावी. पण एकाच वर्गात म्हणजे काय? सुप्रियाताईंना आपले पिताजी पाव शतकापासून पंतप्रधान पदाच्या परिक्षेला बसत राहिल्याचे ठाऊकच नाही काय? १९९१ सालात शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सोडून देशाच्या पंतप्रधान पदाची परिक्षा देण्यासाठी दिल्ली गाठली होती. त्यांचा अभ्यास अजून संपलेला नाही. परिक्षा किती दिल्या वा कोणते पेपर्स कोणी तपासले, तेही ठाऊक नाही. पण अजून पिताश्री ‘ज्येष्ठ नेते’ नामक एकाच वर्गात बसून आहेत. कोणी त्यांना वरच्या वर्गात पाठवत नाही की खालच्या वर्गातही जायला फ़र्मावत नाही. तेही जागचे हलायला राजी नाहीत. मग अशा अभ्यासू विद्यार्थ्याविषयी ताईंचे मूल्यांकन काय आहे? तीन वर्षे एकाच वर्गात बसलेला विद्यार्थी ‘ढ’ असेल, तर पंचवीस वर्षे एकाच बाकावर बसलेला विद्यार्थी, कुठल्या श्रेणीतला असेल हो सुप्रियाताई?

देशात दोनच व्यक्ती सुखी आहेत आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहा असाही शेरा सुप्रियाताईंनी मारलेला आहे. त्यांच्या मते बाकी देशात कोणीही सुखी नाही. अर्थात त्यांचे दु:ख यातून लक्षात येऊ शकते. ताईंचा दादा खरेच पुणे पिंपरी चिंचवडच्या मूठभर लोकांना सुखी करू शकला असता, तर त्या दोन महानगरातील लोक दादांच्या विरोधात प्रगतीपुस्तक घेऊन मतदानाला कशाला घराबाहेर पडले असते? बाकीच्या गोष्टी सोडून द्या. दादांचे काय करायचे? त्यांनी किती वर्षे कुठल्या वर्गात काढली आहेत? कुठल्या परिक्षा दिल्या आहेत आणि किती कॉपी केली आहे? सध्या त्यांचे ‘पेपर्स’ एसीबीकडे तपासायचे पडून आहेत. त्यांनी सोडवलेली गणिते इतकी गुंतागुंतीची आहेत, की त्यांचे मॉडरेशन करण्यासाठी अखेरीस सक्तवसुली संचालनालयाला पुढे यावे लागलेले आहे. त्याविषयी ताईंना पत्ताच नसेल काय? विदर्भ किंवा अन्यत्र कुठे संवाद करायला जाण्यापुर्वी ताईंनी जरा दादाशीच संवाद केला असता, तर त्यांना उद्धव किंवा देवेंद्रापेक्षाही आपल्या दादांचे ‘पेपर्स’ कठीण गेल्याची जाणिव झाली असती ना? पण ताईंची गोष्ट वेगळी! त्या बारामतीच्या असल्याने त्यांना कधी अभ्यास करावा लागला नाही, की परिक्षा द्यावी लागलेली नाही. वर्गात बसावे लागले नाही की कॉपी करावी लागली नाही. थेट शाळेत मास्तरकीचा हुद्दा मिळू शकला आहे. बिचार्‍या देवेंद्राचे नशीब इतके कुठे होते? त्याला बालवर्गापासून प्रत्येक वर्षी अभ्यास वा परिक्षा द्यावी लागली आहे. वर्गात बसावे लागलेले आहे. त्यामुळे त्याला ‘ढ’ म्हणायची सुविधा आहे. ज्यांनी कधी अभ्यास केला नाही वा परिक्षाही दिल्या नाहीत, त्यांचे काय? जन्माला येताच ज्यांना लोकमताची गुणवत्ता आपोआप प्राप्त होते, त्यांचा वर्ग कुठला असतो ताई? नशीब देवेंद्र एकाच वर्गात बसून आहेत तीन वर्षे! म्हणून अजून मंत्रालय शाबूत आहे. दादा असते तर दुसर्‍यांदा तिथे आग लागली असती ना?

सुप्रियाताईंना जुनी शिवसेना कशी रुबाबदार होती, तेही आठवले आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नावातच यु असल्याचा शोध लागला आहे. आणि यु-टर्न असतो, तेही नव्याने उमजलेले आहे. पण यु-टर्न ही पिताश्रींची ऐतिहासिक राजकीय भूमिका राहिल्याचे ताईंना अजून उमजलेले नाही. ज्या पक्षाच्या खासदार म्हणून सुप्रियाताई मिरवतात, त्या पक्षाची स्थापना कशासाठी व कोणत्या तत्वावर झाली, ते ठाऊक आहे ताई? सोनिया गांधी परदेशी जन्माच्या आहेत, म्हणून पिताश्री कॉग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. पण अवघ्या काही महिन्यात त्यांनी त्याच सोनियांशी हातमिळवणी करून राज्यातली सत्ता बळकावली होती. त्या वळणाला काय म्हणतात हो ताई? पुढे पाच वर्षांनी त्याच कॉग्रेससोबत राज्यात जागावाटप व सत्तावाटप करण्यात काकापुतण्याची दहा वर्षे गेली, त्याला कुठला टर्न म्हणतात? बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा धाक वाटायचा, कारण ते बोलतील ते कृतीतून करून दाखवत होते, असेही ताई अगत्याने सांगतात. तसे अनेक नेते आहेत देशात व राज्यात. बोले तैसा चाले, अशा नेत्यांची टंचाई नाही. मग सुप्रियाताईंना त्याचे कौतुक कशाला? पिताश्रींनी कधी बोलले ते शब्द खरे करून दाखवले नाहीत ना? विधानसभेचे निकाल लागले तेव्हा विनाविलंब भाजपाला पाठींबा दिला आणि महिनाभरात सरकार चालवणे आपली जबाबदारी नाही म्हणून झटकून टाकले. असे पिताश्री नशिबी आले, मग ताईंना बाळासाहेबांचे कौतुक वाटणे स्वाभाविकच आहे. आज वाघाची शेळी झाली असे सांगण्यापुर्वी आपल्या पक्षाची दुरावस्था कशाला झाली, त्याचेही वर्णन करायचे होते. निदान अभ्यास तरी करायचा होता. पण चावायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे असले; मग असेच व्हायचे. देवेंद्र वा उद्धव यांची फ़िकीर करू नका, सुप्रियाताई! त्या गजाआड पडलेल्या छगनरावांना बाहेर कसे काढता येईल, त्याच जरा विचार करा. बाळासाहेबांच्या त्या वाघाला पिताश्रींच्या सहवासात बळीचा बकरा का व्हावे लागले, त्याचा खुलासा केलात तर अधिक बरे होईल.

Wednesday, June 21, 2017

लढाईपुर्वीच पराभूत



भाजपाने राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहिर केल्यावर आलेल्या विरोधातल्या प्रतिक्रीया मोठ्या मजेशीर आहेत. सोमवारी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी करण्यापुर्वी, अनेक पक्षांनी व गटांनी आपल्याला हवी तशी नावे आखाड्यात फ़ेकलेली होती. त्यात शिवसेनेने जसे मोहन भागवत किंवा स्वामिनाथन यांची नावे पुढे केली होती. तशीच कॉग्रेस वा डाव्यांच्या गोटातून गोपाळ गांधी वगैरेही नावे पुढे आलेली होती. पण कोविंद यांचे नाव पुढे आले आणि अकस्मात आधी समोर आलेली नावे अडगळीत जाऊन पडली. आता सुशीलकुमार शिंदे वा मीराकुमार यांची नावे पुढे आली आहेत. याचे कारण कोविंद हेच आहे. भाजपाने हे नाव पुढे करताना ते दलित असल्याचे जाहिर केले आणि एकूणच राष्ट्रपती राजकारणाचे रंगरूप बदलून गेले. आता ते नाव मान्य करायचे, किंवा त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून कोणी उभा करायचा, तर त्याला दलित हवा, हे परिमाण लागू झाले. त्यामुळेच मग कॉग्रेसमधील दोन प्रमुख दलित चेहरे पुढे आले. त्यात आधीच्या लोकसभेतील सभापती म्हणून काम केलेल्या मीराकुमार यांचा उल्लेख झाला, तसेच आधीच्या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून ‘गाजलेले’ सुशीलक्मार शिंदे यांचे नाव पुढे आले. पण त्याआधी कोणी यांची नावेही घेतलेली नव्हती. खरेच ही दोन नावे गुणवान किंवा पात्र असतील, तर आधीच कोणीतरी त्यांची नावे राष्ट्रपती पदासाठी घ्यायला हवी होती. पण कुठेही त्यांचा उल्लेखही झाला नाही. पण कोविंद हे दलित असल्याचा गवगवा भाजपाने केला आणि विरोध करणार्‍यांना दलित शोधण्याची पाळी आली. हेच मोदी विरोधात उभे असलेल्यांच्या पराभवाचे एकमेव कारण आहे. ते सतत राजकारणाचा अजेंडा मोदींना मांडू देत असतात. आपला अजेंडा पुढे करून त्यानुसार मोदींना राजकारण करायला भाग पाडणे, या विरोधकांना अजून का सुचत नाही?

राजकारणाचा अजेंडा जो लादत असतो. तोच विजयी होत असतो. लोकसभेच्या निवडणूकांचे वेध लागल्यापासून मोदी सतत देशाच्या राजकारणाचा अजेंडा व दिशा ठरवत आहेत. सहाजिकच त्यांच्या अपेक्षेनुसार व इच्छेनुसार विरोधकांना वागणे भाग पडते आहे. अशा खेळात मोदी चतुर असून, त्यांनी सतत विरोधकांना हुलकावण्या दिल्या आहेत. आताही उत्तरप्रदेश विधानसभा जिंकल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती निवडणूकीची तयारी चालविली होती. तर विरोधक मात्र मतदान यंत्रात गुरफ़टून गेले होते. त्या दोन महिन्यात मोदींनी कुशलतेने राष्ट्रपती निवडून आणण्यासाठी हाताशी असलेली मते आणि कमी पडणारी मते, यांचे गणित मांडून विजयाची तयारी चालू केली होती. पण त्याविषयी विरोधक साफ़ गाफ़ील होते. अण्णा द्रमुक, तेलंगणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल अशा एनडीएबाह्य पक्षांची मते भाजपाकडे आणल्यास, हवा तो राष्ट्रपती निवडून आणणे शक्य होते. मागले दोन महिने मोदी-शहा तेच समिकरण जुळवण्यात गर्क होते. याचा अर्थ असा होता, की उमेदवार कोण ही बाब मोदींनी दुय्यम मानली होती. ज्याला आपण उमेदवार करू; त्याला निवडून आणण्याइतकी हुकूमी मते हाताशी असायला हवी, याचे भान असलेला एकच नेता देशात होता. उलट नुसती पोपटपंची करणार्‍या अन्य पक्षीयांना राष्ट्रपती निवडणूक दारात येऊन उभी असल्याचे भानही नव्हते. त्याची चाहुल लागल्यावरही या शहाण्यांनी मतांचे समिकरण मांडण्याचा विचारही केला नाही. त्यात भाजपा विरोधातील वा बिगरभाजपा प्रत्येक मत आपल्याकडे कसे येईल, याचाही विचार केला नाही. त्यापेक्षा राष्ट्रपती कसा हवा आणि तो सहमतीने निवडावा, असले प्रवचन आरंभले होते. तिथेच मोदींचा विजय निश्चीत झाला होता आणि होत असतो. तिथेच मोदी विरोधकांवर आपला अजेंडा सहज लादू शकत असतात. दलित उमेदवार आणुन त्यात मोदी यशस्वी झाले.

मुळात आपला संयुक्त उमेदवार विरोधकांनी उभा करायचा, हा निर्णय कधीच घेता आला असता. उत्तरप्रदेशची निवडणूक संपल्यावर आणि त्यात मोदींची जादू कायम असल्याचे सिद्ध झाल्यावर विरोधक गडबडले होते. पण तरीही सावध झाले नव्हते. सावध झाले असते, तर त्यांनी उत्तरप्रदेशच्या पराभवाकडे पाठ फ़िरवून राष्ट्रपतीच्या निवडणूकीचे आव्हान उघड्या डोळ्यांनी बघितले असते आणि मोदींना धोबीपछाड देण्याची मोठी संधी म्हणून तात्काळ जुळवाजुळव सुरू केली असती. पण तसे होणेच नव्हते. विरोधी पक्ष स्वबळावर काहीही करायचे विसरून गेले आहेत. आपण काही करण्यापेक्षा मोदी वा भाजपा काही करील, त्याला विरोध करणे; हा आता विरोधकांचा अजेंडा बनुन गेला आहे. त्यामुळेच सोनियांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावल्यानंतर त्यात संयुक्त उमेदवार उभा करू; इतकाही साधा निर्णय होऊ शकला नाही. व्यक्ती कोण हे नंतर ठरवता आले असते. पण बिगर भाजपा एकच संयुक्त उमेदवार, असा निर्णय घेण्यात काय अडचण होती? असा प्रस्ताव करण्यात मोदी कुठे आडवे आले होते? तरीही तितका सामान्य निर्णय सुद्धा विरोधकांना करता आला नाही. त्या बैठकीलाही सर्व पक्ष व नेते हजर होतील, इतकी मजल मारता आली नाही. कारण विरोधक पुरते दिशाहीन होऊन गेले आहेत. त्यांची कल्पनाशक्ती निकामी होऊन गेली आहे. आपण विरोधक म्हणून काय करावे, तेही त्यांना सुचेनासे झाले आहे, म्हणून मग पळवाट शोधण्यात आलेली आहे. जे काही करायचे ते मोदींनी करावे आणि मग आपण आरामात त्यांच्या विरोधात भूमिका घेऊ, अशी ती पळवाट आहे. पण यातून पुढाकार मोदींकडे गेलेला आहे आणि आपणहून विरोधक काही करतील, याची मोदींना भितीच उरलेली नाही. सगळा राजकीय खेळ मोदींना हवा तसा आणि हवा तेव्हा खेळला जाऊ लागला आहे. तसे नसते तर आता शिंदे वा मीरा कुमार यांची नावे पुढे आलीच नसती.

आज दुर्दैव असे आहे, की माध्यमात दिसतात, त्यापेक्षा प्रत्यक्षात कुठे विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. भाजपाचा उमेदवार जाहिर झाला आणि तात्काळ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्याचे अभिनंदन करायला पुढे झाले. यातूनच विरोधी एकजुटीला सुरूंग लावला जातो, इतकेही त्यांना उमजत नसेल काय? पण शिरजोर लालूंना जागा दाखवून देण्याची संधी म्हणून नितीश यांनी अशी कृती केली. त्यामुळेच रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित होऊन चोविस तास उलटण्यापुर्वीच सोनियांनी योजलेल्या बैठकीत हजर असलेल्या अनेक पक्षांचा पवित्रा बदलून गेला. मायावती, मुलायम, नितीश अशा अनेकांनी भाजपा उमेदवाराकडे असलेला कल बोलून दाखवला. जर महिनाभर आधीच बिगर भाजपा पक्षांचा संयुक्त उमेदवार उभा करायचे ठरले असते आणि भाजपापुर्वीच तो जाहिर झाला असता; तर आज यापैकी कोणा नेत्याला वा पक्षाला वेगळी भूमिका घेण्याची मोकळीक राहिली नसती. किंबहूना विरोधकांचा उमेदवार आधीच समोर आणला गेला असता, तर मोदी-शहांना कोविंद यांचे नाव ठरवतानाही वेगळा विचार करावा लागला असता. पण विरोधकांनी सहमतीचे नाटक सुरू केले आणि त्यांच्या भेटीगाठी घ्यायला शहांनी ज्येष्ठ मंत्र्यांना पाठवून विरोधकांना आणखीच गाफ़ील करून टाकले. सत्ताधारी पक्षाने कुठलेही नाव आधी सांगितले नाही, अशी तक्रार आला कॉग्रेस वा डावे नेते करतात, तेव्हा म्हणून हसू येते. तुम्हाला राजकीय लढाई करायची असेल, तर सत्ताधारी पक्षाकडे आशाळभूत नजर लावून बसता येत नसते. तुम्ही पुढाकार घ्यायचा असतो आणि सत्ताधारी पक्षाला प्रतिक्रीया देण्यास भाग पाडायचे असते. पण पराभूत मनोवृत्तीने पछाडलेल्या विरोधकांना अजून २०१४ च्या पराभवातूनच सावरता आलेले नाही, की मोदींच्या हातून पुढाकार हिसकावून घेण्याचा विचारही सुचलेला नाही. मग यापेक्षा काय वेगळे होऊ शकते?

स्वामिनाथन आणि शेषन

seshan   के लिए चित्र परिणाम

एक दिवस आधी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर आलेले होते आणि तिथे तासभर शिवसेना पक्षप्रमुखांशी त्यांची चर्चा झाली होती. ज्या बातम्या समोर आल्या, त्यानुसार ही भेट आगामी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराशी संबंधित होती. त्यात खर्‍या बोलण्यांच्या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बाहेर बसवले गेले. त्यामुळे अर्थातच प्रदेश भाजपाला अपमानित करण्याची इच्छा पुर्ण झालेली असू शकते. अमित शहांनी त्याचा बागुलबुवा केला नाही आणि दानवेंनीही अपमान निमूट गिळला. कारण त्यांना राजकारण खेळायचे आहे, ते जिंकण्यासाठी! असो, अशा बैठकीतून काय सिद्ध झाले? कारण इतर पक्षांप्रमाणेच भाजपाने आपल्या राष्ट्रपती उमेदवाराचे नाव गोपनीय ठेवलेले होते. ते सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन जाहिर करण्यात आले. पण ते नाव जाहिर होण्यापुर्वीच काही एनडीए बाहेरच्या पक्षांनीही भाजपाला पाठींबा दिलेला होता. तर एनडीएत असलेल्या पक्षांचा पाठींबा गृहीत धरलेला होता. अपवाद फ़क्त शिवसेनेचा होता. मागल्याही खेपेस शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी एनडीएला झुगारून कॉग्रेस उमेदवाराला मते दिली होती. आजकाल तर भाजपाला मिळेल तिथे विरोध करण्यातच शिवसेनेची शक्ती खर्ची पडत असते. सहाजिकच उमेदवाराचे नाव आधी सांगितले असते किंवा नंतर; म्हणून फ़रक पडणार नव्हता. याची खूणगाठ भाजपाने आधीच बांधलेलॊ होती. त्यासाठी सेनेमुळे कमी होणारी मते वगळून राष्ट्रपती निवडणूक जिंकण्याच्या तयारीला भाजपा आधीच लागलेला होता. शिवसेनेशी याबद्दल बोलणे हा केवळ सोपस्कार होता. मिळाला तर मिळाला पाठींबा. नाही मिळाला तरी बेहत्तर, अशा तयारीनेच अमित शहा मातोश्रीवर गेलेले होते. म्हणूनच शिवसेनेच्या भूमिकेला महत्व होते. त्याची महत्ता नेतृत्वाला किती उमजली, तेच जाणोत. कारण त्यांनाही शिवसेनेने लढवलेली राष्ट्रपती निवडणूक आठवत नसावी.

१९९७ सालात अशीच राष्ट्रपती निवडणूक झालेली होती आणि सत्तेत जनता दल आघाडी असताना, पुरोगामी पक्षांनी मिळून कॉग्रेसच्या नारायणन यांना उमेदवार केलेले होते. त्याच्या विरोधात एनडीए वा भाजपाकडे फ़ारशी मते नव्हती. म्हणून भाजपानेही नारायणन यांना पाठींबा देऊन टाकला होता. पण शिवसेनेने तो जुमानला नाही आणि पहिला दलित राष्ट्रपती होण्याच्या जातीयवादी नाटकाला झुगारून शिवसेनेने चक्क आपला उमेदवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरवला होता. त्या कालखंडात आपल्या प्रशासकीय दबदब्यामुळे टी. एन. शेषन देशभर कमालीचे लोकप्रिय झालेले होते आणि त्यांना तेव्हाची राष्ट्रपती निवडणूक लढवण्याची खुमखुमी आलेली होती. पण त्यांच्या नावाचे समर्थन करायला कोणीही पक्ष वा नेता पुढे येण्याची हिंमत करू शकला नाही. अशावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेषन यांना आपला पाठींबा जाहिर केला आणि तेवढ्या बळावर शेषन यांनी आखाड्यात उडी घेतली होती. अर्थात शिवसेनेचे तेव्हा विधानसभेतील वा लोकसभेतील बळ शेषन यांना लढतीमध्ये आणण्याइतकेही नव्हते. पण त्या माणसाने बाळासाहेबांच्या शब्दावर विसंबून पराभूत होण्यासाठी उडी घेतली होती. त्यांचा पराभवही झाला. पण शिवसेनेने आपला उमेदवार याही निवडणूकीत आणण्याचे धाडस दाखवले होते. तत्वाचाच प्रश्न असेल, तर विजय पराजयाला महत्व नव्हते आणि त्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाशी बाळासाहेबांनी बोलणीही केली नव्हती. नारायणन यांच्या विरोधात कोणी लढत नसेल तर शिवसेना लढून दाखविल; हे त्यांनी तेव्हा कृतीतून करून दाखवले होते. मग आज कोविंद यांच्या बाबतीत सेनेला खरेच स्वामिनाथन वा अन्य कोणी मैदानात आणायचा असेल, तर काय अडचण होती? शेषन यांना पुढे केले, तेव्हापेक्षा आजच्या शिवसेनेपाशी अधिक मते आहेत. मग कोविंदना समर्थन देण्याची काय गरज होती?

एनडीए आघाडीत असल्याने शिवसेनेने परस्पर पाठींबा दिला असता, तर गोष्टच वेगळी होती. पण अमित शहा मातोश्रीवर भेटून गेल्यावरही नकारघंटाच वाजलेली होती आणि सोमवारी उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यावरही प्रतिक्रीया नकारात्मकच होती. केवळ दलितांची मते मिळवण्यासाठी दलित उमेदवार दिला असेल, तर सेनेला त्याच्याशी कर्तव्य नाही, असेच पक्षप्रमुखांनी वर्धापनदिन सोहळ्यात स्पष्ट केले होते. मग चोविस तासानंतर कोविंद यांच्यात जातीपलिकडे कुठली नवी गुणवत्ता दाखल झाली? एक गोष्ट साफ़ आहे, शिवसेना विरोधात गेल्यानंतरही कोविंद विजयी होणार हे निश्चीत होते. सहाजिकच शिवसेनेने तात्विक भूमिका म्हणून कोविंदना पाठींबा दिला नाही, म्हणून कुठलेही राजकीय गणित बिघडणार नव्हते. किंबहूना भाजपाने त्याची सज्जता केलेली होती. म्हणूनच पहिल्या फ़टक्यात पाठींबा देता आला नसेल, तर नंतरही देण्यात काही हंशील नव्हते. नितीशकुमार यांनी पक्षाची बैठक घेऊन बुधवारी पाठींबा जाहिर केला, कारण ते आधीपासून भाजपा विरोधी आघाडीत सहभागी आहेत. त्यांना भाजपा उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी पक्षातील सहकार्‍यांचा सल्ला आवश्यक असतो. शिवसेनेची गोष्ट वेगळी आहे. तिला प्रत्येक बाबतीत कारण असो वा नसो, भाजपाला डिवचायचे आहे. म्हणूनच दोन दिवस नंतर पाठींबा देण्यापेक्षा विरोधात जाणे तर्कसंगत ठरले असते. किंबहूना शेतकर्‍यांसाठी आपणच सर्वाधिक लढत असल्याचे राजकीय चित्र उभे करण्यासाठी स्वामिनाथन यांना मैदानात उतरवणे अधिक सुसंगत झाले असते. अर्थात त्यासाठी स्वामिनाथन यांची तयारी असायला हवी. त्यांचा वृद्धापकाळ चालू असल्याने ते कदाचित त्याला तयारही नसतील. तर कोणा शेतकरी नेत्याला सेना पुढे करू शकली असती. पण यापैकी काहीही न करता, फ़क्त नावे सुचवायची आणि नंतर कोणी मागे लागला नसतानाही पाठींबा द्यायचा. तर त्यातून साधले काय?

अर्थात शिवसेना मतांची पर्वा करत नसल्याचा दावा पक्षप्रमुखांनी केला आहे. तसे असते तर एका एका नगरसेवकासाठी फ़ेब्रुवारी महिन्यात गणिते मांडावी लागली नसती, की सत्तेचे हिशोब करावे लागले नसते. निवडणूकीच्या रिंगणात उतरणार्‍यांना मताची झोळी पसरावी लागतच असते आणि मतांचे राजकारण खेळावेच लागते. त्यात जातपातही बघितली जात असते. अन्यथा बेहरामपाड्यात अकस्मात पक्षात आलेल्या ओवायसीच्या बगलबच्च्याला शिवसेनेची उमेदवारी कशाला दिली असती? प्रश्न तत्वांचा असतो, तितकाच तत्वांच्या मागे मतांची शक्ती उभी करण्याचा असतो. त्यात कधीकधी पराभवातही भविष्यातील यशाचा पाया घालून घेण्याला राजकारण म्हणत असतात. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून लोकांचे मनोरंजन करता येते. पण डावपेच व लोकमत यातूनच राजकारण खेळले जात असते. त्यापैकी कुठल्याही बाबतीत हयगय केली, मग पक्ष व संघटना हास्यास्पद होऊन जात असते. पर्यायाने लोकांचा नेतृत्वाविषयी भ्रमनिरास होतो आणि शक्ती क्षीण होत जाते. सातत्याने आपले निर्णय वा भूमिका टोपी फ़िरवल्यासारख्या बदलून, भोवतीच्या स्तुतीपाठकांची वहाव्वा मिळवता येत असली, तरी जनतेची सहानुभूती ओसरत जाते. जनता दल, कम्युनिस्ट वा अन्य तत्सम पक्षांची महाराष्ट्रातील वाताहत कशी व कशामुळे झाली, तेही ज्यांना बघायची इच्छा नाही, त्यांच्याकडून यापेक्षा अधिक विनोदी कृतीची अपेक्षाही बाळगता येत नाही. ज्यांना शेषन आठवत नाही आणि स्वामिनाथन यांच्याशी पुर्वचर्चा करण्याची गरज भासत नाही, त्यांचे भवितव्य काय असू शकते? अर्थात भविष्याची चिंता असली तरची गोष्ट आहे. गनिमी कावा हा शिवसेनेचा आवडता ऐतिहासिक शब्द आहे. पण आजची शिवसेना आपला प्रत्येक गनिमी कावा माध्यमातून लढवत असते आणि प्रत्यक्ष लढाईत मार खात चालली आहे.

Tuesday, June 20, 2017

‘ग्यानी’ आणि अज्ञानी

gyani zail singh के लिए चित्र परिणाम

कोण हे रामनाथ कोविंद? सोमवारी भाजपाने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहिर झाल्यावर अनेकांना असा प्रश्न पडला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी व त्यांच्या पक्षाने तर आपण ह्या माणसाला ओळखतही नसल्याचा निर्वाळा देत, त्याला कसा पाठींबा द्यायचा, असाही प्रतिप्रश्न केला आहे. त्यातून त्यांना सुचवायचे काय आहे? राष्ट्रपती हा संपुर्ण देशाला ठाऊक असलेला वा लोकांमध्ये उजळ प्रतिमा असलेली व्यक्ती असावा, असेच त्यातून सुचवायचे नाही काय? तसेच असेल तर अशा अनेक नेत्यांनी वा त्यांच्या पक्षाने कधी व कोणती माणसे त्याच निकषावर तपासून राष्ट्रपती पदासाठी पुढे केली होती? त्रिदीब चौधरी हे कोण होते? त्यांनी कोणत्या पक्षाचे राजकारण केले व त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणूकीला कोणी उभे केले होते? याचे उत्तर आजच्या कोणा संपादकाला तरी देता येईल काय? एच. आर. खन्ना नावाचे गृहस्थ कोणत्या व्यवसायात होते आणि त्यांनी कोणाच्या विरोधात कुठल्या निवडणूका लढवल्या होत्या? हुमायुन कबीर नावाचे गृहस्थ काय करायचे? अशा अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. पण तसे उलटे प्रश्न विचारले जात नाहीत? म्हणून कोविंद कोण, असे बेधडक विचारले जात असते. पण असे विचारणार्‍या शहाण्यांना देखील आजवरचे राष्ट्रपती कोण होते, किंवा ज्यांना उमेदवार करण्यात आले, त्यांची पात्रता लायकी काय होती, त्याविषयी शून्य ज्ञान असते. पण हीच तर भारतीय शहाणपणाची शोकांतिका होऊन गेली आहे. समर्था घरीचे श्वान, यापेक्षाही लायकी नसलेल्या किती लोकांची आजवर तिथे वर्णी पावली गेली आहे? तो विषय म्हणून तर या निमीत्ताने चर्चेला येणे आवश्यक नाही काय? आज यातले ज्ञान पाजळणार्‍यांना राष्ट्रपती भवनात पाच वर्षे काढणार्‍या ‘ग्यानी’ झैलसिंगांची गुणवत्ता अशा वेळी कशी आठवत नाही? ते सांगायची बुद्धी कशाला होत नाही?

१९८० सालात जनता पार्टीचा धुव्वा उडवून इंदिराजींची नवी कॉग्रेस पुन्हा मोठ्या बहूमताने सत्तेत आलेली होती. १९६९ सालात राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीने कॉग्रेस पक्षात पहिली दुफ़ळी झाली. १९७८ सालात पुन्हा विभाजन झाले, तेव्हा संसदेतील कॉग्रेसचे नेता यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी व पक्षाध्यक्ष ब्रम्हानंद रेड्डी यांनीच इंदिरा गांधींना पक्ष फ़ोडण्याची वेळ आणली. तेव्हापासून कॉग्रेसच्या शेवटी कंसाता ‘आय’ हा शब्द चिकटला. त्याच कॉग्रेसला १९८० सालात प्रचंड बहूमत मिळाले आणि नंतर जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक आली, तेव्हा गृहमंत्री असलेल्या ग्यानी झैलसिंग यांची इंदिराजींनी त्या पदासाठी निवड केली होती. त्यांची अशी कुठली महान पात्रता वा गुणवत्ता होती? कॉग्रेस पक्षाने त्यांना इतक्या मोठ्या पदावर उमेदवार म्हणून पुढे केलेले होते? खुद्द झैलसिंग यांनीच निवडून आल्यावर ‘इंडिया टुडे’ पाक्षिकाला दिलेल्या मुलाखतीत, आपल्या त्या गुणवत्तेचा खुलासा केला होता. ती पात्रता नेहरू गांधी खानदानावर असलेली अढळ निष्ठा इतकीच होती. यात आजकालच्या निष्ठावंत कॉग्रेसजनांची पात्रताही क्षुल्लक मानावी लागते. झैलसिंग यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी महत्वाकांक्षा त्या मुलाखतीत कथन केली होती. नेहरू खानदानाच्या घरात आपल्याला झाडू मारण्यासाठी नेमले तरी तो आपला सन्मानच असेल, असे राष्ट्रपती झाल्यानंतर या गृहस्थांनी सांगितले होते. मोदींनी आजवर ज्यांना कुठलीही उमेदवारी वा नेमणूक दिली, त्यापैकी कोणी निदान इतकी उदात्त व महान महत्वाकांक्षा वा पात्रता सांगितलेली नाही. पण आजचे कॉग्रेसवाले किंवा त्यांचे दक्षिणापात्र शहाणे, झैलसिंग यांना ओळखतच नसल्यासारखे कोविंद कोण, असले प्रश्न विचारत आहेत. अर्थात पुढल्या काळात झैलसिंग यांनाही राष्ट्रपती असताना झाडू मारण्याचा प्रसंग नेहरू खानदानाच्या वारसाने आणलाच होता.

राजीव गांधी पंतप्रधान होते आणि त्यांच्या पाठीशी प्रचंड बहूमत होते. म्हणून त्यांनी सुप्रिम कोर्टाचा शहाबानु निर्णय फ़िरवणारा कायदाही करून दाखवला होताच. पण त्याच राजीव गांधींनी देशाचा राष्ट्रपती किती बेअक्कल असू शकतो, त्याचा घटनात्मक दाखलाही निर्माण करून ठेवला आहे. नेहरू खानदानाच्या घरी झाडू मारणेही अभिमानास्पद मानलेल्या झैलसिंगांनी ते दिव्य करून दाखवले होते. त्या कालखंडात खलिस्तानचा दहशतवाद पंजाबला भयभीत करून सोडत होता आणि अकाली दलाने विधानसभा निवडणूका लढवण्याची हिंमतही केलेली नव्हती. अशा काळात अकालींचा एक गट संत लोंगोवाल यांच्या नेतृत्वाखाली वेगळा झाला व त्याने राजीव गांधी यांच्याशी शांतता करार केला होता. त्याच करारानुसार पुढल्या काळात कॉग्रेसच्या पाठींब्याने पंजाबमध्ये संयुक्त सरकार सत्तेत आलेले होते. त्याचे मुख्यमंत्री होते सुरजितसिंग बर्नाला. त्यांची पकड प्रशासनावर नव्हती आणि नित्यनेमाने धुमाकुळ चालू होता. एके दिवशी खुद्द लोंगोवाल यांचाच खलिस्तानी दहशतवाद्यांनी मुडदा पाडला होता. अशा कालखंडात संसदेचे अधिवेशन आले आणि त्याचीही सुरूवात राष्ट्रपतींच्या भाषणानेच झालेली होती. त्या भाषणाचा मसुदा सरकार बनवते आणि राष्ट्रपती नुसते वाचन करतात. अशा भाषणात पंजाबच्या कायदा सुव्यवस्थेचे कौतुक करणारे शब्द घातलेले होते. ग्यानी झैलसिंग यांनी त्याबद्दल आक्षेप घेतला होता. राष्ट्रपती आपल्या संसदेतील अभिभाषणात देशातील एकाच राज्याचे वा राज्य सरकारचे कौतुक करू शकत नाही. किंबहूना त्यामुळे अन्य राज्यात कायदा सुव्यवस्था अयोग्य असल्याचा अर्थ लावला जाऊ शकेल. म्हणून तेवढे वाक्य व संदर्भ वगळावा, असा आग्रह झैलसिंग यांनी धरला होता. पण मंत्रीमंडळाने भाषण संमत केले आहे आणि ते वाचावेच लागेल, म्हणत राजीव गांधींनी राष्ट्रपतींची मागणी धुडकावून लावली होती.

बिचारे झैलसिंग काय करू शकत होते? घटनात्मक अधिकार त्यांना पंतप्रधानाला धुडकावण्याचा अधिकार देत नव्हते आणि वडिलधारेपणाचा सल्ला नेहरू खानदानाचा वारस धुडकावून लावत होता. बिचार्‍या निष्ठावान झैलसिंग यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीत ते भाषण वाचले आणि त्यातून पंजाबच्या बर्नाला सरकारचे आगंतुक कौतुक केले होते. पुढे काय व्हावे? इकडे संसदेचे अधिवेशन चालले होते आणि पंजाबची स्थिती दिवसेदिवस ढासळत गेली. अधिवेशन संपण्यापर्यंत स्थिती इतकी विकोपास गेली, की अधिवेशन संपल्याच्या रात्रीच पंजाबचे बर्नाला सरकार राजीव गांधींनी बडतर्फ़ केले. ते बडतर्फ़ करताना काढलेल्या अध्यादेशात कायदा व्यवस्था हाताबाहेर गेली म्हणून ही कारवाई करावी लागली, असे कारण दिलेल्या त्या अध्यादेशावर सही ग्यानी झैलसिंग अशी आहे. म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींनी बर्नाला सरकारचे उत्तम कायदा व्यवस्था म्हणून कौतुक केले. पण शेवटच्या दिवशी तेच सरकार कायदा राबवता येत नाही, म्हणून बरखास्त करून टाकले. ह्यापेक्षा झैलसिंग यांची कोणती विटंबना असू शकते. ते भले उच्चशिक्षित नसतील. पण किमान प्रशासकीय अनुभव आणि विवेकबुद्धी त्यांच्यापाशी होती. म्हणूनच त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणातूल बर्नाला सरकारचे कौतुक गाळण्याची मागणी केलेली होती. पण ती फ़ेटाळून लावत इंदिराजींच्या पंतप्रधान सुपुत्राने झैलसिंग यांच्या घराणेनिष्ठेची अशी सत्वपरिक्षा घेतली होती. कॉग्रेस पक्षाच्या लेखी यापेक्षा राष्ट्रपती व राज्यघटनेची अधिक लायकी नसते. आपल्या सोयीनुसार व लहरीनुसार काहीही करण्याची संधी, या घराण्यातील कोणीही कधी सोडली नाही. आज त्याच घराण्याचे वंशज व त्यांचे बगलबच्चे कोविंद कोण, असले बाष्कळ सवाल करतात, तेव्हा जिथे असतील तिथून खुद्द ग्यानी झैलसिंग यांनाही हसू येत असेल ना?

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

kovind with modi के लिए चित्र परिणाम

गेला आठवडाभर भावी राष्ट्रपती कोण असतील, त्यापेक्षा त्यासाठी कोण उमेदवार आहेत, याची चर्चा होत राहिली. म्हणजे बहूमत भाजपाकडे असले तरी सहमतीचे त्या पदाचा उमेदवार ठरवावा, अशी मागणी होत राहिली. पंतप्रधान परदेशी होते आणि इथे त्यावरून चर्चा चालल्या होत्या. कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आणि तिला कोण हजर वा गैरहजर राहिले, त्यावरूनही उलटसुलट बोलले गेले. पण त्या चर्चा ऐन रंगात आल्या असताना, निवडणूक आयोगाने त्यासाठीचे वेळापत्रकच जाहिर केले. त्यामुळे नुसतेच बुडबुडे उडवण्याची वेळ संपली होती. दोन बैठका घेऊनही विरोधकांना संयुक्त उमेदवार टाकायचाही साधा निर्णय घेता आला नाही. उलट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत विरोधकांशी बातचित करण्यासाठी तीन ज्येष्ठ मंत्र्यांची समिती नेमून टाकली. दोनचार दिवस या नेत्यांनी ठराविक अन्य पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी केल्या आणि सोमवारी भाजपाने आपला उमेदवार जाहिर करून टाकला आहे. त्यावर आता उलटसुलट प्रतिक्रीया येतीलच. पण खरोखर कधी अन्य पक्षीयांशी अशा पदाच्या उमेदवारासाठी चर्चा झालेल्या आहेत काय? यापुर्वी कुठल्या सत्ताधारी पक्षाने विरोधकांशी भेटीगाठी घेऊन वा सल्लामसलत करून उमेदवार ठरवलेला होता? इंदिरा गांधी वा त्यापुर्वीच्या काळात असा विषयच येत नव्हता. कारण कॉग्रेसच्या पाठीशी कायम बहूमत होते. त्यामुळे कॉग्रेसने ठरवलेला उमेदवार निवडून येण्याची फ़िकीर नव्हती, की त्यांना कधी विरोधकांना विश्वासात घेण्याची गरज भासली नव्हती. फ़ार कशाला मागल्या दोन राष्ट्रपतींना उमेदवारी देताना कॉग्रेसचे बहूमत नव्हते आणि आघाडी सत्तेत असूनही सोनियांनी कुणा विरोधी वा मित्रपक्षाशी चर्चा मसलत केलेली नव्हती. नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत प्रथमच हा उद्योग झाला आहे. त्याचे कौतुक करा किंवा टिका करा.

यापुर्वी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचे खुप राजकारण झालेले आहे. त्यातले काही किस्सेही मनोरंजक आहेत. पण आज ज्या कारणास्तव मोदींवर टिका केली जात आहे, त्यापेक्षा सोनिया गांधी कुठे वेगळ्या वागल्या होत्या? आधीची दहा वर्षे देशात युपीएचे सरकार होते आणि त्याची सुत्रे सोनियांच्या हाती होती. तेव्हा म्हणजे २००७ सालात अशीच निवडणुक आलेली होती. तर सोनियांनी आपले विश्वासू गृहमंत्री शिवराज पाटिल यांची निवड केलेली होती. पण ते नाव समोर येताच डाव्या आघाडीने कडाडून विरोध केला होता. अर्थात त्या डाव्यांच्या मतांशिवाय नवा राष्ट्रपती निवडून आणणे सोनियांना शक्य नव्हते. म्हणूनच त्यांनी शिवराजना सोडून राजस्थानच्या राज्यपाल असलेल्या प्रतिभा पाटिल यांचे नाव पुढे केलेले होते. त्यावेळी संसदेत भाजपा हा विरोधी पक्ष होता आणि इतरही अनेक पक्ष युपीएमध्ये नव्हते. पण सोनियांना अशा अन्य पक्षांशी सल्लामसलत करावी किंवा त्यांचे मत जाणून घ्यावे, असे एकदाही वाटलेले नव्हते. आज जितक्या अधिकारात मोदींनी रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे केले आहे, त्यापेक्षाही एकतर्फ़ी भूमिकेत सोनियांनी प्रतिभाताईंना पुढे केलेले होते. पाच वर्षांनी त्यांची मुदत संपली, तेव्हा नव्या राष्ट्रपतींचे नाव ठरवताना सोनियांचे वा कॉग्रेसचे बळ काहीसे वाढले होते. तेव्हाही त्यांनी विरोधी वा मित्र पक्षांशी बातचित केलेली नव्हती. परस्पर प्रणबदा मुखर्जी यांचे नाव जाहिर केलेले होते. सहाजिकच सत्ताधारी पक्षाने विरोधकांशी बातचित करावी वा केली पाहिजे, हा मुळातच भंपकपणा आहे. असे आजवर झाले नाही आणि आजही होण्यामध्ये कुठला शिष्टाचार नाही. पण मोदींना हुकूमशहा ठरवण्यासाठी व निर्णय लादणारे भासवण्यासाठी, अशा पुड्या सोडल्या जात असतात. अन्यथा आजवर कुठल्याही राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सल्लामसलतीने सहमतीचा उमेदवार आणलेला नाही.

आज मोदींनी अन्य पक्षांना विचारात न घेता कोविंद यांचे नाव घोषित केले आहे आणि म्हणून त्यांच्यावर उर्मटपणाचाही आरोप केला जात आहे. पण मग मागल्या दोन खेपेस सोनियांनी यापेक्षा काय वेगळे केले होते? सोनियांवर तेव्हा कोणी उर्मटपणाचा आरोप केला होता काय? पंधरा वर्षापुर्वी भाजपाची सत्ता होती आणि मित्रपक्ष सोबत घेऊन वाजपेयी पंतप्रधान झालेले होते. तेव्हाही निवडणूकीचा प्रसंग आला. तर स्वपक्षाचा उमेदवार स्वबळावर निवडून आणणे त्यांना शक्य नव्हते आणि कॉग्रेसची शक्ती तेव्हा अधिक होती. म्हणूनच वाजपेयींनी स्वपक्षीय उमेदवार टाकण्यापेक्षा डॉ, अब्दुल कलाम हे निर्विवाद नाव पुढे केले होते. उलट तितकीच दुबळी कॉग्रेस असतानाही सोनियांनी मित्रपक्षांनाही अंधारात ठेवून शिवराज पाटिल वा प्रतिभा पाटिल यांची नावे पुढे केली होती. तेव्हा कोणी कॉग्रेसवाला उमेदवार असू नये, यासाठी चर्चा केलेली नव्हती. आज भाजपाकडे अधिक बळ व बहूमत असतानाही सहमतीच्या उमेदवारासाठी चर्चा होते, ही म्हणूनच बदमाशी म्हणावी लागेल. ज्या पक्षाकडे संख्याबळ असते, त्यानेच आपला उमेदवार टाकण्यात गैर काय असू शकते? ज्या देशात कधीही सहमतीने राष्ट्रपती निवडला गेला नाही, तिथे अशा चर्चा घडवण्यातच लबाडी असते. त्याला दबून जाण्याचा स्वभाव वाजपेयींचा होता. मोदी तितके लेचेपेचे नाहीत. म्हणूनच ते सतत आपल्या विरोधकांना खेळवत असतात. राष्ट्रपतींच्या निवडणूकीचा उमेदवार ठरवण्याच्या बाबतीतही त्यांनी नेमका तोच डाव टाकला आहे. त्यामुळे गुणवत्ता किंवा सहमतीच्या भाषेला कुठलाही अर्थ नाही. ज्या हुलकावण्यांना मोदींनी मागल्या तीन वर्षात कधी दाद दिली नाही, तेच फ़ुसके डाव खेळण्याने काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा याही बाबतीत मोदी बाजी कशामुळे मारू शकलेत, त्याचा अभ्यास विरोधकांनी केल्यास लाभदायक ठरू शकेल.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मोदी या निवडणूकीसाठी आज सज्ज झाले नाहीत, किंवा आताच विचार करू लागलेले नाहीत. दोन वर्षापुर्वीच त्यांनी त्या दिशेने काम सुरू केलेले होते. संसदेत असलेले बळ अधिक विधानसभेतील आमदार संख्या; यावर राष्ट्रपती निवडून येत असतात. सहाजिकच ती संख्या संपादन करण्यासाठी मोदी प्रत्येक विधानसभेच्या निवडणूकीकडे सतत गंभीरपणे बघत आलेले आहेत. महाराष्ट्र असो किंवा उत्तरप्रदेश, त्यातून वाढणारे आमदार राष्ट्रपती भवनाचा मार्ग खुला करतात, हे ओळखून मोदी दोन वर्षे राबलेले आहेत. उत्तरप्रदेशात इतके मोठे यश सत्तेसाठी आवश्यक नव्हते. ते संख्याबळ राष्ट्रपती निवडून आणण्यासाठी आवश्यक होते. हे अखिलेश, मायावती वा राहुल गांधींना कधीच कळले नाही. वाराणाशीला अखेरच्या मतदान टप्प्यात तीन दिवस मुक्काम ठोकून बसलेल्या मोदींना विधानसभेत बहूमताची फ़िकीर नव्हती. त्यांना तेव्हा एक एक आमदाराची राष्ट्रपती मतदानातली किंमत ठाऊक होती. ही तीन महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा विरोधी पक्ष किंवा राजकीय अभ्यासकही राष्ट्रपती निवडणूकीचा विचारही करीत नव्हते. तेव्हापासून मोदी-शहांनी भावी राष्ट्रपतींच्या उमेदवारीची चाचपणी केलेली असणार. कदाचित नावही ठरवलेले असणार. पण अखेरच्या क्षणापर्यंत त्याचा सुगावा कोणाला लागू शकला नाही. ही मोदींच्या राजकारणाची शैली आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकही गडबडून जातात, तर राजकीय विरोधकांची काय कथा? उत्तरप्रदेश जिंकल्यावर मोदी-शहा मिळून मित्र व अन्य पक्षांच्या मतांची बेगमी करण्यात गर्क होते आणि ते साध्य झाल्यावर त्यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या सोहळ्यात वा हेटाळणीत विरोधकांना गुंतवून ठेवले. आता त्याचा निचरा झाला असून, टिकाकारांना नवा विषय सोपवून मोदी-शहा बहुधा राज्यसभेत बळ वाढवण्याच्या गणितामध्ये रमलेले असतील.