Thursday, January 18, 2018

शाळेत काय शिकवतात?

ryan school के लिए इमेज परिणाम

लखनौ येथील एका शाळेतल्या मुलीने पहिलीतल्या मुलाला थाप मारून प्रसाधन गृहात नेले आणि तिथे त्याला मारहाण केली. त्या बालकाने विचारणा केल्यावर तीच मुलगी म्हणाली, की असे काही केल्यावर शाळा लवकर सोडली जाईल. असे म्हणून त्या विद्यार्थिनीने त्या बालकाला भोसकले आणि तसेच सोडून निघून गेली. सुदैवाने ते बालक विव्हळत असताना जवळून चाललेल्या शिक्षीकेला त्याचा आवाज ऐकू आला आणि तो बचावला. ह्यात नवे काही राहिलेले नाही. कारण अशीच्या अशीच एक घटना काही दिवसांपुर्वी हरयाणा राज्यातील एका आधुनिक महागड्या शाळेत घडलेली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती लखनौच्या शाळेत झालेली आहे. कुठला तरी एक विद्यार्थी जखमी झाला वा मरण पावला, तर शाळा लवकर सोडली जाते ही कल्पना त्या मुलीच्या डोक्यात कोणी भरवली? तिने नक्कीच गुरुग्राम हरयाणाच्या घटनेच्या बातम्या बघितल्या असणार. अन्यथा अशा कल्पना एकाचवेळी अनेक मुलांच्या डोक्यात येऊ शकत नाहीत. हरयाणाच्या शाळेत एका मुलाने ते़च केले होते. त्याविषयीचे गुढ नंतरच्या तपासात उलगडले होते. पण अशा बातम्या कथानक वा मालिका असल्यासारख्या दाखवल्या जातात, त्याचाच हा दुष्परिणाम नाही काय? घटना कितीही खळबळजनक असो, त्याचे चित्रण वा विवेचन कोणासमोर करावे, याचे भान आज राहिलेले नाही. मुलांची कोवळी मने अतिशय संवेदनाशील असली तरी त्यांना तारतम्य नसते. मुलेच कशाला समाजातील मोठी लोकसंख्या तारतम्याने विचार करणारी नसते. म्हणूनच त्यांच्या समजुतीला चिथावणी देईल, अशी माहिती त्यांच्यापासून लपवणे ही लबाडी नसते. अविष्कार स्वातंत्र्य वा सत्यकथन म्हणून जे काही नित्यनेमाने घरोघरी वाहिन्यांकडून पोहोचते केले जाते, त्याचे हे परिणाम आहेत. आपण कोणापर्यंत काय घेऊन जातो आहोत, त्याचे भान सुटल्याचा हा परिपाक आहे.

हरयाणाची घटना घडली तेव्हा जवळ्पास आठवडाभर त्या शाळेला लक्ष्य करण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापनाला झोडपून काढण्यात आले. शाळेच्या शिपाई व स्कुलबस कर्मचार्‍यांनाही गुन्हेगार ठरवण्याची स्पर्धा चाललेली होती. ज्या कर्मचार्‍याने त्या जखमी मुलाला उचलून घाईगर्दीने इस्पितळात उपचारासाठी नेलेले होते, त्यालाच खुनी ठरवण्यात आले. विनाविलंब त्याला अटक झाली आणि झोडपून त्याच्याकडून पोलिसांनी कबुलीजबाबही मिळवला. पण दरम्यान आपल्या मुलाच्या मृत्यूचे दु:ख विसरून पालकांनी सीबीआयच्या चौकशीचा आग्रह धरला आणि त्यातून काय निष्पन्न झाले होते? तर त्या बालकाचा जीव वाचवण्यासाठी ज्याने नागरी कर्तव्य पार पाडले, तोच खुनी ठरवला गेला होता. अखेरीस खुनी शोधताना हा पहिला कबुलीजबाब देणारा आरोपी निर्दोष असल्याचे निष्पन्न झाले. इतका तमाशा झाल्यावर तरी वृत्तवाहिन्यांनी आपला उतावळेपणा सोडायचे भान ठेवायला हवे होते. तिथे शाळेत पुरेशी सुरक्षा नाही म्हणून बातम्या रंगवताना शाळेच्या संचालक व व्यवस्थापनाला पळता भूई थोडी करण्यात आलेली होती. ते कोणी पावित्र्याचे हरिश्चंद्र अवतार नव्हते. पण अशा गोष्टी रंगवून सांगताना त्याचा जनमानसावर काय परिणाम संभवतो, त्याचेही तारतम्य माध्यमांनी ठेवायचेच नाही काय? ते राखले असते तर बालकाला वाचवणारा कर्तव्यदक्ष कर्मचारी पोलिसांचा मार खाण्यापर्यंत गुन्हेगार ठरला नसता. व्यवस्थापनालाही अकारण तोंड लपवून पळायची वेळ आली नसती. खरा गुन्हेगार त्या कालावधीत उजळमाथ्याने समाजात वावरला नसता. तो खरा खुनी या सर्व काळात सराईत गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांना सामोरा जाऊनही निश्चींत होता. कोवळ्या वयातील असा सराईत निर्ढावलेपणा, भविष्यातल्या खतरनाक गुन्हेगाराची जोपासना करीत असतो. त्यातून सुदृढ निरोगी समाज निर्माण होण्यास हातभार लागत नसतो.

गुरूग्रामच्या त्या घटनेने एका मुरलेल्या गुन्हेगाराला जन्म दिला व त्याची माध्यमांनीच जोपासना केली म्हणायला हवे. पण विषय तिथेच संपला नाही. त्या बातम्या बघून वा त्याचे तपशील रंगवलेले ऐकून, आणखी कित्येक बालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात तसे काही करण्याची कल्पना शिरलेली आहे. तिचेच प्रत्यंतर मग लखनौमध्ये आले. गुरूग्रामच्या विद्यार्थ्याला परिक्षा पुढे ढकलली जाण्यासाठी अन्य कुणाचा जीव घ्यावा असे वाटले आणि या मुलीला शाळा लवकर सुटावी म्हणून बालकाचा जीव घेण्य़ाची स्फ़ुर्ती मिळाली. बातम्या मनोरंजन ह्या व्यक्तीगत गोष्टी असल्या तरी त्यातून अनेक संदेश व संकेत कोवळ्या अननुभवी मनाला दिले जात असतात. त्याचे भविष्यातील परिणाम त्या मनाला उमजतील असे नाही. कितीही धोका वा प्रतिकुल स्थिती असली, तरी सोपे वाटणार्‍या गोष्टीकडे मानवी ओढा असतो. मग तो जिना चढून पुल ओलांडण्यापेक्षा रेल्वेलाईन ओलांडण्याचा मोह असो, किंवा तलाव नदीच्या डोंगरकड्यावर उभे राहून सेल्फ़ी घेण्याचा आगावूपणा असो. त्यामागची मनोवृत्ती जाणकार म्हणवणार्‍यांनी समजून घेतली पाहिजे. आपण ज्या कल्पना वा माहिती लोकांसमोर मांडतो आहोत, त्यातले धोके ज्यांना समजू शकत नाहीत, त्यांना त्याची ओळखही होऊ नये; याचे भान सादरकर्त्याने राखले पाहिजे. शक्तीमान वा तत्सम कथानके बघून धाडसी कृती करताना अनेक बालकांचा बळी गेलेला आहे. ठराविक वयातल्या मुलांना अशा धाडसाचे आकर्षण असते आणि पकडले जाणार नसल्याचा खुळा समज, त्यांना धाडसाला प्रवृत्त करत असतो. म्हणूनच त्यांच्या डोक्यात असल्या कल्पना शिरणार नाहीत, याची काळजी समजुतदार लोकांनी घेतली पाहिजे. माध्यमात तितके शहाणे आहेत काय, असा मग प्रश्न पडतो. बाजीगर वा तत्सम चित्रपट लोकप्रिय झाल्यानंतर एकतर्फ़ी प्रेमातून किती मुलींना हल्ल्याचे बळी व्हावे लागले होते?

लखनौ येथे जी ताजी घटना घडली आहे, तिची मानसिकताही समजून घेतली पाहिजे. त्या मुलीला शाळेत वा वर्गात बसणेच शिक्षा वाटत असावी. तिला अभ्यासाच्या बोजाखाली दबून रहाण्याचा असह्य कंटाळा आलेला होता. त्यातून सुटका करून घेण्यासाठी तिने एका बालकाच्या जीवाशी खेळ केला. ते बालक त्यातला बळीच आहे. पण कोवळ्या वयात मनासारखे खेळून मौजमजा करून जगण्याची संधी त्या मुलीला नाकारणार्‍यांनी, तिच्यातला पशू जागा केलेला नाही काय? त्यासाठी तिचे पालक व शिक्षक शाळाही सारखीच जबाबदार नाही काय? मुलाचा विकास बुद्धीने व्हायचा, तर ते मुल मनानेही प्रसन्न असायला हवे आणि जे शिकायचे, तेही त्याला आवडायला हवे. आवडले तर सहज शिकता येते. अशा रितीने शाळेत काही अभद्र घडले तर शाळा लवकर सोडली जाते, हे तिला कोणी शिकवलेले नव्हते. पण तरीही ती कुठूनतरी हे शिकली व तोच प्रयोग तिने आपल्या आयुष्यातली समस्या सोडवण्यासाठी केला. शाळेच्या वर्गात वा पुस्तकातून न शिकवलेली हिंसा, ती मुलगी सहज शिकली आणि शाळेत शिकवले जाणारे शिक्षण तिला नकोसे वाटले. तर शिक्षण म्हणजे काय त्याचाही नव्याने विचार होण्याची गरज आहे. कायद्याची कलमे व त्यात नमूद केलेली शिक्षा यातून गुन्ह्याला आळा घातला जाऊ शकत नाही, की समाज सुरक्षित होऊ शकत नाही. समाज हा जीवंत व संवेदनाशील लोकांनी बनलेला असतो. पण तीच माणसे अधिकाधिक संवेदनाहीन व बोथट होत गेली, तर त्यातून पशूचे कळपच उदयाला येणार ना? शाळा वा कुणी विद्यार्थी व व्यवस्थापन यांना आरोपी म्हणून पुढे केल्याने गुरूग्रामला काही साधलेले नाही. लखनौमध्येही काही हाती लागणार नाही. समाज सुदृढ निरोगी मनाचा बनवण्याला प्राधान्य असायला हवे. नुसती सनसनाटी माजवून समाजनिर्मिती होत नाही, की माणसाला सुधारता येत नाही.

1 comment:

  1. I am really disgusted with all the Marathi news-channels.All give news with motivated head-lines.On the debates with panels,most of the anchors stop the member whose views they don't like.Uddhav's & Raj Thakare's vews are given undue publicity.

    ReplyDelete