Wednesday, January 24, 2018

पुरोगामी सतीव्रतेची कथा

संबंधित इमेज

गुजरातमध्ये भाजपाच्या जागा कमी करण्यात यश मिळाल्याने फ़ुशारलेल्या काही पक्ष व नेत्यांनी आगामी लोकसभेपुर्वी मोदी विरोधात बडी आघाडी उभारण्याचा विचार सुरू केला होता. पण त्याला पहिलाच दणका डाव्या आघाडीकडून बसला आहे. डाव्या आघाडीचे नेतृत्व करणार्‍या मार्क्सवादी पक्षाचे सर्वोच्च नेता सीताराम येचुरी यांनी मांडलेला कॉग्रेसशी आघाडी करण्याचा प्रस्ताव त्यांच्याच पक्षाने सध्यातरी फ़ेटाळून लावला आहे. मार्क्सवादी पक्षाचे नेतृत्व करणार्‍या मध्यवर्ति समितीमध्ये येचुरी यांचा आघाडीचा प्रस्ताव बहूमताने फ़ेटाळला गेला आहे आणि माजी सरचिटणिस प्रकाश कारत यांचा आघाडी नको हा बहूमताने मान्य झाला आहे. आता पक्षाचे देशव्यापॊ संमेलन हैद्राबाद येथे होईल, तेव्हा त्यावर अधिक चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. म्हणजेच कॉग्रेस सोबत जावे किंवा नाही, यावर निर्णय होईल. दोन वर्षापुर्वी बंगाल विधानसभेच्या निवडणुकात तो प्रयोग करून झालेला आहे. तिथे ममतांचे आव्हान पेलताना एकट्याची हिंमत गमावून बसलेल्या डाव्या आघाडीने कॉग्रेसशी जागावाटप करून संयुक्तपणे निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे ममतांना रोखणे शक्य झाले नाही, उलट त्यांच्याच अधिक जागा स्वबळावर निवडून आल्या आणि मार्क्सवादी पक्ष तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला जाताना, कॉग्रेसचे मात्र पुनरुज्जीवन बंगालमध्ये झाले. त्यांच्या अधिक जागा डाव्यांच्या मदतीने निवडून आल्या आणि राज्यसभेतके एक सदस्य पाठवू शकेल इतकेही आमदार त्या पक्षाला मिळू शकले नाहीत. मात्र या गडबडीत भाजपाच्या मतांची टक्केवारी बंगालमध्ये वाढलेली असून, आगामी कालखंडात भाजपाच आपले आव्हान असल्याचे समजून ममता डाव्यांना किंमतही देईनाशा झाल्या आहेत. थोडक्यात डावी आघाडी व मार्क्सवादी पक्षाचे अस्तित्वच बंगालमध्ये धोक्यात आले आहे. सती होऊन पतीला जीवदान देण्याचे व्रत त्यांनी कॉग्रेसच्या बाबतीत पार पाडले असे म्हणता येईल.

सीताराम येचुरी वा प्रकाश कारत हे चळवळीतून आलेले नेते नाहीत. १९६० नंतरच्या काळात डाव्यांनी आपल्या रणनितीप्रमाणे विद्यापीठे व बुद्धीजिवी वर्गाला लक्ष्य करण्याचे काम हाती घेतले. महत्वपुर्ण विद्यापीठे व उच्चभ्रू संस्थामध्ये धुर्तपणे शिरकाव करून घेतला. त्यामुळे पुढल्या काळात अशा संस्थांमध्ये मार्क्सवादी पोपटपंची करणारी एक मोठी फ़ौज उदयास आली. आज आपण कन्हैयाकुमार, उमर खालिद वा जिग्नेश मेवानी यांची बकवास ऐकतो, त्यात नवे काहीच नाही. १९६० नंतरच्या काळात डाव्यांनी जी विद्यापीठात विद्यार्थी चळवळीची मशागत केली, त्यातून जन्माला आलेली ही पिढी आहे. त्यांच्या प्राध्यापकांनी व अध्यापकांनी घोकून घेतलेले मुद्दे व विषय ते बडबडत असतात. मात्र त्यांचा कुठल्याही गरीब दलित समाजातील चळवळी वा समस्यांशी कुठलाही काडीमात्र संबंध नाही. त्यांच्या पहिल्या पिढीतून येचुरी वा कारत असे तरूण नेते जन्माला आलेले होते. त्यांनी ज्या पक्षात पुढे आश्रय घेतला, त्या पक्षाची चळवळ किंवा संघटना अशा पढतमुर्खांनी उभारलेली नव्हती. ज्या पिढीने कम्युनिस्ट वा मार्क्सवादी पक्षाची तळागाळापासून उभारणी केली, त्यांनी लोकांच्या समस्या प्रश्न व यातना समजून, त्यावर उपाय योजण्यामधून पक्षाचा डोलारा उभा केलेला होता. कामगार शेतकरी व कष्टकरी यांच्यात मिसळून त्यांनी संघटना उभारलेल्या होत्या. त्यापैकी अनेकांना मार्क्स कोण किंवा लेनिनने केलेल्या सोवियत क्रांतीचे नामोनिशाणही ठाऊक नव्हते. पण आपल्या भोवतालाच्या परिस्थितीवर मार्क्सवादात उपाय व समाधाने शोधलेली होती. म्हणूनच त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळाला व पक्षाला राजकीय बळ उभारता आले. त्यापैकी कुठलेही कष्ट येचुरी कारत यांनी उपसलेले नव्हते. म्हणूनच त्यांना संघटनात्मक मेहनत ठाऊक नव्हती की तिची देखभाल करण्याविषयी कुठली पर्वा नव्हती. त्यातून हा डाव्या आघाडीचा र्‍हास या दोघांनी घडवून आणला आहे.

जेव्हा संघटनेपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाची नाळ तुटली, तेव्हा त्यांनी कॉग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली होती. पण त्यांच्यापासूनच वेगळा झालेल्या मार्क्सवादी गटाने कॉग्रेसशी कायम उभा दावा मांडलेला होता. आणिबाणीनंतर कम्युनिस्ट पक्ष लयास गेला आणि कॉग्रेसची साथ सोडून मार्क्सवादी भावाच्या आश्रयाला परत आला. आपला हा कॉग्रेसविरोध मार्क्सवादी गटाने २००४ सालात संपवला आणि प्रथमच कॉग्रेसच्या मनमोहन सरकारला पाठींबा देण्याची चुक केली. तिथून याही पक्षाचा र्‍हास सुरू झाला होता. सत्तेत येण्यासाठी त्यांची मदत घेणार्‍या कॉग्रेसने डाव्यांचा कुठलाही अजेंडा घेतला नाही. अखेरीस २००८ च्या सुमारास त्यांना कॉग्रेस सरकारला दिलेला पाठींबा काढून घ्यावा लागला होता. पण दरम्यान त्यांचे पावित्र्य लयास गेलेले होते. म्हणूनच प्रथम २००९ सालात त्यांचा लोकसभा निवडणूकीत दारूण पराभव झाला आणि अवघ्या दोन वर्षात विधानसभेतही त्यांचा धुव्वा उडाला. त्याला येचुरी व कारत हे उपटसुंभ विद्यापीठीय नेते कारणीभूत आहेत. जी संघटना उभारण्यात त्यांचा तसूभरही सहभाग नव्हता, तिची सुत्रे हाती घेतल्यावर त्यांनीच आपल्या पुस्तकी अकलेने पक्षाचा पुरता बोजवारा उडवून दिला. त्यांचे प्राबल्य असलेल्या प्रत्येक राज्यात कॉग्रेस हाच त्यांचा प्रतिस्पर्धी होता आणि भाजपा कुठेही त्याचा शत्रू नव्हता. पण राज्यात कॉग्रेस विरोधी मते मागून दिल्लीत त्याच कॉग्रेसचे समर्थन करताना मार्क्सवादी व डाव्यांनी आपले पावित्र्य चारित्र्य संशयास्पद करून टाकले. त्याची किंमत त्यांना २००९ पासून सतत मोजावी लागलेली आहे. भाजपा वा मोदी विरोधाच्या टोकाला जाऊन त्यांनी आपले बळ गमावले आहे. अशा स्थितीत पुन्हा त्याच हेतूने कॉग्रेसशी हातमिळवणी करण्याने काय साधणारे होते? पण पुस्तकात जगणार्‍या अशा उपटसुंभ नेत्यांना कोणी वास्तव दाखवावे? आपल्या चुका ज्यांना समजत नाहीत, ते कधी सुधारत नाहीत.

आज बंगालमध्ये मार्क्सवादी पक्ष खिळखिळा झाला आहे आणि त्यांच्या मागे फ़रफ़टत गेलेल्या अन्य तीन डाव्या पक्षांचीही पुरती धुळधाण उडालेली आहे. त्यामुळे जी पोकळी निर्माण झाली, तिथे भाजपा आपले हातपाय पसरत पुढे सरकला आहे. बंगाल असो किंवा केरळ, दोन्ही राज्यात भाजपाचे बळ वाढते आहे आणि त्यासाठी खरी मेहनत डाव्यांनीच केलेली आहे. बंगाल वा केरळात या डाव्यांचा खरा पाठीराखा मतदार नेहमी हिंदू समाज राहिला आहे. पण तिथे हिंदू म्हणूनच अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले असताना यापैकी कोणी त्या समाजाच्या सुरक्षेला पुढे आलेला नाही. त्याच्या परिणामी भाजपाचे बळ वाढत गेले आहे. त्याच आपल्या हक्काच्या मतदाराला साद घालण्याची अक्कल येचुरी वा कारत यांना आलेली नसेल, तर कुठल्याही आघाडी वा जागावाटपाने त्यांना आपले अस्तित्व टिकवता येणार नाही. मोदी विरोधाच्या अतिरेकात त्यांनी संघ व पर्यायाने हिंदू विरोधी पवित्रा घेतल्याने, त्यांच्या पुरोगामीत्वावरच प्रश्नचिन्ह लागलेले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठींब्याचा लाभ कॉग्रेसला मिळाला आणि डावे आपली जमीन गमावून बसले आहेत. महाराष्ट्रात शरद पवारांच्या मागे जाऊन डाव्या पुरोगाम्यांचा अस्त झाला आणि मागल्या दहा वर्षात देशभरच्या डाव्या पुरोगामी पक्ष संघटनांनी सोनियांच्या मागे धावत आपली ओळख पुसून टाकली आहे. मोदी विरोध ही एक बाब असते आणि आपले अस्तित्व व पाठबळ टिकवणे वेगळी गोष्ट असते. आज आपण कोण आहोत वा आपला राजकीय संदर्भ काय आहे, तेही डाव्यांना लक्षात राहिलेले नाही. कुठल्याही वाहिनीच्या चर्चेत डावे वक्ते प्रवक्ते राहुल वा कॉग्रेसचा ज्या हिरीरीने बचाव मांडतात, त्यातून त्यांची केविलवाणी स्थिती समजू शकते. ते कॉग्रेस सोबत गेले किंवा नाही गेले, म्हणून त्यांचे पुनरुज्जीवन होण्याची बिलकुल शक्यता नाही. पुरोगामीत्वाची वस्त्रे चढवून कॉग्रेससाठी सति झालोय, एवढे त्यांना समजले तरी खुप झाले.

2 comments:

  1. Masta bhau.girish kuber sarkhe tyanchach jatitale lok mhntayat ki Congress shi Yuri n Karin chuk keli.va shivsena bjp chi Yuri tutali he chngle sale ase don lekh lihitat.kevadha murkhpana va bjp virodh

    ReplyDelete
  2. भाऊ काल m.d.ramteke यांचा ब्लॉग वाचण्यात आला हे प्रखर आंबेडकरवादी आहेत,त्यांनी एका लेखात मार्क्सवाद लेकिन किंवा मेवानी इ.लोकांचा चांगलाच समाचार घेतला आहे काही लेख पूर्वग्रहदूषित आहेत पण काही चांगले आणि जबरदस्त आहेत....

    ReplyDelete