Tuesday, January 23, 2018

राहुलचे मोदींना अनावृत्तपत्र

rahul tweets के लिए इमेज परिणाम

आदरणिय प्रधानमंत्री,

आपल्याला ठाऊकच आहे, की माझ्या मनात तुमच्याविषयी किंचीतही आपुलकी वा आदर नाही. असलाच तर राग व मत्सर मात्र पुरेपुर भरलेला आहे. आमचे मणिशंकर अय्यर यांनी नेमक्या शब्दात माझे मनोगत गुजरात विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान व्यक्त केलेले होते. पण माध्यमांच्या दबावामुळे मला त्या लाडक्या स्नेह्याला पक्षातून हाकलावे लागले होते. तेव्हा जाहिरपणे पंतप्रधानाचा सन्मान राखण्याची भाषा केल्यामुळेच आज हे पत्र लिहीताना आदरणिय ह्या शब्दाने सुरूवात केलेली आहे. ती पंतप्रधान या पदासाठी आहे. पण तुम्ही त्या पदासाठी लायक नसल्याची ग्वाहीच दावोसच्या भाषणातून दिलेली आहे. तशी तुमच्याकडून माझी वा पुरोगाम्यांची कुठलीही अपेक्षा कधीच नव्हती. पण तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन परदेशात व जागतिक व्यासपीठावर मायदेशाचा इतका गौरव कराल, हे कोणाच्याही मनात आलेले नव्हते. अहो, मोदीजी परदेशात जाऊन जागतिक मंचावरून मायदेशाची निंदानालस्ती करण्याची थोर परंपरा मागल्या सात दशकात कॉग्रेसने निर्माण करून ठेवली आहे. मला तर त्याचा घरातूनच वारसा मिळालेला आहे. कारण स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षातली ३७ वर्षे तर माझ्याच पुर्वजांनी पंतप्रधानपद भूषवलेले आहे. अशी कुठलीही संधी मिळाली, मग जगासमोर आपल्या चुका, गुन्हे, लज्जास्पद गोष्टी अभिमानाने सांगण्याची ही परंपरा तुम्हाला संभाळता येत नसल्याने एका पक्षाचा फ़क्त अध्यक्ष असूनही मला ती पुढे न्यावी लागते आहे. कालपरवाच बहारीनला जाऊन मी आमच्या देशात न्यायाधीशांचेही मुडदे पडतात आणि न्यायाधीशांनाही न्यायासाठी रस्त्यावर यावे लागते, त्याचा डंका उगाच पिटला होता आणि तुम्ही दावोसला जाऊन काय सत्यानाश करून बसलात? अवघे जग आता भारताकडे आदर्श म्हणून बघू लागले आहे आणि जागतिक संस्थाही त्यालाच दुजोराही देऊ लागल्या आहेत. कुठे फ़ेडाल हे देशद्रोहाचे पाप मोदीजी?

तुम्हाला ठाऊक आहे? स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशाचे पंतप्रधानपद माझ्या पणजोबांकडे आलेले होते. जगात त्यांना खुप मान होता. कारण त्यांनी जगात कधीही आपल्या मायभूमीविषयी आस्था दाखवली नाही, की तिचे गुणगान कुठे केले नाही. परदेशी जाऊन माझे पणजोबा पंडीत नेहरूंनी आपला भारत कसा दरिद्री व उपाशीपोटी जगतो, त्याचा अभिमानाने उल्लेख केलेला होता. म्हणून तर अमेरिकेसारख्या श्रीमंत देशाला दया येऊन त्यांनी पीएल ४८० हा करार केला आणि तिथे गुरांसाठी पिकवला जाणारा तांबडा गहू भारतातील भुकेकंगाल जनतेसाठी उदारहस्ते दानधर्म म्हणून पाठवून दिला. कोट्यवधी टन तो तांबडा गहू रेशनवर खाऊन स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या पिढीला आपल्या देशाची ओळख झाली. शेजारचा इवलासा पाकिस्तान आपले मुजाहिदीन काश्मिरात घुसवून बसला, तर त्यांना सैनिक धाडून पिटाळून लावण्याची हिंमत माझ्या पणजोबांनी दाखवली नाही. त्यापेक्षा रडत राष्ट्रसंघाच्या दारात आपली असमर्थता जाऊन कथन केली आणि अर्धा कश्मिर पाकच्या घशात घालून दिला. अजून तो परत मिळवता आलेला नाही. आजही तीच परंपरा चालवून आम्ही कॉग्रेसजन उर्वरीत काश्मिर पाकच्या घशात घालण्यासाठी हुर्रीयत वा पाक राजदूतांशी खलबते करीत असतो. पण आम्ही कधी त्यांच्या मुजाहिदीन वा जिहादींच्या विरोधात आवाज उठवला नाही. किंवा कारवाई केली नाही. त्यापेक्षाही त्या माझ्या पणजोबांचा मोठा पराक्रम म्हणजे त्यांनी लाखो किलोमीटर्सचा उत्तरेकडील भारतीय प्रदेश चीनला बळकावण्यास मोकळीक दिली आणि नंतर त्यासाठी जगाच्या व्यासपीठावर आपल्या नाकर्तेपणाचे ढोल वाजवले होते. पण चुकूनही कधी स्वाभिमान वा अभिमानाच्या गोष्टी केल्या नाहीत. मोदीजी तीच आपली उज्वल परंपरा आहे. तुम्ही ती दावोसला जाऊन पुरती धुळीस मिळवली.

माझी आजी थोडी अपवाद आहे. तिने आमच्या घराण्याच्या परंपरांना झुगारत पाकिस्तानला धडा शिकवण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि तो देश विकलांग होऊन गेला. पण इंदिराजींनी कधी जगाच्या व्यासपीठावर त्याचे कोडकौतुक सांगितले नाही. भारतीय सैनिकांचा कसा नैतिक पराभव १९७१ सालात झाला, त्याचे गुणगान इंदिराजी देशात करीत राहिल्या. जगाच्या कुठल्याही व्यासपीठावर जाण्याची संधी मिळाली तेव्हा इंदिराजींनी सुद्धा आपल्या आणिबाणीचे गुणगान जगाला ओरडून सांगितले. आपण भारतात कशी संसदीय हुकूमशाही आणुन नागरी हक्काची गळचेपी केली आहे आणि आपल्या विरोधकांना थेट तुरूंगात डांबून न्यायव्यवस्थाही कशी मोडून टाकली आहे, तेच जगाला सांगितलेले होते. ही आमच्या घराण्याचीच नाहीतर कॉग्रेसचीच परंपरा आहे. देशात महापूर आले किंवा भ्रष्टाचाराचे थैमान माजले, त्याचेच आम्ही जगाला कौतुक सांगत राहिलो. १९८४ सालात माझ्या आजीची हत्या झाली आणि त्यानंतर राजधानी दिल्लीत दंगली पेटल्या. त्यात साडेतीन हजार शिखांची कत्तल झाली. आमच्याच कॉग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे हत्याकांड घडवून आणलेले होते. दावोस किंवा तत्सम कुठल्या जागतिक मंचावर बोलण्याचे प्रसंग आले, तेव्हा माझे पप्पा राजीव गांधी यांनी अभिमानाने आपल्या कारकिर्दीत झालेल्या त्या हत्याकांडांचेच प्रवचन केले होते. परदेशी जाऊन मातृभूमीची निंदानालस्ती करणे, ही आपल्या देशातील सत्ताधारी पक्षाची जुनी परंपरा आहे आणि माझ्या तीन पुर्वजांनीच ती निर्माण केलेली आहे. गेल्या दशकात आठवते मोदीजी? तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या गुजरात राज्यात दंगल झाली, त्याचा गवगवा जगात आम्हीच करत राहिलो आणि देशाच्या तोंडाला काळे फ़ासून घेण्याची नवी परंपरा माझ्या मातोश्रींनी तयार केली होती.

मोदी एवढ्यासाठीच आम्हाला तुम्ही पंतप्रधानपदी नको होता. कारण तुम्ही आपल्या देशातील लज्जास्पद, कमीपणाच्या वा अपमानास्पद गोष्टी जगाला सांगतच नाही. आज आपल्या देशात १ टक्का लोकांकडे देशातील ७३ टक्के संपत्ती वळलेली आहे. खरेतर मागल्या सत्तरपैकी पन्नास वर्षात माझ्याच कॉग्रेस पक्षाच्या पुरोगामी कामाने त्ते साध्य होऊ शकलेले आहे. कोट्यवधी बेरोजगार आहेत आणि हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कोट्यवधी लोक उपासमारीच्या स्थितीत दारिद्र्यरेषेखाली अजून खितपत पडलेले आहेत. मी अध्यक्ष असलेल्या पक्षाचे हे ऐतिहासिक कर्तृत्व आहे. आम्ही त्याचाच डंका जगभर पिटत, हाती वाडगा घेऊन कुठल्याही श्रीमंत देशाकडे भिक मागण्याची थोर परंपरा भारतात निर्माण केली. तुम्हाला त्या महान परंपरेची काही कदर नाही? जगभर जाऊन भारताच्या विकासाच्या व प्रगतीच्या गोष्टी सांगत सुटता? अहो जगासमोर आपली लाचारी, नाकर्तेपणा वा अगतिकता ठामपणे मांडायची असते. तरच भीक मिळत असते. गरीबांच्या नावाने भीक मिळवून आपली तुंबडी भरण्याची माझ्या पुर्वजांनी सुरू केलेली महान परंपरा मोदीजी, तुम्ही दावोसमध्ये धुळीस मिळवली. म्हणून ट्वीट करून तुम्हाला माहिती पाठवावी लागली. जोवर जनता गरीब उपाशी व अगतिक असते, तोपर्यंतच तिला नोकर्‍या व रोजगाराची स्वप्ने दाखवता येतात. लोक कर्जबाजारी असले तरच कर्जमाफ़ीची स्वप्ने दाखवणे शक्य असते. जनतेला सशक्त करून भारताचा उद्धार होऊ शकत नाही. माझ्या पणजोबांचा हा सिद्धांत आजवर अबाधित होता. म्हणून तर दरिद्री पाकचे पंतप्रधान आमचे बुजगावणे पंतप्रधान मनमोहन सिंगांना पाणवठ्यावरची रडवेली बाई म्हणाले होते ना? त्यांनीही जपलेली परंपरा तुम्ही धुळीला मिळवलीत मोदीजी. कुठे फ़ेडणार हे पाप तुम्ही? प्रधानमंत्रीजी तुम्ही माझा पुरता भ्रमनिरास केलात. खरोखरच मणि म्हणतो, तुम्ही तसेच आहात.

तुमच्यापासून या गरीब उपाशी देशाला धोका आहे, मोदीजी. जितका हा देश समर्थ व विकसित होत जाईल, तितकी त्याच्याकडे बघण्याची जगाची दृष्टी बदलून जाईल. आठवते, मागल्या लोकसभेत मातदारालाही तुमचे गुजरात विकास मॉडेल पसंत पडले होते. त्यामुळे तुम्ही पंतप्रधान होऊ शकलात. माझ्या व अन्य पुरोगामी मित्रांच्या ही गोष्ट उशिरा लक्षात आली. म्हणून गेल्या विधानसभा निवडणूकीत आम्ही सर्व शक्ती पणाला लावून गुजरात मॉडेल ही संकल्पनाच मोडून काढण्यासाठी कंबर कसली होती. काही प्रमाणात आम्ही यशस्वीही झालो. आज तुमच्यासह कोणी गुजरात मॉडेल हा शब्दही वापरत नाही. म्हणूनच तो मला नैतिक विजय वाटला होता. पण आता लक्षात येते, की तुम्हीही त्या प्रचारात कुठे गुजरात मॉडेल हा शब्द वापरला नव्हता. आता दावोसला भाषण केलेत आणि तिथल्या अन्य वक्त्यांनी माध्यमांनी भारतीय विकास मॉडेल अशी शब्दावली उपयोगात आणलेली आहे. म्हणजेच मागल्या तीन वर्षात तुम्ही गुजरात मॉडेलचेच भारतीय विकास मॉडेल करून टाकलेत. आम्ही मात्र अजून त्या गुजरात मॉडेलचा नि:पात करण्यात आपली शक्ती खर्ची घातली. दावोसला ज्या नव्या मॉडेलची चर्चा व गुणगान सुरू झाले, ते आम्हाला बघताच आले नाही. अन्यथा कधीच त्याच्यावर हल्ला चढवला असता. इतकी धमाल उडवली असती, की दावोसमध्ये मोदीजी, तुम्हाला तोंड उघडणे अशक्य करून सोडले असते. पण गुजरातचेच भारतीय मॉडेल होताना आम्ही बघू शकलो नाही. तिथे चुक झाली. पण कसेही असो, तुम्ही वाडगा घेऊन उभे राहिला नाहीत, ताठ मानेने भारतीयांच्या अभिमानाच्या गोष्टी तिथे केल्यात, ही अतिशय शरमेची गोष्ट आहे. देश एकवेळ तुम्हाला माफ़ करील, पण पुरोगामी साहित्यिक, विचारवंत, विश्लेषक वा कायदेपंडित तुम्हाला कधीही क्षमा करणार नाहीत. कितीही निवडणुका जिंका, नैतिक विजय आमचाच असेल.

12 comments:

  1. अत्यंत मार्मिक पत्र...

    ReplyDelete
  2. Kadak Bhau! Agadi binpanyane kelit!

    ReplyDelete
  3. वक्रोक्ती हा साहित्यप्रकार आता इतीहासजमा झालेला आहे असे वाटत असतांना त्याचे इतके सुंदर दर्शन तुम्ही घडवले आहे! ह्या वक्रोक्तीचा उगम त्याकाळी ब्रिटिश राज्य व्यवस्थेपासून बचावाची गरज म्हणून झाला. पण त्याची गरज कॉंग्रेसच्या अध्यक्षा साठी खरोखरीच नव्हती ! ह्यांना चाबकाचे फटके मारित जरी सांगितले तरी त्याचा उपयोग व्हायचा नाही इतकी ही मंडळी निगरगट्ट आहेत.

    मात्र आपला हा लेख जबरदस्त असून कालांतराने मराठी साहित्यात वक्रोक्तीचा उत्तम नमुना म्हणून त्याचा समावेश अटळ आहे !

    ReplyDelete
  4. यांनी देश सोडावा व नैतिक दृष्टया देशात रहाव

    ReplyDelete
  5. चिरफाड म्हणतात ती हीच . 👌 kudos भाऊ

    ReplyDelete
  6. चिरंजीव राहुल यांस
    अनेक आशीर्वाद
    तुझ्या मनातील माझ्या बद्दलचे भाव मी ओळखून आहे, मी नेहमीच विरोधकांचा आदरच करतो तसाच तुझाही करतो कारण भुतकाळात आणि भविष्यात मला पंतप्रधान बनविण्यासाठी तुझीच मदत झाली व होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.
    देशातील तरुण माझ्याकडे आशेने बघतात
    आणि माझे आशास्थान तु आहेस
    देव तुला असेच नैतिक विजय देत राहो

    तुझाच
    नमो

    ReplyDelete
  7. राहुल गांधी सारख्याला अशी वक्रोक्ती समजणं शक्यच नाही.कारण पाट फेकून मारला तर सन्मानाने बसायला दिला अशी समजणारी जमात आहे ही !!

    ReplyDelete