Saturday, January 13, 2018

चळवळ आणि सत्तास्पर्धा

lokpal के लिए इमेज परिणाम

सामान्य कार्यकर्त्यांनी उभी केलेली चळवळ किंवा त्यातून उदयास आलेला आम आदमी पक्ष यांच्याकडून लोकांच्या खुप अपेक्षा असतात. कारण लोक प्रस्थापित राजकारणी व संस्था संघटनांच्या मस्तीला वैतागलेले असतात. भ्रष्टाचार अशा प्रस्थापितातून येतो आणि त्यातून आमिषे दाखवून कार्यकर्त्यालाही भ्रष्ट केले जाते असा लोकांचा समज असतो. म्हणून तर कुठल्याही प्रस्थापित नेत्याकडून स्थापन झालेल्या पक्षापेक्षा लोकांच्या चळवळीतून आलेल्या व्यक्तींकडून अधिक अपेक्षा असतात. मुळात चळवळ म्हणजे लोकक्षोभाचा हुंकार असतो. त्याची प्रेरणाच जनभावनेतून आलेली असते. पण अशा चळवळी फ़ार काळ टिकत नाहीत आणि टिकूही दिल्या जात नाहीत. त्यांना व त्यात सहभागी असलेल्यांना विविध आमिषात मोहात गुंतवले जाते. पर्यायाने तिथून त्या चळवळीचा र्‍हास घडवून आणला जात असतो. आम आदमी पक्ष त्याला अपवाद ठरण्य़ाचे काही कारण नव्हते. पहिल्याच फ़टक्यात त्या पक्षाला जे यश मिळाले, त्यातून जे नेतॄत्व उदयास आले, त्याच्याकडून अधिक भ्रष्टाचार व मस्तवाल वागणे झाल्यास म्हणूनच नवल नव्हते. अलिकडेच या पक्षाने जुन्या व आरंभापासून संघटनेत असलेल्या कार्यकर्त्यांना टांग मारून दोघा उद्योगपती व भांडवलदारांना राज्यसभेच्या जागा विकल्या. ती लोकपाल चळवळीच्या अस्ताची पावती आहे. खरे तर पहिल्या विधानसभा निवडणूकीत त्या पक्षाला यश मिळाल्यावरच त्याची घसरण सुरू झालेली होती. कारण नंतर त्याचे नेतृत्व एकामागून एक सत्तालोभामध्ये फ़सत गेले आणि त्यात मतलबी लोकांची गर्दी सुरू झाली होती. आपण चळवळीला काय देतो, यापेक्षा चळवळीकडून आपल्याला कोणते लाभ होऊ शकतात, अशा लोकांची वर्दळ संघटना वा चळवळीत सुरू झाली म्हणजे त्या चळवळीच्या हेतूचा अस्त होत असतो. हिटलरने आपल्या ‘माईन काम्फ़’ ग्रंथामध्ये त्याचा इशारा देऊन ठेवला आहे. तो म्हणतो,

‘एखाद्या चळवळीमध्ये अधिकाराच्या जागा आणि मानाची पदे, बिरूदे जितक्या मोठ्या प्रमाणात वाटण्यात येतात, तितक्या प्रमाणात त्या चळवळीकडे निकृष्ठ दर्जाचे लोक आकर्षित होऊ लागतात. शेवटी तर असले बुभूक्षित इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी पक्षामध्ये गर्दी करतात, की पूर्वीच्या काळातील झुंजार प्रामाणिक कार्यकर्त्याला हाच तो आपला पक्ष हे ओळखू देखील येईनासे होते. जेव्हा असे घडते तेव्हा त्या पक्षाचे जिवीत कार्य संपुष्टात आले असे खुशाल समजावे.’ योगायोगाने त्याला भारतातल्या एका सामान्य कार्यकर्त्यानेही पुढल्या काळात दुजोरा दिलेला होता. त्याचे नाव आर, जी, रुके असे आहे. रुके हे आंबेडकरवादी कार्यकर्ते. आरंभीच्या रिपब्लिकन पक्षातले धडाडीचे कार्यकर्ता होते. मुंबई रिपब्लिकन पक्षाचे चिटणिस म्हणूनही त्यांनी काम केलेले होते. १९६७ सालात सत्ताधारी कॉग्रेस पक्षासोबत आंबेडकरी पक्ष वा चळवळीने राजकीय युती करावी, असा प्रस्ताव आला होता. तेव्हा रुके यांनी दिलेला इशारा मान्य झाला असता, तर ती चळवळ व पक्ष इतका विस्कटून गेलाच नसता. त्या युतीनिमीत्त झालेल्या बैठकीत रुके म्हणाले होते, ‘आज आपला पक्ष स्वाभिमान आणि आंबेडकर निष्ठा बाळगून आहे. कारण कार्यकर्त्यासमोर कुठल्याही प्रकारचे आमिष नाही. ते सत्तेपासून दूर आहेत म्हणूनच ते ताठ आहेत. कॉग्रेसच्या आहारी आपण गेलो तर कार्यकर्त्यांना स्वार्थाची लागण लागेल. त्याच्या स्वार्थापुढे पक्षहित नगण्य ठरेल. त्यांना एकदा सत्तेच्या सावलीत बसायची सवय लागली की मग त्यांची आपण सुटका करू शकत नाही. सत्तेसाठी स्पर्धा नाही म्हणून कार्यकर्त्यांमध्ये बंधूभाव आहे. उद्या सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली, तर एकमेकांचे गळे कापायला हेच कार्यकर्ते मागेपुढे पहाणार नाहीत. बाबासाहेबांच्या विचारप्रणालीची जागा कॉग्रेस घेई्ल आणि मग आपल्या पक्षात बजबजपुरी माजेल. हे नाकारायचे असेल तर येत्या जिल्हा परिषद निवडणूकीत कॉग्रेस बरोबर युती करू नये. युती केली तर तो आपल्याच पायावर आपण धोंडा मारून घेतला असे होईल आणि आत्मनिर्भर आंबेडकरी चळवळ संपुष्टात येईल.’

आज पन्नास वर्षानंतर रुके यांचे शब्द किती नेमके व खरे ठरले आहेत, त्याची साक्ष आपल्याला बघायला मिळते आहे. रिपब्लिकन पक्ष शेकडो गटातटात विभागला गेला आहे आणि आंबेडकरी चळवळ तर जितके नेते तितके गट अशी विस्कटून गेली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा पाव शतकातला नेता आज जिग्नेश मेवाणी या गुजराती तरूणाच्या वा नक्षली गटांच्या मागे भरकटला आहे. रामदास आठवले सत्तेच्या परिघात फ़िरत बसले आहेत आणि सामान्य आंबेडकरी जनता गोंधळलेली आहे. आपापल्या स्वार्थासाठी एकमेकांच्या उरावर बसायला असे नेते मागेपुढे बघत नाहीत, ही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. दुसरीकडे तशीच वाताहत चळवळकर्ते म्हणवून घेणार्‍या प्रत्येक विचारसरणीच्या गटांची आहे. शेकड्यांनी असे गट मग आपापली पोळी भाजून घेण्यासाठी संयुक्त आंदोलने परिषदा भरवतात. पण आपापले स्वार्थ साधून झाल्यावर हेतूला हरताळ फ़ासून मोकळे होत असतात. दोघा उद्योगपती भांडवलदारांना केजरीवाल यांनी पक्षातर्फ़े राज्यसभेची उमेदवारी दिली, तेव्हा त्यांचे जुने सहकारी कुमार विश्वास, योगेंद्र यादव किंवा कपील मिश्रा यांनाही केजरीवालना ओळखणे अशक्य झाले. त्यांना आपणच स्थापन केलेला हा आम आदमी पक्ष आहे काय, अशी शंका आली. पण त्याची सुरूवात खुप आधी झालेली होती. चार वर्षापुर्वी आशुतोष वा तत्सम काही लोक त्या पक्षात येऊ लागले आणि त्यांचीच वर्द्ळ सुरू झाली; तेव्हाच लोकपाल आंदोलनाचा र्‍हास सुरू झाला होता. त्याचा कार्यकारणभाव निकालात निघालेला होता. त्या आंदोलनातली भाषा, उर्जा, घोषणा व लोकप्रियतेला बाजारात विकायला काढलेले होते. त्याचे भान अशा जुन्यांना तेव्हाच आले असते, तर पक्ष वाचला असता. रुके यांनी पन्नास वर्षापुर्वी मांडलेली भूमिका आपच्या कुणा नेत्याला घेता आली नाही आणि तो पक्ष व त्यामागचा हेतू कधीचाच लयास गेला आहे.

सवाल एका संघटनेचा वा आंदोलनाचा नसतो. अशा आंदोलनातून लोकांच्या अपेक्षा पालवलेल्या असतात आणि त्यांच्या आकांक्षा ही त्या चळवळीची खरी उर्जा असते. ती मावळली मग पुन्हा जागृत व्हायला दिर्घकाळ जावा लागत असतो. म्हणूनच त्यामागे असलेली जनभावना जपून हाताळण्याची गरज असते. त्याचे नेतृत्व करणार्‍या नेत्याला त्याचे प्रत्येक क्षणी भान राखावे लागते. अन्यथा ती उर्जा आपल्या मतलबासाठी वापरून, मग तिलाच उकिरड्यात फ़ेकून देणारे संधीसाधू तिथे गर्दी करीत असतात. आपल्या व्यावसायिक प्रभावापुढे सामान्य प्रामाणिक कार्यकर्त्याला नामोहरम करीत असतात. तिथेच चळवळीचा र्‍हास सुरू होत असातो. रुके यांनी जो इशारा दिला तो अमान्य झाला आणि पुढल्या काळात सत्तापदांसाठी एक एक रिपब्लिकन कार्यकर्ता नेता कॉग्रेसच्या आहारी गेला. अगदी खुद्द रुकेही त्यातून वाचले नाहीत. आज म्हणून तर मेवाणी वा खालिद उमर यांच्यामागे फ़रफ़टण्यात आंबेडकरी चळवळ खुश आहे. कारण तिला कोणी विश्वासार्ह नेता राहिलेला नाही. नक्षली गटांनी त्यात शिरकाव करून घेतला आहे आणि आंबेडकरी विचारांचे व प्रतिकांचेही अपहरण केलेले आहे. हेच दलित पॅन्थरचे झाले होते आणि प्रत्येक ऐक्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे झाले. जनता दल वा पक्ष म्हणून पुढे आलेल्या मुळच्या समाजवादी चळवळीचा र्‍हास तसाच होत गेला आहे. त्यापासून कटाक्षाने अप्लित राहिलेल्या साम्यवादी वा कम्युनिस्ट पक्षाचीही त्यापासून सुटका झाली नाही. प्रकाश करात वा सीताराम येच्युरी अशा उथळ नेत्यांच्या मतलबामुळे डाव्या चळवळीला स्थान उरले नाही. त्यातही मतलबी लोकांची वर्दळ वाढली. कॉग्रेसची पाळेमुळे खुप खोल रुजली असल्याने तिचा र्‍हास व्हायला दशकांचा कालावधी लागला आहे. यापासून आपल्या संघटनेला काळजीपुर्वक बाजूला राखण्यामुळे रा. स्व. संघ मात्र भरभराटला आहे.

भाजपा हा संघाच्याच मुशीत तयार झालेल्यांचा राजकीय पक्ष असला तरी त्यालाही संघाने आपल्या व्यावहारीक कामकाजापासून दुर ठेवलेले आहे. भाजपाला संघामध्ये ढवळाढवळ करता येत नाही. पण संघाला आवश्यक असेल तेव्हा संघाचे काही नेते भाजपात हस्तक्षेप करीत असतात. सत्तेच्या चक्रात फ़िरणार्‍या संघाच्या भाजपातील कुणाही नेता कार्यकर्त्याला संघाच्या धोरणात्मक व्यवहारात समावून घेतले जात नाही. त्यामुळे़च संघ अजून टिकला आहे व विस्तारतो आहे. भाजपाच्या राजकीय दौडीला संघ मदत करतो. पण सत्तेच्या कर्दमात रुतलेल्यांना संघ आपल्यात येजा करू देत नाही. बाकीच्या चळवळी वा संघटनांची तिथेच गोची झालेली आहे. सत्तेतच रमलेले लोक चळवळीचे निर्णय घेत असतात आणि आपल्या राजकीय गरजेनुसार चळवळीला वाकवत मोडतही असतात. केजरीवाल एकाचवेळी मुख्यमंत्री असतात व चळवळीचे कार्यकर्तेही असतात. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर वा मेवाणी, कन्हैयाकुमार यांच्यात किंचीतही फ़रक नाही. चळवळ व राजकारण यांची गल्लत केली म्हणून त्यांना त्या दुष्टचक्रातून बाहेर पडणे शक्य झालेले नाही. त्यांना म्हणूनच आमिष दाखवून वाटेल तसे वळवता येते वा वाकवताही येते. कॉग्रेसने या चळवळींना किती सहजगत्या आपल्या राजकीय हेतूसाठी वापरले, ते वारंवार दिसलेले आहे. आताही डाव्या संघटनांनी मेवाणी वा आंबेडकरी लोकांना बिनधास्त वापरून घेतले. त्यात तात्पुरते समाधान नक्कीच मिळते. जोश चढतो आणि तो ओसरल्यावर आपण कुठे आहोत, त्याचाही थांगपत्ता लागत नाही. म्हणून चळवळीला सत्तास्पर्धेपासून कटाक्षाने दूर ठेवावे लागते. पक्ष संघटना चालवताना त्यात मतलबी लोकांच्या हाती सुत्रे जाणार नाहीत, याची काळजी घ्यायची असते. भीमा कोरेगाव घटनेनंतरच्या चर्चा व वक्तव्ये बघितली, तर आंबेडकरी चळवळ आंबेडकरी नेत्यांच्या हाती तरी शिल्लक राहिली आहे काय, याची म्हणूनच शंका येते.

6 comments:

  1. प्रकाश अम्बेडकर रामदास आठवले किंवा ईतर कुणीही नेता आपण कसे मीडीया समोर राहू व आपल्याला सत्ता मिळेल हेच बघत असतात असे वाटते .त्यांना समाजाचे प्रश्न हे दुय्यम वाटतात .

    ReplyDelete
  2. ह्यात डाॅ हेडगेवारांचे महत्त्व दिसून येते.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लेख. अचूक निदान. तुमचे असे लेख वाचून कितीतरी बहुमूल्य माहिती मिळते. तुम्ही अनेक अशा गोष्टी लिहिता की ज्या आम्हाला दुसरीकडून कुठून कळणार नाहीत. अधिक तुमचं विश्लेषण अप्रतिम असतं.

    ReplyDelete
  4. भाऊराव, 'आंबेडकरी चळवळ आंबेडकरी नेत्यांच्या हाती तरी शिल्लक राहिली आहे काय' अशी शंका येणं अगदी रास्त आहे. आता हेच बघा ना, कोरेगाव भीमाच्या निमित्ताने इतका गदारोळ झाला. त्यात रामदास आठवले यांच्याकडून कार्यकर्त्यांना कसलंही मार्गदर्शन झालं नाही. ते फक्त इतकंच म्हणाले की जातीजातीतील दुरावा नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत (संदर्भ : http://zeenews.india.com/marathi/india/ramdas-athawale-on-bhima-koregaon-violence/403795 ). आता यावर हसावं की रडावं म्हणता! आठवल्यांनी ठरलेला विवाह मोडून नंतर ब्राह्मण कन्येशी लग्न केलं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. कोरेगाव भीमेच्या उद्रेकाच्या पुरात तो धुवून निघतो का त्याची चाचपणी केली म्हणायची.

    आंबेडकरी चळवळ म्हणून जे काही आहे ते किती आणि कशामुळे भरकटलेलं आहे याची साक्ष पटते. स्वार्थी आणि आपमतलबी नेत्यांमुळे चळवळीत केविलवाणेपण भरून राहिलं आहे. हे सगळं लिहितांना मला आजिबात आनंद होत नाहीये.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  5. केवळ सत्ता हेच सामाजिक बदलाचे एकमेव व परिपूर्ण माध्यम आहे, अशी धारणा संघाची कधीही नव्हती.
    पथका अंतिम लक्ष्य नहीं हैं सिंहासन चढते जाना।
    सब समाजको लिए साथमें, आगे है बढते जाना ।।
    ही स्पष्टता धोरणात आहे. म्हणूनच ९२ वर्षे आणि ५ पिढ्या संघकार्य संक्रमित झाले व विस्तारले.
    संघकार्य "चळवळीच्या" व्याख्येत बसत नाही. चळवळींना तात्काळ परिणामांची अपेक्षा असते. पण स्थायी व शाश्वत बदल चळवळीतून घडत नसतात.
    म्हणून संघकार्य हे "असिधारा व्रत" आहे असे म्हणणे योग्य ठरेल.
    अन्य संघटनाही वर्षानुवर्षे समाजात आहेतच. पण नेता सापेक्ष धोरणांमधे फारकत झालेली आहे. काहींच्या चळवळी संपून "वळवळीच" सुरू आहेत. काही संघटनांचा प्रवासतर "शेवटाकडेच" सुरू आहे.
    ५ पिढ्या संक्रमित झालेला संघ, घराणेशाही मुक्त आहे. म्हणजेच "नालायकाला" नेता मानण्याची सक्ती नाही. समाजकार्य करण्यासाठी "खास" असण्याची वा होण्याची गरज नाही. व्यक्तीला सामान्य राहूनच समाजाभिमूख करण्याचे श्रेय संघाचेच.
    वरील विधाने करताना अन्य संघटना वा संस्थांच्या कार्याला दुय्यम लेखण्याचा उद्देश नाही. संबंधीत समर्थक व कार्यकर्ते आपले मुल्यमापन करतीलच.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्ते , उत्तम टिप्पणी. धन्यवाद.

      Delete