Sunday, January 28, 2018

हा पाकिस्तानी कुठे गेला?

pak soldier cartoon के लिए इमेज परिणाम

झहिद नावाचा एक पाकिस्तानी सैनिक आहे. पण तो सध्या कुठे गेलाय, त्याच्या चिंतेने पाकिस्तानी हेरखात्यासह सरकारला कमालीचे भयभीत करून टाकलेले आहे. अर्थात तो भारताच्या सीमेलगत गस्त करत असताना गायब झालेला नाही, की भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमध्येही मारला गेलेला नाही. तो परदेशी असताना अचानक बेपत्ता झालेला आहे. मध्यंतरी असाच एका पाक सेनाधिकारी नेपाळच्या सीमेवरून बेपत्ता झाला होता. त्याचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. तेव्हाही त्याला भारतीय हेरखात्याने़च पळवून नेलेले असावे, असा सरसकट आरोप पाक माध्यमांनी केला होता. आताही झहिदच्या बाबतीत तसाच आरोप होत आहे. दोन घटनांमध्ये फ़रक इतकाच आहे, की नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या पाक सेनाधिकार्‍याच्या गायब होण्याची तक्रार त्याच्या आप्तस्वकीयांनी केलेली होती. पोलिसांना त्याला शोधण्यासाठी कामाला जुंपलेले होते. झहिदची गोष्ट थोडी वेगळी आहे. त्याच्या कुटुंबाने तशी तक्रार केलेली नसून त्याच्याच आप्तस्वकीयांना पाक पोलिसांनी या गायब होण्यातले आरोपी मानलेले आहे. म्हणूनच झहिदच्या पत्नीसह कुटुंबियांनाही त्यात आरोपी बनवण्यात आलेले आहे. तसा झहिद कोणी मोठा हेर वा सेनाधिकारी नाही. एक साधा सैनिक आहे. काही वर्षापुर्वी पाकसेनेत शिपाई म्हणून त्याची भरती झालेली होती. त्याची गुणवत्ता बघून त्याला संरक्षण खात्यात कारकुन म्हणून बढती देण्यात आलेली होती. त्याच बढतीच्या आधारे त्याला थेट युरोपियन देशातील पाक वकिलातीमध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक मिळाली होती. असा झहिद नावाचा कारकुन बेपत्ता झाल्याने विचलीत होण्याचे काही कारण नाही. पण झहिद नुसताच बेपत्ता झालेला नाही, तर त्या पाक वकिलातीमधले अत्यंत गोपनीय दस्तावेज व कागदपत्रही याच्यासह बेपत्ता झाल्याने पाक सरकार कमालीचे गडबडलेले आहे.

खरबुजा सराई या शहरातील ढोक अब्बासी या मोहल्ला भागाचा रहिवासी झहिद, व्हीएन्ना या ऑस्ट्रीयन राजधानीत असताना गायब झालेला आहे. तिथल्या पाकिस्तानी वकिलातीमध्ये तो कार्यरत होता. २ जानेवारी रोजी तो अचानक कामावर आला नाही आणि चौकशी करता तो बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्या दिवशी तो कामावर आला नाही, पण कोणीतरी घरी फ़ोन करून त्याच्या पत्नीला माहेरी निघून जाण्यास सांगितले होते. त्यामुळे पाक सरकार व हेरखाते त्यांच्याकडे शंकेने बघत आहे. पोलिसांच्या मते तो कुठे गेला व कोणासोबत गेला, याची माहिती त्याच्या कुटुंबाला असूनही ते ही माहिती लपवित आहेत. म्हणूनच कुटुंबालाही आरोपी करण्यात आलेले आहे. झहिद बेपत्ता झाल्यावर शोधाशोध सुरू झाली, तेव्हा व्हीएन्ना वकिलातीमध्ये असलेल्या अत्यंत संवेदनाशील अशा गोपनीय कागदपत्रांचाही शोध लागेना, तेव्हा त्याच्याविषयी संशय बळावला. या वकिलातीमध्ये झहिदकडे अतिशय संवेदनाशील असे काही काम सोपवण्यात आलेले होते. त्यामुळेच पाकिस्तानी सुरक्षेशी संबंधित काही महत्वाचे तपशील व दस्तावेज यांच्याशी झहिदचा संबंध होता. त्याच्यासह अनेक अशी कागदपत्रे गायब झाल्याने पाकची चिंता वाढल्याचे म्हटले जाते. यापुर्वी झहीर नावाचा पाकिस्तानी कर्नल नेपाळमधून भारतीय सीमेलगत असताना गायब झाला होता. त्याविषयी पाकिस्तानात गुप्तता बाळगली जात होती. पण गेल्या ऑगस्ट महिन्यात कुलभूषण जाधव प्रकरण गाजू लागले, तेव्हाच झहिरच्या बेपत्ता होण्याची घटना उघड झाली होती. यातला योगायोग असा, की त्याच दरम्यान झहिदची नेमणूक व्हीएन्नाच्या पाक वकिलातीमध्ये झालेली होती. आता व्हीएन्नामधून झहिदही गायब झाला आहे आणि त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. झहिदचे कुटुंबही त्याविषयी कुठली धड माहिती देत नसल्याने, ह्यातले रहस्य अधिकच गडद होत चालले आहे.

गोपनीय व संवेदनाशील कागदपत्रांनिशी झाहिद बेपत्ता झाल्याने तो बहुधा शत्रूच्या हाती लागलेला असावा, किंवा पाकशत्रूंच्या गळाला लागलेला असावा असा संशय आहे. अर्थात पाकिस्तान भारताला सर्वाधिक मोठा शत्रू मानत असल्याने याही विषयात पाकचा भारतावर संशय आहे. पाकिस्तानची राजकीय भूमिका नेहमी भारत विरोधी राहिलेली असल्याने त्याच्या कुठल्याही गोपनीय कागदपत्रांमध्ये भारत विरोधी तपशील व पुरावे असू शकतात. भारता इतके हे दस्तावेज वा पुरावे अन्य कुठल्या देशाला उपयोगी असू शकत नाहीत. म्हणूनच पाकिस्तानची झोप उडवून देणारी कुठली कागदपत्रे घेऊन झाहिद बेपत्ता झालाय, ही बाब कुतुहलाची आहे. गायब झाला, त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने झहिदच्या पत्नीला माहेरी निघून जाण्यास कळवले. म्हणजेच त्याचा जीव धोक्यात असल्याचा कुठलाही संकेत मिळत नाही. आपल्या गायब होण्याची गदा पत्नीवर येऊ नये, म्हणूनच त्याने तिला माहेरी जायला सांगितलेले असावे. याचा साधासरळ अर्थ, झहिद शत्रु देशाला फ़ितूर झालेला असावा. ऑस्ट्रीया हा देश युरोपातला असून अशा देशातून अन्य देशातल्या हेरांचे अनेक व्यवहार मोकाट होत असतात. विविध देशातील घातपाती व जिहादी यांना या देशात नेहमीच आश्रय मिळालेला असतो आणि हेरखात्यांनाही आपले हस्तक मुक्तपणे खेळवता येत असतात. याच देशात वास्तव्य करून अनेक देशांच्या हस्तकांनी अणुतंत्रज्ञान पळवापळवी केलेली आहे. अनेक घातपाती संघटनांना मिळणार्‍या पैशाची देवाणघेवाणही अशाच युरोपियन देशातून होत असते. सहाजिकच झहिद अशाच उलाढालीत शत्रू देशाला सामिल झाला असल्याची पाकिस्तानी शंका गैरलागू म्हणता येणार नाही. मात्र त्यात भारताचा हात असेल, असे कोणी आज म्हणू शकत नाही. एका व्यक्तीला पाश्चात्य देशातून पळवून आणणे भारतालाही इतके सहजशक्य नाही.

जी तक्रार नोंदण्यात आलेली आहे, ती बघता पाक सरकारला घाम फ़ुटल्याचे स्पष्ट होते. किंबहूना म्हणून असेल, त्याचा पाक माध्यमात फ़ारसा गाजावाजा होऊ देण्यात आलेला नाही. पण तक्रारीतला तपशील खुप बोलका आहे. झहिदच्या कुटुंबियांना तो कुठे दडलाय त्याची माहिती असावी आणि तोही त्यांच्या संपर्कात असावा, असाही संशय आहे. कारण ठाऊक असूनही हे कुटुंबिय त्याची माहिती लपवित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाक हेरखात्याच्या कारवाया, उचापती, विविध जिहादी संघटनांचे परस्पर संबंध, किंवा त्यांना पाककडून मिळणारे सहाय्य, याचे पुरावे धागेदोरे त्याच्याकडे असू शकतात. तशी कागदपत्रे घेऊन त्याने पळ काढलेला असू शकतो. अन्यथा पाकिस्तानी गोटात इतकी तारांबळ व्हायचे काही कारण नव्हते. एप्रिल महिन्यात नेपाळहून बेपत्ता झालेला झहिर व आता गायब झालेला झहिद यात एक मोठा फ़रक आहे. झहिरचे मनाविरुद्ध अपहरण झालेले असल्याची पाकला खात्री आहे. म्हणूनच त्याच्याकडून महत्वाची काहीही माहिती शत्रूला सहज मिळणार नाही अशी खात्री आहे. पण झहिर कागदपत्रांसह बेपत्ता असल्याने तो महत्वाची माहिती घेऊन गेला आहे. सहाजिकच तो सहजासहजी महत्वाचे धागेदोरे शत्रूला देऊ शकतो, याचीच भिती सतावते आहे. उदाहरणार्थ भारतातले जे कोणी पाकप्रेमी आहेत, त्यांना पाठवले जाणारे पैसे वा दिली जाणारी मदत, त्यांची नावे व अन्य संपर्काचे पुरावे भारताला मिळू शकतात. त्यामुळे पाक घाबरला आहे काय? जेव्हा अशी माहिती मिळते, तेव्हा त्या गद्दारांचा काटा परस्पर काढला जातो. किंवा अन्य मार्गाने त्यांचे निर्दालन केले जात असते. आपल्या हस्तकांसाठी पाक चिंतेत पडला आहे, की जगातल्या अन्य देशांशी पाकने केलेल्या गद्दारी विश्वासघाताचे पुरावे घेऊन झहिद निसटला आहे? यासारखी प्रकरणे निकालात निघाली तरी त्याचा सहसा गाजावाजा होत नाही. म्हणूनच झहिरनंतर झहिदच्या बेपत्ता होण्याने पाकला घाम फ़ुटलेला असावा.

3 comments:

  1. हिंदुस्तानात राहणारे ' पाकप्रेमी ' याना मिळणारे अर्थसहाय्य व त्याचा असणारा ' मार्ग ' याबद्दल माहिती येथील सरकारला मिळाली तर कदाचित येथील पाकप्रेमी ( सुधींद्र कुलकर्णी , मणिशंकर अय्यर , बरखा दत्त , राजदीप सरदेसाई , प्रणव रॉय , सागरिका घोष , तिस्ता सेटलवाड ) यांची ' खाते ' दारी उघडकीस येईल हे निश्चित !!

    ReplyDelete
  2. भाऊ,अॅप चा काहीतरी प्राॉब्लेम आहे.
    नेट एरर येतेय.

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्ही कुठून मिळवता आशी माहिती? फार रंजक असतेह

    ReplyDelete