Thursday, April 12, 2018

अण्णा हजारे आगे बढो

anna hunger strike के लिए इमेज परिणाम

आपला रा. स्व संघाशी संबंध जोडून आपल्याला बदनाम करू बघणार्‍यांना कोर्टात खेचण्याची धमकी समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. याची कुठेतरी सुरूवात व्हायलाच हवी होती. अलिकडल्या काळात शोध पत्रकारिता वा आक्रमक पत्रकारिता म्हणून जो छचोरपणा माध्यमत बोकाळला आहे, त्याला कोणीतरी वेसण घालण्याची खरोखरच गरज होती. केजरीवाल यांना कोर्टात खेचून गडकरी, जेटली वा सिब्बल यांनी त्याचा आरंभ केलेला होताच. उशिरा का होईना केजरीवाल यांनी लोटांगण घातले आहे. म्हणूनच तिथे न थांबता या महोदयांनी केजरीवाल यांचे बेताल आरोप छापणार्‍या वा त्याला प्रसिद्धी देणार्‍यांनही न्यायालयात खेचायला हवे होते. मागल्या दहापंधरा वर्षात माध्यमांची विश्वासार्हता असल्याच भुरट्यांनी रसातळाला नेवून ठेवलेली आहे आणि त्यांच्यामुळे खर्‍या प्रामाणिक पत्रकार व माध्यमांची मोठी गळचेपी झालेली आहे. खळबळ माजवणे व त्यासाठी कुठल्याही बाबतीत सनसनाटी माजवणार्‍या आरोपांची रंगपंचमी करण्याला आता पत्रकारिता समजले जाऊ लागलेले आहे. त्याला पत्रकार व संपादक आळा घालणार नसतील, तर कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज होती. गडकरी, सिब्बल यांनी आरोप करणार्‍याला त्यात रोखले असले तरी त्याच्या बदनामीच्या मोहिमेला शक्ती पुरवणारे मोकाट सुटलेले आहेत. अण्णांचा रोख त्याच दिशेने असल्याने अण्णांचे स्वागतच करावे लागेल. कारण देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे मुळ खरेतर भ्रष्टावलेल्या पत्रकारितेत सामावलेले आहे. एकूण समाजाची व राजकारणाची बुद्धी भ्रष्ट करण्याला अशा सुपारीबाज पत्रकारितेने चालना दिलेली आहे. अण्णांनी त्याच विषयाला हात घातला असेल, तर त्याला व्यक्तीगत बदनामीचा मुद्दा मानता येणार नाही. उलट तीच एक मोठी भ्रष्टाचार विरोधातली चळवळ मानता येईल.

काही दिवसांपुर्वी अण्णांचे रामलिला मैदानावरील उपोषण आटोपले आणि त्याच्या यशापयशावर चर्चा सुरू झाली. अण्णांची कृती सार्वजनिक असल्याने त्यातील परिणाम व यशापयशाची चर्चा करण्यात काहीही गैर नाही. पण त्या आंदोलन उपोषणामागे कुणाचा राजकीय हात असल्याचे आरोप करण्याला काहीही अर्थ नव्हता. मागल्या वेळी असेच आरोप झालेले होते आणि आताही तसेच आरोप झालेले आहेत. कुठल्याही व्यापक आंदोलनात विविध समाज घटक व संस्था संघटना आपापले हेतू घेऊन येत असतात व सहभागी होत असतात. आंदोलनाच्या म्होरक्याचे हेतू आणि सहभागी होणार्‍यांचे हेतू समान असतील असे नाही. पण त्यांच्यात काही साम्य असू शकते. पण तेवढ्यासाठी मुळ आंदोलनाचा अजेंडाच भलत्या कोणी ठरवल्याचा आरोप बेछूट असतो. मागल्या उपोषणात केजरीवाल आपला स्वतंत्र हेतू उरात घेऊन पुढे आलेले होते आणि इतरही लहानसहान घटक तसेच आपापले हेतू साधायला घुसलेले होते. इंदिराजी जिंकत होत्या तेव्हा कॉग्रेसमध्ये येणारे व आज भाजपात सहभागी होणारे त्यांच्या विचारधारेशी बांधील नसतात. आपापल्या मतलबासाठी त्या पक्षात संघटनेत वा आंदोलनात येत असतात. त्यांना सहभागी करून घेणार्‍याचाही त्यामागे काही हेतू असतो. अशा येणार्‍यांचा अजेंडा हा आंदोलनाचा हेतू असू शकत नाही. पण तसे आरोप ठेवून त्यावर चर्चा करणारे वा बातम्या रंगवणार्‍यांचा नक्कीच मतलब असतो. त्यातून आंदोलनाला बदनाम करणे हा त्यातला खरा हेतू असतो. आजकाल संघाशी संबंध जोडणे पुरोगामी फ़ॅशन झालेली आहे. मग तो न्यायमुर्ती लोयांचा मृत्यू असो किंवा अण्णांचे उपोषण असो. म्हणूनच अण्णा हे भाजपाच्या प्रेरणेने आंदोलन करीत असल्याचा अशा बातमीतून आरोप होत असतो. तो अण्णांवरचा अन्याय असतो आणि तशी सुपारीबाजी करणार्‍या माध्यमांना धडा शिकवणे अगत्याचे आहे.

मध्यंतरी एका इंग्रजी वेबसाईटने न्या. लोयांच्या तीन वर्षापुर्वीच्या आकस्मिक मृत्यूचे प्रकरण उकरून काढले आणि जणू भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व संघाच्याच कारस्थानातून ती हत्या झाली असल्याचा आभास उभा केलेला होता. त्याच लोयांसमोर शहांच्या विरोधातली सोहराबुद्दीन चकमकीची केस चालू होती आणि म्हणूनच त्यांचा खुन करण्यात आला, असा आशय त्यातून पेश करण्यात आला होता. त्यावरून मग गदारोळ सुरू झाला आणि कॉग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही छानपैकी त्याचा उपयोग करून घेतला. सुप्रिम कोर्टातही न्यायाधीशांना त्यासाठी फ़ितवण्यात आले. पण ही बातमी प्रसिद्ध होताच मुळ बातमीतला खोटारडेपणा एका इंग्रजी दैनिकाने तपशीलवार गोष्टी मांडून उघडा पाडलेला होता. लोयांच्या कुटुंबियांनीही समोर येऊन ती बातमी खोटी पाडलेली होती. तरीही त्याचा उठताबसता संदर्भ दिला जात असतो. जर आरंभीच अमित शहा वा तत्सम कोणी त्या बातमी व लेखाला कायदेशीर आव्हान दिले असते आणि बदनामीचा खटला भरला असता, तर अशा भामट्यांना वेसण घातली गेली असती. तिथेही लोयांच्या मृतदेहाच्या सोबत संघाचा कोणी कार्यकर्ता आल्याचे म्हटलेले होते आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती कॉग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झालेले आहे. तमाम कागदपत्रे बघता ही बातमी वा गौप्यस्फ़ोट धादांत खोटारडेपणा असल्याचे सहज लक्षात येते. पण कोणी आव्हानच दिले नाही आणि तो खपून गेला. योगायोग असा, की अण्णा ज्या बातमीमुळे संतापलेले आहेत, ती एका नगण्य दैनिकात छापून आणली गेली. मग त्याचा प्रसार करायला पुढे सरसावलेला पत्रकारही नेमका लोया विषयाचा गौप्यस्फ़ोट करणारा असावा, याला योगायोग मानता येणार नाही. हे एक मोठे कारस्थान राजरोस माध्यमातून चालले आहे. म्हणूनच त्याच बुरखा फ़ाटला जाण्य़ाची गरज आहे.

अण्णांच्या उपोषणाची आयोजक कोणी महिला होती आणि ती नथूराम गोडसे व सावरकरांची नातलग असल्याचा आरोप मुळातच धादांत खोटेपणा होता. त्या बाबतीत सावरकरांच्या एका कुटुंबियाने सोशल मीडीयात सविस्तर खुलासा करून आपली वंशावळच मांडली, तेव्हा अशा भामट्यांचा धीर सुटला. ज्याने सोशल मीडियात अण्णांच्या त्या बातमीचे कात्रण टाकलेले होते, त्या तथाकथित पत्रकाराने तात्काळ माफ़ीची घोषणाही करून टाकली. बहुधा अण्णा कोर्टात जाण्याच्या मनस्थितीत असल्याची कुणकुण त्याला लागलेली असावी. तसे झाल्यास लोया प्रकरणातील आपली सुपारीबाजी चव्हाट्यावर येईल, म्हणून त्या इसमाची झोप उडाली असणार. अन्यथा इतर कोणाच्या बातमीला पुढे सरकवण्यासाठी या दिवट्याने तात्काळ माफ़ीचा पांढरा झेंडा फ़डकवला नसता. अमित शहांच्या मुलाविषयीही अशीच धडधडीत खोटी बातमी ‘वायर’ नावाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आणि नंतर कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गुजरातच्या प्रचारसभेत त्याचा मुक्तपणे वापर करू लागले. त्या बाबतीत अमित शहांनी कोर्टाची पायरी चढण्याचा पवित्रा घेतला आणि ‘वायर’ संपादकांना तारेवरची कसरत करण्याची नामुष्की आलेली आहे. आधी त्यांनी त्या बातमीची माफ़ी मागून झालेली आहे आणि आता कोर्टाने तो खटला रद्द करावा म्हणून ते संपादक पत्रकार कसरती करत आहेत. अशा भुरट्या सुपारीबाजीला आळा घालणे हेही भ्रष्टाचार विरोधातले अत्यंत प्रभावी आंदोलन ठरू शकेल. कारण एकूणच माध्यमे आता अशा खोटारडेपणाच्या गर्तेत आकंठ बुडालेली आहेत. त्यात अशा सुपारीबाजांना प्रतिष्ठा लाभलेली आहे. त्यातून मग केजरीवाल वा आम आदमी पार्टी अशा विकृती सार्वजनिक जीवनात बोकाळू लागल्या आहेत. त्यांना संपादक शहाणे रोखणार नसतील तर अण्णांनी हेच मोठे शिवधनुष्य पेलायला पुढे आल्यास, त्यांचे जनताच नव्हेतर राजकीय नेतेही स्वागतच करतील.

3 comments:

  1. Bhau,

    Khare Aahe Tumhi Mhanata Te, Aaj Patrakarita Ha 'Bajarbasavi' Sarkha Udyog Zalay, Tyala Nyay-Niti Kasalich Chad Rahileli Nahi.

    Mi Swata Geli 4 Varshe Vartamanpatratlya 'Rajkiya Batmya' Vachane Sodale Aahe Tasech Tya TV Varchya Debatesche. Keval Ekach Ajenda Asato.

    Aata Rajkiya Vishay Fakta ' JAGATA PAHARA ' Varach Vachato, Dusarikade Jayachi Garaj Vatat Nahi.

    ReplyDelete
  2. हि राजकारणातील पत्रकारांची संबंध आजचे थोडीच आहेत .जेव्हा टीव्ही व इतर माध्यमे नव्हती तेव्हा हेच पत्रकार संपादकीय लिहून काँग्रेस चा अजेन्डा चालवत होते लोकांच्या लक्षात पण आले नाही,हल्ली सोशल मीडिया मुळे यांचा खर रूप दिसलं नाहीतर कुमार केतकरांना सभेची उमेदवारी कशी काय मिळाली?
    त्यांनी आणि काँग्रेस ने काबूलच केला ना ते. लोकांना लोकसत्ताचे संपादक म्हणून घेऊन फसवणूक केली ना ,त्यापेक्षा सामना लाख पटीने चांगला ते अशी डबल ढोंग तर आणत नाहीत जे काही आहे ते उघड आहे काँग्रेस सारखाचोर बाजार तर नाही. महाराष्र्टात पत्रकार च नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते ,ngo चे लोक ,बॉलीवूड ,लेखक कवी म्हणवणारे प्राध्यापक असे सर्व लोक काँग्रेस ने पेरून ठेवलेत जरा टोकारले तर त्यांचं खर रूप दिसतं

    ReplyDelete
  3. अण्णांचे हे पाऊल म्हणजे स्वच्छ भारत च्या द्रुष्टीने उत्तम निर्णय .

    ReplyDelete