Thursday, April 12, 2018

बेशरम अब्रुदारांचा देश

asifa के लिए इमेज परिणाम

काश्मिरातील कठुआ आणि उत्तरप्रदेशातील उन्नावच्या घटनांनी पुन्हा एकदा आपल्या देशातील अब्रुदारांची संख्या एकदम फ़ुगलेली आहे. प्रामुख्याने सोशल मीडियात व इतर माध्यमात अनेकांना महिला सुरक्षेच्या चिंतेने ग्रासलेले आहे. त्यांची झोप उडाली आहे आणि अशावेळी मग या लोकांना आपण मोठे अब्रुदार असल्याची आठवण तीव्रतेने होत असते. मात्र आपण ज्या महान सुसंस्कृत सभ्य समाजात जगतोय, तिथे अशा घटना कुठल्या ना कुठल्या कोपर्‍यात नित्यनेमाने घडत असतात आणि त्यातल्या काही तर शेजारीपाजारी घडत असल्याचे यापैकी कोणाच्या गावीही नसते. इतके असे अब्रुदार लोक जागरूक असतात. बालिकांची गर्भाशयातच हत्या होते आणि आपल्या नजिकच्याच सुतिकागृहात तशा हत्या होत असल्याचे या अब्रुदारांना समजण्यासाठी आमिर खानला ‘सत्यमेव जयते’ नावाची मालिका प्रदर्शित करावी लागते. कठुआ किंवा उन्नावला बलात्कार झाले व त्यात कुणा मुलीचा बळी गेल्याचे ऐकून असे अब्रुदार विदीर्ण होऊन जातात आणि काही तासात आयपीएलमध्ये कुठला संघ आघाडीवर असल्याची अगत्याने चौकशीही करताना दिसतील. तेव्हा त्यांना देशात कायदा असतो आणि कायद्याने प्रत्येकाला संरक्षण मिळाले पाहिजे वा कायदा मोडणार्‍याला क्षमा असता कामा नये, असली सुभाषिते आठवत असतात. पण त्यातलेच अनेकजण सलमानला शिक्षा झाल्याने दु:खीकष्टीही होऊन गेलेले असतात. तर कुणाला लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यावर समतेच्या चळवळीचे नुकसान होत असल्याची वेदनाही सतावत असते. निर्भयासाठी हजारो लोक रस्त्यावर अपरात्री उतरले तेव्हा गाढ झोपणारे राहुल गांधी, उन्नावसाठी मध्यरात्री मेणबत्ती पेटवून रस्ता शोधतात आणि निर्भयासाठी दिवसरात्र रस्त्यावर येऊन टाहो फ़ोडणारे भाजपावाले, आज मुग गिळून गप्प बसतात वा युक्तीवाद करताना दिसतील. एकूण आपण बेशरम अब्रुदारांचा देश झालो आहोत.

गुन्हेगारीचा अभ्यास वा आकडेवारी जमा करणार्‍या संस्थांचे अहवाल तपासले, तर उन्नाव किंवा कठुआच्या घटना नव्या नाहीत आणि नित्यनेमाने होणारे गुन्हे आहेत. अगदी आपल्या जवळपास वा शंभर दोनशे पावलावरही तशा घटना अधूनमधून घडत असतात. कधीकधी तर समोर अशा घटना घडत असताना तिथून घाईघाईने पाय काढता घेण्यात पुढाकार असणार्‍यांना आज आसिफ़ा वा उन्नावच्या पिडीतेचा कळवळा आलेला आहे. संधी मिळाली तर यातला प्रत्येकजण धावत जाऊन त्या बलात्कारी गुन्हेगाराचा गळा घोटल्याशिवाय रहाणार नाही, असेच वाचणार्‍याला ऐकणार्‍याला वाटू शकेल. पण प्रत्यक्षातली वस्तुस्थिती अजिबात भिन्न आहे. इतक्या तावातावाने असिफ़ासाठी गळा काढणार्‍यापैकी कोणी घटनास्थळी तिच्या जवळपास असता, तर आधी आपली कातडी बचावण्यासाठी निसटला असता. हे आपले चरित्र झालेले आहे. अगदी त्यात आज मेणबत्त्या पेटवणारे आहेत, तसेच सोशल मीडियातून गळा काढणारे समाविष्ट आहेत. तो बलात्कारी वा तशा लोकांचा जमावही यातला खरा गुन्हेगार नसतो. त्याला फ़क्त अशी संधी मिळालेली असते. खरे गुन्हेगार आपण असतो, जे सर्व काही घडून गेल्यावर टाहो फ़ोडल्याचा तमाशा करीत असतो. रस्त्यावर भरधाव गाडी कोणाला धडक देऊन पळून जाते, तेव्हा ढिम्मपणे ते बघणारे आपण कधी पुढाकार घेऊन गुन्हा घडण्यापासून रोखण्याचा विचार तरी करतो काय? चारचौघांच्या साक्षीने दोन गुंड कुणा मुलीची छेड काढतात वा तिच्यावर अत्याचार करतात. तेव्हा आपल्यातही विरश्री कुठे असते? तिथे कायद्याची गरज नसते, तर सभ्यपणे त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असते आणि तेच कुठल्याही नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण त्यापासून पळ काढतो आणि नंतर पोलिसांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवत असतो. त्यालाच आजकाल सुबुद्ध वा सुसंस्कृत समाज मानले जाऊ लागले आहे. सोशल मीडियाने ते काम आपल्यासाठी सोपे करून ठेवले आहे.

आसिफ़ा या कोवळ्या पोरीला उचलून कोणी असा अत्याचार केल्याचा राग येणे स्वाभाविक आहे. त्यासाठी लाजही वाटण्यात गैर काहीच नाही. पण लाज वाटण्यासाठी ती लाज जपलेला ऐवज आहे काय? लाज त्याला वाटू शकते, जो त्या अब्रुसाठी आपली शक्ती पणाला लावायला सिद्ध असतो. बुडणार्‍याला कायदा वाचवू शकणार नसतो. ते काम तिथे उपस्थित असलेल्याने करायचे असते. आसिफ़ासाठी गळा काढणारे कितीजण आपल्या इर्दगिर्द बालिकांचे शोषण थांबवण्यात पुढाकार घेतील? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. कारण गुन्हे नोंदीकडे बघता मोठ्या प्रमाणात आपल्या आसपास अशा घटना सातत्याने घडत असतात. कालपरवाच हनी इराणी या वयोवृद्ध चित्रपट अभिनेत्रीने आपल्या बालपणी कसे लैंगिक शोषण झाले, त्याच्या आठवणी कथन केलेल्या आहेत. तिच्या आसपास कोणा सभ्य लोकांचा वावरच नव्हता असे म्हणायचे काय? असिफ़ा मारली गेलीय आणि हनी इतकी वर्षे आपली वेदना घेऊन जगली आहे. तिच्यावर होणारा अत्याचार कोणी बघितला नसेल किंवा कुणालाच कळलेला नव्हता, असा दावा आहे काय? आजही हजारो अशा बालिकांचे शोषण भरवस्त्यांमध्ये चाललेले असते. तिकडे ‘समजूतदारपणे’ काणाडोळा केला जात नाही काय? किंबहूना अशा समजूतदारपणालाच आजकाल सभ्यता मानले जात असते. कुठल्या मागास वा आदिवासी समाजात असे काही सहजगत्या चालू दिले जाणार नाही. त्यांच्या पंचायती तिथल्या तिथे अशा विषयाचा निकाल लावून टाकत असतात. आपण तथाकथित अब्रुदार पुढारलेले लोक त्यांना मागास रुढीप्रिय म्हणून हेटाळणी करीत असतो. पण व्यवहारात आपणही तितके मागास नसून पाखंडी झालेले आहोत. कठुआतील कोणी भाजपावाले अशाही हिडीस कृत्याचे धर्माच्या नावाने समर्थन करायला पुढे सरसावले. मग लक्ष्मण मानेंच्या बाबतीत बाबा आढावांनी काय केले होते?

पिछड्या मागास महिलांच्या समाजाच्या उद्धारासाठी लक्ष्मण माने यांनी चालविलेल्या संस्थेतल्याच महिलांनी माने यांच्याकडून आपले लैंगिक शोषण होत असल्याची पोलिसात तक्रार दिलेली होती. त्यानंतर काहुर माजले आणि माने फ़रारी झाले. त्यांनी दडी मारून अटकपुर्व जामिन मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यावेळी दुसरे महान समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रतिक्रीय़ा कठुआतील भाजपावाल्यांपेक्षा तसूभर वेगळी नव्हती. ह्या भाजपा नेत्यांनी आरोपी हिंदू म्हणून त्यांचे वकिली चालविली आहे आणि आढावही न्यायाला फ़ाट्यावर मारून माने यांच्या बदनामीने समतेची चळवळ धोक्यात येण्याची भाषा बोलत होते. परोवर्तनवादी चळवळीतल्या कोणीही बाबा आढावांचा तेव्हा निषेध केला होता काय? कुणाला आढावांचे ते वक्तव्य खटकले तरी होते काय? मानेंच्या पापावर पांघरूण घालताना आढाव म्हणाले होते की शिमग्यापुर्वीच रंगपंचमी सुरू झालीय. त्यात चळवळीचे नुकसान होत आहे. म्हणजे समतेच्या परिवर्तनाच्या चळवळीत महिलांची अब्रु शहीद व्हायला हरकत नसते. अशा युक्तीवादाची कोणाला शरम वाटली नाही. असे लोक अब्रुदार असतात. कारण बलात्कारीता महत्वाची नसते व बलात्कारीही दुय्यम असतो. कोण कुठल्या बाजूचे आहेत, त्यानुसार न्यायाचा व अन्यायाचा चेहरा बदलत असतो. ज्या समाजात असा दुतोंडी अभिजनवर्ग प्रतिष्ठीतवर्ग मान्यता पावलेला असतो, त्या देशात कुठलीही महिला मुलगी सुरक्षित असू शकत नाही. कारण ते गुन्हेगारी व गुंडांचे अभयारण्य असते. सिंह वाघाने शिकार करावी आणि बाकीच्या प्राण्यांनी निमूट बळी जावे, हाच सभ्यपणा असतो. मनुष्यवस्ती नसलेल्या प्रदेशातला हा जंगली कायदा आहे आणि पाखंडी समाजात कायद्याचे जंगल बनवून त्याचेच पालन चाललेले असते. अशा मानवी जंगलात आसिफ़ा वा निर्भया पायदळी तुडवल्या जातात. समतेची न्यायाची लढाई सिंह-वाघ होण्यापुरती मर्यादित झालेली असते.

2 comments:

  1. तुम्ही कृपया मधू किश्वर यांचे ट्विटर हॅण्डल बघा , त्यांनी ह्यात खूप मोठे षडयंत्र आहे असे सांगितले आहे.

    ReplyDelete
  2. या जगात अनेक नकारार्थी गोष्टी आहेत पण जेव्हा एखादी सकारात्मक गोष्ट घडत असते तेव्हा विरोध न करता आणि मागचे दाखले न देता त्या गोष्टीत सहभागी व्हायचे असते.
    मागे काय होतंय किंवा पुढे काय केलं पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न पण जे चुकीच घडलाय त्यावर सडकून टीका केली पाहिजे आणि जेव्हा सर्वजण ती करत आहेत तेव्हा सहभागी न होता असा काही वेगळा विचार मांडण्यात काय अर्थ.??काय फायदा..? यातून काय निष्पन्न होणार..???

    ReplyDelete