Friday, April 6, 2018

दुसरी तिसरी चौथी आघाडी

झुंडीतली माणसं   (लेखांक चौदावा) 

third front image

(गेल्या लोकसभा २०१४ च्या निवडणूकीपुर्वी तीन महिने चंद्राबाबु तिसर्‍या आघाडीतच होते)

त्रिपुरातील विधानसभा निकालानंतर गंभीरपणे विरोधी पक्षांमध्ये मोदीविरोधी भक्कम आघाडी करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांच्याशी हितगुज करून त्याचा आरंभ केला. तर त्याला मिळणारा प्रतिसाद बघून सोनिया गांधींनी कॉग्रेस नेतृत्वाखालीच अशी आघाडी उभी रहावी, म्हणून प्रयत्न सुरू केले. अर्थात अशी आघाडी वा तिची कल्पना नवी नाही. इंदिराजींच्या काळापासून चार दशके हा खेळ रंगलेला आहे. तेव्हा एकट्या समर्थ कॉग्रेस विरोधात अशा आघाडीची कल्पना मांडली जायची. मग विचारधारा वगैरे खुंटीला टांगून विविध पक्ष एकत्र यायचे. पुढे कॉग्रेस दुबळी होत गेली आणि हळुहळू भाजपा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येत गेला. तसे ह्या बाकीच्या पक्षांना आपण पुरोगामी वा सेक्युलर असल्याचा साक्षात्कार होऊन तिसर्‍या आघाडीचा शब्द जन्माला आला. त्याचा अर्थ कॉग्रेस वगळून उरलेल्या पुरोगामी पक्षांची मोट बांधणे असा होता. प्रत्यक्षात कॉग्रेस वा भाजपाला दूर ठेवून फ़क्त समविचारी म्हणजे पुरोगामी पक्षांची मोट बांधण्यात पुढाकार घेणार्‍या बहुतेक पक्षांनी कधी कॉग्रेस तर कधी भाजपाशी राजकीय सोयरिक केलेली आहे. आता कॉग्रेस नामशेष व्हायची पाळी आली असून भाजपाने तिची जागा घेतली आहे. तेव्हा एकीकडे भाजपाविरोधी आघाडी व दुसरीकडे बिगरकॉग्रेस पुरोगामी आघाडी, असा नवा घाट घातला गेला आहे. त्यात सगळ्याच पुरोगामी वा बिगरभाजपा पक्षांनी युती आघाडी केली तर तो प्रयोग कितपत यशस्वी होऊ शकेल? यापुर्वी कॉग्रेस विरोधातला असाच प्रयोग कधीच का यशस्वी झाला नव्हता? हे पक्ष व नेते एकमेकात इतके का भांडतात? अशा अनेक प्रश्नांचे कोडे सामान्य लोकांना पडलेले असते. त्याची उत्तरे सुद्धा झुंडीचे मानसशास्त्र वा कळपाच्या मानसिकतेमध्ये दडलेले आहे.

हे असे एकत्र येऊन पुर्वी इंदिराजींना वा आज मोदींना पराभूत करू बघणारे पक्ष वा नेते, खरोखरच विचारांनी एकत्र येत असतात का? असते तर त्यांच्या वागण्यात वा कृतीमध्ये एकवाक्यता दिसली असती. पण तसे सहसा घडलेले नाही. ठराविक काळापर्यंत त्यांची एकजुट मोठी अभेद्य वाटते. पण त्यात थोडेफ़ार जरी यश मिळताना दिसू लागले, की मुळचा हेतू बाजूला पडून हे लोक एकमेकांच्या उरावर बसलेले दिसतात. हे प्रत्येक वेळी झालेले आहे. १९७७ सालात म्हणूनच जनता पक्षाचा प्रयोग फ़सला आणि १९८९ सालातला जनता दलाचाही प्रयोग फ़सला. पुढे त्याचीच पुनरावृत्ती १९९६ सालात भाजपाला सत्तेपासून अलिप्त राखण्याच्या फ़सव्या प्रयोगातून झाली. असे प्रत्येकवेळी कशाला व्हावे? आपला समान शत्रू वा प्रतिस्पर्धी संपला नसताना, हे लोक असे हेतूला हरताळ फ़ासून एकमेकांचेच पाय कशाला ओढू लागतात? त्याचे विश्लेषण त्यांच्या मनातील कडव्या द्वेषभावनेत सामावलेले असते. त्यांना एकमेकांविषयी काडीचेही प्रेम नसते की आपुलकी नसते. त्यापेक्षा कुणाचा तरी समान द्वेष करण्याच्या भावनेने त्यांना एकत्र आणलेले असते. ते द्वेषाचे लक्ष्य किंचीत जरी दुबळे पडल्यासारखे वाटले, की या एकजुट झालेल्यांच्या द्वेषाची दिशा तात्काळ जवळ उभ्या असलेल्या सहकार्‍याकडे वळत असते. शत्रू दुबळा होत असताना आपला सहकारी शिरजोर होण्याची उपजत भिती व भयगंड त्याचे कारण असतो. म्हणून चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर वा सीताराम केसरी जमलेला डाव उधळून लावत असतात. कारण असे एकत्र येणारे मुळातच माथेफ़िरू स्वभावाचे असतात आणि स्थैर्याने जगण्यात त्यांना अजिबात रस नसतो. स्थिरता येऊ लागली की ते विचलीत होतात आणि जमलेल्या समिकरणाचा विचका सुरू करतात. ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकात त्याचे नेमके वर्णन आलेले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

‘चळवळीत भाग घेणारे माथेफ़िरू अनुयायी हे कोठल्याही सामुदायिक लढ्याच्या विकासमार्गातील प्रमुख अडथळे असतात. कारण माथेफ़िरू हा अस्थिर वृत्तीचाच असायचा असा मानसशास्त्राचा नियम आहे. माथेफ़िरूच्या जीवला स्वस्थता कशी ती माहित नसते. समजा ज्या लढ्यात तो भाग घेतो तो लढा यशस्वी झाला, तरी त्याला समाधान होत नाही. लढा संपून समाजामध्ये स्थिरता येऊ लागली की तो अस्वस्थ होऊ लागतो. मग तो खरीखोटी भांडणे उकरून काढण्याच्या उद्योगाला लागतो. फ़ाटाफ़ुटीला सुरूवात करतो. माथेफ़िरूला भावनांचा अतिरेक आवडतो. तो तशाप्रकरच्या अनुभवाच्या शोधात असतो. परिणामी जनता-लढे ज्या दिवशी विजय प्राप्त करून घेतात, त्याच दिवशी पुढारी मंडळी आपापसात भांडत आहेत असे दृष्य अनेकवार नजरेस पडते. बाह्यशत्रू बरोबर लढताना जो आवेश दाखवला होता तोच आवेश आज आपापसातील भांडणात दाखवत असतात. मुळात प्रत्येक माथेफ़िरू स्वत:चाच द्वेष करतो. चळवळीच्या काळात या द्वेषाची दिशा काही प्रमाणात बाहेरच्या बाजूला वळते. मात्र कुणाचा ना कुणाचा द्वेष करणे, ही या सर्व महाभागांची सवय त्यांना कधीही सोडून जात नाही. यशस्वी चळवळीनंतर द्वेष करण्यासाठी बाहेरचा शत्रू शिल्लक उरत नाही. तेव्हा आता हे माथेफ़िरू परस्परांचा द्वेष करू लागतात. परस्परांना शत्रू समजू लागतात........ हिटलरने त्यांचे नेमके विश्लेषण केले आहे. तो म्हणतो, ‘हे लोक त्यांच्या आयुष्यात कुठेही स्थिर होणार नाहीत. सर्व व्यर्थ किंवा शून्यवाद हाच त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. कारस्थाने करण्यात आणि जे जे स्थिर पायावर उभे असेल ते ते पाडण्यात आणि त्याचा नाश करण्यात त्यांना आनंद वाटतो.’ (झुंडीचे मानसशास्त्र पृष्ठ २१७)

गेल्या अर्धशतकात अनेकदा केलेला हा विरोधी आघाडी वा तिसर्‍या आघाडीचा प्रयोग फ़सला त्याचे उत्तर उपरोक्त परिच्छेदात सामावलेले आहे. आताही त्यापेक्षा काहीही वेगळे होण्याची अजिबात शक्यता नाही. कालपरवा रामलिला मैदानावर अण्णा हजारे यांनी आरंभलेले उपोषण संपले. सात वर्षापुर्वी तशाच उपोषणाने लोकपाल आंदोलन पेटलेले होते आणि त्याने समाज ढवळून निघाला होता. त्यात एकत्र आलेल्या विविध व्यक्तीमत्वांचे त्यानंतर काय झाले? इंडिया अगेन्स्ट करप्शन नामक संघटनेचे काय झाले? त्यातून वेगळा होऊन राजकीय पक्ष स्थापन करणार्‍या केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांची आज काय स्थिती आहे? एकमेकांसाठी जीवास जीव देऊ अशा आणाभाका घेतलेले केजरीवाल, कुमार विश्वास, प्रशांत भूषण, किरण बेदी वा योगेंद्र यादव यांची काय कथा आहे? हिंदी चित्रपटातले ठाकूर चौधरी जितकी कडवी दुष्मनी दाखवू शकत नाहीत, त्यापेक्षा या उच्चशिक्षित लोकांनी आपल्या द्वेष तिरस्काराची नाटके रंगवली ना? पुर्वीचा समाजवादी पक्ष वा नंतरच्या जनता परिवाराची कथा कितीशी वेगळी आहे? वाजपेयी वा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकजुट झालेल्या पक्षांनी पंतप्रधानपद जनता गटाला दिलेले होते. तर त्याला सुरूंग कोणी लावला होता? लालू, मुलायम, पासवान, नितीश, देवेगौडा, शरद यादव हे सगळे कोण आहेत? वेळोवेळी भाजपा वा मोदी विरोधाची डरकाळी फ़ोडून राजकारण केलेल्या अशा नेत्यांना एकदा तरी सलग दहाबारा वर्षे एका पक्षात वा एकदिलाने काम करता आले आहे काय? ही एका जनता गटाची स्थिती आहे. बाकी डझनावारी पुरोगामी पक्ष आहेत आणि प्रत्येक नेत्याचे वेगवेगळे अहंकार त्यांच्या देहयष्टीपेक्षाही अगडबंब आहेत. असे सगळे अहंकार व रागलोभ विसरून एकत्र येण्यासाठी त्यांना मोदींचा द्वेष उपयुक्त ठरतो. पण त्या द्वेष वा धोक्याची तीव्रता किंचीत कमी झाली, तरी आपसातले वैर उफ़ाळून बाहेर यायला वेळ लागत नाही ना?

ममतापासून मायावतीपर्यंत आणि चंद्रखेखर रावपासून सीताराम येचुरीपर्यंत सगळे लोक मोदी विरोधात एकजुटीने वागायला ‘तत्वत:’ नेहमीच राजी झालेले आहेत. पण समस्या व्यवहाराची येते. मोदी किंवा भाजपाच्या विरोधातील आघाडी ही नुसती तत्वधिष्ठीत असून चालणार नाही, तर मताधिष्ठीत असावी लागते आणि तसे व्हायचे तर ५४३ जागी एकाला एक उमेदवार विरोधकांना उभा करता आला पाहिजे. आज लोकसभेच्या अवघ्या चार जागा बंगालमध्ये डाव्यांच्या पदरात पडलेल्या आहेत आणि ३२ जागा ममतांच्या तृणमूल कॉग्रेसकडे आहेत. आहेत तितक्या जागांवर डावे समाधानी होतील काय? नसतील तर त्यांच्यासाठी ममता काही जागा सोडून द्यायला तयार होतील काय? मायावतींकडे उत्तरप्रदेशची एकही जागा नाही आणि समाजवादी पक्षाकडे सात जागा आहेत. त्या दोघांकध्ये ८० जागांचे वाटप कसे होऊ शकते? खेरीज त्यातून पुन्हा कॉग्रेस व अजित सिंग अशांना काही वाटा द्यावाच लागेल. जेव्हा तत्वाच्या पलिकडे व्यवहारी वाटपाचा विषय समोर येईल, तेव्हा तिसरी आघाडी वा एकजुटीचे काय होणार? कारण त्यात सहभागी होणार्‍यांना जागा जिंकल्या हरल्यावर तत्वांचे राजकारण करायचे नसून, अधिकाधिक जागा जिंकण्याचे राजकारण पुढे रेटायचे आहे. त्यात जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षाला वा नेत्याला जागा सोडण्याची लवचिकता कितपत दाखवली जाऊ शकेल? लोकसभेच्या पराभवानंतर त्याचा प्रयोग होऊ शकला असता. डाव्यांनी तो बंगालमध्ये ममताच्या विरोधात केला आणि आता कानाला खडा लावलेला आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश वा हरयाणा राजस्थानात तो कितपत होऊ शकेल? एकजुटीची घोषणा होऊ शकेल. पण त्यातून आघाडीच ३०० हून अधिक जागा जिंकण्याची शक्यता निर्माण होऊ लागली, मग हे सर्व आघाडीवीर एकमेकांच्या उरावर बसण्य़ाशिवाय दुसरे काय करू शकतील?

१९७७ सालात जनता पक्षाचे यश इंदिराजींनी नव्हेतर समाजवादी माथेफ़िरूंनी मातीमोल केले होते. नसलेला द्विसदस्यत्वाचा मुद्दा उकरून काढण्यातून जनता पक्षात दुफ़ळी माजली होती. तर १९९० सालात पुरोगामीत्वाचे भुत स्वार झालेल्या समाजवादी गटानेच जनता दलाचे तुकडे पाडलेले होते. त्यांच्या राजकारणाला आधी इंदिराजी वा नंतर राजीव गांधींना कुठलाही सुरूंग लावण्याची गरज भासलेली नव्हती. इंदिरा हटाव किंवा बोफ़ोर्सने एकत्र आलेल्या असंतुष्टांना आपसात भांडणे करायला जराही वेळ लागला नाही आणि आघाडीत बिघाडी होऊन गेलेली होती. मोदी नावाचे भुत मानगुटीवर त्यांनीच चढवून घेतलेले आहे, तोपर्यंत आघाडी जोमात चालणार आहे. पण जेव्हा मोदींपेक्षा आपलाच कोणी सहकारी पक्ष वा नेता शिरजोर होताना दिसेल, तेव्हा फ़ाटाफ़ुटीला इतकाच आवेश चढलेला दिसेल. कालपरवा बिहारमधला महागठबंधनाचा प्रयोग यशस्वी झालेला होता. पण भाजपाला पराभूत केल्यावर नितीशना सतत कोंडीत पकडून लालूंनी कोणते राजकारण यशस्वी केले? एकमेकांच्या प्रेमापायी किंवा आपुलकीने जवळ येण्याचा कुठलाही विषय नव्हता. किंबहूना नाहीच. या सर्वांना मोदींच्या यशाने पछाडलेले आहे आणि त्यातून आपले अस्तित्व टिकवण्याचा हा लढा सुरू झालेला आहे. त्यात आपण भाजपापेक्षा बलशाली होऊन त्याला पराभूत करावे, अशी कुठलीही इर्षा नाही. मोदी-शहा जोडीसमोर आपण कमकुवत असल्याची भावना त्यांना एकत्र यायला भाग पाडते आहे. त्यातच आघाडीचे विस्कटणे अपरिहार्य झालेले आहे. कारण या पक्षातले वा एकूण आघाडीचे समिकरण मांडणारे राजकीय विचार करीत नसून द्वेषाने प्रवृत्त झालेले आहेत. समविचारी म्हणून एकत्र येत नसून भयगंडाने त्यांना एकत्र बांधलेले आहे. तो भयगंडाचा धागा जरासा सैल पडला, तरी त्यांचे विखुरणे सक्तीचे आहे आणि कुठलेही स्थैर्य त्यांच्या स्वभावातच नाही.

अशाच विविध आघाडीच्या प्रयोगात १९७० नंतरच्या काळात भाजपा (पुर्वीचा जनसंघ) सहभागी झालेले होते. पण त्याची निष्फ़ळता लक्षात आल्यावर त्यांच्या नेतृत्वाने स्वतंत्रपणे कॉग्रेसला पर्याय म्हणून देशव्यापी पक्षबांधणीचा निर्धार केला. त्याला तीन दशकानंतर यश आलेले आहे. काळानुसार व गरजेनुसार त्यांनीही आघाडीत भाग घेतला. पण कॉग्रेसच्या द्वेषापोटी नाही तर कॉग्रेसला पर्याय होण्याच्या भूमिकेतून वाटचाल केली. आज भाजपाच्या पंखाखाली आलेले विविध प्रांत बघितले, तर अशाच प्रयत्नातून आलेले आहेत. उलट याच कालावधीत आपले विस्कटलेले संघटन नव्याने उभारून वा लोकांमध्ये आपले बस्तान पक्के करण्यापेक्षा कॉग्रेस झटपट सत्तेसाठी राजकीय द्वेषातून आघाडीच्या राजकारणात गुरफ़टत गेली. आता कॉग्रेसही अशा दुबळ्या द्वेषाने भारावलेल्या माथेफ़िरूसारखी होऊन गेली आहे. त्यात त्यांनी हातातले गुजरात, दिल्ली वा उत्तरप्रदेश, बिहार गमावले. हळुहळू आपले बालेकिल्ले भाजपाला मोकळे करून दिले. भाजपाच्या नावाने बोटे मोडत बसणे, यापेक्षा कॉग्रेसपाशी आज कुठला राजकीय अजेंडा राहिलेला नाही. म्हणूनच मग ममतांनी जे पऊल उचलले त्या स्पर्धेत सोनियांना उतरावे लागलेले आहे. दुसर्‍या वा तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व आपल्याला मिळावे, किंवा आपल्यापाशी टिकावे, म्हणून या शतायुषी पक्षाला कसरत करावी लागते आहे. त्यातून कॉग्रेसचा जिर्णोद्धार होण्याची बिलकुल शक्यता नसून पुढल्या काळात मार्क्सवादी पक्षाप्रमाणे कॉग्रेसही अस्तंगत होत जाणार आहे. अशा पक्षांमध्ये कोणी नेतृत्व करू शकणारा शिल्लक राहिलेला नाही. मोदी व भाजपाच्या विरोधात खर्‍याखुर्‍या कर्तबगार नेत्यासह इच्छाशक्ती बाळगणार्‍या नव्या पक्षाचा उदय होण्याची गरज आहे. कारण आघाडी हा पर्याय नसून एकजीव संघटनेत एकदिलाने काम करणारेच खरे आव्हान उभे करू शकतात आणि प्रस्थापितामध्ये बदल घडवून आणू शकतात. बाकी कितीही मोठ्या संख्येने भयभीत लोक एकत्र आले, तरी तो निव्वळ जमाव असतो आणि त्याच्याकडून कुठली अपेक्षा बाळगता येत नसते.

(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)

http://www.inmarathi.com/

4 comments:

  1. Bhau what you have written is absolutely correct, I don’t see other than Congress any party having pan India presence, but they need to bring some non gandhi leader like Jyortidtya Scindia or Sachin Piolot who are capable to bring Congress to mainstream

    ReplyDelete
  2. Bhau,

    Tumhi Evhade Talamaline Lihit Ahat Pan Ya 'ModiVirodhakanchi' Sthiti 'Vinashkale Veeparit Buddhi' Ashi Zali Aahe, Aaplya Karmane Te Marat Aahet Tyana Tasech Maru Dyave.

    Tumchyasarkhya Anubhavi Patrakarala Tyanchyat Ektari Changla Goon Distoy Ka Kivva DeshHitasathi Te Ekatra Yet Aahet Ase Watate Ka Tar Uttar Milel Nahi,. Aaj Yanche "WASTED INTERESTED" Purna Hot Nasalyamule Va Gatkalatlya Bhangadinvar Modichya Rajyat Ujed Padun Aapan Ughade Padu Va Tond Lapavinesuddha Jad Jaail Mhanunach He Sagale KAVALE Ekatra Yeun Kaav Kasv Karat Aahet He Aata Sarvanna Samajate. 'Marave Pari Aapkirtirupe Urave' Asha Vicharsarnichya Mansancha Shevat Ha Tharlelach.

    ReplyDelete
  3. Bhau,
    Even if this alliance worked out and only two candidates per seats come true.

    So who's dream it is that India should have two parties 😉 -PM NARENDRA MODI

    means all parties working to make his dream true this is Modi style as u mentioned earlier .

    ReplyDelete
  4. अतिशय योग्य भाऊ.. आता विकासाला विकासच मात देऊ शकेल. 'व्यक्तिगत द्वेष' इतकाच मर्यादित कार्यक्रम घेणारा पक्ष मोदींना आणखी मोठं करेल. विकास वेडा होऊ शकतो जनता फार काळ नाही.

    ReplyDelete