Thursday, November 15, 2018

कसं बोललास शाहीद!

shahid afridi के लिए इमेज परिणाम

पाकिस्तानचा धडाकेबाज फ़लंदाज आणि माजी क्रिकेट कर्णधार शाहीद आफ़्रिदी याने इंग्लंडमध्ये केलेल्या एका विधानाने त्याच्या मायदेशी खळबळ माजलेली आहे. कारणही स्वाभाविक आहे. आजकाल पाकिस्तानचे राजकारण क्रिकेटमय झाले आहे. तिथला पंतप्रधानच क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व गोलंदाज आहे. मात्र त्याला वाटली होती तितकी पाकिस्तानची राजकीय स्थिती सुखरूप नाही. टॉस जिंकून आधी फ़लंदाजी घ्यावी आणि पहिले पाचसहा फ़लंदाज किरकोळ धावसंख्येत बाद व्हावेत, तशी इमरानची एकूण अवस्था आहे. अशावेळी नेहमी अष्टपैलू मानल्या जाणार्‍या कर्णधाराला डाव संभाळावा लागत असतो. इमरानखान त्याच अवस्थेतून जात आहे. मात्र सुंभ जळले तरी पीळ जात नाही, या उक्तीप्रमाणे पाकचा क्रिकेटपटू पंतप्रधान काश्मिरचा राग आळवत बसला आहे, मग इंग्लंडला गेलेल्या दुसर्‍या माजी कर्णधाराला लोकांनी वेडेवाकडे प्रस्ग्न विचारले तर नवल नाही. शाहीद आफ़्रिदीला असाच कोणी काश्मिर विषयी प्रश्न विचारला आणि त्याने आपल्याला ज्येष्ठ असलेल्या इमरानची अब्रुच चव्हाट्यावर आणली. असलेले चार प्रांत पाकिस्तानला संभाळता येत नसतील, तर काश्मिर घेऊन काय करायचे आहे? असा प्रामाणिक सवाल आफ़्रिदीने प्रश्नकर्त्यालाच विचारला. काश्मिर पाकिस्तानने काबीज करण्यापेक्षा असलेले चार प्रांत संभाळावेत आणि काश्मिरला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी. तिथला रक्तपात तरी निदान थांबू शकेल. पाकिस्तानला काश्मिर नकोच आहे असे आफ़्रिदी म्हणतो, तेव्हा त्याला त्या भूमी वा लोकसंख्येचे नियोजन व संभाळही पाकिस्तान करू शकणार नाही, असेच म्हणायचे आहे. म्हणजेच जो काही पाकिस्तान आहे तोच दिवाळखोरीत व अराजकात बुडाला असल्याची कबुलीच आफ़्रिदीने दिली आहे. मग काश्मिर हवा कशाला? हा सवाल योग्य व वास्तविक असला, तरी तो विचारणार्‍या आफ़्रिदीला अजून पाकिस्तान मात्र कळलेला नसावा.

काश्मिरात वाद वाढल्याने तिथले लोक मारले जातात. हिंसाचार व रक्तपात होतो, शांतता निकालात निघाली आहे. कुठल्याच आसपासच्या लोकांना सुखरूप समाधानी जगता येत नाही. म्हणून माणूसकी सर्वात महत्वाची आहे. मरणारे वा मारणारे कुठल्या जात धर्माचे आहेत, ते महत्वाचे नसून तीही माणसे आहेत. याकडे आफ़्रिदीने लक्ष वेधले आहे. तसेच असेल आणि आफ़्रिदीला माणूसकीचा इतकाच कळवळा आलेला असेल, तर मग पाकिस्तान तरी कशाला हवा होता? असा प्रश्न त्याला पडायला हवा होता. कारण पाकिस्तान हा देशच मुळात रक्तमासाच्या चिखलाने शिंपडून उभा करण्यात आला आहे. आपण मुस्लिम लोकसंख्या असल्याने आपण वेगळा देश वा राष्ट्र असल्याच्या दुराग्रहामुळे हिंदूस्तान नावाच्या देशाची फ़ाळणी झाली. करोडोच्या संख्येने तिथे वसलेल्या बिगर मुस्लिमांना पिढीजात घरेदारे सोडून भारतात पळून यावे लागलेले होते. अनेकजण सुखवस्तु होते आणि रातोरात देशोधडीला लागले. पण तरीही त्यांना सुदैवीच म्हणावे लागेल. कारण जे कोणी अंगावरच्या वस्त्रानिशी घर सोडून पळाले आणि जीव मुठीत धरून दिल्ली अमृतसरच्या दिशेने आले, ते बचावले तरी. बाकी लाखो शिख हिंदूंची आजच्या पाकिस्तानात कत्तल होत राहिली, अगदी मागल्या सत्तर वर्षात तिथे घटलेली हिंदू-शिखांची संख्या खुप बोलकी आहे. आजही कोणी बिगर मुस्लिम तिथे सुरक्षित नाही. ख्रिश्चन धर्म आचरण करणार्‍या आशियाबी नामक महिलेचे हाल हल्लीचेच आहेत ना? तिच्या वाट्याला आपल्याच मायदेशात अशी दुर्दशा कशामुळे आली? की आफ़्रिदीला पाकिस्तानात काय चालले आहे, तेही ठाऊक नाही? असते तर त्याने अशी हवेतली विधाने केली नसती. काश्मिर पाकिस्तानला नको असेल तर ठिक आहे. पण पाकिस्तान तरी कशाला हवा आहे? कोणाला हवा आहे? मुठभर राजकारणी व तितकेच सेनाधिकारी यांचे पोटपाणी चैन यापेक्षा पाकिस्तानच्या अस्तित्वाला काय अर्थ उरला आहे?

धर्माच्या नावाने जे राजकारण म्हणून मागल्या शतकाच्या पुर्वार्धात मुस्लिम मौलवी व कडव्या धर्मनिष्ठ राजकारण्यांनी हे भूत निर्माण केले, आफ़्रिदी त्या भुताटकीलाच आपली मातृभूमी समजून बसला आहे. रक्त सांडणार्‍या कैचीत सापडलेल्या काश्मीरच्या गोष्टी सांगतो आहे. तिथे ज्या मुठभरांचा रक्तपात आजही चालू आहे, त्याच्या हजारपटीने काश्मिरी लोक अनेक पिढ्या बरबाद होऊन गेलेले आहेत. काही लाख काश्मिरी हिंदू उध्वस्त होऊन गेले आहेत आणि भारताच्या ताब्यात असूनही इथल्या काश्मिरात सुखाने हिंदू जगू शकत नाही, अशी स्थिती आहे. कारण तो काश्मिरचा प्रादेशिक विषय नसून धार्मिक राजकारणाचा पेच आहे. जगावर इस्लामचा झंडा फ़डकावण्याच्या इर्षेला पेटलेल्यांचा रक्तरंजित खेळ आहे. बाकीच्या धर्माचे सोडून द्या, शिया मुस्लिमांची होणारी कुठल्याही देशातील कत्तल आफ़्रिदीला कळत नाही  काय? त्याच्याच पाकिस्तानी देशामध्ये ज्या अहमदीया पंथाच्या लोकांची निर्घॄण हत्या सातत्याने होते असते, त्यांचे काय? ते बिचारे स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेतात. तर त्यांना पाखंडी ठरवून ठार मारले जात असते ना? शिया वा अहमदिया मुस्लिमांच्या मशिदीत नित्यनेमाने होणारे बॉम्बस्फ़ोट कशासाठी होत असतात? काश्मिर पाकला मिळावा म्हणून नव्हेतर, कोणाचा इस्लाम खरा, अशा वादातून ही हत्याकांडे होत असतात. तेव्हा समस्या समजून घेतल्याशिवाय आफ़्रिदीने असली राजकीय वक्तव्ये करण्याचे काही कारण नाही. वादग्रस्त होऊन थोडी जास्त प्रसिद्धी मिळू शकेल. पण प्रश्नाचा अधिक चुथडा होऊन जाईल आणि रक्तपात थांबवायचा असेल तर मुळात धर्माचे राजकारण व अट्टाहास थांबवावा लागेल. ते इमरानच्या हाती नाही की आफ़्रिदीच्या हातातली गोष्ट नाही. कारण समस्या राजकारणात नसून धर्माच्या नावाने माजवलेल्या थोतांडात सर्व गुणदोष सामावलेले आहेत. ते सत्य बोलण्याची हिंमत पुरोगामी लोकांमध्ये नसेल तर मुस्लिमात कुठून असायची?

आफ़्रिदीने जो काश्मिरातील हिंसा व रक्तपाताचा विषय काढला आहे, तो ऐकून इथले अनेक हिंदूत्ववादी हुरळून जाऊ शकतात. कारण त्यात पाकिस्तानला दोन खडेबोल सुनावले असाही आभास निर्माण होतो. पण व्यवहारात त्यातून आफ़्रिदीचे अज्ञानच प्रकट होते. तो प्लास्टीकची बॅट घेऊन अंगणात क्रिकेट खेळत होता, तेव्हापासून काश्मिरातला हिंसाचार सुरू झालेला आहे आणि त्याचा बोलविता धनी पाकिस्तानच आहे. अगदी क्रिकेटमध्येही धर्माने लुडबुड करायची बाकी ठेवली नाही, हे त्याचा कर्णधार म्हणून नेतृत्व केलेल्या इंझमाम उल हकने कृतीतून दाखवून दिलेले आहे. मग नसत्या उचापती आफ़्रिदीला कोणी सांगितल्या आहेत? अजून त्याचा कोणी मुडदा पाडलेला नाही आणि वेळ आल्यास पाडतीलही. तेव्हा काय रडायचे, ते त्याने आपल्या आप्तस्वकीयांना आतापासून पढवून ठेवावे. शक्य झाल्यास इमरान खानला भेटून हे शहाणपण शिकवावे. पंतप्रधान म्हणून देशाच्या चार प्रांतांचा कारभार चालवता येत नाही आणि कायदा व्यवस्था राखता येत नसेल; तर काश्मिरच्या उचापती कशाला हव्यात? हे लोकांना नव्हेतर पाकिस्तानी पंतप्रधानाला समजावण्याची गरज आहे. बाकीची पाक जनताही असल्या जिहादी राजकारणाला कंटाळलेली आहे. पण तिला काही करता येत नाही आणि ‘नया पाकिस्तान’ घडवायला निघालेल्या इमरानला सत्ता मिळाल्यावरही जुन्या काश्मिरी जिहादमधून मुक्त होता येत नाही. मग मधेच उठून आफ़्रिदीने शहीद होण्याचा आव तरी कशाला आणायचा? त्यापेक्षा त्याने आपली लोकप्रिय प्रतिमा वापरून पाक जनमानसात त्याचा प्रचार प्रसार करावा. मग काही फ़रक पडू शकेल. निदान विविध प्रांतातील लोक उठून इमरानला काश्मिरातील उच्छाद थांबवण्यासाठी आग्रह धरू लागतील आणि मानवतेला कलंक लावणारा त्या भूमीतला रक्तपात आटोक्यात आणायला हातभार लागू शकेल. नुसत्या वल्गना करण्यात अर्थ नाही.

7 comments:

  1. पाकिस्तान फक्त नवाबांसाठी वेगळा झाला होता आजही तेच आहे मग इथले पाकप्रेमी कोणत्या लोकांशी संवाद करायला बघतात? सिंध बलुच पश्तुन कुठेही दिसत नाहीत WHO च्या अहवालानुसार मानसिक रोगाने पिडीत सर्वात जास्त लोक पाकमधे आहेत तस होणारच

    ReplyDelete
  2. जन्मापासुनच पाक भिकारी आहे भारताने ५५ कोटी दिले तेवापासुनच नंतर सौदी अमेराका चीनने भीक दिली पण आता खरच भीक कोणी देत नाही.पाकच काय होणारेय लवकरच कळेल आणखी एक किंवा चार तुकडे पडणार

    ReplyDelete
  3. भाऊ राफेलबद्दलचा मतमतांतराचा गलबला आपणच समजावू शकता... नक्की काय गौडबंगाल आहे हे आपल्या अभ्यासपूर्ण लेखात वाचायला आवडेल... लेखाची म्हणजे ब्लॉगची वाट बघत आहे

    ReplyDelete
  4. भाऊ
    मारमीक विशलेषन .
    पण इतकी हिंमत कोणी करू शकत नाही.

    ReplyDelete
  5. खरोखरच सडेतोड लिहिले आहे. अजून यावर कुठल्याच हिंदुत्ववाद्याने प्रतिक्रिया दिली नाही याचे आश्चर्य वाटते. पाकिस्तानी सरकार सामान्य जनतेचा कानोसा घेण्याचे धाडस कदापी करणार नाही.
    फ्रेंच राज्यक्रांती सारखे काही अघटित घडले तरच शक्य आहे.

    ReplyDelete
  6. हे शीर्षक अस सुद्धा होऊ शकत.

    "आता कस बोललात भाऊ"
    कोणताही धर्म व जातीवर आधारित देशाच राजकारण शेवटी त्या देशाला अधोगती कडेच घेऊन जाते.

    त्यासाठीच घटनाकारांनी धर्म निरपेक्ष लोकशाही राज्याची निर्मिती केली कारण सर्वांना एकसंध ठेऊन देश प्रगती करु शकतो.

    ReplyDelete