Friday, November 16, 2018

आधुनिक दंतकथेचा नायक (उत्तरार्ध)

Related image

कुठलेही शब्द बेधडक बोलण्याची त्यांची हिंमत जगाला चकीत करणारी होती. इतर कोणी जे बोलायला धजावणार नाही, ते बोलण्याची व त्याला घट्ट चिकटून रहाण्याची ही हिंमत या माणसात कुठून आली असेल? मजेची गोष्ट अशी, की त्यांनी लिहावे किंवा बोलावे, त्यावर कायदेशीर कारवाई करायचे धाडस सरकारलाही होत नसे. अनेकजण त्यांच्यावर खटले भरून त्यांना हैराण करू शकले असते. पण तसे झाले नाही. कारण जे कोणी त्यांना ओळखत होते, त्यांना शब्दातल्या अर्थापेक्षाही आशय समजलेला असावा. भावनांचा उद्रेक यापेक्षा बाळासाहेबांच्या मनात कुठे कुणाविषयी किल्मीष नसायचे. म्हणून कुठलेही शब्द वापरण्याची मुभा या जगाने त्यांना दिलेली होती. त्यातली निष्पाप भावनाही लोकांना उमजलेली होती. ते पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादादनेही बोलून दाखवले. अखेरच्या दिवसात साहेबांची प्रकृती बिघडली, तेव्हा अनेकांच्या प्रतिक्रीता वाहिन्यांवर घेतल्या जात होत्या, त्यात मियादादही होता, आपल्या मातोश्री भेटीची आठवण त्याने कथन केली. पाकच्या विरोधात इतके जाळजळीत बोलणारा हा माणूस घरी भेटायला गेलो, तर माझ्या कुटुंबाची विचारपूस करत होता. ‘अजिब आदमी थे, ना पाकिस्तान ना दुष्मनी, हमारे बालबच्चे फ़ॅमिलीकी बारेमे पुछते रहे.’ एका पाकिस्तानी खेळाडूचे नवल यासाठी होते, की जाहिर भूमिकेतून त्याला ठाऊक असलेला बाळासाहेब आणि समोर साक्षात अनुभवास येणारा शिवसेनाप्रमुख यात जमिन अस्मानाचा फ़रक त्याला दिसला होता. व्यासपीठावरून पाकविषयी बोलणे व घरी आलेल्या पाहुण्याला अपमानित करणे, यातला फ़रक मियादादला चकीत करून गेला होता. कारण तो राजकारण्याला भेटायला आला होता आणि भेटला होता एक कुटुंबवत्सल माणूस! पण वास्तवात तेच खरेखुरे बाळासाहेबांचे रूप होते. राजकारण त्यांनी खेळले खुप, पण ते त्यांना कधीच मानवले नाही. ते सामान्य माणूसच राहिले.

१९९४ सालची गोष्ट आहे. सुरेश खानोलकर हा माझा मित्र तेव्हा दुखणाईत होऊन इस्पितळत दाखल झाला होता. त्याच्या ‘खतरनाक’ या दिवाळी अंकाची एक प्रत साहेबांना सर्वात आधी द्यावी ,अशी त्याने मागणी केली आणि मी नरक चतुर्दशीच्या दिवशी मातोश्रीवर गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहसिनखान आलेल होता. तेव्हा तो इथे भारतात येऊन काही हिंदी चित्रपटात हिरो म्हणूनही झळकला होता. कोणी मुस्लिम बिल्डर उद्योगपती त्याला मातोश्रीवर घेऊन आलेले होते. त्यांची पत्नीही तिथेच बसलेली होती. बहुधा दिवाकर रावतेही तेव्हा तिथे होते. कुठून तरी बोलता बोलता विषय मुस्लिमांकडे वळला. अकस्मात साहेब मोहसिनखानला म्हणाले, माझ्यावर मुस्लिमांना लांडे म्हटल्याचा आरोप होतो. तर मी काय चुकीचे बोलतो? तुमचे ‘ते’ थोडे कापलेलेच असते ना? कापल्याने तोकडे झाले तर मराठीत त्याला लांडे म्हणतात. मग माझे काय चुकले? अर्थात हे सर्व साहेब त्यांना साधेल तितक्या हिंदीत बोलत होते आणि ऐकणारे चपापलेले होते. तो मोहसिनखान इतक्या दडपणाखाली होता, की तो अवाकच झाला होता. साहेबांनी चुकले कुठे म्हणून विचारले तर तो बिचारा काय उत्तर देणार होता? तरी साहेबांनी पुन्हा विचारलेच. ‘कुछ गलत है क्या?’ बिचार्‍याने नकारार्थी मान हलवली आणि विषय बदलून संवाद पुढे सरकला. थोड्या वेळाने ती मंडळी निघून गेली आणि मीच साहेबांना म्हणालो, तुम्ही काय बोलून गेलात? तर माझ्याकडे चमत्कारीक नजरेने बघत त्यांनी विचारले काय बोललो? त्यानेही मान्य केले की. मुस्लिम असले म्हणून काय झाले मी बोललो, तेच खरे आहे आणि त्यानेही मान्य केले ना? त्यावर मी म्हणालो, पण त्यांच्या सोबत एक बाई होती ना? तेव्हा मात्र चपापल्यासारखे साहेब उत्तरले, हे मात्र चुकले. त्या बाईसमोर असे शब्द बोलायला नको होते. बस्स!.

यातली गंमत लक्षात घेतली पाहिजे. समोर बसलेल्यात तिघेजण मुस्लिम होते आणि त्यातला एक चक्क पाकिस्तानी होता. तरी जाहिरपणे मुस्लिमांना लांडे म्हणणारे बाळासाहेब त्यांनाच आपल्या शब्दात काही चुक आहे काय असे विचारत होते. त्यातून त्यांच्या धार्मिक भावना दुखावतील वा अन्य काही आपल्यावर आरोप होतील, याची त्यांना अजिबात फ़िकीर नव्हती. आपण जे शब्द बोललो ते योग्य असल्याची त्यांना खात्री होती आणि म्हणूनच त्यांनी थेट मोहसिनखानलाच असा प्रश्न विचारला होता. त्यानेही वाघ्याच्या गुहेत बसलेल्या कोकराप्रमाणे त्याला होकार भरला होता. पण त्याला तिथे घेऊन आलेल्या भारतीय मुस्लिम उद्योगपतीचे काय? त्याचा उपमर्द होईल असेही साहेबांना कशाला वाटले नसेल? उद्या तोच उद्योगपती बाहेर जाऊन याचा गवगवा करील व पक्षाला त्याची वेगळी किंमत मोजावी लागेल, अशीही कुठली चिंता या पक्षप्रमुखाच्या सुरात नव्हती. म्हणूनच मी विचारले तर त्यांनी आपल्या शब्दाचा ठामपणे आक्रमक तर्‍हेने बचाव केला होता. पण दुसर्‍याच क्षणी म्हणजे तिथे एक महिला असल्याचे लक्षात आणुन दिल्यावर चपापलेल्या मुलाप्रमाणे आपली चुक मान्य केली होती. कुठल्या राजकीय नेत्याला इतके निरागस राहुन राजकारण करता येईल? काही मिनीटे आपली चुक नसल्याचे ठामपणे सांगणारा हा मोठा नेता, चुक लक्षात आल्यावर कुठलेही आढेवेढे न घेता विनासायास शब्द चुकल्याचे मान्य करतो, हे किती भारतीय नेत्यांना शक्य आहे? भले हा प्रसंग जाहिर नव्हता. खाजगीतला होता. पण दोन व्यक्तीतला संवाद नव्हता. त्याला अनेकजण साक्षीदार होते. पण आपल्या शब्दावरचा विश्वास व चुक मान्य करण्यातला प्रामाणिकपणा दुर्मिळ आहे ना? बाळासाहेबांचा हाच मोठेपणा होता. राजकारणातले डावपेच वा फ़ायदेतोटे ओळखून त्यांना कधी जगता आले नाही, की आपल्या जगातील प्रतिमेला ते बळी पडले नाहीत.     

अख्खी नदी अंगावर घेऊन हा माणूस राजकारणापासून किती व कसा कोरडा राहू शकला? मी मार्मिकमध्ये असताना त्यांनी शिवसेनेचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला नेलेले होते. मला तो विषय घ्यावा असे वाटलेले होते, म्हणून मी त्यांना भेटायला मातोश्रीवर गेलो होतो. तर त्या भेटीत काय झाले व कुठली चर्चा झाली, तेच त्यांना स्पष्ट करता येईना. मला त्याची गंमत वाटली. शिष्टमंडळ तुमच्या नेतृत्वाखाली असेल, तर मुख्य चर्चा तुम्ही व मुख्यमंत्र्यांची झाली असणार ना? मग काहीच कसे आठवत नाही? हे हसून उत्तरले, मी कोणाला भेटायला गेलो होतो? मुख्यमंत्री कोण आहे? यावर मी उत्तरलो, शंकरराव चव्हाण! त्यांना कधी समोरासमोर भेटलायस का? मी उत्तरलो नाही. त्यावर साहेब म्हणाले, भेटूनही उपयोग नाही. कारण तू व्यंगचित्रकार नाहीस. अरे मी शिवसेनाप्रमुख असलो, तरी मुळचा कार्टुनिस्ट आहे. समोर कार्टूनला योग्य चेहरा व व्यक्तीमत्व बसलेले असेल, तर त्याच्या बोलण्यातल्या गंभीर विषयाकडे लक्ष कसे राहिल? शंकरराव असे व्यक्तीमत्व आहे, की त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्यांची रेखाचित्रे रंगवावीत. हे असेच होणार हे मला ठाऊक असल्याने मी त्यांना कधीच एकटा भेटत नाही. ते मनोहरपंत, सुधीरभाऊ, नवलकरांना सोबतीला घेऊन जातो. ते ऐकत असतात, बोलत असतात. मी निरिक्षणे करीत असतो. मध्येच कोणी हटकले तर इतरांकडे प्रश्न ढकलून आपले निरिक्षण चालू! शंकररावांचे ओठ कसे आहेत? नरसिंहरावांचे ओठ कसे आहेत? नुसत्या ओठांना उठाव दिला की व्यंगचित्र तयार! बाकी पार्श्वभूमी तात्कालीन विषय असेल, तशी घ्यायची. ह्याला कोणी एका राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणायचे? राजकारणात डुंबूनही जो माणूस इतका अलिप्तपणे राजकीय व्यक्तीमत्वांचा व्यंगचित्रातून विचार करत असेल, तर त्याच्यातली ती अलिप्तता किती अपवादात्मक असेल ना?

याच कारणास्तव मला बाळासाहेबांशी जुळवून घेता आले. पन्नास वर्षाची पत्रकारिता करताना सहसा कुठल्याही नेत्याला भेटायचे टाळलेला बहुधा मी मराठीतला एकमेव पत्रकार असेन. बाळासाहेब असे जवळून व अफ़लातून बघता आले नसते, तर याही नेत्याशी कधी जवळीक झाली नसती. सहसा राजकीय नेता आपला आब व प्रतिष्ठा राखुन इतराशी संवाद चर्चा करत असतो. पण बाळासाहेबांची गोष्ट वेगळी होती. मुंबईच्या कुठल्या कोपर्‍यातला फ़ेरीवाला वा झोपडपट्टी रहिवासी असो, किंवा कोणताही उद्योगपती असो, त्याच्याशी तितक्याच मोकळेपणाने बोलणे वागणे या माणसाला साधलेले होते. तुमची त्याच्याकडून काही अपेक्षा नसेल, तर त्यांना घाबरून वागण्याचीही गरज नव्हती. ते कोणाशीही मित्रासारखे वागू शकत होते. तुम्हाला त्यातला मित्र ओळखता आला नसेल, तर दोष त्यांना देता येणार नाही. तुमचे पुर्वग्रह हा त्यांचा गुन्हा नाही. माझ्या पत्नीने जिहादची तोंडओळख करून देणारे पुस्तक लिहीले व साहेबांचा अप्रण केले होते. त्याचे प्रकाशनही त्यांच्याच हस्ते व्हावे, ही तिची अपेक्षा होती. म्हणूनच आमच्या कुटुंबातील सर्वजण प्रथमच मातोश्रीवर गेलो होतो. प्रकाशनाचा विषय बाजूला राहिला आणि साहेब गप्पातच रंगून गेले. त्यांनी जुन्या काळातील प्रबोधनकारांच्या अनेक आठवणी त्यावेळी जाग्या केल्या. मला कायम आवाज चढवून बोलण्याची संवय आहे आणि तिथेही मी तसेच बोलत होते. तर माझ्या साडूंना तो शिवसेनाप्रमुखांचा अवमान वाटला असावा. तो एका हाताने मला आवाज खाली ठेवण्यासाठी इशारा करीत होता आणि माझे तिकडे लक्षच नव्हते. परंतु जगातल्या एका महान व्यंगचित्रकाराचे तिकडे बारीक लक्ष होते. त्यांनी माझ्या साडूला हटकले, तुम्ही असा हात कशाला हलवता आहात, हे विचारल्यावर गडी गळपटला. साहेब विचारतात तर तो नाही नाही म्हणू लागला. साहेब म्हणाले, नाही कसे, मी मघापासून बघतोय तुम्ही हात हलवित आहात. पण काही उपयोग नाही.

या संवादाने उपस्थित सगळेच चमकले आणि माझ्या साडूला उगाच घाम फ़ुटायची वेळ आली. कारण त्याच्या समजुतीतले बाळासाहेब आणि समोरची व्यक्ती यातला फ़रक त्याला उमजला नव्हता. तेव्हा त्याला समजावित साहेब म्हणाले, बाहेर जगात म्हणतात, माझा दबदबा आहे. पण इथे बघताय ना? मला कोण चढ्या आवाजात दम भरतोय? भाऊ इथे आला मग असाच दमदाटी करतो मला. काय करू शकतो सांगा? आपला इशारा भाऊने ओळखला नाही व साहेबांनी पकडला, म्हणून माझा साडू खजील झाला होता. पण त्यामुळे त्याच्या मनातली या महान व्यक्तीविषयीची प्रतिमा कायम बदलून गेली. त्यापुर्वी मी साहेबांधी काय बोलायचो ते घरी सांगूनही कोणाचा त्यावर विश्वास बसलेला नव्हता. कारण त्यांच्या मनातली शिवसेनाप्रमुखाची दहशत पक्की होती. प्रत्यक्ष ती व्यक्ती व त्याच्याशी झालेला संवाद जेव्हा त्यांनी अनुभवला, तेव्हा त्यांचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की कानावर! जगाला राजकारणातला हा माणूस ठाऊक आहे, त्याची व्यंगचित्रे, वक्तव्ये व विधाने माहिती आहेत. परंतु आपल्या जीवनक्रमात या माणसाला प्रत्यक्ष जे कोणी भेटले आहेत, त्यांच्याकडे अशा शेकडो दंतकथा असतील, ज्या जगासमोर क्वचितच आल्या असतील. राजकारणात इतका ॠजू व नम्र नेता मला तरी कोणी दिसला नाही. त्यांच्या कृपेने मोठी सत्तापदे भूषवलेल्यांनाही तितकी नम्रता वा समज दाखवता आलेली नसेल. शेकड्यांनी सत्तापदे इतरांना वाटून मोकळा झालेला हा माणूस, कुठल्या पदाच्या मोहात सापडला नाही आणि एक सामान्य माणूस म्हणून जगण्याचा अट्टाहास त्याने कधी सोडला नाही. आपल्या वागण्याबोलण्यातून त्याने आपले अढळपद निर्माण केले. साडेचार दशके देशातील एका मोठ्या राज्याचे राजकारण करूनही राजकारणापासून पुर्णपणे कोरडा राहू शकलेला दुसरा कोणी नेता मला तरी ठाऊक नाही.  (संपुर्ण)


8 comments:

  1. भाऊ, माननीय बाळासाहेब आम्हाला समजलेच नाहीत असेच म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  2. FAR MAST BHAU...
    kahipan asude pan vachatana dolyat pani ale

    ReplyDelete
  3. Bhau,bharun pawlo.tumche balasahebanbarobarche kisse ya vishayawar swatantra pustak liha.khare balasaheb Maharashtra la samjtil.

    ReplyDelete
  4. विनम्र अभिवादन !

    ReplyDelete
  5. Bhau
    Really unbelievable .Pl. write series of artical on Balasaheb.

    ReplyDelete
  6. बाळासाहेबांनी घराणेशाही का होऊ दिल्ली असेल?

    ReplyDelete